विंचवाचे बिऱ्हाड

Submitted by Abuva on 27 February, 2023 - 02:00
Vinchavache Birhad (DALL-E generated)

"का..का, का..का" छोट्या अनुयाच्या बालमुखातून शब्द उमटले आणि...

"अरे वा वा वा वा" असा आम्ही सगळ्यांनी मिळून गिल्ला केला! पहिल्यापहिल्या शब्दांचा हा आनंदच असा असतो. पहिलं पाऊल, पहिला शब्द ह्या बाललीलांचा महिमा काय वर्णावा! अनुया ही आमच्या समोरच्या फ्लॅटमधल्या जोडप्याची मुलगी. पहिलीच. त्यामुळे सगळ्याच गोष्टींचं अप्रूप काय सांगू महाराजा! त्यात गेल्या दोनतीन वर्षांत आम्ही सगळेच घरी बसलो होतो. त्यामुळे आमची घसट खूपच वाढली होती. अगदी घरच्यासारखेच होतो म्हणा ना. विनोद आणि करूणा हे कोविड सुरू झाला तेव्हा नुकतंच लग्न होऊन या गावात रहायला आले होते. आणि आता त्यांच्या संसारात हा नवा जीव आला होता. या काळात रूपाचा आधार होता करूणाला. खरं तर रूपा वयाने तिच्या आईएवढी होती . पण रूपाकडं बघून तिच्या वयाचा अंदाज येणं कठीण होतं. आणि सदैव उत्साही स्वभाव यातून तिचं वय जाणवत नसे. म्हणूनच तिचं आणि करूणाचं चांगलं जमलं होतं. मात्र मी वयाच्या मानानं थकलो होतो, कारणं काहीही असोत. त्यामुळे अनुया मला काका म्हणण्यापेक्षा आजोबा म्हणाली असती तरी चाललं असतं!
मी आणि रूपा, आता तीसहून अधिक वर्षं झाली आमच्या संसाराला. पण फळला नव्हता. नाही, त्याचं काही मोठं नाही. विंचवाचे बिर्‍हाड पाठीवर घेऊन दर दोन चार वर्षांनी नोकरी बदलून वा ट्रान्स्फर घेऊन अनेक देशांत, वेगवेगळ्या गावी आणि प्रदेशांत काढून गेली पाचेक वर्षं आता इथे मुक्कामी होतो. या अस्थिर जीवनामुळे म्हणा वा इतर कोणचं कारण असेल, आमचा मित्र परिवार म्हणा, नातेवाईक म्हणा अगदी थोडे होते. नव्हतेच म्हणा ना. त्यामुळे, कोवीड काळात जमून आलेलं हे विनोद-करूणा बरोबरचं नातं, ते अनुयाचं दिसामाजी वाढणं, हे खूप भावलं होतं. रूपाचा विचार होता, की आता ही वणवण थांबवावी. पन्नाशी उलटली, आता इथेच रहावं असं तिला खूप कुठे तरी आतून, खोलवरून वाटत होतं. पण, पण माझी तयारी होत नव्हती. माझ्या मनात चलबिचल होती. त्यामुळेच आमचे गेले काही दिवस खटके उडत होते.

