अर्थाअर्थी -(भाग-०६) - नचिकेतच्या वहिन्या..
या आधीचे भाग :
अर्थाअर्थी -(भाग-०१) - टिंडर भेट..
अर्थाअर्थी -(भाग-०२) - चाय पे चर्चा..
अर्थाअर्थी -(भाग-०३) - नचिकेतच्या मनातलं..
अर्थाअर्थी -(भाग-०४) - समज - गैरसमज..
अर्थाअर्थी -(भाग-०५) - आर्थिक स्वातंत्र्य..
आधी ठरल्याप्रमाणे यावेळेस नचिकेच्या ऑफिसला भेटायचं ठरलं होतं. त्याचं ऑफिस तळमजल्यावरच होतं.
पार्किंगलॉट मधून रेवा नचिकेच्या ऑफिसजवळ चालत पोहोचली तेव्हा तो दाराशी तिची वाटच पाहत होता.
ये.. हसऱ्या चेहऱ्याने तिचं स्वागत करत तो म्हणाला आणि आत घेऊन गेला. आत गेल्यावर एक छोटीशी लॉबी रिसेप्शन एरियात घेऊन जात होती. रिसेप्शनमधल्या उजव्या हाताला असलेला काॅन्फरन्स रुमचा काचेचा दरवाजा उघडून नचिकेत तिला आत घेऊन गेला. आतमध्ये तिचं स्वागत केलं ते तीशी बत्तीशी मधल्या तीन स्त्रियांनी.
त्यातल्या साडीतल्या स्त्रीकडे वळून नचिकेत म्हणाला, ही मंजुळा वहिनी.. सलवार खमीस मधल्या स्त्रीकडे हात दाखवत म्हणाला.. ही प्रिया वहिनी आणि जीन्स टाॅपमधल्या स्त्रीकडे पहात म्हणाला, ही आसावरी वहिनी.
आणि रेवाकडे वळत त्या तिघींना म्हणाला, ही रेवा..
तीघीही एका सुरात बोलल्या… हो, ते कळलं.
हाय रेवा, अगं एवढे दिवस तुझं नांवच ऐकत होतो.. आता भेटही झाली.
मंजुळा रेवाला म्हणाली, बस ना तू.
आज शनिवार. आज ऑफिसमधे क्लायंट्स मिटींग्ज किंवा काॅल्स नसतात. फक्त डिझाइन आणि ॲडमिनिस्ट्रेशनची कामं. त्यामुळे इथे आपल्याला कोणीही डिस्टर्ब करायला येणार नाही. नचिकेतच्या आवडत्या विषयात तू खूप रस घेतेयस असं तो म्हणाला, तर वाटलं तुला एकदा भेटावं, तुझ्याशी त्याच विषयावर बोलावं.
तुलाही त्याचं ऑफिस बघायचं होतं.. म्हटलं, ये घेऊन.
नचिकेत रेवाच्या जवळ जाऊन म्हणाला, आज बोलण्याचं काम ह्या तिघी करणार आहेत.. मी फक्त खानपानाची सोय करण्यापुरता आहे.
सगळेजण बसल्यावर रेवा म्हणाली, आज काय बोलणार आहात माझ्याशी ?
आसावरी म्हणाली, अगं आतापर्यंत तुमचं प्राथमिक बोलणं झालंय असं नचि म्हणाला. आता आज आम्ही तुला सांगणार ते म्हणजे सुरुवातीचे अगदी मूलभूत फॉर्म्युले किंवा नियम, जे माहिती असले तर त्याच्या सहाय्याने पुढच्या गोष्टी जास्त सोप्या, सहज होऊन जातात.
पण हे खूप किचकट आणि कॉम्प्लिकेटेड नाही ना ? कारण मी आहे आर्ट्स साईडची.
अगं नाही, नाही. हे अगदी सोप्पं आहे आणि यातलं गणितही एकदमच प्राथमिक आहे. अगदी दहावीच्या पातळीपर्यंत किंवा त्याहीपेक्षा कमीच.
रेवाने सुटकेचा एक निश्वास सोडला पण तरीही तिच्या चेहऱ्यावरून थोडीशी चिंता झळकत होतीच.
