डिसेंबरची असली तरी दुपारी दीड-दोनची टळटळीत वेळ होती. निगडीच्या स्टॉपवर जवळपास सत्तर-ऐंशी लोकं तळेगाव-वडगावकडे जाणाऱ्या बसची वाट पहात होते. तिथे कोण नव्हते? शाळेच्या गणवेशातील मुलं होती, कॉलेजकुमार आणि कन्यका होत्या, आजी आजोबा होते. कुणी खरेदी करून परत चाललं होतं तर कुणी झाकलेली टोपली घेऊन विकायला चालले होते. पाठीवर दप्तरं होती तसेच लॅपटॉपच्या बॅगा होत्या. खांद्यावर बॅगा होत्या, हातात पिशव्या होत्या. डोळ्याला गॉगल होते, तर पांढरी काठी घेऊन एक अंध जोडपं ही होतं. गर्दी पाहून मी मागेच राहिलो होतो. जोडीला एक आजोबा होते. जसा जसा बसला उशीर होत होता, तशी गर्दी वाढत होती. आजोबा स्वतःशीच बोलावं तसं मला म्हणाले, "कोण चढणार या गर्दीत?" मी मान डोलावली, म्हणालो, "एक तरी बस सोडावी लागणार असं वाटतंय". इतर बशी येत होत्या जात होत्या. पण त्या सगळ्या पुण्याकडे जाणाऱ्या. रस्त्याच्या कडेलाच थांबायच्या, माणसं धावत जायची आणि चढायची.
समोर एक बाई आपल्या तीन-चार वर्षाच्या पोराबरोबर उभी होती. जोडीला तिच्याच वयाची तिची बहीण असावी. मुलगा आईच्या बोटांना लोंबकळला होता, आणि त्याची जरा किरकीर चालू होती. बरोबर आहे हो, ताटकळून सगळेच वैतागले होते. अचानक "आली, आली" असा हाकारा उठला. वळून आत येणारी बस आधीच भरलेली होती. ती दिसताच सगळा लोंढा तिकडे धावला. पण ती बस रस्त्याच्या कडेला थांबली नाही तर पूर्ण वळून आत थांब्यापर्यंत आली. हे अनपेक्षित होतं. त्यामुळे पुढे गेलेला सगळा घोळका उलटा मागे आला. लय रेटारेटी झाली. ही आई, तो मुलगा हे त्या गर्दीत घुसले होते ते सगळ्यांबरोबर मागे ढकलले गेले. आईनं तोल सावरला, पण मुलाचा वांदा झाला. धडपडत उलट्या उलट्या मागे सरकणाऱ्या गर्दीच्या गचपणात तो अडकला. एकीकडे त्याला आईचा हात सोडता येत नव्हता. आणि सगळ्या त्याच्यापेक्षा उंच माणसांच्या पायात पायात येऊन दोघाचौघांच्या मध्ये चेंबला जात होता. तेवढ्यात त्याच्या पायावर कुणाचा बुटाचा पाय पडला, झालं! त्याच्या आईनं जरा सावरल्यावर त्याला खेचून बाहेर काढला. पण तोवर त्यानं भोकाड पसरलं होतं. बूटाचा पाय पडल्यानं त्याचा पाय चांगलाच सोलवटला होता. बरं बोलणार तरी कुणाला? सगळेच बसमध्ये घुसायच्या नादात.
आईनं त्याला उचलला, कडेवर घेतलं, त्याला चुचकारलं. पायावर फुंकर घातली. तोवर वीस-पंचवीस माणसं भरून ती बस निघून गेली. मी आणि आजोबा, आम्ही दोघंही निवांत होतो. आपल्याला अशा गर्दीत शिरायचं नाही हे आम्हाला पक्कं ठावूक होतं! पण ही आई मात्र आता चिडलेलीच दिसली. तिला अंदाज न आल्यानं एक तर बस चुकली, आणि वर पोरालाही लागलं. चिडचीड होणं साहाजिक होतं. शेवटी आई आहे ती!
