मराठी भाषा गौरव दिन - स.न. वि.वि. - आंबट गोड

Submitted by छल्ला on 26 February, 2023 - 03:59

प्रिय मृत्यो,

’प्रिय’ शब्दाने सुरुवात करावी की नाही....दुविधेत होते मन!
खरं तर प्रिय शब्दाची व्याख्या काय? ज्याचा आपल्या मनी -मानसी सतत ध्यास असतो, ज्याची आपणाला सर्व सुखा दु:खाच्या क्षणी हमखास आठवण होते, असा ! तू तर या व्याख्येत बसतोस की !अगदी चपखल. पण तरीही तू ’प्रिय’ नाहीस. कुणालाच!
म्हटले, आज पत्र लिहून तुझ्याशी संवाद साधावा. तेव्हढेच एक नवीन माध्यम. बघूया, नव्याने काही हाती लागतेय का..तुझ्या माझ्या मधल्या बंधांना अधिक गहिरं बनवेल अशी काही अभिव्यक्ती!
मला तर वाटतं.... ’येणारच’ अशी गॅरंटी फ़क्त तुझ्याच बाबतीत देता येते.... अगदी भरवशाचा आहेस बघ तू!
आणि कैकदा वेदनाहारी, बर्‍याच अनुत्तरीत प्रश्नांना बगल देऊन कायमचं संपविणारा, कित्येक समस्यांचे आपोआप निरसन करणारा....असा देवदूतच तू! पण तरी ही लोक तुला किती घाबरतात! तुझ्यापासून दूर दूर पळतात, तुझा उल्लेखही करत नाहीत..... अनुल्लेखाने ’मारतात’ तुला! 
कित्येक तत्ववेत्त्यांनी तुझ्यावर चिंतन केले आहे. तुझे स्वरुप, तुझ्या नंतर चे जीवन (?), माणसाची इतिकर्तव्यता, भोग, त्याग, इच्छा अपेक्षा, जय- यश ...किंबहुना विचारांचे सगळेच प्रवाह तुलाच तर येऊन मिळतात..अपरिहार्य पणे .
पण तरीही, या पृथ्वीवर जीवन जे बहरले ते केवळ तुझ्या अस्तित्वाच्या अमिट जाणिवेमुळेच. आम्ही ऋणी आहोत तुझे.
खरंच, तू नसतास तर. विचारही करवत नाही. अंताची खात्री आहे म्हणून तर आरंभाची उमेद आहे.
आम्ही इतकं धडपडतो, हसतो, रडतो, भांडतो, हारतो- जिंकतो ..
आणि तू ! आपल्या एकाच मास्टर स्ट्रोक ने सगळ्याला अलगद पूर्णविराम देऊन टाकतोस. नो चॅलेंज ॲक्सेप्टेड!
मित्रा, तू असं युगानुयुगं, मानवाला आणि -ज्याची तो अपरिमित शेखी मिरवितो त्या त्याच्या बुद्धीला- कायमच गुंगारा देत आलेला आहेस. हारवलं आहेस तू आम्हाला! स्वत:चाच शब्द अंतीम हे तर तू ठसवून दिलं आहेसच; पण सद्वर्तनाचं, सत्याच्या मार्गावर चालण्याचं एक अदृष्य बंधन ही आमच्यावर घातलं आहेस. तेव्हा, आमच्या आयुष्यातून तुला वजा करता येणार नाहीच.
अजून काय लिहू?
ये, कधीही. स्वागत आहे.
भेटूच. नक्की!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भावपूर्ण !
पत्राचा प्राप्तकर्ता आवडला

छान लिहीले आहे Happy
आयुष्यावर बोलू काही तसे मृत्युवरती बोलू काही Happy

पण पत्र पोहोचेल का याची मला ग्यारंटी नाही. कारण माझ्यामते मृत्यु वगैरे असे काही नसते. जसे अंधार वगैरे असे काही नसते, जसे प्रकाशाचा अभाव म्हणजेच अंधार. तसे जीवनाचा अभाव म्हणजेच मृत्यु. अंतिम सत्य मृत्यु नाही तर जीवन आहे. जन्माला आलोय तर जीवन जगायचेच आहे. ते कधी थांबते याचा विचार का करावा Happy

छान लिहीले आहे.
’येणारच’ अशी गॅरंटी फ़क्त तुझ्याच बाबतीत देता येते.... अगदी भरवशाचा आहेस बघ तू!>> एरवी कुणी यायला उशीर केला की राग येतो. तुझ्याबाबत पण असं होईल?

शर्मिला.... Happy

एरवी कुणी यायला उशीर केला की राग येतो. तुझ्याबाबत पण असं होईल?..... हे अगदी मरणासन्न असणार्‍या लोकांना विचारुन पहा...!! त्यांना येतच असेल राग त्याचा...लवकर न आल्याबद्दल!

प्रतिसादां बद्द्ल आभार. अस्मिता, ऋन्मेSSष, हपा..!!