अनोळखी व्यक्तीस ऑनलाईन आर्थिक मदत

Submitted by कुमार१ on 15 February, 2023 - 06:50

नमस्कार
ऋन्मेऽऽष यांच्या या धाग्यावर (https://www.maayboli.com/node/82986?page=2#new ) झालेल्या चर्चेनुसार हा नवा धागा काढतो आहे.
एक विनंती : त्या धाग्यावर वर्णन केलेले प्रकरण आपल्या सर्वांच्या माहितीचे आहे. त्याचा कुठलाही संबंध इथे न जोडता स्वतंत्रपणे आणि तटस्थ चर्चा व्हावी ही अपेक्षा.

खालील मजकुरात मी काही शंका उपस्थित केल्यात. त्यातल्या काही बाळबोध सुद्धा वाटू शकतील. परंतु मनातील अशा सर्व शंकांचा निचरा व्हावा हाच हा धागा काढण्यामागचा हेतू आहे.
** ** **

समाजात अनेक जणांवर अचानक काही ना काही शारीरिक आपत्ती ओढवते- जसे की अपघात, गंभीर आजार आणि त्याची शेवटची अवस्था. अशा प्रसंगी मोठी आर्थिक तरतूद करण्याची वेळ येते. ज्यांच्या बाबतीत अशी कौटुंबिक तरतूद करता येणे अवघड असते, ते लोक आर्थिक मदतीसाठी निरनिराळ्या वृत्त आणि समाजमाध्यमांमधून आवाहन करतात. आपणही बऱ्याच वेळा अशा प्रकारची आवाहने वाचतो.

संबंधित बातमीमध्ये ऑनलाईन पैसे कोणत्या बँक खात्यात पाठवायचे याची योग्य ती माहिती दिलेली असते. या प्रकारची सेवा देणारी काही संस्थळे किंवा ॲप्स अलीकडे निर्माण झालेली आहेत. त्यांच्यामार्फतही मदतीचे आवाहन केले जाते आणि तिथे आपण मदत पाठवू शकतो. तिथे ज्याला रक्कम पाठवायची त्याच्याबद्दलची माहिती, त्याची एकंदरीत शारीरिक परिस्थिती, दाखल केलेले रुग्णालय वगैरे माहिती दिलेली असते. तसेच, एकूण अपेक्षित मदत आणि आतापर्यंत झालेली मदत याचीही आलेख स्वरूपात माहिती दाखवलेली असते.

या संदर्भात एक महत्त्वाचा मुद्दा प्रथम उपस्थित होतो. संबंधितांचे आवाहन वाचून बऱ्याच जणांना भावनिक दृष्ट्या अशी मदत करण्याची इच्छा होते. परंतु, आपण ज्या व्यक्तीस मदत करीत आहोत ती अजिबात ओळखीची नसते. दुसरे असे की, ज्या मध्यस्थ ऑनलाइन यंत्रणा आहेत त्यांच्यावर पटकन विश्वास ठेवावा का अशी शंकाही आपल्या मनात येऊ शकते. यासंदर्भात माझ्या मनातील काही शंका आधी उपस्थित करतो :

१. समजा, ज्या व्यक्तीला ऑनलाईन मदत पाठवायची आहे तिच्या बँक खात्याची माहिती वृत्तपत्रातून आलेली आहे. समजा, अशी मदत एखाद्याने थेट त्याला पाठवली तर पाठवणाऱ्या व्यक्तीस आयकर सवलतीचा लाभ घेता येतो का ? बहुतेक नसावा.

