वसतिगृहात रहात असताना चांगले, वाईट, मजेशीर असे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येतात. मलाही आले. त्यापैकी दोन गमतीशीर अनुभव लिहीत आहे. ( नावं बदलली आहेत)
इंजिनीअरिंगची चार वर्षं मी पुण्यात ’कॉट बेसिस’वर रहात होते. पहिली दोन वर्षं एका ठिकाणी आणि पुढची दोन वर्षं दुसर्या ठिकाणी.
पहिली दोन वर्षं जिथे रहात होते तिथे आम्ही पाच खोल्यांमध्ये मिळून एकूण पंधरा मुली रहायचो. माझी एक रूममेट दीपालीताई बेळगावची होती, तर दुसरी गीता नागपूरची. गीता माझ्याच वर्गात होती, तर दीपालीताई आमच्याहून चारएक वर्षांनी मोठी. ती एमबीए करत होती. ती होती मराठीच, पण तिला इंग्लिशमध्ये बोलण्याची जास्त सवय होती. अर्थात तिला मराठी कळायचं, त्यामुळे आमच्या गप्पा द्वैभाषिक असायच्या. घरमालक काका-काकू खालच्या मजल्यावर रहायचे. तेव्हा तुरळक प्रमाणात मोबाईलचा वापर सुरु झालेला असला, तरी आम्हा पंधरा जणींपैकी कुणाकडेच मोबाईल नव्हता. त्यामुळे होस्टेलवर असलेल्या एका लॅंडलाईनवर सगळ्यांचे फोन यायचे.
असाच एकदा दुपारी फोन वाजला. जिने फोन घेतला, तिने "दीपालीदीदी..." अशी हाक मारली. दीपालीताई तर नव्हती, म्हणून काही निरोप असेल तर घ्यावा, म्हणून मी जाऊन फोन घेतला.
"हॅलो?"
"हॅलो दीपाली?"
"नाही मी तिची रूममेट बोलतेय, काही निरोप आहे का?"
"तिला सांगा नगरहून तिच्या वकील मित्राचा फोन होता."
"बरं, चालेल"
"मी माझा नंबर देतो. तिला मला फोन करायला सांगा"
मी नंबर लिहून घेतला. दीपालीताई रात्री नऊच्या सुमारास यायची. रूमवर तिच्याकडे कम्प्यूटर नसल्यामुळे त्यांच्या ज्या प्रेझेंटेशनच्या असाईनमेंट्स वगैरे असायच्या, त्या ती कॉलेजमध्येच पूर्ण करून यायची. ती आल्यावर मी तिला हा निरोप सांगितला आणि फोन नंबरही दिला, पण ती म्हणाली,
"I don't have any friend in Nagar"
मी म्हटलं, फोन करून तर बघ. कदाचित कुणी शिफ्ट झालं असेल नगरला. त्यावर ती म्हणाली,
" I don't have any lawyer friend either.. चुकून केला असेल फोन कुणीतरी."
मग मीही सोडून दिलं. यानंतर काही महिने उलटले. मधल्या काळात मी या फोनबद्दल विसरूनही गेले. नंतर परत एकदा संध्याकाळी दीपालीताईसाठी फोन आला आणि मीच तो घेतला. एसटीडीचीच बेल वाजली होती.
"हॅलो?"
"हॅलो दीपाली?"
"नाही मी तिची रूममेट बोलतेय"
"दीपाली कुठे गेली आहे?"
" कॉलेजला"
"अजून आली नाही?"
"नाही ती नऊपर्यंत येईल. आपण कोण बोलताय?"
" रोज एवढ्या उशिरा येते ती कॉलेजमधून?"
"हो. आपण कोण बोलताय?"
इथे माझ्या डोक्यात शंकेची घंटा किणकिणायला लागली. दीपालीताई म्हणाली होती की तिच्या आईबाबांनी एकदोन ’स्थळं’ बघितली आहेत. त्यांच्यापैकी कुणाचा फोन तर नसेल?
