प ठाण ठाण ठाण ठाण ठाण ठाण ठाण ठाण

Submitted by रघू आचार्य on 29 January, 2023 - 10:02

शोले हा ज्याप्रमाणे सचिनपट म्हणून ओळखला जातो, धूम सिरीज उदय चोप्रासाठी ओळखली जाते त्याच प्रमाणे पठाण सुद्धा रजत कौल साठी ओळखला जात आहे. सचिन यांनी शोलेपाठोपाठ त्रिशूल हा ही सुपरडुपर हिट मूवी दिल्याने त्यांना आज महागुरू म्हटले जाते. रजत कौल यांच्याकडून भविष्यात अपेक्षा आहेत. अर्थात पठाण मधे आशुतोष राणा हे ही आकर्षण आहेच. शिवाय भाईजानचा कॅमिओ आहे. त्यामुळे एकट्या रजत कौलच्या जिवावर सिनेमा सुपरहीट झाला यावर शंका घेतली जाऊ शकते.

गेले वर्षभर न बघताच सिनेमा बॉयकॉट करा म्हणून मोहिमा चालवण्याचा ट्रेण्ड सध्या आहे. त्यांच्या दृष्टीने त्यांच्या लिस्टीत बॅड असलेल्यांचे सिनेमे पाहणे हा देशद्रोह आहे.
समजा, कुणी तुम्हाला सांगितले कि पठाण हा एक टुकार सिनेमा आहे तर त्यावर मुळीच विश्वास ठेवू नका.
हल्ली कुणी कौतुक केले की त्या सिनेमावर आगपाखड करायचा ट्रेण्ड आहे. तसंच एखाद्याने सांगितले की सिनेमा टुकार आहे तर तसे सांगणार्याला हत्तीच्या पायी देण्याचाही ट्रेण्ड आहे. तरीही टुकार आहे असे सांगणार्‍यांपासून सावधच.

पठाण हा प्यासाच्या जातकुळीतला एक हळवं करून सोडणारा अनुभव आहे. त्याच वेळी गॉन विथ द विंड प्रमाणे जागतिक महापट देखील आहे. यातलं अ‍ॅक्शननाट्य गन्स ऑफ नेव्हेरॉन प्रमाणे रोमांचित करणारं आहे, मेकॅनॉज गोल्ड प्रमाणे भव्य आहे, कोणत्याही बॉण्डपटापेक्षा यातला थरार उच्चकोटीचा आहे. यातले पाठलाग जॅकी चॅनच्या पोलीस स्टोरी सिरीजपेक्षाही उत्तम दर्जाचे आहेत तर सिनेमॅटोग्राफी बेनहर ला लाजवणारी आहे. सीजी ज्युरासिक पार्क, मॅट्रीक्सच्या थोबाडीत मारणारे आहेत. तर लॉजिकमधे हा टेनेटला रानोमाळ मागे टाकणारा सिनेमा आहे.
असे जर कुणी म्हटले तर एक तर तुम्ही विश्वास ठेवू शकता किंवा मग आपली सदसदविवेकबुद्धी वापरू शकता.

बॉयकॉट गॅंगला धडा शिकवण्यासाठी सिनेमा सुपरहीट करणे याला कदाचित कुणी सदसदविवेकबुद्धी म्हणू शकते, तर कुणी गदगदबुद्धीही म्हणू शकते. गदगदबुद्धीवाल्यांचंही बॉयकॉट वाल्यांप्रमाणेच आहे. जर सिनेमा पाहून आलेल्याने नाही आवडला असे सांगितले तर मग तो भक्त, शाहरूखद्रोही, बॉलीवूड हेटर ठरू शकतो.

त्यातच एखाद्या नावडत्याला एखादा सिनेमा आवडला म्हणून इतर लॉजिकल सिनेमांवर पण आगपाखड करणारे जेव्हां पैसा वसूल चित्रपट आहे म्हणून उचलून धरतात तेव्हां इतकेच म्हणावेसे वाटते कि " ओ बबुआ, ओ भईय्या, तुम जिस चित्रपट पर आग पाखड रहे थे उसके बारे मे तनिक हमारा भी यईच मत था".

या सगळ्या शक्याशक्यतांच्या कोलाहलातून मार्ग काढत सिनेमा नेमका कसा आहे हे समजणे अतिशय क्लिष्ट झालेले आहे. त्यामुळं पुलं म्हणतात तसं हिंदू खतरेमे वाल्याच्या सभेला पण जायचं आणि मुसलमान खतरेमे वाल्यांच्या सभेला पण जायचं. दोन्हीही कडे नाही फिरकले तर भगवे आपल्याला हिरवा समजून मारून टाकतील आणि हिरवे आपल्याला भगवा समजून मारून टाकतील. नमनाला घडाभर तेल सांडून झाल्यावर सिनेमाबद्दल पण बोलूच.

पठाण हा सिनेमा वॉर नामक ऋत्विक रोशन टायगर श्रॉफ फिल्म बनवणार्या कुणा एका सिद्धार्थ आनंद नामक दिग्दर्शकाने बनवलेला आहे. चोप्राज ना आपण स्पाय मूव्ही किती उत्तम बनवू शकतो याचे पूर्ण आकलन असल्याने ती जबाबदारी आउटसोर्स केलेली दिसते. हीच गोष्ट भन्साळीने सुद्धा केली तर किती छान होईल.

अर्थात चोप्राजने दीवार, त्रिशूल सारखे सलीम जावेद लिखित सिनेमे वगळता सिनेमा कोणताही असो त्यांच्या विस्कळीत मांडणीला बाधा येऊ दिलेली नाही. त्याच प्रमाणे या नव्या दमाच्या दिग्दर्शकानेही आपण वॉरच बनवत आहोत अशा पद्धतीने पठाणची हाताळणी करण्यात कोणतीच कसूर ठेवलेली नाही.

सिनेमाला एक कथा सुद्धा आहे. वॉर मधे थोडे फरक करत "इधर हम हिरॉईन को लेते है, कॅमेरा ऐसे आयेगा, हिरो यहां से आयेगा झूम .... कट ! पाणी मे व्हिलन ...इधर मुझिक टॅडॅण टॅडँ " अशा पद्धतीने पटकथाही लिहीलेली आहे.

५ नोव्हें २०१९ हा भारताच्या इतिहासातला सुवर्णाक्षरात लिहून ठेवावा असा दिवस आहे. याच दिवशी कोविडचा पेशंट भारतात आल्याची पहिली बातमी आली होती आणि याच दिवशी सिनेमाची कथा सुरू होते. एक पाकिस्तानी जनरल डॉक्टरकडे बसलेला आहे. त्याला कॅन्सर असल्याचे डॉक्टरांनी एक्सरेज पाहून सांगितलेले आहे. नाहीतर उर्वरीत जगात बघा, कॅन्सरसाठी वेगळ्या टेस्ट घेतात. एक्सरे काढून कॅन्सर सांगता येत असताना द्राविडी प्राणायाम का करावा ?

