पैशाचे झाड- भाग २

Submitted by अतरंगी on 23 January, 2023 - 21:48

पैशाचे झाड भाग :-१ https://www.maayboli.com/node/82901

हो नाही करत शेवटी ऐन वेळी कोणाचेही कॅन्सल न होता, कोणतेही विघ्न न येता, ठरल्याप्रमाणे सगळा गृप कोकण ट्रिपला निघाला. बर्‍याच दिवसांनी सगळे जण एकत्र ट्रिपला निघाल्यामुळे थट्टा मस्करीला पार ऊत आला होता. क्षणाक्षणाला हसण्याचे फवारे फुटत होते. नवे- जुने संदर्भ घेऊन एकेकावर धपाधप जोक्स पडत होते. प्रत्येक वेळेस मुले गाडीतच पेग भरायला लागली की आनंदच्या मनात धाकधूक होत होती. अजून नव्या गाडीची नवलाई संपली नव्हती. पाच जणात दोन खंबे कधी संपले पत्ता पण नाही लागला. खंबे संपले तसे सगळ्यांनाच भुकेची जाणीव झाली. एक छान पैकी हॉटेल बघून जेवायची ऑर्डर येईपर्यंत परत एक एक लार्जची ऑर्डर पण देऊन झाली. आपल्याच मस्करीमधे दंग असलेल्या मुलांचे लक्ष वेधून घ्यायला पार्किंग मधे आलेली एक नविन कोरी BMW X5 कारणीभुत ठरली. त्या BMW चे काही एवढे विशेष नव्हते पण त्यातून ऊतरलेल्या ३ सुंदर मुलींनी मात्र सगळ्यांच्या नजरा बांधून ठेवल्या. अचानक जोक्स कमी झाले, सगळ्यांची पोटं आत गेली आणि सगळेच सावरून बसले. त्या तीन मुलींसोबत असलेल्या २ मुलांकडे कोणाचेच लक्ष गेले नाही. ते पाचही जण सरळ एसी सेक्शन ला गेल्यावर सगळे जण परत सैलावले.

"असं आयुष्य असायला हवं च्यायला. पैसा असला की सगळंच बदलतं. मिसरुड फुटलं नाही अजून आणि ऐश बघ, मुलं- मुली मिळून ट्रिपला निघाली आहेत."

" ही ऐश करायची राहिली यार आयुष्यात, आपल्या गृपमधल्या मुलींना च्यायला साधं लोणावळ्याला वन डे रिटर्न ट्रिपला यायला जमायचं नाही. "

" खरं तर हा फरक पैशाचा आहे तेवढाच पिढीचा आणि सोसायटीचा पण आहे रे. "

" हो ना, आपल्याला निदान मैत्रिणी असणं गृप असणं, एकमेकांच्या घरी जाणं, पिक्चरला जाणं हे तरी होतं, त्या आधी आणि आपल्यासोबतच किती घरं अशी होती की तिथे मुलींना मुलांशी बोलणं पण अलाऊड नव्हतं. "

" ते पैसे, पिढी सोडा रे, अशा चिकण्या मैत्रिणी तरी कुठे होत्या त्या वेळेस?"

" अरे त्या गेल्या आता. जाऊ दे. पेग संपला, दुसरा ऑर्डर करा."

तिथून निघेपर्यंत सगळ्यांची नजर अधून मधून त्या तिघींकडे जातच होती. त्या निघाल्याशिवाय हॉटेल मधून निघायची कोणाची ईच्छाच होत नव्हती. नित्याने पोचायला लेट होईल, आता निघायलाच हवं, असा अल्टीमेटम दिल्यावर मनावर दगड ठेऊन निघावंच लागलं. बुक केलेल्या होम स्टे वर गेल्यावर सगळे एकदम खुश झाले. होम स्टे च्या टेरेस वरून दिसणारा सुंदर समुद्र, शेजारचं रेसॉर्ट, स्विमिंग पुल, सगळेच एकदम भारी होते. रुम्स मधे बॅग्स टाकून सगळे आधी बीच वर पळाले. पेयपान संपल्यावर गाडीतच एक एक डुलकी झाल्याने सगळे मस्त फ्रेश होते. सगळ्यांना पाण्यात ओढून नेणे, मस्ती करणे यातच संध्याकाळ झाली.