" पण ती इतका वेळ कॉलेजमधे काय करते?"
" नाही मला माहिती. तुम्ही बेळगावहून बोलताय का?"
इथे पलीकडचा माणूस एकदम ॲलर्ट झाला.
"बेळगाव? का?"
" नाही, असंच. ठीक आहे, तुमचा काही निरोप आहे का?"
" नाही पण तुम्हाला बेळगावहून फोन आहे असं का वाटलं?"
" नाही, असं काही नाही, एसटीडी बेल वाजली म्हणून वाटलं. तुमचा काही निरोप आहे का?"
" नाही नाही,खरं सांगा. तिचा बेळगावला कुणी मित्र आहे का? "
अरेच्चा! मी काहीच बोलले नाही. डोक्यातल्या घंटेची घणघण जोरात ऐकू यायला लागली.
" लाजू नका. तुम्हाला जे माहिती असेल ते सांगा. तिला कुणाचे फोन येतात का बेळगावहून?"
हे शब्द ऐकून तर मला काय बोलावं ते कळेचना. शेवटी मी म्हटलं,
" नाही, मला काही माहिती नाही. ती बेळगावची आहे म्हणून मला वाटलं की बेळगावचा फोन आहे. "
" ती बेळगावची आहे असं सांगितलंय तिने? ती नगरची आहे"
"अहो नाही, ती बेळगावची आहे. दीपाली कदमबद्दल बोलताय ना तुम्ही?"
" कदम नाही. दीपाली राणे. "
"राणे? इथे दीपाली राणे नाहीये कुणी"
"असं कसं? मला तिने हाच नंबर दिला होता. मी आधीपण तिला फोन केला होता या नंबरवर"
"एक मिनिट"
मी तिथून जाणार्या एका मुलीला थांबवलं. ती माझ्याआधी एक वर्षापासून तिथे रहात होती. मी तिला विचारलं, "दीपाली राणे कौन है?"
"वो सामनेवाले होस्टेल में रहती है।"
" उसके लिये फोन है।"
"अच्छा रुक एक मिनट" असं म्हणून ती बाहेर गेली आणि तिने समोरच्या होस्टेलमधल्या एका मुलीला बोलावून आणलं. आदल्या वर्षी म्हणे समोरच्या या होस्टेलला लॅंडलाईन नव्हता, म्हणून तिथल्या मुलींचे फोनही आमच्याच नंबरवर यायचे. आता हे मला काय माहिती? दीपालीताई आल्यावर मी तिला हा किस्सा सांगितला आणि आम्ही भरपूर हसलो. मग मला तो आधी आलेला ’ नगरच्या वकील मित्राचा’ फोनही आठवला. तो हाच मुलगा असणार आणि त्याने त्याचा फोननंबर देऊनही त्या दीपाली राणेने त्याला फोन न केल्यामुळे तो अस्वस्थ झाला असणार. बिचारा! त्याच्या त्या ”लाजू नका" या वाक्यावर तर आम्ही भयंकर हसलो.
