मनाचे श्लोक

Submitted by TI on 1 January, 2023 - 04:20

आईने बेसनाचे लाडू करायचा बेत केला, बेसन भाजण्याचा सुगंध घरभर दरवळला. त्या घमघमाटानेच मी इतकी खूष झाले, म्हणजे लाडू बनून ते खाण्याआधीच मला त्या दरवाळण्याने तृप्त केलं होतं. लाडू तर पोटात गेले नव्हते तरी सुद्धा कसं काय बरं मनाला इतकं बरं वाटलं? माणूस खाण्या आधी डोळ्याने अन्न खातो म्हणतात, बघायला चांगलं वाटलं तर खावंसं वाटतं म्हणून प्रेझेन्टेशनला इतकं महत्व आलय, मुळात त्याही आधी आपण मनाने ती गोष्ट केलेली असते असं मला वाटतं. माणसाच्या हृदयाचा मार्ग पोटमार्गे आहेच मुळी.
असंच परवा चक्कर मारायला म्हणून बाहेर पडलो होतो, सरळ लांब जाणारी वाट, ग्रीष्माचे दिवस त्यामुळे रखरखीत वाटावं असं वातावरण होतं. वाटेत बहाव्याचं झाड लागलं त्याचे पिवळे पिवळे गर्द झुबके बघून इतका आनंद झाला, म्हणजे अगदी सहजच मन सुखावलं. असं मुद्दाम काही प्रयत्न करून नव्हे तर नुसतं त्या पिवळ्या नाजूक फुलांमुळे मन खरंच बहरलं. रखरखीत रस्त्यावरची ती पिवळी धमक फुलं मनाला खूप मोठा आनंद देऊन गेली.
मध्यंतरी घरात अचानक एक दिवस माळ्यावरून बारीक आवाज यायला लागला आम्ही वर चढून पाहिलं तर माळ्यावर आमच्या मनीची ३ इवलीशी पिल्लं टुकटुकत आमच्याचकडे बघताना आम्ही पहिली, आत्ता आत्ता स्वतः पिल्लू म्हणून लाड करून घेणारी आमची मनी इतकी मोठी कधी झाली? तिची पिल्लं बघून इतके म्हणजे इतके आम्ही सुखावलो!
तसं पाहिलं तर हे प्रसंग काही विशेष असे नाहीत, रोजच अशा बारीक सारीक गोष्टी घडतात, कधी मनाला अल्हाददायी वाटणाऱ्या तर कधी हलकंसं मळभ आणणाऱ्या.
रोजच्या धावपळीच्या आपल्या रुटीन मध्ये मनाचे व्यायाम करायला आपण विसरूनच जातो, फिट राहण्यासाठी जिम लावतो, बाहेर व्यायाम करून येतो, डाएट तर कोणा ना कोणाचं रोजच सुरु असतं. पण मुळातच लवचिक असणारं आपलं मन फिट राहावं ह्यासाठी आपण कोणीच काहीच करताना दिसत नाही. आणि तरीही आपलं मन आपली साथ देत राहतंच. सर्दी खोकला झाला, कुठे धडपडलो तर कधी काही निमित्ताने डॉक्टर कडे जाऊन औषध घेऊन येतो, काही होत नसताना सुद्धा उगाच डॉक्टरच्या वाऱ्या करणारी मंडळी आजकाल वाढलेली बघतोय. पण आपल्यातले किती जण मनाला बरं वाटावं म्हणून प्रयत्न करताना आपण बघतो? मनाला इजा झाल्याने मदत घेणाऱ्या लोकांचे प्रमाण अगदी तुरळकच असेल.
हल्ली डिप्रेशन, स्ट्रेस असले मोठाले शब्द रोजच वापरले जातात. कामाचा ताण, लहान मुलांना अभ्यासाचा ताण, स्पर्धेचा, परीक्षांचा कसले कसले स्ट्रेस लहान मुलं सुद्धा घेताना दिसतात. ह्या सगळ्या गडबडीत लहान गोष्टीतला आनंद कमी कमी होत चाललाय असं जाणवतं. जपान, अमेरिका, युरोप सारख्या मोठया प्रगत प्रदेशात तर मानसिक अस्वास्थ्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत चाललंय. आपल्या कडेही सध्या सगळ्या वयोगटातल्या लोकांमध्ये ताणाचं प्रमाण वाढलेलं दिसतंय. रोजच्या स्पर्धेच्या, गुंतागुंतीच्या आयुष्यात जगायचं विसरून चाललोय आपण. आणि म्हणूनच पुढच्या पिढीला, लहान पणी आपण ज्या हरखून गेलेल्या, मौजेच्या गोष्टी अनुभवल्या त्याची अनुभूती करून देणं ही काळाची गरज बनली आहे.
सूर्योदय सूर्यास्त पाहणे, जंगलात मनसोक्त भटकणे, मातीत खेळणे, पहिल्या पावसाचा ओल्या मातीच्या सुगंधाने वेड लावणे, अचानक रेडिओ वर आपल्या आवडीचं गाणं लागणे, जेवायला आईने न सांगता काहीतरी छान बनवलेलं असणे, सुट्टीच्या दिवशी एखादी पायवाट पकडून मस्त भटकंती करून येणे, रस्त्यात एखाद्या कुत्र्या-मांजराने येऊन लाड करून घेणे, घरच्या मोगऱ्याला भरभरून फुलं येणे, कुडकुडत्या थंडीत बाऊलभर आईसक्रीम वर ताव मारणे, लाडक्या मित्र-मैत्रिणीं बरोबर खिदळणे, ह्या सगळ्या किती लहान गोष्टी? पण हल्ली किती दुर्मिळ झाल्यात? महागल्यात? म्हणलं तर सोप्पं म्हणलं तर कठीण.
ह्या छोट्या आनंदना जवळ करायला हवं, मनाचं मळभ दूर करायचं तर कुठे लांब न जाता आपल्या आसपासच्या गोष्टींना जवळ केलं तर खरंच आनंदाचं झाड लांब नाही. झाकोळलेल्या मनाला अधे मध्ये उभारीची गरज प्रत्येकालाच कधी ना कधी जाणवते, हवी असते. अशा वेळी मस्त वाफाळता चहा करावा, पार्ले-जीची बिस्किटं मनसोक्त त्यात बुडवून खावीत, बॅकग्राऊंडला किशोर-आशाची गाणी असावीत, तुमचा दिवस सुखाचा झालाच मग! व्यक्ती परत्वे ह्या गंमती बदलतीलही, प्रत्येकाने आपली सोनेरी किनार शोधायला हवी, काळ्या ढगांना ही किनार असावी आणि किनारीचं महत्त्व असावं, राहावं म्हणून मळभही अधून मधून अनुभवावं! तर आपली आपली सोनेरी किनार शोधा आणि एक उनाड दिवस जगून पाहा, दिवस कसा सुंदर जातो बघा.

bahawa.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

Back to top