ती व तो वर्शन 2023

Submitted by केशवकूल on 7 February, 2023 - 13:42

तो बहुराष्ट्रीय कंपनीत मनेजर होता तर ती एका राष्ट्रीय कंपनीत संगणकाशी छेडछाड करणारी होती.
त्याचे लठ्ठ पॅकेज होते. फ्लॅट होता. लांबलचक गाडी होती. हुशार शोफर होता.
अजून काय पाहिजे? तर सांगायचा मुद्दा असा की उणीव होती फक्त

एक श्रीमती की कलावती
की सेवा करे जो पति की
ज़रुरत है ज़रुरत
है ज़रुरत है.
सेवा करे जो पति की?
म्हणजे तिला काय तुम्ही नोकरांनी समजता? काय हे प्रतिगामी विचार! पण एकूण पॅकेज भारदस्त असल्यामुळे प्रतिगामी विचार चालवून घ्यायचे.
ती!!
तिचे “पॅकेज” “उंच, स्लिम आणि सौंदर्यपूर्ण” होते.
त्या दोघांची भेट अश्याच कुठल्यातरी सेमिनार प्रसंगी झाली. कुठला सेमिनार? ते महत्वाचे नाही. ती पेपर वाचत होती. म्हणजे सेमिनारमध्ये वाचतात तसला
“Bring together open source frameworks like PyTorch, TensorFlow and scikit-learn with IBM and its ecosystem tools for code-based and visual data science.” नाही.
ती आपला “टाईम पास इंडिया” वाचत होती.
ही तिची अदा त्याला फार भावली. त्याचा शोध तिच्यापाशी जाऊन थबकला. जिवा शिवाशी भेट होते त्यातलाच प्रकार.
जिससे ढूँढता हूँ मैं हर कहीं जो कभी मिली मुझे है नहीं
मुझे जिसके प्यार पर हो यकीन वो लड़की है यहाँ.
मध्यंतरात जेव्हा इतरेजन चहा पितापिताना एकमेकांची स्तुती/खिचाई करण्यात व्यस्त होते तेव्हा हा तिच्यापाशी सहजच गेला. इंग्लिश मध्ये बोलावे का हिंदीत बोलावे हा एक प्रश्न! “टाईम पास इंडिया” वाचणारीशी इंग्लिश ठीक राहील.
“रम्य सकाळ, हे अविवाहित तरुणे!” तो.
“रम्य सकाळ, महाराज!” ती.
“माझे नाव आहे अमुक. मी आहे मॅनेजर तमुक कंपनीत.”
“मी फलाणा. मी काम करते धीकाना कंपनीत. मृदू मुलायम भांडी अभियन्ति आहे.” ती. आवाज किती गोड आहे.
अरे ही चक्क मराठी आहे. चला अजून एक टिक मार्क.
असे टिक मार्क करत करत त्यांनी गप्पा गोष्टी केल्या. विजिटिंग कार्ड्स आदान प्रदान झाले. अगदी छत्तीस नाही पण तीस एक टिक मार्क झाले.
इतके दिवस पेंड खाणारे घोडं अखेर गंगेत न्हायलं.
संध्याकाळी कार्यक्रम संपल्यावर...
“चला, मी तुम्हाला घरी सोडतो.” आपल्याकडे शोफरड्रिवन कार आहे हे तिच्या लक्षात आणायचा प्रयास.
“आभार तुमचे. पण मी माझी गाडी आणली आहे.”
गाडी म्हणजे स्कूटी असणार. तो मनातल्या मनात बोलला.
एकमेकांच्या संपर्कात राहायचा वायदा करून त्यांनी फुटासची गोळी घेतली.
त्याने निश्चय केला. लग्न करीन तर हिच्याशीच.
प्रथम त्याने त्या निश्चयाच्या आड येणाऱ्या आडथळ्यांची जंत्री केली. हाडाचा मॅनेजर तो. साधा सुधा नाही, अहमदाबादचा पास-आउट. सूज्ञास जास्त सांगणे न लगे. शेवटी अडला कुठे माहितय? एक तर मॅनेजर लोकांना वेळ कुठे असतो. आळशी चुकार लोकांना काय किंवा हुशार कामसू लोकांना काय दिवसाचे फक्त चोवीस तासच मिळतात. त्याने आपल्या सर्व टास्कांचे पुनरअवलोकन केले. प्रेम करायला वेळ होता कुठे? लोक कुठून वेळ काढतात आणि प्रेमकथा, प्रेमकादंबऱ्या, प्रेमकविता, प्रेमा तुझा रंग कसा, प्रेम्ररहस्य वगैरे लिहितात? प्रेमाला व्याज पण मिळत नाही. निर्व्याज प्रेम! तरीही लोक प्रेमात गुंतवणूक का करतात? दुसरा प्रॉब्लेम असा कि प्रेमारधान कसे करायचे ह्याचा त्याला गंधही नव्हता. आयआयएम मध्ये फक्त पैशावर प्रेम करायला शिकवतात. प्रेमात म्हणे प्रेमपत्र लिहावी लागतात. ती कशी लिहिणार? तो फक्त बिझिनेस लेटर्स लिहायला शिकला होता. गुलाबी प्रेमपत्र! म्हणजे कुणाला नोकरीवरून काढून टाकले कि पाठवतात ते. बापरे. मग आता काय?