जनरल विचारतो कि किती दिवस ? म्हणजे आयुष्याचे किती दिवस शिल्लक ?
यावर डॉक्टर सांगतो तीन वर्षे. रिटारमेंटला तीन वर्षे असल्याप्रमाणे जनरल नोटेड असे भाव आणतो. इतक्यात टीव्हीवर बातमी येते कि इंडीयाने काश्मीरमधून ३७० हटवले. इथेही डॉक्टरांची कल्पकता बघा. जगात कुठेच डॉक्टर कन्सल्टन्सी मधे पेशंटशी बोलताना न्यूज चालू ठेवत नाहीत. पण इन मीन चार संवाद संपल्यावर आपण काय गप्पा मारणार ? त्या पेक्षा हवापाण्याच्या गप्पा करता येतील. पेशंटच्या आरोग्याविषयी तरी काय तेच तेच बोलायचं ? तो ही कंटाळत असेल, आपण तर कंटाळतोच. जाताना तेव्हढं काऊंटरवर गुगल पे केल्याशी मतलब.

डॉक्टर मग उसळून म्हणतो कि ये इंडीयावाले अब हमारा आजाद काश्मीर भी ले लेंगे. पाकिस्तान आर्मीच्या जनरलचा माहिती सोर्स हा टीव्हीचा न्यूज चॅनेल असल्याने तो वरीष्ठांना फोन लावून ही माहिती देतो. कदाचित एव्हढ्यासाठीच हेल्थचेक अपचा बहाणा करून तो डॉक्टरकडे आला असणार. हो नक्कीच, पाकिस्तान आर्मीचे अधिकारी हुषार असतात. त्या टीव्हीवर बातमी मिळते म्हटल्यावर का नाहीत येणार ? यशराज फिल्म्स यामुळेच भारतातले नंबर वन प्रॉडक्शन हाऊस आहे.

जनरल डॉक्टरला विचारतो "कितने साल बताये थे आपने "
डॉक्टर म्हणतात "तीन"
"बहोत है. हम इंडीया को अमूक तमूक कर देंगे"
वरीष्ठ तिकडून काहीतरी बोलतात.
हा वरीष्ठांना ठणकावून सांगतो "अब डिप्लोमसी का और यूएन के भरोसे रहने का समय नही है. अब कोई खुदा का बंदा हमारे काम नही आयेगा. वख्त आ ग या है कि हम शैतान से हाथ मिलाये"
म्हणजे पाक लष्करात सगळे खुदा के बंदे असल्याने ते दहशतवादी कारवाया करू शकत नाही एव्हढ्यासाठी त्याच्यावर शैतानाची मदत घ्यायची वेळ आलेली आहे. असं कनवाळू लष्कर जगात दुसरे नसणार. सिनेमाचा निर्माता रामु किंवा रामसे असते तर या सुरूवातीवरच पुढे थडग्यातल्या पेटीत बंद असलेल्या शैतानाला ज. कादर जागवणार आणि मग सिनेमाभर शैतानाचा कहर , शेवटी नायक त्याला ओम दाखवणार आणि नायिका ७८६ !

पण सिनेमा चोप्रांचा असल्याने असे काहीही न घडता तो व्यावसायिक कंत्राटी दहशतवादी जिम म्हणजे जॉन अब्राहम कि इब्राहिमला फोन लावतो.
" बोलो जनरल कादर खैरीयत तो है ?"
" अब खैर नही, कहर ढाने का समय आया है "
" क्या करना है ?"
" इंडीया को घुटने पे लाना है"
"सोच लो कादर. हमे काम दिया इसका मतलब जानते हो ना ? एक बार बंदूक से निकली हुई गोली फिर वापस नही आती"

तीर और अल्फाज फिर वापस नही आते अशा म्हणी सुद्धा काळानुसार अपडेट व्हायला पाहिजे हे इथे जाणवले.

हातच्या ब्रेसलेटला सेल्फी कॅमेरा कशाला ?
काखेतल्या पर्समधे मोबाईल सायलेंट आणि गावभर रिंग देत भटकून आले मी लेट
हे असे अपडेट केले तर हिंदीतले ग्रॅज्जर ( आठवा महेश कोठारे मुठी वळवून आत घेऊन सांगताहेत) खेचून आणता येईल.

लगेच स्क्रीन वर खालच्या डाव्या कोपयात पाटी येते.
तीन साल बाद
पुढची पाटी
समव्हेअर इन आफ्रिका .

या पाट्या येताना जर महत्वाचे व्हॉट्साप स्टेटस किंवा चिकवाच्या धाग्यावर माझ्या बबड्याने दोन शैतानांची वाट लावली कि नाही म्हणून स्क्रीनकडे लक्ष दिलं तर पुढचा पिक्चर बापजन्मात कळायचा नाही. मग करा बुकिंग पुढच्या शोचं. ही सुद्धा एक सोची समझी मार्केटिंग ट्रीक असू शकते.
कुठल्यातरी तालुकासदृश्य आफ्रिकन देशात कृष्णवर्णिय लोक भर बाजारासारख्या जागेत एखादं गॆरेज असावं तसं रणगाडे, लष्करी जीपा, मिसाईल्स ठेवलेल्या जागेत आहेत. बंदूका घेऊन सगळे फिरताहेत. ग्यारेज सारख्या मोकळ्या जागेला कोरीव कमान आणि त्याच्यावर उर्दू अक्षरे ( असा कोणता देश आहे बरं आफ्रिकेत ?) आणि कॅमेरा एका राजबिंड्या इसमावर येऊन स्थिरावतो.

थेटर मधे नुसत्या टाळ्या आणि शिट्ट्या ! एकाने तर उत्साहात रॉकेट उडवलं ते पडद्यावर जाऊन फुटलं. नशीब पडदा जळाला नाही. आपटबार फुटत असतानाच एकाने कर्णा घेऊन अनाऊन्समेण्ट केली.

भाई रजत कौल ! जियो मेरे लाल !!

रजत कौलची धमाकेदार एण्ट्री पाहून इतर पब्लीक बुजतंच. इथे रजत कौल राफे नावाचा पॅरलल निगेटिव्ह लीड आहे. नुसती धमाल. इतक्यात एक कृष्णवर्णिय येऊन सांगतो कि एकजण राफेसाहेबांना शोधतोय....