२. समजा, एखाद्याला मोठ्या रकमेची मदत करायची आहे तर अशावेळी त्याला भावी वर्षात आयकर सवलतीची अपेक्षा असणे स्वाभाविक आहे. अशा प्रसंगी त्याने ऑनलाईन संस्थळाची मदत घेतल्यास फायदा होईल हे उघड आहे. अशा संस्थळावर ते लोक पाठवणाऱ्यांची संपूर्ण माहिती- नाव गाव पत्ता फोन इत्यादी सर्व काही विचारतात. इथे पाठवणाऱ्या व्यक्तीस अडखळल्यासारखे होऊ शकते.
अशा संस्थळाची विश्वासार्हता जोखण्याचे निकष काय असतात ?

३. जी संस्थळे किंवा ॲप्स अशी सेवा देत आहेत, ती आपण पाठवलेल्या रकमेतून काही वाटा त्यांच्या प्रशासकीय खर्चासाठी काढून घेणार हे उघड आहे. त्या वाट्याचे प्रमाण अंदाजे किती असते? आपण या पद्धतीने एकदा मदत केल्यानंतर आपली संपर्क माहिती त्या मध्यस्थ संस्थळाकडे जाते. कालांतराने त्यांच्याकडे जेव्हा नवी प्रकरणे येतील तेव्हा ते जुन्या देणगीदारांच्या मागे ससेमिरा लावण्याची शक्यता वाटते.
यासंबंधीचे कोणाचे काही अनुभव ?

या विषयावर थोडाफार विचार केल्यावर मला झालेला अर्थबोध असा आहे :

१. अनोळखी व्यक्तीस आपल्याला लहान स्वरूपात रक्कम पाठवायची असेल तर तर ती थेट व्यक्तीच्या खात्यावर पाठवलेली चांगली. म्हणजे त्याला ती पूर्ण मिळेल. परंतु अशा वेळेस ती रक्कम नेट बँकिंगने पाठवावी की UPI ने ? यापैकी जास्त सुरक्षित (आपल्या दृष्टीने) काय मानले जाते? की दोन्ही सारखेच ? नेट बँकिंगमध्ये नव्या व्यक्तीचे नाव नोंदवून चार तासानंतर पाठवणे हे सर्वाधिक सुरक्षित मानले जाते का? निदान त्या चार तासांमध्ये आपल्याला फेरविचार करायला वेळ मिळतो हा एक फायदा.

२. UPI ने पैसे पाठवल्यास पलीकडच्याला आपला फोन नंबर समजणार हे उघड आहे. नेट बँकिंगमध्ये तो न समजण्याचा फायदा दिसतोय पण आपल्या नावाची नोंद तर बँकिंग व्यवहारात होणारच.
३. एखाद्याला रक्कम तर पाठवायची इच्छा आहे परंतु त्याला त्याचे नाव, फोन नंबर, ईमेल असे काहीही दुसऱ्याला कळू नये अशी इच्छा असल्यास रक्कम रोख नेऊन देणे हाच एकमेव पर्याय राहतो का ? किंवा मध्यस्थ स्थळामार्फत ऑनलाईन पद्धतीतही तशी गोपनीयता जपता येते का ?

४. आयकर सवलतीचा लाभ घेण्यासाठी देणगीच्या रकमेसाठी काही किमान / कमाल मर्यादा असते का? भारतीय आयकर खात्याच्या 80G संबंधी माहिती जालावर आहे. परंतु तिथे भल्या मोठ्या याद्या आहेत. ते जरा सोप्या भाषेत विस्कटून माहितगारांनी सांगितल्यास बरे होईल. काही वेळेस सवलत शंभर टक्के आहे तर काही वेळेस 50%.

या आणि अशा अनेक प्रकारच्या शंका विचारण्यासाठी आणि त्यांचे माहितगारांकडून निरसन करून घेण्यासाठी हा धागा उघडतो आहे. इच्छुकांनी जरूर सहभागी व्हावे ही वि.

लक्षात घ्या :
मूळ मुद्दा, पूर्णपणे अनोळखी व्यक्तीस मदत हा आहे.
*******************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चर्चा सुरू होऊ द्या.
मी जरा अन्य उपक्रमात व्यग्र असल्यामुळे इथे प्रतिसादांच्या रूपाने येणार नाही.
अधून मधून वाचनमात्र राहीन
धन्यवाद !

