मक्तू SSSSSSब !!...(The Destiny … ) भाग -९

Submitted by Sujata Siddha on 2 February, 2023 - 05:02

https://www.maayboli.com/node/82937

मक्तू SSSSSSब !!...(The Destiny … )
भाग -९

यु डी कडची नोकरी बंद झाली तरी माझं बातम्या देणं चालूच होतं , त्यावेळी अधून मधून सुपर्णाची आणि माझी भेट होत असे , तिला पाहिल्यावर मला उगाचच अपराध्यासारखं वाटे . पण ती मात्र नॉर्मल बोलत असायची , माझ्या मनात सतत घालमेल असायची हिला या सगळ्या घडामोडींबद्दल माहिती नाही असं होणंच शक्य नाही , पण ही कधीही ते चेहेऱ्यावर दाखवत देखील नाही ? तिच्या मनात नेमकं काय असेल ? ती यु डी ला घाबरत असेल म्हणून विषय काढत नाहीये की अजून काही कारण असेल ? आणि मग एके दिवशी तिचाच मला फोन आला ,
“हॅलो उल्का , सुपर्णा बोलतेय “
“बोल ना “
“ऑफिस का सोडलंस ? उदयन ने तुलाही पटवण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय हो ना ? खूप नीच आहे तो , लग्न झालेल्या बाईला पण सोडत नाही . “
“शी !.. असं काही नाहीये “
“मग तु नोकरी का सोडलीस बोल ? “
“आहेत काही माझी वैय्यक्तिक कारणं “
“ उल्का माझ्या नवऱ्याला मी खूप चांगलं ओळखते , ‘ नवरा ‘ हा शब्द उलट्या बाजूने वाचला तर काय होतो माहितीये ना ? रावण .. उदयन तसाच आहे ! तु फार भोळी आहेस ,समोर जे दिसतं तेवढंच जग नसतं . आणि नोकरी सोडली म्हणून तो तुला सोडेल असं वाटतं का ?तु उदयन ला ओळखत नाहीस उल्का ”
“तुझा काहीतरी खूप गैरसमज झालाय त्यांच्याबद्दल , ते तसे नाहीत “
पलीकडून ती मोठ्यांदा हसली , “ हे तू मला सांगतेस ? मी सहा वर्ष संसार केलाय त्या माणसाबरोबर , उदयन काय आहे हे फक्त मला माहितीये “
“असेल तसंही , पण …”
“मला एक सांग उल्का , तुझ्या नवऱ्याने तुझा कधी गळा दाबलाय ? “ एवढंच विचारून तिने फोन डिस्कनेक्ट केला . मी शॉक झाले ,सुपर्णा खरं बोलत असेल ? खरंच यु डी तसे असतील ? सुपर्णाच्या च्या चष्म्यातून यु डी ईतके भयानक वाटत होते की माझ्या मनाशी रंगवलेल्या त्यांच्या एक्स्ट्रा -ऑर्डीनरी प्रतिमेला असंख्य भेगा पडल्या होत्या , माणसं ईतकी दुटप्पी असू शकतात हे माझ्या सहनशक्ती च्या पलीकडे होतं , माझं पाहिलं -वाहिलं प्रेम म्हणजे यु डी होते , माझ्या मनात मी त्याना खूप उच्चसनावर बसवलं होतं त्या मूर्तीची कोणीतरी अशी येऊन तोडफोड केलेली मला सहन होत नव्हती . त्या दिवसात सतत रडत राहणे या व्यतिरिक्त दुसरे ईमोशन्स मला आठवत नाहीत .
काही दिवसांनी पुन्हा एकदा सुपर्णा चा फोन आला , ती मला नगरला तिच्या माहेरी बोलवत होती , मलाही एकदा सविस्तर तिच्याशी बोलायचे होतेच , मानस ची परवानगी मिळाल्या वर मी तिला येते म्हणून सांगितलं , शनिवारी बातम्या देऊन झाल्यावर तिथूनच परस्पर नगरला जायचे असे आमचे ठरले , ती गाडी घेऊन तिकडेच येणार होती आणि मानस निशी ला तिथे सोडणार होता , नगरला जायच्या आदल्या दिवशी संध्याकाळी फोन खणखणला , फोन यु डी चा होता . यु डी चा आवाज ऐकून माझ्या दोन्ही पायांना कापरं भरलं ,ccd ला त्यांनी प्रपोज केलं होतं त्या नंतर मी आजच त्यांचा आवाज ऐकत होते ,माझ्या ऐवजी दुसऱ्या कोणी फोन उचलला असता तर ? …