अगं, तू टेन्शन नको घेऊ मंजुळा मायेने म्हणाली. हे बघ ना आता पहिलाच फॉर्म्युला बघ. याला म्हणतात "७२ चा नियम."
ह्या नियमानुसार कुठल्याही गुंतवणुकीचे यिल्ड म्हणजे इंटरेस्ट किंवा डिव्हिडंडच्या दराने ७२ ला भागल्यानंतर जी संख्या येते तेवढ्या वर्षांमध्ये आपली मूळ रक्कम दुप्पट होते.
म्हणजे एखादी गुंतवणूक योजना जर दरवर्षी ९% व्याजदर देत असेल तर ७२ भागिले ९ म्हणजे ८ हे उत्तर येतं.
याचाच अर्थ या योजनेमध्ये गुंतवलेले आपले पैसे आठ वर्षांमध्ये दुप्पट होणार.
थोडक्यात जेवढा गुंतवणुकीवरच्या परताव्याचा दर जास्त, तितकी कमी वेळात आपली गुंतवणूक दुप्पट होणार.
आता हा गुंतवणूक दुप्पट होण्याचा कालावधी आपल्याला 'मॅजिक ऑफ कंपाऊंडिंग' ही संकल्पना समजून घेताना आणि पर्यायाने निवृत्ती नियोजनासाठी उपयोगी पडेल.
आणि दुसरी सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट ही, की गुंतवणूक लवकर दुप्पट व्हावी म्हणून जास्तीत जास्त परताव्याचा दर देणारी योजना सिलेक्ट करताना अशा गुंतवणुकी मधलं 'रिस्क-रिवॉर्ड रिलेशन' हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते समजून घ्यायला पाहिजे.
आता याच फॉर्म्युला वरून तिप्पटीसाठी ११४ चा नियम आणि चौपटीसाठी १४४ चा नियम आहे.
रेवा पटकन म्हणाले पण हे म्हणजे ७२ च्या दुप्पट १४४ म्हणून दुप्पट वाढीऐवजी चौपट वाढ, असंच झालं ना ?
यावर मंजुळा म्हणाली.. बघ, आहे की नाही साधं, सोपं गणित आणि तुला किती पटकन कळलं.
म्हणजे आपल्याला अवघड गणित येण्याची खरं तर गरजच नाहीये.
आता मात्र रेवाच्या चेहऱ्यावरची चिंता जाऊन तिकडे हलकं हसू दिसायला लागलं होतं.
आसावरी म्हणाली, हिने सांगितला, रक्कम दुप्पट व्हायचा फॉर्म्युला. आता आपण बघूया आपली गुंतवणूक, आपलं उत्पन्न निम्मं व्हायचा फॉर्मुला.
अरेच्चा, रेवा आश्चर्याने म्हणाली. पण आपली गुंतवणूक किंवा गंगाजळी निम्मी का करायची ?
यावर आसावरी हसून म्हणाली. अगं, काळाचा महिमा.
जसं काळ, पैसे गुंतवले तर दुप्पट करतो तसंच महागाईमुळे आपल्या गंगाजळीची क्रयशक्ती म्हणजे परचेसिंग पॉवर ही काळानुसार कमी कमी करतो.
आणि हा विचार जर केला नाही तर आज आपल्याकडे असलेली रक्कम आपल्याला आज खूप पुरेशी वाटत असली तरीही कालांतराने ती अपुरी पडत जाते. म्हणूनच हा फॉर्म्युला जाणणं खूप महत्त्वाचं आहे.
तर हा फॉर्म्युला असा :
७० या संख्येला जर महागाई वाढीच्या म्हणजे इन्फ्लेशनच्या ऍव्हरेज वार्षिक दराने जर भागलं तर येणाऱ्या उत्तराएवढ्या वर्षात आपल्याकडे असलेल्या रकमेची किंमत अर्धी होऊन जाते.
म्हणजे समजा महागाई वाढीचा दर जर वर्षाला ७ टक्के असेल तर ७० भागिले ७ म्हणजे १० वर्षात आपली रक्कम/गंगाजळी निम्मी होऊन जाणार.