मदत एखाद्याने थेट त्याला पाठवली तर पाठवणाऱ्या व्यक्तीस आयकर सवलतीचा लाभ घेता येतो का ? बहुतेक नसावा....... व्यक्तीस मदत पाठविल्यास आयकर सवलतीचा लाभ निश्चितपणे घेता येत नाही.अभिनयक्षेत्रातील एका व्यक्तीस खारीचा वाटा पाठविल्याने हे सांगत आहे.
मात्र एखाद्या संस्थेस थेट मदत पाठविल्यास आपल्यास रिसीट येते.त्यावेळी आयकर सवलतीचा लाभ घेऊ शकतो.

मुद्दा क्र. १
नुकताच कमावता झालो होतो तेव्हां लहान मुलांच्या एका संस्थेला आम्ही मदत करायचो. तेव्हां एक जण आम्हाला म्हणाला कि हे लोक फाईव्ह स्टार हॉटेलमधे जाऊन मजा करतात तुमच्या पैशातून. त्या वेळी वय कमी असल्याने भावनिकतेतून अचानक मदत करणे बंद करून टाकली.

नंतर काही वर्षांनी काही संस्थांची (लहान मुलांशी संबंधित नाही) कामे बघत गेलो. त्या संस्थांच्या कार्यालयात गेलो. तिथे असलेला स्टाफ, पैशाचे हिशेब ठेवणे, धर्मादाय संस्थेला रिपोर्ट्स पाठवणे या कामासाठी असलेला स्टाफ, फिल्ड मधे असलेला स्टाफ, त्यांचा पगार, वीज, भाडं अशा गोष्टी यांचा खर्च कुणी करायचा हे समजत गेलं.

मुद्दा ३ - किंवा मध्यस्थ स्थळामार्फत ऑनलाईन पद्धतीतही तशी गोपनीयता जपता येते का ? >>> होय. इम्पॅक्ट गुरू च्या फॉर्म मधे अ‍ॅनॉनिमस चा पर्याय होता. तसे केल्यावर आपली मदत इम्पॅक्टगुरू डोनर अशा नावाने दिसते. आपले नाव येत नाही.

माझा याबाबत बराच अनुभव आहे.अक्षयपात्र, मिलाप, हेल्पेज इंडिया, इम्पॅक्ट गुरू वरून डोनेशन्स चा.नाव अनामिक ठेवा म्हटल्यावर गुप्तता पाळली जाते.किंवा नाव नंबर देऊन पण कोणताही 'सेन्ड मी अपडेट' चा बॉक्स आठवणीने डिसेबल केल्यास पुढे काहीही फोन्स येत नाहीत.
हेल्पेज इंडिया चा अनुभव वाईट आहे.त्यांनी फोन करून तगादा, आईबाबांच्या घरी येऊन 'तुम्ही अमक्या एरियातले ना, तरीही आदिवासी कम्युनिटी ची दुःखं जाणवत नाहीत, डोनेट करणार नाही म्हणजे' वगैरे पाणउतारा केला होता(त्यांचाही झालाच माझ्याकडून)
मुळात अनोळखी माणसाला मदत करताना 'त्या अमक्याला फोन करून डिटेल विचारा आणि मग त्याला मदत करा' इतका पेशन्स आणि इच्छाशक्ती कोणाकडेही नसते.त्या मानाने या साईट त्यातल्या त्यात माहितीतल्या वापरल्या तर बरं पडतं.
इम्पॅक्ट गुरू चा 'इतके इतके मिळाले' वाला मीटर ते इतके इतके पूर्ण झाल्यावर रिसेट होऊन परत भरणी चालूच असल्याचं एकदोन वेळा दिसलं.त्यामुळे ते कधी घेण्याचं थांबवतात याबद्द्ल शंका आहे.
अतिशय प्रसिद्ध, मान्यताप्राप्त संस्थाना त्यांच्या पानावर जाऊन किंवा त्यांना फोन कायुन विचारूनच देणगी देणे बरे पडते.प्रसिद्ध नसल्यास किमान आपल्या अगदी जवळच्या माणसाने चालवलेले किंवा त्यांना विश्वासू म्हणून माहीत असलेले असणे बरे.

