पैशाचे झाड भाग :-१
"हॅलो"
"बोल"
" कुठे आहेस?"
" घरी"
"किती वेळ लागेल?"
"का?"
"अरे, का म्हणजे? तू येतोएस ना? सगळे थांबले आहेत?"
"कोण थांबले आहेत? आणि कुठे?"
विनितला कळेचना की, हा असा का बोलतोय?
"अरे तू गृपवर मेसेज नाही पाहीले का?"
"नाही, माझा स्मार्ट फोन बंद आहे. काय झालं? "
"नित्याच्या घरी सगळे बसलोय ये लवकर.."
"स्टॉक आहे की घेऊन येऊ?"
"अरे तीन खंबे आहेत, सगळे आज लोळत नाहीतर झिम्मा खेळतच घरी जाणार आहेत. तू ये फक्त"
पंधरा मिनिटात येतो असे सांगून अभिने फोन कट केला.
अभिजित देसाई , विनित कंधारे , नितिन पाटील, आनंद म्हात्रे, अमोल निकाळजे हे सगळे बालपणीचे मित्र, या ना त्या मार्गाने प्राथमिक शाळेतली घट्ट मैत्री वयाच्या चाळीसाव्या वर्षी सुद्धा टिकवून होते. प्रत्येकाची जडणघडण, शैक्षणिक व आर्थिक परिस्थिती जरी वेगवेगळी असली, तरी तो मैत्रीच्या आड कधी आली नाही. कोणाच्या घरी सुखाचा प्रसंग असो की दु:खाचा एकमेकां शिवाय कोणाचेही पानही हालत नसे. प्रत्येकाच्या फॅमिलीच्या जबाबदार्या आणि कामात बिझी असले तरी काही ना काही कारण काढून भेटी गाठी ठरवत आणि एकमेकांची अगदी मनसोक्त चेष्टा करत महिनोंमहिने पेंडीग राहिलेला हसण्याचा कोटा कंप्लिट करून घेत. आज परत असाच मुहुर्त आलेला दिसत होता.
अभि हातातले काम संपवून नित्याच्या घरी पोचे पर्यंत अर्धा तास उलटून गेला होता. तिसर्या मजल्यावरुन येणार्या हसण्याच्या आवाजावरुन दोन चार पेग झालेले दिसत आहेत आणि पार्टी चांगलीच रंगली आहे , हे पार्किंगमधे गाडी लावतानाच अभिच्या लक्षात आलं.
बेल वाजवल्यावर सर्वांनी " चेंगट लोकांचे शिरोमणी, कबाडी- भंगार भक्षक, जुनाट वस्तूचे संरक्षक, लक्ष्मी व सरस्वतीचे मानसपुत्र, विनायक नगरच्या पुरातत्व खात्याचे रखवाल अभिजित देसाई यांचे सहर्ष स्वागत !!!! " अशा दणदणीत घोषणेत अभिला घरात घेतले.
" काय रे ईतका वेळ कुठे होतास, विनायक नगर वरून ईथे यायला ईतका वेळ लागतो का?"
अभिचे " अरे कामात होतो" हे वाक्य पुर्ण होईपर्यंत अमोलने " घरी दोघंच होतात वाटतं.... नाही फोनवर बोलताना तुला दम लागला होता म्हणून विचारलं " असे म्हणून पुढचा टोला हाणला.
हास्याच्या गडगडाटात " अभ्याच्या या असल्या उद्योगांमुळे त्याच्या दोन्ही पोरांचे दात खराब व्ह्यायला लागलेत, मागच्या वेळेस ह्याच्या घरी गेलो तर दोन्ही पोरं बिचारी खाली पार्किंग मधे बसली होती. त्यांना म्हणलं, चला घरी जाऊ तर एकदम घाबरुन नको नको म्हणायला लागली . म्हणाली की बाबांनी चॉकलेट आणायला पाठवलं ना, की अर्ध्या तासाने घरी यायचं असं बाबानी बजावून ठेवलं आहे. त्या आधी गेलं तर आम्हाला दुसर्या खोलीत कोंडून ठेवतात....." या पुढच्या जोकने अजूनच भर पडली.
