सप्रेम नमस्कार.
{मनातील} 'भया' स,
अगदी नाईलाज झाला , म्हणून तुला मनातलं सांगण्याचा हा रस्ता निवडला. अरे, तुला वाटेल , की जन्मापासूनच आपण सोबत आहोत, तर हे कानामागून घास घेणं कशाला? पण मला, आपलं दोघांचं सतत एकत्र असणं जरा जाचक होऊ लागलंय आणि हे असं राहण्याची खरोखरच गरज आहे का हे स्वतःला आणि तुला विचारण्यासाठी हा टेकू..
तुझं - माझं माझ्या लहानपणापासूनचं मैत्र. मला ते कधी समजलं..तर जेव्हा घरीदारी "प्राची ना अगदी भित्री" असं कानावर पडू लागलं तेव्हापासून. खरंच का मी घाबरट होते? हो बहुतेक. माझ्या भीतीचा पल्ला तरी किती होता... किंवा आहे म्हणायला हवं खरंतर..
असं बघ.. पडण्याचं भय. . खरचटणं इतकीच मजल. त्यामुळे मैदानात खेळताना स्पेअर पार्टस् सहीसलामत.. किंवा मारामारी केली आहे, फार दुखापत झाली आहे, असे क्वचितच झालं असेल. .एरव्ही आईबाबांच्या डोळ्यांतील जरबेला भिणं. त्यामुळे शिस्त लावण्यासाठी त्यांना आवाजही कधी उंच करायला लागला नाही. बरेचदा शब्दांच्या माराचीसुद्धा गरज पडत नसे.
अरे, तुला कल्पना आहेच, की वेगावर 'स्वार' व्हायचं तर उलट माझं मन 'गपगार' होतं. सी - सॉ, झोपाळा, जायंट व्हील यांची सवारी करताना माझ्या सोबतचा माणूस म्हणजे बहुतेक वेळा लहान मूल, हे हैराण होणार. कारण जरा उंचावर जाणं झालं, वेग मिळाला, की मला भीतीचा आवेग आलाच.. त्यामुळे माझी पावलं तिथे अपवादानेच वळणार. पण एकदा नाईलाजाने जायंट व्हीलमध्ये बसावं लागलंच. पुतणीसह... तेव्हा नवविवाहित होते मी! त्यामुळे "काकू घाबरते", असा गवगवा होऊ नये, असं वाटत होतं.. मग काय.. चेहऱ्यावर बेदरकार भाव दाखवण्याचा प्रयत्न करत त्यात बसले खरी; पण पूर्णवेळ मनात रामरक्षा पठण सुरू होतं.. म्हणजे या अर्थाने माझे जमिनीवरचे पाय सुटलेले नाहीत हो कध्धीच..
इथवर तरी ठीक असतं... पण कहर म्हणजे, दुसऱ्यांना वेगात वागताना बघतानाही तू आपला माझ्याबरोबर असणार .. झोपाळ्यावर कुणी जोरजोरात झोके घेताना, कुणी फुररऽ करीत बाईकवर रोरावत जात असताना इथे माझी धडधड वाढते..
खुद्द मी स्कूटर चालवताना ? कुणाची बिशाद आहे, की मला 'वेगमर्यादे'वरून अडवू शकेल.. मी आपली स्कूटर चालवताना कायम 'विशी'त असणार .. अरे, पण माझं असं 'मर्यादशील' असणं घरातल्यांना कुठलं समजायला..ते चिडवतात मला. . तुला तर माहित आहे, की मला आणखीन एक भीती असते..गाडीवर कुणी 'वजनदार' माणूस डबलसीट बसवण्याचा प्रसंग आला की माझा चेहरा पडणार.. पूर्वी हे टाळण्यासाठी मी निमित्त शोधून काढत असे. पण आता निदान परिचित वर्तुळात माझं हे घाबरणं माहीत झालंय म्हणून बरं.. ट्रॅफिकमध्ये गाडी उभी करून, पाय नेहमीप्रमाणे जमिनीवर ठेवून उभं असलं, की भीती वाटत राहते, कि मागून येणाऱ्या वाहनाला वेळेवर ब्रेक लावता येईल का... नाहीतर माझ्या स्कूटरबाईला "दे धक्का" होईल.. (यापूर्वी एकदोनदा असं घडलेलं असल्याने)..