घेण्यासाठी देणगीच्या रकमेसाठी काही किमान / कमाल मर्यादा असते का?

तुमच्या ग्रॉस इन्कम च्या 10% च रक्कम च तुम्ही दान देवून टॅक्स benefit मिळवू शकता .
त्या पेक्षा जास्त नाही.
असे वाचनात आले होते

मला तो दिलेल्या लिंकवरचा 4था मुद्दा नीट कळला नाही.म्हणजे काय म्हणायचंय, 1.5०लाख डोनेट केल्यास फक्त 75000 80जी साठी वैध आहेत?

उपयुक्त माहिती आणि चर्चेबद्दल सर्वांना धन्यवाद !
..
मला एक मध्यस्थ म्हणून सोशल फॉर ॲक्शन ही संस्था खूप चांगली वाटली.
आपण ऑनलाइन देणगी पाठवल्यानंतर काही क्षणातच आपल्याला ईमेलवर त्यांची पावती येते.
पुन्हा आयकर परतावा भरण्याच्या दरम्यान योग्य ती माहिती ते स्वतंत्रपणे पाठवतात.

अतिशय प्रसिद्ध, मान्यताप्राप्त संस्थाना त्यांच्या पानावर जाऊन किंवा त्यांना फोन कायुन विचारूनच देणगी देणे बरे पडते.प्रसिद्ध नसल्यास किमान आपल्या अगदी जवळच्या माणसाने चालवलेले किंवा त्यांना विश्वासू म्हणून माहीत असलेले असणे-> +१

१. समजा, ज्या व्यक्तीला ऑनलाईन मदत पाठवायची आहे तिच्या बँक खात्याची माहिती वृत्तपत्रातून आलेली आहे. समजा, अशी मदत एखाद्याने थेट त्याला पाठवली तर पाठवणाऱ्या व्यक्तीस आयकर सवलतीचा लाभ घेता येतो का ? बहुतेक नसावा.>>>
पाठवणाऱ्या व्यक्तीस तर आयकर सवलत लाभ घेता येत नाहीच, पण मला वाटते रक्कम अशी खात्यात जमा करून मग त्यांनी रुग्णालयाचे बिल भरले तर ₹५०,००० पेक्षा जास्त रक्कम देणगी म्हणुन आल्याने ती सगळी रक्कम जिच्या खात्यावर ती रक्कम आली त्या व्यक्तीच्या आयकर स्लॅब नुसार करपात्र ठरते.
जर हॉस्पिटलला परस्पर देणगी दिली तर हे टाळता येते.
त्या साठी हॉस्पिटलतर्फे अशा देणग्या एखाद्या रुग्णाच्या नावाने जमा करून हिशेब ठेवण्याची सोय असावी.

किंवा मध्यस्थ संस्था. एखाद्या रुग्णाच्या नावे आलेली रक्कम ते सरळ रुग्णालयाला देतात.

बरोबर.
काही रुग्णांच्या बाबतीत रुग्णालयच बँकिंग मध्यस्थाचे काम करते असे दिसले आहे. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या निराधार लोकांसाठी ते गरजेचे असते.

आयकरातील सवलत हे देणग्या देण्यासाठी प्रोत्साहन असते. ही सवलत नसती तर किती लोकांनी देणग्या/मदत केली असती?