अनुयाच्या मागे मागे रूपा-करूणा गेल्या. चहाचे घुटके घेत मी आणि विनोद बसलो होतो. विनोद उठला. खिडकीजवळ उभा राहिला. काही तरी विचार करत होता. "रमेशदा, खरं तर हे करूणा रूपावहिनींशी बोलणार होती पण मी विचार केला पहिल्यांदा तुमच्याशी‌ बोलून घ्यावं."
"हं, हं, बोल ना?" मी विचारलं.
"आपल्याकडे ज्या अंबिका बाई काय करतात, त्यांचा तुम्हाला कसा अनुभव आहे?"
"म्हणजे? चांगली आहे की बाई. का रे? काय झालं अचानक? असं का विचारतोयस?"
"दादा, घरातून वस्तू, किंमती वस्तू गायब झाल्या आहेत"
"काय सांगतोस?"
"हो दादा. अनुयाच्या पायात आजीनं घातलेलं बाळलेणं होतं सोन्याचं. आता ते नाहीये!"
"काय?"
"हो दादा. गेल्या आठवड्यात अनुया आजारी होती ना तेव्हापर्यंत होतं ते. त्या काळात काळजीमुळे की काय आमच्या लक्षात आलं नाही. पण काल अचानक लक्षात आलं. बरंच शोधलं घरात पण काही सापडलं नाही. "
"आणि तुम्हाला अंबिका बाईंबद्दल शंका येते आहे?"
"हो दादा. कारण आमच्या घरी गेल्या आठवड्यात त्या सोडून दुसरं कोणीच आलं नाहीये. आणि अनुया आजारी होती त्यामुळे तिला कुठे बाहेर नेण्याचा विषयच नाहीये."
"आठव बरं आणखी कोणी आलं होतं का? अरे, त्या‌ बाई अशा वाटत नाहीत रे. आमच्या घरात तर बऱ्याच अशा गोष्टी पडलेल्या असतात. रूपाचे दागिने, कानांतली, माझं पैशाचं पाकीट. आम्ही तर घरसुद्धा तिच्यावर सोडून जातो कितीदा."
"खरं आहे दादा. पण मग तुम्हीच सांगा. आमच्या घरात आहे कोण आणखी? तुम्ही सोडून बाहेरचे तरी असे कोण येतात? करूणा आणि रूपाताईंशिवाय अनुया कोणाकडे असते दादा? असल्या तर अंबिका बाईच."
"मला नाही वाटत"
"खरं तर मलाही वाटत नाही. पण मग..."
"हं"
"आणि दादा, आणखी एक सांगतो. एक मोठं ताम्हन होतं घरी. लक्ष्मीपूजनाच्या वेळी काढलं होतं. कालच्या शोधाशोधीत तेही गायब झालं आहे हे लक्षात आलंय"
"काय सांगतो आहेस? बाप रे!"
"घाईघाईत लक्ष्मीपूजन आटपून दुसऱ्या दिवशी आम्ही गावी गेलो होतो. काय झालं असेल आता आठवत नाही. पण तेही गायब आहे. आम्ही तुमच्याकडे किल्ल्या ठेऊन गेलो होतो अंबिका बाईंसाठी. धुणीभांडी राहिली होती त्या दिवशीची म्हणून."
त्याचं हे बोलणं ऐकताना मला जणू विजेचा शाॅक बसावा तसा झटका बसला. माझा आवाज उतरला. "नाही रे, मला तरी ती बाई तशी वाटत नाही."
"काय करावं? बोलू का मी त्यांच्याशी? पोलिसात.."
"थांब विनोद. पोलिसांपर्यंत जाऊ नकोस. जरा विचार कर. जरा बोलू आपण. थांब थोडं"
"मला तर काय करावं कळत नाही."
"त्यांच्यावर थोडी नजर ठेव. चार दिवस बघ. पण.. नाही, मलाही कळत नाही काय करावं"
"हो ना, दादा. आम्ही दोघंही काल पासून सुन्न आहोत."
विनोदचा मोबाईल वाजला. त्यानं पाहिलं, "आईचा फोन आहे. येतो मी नंतर."

मी बराच वेळ तसाच बसून होतो. मनात घालमेल चालली होती. रूपा आता आली.
"अरे अंधारात काय बसला आहेस? दिवा लाव की."
"हं"
"आणि चेहरा का असा दिसतोय? बरं वाटतं नाही का? ताप वगैरे काही वाटतंय का?" तिनं माझ्या कपाळाला हात लावून पाहिलं. "नाही, अंग काही गरम नाहिये. मग असा चेहरा करून का बसला आहेस? कामाचं टेन्शन आहे का? सोडून दे बरं ती‌ नोकरी! आता पन्नाशीनंतर कुठे टेन्शनची ओझी वाहायची?"
"कुठे काय? उगाच काही तरी वाटतंय तुला. नोकरी‌ काय सोडायची? झाडाला लागते काय नोकरी?"
"गेल्या तीस वर्षांत पंधरा तरी नोकऱ्या केल्या असशील तू. तुलाच माहिती नोकरी झाडावर लागते का कुठे ते! बरं, मी भाजी घेऊन येते. करूणा पण आहे. तिच्याच गाडीवरून जाऊन येतो आम्ही."
"हं"
ती आत गेली आणि पाच मिनिटांत तयार होऊन बाहेर आली. "तुला काही आणायचंय?" माझ्या उत्तराची वाट न पहाता तिनं माझ्या शेजारच्या कप उचलला. आणि लगबगीत आत जाऊन ठेऊन आली.
"आलेच मी. आले की लगेच जेवण करू. आणि तू लवकर झोप".