या असल्या जोक्स वर अजून काही बोललं की पुढे आपल्यावर अजूनच पडी होत राहणार हे कळल्यामुळे अभिने स्वतःच्या गोलमटोल पोटावर प्लेट ठेवून चकणा खाणार्या विनितला " बर्याच दिवसांनी भेटलास, बारीक झालास रे...,आता यापेक्षा बारीक होऊ नकोस नाही तर पुढच्या वेळेस ती प्लेट हातात धरायला लागेल" असा टोमणा मारून आपल्यावरचे लक्ष विनित कडे नेले.
" गपे पिढीजात प्रॉपर्टी आहे आपली.... तुझ्या सारख्या मोजून मापून खाणार्या, शर्ट काढला तर हाडं मोजता येतील, असल्यांना त्याचं महत्व नाही कळायचे. डिल करायला बसलं की कसं भारदस्त व्यक्तिमत्व दिसायला हवं.... तुझ्या सारख्या शेख लोकांनी वाढलेलं तेवढंच खायची सवय असलेल्या लोकांना नाही कळायचं ते" रिअल ईस्टेट एजंट असलेल्या विनितने आपल्यावर झालेला वार अभिच्या दुबईमधल्या जॉब वरुन टोमणा मारुन परतवला.
" ओ म्हात्रे अहो जरा बाकीच्यांचे पण पेग भरा" या वाक्यावर कोणी काही बोलण्याआधीच अमोलने " ए आज त्याला कोणी काही बोलू नका, आजची पार्टी त्याच्याकडून आहे. खंबे पण त्यानेच आणले आणि जेवायला पण तोच नेणार आहे. तुम्ही त्याला काय पेग भरायला सांगताय? आज तुम्ही त्याला ओंजळीने पाजायला हवी."
" अरे वा! काय विशेष ?"
" अहो अभिजित देसाई जरा त्या पुरातत्व खात्यातून बाहेर पडून वर्तमानात या" अभिच्या वर्षानुवर्षे जुन्याच वस्तू वापरत राहणे हा गृपमधे कायमचा चेष्टेचा विषय होता.
" आनंद म्हात्रेंनी नविन महिंद्रा थार घेतली, तू काय गृपवरचे मेसेज वाचतच नाहीस की काय?"
" अरे वाह ! क्या बात है..... अभिनंदन. " अभिच्या आवाजातला उपहासात्मक टोन बाकी कोणाच्या लक्षात नाही आला तरी न पिणार्या अमोलच्या मात्र लगेच लक्षात आला.
" ते गृपचे मेसे़ज सोड, घरी बापाशी तरी बोलतोस की नाही? तुझ्या बापाच्याच ओळखीने त्यांच्याच बँक मधून लोन केलंय की..."
" तू १२ लाखाची गाडी लोन वर घेतली?" अभिच्या आवाजातून आश्चर्य लपत नव्हते.
"बारा लाख काय केळ्या, टॉप मॉडेल आहे वीस लाखाचे..."
" वाह मस्त !"
" गाडीचे पासिंग झाले की पुढच्या आठवड्यात कोकणला जाऊ" या नित्याच्या वाक्याने विषय नेहमीप्रमाणे पुढे जाऊन कॅन्सल होणार्या ट्रिप च्या प्लॅनिंगकडे वळाला.
कोणाला कधी जमतंय, नोकरी करणार्यांच्या सुट्ट्या, अमोलचे दुकान कधी बंद ठेवता येईल, विनितचे शेड्यूल, ही सगळी चर्चा चालू असताना अभि अजूनही वीस लाखाची गाडी लोनवर घेतली याच स्टेशन वर अडखळला होता.
" ओ देसाई, तुम्हाला जमतंय कधी जमतंय डिसेंबरचा पहिला की दुसरा आठवडा?"
" न जमायला काय झालंय? काम काय आहे त्याला? रिकामाच तर असतो "
"पहिल्या आठवद्यात जमेल, दुसर्या आठवड्यात परिक्षा आहे माझी"
" आता अजून कसली परिक्षा? च्यायला एवढ्या डिग्र्या घेऊन काय करणार आहेस? आली की आता चाळीशी, बास की आता !"