दुसरा किस्सा घडला तेव्हा मी होस्टेल बदललं होतं. मधल्या काळात मी एक दुचाकी घेतली होती. इथेही माझी एक रूममेट माझ्याच वर्गात होती, तर दुसरी रूममेट आमच्याच कॉलेजला, पण दुसर्या डिपार्टमेंटला होती. तिचं नाव होतं शालिनी. तिच्याकडेही गाडी होती आणि मोबाईलही होता. तर एकदा काय झालं, प्रिपरेशन लीव्ह चालू होती आणि मी काही झेरॉक्स काढण्यासाठी गाडीवरून कॉलेजजवळच्या एका झेरॉक्सच्या दुकानात गेले होते. माझं काम तर झालं, पण माझ्या गाडीची किल्ली कुठेतरी पडली, ती सापडेचना. खूप शोधाशोध केली, पण किल्ली मिळाली नाही. तेवढ्यात तिथे देशमुख सर आले. देशमुख सर त्याच वर्षी आमच्या कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून रुजू झाले होते. त्यांना शिकवण्याचा अनुभव नसला, तरी ते चांगलं शिकवण्याचा प्रयत्न करत. त्यामुळे त्यांच्याविषयी आमचं मत तसं बरं होतं. त्यांनी काय झालं वगैरे चौकशी केली, पण त्यांनाही काही करता आलं नाही. लॉक ॲंड की मेकरचं दुकान तिथून थोडं लांब होतं. म्हणून मी जवळच्या कॉईनबॉक्सवरून शालिनीला मोबाईलवर फोन केला. तीही लगेच आली आणि आम्ही तिच्या गाडीवरून किल्लीवाल्याकडे जाणार, तेवढ्यात झेरॉक्स दुकानदाराने त्याच्याकडची एक किल्ली देऊन म्हटलं, ही लागतेय का बघा. आणि आश्चर्य म्हणजे त्या किल्लीने चक्क हॅंडल लॉक उघडलं आणि गाडीही सुरू झाली. आनंदाने मी गाडीवर बसून शालिनीकडे पाहिलं. तिनेही तिच्या गाडीकडे जात ’ तू चल, मीपण येतेच’ असा हात हलवला. मी रूमवर पोचले, पण पंधरावीस मिनिटं झाली तरी शालिनी आली नाही. मी गच्चीवर जाऊन अजून दहा मिनिटं तिची वाट पाहिली, तरी ती आली नाही. शेवटी काळजी वाटून मी बाहेर जाऊन कॉईनबॉक्सवरून परत तिला मोबाईलवर फोन केला. ती म्हणाली, येतेच दहा मिनिटांत. मी परत रूमवर आले. पंधरावीस मिनिटांनी शालिनीही आली. आल्या आल्या ती पहिलंच वाक्य म्हणाली, " तुझी किल्ली मला बरीच महागात पडली" मी आश्चर्याने विचारलं, "काय झालं?" त्यावर तिने काय काय झालं ते सविस्तर सांगितलं. मी तिथून निघाल्यावर देशमुख सर तिच्याकडे गेले. त्यांनी तिचं नाव वगैरे विचारलं. तिच्याशी ओळख करून घेतली. त्यांनी तिला आधी कॉलेजमध्ये, बाहेर असं काही वेळा पाहिलं होतं म्हणे. ते चक्क तिला म्हणाले की तू मला आवडतेस. मी तिला जेव्हा फोन केला तेव्हा ते दोघे जवळच्या एका हॉटेलमध्ये बसलेले होते. माझा फोन आल्यावर त्यांनी तिला बजावलं की तिला (म्हणजे मला) अजिबात सांगू नको. तिथून निघतानाही त्यांनी परत परत तिला मला न सांगण्याबद्दल बजावलं होतं. कारण मी जर आमच्या वर्गात किंवा त्याहून वाईट म्हणजे एचओडींना वगैरे हे सांगितलं असतं, तर त्यांची चांगलीच पंचाईत झाली असती. शालिनीने मात्र आम्हा दोघींना हे सर्व सांगून टाकलं . तिला त्यांच्यात अजिबात रस नव्हता, पण ती तशी भिडस्त स्वभावाची असल्यामुळे ती हे थेट त्यांना सांगू शकली नव्हती. तिचं डिपार्टमेंट जरी वेगळं असलं, तरी शेवटी आम्ही एकाच कॉलेजमध्ये होतो. देशमुख सरांनी तिचा मोबाईल नंबर घेतला होताच. ते तिला अधूनमधून फोन करायचे, कॉलेजमधेही तिच्याशी बोलायचे. दोन तीन महिने हा प्रकार चालला असेल. मी आणि माझ्या दुसर्या रूममेटने (जी माझी क्लासमेटही होती) हे आमच्या वर्गात कुणालाच सांगितलं नाही. शालिनीला तसा देशमुख सरांचा काही त्रास नव्हता, पण तिलाही हे थांबलं तर हवंच होतं. माझा अंदाज असा होता की त्यांनी तिला फोन केला आणि मी तो घेतला तर हे थांबेल. पण तशी संधी येत नव्हती. शेवटी एकदा तशी संधी आली. पण मी फोन उचलताच त्यांनी फोन कट केला. मी लगेच परत त्यांना फोन केला आणि अगदी नॉर्मल आवाजात म्हटलं की सर, शालिनी जरा बाहेर गेली आहे. काही निरोप आहे का? त्यांनी थातुरमातुर काहीतरी निरोप सांगितला आणि फोन ठेवला. परत त्यांनी कधीही शालिनीला फोन केला नाही आणि कॉलेजमध्येही तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला नाही. नंतर कॉलेजमध्येही आम्ही त्यांच्याशी आणि ते आमच्याशी, जणू काही झालंच नाही अशा प्रकारे वागत राहिलो. पुढच्या वर्षी त्यांचं लग्नही झालं आणि हा सगळा विषयच संपला!