राफे त्याच्या मागे कबाडीच्या जागेत ऑफीस असावं तशा ठिकाणी वरच्या मजल्यावरच्या फुटक्या केबीनमधे येतो. तिथे एका झिपर्याला ठेवलेले असते आणि एक साडेसहा फूट गार्नरसदृश्य दानव जीव खाऊन दणके देत असतो.. त्याच्या ओठातून रक्त येत असतं.
राफे विचारतो " कौन है बे तू ?"
तो झिपरा खर्जातला आवाज लावत बोलतो. याचा आवाज पूर्वी बकरीसारखा होता. पण साऊंडकार्डच्या सहाय्याने सैफ अली, सलमान अशांचे आवाज सेक्सी केले जातात. तसाच याने बेस वाढवून खर्जात आवाज लावलेला दिसतो.
" अब तू झुकेगा, फिर देखेगा, फिर पाच मिनिट सोचेगा, तुझे यकीन नही होगा, फिर तू कहेगा " इथे पिनड्रॉप सायलेन्स.
आणि राफे म्हणतो " तू जिंदा है ? पठाण ??" रजतच्या या डायलॉगला पुन्हा पब्लीक थेटर डोक्यावर घेतं.
आणि तो झिपरा आपणास दर्शन देतो.
शाहरूख खान नावाचा एक कॅरेक्टर आर्टिस्ट रजत शर्माच्या चित्रपटातून सेफ पुनरागमन करत असल्याची कुणकुण होतीच. शिवाय यात आशुतोष राणा पण आहेच.
पठाण राफेला विचारतो "रूबिना कहा है "
राफे उत्तरतो "हमारे खानसाब का दिल घायल है. तू जिंदा कैसे बचा ?"
"सवाल पहले मैने किया था"
" रूबिना को हमने बहोत दूर पहुंचा दिया है, तुम्हारी पहुंच से दूर. और अब तू भी वही जायेगा "
राफेने पठाणच्या कनपट्टीला गन लावलेली. पठाणचे हात खुर्चीला मागे बांधलेले. आता गोळी सुटणार , पठाण खल्लास आणि पिक्चर संपणार.
असं कधी होतं का पण ?
राफे विचारतो " कोई आखरी तमन्ना , पैगाम किसी को ?"
"एक पैगाम पहुंचाना है"
राफे बघतो. पठाण तळहाताची मूठ सोडतो आणि त्यातून खुर्चीचे नटबोल्ट्स खाली पडतात. दहशतवाद्यांना डोकं कमीच असतं. पाहुण्यांना असल्या खुर्च्या का देतात ? माहिती आहे ना हा स्पाय आहे ?
नटबोल्ट्स निघाल्याने खुर्ची अनेक भागात मोडून पठाण जमिनीला समांतर होतो आणि गोळी त्याला समांतर अशा प्रतलातून आर पार होते. खुर्चीच मोडल्याने हात पुढे येतात आणि मग काय ?
एका स्पायला आणखी काय पाहीजे ?

तो खुर्चीचे दोन लोखंडी बार हातात घेऊन जंप करत उभा राहत तोल सावरतो. एक दशहतवादी त्याच्या केसांवर एक्झॉस्ट फॅनचा फवारा मारतो, त्यामुळे केस व्यवस्थित मागे उडतात. पूर्वी अशी एण्ट्री हिरविनीला असायची. आता तो फरक संपल्याने हिरोचेही केस उडतात. एव्हढा एक क्षण दहशतवाद्यांनी संयम पाळायचा असतो. फूटेज खात खान उभा राहतो, केस वार्यावर उडत राहतात. पिनड्रॉप सायलेन्स.
आणि पुढच्याच क्षणी खान हातातले दंडुके फेकून स्तंभित पात्रांना बाद करतो. येऊन जाऊन गावठी दहशतवादीच ते. खानापुढे काय टिकणार ? ते हवेत वरच्या वर लांबून हत्यारे चालवत असतात. खान फक्त कंबर २३ अंशातून मागे वाकवतो. ते वार चुकतात. २० अंशापर्यंत त्यांना ट्रेनिंग दिलेले असते हे खानाला माहिती असते. वार चुकवायला २१ अंशातून वाकले तरी जमले असते, पण इथे सलमान खान सारखा सूक्ष्म अभिनयसम्राट नसल्याने थोडा इंजिनिअरिंग टॉलरन्स घेतला जातो. टायगर बरोबर दोन तीन मिशन केले तर सुधारणा होतीलच.

खान टेबलावरून लोळण घेत पलिकडे जाऊन दोघांना बाद करतो आणि पलिकडच्या रूममधे जाऊन दार लावून घेतो. एव्हढं करायचं होतं तर निरोप का पाठवला राफेला ? स्वत:चे हाल का केले ? याला करायचं काय होतं नेमकं ?

तर इथे हाणामारी चालू असताना पठाण राफेला घेऊन हातबॉंब फुटायच्या आत वरच्या केबीनची काच फोडून खाली शॉप फ्लोअर कडे झेप घेतो. राफे खाली आणि खान जिन्याच्या रेलिंगवरून स्कीईंग करत खाली. दोघे एकाच काचेतून खाली आले. येताना मधे जिना नव्हता. पण राफे गुरूत्वाकर्षणाच्या ज्या फोर्सने खाली येतो त्याच्या थोडा उशिरा खान फुटक्या काचेला शे पाचशेचा ऑफसेट मारून खाली येतो. इथेच आपल्याला गुरूत्वाकर्षणाचा प्रयोग लक्षात येतो. एकाच आकाराची दोन पोती वरून खाली टाकली तर लोखंडाचे पोते लवकर खाली येते, कापसाचे थोड्या वेळाने येते.

ज्याला आपण कडबा कुट्टी समजत होतो ते जुन्या बाजारातली दोन मजली शेड असावी असे पत्र्याचे वर्कशॉप असते. त्यात हेलिकॉप्टर असते. आत हवा यायला जागा नसताना हेलिकॉप्टरचा पंखा आजूबाजूला काहीही पाडापाडी न करता ते उडते सुद्धा. इतकेच नाही राफेला खाली बांधून उडत असताना शेडचे दरवाजे बंद होत असतात. हेलिकॉप्टरला गोळ्या लागत असतात. पण जनू बांडे किंवा मिशन इम्पॉसिबल मधे पण जसे शत्रूपक्ष नेमबाजीत कच्चा पेरू असतो तसेच इथे पण. पठाण आख्खी स्टेनगन (जिला स्थिर करायला दुसरा हात विशिष्ट ठिकाणी लावावा लागतो) एका हाताने चालवत दुसर्या हाताने एका बावळट अतिरेक्याच्या पायाला धरून ओढत असतो. त्याच्या गोळ्या सटासट सुटत असतात आणि कच्च्या पेरूंना अचूक लागून ते खाली पडत असतात.