तिच्यामागे लॅच लागल्याचा आवाज आला आणि मी चटकन उठलो. बेडरूम मध्ये गेलो. बाल्कनीतून शिडी आत आणली, आणि लॉफ्टजवळ लावली. चढून लॉफ्टमध्ये डोकावलो. एक जुनी ट्रंक अगदी कोपऱ्यात होती. पण तिथपर्यंत हात पोहोचत नव्हता. उतरलो, शिडी ओढून ठीक जागी लावली. समोरची अडगळ बाजूला करून ट्रंक पुढे ओढली. उघडताना माझे हात थरथरत होते. लग्नात ही ट्रंक घेऊन आली होती रूपा. तिच्या सगळ्या आठवणी या ट्रंकेत होत्या. जिवापाड जपायची ती या ट्रंकेला. जुन्या वह्या, वाचून वाचून जिरलेली पुस्तकं, विरलेले जुने आवडते ड्रेस, कुठे शाळेत स्पर्धा जिंकल्यावर मिळालेलं प्रशस्तीपत्रक, कुणी पाठवलेली पत्रं, काहीही होतं यात.

मनावर प्रचंड दडपण आलं होतं. मी मनावर दगड ठेऊन ती पेटी उघडली. वरतीच काही कपडे होते, ड्रेस होते. हातानेच चाचपलं तर कठीण वस्तूची कडा लागली. जरा कपडे बाजूला केले तर, तर एक मोठं ताम्हन दिसलं. माझ्या ओळखीचं होतं. चांदीचं मोठं ताम्हन मी विनोदकडे पाहिलं होतं तेच. मला वाटलं होतं तेच खरं होतं. मग आणखी काही न बघता, मी ट्रंकेचं झाकण बंद केलं, सगळं होतं तसं ठेवलं आणि खालती उतरलो. डोळ्यांत पाणी होतं. तशाच डबडबलेल्या डोळ्यांनी मी शिडी बाहेर ठेऊन आलो. बेडरूमचा दरवाजा बंद केला, आणखी जड पावलांनी‌ बाहेर येऊन सोफ्यावर बसलो. अश्रू थांबत नव्हते. आतून आतून कढ येत होते.

मला खरं दुःख रूपानं चोरी‌ केली‌ याचं नव्हतं. ते तर होतंच. रूपाला क्लेप्टोमेनिया होता. उगाच चोरी‌ करायची‌ वाईट सवय होती. सवय तरी‌ कसं म्हणायचं. तिला तो झटका यायचा, अनावर उर्मी व्हायची. मला नक्की ठावूक होतं. इतके वर्षं बघतोय ना मी? मला अन् मलाच फक्त ते पक्कं ठावं होतं. डॉक्टरी उपचारांना नाही म्हणायची ती. खूप हट्टी होती. मग एकच मार्ग आम्हाला सापडला होता. नव्या ठिकाणी गेलो की दोनतीन वर्षं ती शांत असायची. आणि मग तिला तो झटका यायचा. अचानक ती असं काही तरी आक्रीत करून बसायची. तिला त्या वस्तूची गरज नसायची, खरं तर तिला आपण चोरी केली आहे याची जाणीव किंवा आठवणही नसायची. ते लपवून ठेवायचं, तर कुठे? एकच जागा, तिची ट्रंक! मग घर, जागा, गाव सोडल्यावर कसं तरी करून त्या चीजवस्तू ज्याच्या त्याला परत धाडायच्या.
मला दुःख होतं ते, ते ही जागा सोडून पुन्हा कुठे तरी जावं लागणार याचं. पुन्हा नवी नोकरी, नवी जागा, नवी नाती. गेले तीस वर्षं आम्ही पळत होतो या ब्रह्मराक्षसापासून. हा ससेमिरा कधी संपेल ठाऊक नाही. कधी संपेल का याचीही खात्री नाही. पण आता उमेद राहिली नव्हती. नव्या नोकऱ्या आता या वयात मिळणं अवघड झालं होतं. याला तोंड द्यायची ताकत उरली नव्हती. पण मला जावं लागणार होतं. ते घडणार हे नक्की होतं, अगदी पक्कं.

विंचवाला पाठीवरल्या बिर्‍हाडाचं ओझं होतं का?

दुसरा दिवस उजाडला. रात्री डोळ्याला डोळा लागला नव्हता. विचारात रात्र गेली होती.
रूपा डब्याची भाजी बनवत होती. शेजारी मी माझं ऑमलेट बनवून घेतलं. रूपा बोलत होती, "रमेश, रात्री झोप नाही का रे लागली चांगली तुला? सारखा या कुशीवरून त्या कुशीवर वळत होतास. आणि किती बोलत होतास स्वतःशीच? चोरी काय अन् पोलिस काय? काय एवढी‌ उलाघाल चालली आहे तुझ्या मनात?"
मी गडबडलो. काय काय बडबडलो मी रात्री? पण तोंडावर आलेले शब्द परतवले. "काही माहित नाही गं. स्वप्नं पडलं असेल. पण आता मात्र डोकं चढलंय."
"मग सुट्टी घेतोस का आजचा दिवस? काही तरी बिनसलंय तुझं. काल संध्याकाळपासूनच तू जरा डाऊन दिसतो आहेस."
"नाही, आज ऑफिसला जावंच लागेल. महत्त्वाचे डिसिजन्स घ्यायचे आहेत."
" महत्त्वाचे डिसिजन्स? बरं, मग लवकर घरी ये शक्यतो".