आणखीन काय.. बाहेरगावी जाताना वा येताना ट्रेनमध्ये चढण्याचा प्रसंग. घरच्यांनी हात टेकले, पण माझी तुझ्याशी जोडी काही तुटत नाही. आत चढेपर्यंत ह्रदयानं ठाव सोडलेला असतो. याला ना , तीन स्तर असतात. १} गाडी भलत्याच फलाटावर येईल. मग सामानासकट आपल्याला धावत जाऊन (तशी मी चपळ आहे अजून हं, पण बरोबरच्या लोकांचं काय ?) २} गाडी पकडता येईल का? ; गाडीचा डबा नेमका ठरलेल्या ठिकाणी येईल का? ; ३} गाडीत सगळे चढू शकू का , कि कुणीतरी एखादा कुटुंबीय खालीच राहील? अरे, तुझ्यामुळे ना मग घरचे दरवेळेस प्रतिज्ञेचा पुनरुच्चार करतात, "ट्रेन ने जाताना हिला बरोबर आणायचं नाही."
पण 'कामातुराणां' च्या धर्तीवर "भयातुराणां न लज्जा" असं माझ्यापुरतं सूत्र धरून माझी मार्गक्रमणा सुरू असते.
आणखीन झालंच तर.. श्वानभय.. ही अगदी जिव्हाळ्याची बाब. त्यांचं भुंकणंच काय, पण माझ्याकडे बघणंही मला अस्वस्थ करतं. श्वानपथक वाट अडवून उभं दिसलं, की मी तुझ्या सोबतीनं वरकरणी कोऱ्या चेहऱ्यानं, निर्भय 'जाणकारांनी' दिलेले सल्ले आठवत आठवत, चालत वा( स्कूटर) चालवत राहते खरी. पण एकदा असंही ऐकलेलं की तू असलास, की एक विशिष्ट रसायन शरीरात निर्माण होतं. त्याचा सुगावा श्वानवर्गास लागतो. मग काय. तेवढ्यापुरता तरी तुला झटकून टाकण्याचा खटाटोप मला करावाच लागतो!
असे बरेच आहेत 'स्थूला'तले तुझ्याबरोबरचे किस्से... आणि 'सूक्ष्मा'तले... फसवणूक ते फजिती, वियोग ते विस्मृती.. अशा अनेक भयाच्या रीती.. कितीतरी वेळा तू काळजीचं बोट धरून येतोस..आणि मग आत्मविश्वासाचं डबोलं कुरतडू लागतोस. वय, शिक्षण, जीवनानुभव, स्वकीयाधार यांच्या मदतीनं जेव्हा तुला पळवून लावता येत नाही, तेव्हा स्वतःचा राग येतो मला... आणि तुझाही... जसा आत्ता आलाय. तो आवरून हे पत्र लिहतेय.
तर हे भया, तुला विनंती ही, की तू माझ्याबरोबर रहा; पण.. विशेष प्रसंग असेल तेव्हाच. म्हणजे असं बघ की, एखाद्या वेळी मोह, अनीति,कर्तव्यपराङ्मुखता अशा कुमार्गावर जर पावलं वळली, तर आणि तेव्हाच तू जागा होऊन साथ कर. तोवर गुडूप झोपून जा मनाच्या एखाद्या दालनात आणि दरवाजा ओढून घे. घट्ट नको हं पण. कारण तुझी गरज पडेल तेव्हा पटदिशी येता येईल मग...
कळावे, 'लोभ' असावा पण 'क्षोभ' नसावा ही विनंती.
'अ- भया' होऊ पाहणारी,
प्राचीन.