अंधार पडला तसे सगळे रुमवर परत येऊन शॉवर घेऊन टेरेस वर गप्पा मारायला जमले. परत खंबे ओपन झाले, परत पेग भरले गेले आणि चकण्याला आलेल्या मस्त फ्राय केलेल्या पापलेट , सुरमई वर सगळे तुटून पडले. सकाळपासूनचा बडबडीचा, थट्टा मस्करीचा उत्साह जरा कमी झाला होता. कोणीतरी मोबाईलवर छान किशोरची गाणी लावली होती त्यातच सगळे दंग होते. जनरल ख्याली खुशालीच्या गप्पा चालू होत्या. नित्याचं मात्र गप्पांमधे लक्ष नव्हतं हे बर्‍याच वेळाने कोणाच्या तरी लक्षात आलं. त्याला हटकल्यावर त्याने नजरेनेच शेजारच्या रेसॉर्टच्या स्विमिंग पुलकडे ईशारा केला. तिथे तेच दुपारचे पाच जण स्विम सुट्स मधे बिअर पित पित पुल मधे मस्ती करत होते.

" नित्या अरे बास, किती बघशील, तुझ्या अशा बघण्याने एखादी प्रेग्नंट होईल तिकडे" विनितने ऊगीचच नित्याला एक वर एक जोक पास केला.

" योग्य वयात अजून शिकला असतास आणि अमेरिकेला वगैरे गेला असतास, खोर्‍याने पैसा कामवला असतास. तुझं तर वय गेलं आता पण तुझ्या पोराने तरी अशी ऐश केली असती." अन्याने पण मधे चान्स मारुन घेतला.

" अबे छोड यार काय आहे त्या पैशा मधे. मी आत्ता पण सुखी आहेच की. तुमच्या सारखे येडझवे असले तरी चार जिवलग मित्र आहेत. झकासपैकी नोकरी आहे, घर आहे, गाडी आहे. अजून काय हवं असतं आयुष्यात. अमेरिकेला गेलो असतो तर कमावला असता पैसा, पण पैशाने सगळं थोडीच विकत मिळतं. "

" बरोबर आहे. काय लोकं ऊगीचंच पैसा पैसा करत असतात. निम्म्यापेक्षा जास्त आयुष्य त्या पैशापारी वाया घालवायचं. काय फरक पडतो पैसा असला काय आणि नसला काय? आता आपण आज थार मधून आलो, ते BMW मधून, आपण ईकडे होम स्टे वर राहीलो आहोत, ते तिकडे भारी रेसॉर्ट मधे, आपण मोबाईल वर गाणी ऐकतोय, ते बोस च्या स्पिकर वर ऐकत असतील पण त्याने आपली मजा थोडीच कमी झाली? पैसा असला काय नसला काय त्याने काय फरक पडतो. कमी पैशामधे पण मस्त आयुष्य जगता येतंच की!" अमोलने न थांबता आपल्या मनातलं बोलून दाखवले.

" वा अमोल महाराज, १००% सहमत. कशाला एवढी झवझव करायची आयुष्यात, खायचं, प्यायचं, ऐश करायची. आपल्या कडे च्यायला लोकं नुस्ता रॅटरेस मधे, पैशाच्या मागे. पोरगं जन्माला येऊन श्वास घेत नाहीत तो पर्यंत यांचे पुढचे प्लॅन चालू. लगेच बैल घाण्याला जुंपला तसा जुंपायचे त्या पोराला. नर्सरी काय, लोअर केजी काय..... आयुष्यातली सोनेरी वर्षे त्या शाळेत वाया घालवायची... कशासाठी ? तर पुढचं सगळं आयुष्य कोणत्या तरी कंपनीत खर्डेघाशी करत घालवण्यासाठी. कोणी सांगितलं आहे एवढं? लई विचार करायचा नाही. मस्तपैकी आज मधे जगायचं, एंजॉय करायचं. पुढं काय होईल कोणाला माहित आहे ? त्या साठी आज कशाला मन मारायचं?" विनितला पण राहवलं नाही. दहावी पर्यंत कसंबसं शिकलेल्या विनितचा शाळेवर जरा जास्तच राग होता.