आता एक कृष्णवर्णिय खांद्यावरून डागायचे रॉकेट लॉंचर घेऊन हेलिकॉप्टर वर मिसाईल डागतो खरा पण आश्चर्य !’
चॉपर जे करू शकत नाही असा त्याच्या निर्मिती करणार्या संस्थांचा अंधविश्वास असतो, त्याला पठाण सुरूंग लावतो. चॉपर जमिनीला ९० अंशाचा उभा कोन करून वर उडते. खालून मिसाईल जाते आणि ते फुटल्याने वरच्या काचा फुटून त्यातून हेलिकॉप्टर अज्जात पार.
या शेडला वर काचा लावणारे कल्पकच म्हणायला पाहीजेत. पूर्वी नाही का व्हिलनच्या अड्ड्यात एक काचेची रूम असाय़ची ज्यात दोन ठोकळे दोन विरूद्ध दिशेने यायचे. मधे हिरोची आई, बहीण, गफ्रे किंवा पुतण्या असायचे. त्या ठोकळ्यांना अणकुचीदार लांब लाब भाले असायचे. किंवा व्हिलन लोक मधोमध एक विहीर ठेवायचे. त्यात बुडूक बुडूक करणारं अ‍ॅसिड असायचं. मधे एक फळी. त्यावर हिरो.

ही सगळी व्यवस्था आयुष्य़ात जेव्हां हिरो हमला करेल तेव्हढ्यासाठीच फक्त. अगदी तसंच हे छताला काचेचा डोम बसवण्यामागचं प्लानिंग असतं.
हेलिकॉप्टर वर जात असताना आकाशात माथ्यावर सूर्य तळपत असतो. म्हणजे भर दुपारी एव्हढा धमाका झाला. त्या सूर्याच्या पार्श्वभूमीवर नावं येतात.

यशराज फिल्म्स प्रेझेंटस.
पठाण

स्पाय मूवीज दोन प्रकारचे असतात.
एका प्रकारच्या मूवीज मधे जीव धोक्यात घालून परदेशात कवर घेऊन तिथल्या जनतेत मिसळून नेहमीचे जीवन जगणारे हेर. ज्यांना मिशन मिळालं कि ते सक्रीय होतात आणि कुणालाही कळू न देता माहिती काढतात. ही माहिती जोखीम पत्करून ते आपल्या मूळ देशाकडे हस्तांतरित करत असतात. ती माहिती मिळाल्यानंतर मग सेना किंवा अन्य फोर्स त्या माहितीचा वापर करून ऑपरेशन आखतात आणि धोका नष्ट करतात किंवा आपली चढाई करतात. राझी सारखे चित्रपट यात येतात. शायनिंग थ्रू हा मायकेल डग्लसचा हेरकथेवर आधारीत सिनेमाही असाच. अशा मूवीजमधे जेव्हढे जास्त डिटेलिंग करावे तेव्हढा प्रेक्षक जास्त शहाणा होत चुका काढत जातो. कारण त्याच्या अपेक्षा वाढत जातात. उदा मिशन मजनू.

दुसरे मूवीज असतात त्यात सैन्याला काही काम नसतं. स्पायवरच सगळा लोड असतो. परदेशात नेटवर्क असेल यावर त्या स्पायचा विश्वास नसतो. त्याच्या वरीष्ठांचाही नसतो. एकही आदमी बचा सकता है ही परवलीची लाईन असते. त्याच्या पुढे टायगर किंवा एजंट विनोद किंवा मग आता पठाण असे नाव जोडले कि देश नि:श्वास टाकत असतो. हे असे स्पाय माहिती पोहोचवण्यावर विश्वास ठेवत नाहीत. माहिती जरी पोहोचवली तरी त्यांचे वरीष्ठ विचारतात "टायगर / पठाण / लायन / फॅंटम अब तुम्हारा अगला कदम क्या होगा ?"

इथे हेडक्वार्टरला कुणाचंच डोकं चालत नसतं. आलेल्या माहितीचं काय करायचं याचं ज्ञान त्यांच्याकडे नसतं. ते आर्मीला पोहोचवून तरी काय उपयोग ? ते ऑफीसर्स मेस मधे दारू पीत पत्ते खेळत असतील असाच विचार हे तथाकथित हेडक्वार्टरवाले करत असतात. त्यामुळे तुझ्याच हाताला जास्त कीडे होते ना ? मग भोग आपल्या कर्माची फळं या थाटात ते "तूच आणलीस ना माहिती, मग कर पुढचे पण सोपस्कार पण ... आम्हाला अडचणीत आणतोस का ? जास्त शहाणा झालास का " हे शब्द गिळत ते त्याला फक्त "अब आगे ?" असे विचारतात किंवा स्पेशालिस्ट स्टायलिश दिग्दर्शक असेल तर फक्त त्या अर्थाच्या भिवया उडवतात. त्यांच्या डोळ्यात तोच प्रश्न असतो. यावर मग टायगर / विनोद / फॅंटम / पठाण फक्त हसतात. शाहरूख प्रत्येक पिक्चरमधे हसण्याच्या सीनआधी गालात बोटं घालून खड्डा तयार करून तो भरायच्या आत खळीचा इफेक्ट आणत किलर स्माईल देत राहतो. तेव्हढे काही सेकंदाचे फूटेज चालू असताना आजूबाजूचे सगळे स्तंभित पात्रा दाखवावे लागतात. मग जीवघेणी हाणामारी का असेना ?

अशा मूवीज मधे हेडक्वार्टरसहीत कुणाचंच डोकं काम करत नसल्याने प्रेक्षकही आपले डोके बंद करून घेतो आणि जे काही पडद्यावर दाखवतील ते "पदरी पडले आणि पवित्र झाले" मोड मधे येऊन स्विकारत जातो. इथे डोकं लावायचं नाही हा मेसेज न बोलता एकदम ठळक अंडरलाईन झालेला असतो. मिशन मजनू वाल्यांनी हे पाळलं असतं तर ?

नावं संपताक्षणी स्क्रीन वर नवी दिल्ली जे ओ सी आर मुख्यालय अशी पाटी झळकते. एक चकाचक स्कायक्रॅपर दिसते. ज्याप्रमाणे सीआयडी मालिकेतलं ऑफीस हे एल ए च्या पोलिसांप्रमाणे असायचं तसंच अशा हिंदी स्पाय मूवीज मधलं ऑफीस हे दगडी भिंतीची तीन मजली इमारत , ज्या समोरच्या बाजूला व्हरांडे , वीटांच्या चुर्‍याचा आणि चुन्याचा रंग मारून रंगवलेल्या भिंती आणि आजूबाजूच्या परीसरात त्याच रंगात रंगवलेल्या रस्त्यांचे कठडे असे न दाखवता आयबीएमच्या थोबाडीत मारावे असे असते.