आवरून नेहमीसारखा ऑफिसला गेलो खरा. पण डोकं भणभणत होतं. दुपारी लंचटाईमला रूपाचा फोन आला. घ्यावा का नाही मनात उलाघाल झाली क्षणभर. घेतला.
"हं, बोल रूपा"
"कामात नाहीस ना?"
"नाही, बोल."
"डबा खाल्लास?"
"हे विचारायला फोन‌ केलास का?"
"नाही रे. सकाळी तुझी अवस्था अशी होती! म्हणून आता बरं आहे का हे विचारायला फोन केला होता".
"बरी आहे"
" पण आवाज तुझा.. जाऊ दे. अरे, मला करूणानं आत्ता सांगितलं की तिनं अंबिका बाईंना तडकाफडकी काढून टाकलं आज!"
"काय?" मी नकळत मोठ्यानं बोललो, जवळ जवळ ओरडलोच. आजूबाजूच्या मंडळींनी चमकून बघितलं. मी आवाज खाली करून विचारलं, "पण का? काय म्हणाली‌ ती?"
"अहो, त्या चोरी करतात असा संशय होता दोघांना."
"बरं पण पोलिस वगैरे काही भानगड नाही ना?" माझा आवाज कातरा झाला होता.
"नाही. आत्ता तरी नाही."
"म्हणजे?"
"तू नको लक्ष घालू. मी बघते."
"अगं पण..."
"हे बघ, तुझी जरा काळजी वाटली म्हणून फोन केला. पण मी घेते संभाळून. संध्याकाळी बोलू. पण एक लक्षात घे. सगळ्यांशी जरा जपून वाग. तुझी तब्येत बरी नसेल तर घरी निघून ये."
"हो. पण.."
"रमेश, आता नोकरीचं एवढं टेन्शन घेऊ नकोस. ही नाही दुसरी. आणि आता नाही केलीस नोकरी तरी चालेल आपल्याला. हो की नाही?"
"हो. पण..."
"आता खूप विचार करू नकोस. ठेवते."
असं म्हणून तिनं फोन ठेऊन दिला.
आता मला गोष्टी हाताबाहेर जायच्या आत काही तरी पाऊल उचलणं भाग होतं.

चार वाजण्याच्या सुमारास मी साहेबांच्या केबिनमध्ये गेलो.
"सर, मे आय कम इन?"
"येस, रमेश, कम कम"
"सर, मी रिझाईन करतोय."
"काय? पण का?"
"सर, घरचे प्रॉब्लेम्स आहेत. हे गाव सोडून जावं लागतंय.‌"
"काही तरी काय? अरे तू इथे फ्लॅट घेतला आहेस. आणि घरी काय प्रॉब्लेम्स आहेत?"
"सर, नाही सांगता येणार असं"
"धिस इज मोस्ट इर्रेग्युलर,रमेश. डू यू वॉंट मी टू बिलीव्ह धिस बाल्डरडॅश?"
"..."
"काय ऑफर आहे तुला? आणि या वयात तुला कुठली ऑफर मिळते आहे, आय नीड टू नो." साहेब छद्मी हसला.
"सर, अजून मी दुसरी नोकरी बघितली‌ नाहीये. पण मला हे गाव सोडायचं आहे."
"रमेश, आय ॲम नॉट शुअर की तू शुद्धीत आहेस. आपण या बाबतीत उद्या बोलू. आय सजेस्ट यू टेक द रेस्ट ऑफ द डे ऑफ."
"सर, पण मला रिझाईन करायचंच आहे."
"व्हॉट नॉनसेन्स! ओके. सेंड मी द मेल. पण थिंक अगेन".
"येस सर, मी आत्ता घरी जातो" असं म्हणून मी बाहेर आलो.

घरी येता येता विचार करत होतो, की आता काय करायचं? नोकरी एक गोष्ट. पण जागा आत्ताच बदलायची का? का नोकरी मिळाल्यावरच सगळं करायचं? बरं विनोद आणि करूणाला कसं समजवायचं? आत्ताच सांगायचं का नंतर? आणि आता हे मॅटर पोलिसांत जाण्यापासून कसं थांबवायचं? कालपासून हेच विचार घोळत होते डोक्यात. कसं तोंड द्यायचं या प्रकाराला?