" लोकं ईतकी काय पैशाच्या मागे धावत असतात. कशाला लागतो पैसा? किती विचार करत बसतात. मस्तपैकी निवांत आयुष्य जगावं, फिरावं, खावं- प्यावं ऐश करावी. नसली भारी कार, मोबाईल, कपडे तरी काय फरक पडतो? सुख हे समाधानात असतं, मानण्यात असतं. अलिशान घरं घेतली, सोन्याच्या ताटात पंच पक्वान्न जरी जेवत असाल तरी समाधान नसेल तर काय फायदा अशा श्रीमंतीचा ? "

" पैसा आला की लोकं माणूसकी पण विसरतात रे. पैसा एकटा येत नाही तो त्याच्यासोबत अनेक वाईट गोष्टी पण आणतो. माज, अहंकार, आजार, सगळं एका मागे एक येतंच."

सगळे जण एका मागे एक बोलत होते. प्रत्येक जण स्वतःचे विचार मांडत होता. अभि मात्र एकटाच एका खुर्चीवर पाय पसरून, डोके टाकून डोळे बंद करून बसला होता. ह्याला बहुतेक जास्त झाली म्हणून कोणी त्याची दखल घेत नव्हतं.

जशी जशी झोप अनावर झाली तसे अमोल आणि अभि सोडून एक एक जण रुम मधे जाऊन झोपले. अमोल शांतपणे समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकत शांत बसला होता.

थोड्यावेळाने अभिच ऊठला आणि अमोलला म्हणाला "चल, आईस्क्रीम खाउन येऊ."

" कुठून? शहर नाहीये. गावात आहोत आपण."

" चल रे, नाही मिळालं तर चालून येऊ."

दोघेच निजानिज झालेल्या त्या गावात फिरायला बाहेर पडले. एके ठिकाणी एक दुकान ऊघडे सापडले पण तिथे आईस्क्रिम नव्हते. अभिने सहज कुठे मिळेल विचारले तर त्या दुकानदाराने नेमके ते रहात असलेल्या होम स्टेच्या शेजारच्याच रेसॉर्टचेच नाव सांगितले.

त्या रेसॉर्टचा डायनिंग हॉलच्या एका कॉर्नरला बसून अभिने आईस्क्रीमची ऑर्डर दिली. अभि, अमोल, दोघेही जास्त बोलत नव्हते. बर्‍याच वेळ आइस्क्रीम आलं नाही म्हणून अभिने एक दोन वेळा सर्व्हींग काऊंटर कडे मान वळवून पाहिले. काऊंटर वरच्या माणसाने ऑर्डर तयार करुन ठेवली होती. पण ती तिथून टेबल वर अजून आली नव्हती.

" सगळे वेटर जेवायला गेले असतील"

" अरे हो, जाऊ दे मीच जाऊन घेऊन येतो."

अभिने टेबल वरुन ऊठून काऊंटर वरचे स्कुप ऊचलून मागे वळला आणि त्याच क्षणी आपल्याच धुंदित हसत खिदळत येणार्‍या गृपमधल्या एकाचा धक्का लागून सगळेच स्कूप खाली पडले. हा तोच पाच जणांचा गृप होता जो सकाळ पासून मित्रांमधे चर्चेचा विषय ठरला होता. आपल्या कडून झालेल्या चुकीची जाणिव होताच तो मुलाने पटकन वरमून माफी मागितली आणि अभि नको म्हणत असताना पण त्याने स्वतःच्या ऑर्डर बरोबर त्याची ऑर्डर रिपिट करायला सांगून बिल भरले. ऑर्डर तयार झाली तरी तो गृप आणि अभि काऊंटर वरच गप्पा मारत ऊभे होते. अमोल शांपपणे हे सगळं टेबल वरुनच बघत होता.

आईस्क्रीम घेऊन दोघे बाहेर पडल्यावर चालता चालता अमोलने सहज म्हणून विचारले " एवढा वेळ काय बोलत होतात?"