इथे गुरू रंधवा सारखा दिसणारा एक जण संगणकावर बसलेला आहे. तो त्याची लेडी बॉस डिंपल ( काका लोकांच्या मनातल्या मनात शिट्ट्या, लगेचच सागर, जांबाज चे सीन्स डोळ्यासमोरून तरळून जातात, काकूंची भेदक नजर वाकून अंधारात त्यांच्या चेहयाचा वेध घेते. त्या क्षणी काका निर्विकार बुद्धाची मूर्ती ! याच काकू जॉनच्या बॉडीकडे अनिमिष नेतांनी पाहताना काकांच्या बथ्थड डोक्यात ट्यूबलाईट लागत नाही Wink )

हा गुरू रंधवा छाप युवक सांगतो कि रूबीला लंडन मधे सिक्युरिटी कॅमेर्‍यात कॅच केले आहे. त्याचा स्क्रीनशॉट यांच्या स्क्रीनवर. डिंपल म्हणते पठाणला कळवायला पाहीजे. मग गुरंछा एजंट विचारतो कि पठाणचाचा आपल्याकडे होते ना ? डिंपल म्हणते " त्याच्यामुळेच आपण आहोत. तोच ओपनिंग बॉलर, तोच ओपनिंग बॅट्समन आणि तोच विकेटकीपर " थोडक्यात अकरा जणांच्या टीममधे हा एकटाच मैदानात आणि हे ड्रेसिंग रूममधे बसून मॅन ऑफ द मॅच ची रक्कम विभागून घेऊ म्हणायला भरती.

पुन्हा एकदा फ्लॅशबॅक. रूबीचा आणि पठाणचा काय संबंध दाखवायला. इथे मोबाईलमधला कॅलक्युलेटर काढून ठेवावा. सुरूवात झाली ती २०१९ साली. त्यानंतर राफेच्या अड्ड्यात जाताना ३ वर्षानंतरचा काळ म्हणजे २०२२ साल. आता दोन वर्षापूर्वी पुन्हा म्हणजे २०२० सालची घटना. हे एकदा नीट नोट केलं की पुढे जो घोळ होणार आहे तो होत नाही. लिहीता वाचता येत नसल्यास एखाद्या सुशिक्षित सवंगड्यासोबत पहावा पिक्चर.
डिंपलची कमेण्ट्री चालू असतानाच पठाणने कसे मेडीकली अनफिट लोकांना भरती करून जे ओ सी आर चालू करतो आणि कर्नल लुथ्राला सुरूवातीच्या हिलेरीअस मेस अप नंतरही कसा पटवतो वगैरे सांगून होतं. विशेष म्हणजे जे ओ सी आर मधे जी भरती केली ते पुन्हा कुठेच दिसत नाहीत. फक्त आपला गुरंछा एजंट तेव्हढा नाना फडणविसाप्रमाणे ऑफीसमधे बसलेला असतो.

पठाणच्या इंटेलवर कर्नल लुथरा म्ह णजे आशुतोष राणा त्याला दुबईला पाठवतो. दुबईत महत्वाच्या राजकीय व्यक्तींची व्ह्जिट असते अशातच आंतरराष्ट्रीय दहशतवादी जिम काहीतरी करणार असतो. त्यामुळे मंत्र्यांची सुरक्षितता वाढवण्यासाठी राणा सूचना करत असतो. पण पठाणच्या मनात वेगळेच शिजत असते. त्याला खबर लागते की भारताचे दोन सायंटिस्ट दुबईत आहेत. जिमचं टार्गेट ते आहेत. जे ओ सी आर नावाच्या या संस्थेचं कामच असं आहे. भारताच्या रॉ, मिलिटरी इंटेलिजन्स तसेच सहकारी इंटरपोल व काही करार केलेल्या आंतरराष्ट्रीय संस्था भारताला माहिती देत नाहीत. अचानकच ज ओ सी आर चा एजंट तिथे पोहोचल्यावरच त्याला कुठून तरी खबरा मिळत असतात. हा स्पाय असून मस्तपैकी बंदूका घेऊन फिरतो. गाड्या उडवतो. अजिबात लो प्रोफाईल राहत नाही. दुबई पोलीस हे दौंड पोलिसांच्या लेव्हलच्या बरेच खाली असतात इत्यादी आपण आता गृहीत धरायचे आहे याची आठवणही न व्हावे अशा पद्धतीने आपण या पेसला युज्ड टू होतो. खड्ड्य़ांच्या आणि वळणावळणाच्या रस्त्याला आणि सरळच्या सरळ रस्त्याला जसा मनुष्य वेगवेगळ्या पद्धतीने गुंग होतो तसंच.

बॉण्ड सुद्धा असाच कुठल्याही देशात उतरतो. तो बॉण्ड आहे हे इतर देशांच्या गुप्तहेरांना माहिती असतं पण लोकल गव्हर्न्मेंट, पोलीस यांना खबरबात नसते. त्याला जी माहिती काढायची असते त्याची सुरूवात कशी करायची हे त्याच्यासहीत आपल्यालाही ठाऊक नसते. बॉयकॉट ग्यांगच्या कारवायांमुळे ब्रह्मास्त्र हिट व्हावा त्याप्रमाणे त्याच्यावर स्वत:हूनच अंडरग्राउंड एजंट्स हल्ले करतात आणि त्याला लीड मिळत जातो. भरीत भर म्हणून त्याच्यापर्यंत विषकन्या म्हणून बॉण्डगर्ल पाठवल्या जातात. त्या मिसलीड करतात (एक पीजे आवरला) पण त्यातूनच नंतर लीड मिळतो. समजा जर हे हल्ले झाले नसते किंवा बॉण्डगर्लने त्याला मिसलीड केलं नसतं तर बॉण्ड कसा माहिती मिळवणार होता ? हा एक प्राचीन काळापासून अनुत्तरीत यक्षप्रश्न आहे.

इथे जिम म्हणजेच जॉन अब्राहम रस्त्यात मिसाईल घेऊन उभा आहे पण शास्त्रज्ञांसाठी !
ही माहिती तत्क्षणी पठाणला मिळते. पठाण तिथे पोहोचेपर्यंत त्याने शास्त्रज्ञांना आपल्या गाडीत घातले पण आहे. आता पठाण जिमच्या मागे लागलाय. दोघांची तुफान मारामारी सुरू होते. त्या मारामारीची प्रेरणा इथून घेतलेली आहे.
https://youtu.be/TIe06TAGaZM

हाणामारी करता करता ते बसवर पोहोचतात. तिथे पठाणचे दोन दोन हेलिकॉप्टर्स स्लिंग टाकून काहीतरी वर खेचायच्या बेतात असतात. पण जॉन अब्राहम मर्द मधल्या दारासिंगने एक हेलिकॉप्टर दोरीने ओढलं त्याच्या पुढे जाऊन दोन हातांनी दोन्ही हेलिकॉप्टरला खाली खेचून बसला बांधून टाकतो. पुढे बोगदा आणि जॉन बाय बाय करून जातो. हेलिकॉप्टर्स उडून जातात.