मी बिल्डिंग मध्ये शिरता शिरता अंबिका बाई बाहेर पडताना दिसली. तिनं एक नजर माझ्यावर टाकली, आणि तोंड फिरवून तरातरा चालू लागली. सिक्युरिटी पाशी जाऊन काहीबाही जोर जोरात बोलायला लागली. मला जरा विचित्र वाटलं. मी लिफ्टनं वर आलो. करूणा आणि अनुया आमच्या घरीच होत्या. मी दरवाज्यात दिसल्यावर रूपा समोर आली. "रमेश, लवकर आलास नं, बरं झालं! बरं वाटतए का?"
करूणा म्हणाली, "रूपाताई, मी जाते."
"अगं थांब, अनुया खेळतेय, खेळू दे तिला."
"नको, तुम्ही दादांकडे बघा. चल अनु, घरी जाऊ या"
"अगं खेळू दे तिला..." मी म्हणालो.
"नको दादा, तुम्ही विश्रांती घ्या" असं म्हणून ती अनुयाला घेऊन लगबगीनं बाहेर पडली.

मी हातपाय धुवून आलो. रूपा आतून चहा घेऊन आली. बाहेरचा दरवाजा नीट बंद करून ती शेजारी येऊन बसली. मी तिच्याकडे बघत म्हणालो, "आज रिझाईन केलं मी."
तिनं माझ्याकडे समजुतीनं बघितलं. तिनं हातावर हात ठेवला. माझ्या डोळ्यांत पाणी तरळत होतं. "डोन्ट वरी, सगळं ठीक होईल. बरं झालं, तू नोकरी सोडली ते. आता कुठे जायचं ठरवलं आहेस का?"
माझा आवंढा घशातच अडकला. मी फक्त नकारात्मक मान हलवली.
रूपा म्हणाली, "मी सगळी काळजी घेतली आहे. नाही येणार पोलीस!"
मी मान वर केली. ती माझ्याकडेच बघत होती. "काल तू रात्री बडबड करत होतास ना, मला अंदाज आला. आता तुझी रिलॅप्सची लक्षणं चांगली ओळखते मी. मग नेहमीसारख्या सगळ्या गोष्टी शोधल्या. तिथे जे काही सापडलं त्यावरून मला मामला कळला. तुला काल कसला त्रास होत होता ते आलं माझ्या लक्षात. लगेच मी करूणाशी आणि अंबिका बाईंशी बोलले. ट्रंकमधल्या त्या दोन्ही वस्तू काढून दिल्या आहेत मी करूणाला." मी थक्क होऊन ऐकतच राहिलो.
"त्यांना सांगितला तुझा प्रॉब्लेम. आता या गोष्टी अशा आहेत की त्यांना काय उपाय? दोघींनाही वाईट वाटलं. पण आता काय करणार? मी त्यांना सांगितलं कुठेही बोलू नका या विषयी."
मी आ वासून पहात होतो. "म्हणजे काय?"
"रमेश, तुला ज्या मानसिक व्याधी आहेत त्यांचा त्रास कधी ना कधी होणारच ना? डॉक्टरांनी काय सांगितलं आहे आपल्याला? मग त्याला कोण काय करणार? हे आपलं नशिब आहे. मला कितीही वाटलं इथे रहावं, तरी पण नशिबाचे भोग कुणाला चुकले आहेत?! चल, आपण पुन्हा बांधाबांध करायला लागू. गाव बदलायची वेळ आली आहे आता."

विंचवाची मादी विंचवाला खाऊन टाकते म्हणतात. आणि विंचविणीच्या पाठीवरच्या बिर्‍हाडातले विंचू? ते विंचविणीला खातात.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

बापरे!
नक्की कोण चोरी करतं पण? नवरा की बायको?

भारी कलाटणी !

नक्की कोण चोरी करतं पण? नवरा की बायको? >>>> +१

मला वाटतंय बायको ला आहे! पण नवर्‍याने स्वत:ला आहे असे तिला सांगीतले आहे
>>>>>> हा तर्क सर्वात जास्त पटला Happy

कथेचा निवेदक आपल्याशी खोटं बोलतोय यावर वाचकांचा सहसा विश्वास बसत नाही!
मनोव्यापार हे ती सीमारेषा पार करून मनोव्याधी कधी बनतात? सांगणं कठीण आहे.
सर्व प्रतिसादांचे मनापासून स्वागत!