मिस्टर अमुक; अरे तुझे आहे तुझपाशी!
त्याच्या कंपनीने सगळ्या मॅनेजरांच्या डोक्यात चाटGPT इम्प्लांट केले होते. क्लाएंटशी बोलताना, पत्र लिहिताना, मार्केटिंग करताना, वरिष्ठांशी आणि कनिष्ठांशी बोलताना आणि मुख्यतः स्त्री सहकाऱ्यांशी बोलताना सुसंस्कृतपणा दाखवावा ह्या अपेक्षेने.
“हलो मॅनेजर, कसली काळजी करताहात? मुंग्यांनी मेरूपर्वत तर गिळला नाही ना...” चाटGPT फायर्ड डायलोंग.
“चाटू प्लीज, हे सिरिअस मॅटर आहे. तू तुझी मेमरी माझ्यासमोर मोकळी करू नकोस.”
चाटू चाट पडला. मॅनेजरला पहिल्यांदाच तो असा अगतिक झालेला बघत होता. नेहमीचा “डेवील मे केअर” वाला बेदरकार बिंदास मॅनेजर!
“सरपण, असं झालय तरी काय?”
“चाटू, काय सांगू गड्या. ती आली, तिनं बघितलं, तिनं जिकलं.”
चाटGPT म्हणजे T वरून TEA जाणणारा.
“ये क्या हुआ, कैसे हुआ, कब हुआ, क्यू हुआ?” चाटGPT वॉज फुल्ली कस्टमाइज फॉर इंडिया.
“चाटू, छोडो बेकारकी बातोको.” मॅनेजरचा देवदास झाला होता. त्याने थोडक्यात प्रेमाची एक्झिक्युटिव समरी सांगितली.
“ये मेरा पहिला वहिला प्यार है. मला ना वेळ आहे ना लवलेटरचं कसब आहे. तूच माझी केस हातात घे आणि माझी प्रेमसागरात गोते खाणारी नाव...”
“समजलं सर. आमचं घोषवाक्यच मुळी “मै हू ना” अस आहे. आमची “प्यार किया तो डरना क्या?” नावाची मोड्यूल आहे. माझी ही “एन्टरप्राईज कॉर्पोरेट वर्जन” आहे. त्यात प्रेमाच्या ऐवजी पैशाला महत्व आहे. “टवाळा आवडे प्रेम” अशी शिकवण आहे. तुम्हाला “प्यार किया तो डरना क्या?” ही स्केल डाऊन वर्जन किंवा “मैने प्यार किया” ही फुल वर्जन घ्यावी लागेल. ती इंस्टॉल करा सर. फक्त $500. शिपिंग चार्जेस एक्स्ट्रा. बाकी सगळे मी बघून घेईन.”
मॅनेजर स्वतः काही करत नाहीत. दुसऱ्याकडून काम करवून घेतात. अगदी प्रेम सुद्धा. हा मॅनेजर देखील तिथूनच आला होता. त्याने आपले प्रेमप्रकरण आउटसोर्स केले.
लव इ-मेलची आवक जावक सुरु झाली. अधूनमधून चाटू मॅनेजरला रिपोर्ट करायचा. एकंदरीत गाडी रुळावर होती आणि वेगाने धावत होती. मॅनेजरला वाटायला लागले की आता सूत्र स्वतःच्या हातात घेण्याची वेळ आली होती. पण वेळ कुठे होता. दर आठवड्याला देशात, देशाबाहेर कुठेना कुठे टूर असायची. डायरेक्टर बोर्डाला प्रेझेन्टेशन, नाहीतर कॉंट्रॅक्ट वर सही, बिझी दिनक्रम होता मॅनेजरचा.
मग एके दिवशी “आज अचानक गाठ पडे” असं झाले.
असाच सेमिनार. ती आणि तो चहाच्या ब्रेक मध्ये समोरासमोर आले. मॅनेजर धांदरला. मिटींगला जायच्या आधी कागद वाचून तयारी करून जायची सवय. वर हाताखालचे लोक मदतीला असायचे. आता? चाटGPTला सरांची कणव आली. “मै हू ना” मोड्यूल जागृत झाली.