"काही नाही रे जनरल गप्पा. मी राहतो त्याच्या दोन लेन पलिकडेच राहतात. त्यातल्या एकीला जपानला स्कॉलरशिप मिळाली आहे एक महिन्याने ती दोन वर्षासाठी जपानला जाणार आहे आणि तो ब्लू शर्ट मधला होता, तो MS करायला युएस ला चाललाय पुढच्या आठवड्यात, म्हणून जायच्या आधी सगळे एकत्र वेळ घालवायचा म्हणून आले आहेत ट्रिपला. "

" ओह म्हणजे हुशार आहेत पोरं. छिछोर आणि नुस्ता बापाचा पैसा ऊडवणारी नाहीयेत तर !"

" हो"

" असे फार कमी असतील नाही?"

" असे का वाटते तुला?"

" काही नाही रे जनरल ऑबझर्वेशन. वाटलं असंच. आपल्याकडची गावातली अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली, पैशापायी येडे चाळे करणारी, पैशामुळे येणारे आजार सोबत घेऊन आलेली घरं पाहिली की असं वाटतं की आपलं आयुष्य बरं. मीठ भाकर खाऊन का होईना सुखी आहोत आपण. नको ते महगडे शौक, नको तो पैसा, नको ती श्रीमंती."

एवढे बोलता बोलता दोघेही त्यांच्या होम स्टेच्या टेरेस वर परत आले होते. परत मगासारखाच एका खुर्चीवर पाय ठेवून अभि शांतपणे स्वतःशीच बोलल्या सारखा शुन्यात नजर लाऊन बोलू लागला.

"मगाशी तुम्ही सगळे जे पैसा आणि पैसेवाल्यांबद्दल जे बोलत होतात, ते मी शांतपणे ऐकत होतो. आपल्याकडे ना पैसा आणि श्रीमंती बद्दल कायम नकरात्मकच बोललं जातं. पिक्चर आणि सिरियल्समधे पण कायम श्रीमंत लोक कसे वाईट, स्वार्थी, गरिब कसे चांगले, दिलदार, स्वच्छ मनाचे असेच दाखवले जाते. "हट्टीकट्टी गरिबी आणि लुळी पांगळी श्रीमंती.......". आपल्या मनावर पण पैशा मागे धावू नका, पैशाची हाव करु नका, हे करु नका ते करु नका म्हणून अनेक गोष्टी लहानपणा पासून बिंबवलेल्या असतात. पण प्रत्येकाला पैसा हवा असतो, आणि ९० % लोक आयुष्य पैशासाठी काम करण्यात घालवतात, हे सत्य आहे.

" अभ्या अरे पैसा नकोच असे कोणी नाही म्हणलं. जगायला पैसा लागतोच की. पण पैशाचा अतिरेक नको. बंगले, महागड्या गाड्या, महागडे मोबाईल हे सगळं असलं काय नसलं काय? काय फरक पडतो?"

" नाही पडत. बरोबर आहे. पण श्रीमंती म्हणजे फक्त बंगले, गाड्या, मोबाईल, हॉटेलिंग एवढंच हे तुल कोणी सांगितलं? जगायला पैसा लागतोच हे तू पण मान्य केलंस, प्रत्येकाकडे पैसा हवाच, पण तो किती हवा हे सांगू शकशील? "

अभ्या कडून जेव्हा असे प्रश्न येतात तेव्हा त्याला काही तरी महत्वाचे सांगायचे आहे आणि त्या प्रश्नाला काहीही कसेही ऊत्तर दिले तरी तो सांगणारच आहे, हे अमोल ला अनुभवाने माहित होते. तरी ऊगीचंच काही तरी बोलायचे म्हणून तो म्हणाला " नक्की असे नाही सांगता येणार"

" मी माझ्यासाठी ठरवलेलं ऊत्तर सांगतो. जेवढ्या पैसा आल्यावर मला माझ्या वेळेवर पुर्ण ताबा येईल आणि मला कोणा कडेही मदत न मागता हवे ते पर्याय निवडायचे स्वातंत्र्य मिळेल, तेवढा पैसा मला कमवायलाच हवा."

" म्हणजे? तो तर सगळ्यांकडेच असतो की!"