थोडक्यात ज्या पैशात आज आपण जेवढ्या वस्तू घेऊ शकतो तेवढ्या पैशांमधे त्यातल्या निम्म्याच वस्तू दहा वर्षांनी येतील किंवा आज आपल्याला लागणाऱ्या वस्तूंसाठी आपण आज जेवढे पैसे मोजतो त्याच्या दुप्पट पैसे आपल्याला तेव्हा द्यावे लागतील.
अगदी सोप्या शब्दात, महागाई जर दर वर्षी ७ टक्क्यांनी वाढली तर आपला आजचा घरखर्च दहा वर्षांमध्ये दुप्पट होऊन जाईल.
रेवा म्हणाली, म्हणजे काही वर्षांपूर्वी बँकांमध्ये व्हीआरएस योजना आली होती आणि त्या वेळेला लोकांना पंधरा लाख, वीस लाख अशी एकरकमी रक्कम मिळाली होती आणि त्या गंगाजळीवर ते सर्वजण तेव्हा खुश होते.
पण नंतर काही वर्षातच त्यांची आर्थिक परिस्थिती पूर्वी इतकी समाधानकारक राहिली नाही, ते यामुळेच का ?
प्रीती भाभी म्हणाली, बिलकुल बराबर.. होशियार है ये छोरी.
प्रीती पुढे म्हणाली, तेव्हा गुंतवलेल्या रकमेमध्ये काळानुसार होणारी वाढ आणि असलेल्या रकमेमध्ये महागाईमुळे काळानुसार होणारी घट यांचा परस्पर संबंध लक्षात ठेवून आपलं राहणीमान योग्य ते राखून आणि योग्य ती गुंतवणूक करुन त्याचा साधलेला सुयोग्य समतोल म्हणजे आपलं 'सुखी भावी आयुष्य' आणि 'सुखी वानप्रस्थ'.
पण इथे एका ठिकाणी पैसे वाढतात आणि त्याच वेळेला त्याची क्रयशक्ती कमी होत जाते. मग हा सुवर्णमध्य साधायचा कसा आणि ही हॅपी रिटायरमेंट किंवा सुखी वानप्रस्थ मिळवायचं कसं ? रेवा थोडसं गोंधळूनच म्हणाली.
अग तू कशाला त्याची काळजी करतेस. सुखा-समाधानाने आपलं निवृत्त आयुष्य जगणारे आणि लवकर रिटायर होऊन मजा करणारे लोक नाहीत की काय या जगात ?
त्याचेही काही नियम आहेत, ठोकताळे आहेत. ते कळले, समजून घेतले आणि त्याप्रमाणे वागलं की झालं, प्रीती म्हणाली.
आता वरच्या दोन्ही गोष्टी ही गणितातली समीकरणं आहेत. शाश्वत किंवा न बदलणारी.
पण पुढचा नियम मी सांगते आहे तो आहे साधारणपणे आदर्शवादी नियम.. हे समीकरण नाही त्यामुळे यात लवचिकता आहे.
एखाद्या माणसाचा पिंड, त्याची आधीची संपत्ती, आर्थिक परिस्थिती, त्याच्या आवडीनिवडी यानुसार थोडा फरक झाला तरी चालतो. पण एक गाईडलाईन म्हणून यांचा वापर केला तर खूप चांगलं.
हा नियम आहे ५० : ३० : २० चा.
म्हणजे जे आपलं हातात येणारं उत्पन्न,वेतन असेल त्यापैकी ५० टक्के भाग आपल्या गरजांसाठी म्हणजे आपलं वाणसामान, घरभाडं, घराचा हप्ता अशा नैमित्तिक खर्चासाठी, ३० टक्के भाग चैन आणि मौजमजा म्हणजे आपलं हिंडण-फिरणं, पार्ट्या, सहली, हॉटेलिंगसाठी आणि राहिलेला २० टक्के भाग सुयोग्य गुंतवणुकीसाठी राखून ठेवणे.