" च्यायला तू मागच्या गेट -टूगेदरला, शाळेत तुला राखी बांधायची त्या अश्विनीशी गुलूगुलू बोलत होतास, तिचा नंबर घेऊन तिच्याशी नको नको ते चॅटींग करत बसतोस, तेव्हा नाही का आठवत तुला तुझी चाळीशी?"
अभिचा हा घाव मात्र नित्याच्या वर्मी बसला. गेट- टूगेदरच्या विषयाने गृपची गाडी शाळा, शाळेतल्या गमती, जुन्या आठवणी या कडे वळाली.
शेवटी रंगलेली पार्टी बारा वाजले तरी काही संपेना हे दिसायला लागल्यावर नित्या आणि आनंदची चुळबूळ सुरु झाली. नित्या सॉफ्टवेअर कंपनी मधे टिम लिडर तर आनंद एका मोठ्या हेवी ईंजिनिअरिंग कंपनी मधे डेप्युटी मॅनेजर होता. दोघांनाही सकाळी लवकर कामाला जायचे होते.
" चल मी निघतो." आनंदने निघायची तयारी केली.
"बस रे जाशील, एवढी काय घाई आहे?" अमोल ने त्याला थांबवायचा एक निष्फळ प्रयत्न करुन बघितला.
" तुला काय, सकाळी चार तास दुकान चालवलंस की दुपारी घरी जाऊन झोपतोस चार तास. आम्हाला तिथे कंपनी मधे साधं बसायला वेळ नसतो."
"चला मी पण झोपतो, उद्या सकाळी सकाळी क्लाएंट सोबत मिटींग आहे. तुमच्या गप्पा झाल्या की जाताना दार ओढून घ्या. " नित्याने पसारा आवरत झोपायची तयारी केली.
नेहमी प्रमाणे अभि, अमोल, विनित फक्त मागे राहीले. तिघांना कधीच कसलीही घाई नसायची. गप्पा रंगल्या की अगदी पहाटे तीन चार वाजे पर्यंत गप्पा मारत बसायचे. त्या ही दिवशी अशाच रात्री अडीच पर्यंत गप्पा मारल्यावर सगळे जायला निघाले.
" चला निघू आता.'
" तू कसा आला आहेस?"
" अॅक्टिव्हा"
" ती कार काय नुस्ता पार्किंगमधे लावायला घेतली का रे? जरा काढत जा की, रात्री अपरात्री कशाला अॅक्टिव्हावर फिरत असतो? ईथे रहायला असतास तर पाच मिनिटात घरी पोचला असतास"
अभिने बारा वर्षा पुर्वीच गावातलं घर सोडून विनायक नगरला शिफ्ट झाला होता.
" च्यायला एवढं सगळं असताना कसं रे भाड्याने रहायला जमतं तुम्हाला? का फक्त आम्हाला सांगायला भाड्याने घेतलाय? कोणाच्या नजरेत येऊ नये म्हणून विकत घेतलाय हे सांगत नाहीस? "
"भाड्यानेच राहतो रे. तिकडे गेल्यापासून तीन वेळा फ्लॅट बदलला की, स्वतःचा असता तर कशाला बदलत बसलो असतो? मुलांना शाळा जवळ पडते म्हणून तिकडे राहतो रे."
" ते ठिक आहे रे, मग तुझे एक दोन फ्लॅट विक आणि एक घेऊन टाक की स्वतःचा. चार चार ठिकाणी जागा पण घेऊन ठेवल्या आहेस बिन कामाच्या. त्यापेक्षा एक चांगला फ्लॅट घे"
" तीन कोटीच्या खाली फ्लॅट नाही तिकडे. माझ्याकडे कुठे आलेत तीन कोटी? आणि जरी असते तरी, तीन कोटीचा फ्लॅट विकत घेण्यापेक्षा पस्तीस- चाळीस हजार भाडं दिलेलं परवडतं की. "
" तुझे लॉजिक तुलाच कळतात. असो, चला आता खरंच निघू"
रात्री ८.३० ला चालू झालेली पार्टी शेवटी रात्री पावणेतीनला संपली. अभि नेहमीप्रमाणे आपली आवडती प्ले लिस्ट लावून रात्रीच्या त्या निर्जन रस्त्यावरून भन्नाट वेगाने घरी निघाला. काही केल्या त्याच्या डोक्यातून त्या कर्जावर घेतलेल्या थारचे विचार जात नव्हते.