" नाही. सगळ्यांकडे नसतो. "

" आधी वेळ या विषयावर बोलू. आपण आपल्या आयुष्यातले किती दिवस आपल्याला हवे ते करु शकतो? जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी नोकरी करतो किंवा स्वयं-रोजगार सुरु करतो, तेव्हा आपल्याला वर्षभरातले साधारण २५० ते ३०० दिवस तिथे कामाला जावे लागते. तेवढे काम केल्याशिवाय, तेवढा वेळ दिल्याशिवाय, तो पगार मिळणार नाहीये. हेच आयुष्यभरासाठी आहे. म्हणजेच आपला तेवढा वेळ त्यांनी विकत घेतला आहे. ऊद्या, परवा, पुढचे वर्ष, ईथून पुढचे पुर्ण आयुष्य सकाळी ऊठून काय करायचे हे आपण ठरवू शकत नाही. आयुष्य भर ऊद्या सकाळी ऊठून मी काय करायचे याचा निर्णय जेव्हा माझा असेल तेव्हा मी म्हणू शकतो की माझा माझ्या वेळेवर ताबा आहे. मी मनचा राजा आहे. मला वाटलं तर मी ऊद्या काम करेन, नाही तर मित्रांसोबत फिरायला जाईन, बायकोला घेऊन पिक्चरला जाईन, हवे ते करेन. आपले मित्र म्हणतात की पैशाने सुख विकत घेता येत नाही. पण त्यातल्या अनेकांना आपण अनेक दिवसांनी भेटतो, गप्पा रंगतात, आपण छान हसत खिदळत असतो, तेव्हा सकाळी लवकर ऊठून कामावर जायचे आहे म्हणून तिथून घरी जावे लागते. त्यांच्या कंपनीच्या मालकांना असे कामावर जायचं आहे म्हणून मित्रां मधून ऊठून जावे लागत असेल का? तुमच्या बँक मधे पाच सात कोटी असते, काम करो न करो दर महिन्याला ठराविक रक्कम घरी येत असती, तर तुम्हाला सकाळी कामावर जायचे आहे म्हणून मित्रांसोबत रंगलेल्या गप्पा सोडून घरी जावे लागले असते का? सुख कशात आहे? मित्रांसोबत गप्पा मारण्यात की कामावर जाण्यात? "

" अरे अभ्या हे जे तू वेळे बद्दल बोलत आहेस न ते स्वातंत्र्य तर एका मजूर अड्ड्यावरच्या मजुराकडे पण असतं की. त्याला हवं तेव्हा तो काम करतो, नसेल करायचं तेव्हा नाही करत. त्याची गुजराण करण्यापुरते मिळतातच की त्याला. त्याचा आहे की त्याच्या वेळेवर ताबा."

" हो. पैसे नसताना वेळेवर ताबा असलेले अनेक जण आहेत. आजुबाजूला बघितलंस तर दिसतील. पण त्यांच्या आयुष्यात एक महत्वाची गोष्ट नाही, ती म्हणजे पर्यायांवर ताबा. मला आयुष्यात हवं तेव्हा समोर असलेल्या पर्यायांपैकी मला हव तो, योग्य तो, बेस्ट पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य.

छोटेसे ऊदाहरण घेऊ. समज एखादा गरिब स्वाभिमानी मजूर आहे, स्वतः जितके कमावतो त्यात खाऊन पिऊन सुखी समाधानी आहे. उद्या त्याच्या मुलाचा वाढदिवस आहे म्हणून त्याने त्याच्या बापाकडे हट्ट धरला की तू ऊद्या कामावर जाऊ नको. पुर्ण दिवस माझ्या सोबत खेळ, मला शाळेत सोड, घ्यायला ये, संध्याकाळी बागेत घेऊन जा. तर तो हे करु शकेल. त्याला काय, उद्या मजूर अड्ड्यावर गेला नाही तर काही फरक पडणार नाही.

पण समज त्याच्या मुलाला काही तरी गंभीर आजार झाला आणि त्याचा ईलाज करायला पंधरा ते वीस लाख खर्च येणार असेल तर? तर तो मजूर काय करेल? कुठून आणेल ते पैसे? स्वतःच्या स्वाभिमानाला मुरड घालून लोकांसमोर मदतीला हात पसरावा लगेल ना? की तो स्वतःच्या मुलाला ट्रिटमेंट द्यायला पैसे नाही म्हणून मरायला सोडून देईल? रोज त्याचे तिळ तिळ मरणे बघेल?