यात हेराफेरी नसेल (एक रक्कम देऊन फार मोठ्या रकमेची पावती घेणे) तर शेवटी आपल्या खिशातूनच देणगी जाते ना, कर सवलती मुळे थोडी कमी जाते एवढेच.
तेव्हा कर सवलत नसली तरी तेवढीच मदत केली असती लोकांनी.
आयकरातील सवलती मुळे थोडी जास्त (जेवढी सवलत मिळते तेवढी ज्यादा रक्कम) मदत करण्यास प्रोत्साहन मिळते.

मोठी मोठी म्हणजे एकदम लाखात सामान्य लोक मदत करत नाहीत .
जे मदत मनापासून करतात आणि ते पैसे विसरून जातात.
त्यांच्या कूवती प्रमाणे च जमेल तितकी मदत करतात

हा एक गट आहे.
आणि दुसरा जो आहे तो मोठ्या रकमा दान करतात पण ही लोक कधीच गरजू च्या खात्यात सरळ पैसे पाठवत नाहीत.
ते संस्थे मार्फत च करतात.
त्या मुळे नाव पण होते आणि टॅक्स पण वाचतो.
ब्लॅक चे white money मध्ये रुपांतर पण होते.
खास ह्याच हेतू नी संस्था पण अस्तित्वात असतील .

मध्यंतरी एका विशेष घटनेच्या निमित्ताने मी एका सामाजिक संस्थेला देणगी दिली. त्याआधी मी कुटुंबात एक मुद्दा मांडला. बरेच वर्षे माझ्या मनात असलेली गोष्ट मी करणार होतो आणि मला स्वतःला या प्रकरणात आयकर लाभ वगैरे घ्यायची अजिबात इच्छा नव्हती.

यावर कुटुंबात चर्चा झाली. सर्वांचे मत असे पडले की आयकर सवलत ही सरकारने ठेवलेली गोष्ट आहे. त्यामुळे ती घेण्यात काहीच गैर नाही. पुढे जाऊन असे करावे, की जो लाभ आपल्याला मिळणार आहे तेवढी रोख रक्कम आपण अन्य एका गरजूला द्यावी.

हा मुद्दा मला पटला आणि मग मी दोन्ही गोष्टी केल्या.
असाही एक दृष्टिकोन.

सर,
मला वाटत 80G ची सवलत अनोळखी व्यक्तीस ऑनलाईन आर्थिक मदत केल्यास नाही भेट्णार (?) अस मला वाटत.

जुन्या देणगीदारांच्या मागे ससेमिरा - हे होत

नेकी कर गंगा मे डाल.... हे सुत्र बर वाटत .

अमेरिकेत यासाठी gofundme साईट आहे.
मला याबद्दल जरा मेंटल ब्लॉकच आहे. म्हणजे ज्यांना मदत करायची ती व्यक्ती गरीब असेल तर प्रश्न पडत नाहीत.उदा- कामवाली बाई किंवा भाजीवाला वगैरे. ते नेटवर मदत मागत नाहीत पण त्यांची परिस्थिती दिसत असतेच आपल्याला त्यामुळे मदत केली जाते.
पण कधीकधी चांगले जॉब असणारे, स्वतःचं घर/फ्लॅट असणारे लोकही जरा आर्थिक संकट आलं की gofundme आणि तत्सम ठिकाणी धाव घेतात तेव्हा मात्र प्रश्न पडतात. महिन्याचा पगार मिळत असून हे लोक सेव्हिंग न करता उडवून टाकतात की काय. का स्वतःच्या सेव्हिंगला हात लावायचा नाही, परस्पर लोकांकडूनच पैसे काढून आर्थिक गरज भागवायची असा विचार असतो? आमच्यावर झालेले संस्कार म्हणजे स्वतःचे सर्व ऑप्शन exhaust झाल्याशिवाय कोणाकडे काही मागायचं नाही आणि त्यातही तशी वेळ आल्यास लक्षात ठेवून ते जमेल तसे परत करणे.