कमी गरजांमुळे वरच्या ५०% मधून आणि कमी हौसेमौजेमुळे ३०% मधून आपले काही पैसे वाचले किंवा आपण वाचवले आणि त्याची गुंतवणूक झाली तर आपलं उद्दिष्ट लवकर पूर्ण होऊ शकतं किंवा आपलं आर्थिक स्वातंत्र्य जास्त लवकर मिळू शकतं. मात्र हे करताना आपण काटकसरी रहाणं हे गरजेचं आणि काटकसरीपणा आणि कंजूसपणा यातला फरक जाणणं हेही खूप महत्त्वाचं.
मंजुळा पुढे म्हणाली, आकस्मिक कारणाकरता होणाऱ्या खर्चासाठी आपल्या मासिक उत्पन्नाच्या तीन ते सहा पट रक्कम इमर्जन्सी फंड म्हणून लिक्विड म्हणजे रोकड सुलभ स्वरूपात आपल्याजवळ असली पाहिजे, हा ही एक नियम. कोविडचा अनुभव घेतल्यानंतर आता काही तज्ञ ही रक्कम मासिक पगाराच्या बारापट किंवा वार्षिक उत्पन्नाएवढी असावी असंही म्हणायला लागले आहेत.
एवढ्यात नचिकेतच्या ऑफिस प्यून ट्रे मधून खाऊगल्लीतले पदार्थ आणि कॉफी घेऊन आला.
कॉफी पिता पिता रेवाने विचारलं, तुम्हाला कशी काय ह्या विषयाची माहिती ? तुम्ही तिघींनी फायनान्समधे काही विशेष शिक्षण घेतलंय का ?
छे !! छे !! मंजुळा म्हणाली. मी आणि प्रीती दोघीही आर्टस् साईडच्या. ही आसावरी कॉमर्सची आहे पण तरीही तिला या विषयातील विशेष माहिती नव्हती. ही सगळी कृपा नचिकेतची.
सुरुवातीला त्याने त्याचे पार्टनर्स म्हणजे आमचे नवरे, त्यांना या सगळ्या गोष्टी सांगायला सुरुवात केली, की अरे आपण जे पैसे कमावतो ते तुम्ही असेच पाडून ठेवता, तर त्याचं काहीतरी भलं करा. पण ते पडले सगळे कलंदर लोकं.
कलेच्या क्षेत्रात मुशाफिरी करतील आणि गुंतवणूक विषयामधून पळ काढतील.
शेवटी नचिकेतने आम्हाला पकडलं आणि हे सगळं आमच्या डोक्यात कोंबायला सुरुवात केली. पतीपत्नी पैकी सुरुवातीला एका व्यक्तीला तरी याची चांगली माहिती हवी, असं म्हणत.
तसा वागायला एरवी साधासरळ वाटला तरी पक्का डँबीस आहे तो. ज्या गोष्टी व्हायला हव्यात, गरजेच्या आहेत त्या कठोरपणे करवून घेतो. मग ते क्लायंट्स साठी प्रेझेंटेशन असो किंवा ही अशी गुंतवणूक.
हो पण आता या तिघांच्या पैशांची सगळी हाताळणी, गुंतवणूक याच तिघी करतात आणि अगदी समर्थपणे. नचिकेत त्यांच्याकडे आधी कृतककोपाने आणि नंतर अभिमानाने बघत म्हणाला.
बरं, चल रेवा, तुला ऑफिस बघायचं होतं ना, ये दाखवतो.
प्रीती म्हणाली ये जाऊन. जरा ब्रेकही मिळेल तुला आणि आम्हालाही.
आल्यावरती आपण Risk Appetite, Risk Return Reward, Asset Allocation यांची तोंडओळख करून घेऊ म्हणजे मग तू जायला मोकळी.
चालेल ना की आत्ताच ओव्हरडोस झालाय ??
नाही, नाही रेवा म्हणाली. आवडतंय मला हे सगळं.
आलेच मी म्हणत ती नचिकेत बरोबर काॅन्फरन्स रुममधून बाहेर पडली.
छान ! खुप दिवसांनी आला भाग ..
छान ! खुप दिवसांनी आला भाग ..
छान !
छान !
वाचतोय. छान माहिती देत आहात.
वाचतोय. छान माहिती देत आहात.
पु भा प्र.
छान लिहित आहात नीरु!
छान लिहित आहात नीरु!
आताच सर्व भाग वाचून काढले.पहिल्या भागातले चित्र फार सुंदर आहे.