हे थोडे नकारात्मक ऊदाहरण झाले. जाऊ दे. चांगले घेऊ. ऊद्या त्या मुला मधे समज कुस्तीपटू होण्याचे, बॉडी बिल्डर होण्याचे पोटेंशिअल असेल. तर त्याला लागणारा जो महिन्याला १०-१५ हजाराचा खुराकाचा खर्च तो बाप करु शकेल? तो मुलगा हुशार निघाला तर त्याला स्व्बळावर डॉक्टर, ईंजिनिअर करु शकेल? बापाकडे पैसे नाहीत तर त्या मुलाने स्वतःच्या खर्चासाठी कुठे फिरायचे? का फिरायचे?

पैसा हे स्वातंत्र्य देतो.

ऊद्या एखाद्याचा मुलगा आजारी असेल तर त्याला हे बघावे लागू नये की आपल्याला त्याची ट्रिटमेंट कुठे करणे परवडेल, मनात एकच विचार यायला हवा, यावर जगात कुठे सगळ्यात चांगली ट्रिटमेंट मिळेल? कोणते हॉस्पिटल बेस्ट आहे? मी तिथे माझ्या मुलाला नेणार. मुला मधे जर डॉक्टर व्हायचे टॅलेंट असेल तर एकच विचार मनात यायला हवा, कोणते कॉलेज बेस्ट आहे? तिथे माझा मुलगा शिकणार.

याला म्हणतात पर्याय निवडीचे स्वातंत्र्य.

वेळेवरचा ताबा आणि स्वाभिमानाने जगताना हवा तो पर्याय निवडायचे स्वातंत्र्य हे फक्त पैशानेच मिळते. त्याला दुसरा काहीच ऑप्शन नाही. "

अभि हे सगळे बोलत असताना अमोल अचानकच फार शांत होऊन ऐकत होता. त्याच्या मनातली खळबळ स्वतःच्याच तंद्रित बोलत असणार्‍या अभिच्या जराही लक्षात नाही आली.

"लोक पैशाला फार कमी लेखतात रे. मॉर्गन हाऊजेल चे Psychology of Money नावाचे एक छान पुस्तक आहे. ते नक्की वाच. पैशाची खरी ताकत हे महागडे मोबाईल, बंगले, फर्निचर, गाड्या घेण्यात नाहीये रे अमल्या. लोकांना पैशाने विकत घेता येणार्‍या गोष्टी दिसतात, पण पैशाची खरी ताकत आहे ती न दिसून येणार्‍या दोन गोष्टींमधे.... आपल्या वेळेवर ताबा आणि पर्याय निवडीचे स्वातंत्र्य. स्वातंत्र्य ही जगातली सगळ्यात महागडी गोष्ट आहे. पैशाचा सगळ्यात मोठा ऊपयोग आहे ते स्वातंत्र्य विकत घेण्यात..... गाड्या, मोबाईल, कपडे यासारख्या चिल्लर गोष्टी घेण्यात नाही. "

" पैसा कमी असताना पण माणूस सुखी राहू शकतो. पैशाने सगळं विकत घेता येत नाही, पण काही गोष्टी फक्त पैशानेच विकत घेता येऊ शकतात. त्यातली एक आहे स्वाभिमान. मी कायम म्हणतो बघ, गरिबी वाईट नसते, त्या गरिबीमुळे येणारी लाचारी आणि मजबूरी वाईट असते."

लोकं म्हणतात कि पैशाने सुख विकत घेता येत नाही. मी म्हणतो सुख हे पैशानेच विकत घेता येतं . कारण खरे सुख आहे कोणा कडून कधीही एक रूपया सुद्धा ऊधार न घेता स्वाभिमानाने जगण्यात, मित्रांसोबत तासंतास गप्पा मारण्यात, पैशासाठी काम करत आयुष्य वाया घालवण्याऐवजी स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी करण्यात, आपल्या बायको मुलांना हवा तेवढा वेळ देण्यात, आपल्या कर्तव्यांमधे आपण कधीही कुठेही कमी पडलो नाही या भावनेत, एक छान संपन्न आणि बॅलन्सड् आयुष्य जगण्यात.