खान राणाकडून जॉनची स्टोरी ऐकतो आणि राणाला कोस कोस कोसतो. त्याला नॉन ओबिडियन्स क्लॉज लागू नसतो. तुमच्यामुळे जॉन अब्राहम असा झाला. त्याचे सत्यमेव जयते आणि सगळेच पिक्चर आपटले आता तो व्हिलन झाला. तुम्ही जबाबदार याला. तर पुढे त्याला रक्तबीज नावाच्या कोडची टचस्क्रीन वर मिळते. पण तपशील मिळत नाही. दुबईत झालेल्या हाणामारीतले सगळे लोक एजंटस होते आणि ते नुकतेच हायर केले होते. त्यांच्या बॅंक खात्यात रूबिना मोहसीन च्या अकाऊंट मधून पैसे आल्याची खबर पक्की होते. ही रूबीना आत्ता स्पेनमधे असते. पठाण म्हणतो मलाही व्हेकेशन्सची गरज आहे.

स्पेनमधे कॅमेरा स्थिरावतो तेच बेशरम रंगच्या सुरावटींवर. तीन चार गाण्यांचे मिश्रण पुन्हा कानात घोळू लागते. या गाण्य़ात रूबीना सुद्धा खानाला लाईन देते. संपूर्ण गाण्यात भगव्या बिकिनीवाला शॉटच दिसत नाही. खान जेव्हां तिचा म्हणजे दीपिकाचा पाठलाग करत जातो तेव्हां ती थोड्याच अंतरावरच्या स्विमिंग पूल मधे भगव्या बिकिनीमधे दिसते.

म्हणजे भगवा रंग भक्तांनी एडीट केला नव्हता. तो सीन होताच. पण गाण्यात नव्हताच. तर मग भक्तांच्या हाती हा सीन कसा लागला ? चोप्रांच्या युनिटमधे कोण गद्दार ? कि खुद्द चोप्रांनीच निगेटिव्ह पब्लिसिटीसाठी हा फोटो पुरवला ? म्हणजे विरोध करणारे आणि ते विरोध करतात म्हणून पेटून सिनेमा हिट करणारे दोघे कोण ?

पण हे काय कॅमेरा सरकतो आणि त्याच पूल मधे जॉन अब्राहम त्याच्या अगडबंद पीळदार देहासहीत दिसतो. दीपिका त्याच्या बाहुपाशात स्थिरावते आणि खानाच्या चेहयावरचे भाव पडतात. साहजिकच आहे ना. त्या अब्राहमचा एक एक दंड पाहून खुद्द रणवीर सिंग जरी तिथे असता तरी म्हणाला असता " अरे तू होय ? काही नाही मी आपला सहजच इकडे फिरत फिरत आलेलो. चालू द्या. आणि तू गं काही घाई नाही. ये सावकाश " असं म्हणाला असता. तिथे खान कुणाचा कोण ?

इथेही प्रचंड हाणामारी होते आणि मग दीपिका खानाला पळून जायला मदत करते. तिथे ती त्याला सांगते की ती तिच्या मनाविरूद्ध जॉनसोबत आहे. ती आय एस आयची असून जॉन आणि रशियन माफियामधे डील झालेलं आहे. रक्तबीज जॉन मिळवणार आहे. ते त्याच्या आधी आपल्याला मिळवायला पाहिजे.

इथून पुढे सिनेमाचा प्लॉट सुरू होतो. हे रक्तबीज म्हणजे काय, ते हे मिळवतात का ? पुढे काय काय ट्विस्ट्स आहेत हे पडद्यावरच पाहणे मनोरंजक ठरेल.

पण या कामगिरीत शाहरूखला ४४० व्होल्ट्सचा झटका बसल्यावर रशियन्स पठाणचा शोध घेतात. भारत सरकार हात वर करते. डिंपल त्याच्यासमोर "मेरी तरफसे दो गोली मार देना " असे सांगते.
रशियन त्याला तिथेच गोळ्या न घालता एका ट्रेनमधून अज्ञातस्थळी नेत असतात.

इतक्यात ट्रेनला भोक पडतं आणि चौकड्याचा रूमाल आत येतो.
थिएटरमधे नुसत्या शिट्ट्या ! पब्लीक खुर्च्यात उभं राहून शिट्ट्या मारत असतं पण माठ रशियन्सला कळत नाही.
त्या भोकातून टायगर खाली उतरतो.
टायगर उर्फ सलमान खान हे काटकसरी अभिनयासाठी प्रसिद्ध असल्याने कधीही जास्तीची रेषा हलवत नाहीत त्याच प्रमाने गोळ्या चुकवतानाही इतरांप्रमाणे हालचाली करत नाहीत. डान्समधेही सूक्ष्म मूव्हमेंट करून डान्स हिट करणे हा हातचा मळ.

घाऊक अभिनय करून जगभरात कुणीही सिनेमे हिट करतं. पण मोजका , कॅल्क्युलेटेड अभिनय करून चेहरा कॉमिक ठेवून कॅमिओ अपिअरन्सनेही सिनेमा सुपरहीट करण्याची किमया फक्त भाईजानच करू शकतात.
ट्रेनच्या छतावर प्रचंड हाणामारी चालू असताना हेलिकॉप्टर मधून फायरिंग होत असते. पण सचिन तेंडुलकरच्या पदलालित्याप्रमाणे दोन्ही खान गोळ्या चुकवत रशियन्सना नेस्तनाबूत करतात. इतक्यात ज्या ब्रीजवरून ट्रेन जाणार असते त्याच्यावर बॉंब पडून तो उद्ध्वस्त होतो.

इथे एक आश्चर्यकारक घटना घडते जी साऊथ इंडीयन्स अ‍ॅक्शनच्या थोबाडीत मारणारी ठरते.
खाली पडताना ग्रॆव्हिटीमुळे ज्याची अपवर्ड रिअ‍ॅक्शन झिरो झाली आहे त्या डब्यावर पाय ठेवून दोन्ही खान वर उडी मारतात. हे थक्क करणारं भौतिकशास्त्र रजनीशास्त्राच्या पुढचे एक पाऊल होय. आईनस्टाईनवर सुद्धा लोकांचा सुरूवातीला विश्वास बसला नव्हता. भाईजान शास्त्र काही दिवसांनी लोकांना नक्कीच पटेल. एव्हढे स्टंट करताना दोघे एकमेकांशी हवापाण्याच्या गप्पा करत असतात. हे म्हणजे पुण्य़ाच्या बेशिस्त रस्त्यांवरती गाडी चालवता चालवता मोबाईलवर बोलावे तितकेच सहज वाटते. त्यातून दोघांच्या चेहर्यावर " त्यात काय रोजचंच तर आहे" असे भाव असतात. " ए तू डर गया क्या ?" " हां तेरे लिए" " थॅंक्स टायगर तू सही वक्त पे आ गया" तुझे भी मेरे लिये आना होगा " "हां जरूर" या गप्पा तुफानी धुमश्चक्रीत चालू असतात तेव्हां डोळ्यात पाणी तरारते.