पैशाचे झाड- भाग २ https://www.maayboli.com/node/82912
Chhan सुरुवात!
Chhan सुरुवात!
मुद्दे कळले आणि पोचले.
मुद्दे कळले आणि पोचले. पुढे लिहिलेलं सगळंच लेखावर टीका म्हणून आहे , असं नाही.
१. लेख गुंतवणूक या ग्रुपमध्ये हवा का?
२. रविवारी सकाळी नवीन लेखन करू नये. बरेचसे वाचक नसतात. सोमवारी मागे पडतं.
३. फोन बंद आहे तर हॅलो हॅलो कुठे केलं?
४. संवाद , नाट्यामय प्रसंग, विनोद न करता सरळ मुद्दे मांडले तर पोचणार नाहीत का?
मला जाणवलेलं उत्तर - हो. हे काहीतरी गंभीर , किचकट आहे. आपल्याला काय कळतंय, काय गरज आहे, म्हणून बरेचसे लोक न वाचता सोडून देतील. अजूनही बहुतेक लोक फॉर्मवर टिक केलेल्या जागी सही करणं एवढंच करतात.
५ ड्रंक ड्रायव्हिंग?
६ हा मुद्दा देवकी यांचा प्रतिसाद पहिला आल्याने सध्या सोडून दिला.
छान झाला आहे पहिला भाग.
छान झाला आहे पहिला भाग.
धन्यवाद देवकी, भरत, वीरू.
धन्यवाद देवकी, भरत, वीरू.
भरतदा,
१. लेख गुंतवणूक या ग्रुपमध्ये हवा का?>>>> गुंतवणूक विभागात लिहिण्यापेक्षा जास्त लोकांपर्यंत विषय पोचावा आणि चर्चा व्हावी यासाठी ललित म्हणून लिहिला आहे.
२. रविवारी सकाळी नवीन लेखन करू नये. बरेचसे वाचक नसतात. सोमवारी मागे पडतं. >>>> ओके
३. फोन बंद आहे तर हॅलो हॅलो कुठे केलं? >>>> बदल केला आहे.
४. संवाद , नाट्यामय प्रसंग, विनोद न करता सरळ मुद्दे मांडले तर पोचणार नाहीत का?
मला जाणवलेलं उत्तर - हो. हे काहीतरी गंभीर , किचकट आहे. आपल्याला काय कळतंय, काय गरज आहे, म्हणून बरेचसे लोक न वाचता सोडून देतील. अजूनही बहुतेक लोक फॉर्मवर टिक केलेल्या जागी सही करणं एवढंच करतात. >>>>
बरोबर. या विषयावर अनेकानेक चांगली पुस्तके उपलब्ध आहेत. पण आपल्या आजुबाजूला कित्येक जण असे आहेत की त्यांना त्या पुस्तकांचे महत्व कळलेले नाही, ती का वाचायची हे माहित नाही. याशिवाय असाही एक वर्ग आहेत की ज्यांना ती पुस्तके ज्या स्वरुपामधे लिहिलेली आहेत त्याप्रकारे ती कळणार नाहीत. त्याच पुस्तकांमधल्या अतिमहत्वाच्या संकल्पना अगदी सोप्प्यातल्या सोप्प्या भाषेत गोष्टी स्वरुपात लिहिण्याचा प्रयत्न आहे.
५ ड्रंक ड्रायव्हिंग? >>>> पार्टी साडे आठला सुरु झाली होती. रात्री पावणेतीन पर्यंत सगळ्यांची उतरली असेलच की.....
छान सुरुवात !
छान सुरुवात !