आणि हे सगळं करायची क्षमता फक्त पैशानेच किंवा संपत्तीनेच येते. दुसऱ्या कोणत्याही गोष्टीने नाही. ...

रोज पैशासाठी राबणारे दारिद्र्यरेषेखाली जगणारे लोक आणि पैशाला कामाला लावून त्याचा सुंदर वापर करणारे मोठमोठे बिझनेसमन यामधे असते आपल्यासारखी मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय जनता..... ती एका वेगळ्याच धुंदीत आहे. छान नोकर्‍या किंवा छोटे- मोठे व्यवसाय आहेत, महिन्याला पाच आकडी ईन्कम आहे. एक दोन फ्लॅट आहेत, गाड्या आहेत, सेव्हिंग्स आहेत. त्यांना वाटतं की आपण सुरक्षित आहोत. पण खरे तर हे सगळे गरिबीच्या फक्त एक पाऊल पुढे आहेत. यांना ही लाईफ स्टाईल मेंटेन करायला, रिटायरमेंट नंतरचे लाईफ सिक्युअर ठेवायला आयुष्यभर टाचा घासायला लागणार आहेत. शिवाय नशिबाचा एक फटका बसला ना तर ही सगळी लाईफ स्टाईल एका झटक्यात नाहीशी होईल......"

बोलता बोलता अभि झोपून गेला, अमोल मात्र पहाटे पर्यंत अभिने सांगितलेल्या गोष्टीवर विचार करत बसला होता.

ट्रिप संपवून सगळे घरी पोचले तरी अमोलच्या डोक्यातून तो विषय काही केल्या जात नव्हता. अभ्याने सांगितलेले स्वातंत्र्याचा मुद्दा आणि महत्व तर त्याला कळले होते. पुढचे कित्येक दिवस तो सातत्याने त्याचाच विचार करत होता.

भाग ३ https://www.maayboli.com/node/82915

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान सुरु आहे लेखमाला.
मुळात गुंतवणूक हा विषय अनेकांना किचकट वाटतो. गुंतवणूक करायाला पैसेच नाहीत ही भावना ; गुंतवणुकीच्या पर्याय शोधण्यासाठी अभ्यास करायची तयारी नसणे, कर्ज काढून का असेना पण कार सारख्या गोष्टींची खरेदी अशा अनेक कारणांमुळे बरेच जण आयुष्यातली मौल्यवान वर्ष वाया घालवतात,काही वेळा कोणीतरी काहीतरी सुचवतो दाम दुप्पट तिप्पट वगेरे किंवा आणि फसगत करून बसतात. नाही तर विमा एजंट आहेतच तयार त्यांच्या योजना गळ्यात घालायला ..

विचार पोचला.

फक्त काम वाईट, त्यात आनंद नाही असा काहीसा एक अर्थ निघू पाहतोय, तो खटकला.
<सुख कशात आहे? मित्रांसोबत गप्पा मारण्यात की कामावर जाण्यात? कामावर जाण्यातही सुख असतं. असायला हवं. मित्रांबरोबर रोज रोज गप्पा काय आणि किती मारणार? काम करताना त्यातून वेळ काढून कधीतरी गप्पा मारणं यात सुख असेल.

<त्यांच्या कंपनीच्या मालकांना असे कामावर जायचं आहे म्हणून मित्रां मधून ऊठून जावे लागत असेल का? > कंपनीच्या मालकाकडे भरपूर पैसा असेल. तो गेला नाही तर कोणी त्याचा पगार कापणार नाही. पण कंपनी चालवतोय म्हणजे जबाबदार्‍याही येणार. त्या कोणी लादलेल्या नसतील. त्याला वाटेल तेव्हा तो कदाचित सगळं बंद करू शकेल, एवढाच फरक.

आधीच्या लेखातला भाड्याने घर घेऊन राहण्याचा मुद्दा विस्ताराने मांडला जातोय का याची उत्सुकता आहे.

भरतदा,

काम करणे वाईट, काम करणे म्हणजे आयुष्याचा/ वेळेचा अपव्यय असे नाही. मला तसे म्हणायचे नाही आणि तसे माझे स्वतःचेही वैयक्तिक मतही नाही.