खाली पडणार्या डब्यांवर पाय देत देत ते आभाळात उडणार्या चॉपरच्या दांड्याला लटकतात. दोघांचाही ताळमेळ तोंडात बोटं घालण्यासारखा.
एकदा इथे मेंदू कोमात गेल्यावर मग बर्फावरची फायटिंग त्या मानाने खूपच सायंटिफिक वाटते. बफाखाली चार डिग्री तापमान असल्याने दीपिका त्यात पडून जिवंत राहू शकते हे आपल्याला पटते. पण बर्फाच्या लेयरखाली माणूस गेला कि तापमान खाली गेल्याने त्याला पाच मिनिटात ऊब द्यावी लागते हे इथे लागू पडत नाही.
हा जवळपास तासभराचा फ्लॅशबॅक संपताना आपण आत्ता नेमक्या कोणत्या काळात आहोत, वर्तमानकाळ कोणता याचे जाम विस्मरण झालेले असते. मग पुन्हा डिंपल, रूबीनाचा स्क्रीनशॉट मिळाल्याचा उल्लेख करते आणि म्हणते " पठाण का वनवास खत्म करने का समय आ गया है" एक जरी पाटी चुकवली तर पठाणचा बॅक टू फ्युचर होऊन जातो.

अशा तुफान हाणामार्‍या, जीवघेणे स्टंट्स करता करता रक्तबीजचे कोडे उलगडते.
शेवटी शेवटी व्हिलन जिम पंख असलेला जेटपॅक घेऊन पलायन करतो. पण पूर्वी जसे व्हिलनने तलवार उपसली कि दुसरी तलवार हजर असायची आणि तलवारीची मारामारी व्हायची ( आठवा जैसे को तैसा, फांदेबाज ) तसंच इथेही दुसरा तस्साच जेटपॅक तयार असतो. मग उडत उडत हाणामारी. एव्हढेच बघायचे राहीले होते ते ही पठाणने दाखवले. या जन्मीची इच्छा पूर्ण झाली.

पिक्चर संपता संपता जड पावले (आणि मेंदूने) आपण बाहेर पडतो तेव्हां कुणीतरी सांगतं "अरे ते दुसरं गाणं आत्ता आहे वाटतं " तोपर्यंत आपण खाली जाणार्या एस्क्लेटरर्सवर आरूढ झालेलो असतो.

शाहरूखखानचा वावर सहज आहे. हल्ली तो पूर्वीसारखा अतिशहाणा वाटत नाही. अर्थात चेन्नई एक्सप्रेस सारखा परफॉर्मन्स यातही नाही जमलेला. पण त्याचं टायमिंग भन्नाट आहे. त्याला दिलेले जोक्स पीजे आहेत पण खानाने ते उत्तम डिलीव्हर केलेत.

जॉन अब्राहम जबराट आहे. त्याच्या पात्राला सहानुभूतीची किनार पण दिलेली आहे. आम्ही ग्रे शेड्स मधे पोहोचलो हे चोप्राजना सांगायचे असावे.
सलमान खान जबरदस्त फॉर्म मधे आहे. छोट्याश्या रोलमधे सर्वांत जास्त भाव खाऊन गेला आहे. त्याचा दगडी अभिनय टागयरच्या भूमिकेला सूट होतो. दीपिका सुंदर दिसलीय असे वाटत नाही. तिने स्टंट्स भन्नाट केले आहेत. फिगर मेन्टेन करण्यावर लाखो खर्च होत असावेत. त्यामुळे तिचे अ‍ॅक्शन सीन्स मस्त झालेत.

एकंदर डोकं कोणत्या सिनेमाला बाजूला ठेवून जायचं हे समजलं तर दात ओठ खात त्वेषाने चिकवावर यायची गरज पडू नये याची शिकवण देणारा हा एक महान चित्रपट आहे.

जय पठाण !
जय टायगर !
जय बॉयकॉट ग्यांग !
जय बॉयकॉट ग्यांगची जिरवणारी ग्यांग !
जय रघू हेटर्स क्लब !! (ब्रह्मास्त्र मधले हो Wink )

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Omg खतरनाक लिहिलेय. अर्धे वाचूनच हसून हसून पुरेवाट झाली आहे. त्याची पोचपावती. आता बाकीचे वाचते Lol

“स्पायवरच सगळा लोड असतो.“ - जी गोष्ट हीरोची, तीच व्हिलनची. पुर्वी गब्बर वगैरे व्हिलन्स कडे टोळी असायची. कॉस्ट कटिंग मध्ये त्या टोळ्या गेल्या. प्लॅनिंग, एक्झिक्युशन, निगोसिएशन्स, पोस्ट ऑपरेशन एनालिसिस वगैरे सगळी जवाबदारी तो एकटाच निभावतो. पूर्वी हिरो व्हिलन वगैरे लोकं गाड्या चालवणं, नाच गाणी करणं, समोरच्या माणसाच्या वाक्यावर उर्दूमिश्रित हिंदीतून मुंहतोड़ जवाब देणं वगैरे स्किल्स बाळगून असायचे. आता ह्या व्यतिरिक्त न्यूक्लियर वॉरहेड्स, बायोलॉजिकल वेपन्स, विमानं, मिसाईल्स ई. गोष्टीत सुद्धा त्यांना पारंगत असावं लागतं.

महत्वाच्या टिपा: Dodge, Hummer गाड्या वापरू नयेत. उलट्या पालट्या झाल्या तरी एअरबॅग्स डिप्लॉय होत नाहीत. अगदी वेळ आलीच तर घरून हवा भरून ग्रोसरी बॅग्ज घेऊन जाव्या.

असले सिनेमे ग्रुप्स मध्ये बघावे. त्याचे दोन फायदे. खेचणाऱ्यांच्या संख्येनं खेचण्याची मजा वाढत जाते. आणि दुसरं म्हणजे आपल्यासारखे इतरही आहेत ह्या विचारानं पुढच्या सिनेमाची तिकिटं काढायचा उत्साह टिकून राहतो.