“, तु सुपर्णा बरोबर शनिवारी नगर ला चाललीयेस असं कळलं , जाऊ नकोस “
“तुम्ही घरी फोन का केलात ? मी आता ऑफिस ला येत नाहीये “
“ ते महत्वाचं नाहीये , तु जाऊ नकोस तिच्याबरोबर .”
“पण का ? “
“ नाही जायचं “
“का ? ती तुमच्याबद्दल मला नको नको ते सांगेल म्हणून ? पण तुम्ही जर खरे असाल तर का घाबरता ? ”
“ उल्का मी माझ्या संबंध आयुष्यात कधीही कुणालाही घाबरलेलो नाही , मी जे करतो ते जाहीर पणे करतो , कुणालाही खोटं बोलून फसवणं माझ्या स्वभावात नाही , पण सगळी माणसं तशी नसतात, सुपर्णा कुठल्या थराला जाऊ शकते हे मला माहितीये आणि तु खूप निष्कपट स्वभावाची आहेस उल्का , ती तुझ्या या स्वभावाचा गैरफायदा घेईल , म्हणून म्हटलं की नको जाऊस , पण तरीही तुझा हट्टच असेल तर मी काय म्हणणार यावर ? Anyways एका गोष्टीसाठी मला तिचे आभार मानायला हवेत , आज तिच्यामुळे तब्बल एक महिना , बावीस दिवस , पावणे चार तास , तीन मिनिटे आणि साडे -अकरा सेकंदांनी तुझा आवाज ऐकतोय , किती आनंदाचा क्षण आहे माझ्यासाठी तुला कल्पनाही नसेल ,आणि त्यांनी एकदम गुणगुणायला सुरूवात केली , “मुझको अगर भूल जाओगे तुम , मुझसे अगर दूर जाओगे तुम , मेरी मुहोब्बत में तासीर है , तो खिचके मेरे पास आओगे तुम , sss देखो हमारी होगी जीत .. .. … “ मी ऐकत राहिले , ते स्वर आणि ते शब्द मनात पुन्हा रुतत गेले. पलीकडून फोन डिस्कनेक्ट झाला ,तरी कितीतरी वेळ मी तशीच उभी होते .
खरं तर मी जॉब जरी सोडला होता तरी माझ्या मनातून मी यु डी ना काढू शकले नव्हते , पदोपदी त्यांची आठवण मला छळत होती , सुपर्णाचा मला नगर ला नेण्याचा आग्रह का चालला होता हे न कळण्याईतकी मी दूधखुळी नव्हते , पण कुठेतरी मनाला असं वाटत होतं की सुपर्णाने ईतक वाईट -साईट सांगू दे मला यु डी बद्दल की माझ्या मनातून ते उतरले पाहिजेत .पण यु डी च्या त्या एका फोनने माझा सगळा डोलारा डळमळाला. तरीही मी नगरला गेले . तिची आई , बाबा, भाऊ, आजी आजोबा सगळेच माझ्याशी खूप चांगले वागले ,जणू मी त्यांच्या घरातलीच एक आहे . निशी पण अनय बरोबर खूप छान रमली . पण मला वाटले तसे काही झाले नाही , ना त्यांनी मला यु डी बद्दल काही वाईट सांगितले ना मी त्यांच्याशी या विषयावर बोलले पण बहुधा यु डी च्या घरच्यांची आणि यु डी च्या घरच्यांची शेवटची बैठक असणार होती , त्यात काय ते फायनल ठरणार असावं म्हणून सुपर्णा पुरावे गोळा करत होती . ते सर्व ईतके चांगले वागल्यामुळे मी सुपर्णा च्या बाजूने बोलेन असा त्यांना विश्वास होता , कारण नगर हून आल्यानंतर दोन -तीन दिवसांनी जाई चा फोन आला , ऑफिसला येतेस का ? यु डी च्या आई ऑफिसला येणार आहेत त्यांना तुझ्याशी बोलायचंय कारण तु सुपर्णाची मैत्रीण आहेस आणि तिच्या बरोबर नगर ला जाऊन आलीस हे त्यांना कळलं आहे . मी हो म्हणाले , जवळ जवळ दीड -दोन महिने झाले मी घरी होते , या दरम्यान ना मला दुसरी नोकरी मिळाली होती , ना घरच्या परिस्थितीत तिळमात्र बदल झाला होता . कुठेतरी ते हरवलेलं रंगेबिरंगी आयुष्य पुन्हा सुरू व्हावं अशी मनाला ओढही लागली होती . एकदा वाटे जाई म्हणते तसं त्यांनी आपल्याकडे मागितलंच काय होतं ? फक्त माझ्या आसपास रहा एवढीच याचना केली होती , तिथेही आपण आखडू पणा केला . आता पुन्हा काहीतरी निमित्ताने बोलावणं येतंय तर नाही का म्हणा . मानस ला सांगितलं की मी ऑफिस ला जाऊन येते तसा त्याला खूप आनंद झाला . त्यानेच पुन्हा गाडीवर नेऊन सोडवले . यु डी ने प्रपोज केलं आहे हे वगळता बाकी सर्व गोष्टी मी त्याला सांगितल्या होत्याच .
यु डी च्या आई भेटल्या , त्यांना मुलगा जे काही करतो आहे याचा भयंकर राग होता , त्या पूर्णपणे सुपर्णाच्या बाजूने होत्या . आपल्या घरातून एका मुलीवर अन्याय होतो आहे हे त्यांना सहन होत नव्हते आणि यु डी चा स्वभाव असा होता की सगळ्या गोष्टी जाहीरपणे सांगायची त्यांना सवय होती . लपून वैगेरे करणे त्यांच्या स्वभावात नव्हते . त्यामुळे मुलगा वाईट आणि छंदीफंदी आहे याचं त्यांना प्रकर्षाने वाईट वाटत होतं असं दिसलं . माझ्याविषयीही त्यांना कळले होतेच त्यामुळे मला वारंवार सावध करून त्या गेल्या . यु डी ना आपल्या आई बाबांबद्दल प्रचंड आदर होता असे निदान त्यांच्या बोलण्या वागण्यातून वाटायचे , असे असले तरी सुपर्णा च्या बाबतीत ते ठाम होते त्यांना तिच्याबरोबर संसार करायचा नव्हता . अखेर सध्या सुपर्णा रहात असलेला २ bhk फ्लॅट ,लग्नातले सर्व दागिने , अनय च्या शिक्षणाची तसेच त्या दोघांच्या उदरनिर्वाहाची पूर्ण जबाबदारी यु डी ने घ्यायची या अटींवर ती घटस्फोटाला तयार झाली . त्या गोंधळात ईकडे मी रोज ऑफिसला कधी यायला लागले हे माझ्याच काय कुणाच्याच लक्षात आले नाही.
पुन्हा माझे रूटीन सुरू झाले , यु डी चे ही पूर्वीसारखेच सगळ्यांना घेऊन भटकणे , हॉटेलिंग , मूव्ही ई गोष्टी चालू झाल्या , पुन्हा सारे पुर्वीप्रमाणेच चालू झाले फरक फक्त माझ्यात पडला होता . माझ्याही नकळत मी बंडखोर होत चालले होते , हल्ली मी वहिनींचे निमूटपणे ऐकून घेत नव्हते त्यांना उलटं बोलत होते , सासूबाईंनी सांगितलेल्या बऱ्याच गोष्टींकडे कानाडोळा करत होते , मानस आणि माझ्यातही खूप वाद -विवाद वाढले होते , त्यातच तो पुन्हा एकदा जिव्हारी लागेल असे बोलला ,मला म्हणाला, ‘मला माहितीये आम्ही कोणीच तुला आवडत नाही , पण केवळ दुसरा ऑप्शन नाही म्हणून गपचूप आम्हाला झेलतीयेस , ज्या दिवशी दुसरा ऑप्शन मिळेल त्या दिवशी जाशील निघून , “ हे ऐकल्यावर मला त्याला ओरडून सांगावंसं वाटायला लागलं की अरे दुसरा ऑप्शन केव्हाच मिळलाय पण नाही जाऊ शकत तुम्हाला सोडून , कारण नको ते चांगुलपणाचे संस्कार आहेत माझ्यावर . मला मीच खूप त्यागी , सज्जन वैगेरे वाटू लागले अशा तर्हेने माझं स्वतः:चहि भान सुटू पाहतंय हे माझ्या लक्षात नव्हतं येत .मी बदलत चालले आहे हे मला कळत नव्हतं .

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यू. डी. विषयीच शंकानिरसन केल्याबद्दल धनयवाद
उल्का च्या आयुष्याला पुढे कस वळण लागलं ह्याची उतसुकता आहे
अजून भाग येऊ देत.

मला युडी जरा विचित्र वाटतोय. सुपर्णा त्याची बायको, जाईबरोबर रहातो आणि आता उल्काच्याही प्रेमात. मॉर्डन श्रीकृष्णच की.