पुढची बस आली. आता गर्दीला अंदाज होता. त्यामुळे लोकं पुढे धावायच्या ऐवजी जरा मागे सरकले. आम्ही मागेच होतो. चांगलं अंतर ठेऊन होतो. समोर मावशीचा हात धरून तो छोटा मुलगा होता. मग आई कुठे आहे? बघता बघता ती बस समोर येऊन थांबली. आता गर्दी तिला झोंबत होती. पण आई? ती दिसली ती बशीच्या आत! सारे समय केवल महिलाओंके लिये असलेल्या जागी! तिच्या चेहेऱ्यावर एक निग्रह होता. चीड, संताप धगधगत होता. आईनं बघितलं की सगळी जनता मागेमागे सरकतेय. मग ती चलाखीनं पुढे गेली आणि वळताना बसचा वेग कमी होताच दरवाजातला बार पकडून वर चढली, आणि तिनं बाकडं पकडलं! तेवढ्यात दुसऱ्या एका अतिहुशार गृहस्थांनी त्या खिडकीतून जागा पकडण्यासाठी रुमाल टाकला. तर त्या आईनं उचलून बाहेर फेकला अन् गर्जली, "महिलांसाठी राखीव जागा आहे!" मग मावशीनं मुलाला उचललं आणि खिडकीतून आत आईकडे दिलं! स्वतः चपळाईनं दरवाजा जवळच्या गर्दीत घुसली. ती मावशी चढून तिथे येईपर्यंत आईनं खिंड लढवली. मुलाची सोय झालीच पण मावशीसाठीही जागा धरून ठेवली! हिरकणीच ती!
आता गर्दी जरा कमी झाली. पण लगेच पुढची बस येणार नाही या हिशेबाने मी आणि आजोबा पलिकडच्या टपरीवर चहा पिऊन आलो. एक तान्हं मूल कडेवर, एक बॅग खांद्यावर आणि दुसऱ्या हातात पिशवी अशी एक आई आता तिथे आली होती. बघितल्यावर वाटलं गावाकडनं माहेरपण आटपून आली असावी! बस आली; आजोबा पुढच्या दारानं चढले; मी मागच्या गर्दीत मिसळलो. ही बाई आता गर्दीत घुसली. पण तिनं हातातली पिशवी डोक्यावर घेतली होती. एक हात चढताना बार धरण्यासाठी, आधार घेण्यासाठी मोकळा केला होता तिनं! गर्दी कमी झाली म्हटलं तरी चढणाऱ्यांची भाऊगर्दी असतेच ना. बाळ काय बाई काय बुवा काय, कोण बघतोय? घुसा आत, रेटा, होऊं द्या चेंगराचेंगरी! मग तिच्या कडेवर बाळ आहे याचा कोण विचार करतंय. झालं.
ती चढली खरी, पण काय झालं कोणास ठाऊक, ते बाळ एकाएकी रडायला लागलं. जरा बाबापुता केला तिनं, पण ते काही ऐकायला तयार नव्हतं. बस मार्गाला लागली तशी कंडक्टरनं सगळ्यांना पुढे हाकललं. थोडी गर्दी हलली, जागा मोकळी झाली. पण या पोरानं जो सूर धरला तो ऐकेच ना. तोपर्यंत आईनं डोईवरची पिशवी उतरवली होती. आई म्हणजे काय हो, लग्न होऊन वर्ष झालं असेल नसेल अशी अठरा वीस वर्षांची लहानखुरी मुलगी होती ती. आता ती त्याच्या कानात काही बोलू लागली, गाणं म्हणू लागली. कसचं काय! कुणा पोक्त बाईनं तिला "आगं ये बये, खिडकीजवळ जा पोराला घिऊन! वारं लागूं दे जराशी" असं हाकारलं. ती वाट काढत काढत गेली खिडकीपाशी. अंहं, पोरगं काय ऐकायला तयार नव्हतं. मग आजूबाजूच्या कॉलेजकन्यकांनी त्याचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मगाचे आजोबा होते ना, त्यांना चांगली सीट मिळाली होती. त्यांनी पाण्याची बाटली काढली थैलीतून, अन् त्याला पाजायला दिली. ते पोर काही तोंड लावे ना. अन् टिपेचा सूर चालूच. मग एकानं मोबाईल काढला अन् काहीबाही लाऊन त्याच्यासमोर धरला. जरा आवाज थांबला. सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. पण किती? दोनच मिनिटं. पुन्हा रडणं सुरू! आता मात्र आईनं महिलांच्या सीटवर बसलेल्या एका माणसाला उठ असं सांगितलं. तिथल्या खिडकी जवळच्या बाईला सरकायला सांगितलं. पायाखाली बॅग अन् पिशवी ठेवत मांड ठोकली, आणि पोराला पद्धतशीर पदराखाली घेतलं! पोराचा आवाज बंद! हिरकणीच ती!