मराठी भाषा गौरव दिन - स.न.वि.वि. - प्राचीन
Submitted by प्राचीन on 26 February, 2023 - 11:41
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान पत्र, भयाशी असं हितगुज
छान पत्र, भयाशी असं हितगुज केलं तर ते शरणागती पत्करेल.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर कल्पना! भ्य इथले संपत
सुंदर कल्पना! भ्य इथले संपत नाही..
हाहाहा मस्त कोट्या आहेत गं.
हाहाहा मस्त कोट्या आहेत गं.
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
>>>>>>>>अरे, पण माझं असं 'मर्यादशील' असणं घरातल्यांना कुठलं समजायला.
>>>>>>>>म्हणजे या अर्थाने माझे जमिनीवरचे पाय सुटलेले नाहीत हो कध्धीच.. Proud
लोल!!!
>>>>पण 'कामातुराणां' च्या धर्तीवर "भयातुराणां न लज्जा" असं माझ्यापुरतं सूत्र धरून माझी मार्गक्रमणा सुरू असते.
हाहाहा
मस्त मस्त
मस्त मस्त![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मलाही आवडेल अभया व्हायला, पण भय इथले संपत नाही. श्वानभय तर अगदी अगदी.
खूप छान लिहिलं आहे. सहसा
खूप छान लिहिलं आहे. सहसा भयाशी मैत्री ही कमकुवतपणाचं लक्षण समजलं जात असल्यामुळे ती उघडपणे क्वचितच व्यक्त केली जाते. परंतु जश्या इतर भाव-भावना असतात तसंच भय असतं. एखाद्याला राग जास्त येतो तर एखाद्याला भीती जास्त वाटते. त्यात कुठलाही कमीपणा मानू नये असं मला वाटतं. तुमचा शेवटचा परिच्छेद तर खूपच सुंदर! "हे भया, तुला विनंती ही, की तू माझ्याबरोबर रहा; पण.. विशेष प्रसंग असेल तेव्हाच."![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच लिहिलंय .
मस्तच लिहिलंय .![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
पण 'कामातुराणां' च्या धर्तीवर "भयातुराणां न लज्जा" असं माझ्यापुरतं सूत्र धरून माझी मार्गक्रमणा सुरू असते. >>
खूप छान लिहिलं आहे.
खूप छान लिहिलं आहे.
झकास! श्वानभय
झकास!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
श्वानभय
मस्त लिहिलं आहे!
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
गुदगुल्या करत हसवणारे, काही ठिकाणी relate झालं एकदम.
मस्त! नं भिता लिहिलय!
मस्त! नं भिता लिहिलय!
द. सा., छन्दिफन्दि, सामो
द. सा., छन्दिफन्दि, सामो,अन्जू, ह. पा., वर्णिता, कुमार१, अनिंद्य, वावे, झकासराव आणि SharmilaR, सगळ्यांचे आभार.
:
हरचंद जी, क्षुल्लक बाबींचं भय वाटतं तेव्हा वैताग येतो मला. एरवी कसोटीच्या प्रसंगी काही वेळा इतरांना बुचकळ्यात टाकण्याइतकी शूरशिपाई झाले आहे.. पण ते क्वचितच..
>>> कितीतरी वेळा तू काळजीचं
>>> कितीतरी वेळा तू काळजीचं बोट धरून येतोस..आणि मग आत्मविश्वासाचं डबोलं कुरतडू लागतोस.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त लिहिलंय. प्रामाणिक आणि खुसखुशीत!
छान ... खुसखुशीत पत्रलेखन...
छान ...
खुसखुशीत पत्रलेखन...
छान लिहिलंय!
छान लिहिलंय!
हरचंद जी नका म्हणू हो. मलाच
हरचंद जी नका म्हणू हो. मलाच घाबरायला होतं. हर्पा, ह पा, किंवा अगदीच टोपणनाव नको असेल तर हरचंद चालेल. किंवा हरचंद जी ऐवजी हरचंद पी चालेल. पी फॉर पालव.
छान लिहिलंयस ग.
छान लिहिलंयस ग.