चुकवू नये असले काही. Happy Happy

फेफ Lol मस्त प्रतिसाद
घरून हवा भरून ग्रोसरी बॅग्ज घेऊन जाव्या. >>> या वाक्याला फुटलेच Rofl
महत्वाच्या टिपा वाचून 'साराभाई' मधला दुष्यंत आठवला Proud

हसून हसून मेले Rofl
पठाणकडून हिच अपेक्षा होती. तुम्ही चित्रपट बघू शकलात म्हणून अभिनंदन Wink आपलं नाही बाबा धाडस Lol

आणि पुढच्याच क्षणी खान हातातले दंडुके फेकून स्तंभित पात्रांना बाद करतो. >> या ठिकाणी संभित पात्रा असे वाचनात आले, म्हणून परत दोन वेळा वाचून खात्री केली कारण सध्या कुठे नाव ऐकू येत नाही आहे.

खतरनाक लिहल आहे, एकसे एक पंचेंस

पावलांचा फोटो टाकलाय हे बरे केलेत Happy

अशक्य हसतोय, कसं सुचतं ?

त्याचे सत्यमेव जयते आणि सगळेच पिक्चर आपटले आता तो व्हिलन झाला. तुम्ही जबाबदार याला>> कहर Happy

आईग्ग! कसल जबरी लिहिलय! नाव पाहून हे काय बर ठणठणपाळ म्हणून आलेले! खुप हसले!

फेफांचा प्रतिसादही मस्त!
दुष्यंत Lol

सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. (मनोरंजन म्हणून वाचल्याबद्दल).
काल एक लिंक द्यायला विसरलो होतो. आता चेक करताना लक्षात आले म्हणून संपादित केला. जमलं तर बघा. या परिच्छेदानंतर आहे. ज्यांनी पूर्ण वाचला आहे त्यांच्या साठी इथेच दिली आहे.

"शास्त्रज्ञांना आपल्या गाडीत घातले पण आहे. आता पठाण जिमच्या मागे लागलाय. दोघांची तुफान मारामारी सुरू होते. त्या मारामारीची प्रेरणा इथून घेतलेली आहे."
https://youtu.be/TIe06TAGaZM

फेरफटका. मस्तच लिहिलय तुम्ही. परफेक्ट निरीक्षणामुळे मजा आली. Lol
एअर बॅग ऐवजी कॅरी बॅग हे खरंच सिरीयसली घेण्यासारखे आहे. Happy

आवडल्याची पावती दिलेल्या आपण सर्वांचे आभार. __/\__

रघु आचार्य >>> Rofl Rofl
काय पिसे काढली आहेत. मझा आ गया......

>> त्या अब्राहमचा एक एक दंड पाहून खुद्द रणवीर सिंग जरी तिथे असता तरी म्हणाला असता " अरे तू होय ? काही नाही मी आपला सहजच इकडे फिरत फिरत आलेलो. चालू द्या. आणि तू गं काही घाई नाही. ये सावकाश " असं म्हणाला असता. तिथे खान कुणाचा कोण >> Rofl लिहिलं आहे. पिक्चर बघायची शक्यता शून्य आहे पण असाच आचरटपणा असणार आणि तोच पब्लिक डोक्यावर घेत असणार ह्याची खात्री आहे.

पठाण हिट करण्यात बॉयकॉट टोळीचा सिहाचा वाटा आहे.

तुमचा रिव्ह्यु वाचुन असे वाटतेय कि मी न पाहण्याचा निर्णय घेऊन योग्यच केले..

नवीन वाचकांचे मनापासून आभार.
ज्यांना सिनेमा पहायचा आहे त्यांनी जरूर पहावा. सिनेमातलं विनोदी मटेरियल आयतंच वापरलंय फक्त. ऑल क्रेडीट गोज टू पठाण Wink

पठाणसाठी शाहरूख ने हा जो संवाद साधायचा प्रयत्न केला आहे तो मात्र खूप आवडला.
https://www.youtube.com/watch?v=v1JI1b3RIcI

सचिन यांनी शोलेपाठोपाठ त्रिशूल हा ही सुपरडुपर हिट मूवी दिल्याने त्यांना आज महागुरू म्हटले जाते. >>>
. पाकिस्तान आर्मीच्या जनरलचा माहिती सोर्स हा टीव्हीचा न्यूज चॅनेल असल्याने तो वरीष्ठांना फोन लावून ही माहिती देतो >>>
पाहुण्यांना असल्या खुर्च्या का देतात ? >>>
पूर्वी अशी एण्ट्री हिरविनीला असायची. आता तो फरक संपल्याने हिरोचेही केस उडतात. >>>
चॉपर जे करू शकत नाही असा त्याच्या निर्मिती करणार्या संस्थांचा अंधविश्वास असतो, त्याला पठाण सुरूंग लावतो >>>
ही सगळी व्यवस्था आयुष्य़ात जेव्हां हिरो हमला करेल तेव्हढ्यासाठीच फक्त. >>>

इथे हेडक्वार्टरला कुणाचंच डोकं चालत नसतं. आलेल्या माहितीचं काय करायचं याचं ज्ञान त्यांच्याकडे नसतं. >>>
अरे तू होय ? काही नाही मी आपला सहजच इकडे फिरत फिरत आलेलो >>>

Lol धमाल लिहीले आहे. जबरी पंचेस आहेत. मी इतके लिहून थांबलोय पण पुढेही आहेत. मजा आली.

बफाखाली चार डिग्री तापमान असल्याने दीपिका त्यात पडून जिवंत राहू शकते हे आपल्याला पटते. >>> ती बेशुद्ध पडली तर तिला उब देण्याकरता हीरो काय करेल याची तिला गंगा जमुना सरस्वती पाहून कल्पना आली असेल. तेव्हा त्यापेक्षा शुद्धीवरच राहू असा विचार केला असेल.

"बफाखाली चार डिग्री तापमान असल्याने दीपिका त्यात पडून जिवंत राहू शकते हे आपल्याला पटते" - त्याहीपेक्षा तिला वर काढल्यावर, विमानात देतात तसल्या फ्लीस च्या ब्लँकेटने तिला उब मिळते हे पाहून आपण गदगदतो. Happy

तसं कुणी मिसलं असल्यास - शेवटच्या मारामारीनंतर, ते कड्याच्या काठावरचं लाकडी घर नीट पहा. घराच्या बाहेर, कड्याच्या काठाला, एक वॉश बेसीन आहे. त्याचा पर्पज कुणाला कळला असेल, तर नक्की कळवा.

बफाखाली चार डिग्री तापमान असल्याने दीपिका त्यात पडून जिवंत राहू शकते हे आपल्याला पटते.
>>> कारण ती हॉट आहे...

कड्याच्या काठावरचं लाकडी घर >>> ती सगळीच घरं रिकामी आहेत असं वाटलं त्या घरांचाच पर्पज कुणाला कळला असेल तर सांगा आधी Happy

हीरो काय करेल याची तिला गंगा जमुना सरस्वती >>> फा Rofl

Pages