तुमचेही असे काही हलकेफुलके अनुभव असतील तर जरूर लिहा.
हो
हो
असं करतात.बारावीत आमच्या सोसायटीत घरं समोरासमोर असल्याने 'तुझा लाईट 2 पर्यंत चालू होता, माझा 12 पर्यंतच वगैरे खूप चालायचं.मग लोक समोरून दिसणार नाहीत अश्या खोलीत खरा अभ्यास करून दिसेल अश्या खोलीत 12 पर्यंत लाईट लावणे वगैरे युक्ती पण करायचे.
समोरून दिसणार नाहीत अश्या
समोरून दिसणार नाहीत अश्या खोलीत खरा अभ्यास करून >>
खरंच, एवढा गुंतागुंतीचा विचार कशाला करायचे काय माहिती. याची एक बाजू अशीही आहे की आपण अभ्यास करतोय असं दिसल्यावर 'तू काय बाबा सिन्सिअर,' 'टॉपर येणार का यावेळी', 'मी नाही बाबा पीएलशिवाय पुस्तकांना हात लावत' असं ऐकवणारेही असतात.
३ ईडीयट्स मधला चतुर नाही का,
३ ईडीयट्स मधला चतुर नाही का, पॉर्न ची पुस्तकं टाकतो मुलांना लक्ष विचलित करण्या साठी..
असतात असे कॉलेज ला कायम च असायचे १-२ तरी
म्हणजे पार्श्वभुमी तयार करून ठेवायची की मार्क्स कमी पडले तरी म्हणता येतं की मी तर खूप च कमी केला होता अभ्यास.
हाहा भारी किस्से आहेत.
हाहा भारी किस्से आहेत. हाॅस्टेल लाईफ कधी अनुभवले नाही पण काही मैत्रिणी ज्या होत्या राहणा-या त्यांच्या रुमवर अधेमधे अभ्यासाला जाणे व्हायचे एक्झाम टाईम मधे, तेव्हा असेच काही गोष्टी अनुभव त्या सांगत.
खरंच, एवढा गुंतागुंतीचा विचार कशाला करायचे काय माहिती >>> असतात असे बरेच जण. त्यांना आपला अभ्यास कधीच दाखवून द्यायचा नसतो, मला काही येत नाही असं भासवायचं पण मार्क्स आले की डायरेक्ट टॉपर. दुसऱ्यांनी आपली मदत घेऊ नये किंवा घेऊन आपल्या पुढे जाऊ नये हीच मेंटॅलिटी असावी.
गुंतागुंतीचा विचार>>> खरंय.
गुंतागुंतीचा विचार>>> खरंय.