काही वैयक्तिक ओळखीच्या अशा सुखवस्तू लोकांनाही मदत केली आहे. पण जास्ती करून हातावरचं पोट असलेल्या, अनेक समस्यांशी झगडणाऱ्या, किंवा सुखवस्तू असूनही मोठं संकट समोर असलेल्या लोकांना प्राधान्याने मदत करायची असं माझं धोरण आहे. (उदा- एक अमेरिकेत चांगले जॉब्स असलेलं परिचित जोडपं. त्यातल्या पत्नीने अचानक सुसाईड केली. ३-४ वर्ष वयाचा मुलगा- तोही पाश तिला थांबवू शकला नाही. त्याच्या मित्रांनी तिचं पार्थिव भारतात नेण्यासाठी gofundme वर आवाहन केलं तेव्हा तातडीने मदत केली होती आणि सर्वच कम्युनिटी एकत्र येऊन चोवीस तासात सर्व व्यवस्था झाली होती.)

हम्म
Nri गो फंडमी बद्दल कधीकधी असे प्रश्न मलाही पडतात.पण मला माहीत नाही.जितकं पॉश घर, गाडी आपल्याला फोटोत दिसत असेल त्याच्या मागे कर्ज, उधारी, इतर खर्च असूही शकतील.
मुळात दिलेली मदत योग्य प्रकारे वापरणं हा स्वभावाचा भाग आहे.कदाचित हातावर पोट असलेलेही मदत चुकीच्या हाती पडली तर चुकीचा उपयोग करतील ही शक्यता आहे.
त्यामुळे ते नशिबावर सोडून आपल्याला वाईट वाटलं तर मदत करावी असं करावं लागतं.

मदत करताना आपण त्या वेळची इमर्जन्सी बघतो. माणुसकी म्हणून मदत करतो. अशा केसेस मधे श्रेयवाद नसावा. पण अनेकदा अशा अनेक मदत करणार्‍यांचे आभार सुद्धा न मानता जे पुढाकार घेतात त्यांना श्रेय मिळते.

काही वेळा तर सोशल मीडीयात आवाहन करणारे आपल्या आवाहनाला प्रतिसाद देणार्‍यांना त्रास द्यायला सुरूवात करतात.
इंपॅक्टगुरू, स्माईल अशा संस्थेबद्दल चर्चा होतेय त्याच प्रमाणे आवाहन करणार्‍यांनी सुद्धा संकेत पाळायला हवेत. जेणे करून पुढच्या वेळी त्यांच्या आवाहनाला पुन्हा भरघोस प्रतिसाद मिळावा. एका गरजूला मदत मिळावी.

<< असे दान करताना जास्त विचार करायचा नसतो.
गेले ते गंगेला मिळाले.
बस.
नंतर विसरून जायचे असते. >>

------ हा विचार आवडला....

उदय सर,
माझाही तोच विचार आहे. पण सगळेच असा विचार करतील असे नाही.
सामाजिक कामात आवाहन करणार्‍या व्यक्तीने जर नंतर उनाडक्या केल्या तर पुढे त्यांच्या आवाहनाकडे अपवाद वगळता अन्य लोक गांभिर्याने लक्ष देणार नाहीत. नुकसान गरजूंचे आहे.

<< उदय सर,
माझाही तोच विचार आहे. पण सगळेच असा विचार करतील असे नाही.
सामाजिक कामात आवाहन करणार्‍या व्यक्तीने जर नंतर उनाडक्या केल्या तर पुढे त्यांच्या आवाहनाकडे अपवाद वगळता अन्य लोक गांभिर्याने लक्ष देणार नाहीत. नुकसान गरजूंचे आहे.
नवीन Submitted by रघू आचार्य on 9 August, 2023 - 23:46 >>

------ मला उदय म्हटलेले आवडते ... Happy

नुकसान खर्‍या गरजूंचे होते हे मान्य.

Pages