एकाच प्रवासातल्या या दोन घटना. छोट्या छोट्या. रोजच्या व्यवहारात आपल्या समोर घडतात अशा. पण बऱ्याच वेळा आपण दुर्लक्ष करतो. खरं तर दिवसाच्या रगाड्यात आपल्या लक्षातही येत नाही. क्वचित तो पायावर पडणारा बूट आपलाच असतो, वा महिलांच्या राखीव जागेवर बिनदिक्कत ठिय्या देणारे आपणच असतो! मात्र एका आईला स्वतःसाठी, आणि त्याहूनही जास्त आपल्या मुलांसाठी, या अशा अन्यायाविरुद्ध पावलापावलाला संघर्ष करावा लागतो.
तुम्ही म्हणाल, कशाला हिरकणीची उपमा देताय या साध्या साध्या प्रसंगातल्या स्त्रियांना? रोज संध्याकाळी कर्वे रोडवरून गर्दी कापत जाणाऱ्या, गल्ल्या गल्ल्यांतून वाट काढत जिवाच्या कराराने दुचाक्या हाकणाऱ्या स्त्रिया दिसत नाहीत तुम्हाला? किंवा डेक्कनच्या बस स्टॉपवर काखोटीला पर्सा लावून तुडुंब भरलेल्या, गर्दीने उतू जाणाऱ्या बशांमध्ये इरेसरीने घुसणाऱ्या या बायका बघितल्या आहेत ना? मग त्यांच्यात आणि जीव पणाला लाऊन बाळाकडे परतणाऱ्या कथेतल्या हिरकणीत काही फरक आहे की नाही? आहे ना. पण हिरकणीच्या अलौकिक धैर्यामागची प्रेरणा आणि रोजच्या व्यवहारातलं मातेचं वर्तन या मागची अंतस्थ ऊर्मी एकच आहे. बघाल तर ती दैनंदिन प्रसंगातही तशीच उमटताना दिसते. नव्हे, मातेच्या हृदयी ती धगधगती ऊर्मी आहे म्हणूनच क्षणोक्षणी त्याचं प्रत्यंतर येतं आणि म्हणूनच असाधारण कसोटीच्या प्रसंगी तिच्या असामान्य धैर्याची प्रचीति येते.
एका आईला रात्रंदिन युद्धाचाच प्रसंग असतो हेच खरं. पदोपदी आडव्या जाणाऱ्या मठ्ठ समाजाला वळसा घालून जाण्याचं भान तिला बाळगावं लागतं. जगाला तिच्या हाती फक्त पाळण्याची दोरी दिसत असली ना तरी तिच्यासाठी आव्हान मात्र जगदोद्धाराचे आहे. आणि म्हणूनच प्रत्येक माता ही त्या अर्थाने हिरकणीच आहे.
छान लिहिलं आहे. आवडलं!
छान लिहिलं आहे. आवडलं!
उत्तम लिहिलय! पुलेशु.
उत्तम लिहिलय! पुलेशु.
स्त्रियांची राखिव स्थानांवरून कुचेष्टा करणारे काही बाजू लक्षात घेत नाहीत.. बर्याच स्त्रिया थकून भागून ही घरी जाऊन रांधतात, काहिंना मासिक पाळी असते, काहिंना इतर दुखणी.