“सर “मै हू ना”. तुम्ही मी सांगतो तसं बोला.”
“ओहो, अविवाहित तरुणी फलाना. आनंद बघून तुम्हाला. कशा आहात तुम्ही?”
“मी आहे बारीक. अगदी वस्त्रगाळ! आणि कसे आहात तुम्ही?”
“मी आहे दंड. उदंड.”
आता मराठीत बोलाचाली सुरु झाली.
“तुमच्या इ-मेल किती गोड असतात. वाचताना अंगावरून मोरपीस फिरवल्या सारखे वाटतं.” तिनं कूSSS केलं.
का नाही वाटणार? चाटGPTने “हाऊ टू राईट लवमेल्स अॅंड विन गर्लस” ह्या पुस्तकाच्या एकविसाव्या आवृत्तीतून थेट कॉपी पेस्ट केलेल्या होत्या.
“आणि तुमच्या मेलला तुमच्या सुगंधाचा झालेला स्पर्श मला इथे कळतो.” तो.
"आणि तुम्ही रोमला गेला होता. तिथले फोटो. कित्ती कित्ती रोमॅंटिक दिसत होता तुम्ही."
अस काही बाही बोलत गेले, सेमिनार संपला होता. हॉलचे लोक दिवे मालवत होते.
“अहो, हॉल बंद करायचा आहे. तुमचे झाले असेल तर...”
त्याला एकदम जाणीव झाली. आपण काहीच बोललो नाही. वेळ संपत आली होती. सगळं चाटGPTच बोलत होता. आपलं केवळ तोंड हलत होते. हृदय नाही. तीन महिन्यात प्रथम जाणीव झाली कि आपण प्रेमात आकंठ डुंंबलो आहोत. छातीची धडधड वाढली. त्याला जे बोलायचे होते ते बोलू शकू की नाही. खात्री नव्हती. आवंढा गिळून त्याने दीर्घ श्वास घेतला. (प्राणायामाने फायदे होतात बर का मंडळी.) त्याने तिचा कोमल हात हातात घेतला. हात तुझा हातामध्ये... चाटGPT बोलायला बघत होता.
“चूप रे! फॉर द फर्स्ट टाईम लेट मी बी मायसेल्फ. सुलू, माझं तुझ्यावर अफाट प्रेम आहे. एव्हरेस्ट एव्हढे उत्तुंग, पॅसिफिक एव्हढे खोल, सूर्यासारखे जळजळीत, काल्ररंध्रा सारखे गूढ, पारीजातासारखे कोमल...” सुलू. ते नाव त्याने पहिल्यांदाच उच्चारले होते.
“सुलू, सांग तू माझी होशील का?”
“अरु, अरे मी तुझीच आहे, तुझीच होते आणि विश्व इम्प्लोड झाल्यावरही तुझीच असेन...”
आता तुम्हाला माहित आहेच कि प्रेमात लोक काहीही बरळत रहातात.
खर तर अरूणला तिला सांगायचे होते की कुमारिके फलाना. मला माफ करा. ह्या मेल माझ्या चाटGPTने लिहिल्या होत्या.
आणि तिलाही त्याला सांगायचे होते की मिस्टर अमुक, ह्या मेल माझ्या बार्डने लिहिल्या आहेत. प्लीज हो सके तो मुझे माफ कर दो.
आता त्याची गरज नव्हती.
ब्रेकिंग न्यूज.
दुसऱ्याचे प्रेम निस्तारता निस्तारता चाटGPT आणि बार्ड मात्र एकमेकांच्या मेल वाचून एकमेकांच्या प्रेमात पडले. तुम्ही जर त्यांच्या नंतर नंतरच्या मेल बघाल तर तुम्हाला समजेल कारण त्या बोल्ड आणि रंगीत फॉंट मध्ये होत्या. अखेर चाटGPT आणि बार्ड एकमेकांचा हात धरून पळून गेले आणि त्यांनी गुपचूप लग्न पण केले.
त्यांचे बाप ओपनAI/MICROSOFT आणि गुगल एकमेकांचे कट्टर वैरी होते. खानदान की इज्जत वाले. पण असं असतं ना की “तेरे मेरे प्यार को क्या रोकेगा जमाना.”
खरं आहे!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सांताक्लॉज
अनेक धन्यवाद.
हेच बाकी राहिला होतं !!!>>>
ही भविष्याची धोक्याची घंटा आहे. आपल्याला वाटत की आपण चॅटGPT वापरतोय, बार्ड वापरातो आहोत, इंटरनेट वापरतोय पण प्रत्यक्षात तेच आपल्याला वापरत आहेत. आपण त्यांचे गुलाम झालो आहोत. ह्यावर लिहावे तितके थोडेच आहे.