पैशासाठी काम करावे लागणे यात मला प्रॉब्लेम वाटतो.

कामाची आवड आहे म्हणून काम करणे वेगळे आणि काम करायलाच लागणार आहे नाही तर घर कसे चालणार, खर्च कसे भागवणार? हे वेगळे.

आपण जर आपल्याला आवडत असलेले काम करत असू तर ते काम करण्यात पण सुख आहे.

कंपनीच्या मालकाकडे भरपूर पैसा असेल. तो गेला नाही तर कोणी त्याचा पगार कापणार नाही. पण कंपनी चालवतोय म्हणजे जबाबदार्‍याही येणार. त्या कोणी लादलेल्या नसतील. त्याला वाटेल तेव्हा तो कदाचित सगळं बंद करू शकेल, एवढाच फरक.>>>>

माझ्या मते तेवढाच फरक नाही.

मी वर लिहिताना फक्त मित्रांसोबत गप्पा मारणे आणि कामावर जाणे या मधल्या प्रेफरंस बद्दल लिहिले. पण ही यादी खुप मोठी आहे.

मी कितीवाजता कामावर यायचे किती वाजता घरी जायचे हे दुसरे कोणीतरी का ठरवणार? मला सुट्टी घेताना कोणाची तरी परवानगी का घ्यावी लागते? मी वर्षातून किती सुट्ट्या घ्यायच्या हे दुसर्‍या कोणीतरी का ठरवायचे? कामावरच्या लोड मुळे मला का मुलांचे वाढदिवस, फॅमिली फंक्शन्स, गेट टुगेदर मिस करावे लागतात? घरातला एखादा माणूस आजारी असताना पण का कामावर जावे लागते? हॉस्पिटल मधे बसुन पण कॉल/ मिटिंग का अ‍ॅटेंड करावे लागते? का रिपोर्ट बनवावे लागतात? मला किती पगार मिळणार, पुढच्या वर्षी किती टक्के पगारवाढ मिळणार हे दुसरे कोणीतरी का ठरवणार? असे अनेक प्रश्न आहेत. भलीमोठी यादी आहे.

जेव्हा पैशासाठी काम करावे लागते तेव्हा आपले स्वातंत्र हिरावले जाते. अनेक दैनंदिन आयुष्यातल्या छोट्या गोष्टींपासून ते मोठे निर्णय घेताना अनेक मर्यादा येतात.

मला त्या मर्यादांवर आक्षेप आहे आणि वाईट याचे वाटते की कित्येकांनी हे असेच असते, असेच असणार आहे, हे स्विकारलेले आहे.
त्यातून बाहेर का पडायचे, कसे पडायचे हे त्यांना माहितच नाही.

आधीच्या लेखातला भाड्याने घर घेऊन राहण्याचा मुद्दा विस्ताराने मांडला जातोय का याची उत्सुकता आहे.>>>>

हे खरंच विसरलोच होतो... बरे झाले आठवण करुन दिलीत. चवथ्या किंवा पाचव्या भागात कव्हर करतो Happy

पैशाचं नियोजन कसे करता येईल याची माहिती आली पुढे तर छान होइल.>>>>

आबा, मला जितके थोडेफार ज्ञान आहे ते सर्व या लेखमालिकेत लिहिणार आहे.

वीरू +१.
हर्पेन, मनिमाऊ, धन्यवाद.

हो अतरंगी.
{मला तसे म्हणायचे नाही आणि तसे माझे स्वतःचेही वैयक्तिक मतही नाही.}
हे माहीत आहे. पण वरच्या लेखनातून तसा अर्थ निघू शकतो एवढंच सांगायचंय.

हो. तुमच्या प्रतिसादाबद्दल मनात कधीच शंका नसते. ते positive criticism किंवा दुसरी बाजू मांडणे या उद्देशानेच असतात याची कल्पना आहे.

मी हे सगळं लेखात लिहावे की नाही संभ्रमात होतो.

तुमच्या प्रतिसादामुळे लेखाला पुरवणी लिहिली. Happy

<< पैशाने सगळं थोडीच विकत मिळतं. >>
माना, पैसा खुदा नही | लेकीन खुदा कसम, खुदा से कम भी नही |

लेखमाला वाचतोय.