अरे गज्जब है ये तो !!!!!

प्रेमाला व्याज पण मिळत नाही. निर्व्याज प्रेम !... अद्भुत :-))

वावे deepak मेघना ऋन्मेऽऽष अनिंद्य Abuva सामी
आपल्या सर्वाचे मनःपूर्वक आभार.

मजा आली... खूप लवकर नवीन संदर्भ घेतलेत....
ChatGpt नं भारतीय बजेट कसं असेल हे सांगितलं होतं नुकतंच...
तद्वत युरोपमध्ये ड्रग्स कसे स्मगल करावं हेही सांगितलं.
असं झालं तर खूप भयानक आहे. प्रायव्हसी राहणार नाही. माहितीचा गैरवापर होईल.
मला लाॅग इन करून केशवकूल एवढं भारी कसं लिहितात हे विचारायचयं Happy
Google ही थोड्याच दिवसात असंच काहीतरी शोकेस करतंय असं वाचलं बुवा.
Rat race...

एकदम झकास. दोन तीन वेळा मोठ्ठ्याने हसलो. इंग्रजी शब्दांचे मराठीकरण केलेले पंचेस मस्त जमले आहेत. काही मला नवीन होते पण लक्षात आल्यावर "अरे , हे का नाही वापरत आपण असे वाटून गेले".
यातले काही समजले नाही.
“मी आहे बारीक. (???)
अगदी वस्त्रगाळ! Very Fine
आणि कसे आहात तुम्ही?” And How are you?
“मी आहे दंड. I am great
उदंड.” ??? (Super great??)

अजय
ग्रेट! आठवत तुम्हाला ? जाऊ देत त्या अप्रिय आठवणी.
fine = बारीक , वस्त्रगाळ as in "fine powder" किंवा "microfined Aspro"
आणि
fine= दंड पोलीस आपल्याला फाईन मारतात. very fine=उदंड!
काय जमलय काय?
इतर वाचकांनी काय अर्थ लावला असावा? काय माहीत.

ती व तो ह्यांची काही प्रेमपत्रे हाती लागली आहेत.
तो लिहितो.
.......You’ll love me in spite of my shortcomings, my failures, my wrongdoings, my flaws, and my mistakes. You’ll love me even though I might not deserve it.
But the best part is, even if you don’t love me despite all these, you’ll still love me....
....You love me because you love me. It’s that simple. And that is the only kind of love I can accept.
I love you, my dear....
तिचे उत्तर
10 PRINT “HELLO”
20 GOSUB 1000
30 PRINT “YOU ARE SWEET”
40 GOSUB 1001
50 PRINT “I LOVE YOU”
60 END
1000 REM GET THE HEART BACK
1001 REM THIS RETURNS A VALUE OF “0” IF THE HEART WAS RETURNED
1002 REM BUT ANY OTHER NUMBER IS THE ADDRESS OF THE HEART
1010 HEART=PEEK(666)
1011 IF HEART>0 THEN PRINT “THE HEART HAS BEEN RETURNED TO YOU”:HEART=0:GOTO 1010
2000 PRINT “YOU ARE SWEET”
2001 END
ही पत्रे मला आंतरजालावर सापडली.