पण अभ्यास झालाय म्हटलं तर "नोट्स दे ना...." म्हणून आपल्या अभ्यासाचा निव्वळ गैरफायदा घेणारे महाभागही असतात. स्वानुभव आहे. पटकन "नाही" म्हणता येत नाही अशांसाठी तर हे फारच त्रासाचं होतं. मी डिप्लोमा करून थेट सेकंड यिअर ला आले होते, काही विषयात मला जास्त गती होती तर होस्टेलवर असताना काही लोकल मुली पीएल मधे रहायला आल्या (घरी खूप डिसट्रॅक्शन होतं म्हणून) आणि माझा फुकट वेळ खाल्ला. अभ्यास झालाय असं चुकून बोलून गेल्याचे परिणाम!
धागा आणि प्रतिसाद एक से एक.
धागा आणि प्रतिसाद एक से एक.
खूप काही आहे या धाग्यावर लिहिण्यासारखे. आता कधी वेळ मिळतो बघू.
नक्की लिहा अतुल
नक्की लिहा अतुल

कोकिलकूजन वगैरे थोड्या प्रमाणात मंजुळ वाटतं, पण सतत तो आवाज ऐकला की राग यायला लागतो कोकिळांचा
पुण्यात कोकिळ जरा जास्तच आहेत आणि!
ती सिंहगड ट्रिपही मस्त झाली होती.
प्रज्ञा
आमच्या घरमालकीण काकू उन्हाळ्यात गच्चीवर झोपायला यायच्या. आम्हीही एकदा गच्चीवर झोपून बघितलं आणि ते फारच आवडलं. मग रोज गच्चीवरच झोपायला लागलो.
झोप चांगली लागायची पण पहाटेपासून कोकिळांच्या आवाजाने वैताग यायचा
शेवटच्या वर्षाला असताना एकदा आम्ही काही होस्टेलवरच्या मैत्रिणी आणि काही वर्गातल्या मैत्रिणी अशा मिळून सिंहगडावर गेलो होतो. तेव्हा सकाळी लवकर उठून एकत्रच जाण्यासाठी लोकलाईट मैत्रिणी आमच्याकडे आदल्या दिवशी रहायला आल्या होत्या. तेव्हा सगळ्या गच्चीवर झोपलो होतो. खूप मजा आली होती
विशाखा तुम्ही धाग्यात
विशाखा तुम्ही धाग्यात लिहिलेले किस्से हलकेफुलके आहेत खरे. पण त्याची गंभीर बाजू सुद्धा जाणवली. पहिला फोन कॉलचा किस्सा. अशाच गैरसमजातून काहीजण, मुलींना नाहक त्रास देतात. नशीब कि तुम्ही त्याला तो चौकशी करीत असलेल्या मुलीचे पूर्ण नाव विचारून त्याचा गैरसमज दूर केला. अन्यथा त्या दुसऱ्या मुलीवर संशय घेऊन त्याने तिला नाहक त्रास दिला असता. दुसऱ्या प्रसंगात सुद्धा त्या लेक्चरने केलेली कृती, मुलीला एकटीला अडवून "तू आवडतेस" वगैरे म्हणत जबरदस्ती हॉटेलात घेऊन जाणे आणि नंतर फोन करत राहणे वगैरे. एखाद्या लेक्चररकडून हे indecent वर्तन वाटले.
रात्री उठून अभ्यास करण्याचे
रात्री उठून अभ्यास करण्याचे किस्से वाचून मला माझा एक किस्सा आठवला. तसा छोटा आहे पण त्यातल्या विनोदाच्या टायमिंग मुळे अजून लक्षात राहिला.
पुण्यात अगदी सुरवातीला हॉस्टेलवर मी आणि माझा मित्र असे आम्ही दोघेच रूमपार्टनर होतो. आम्हा दोघांचा सेन्स ऑफ ह्युमर प्रचंड मिळताजुळता होता. त्यामुळे आमच्यात गंभीर असे प्रसंग कधीच उद्भवले नाहीत. याउलट, दीर्घकाळ लक्षात राहतील असे विनोदी किस्सेच घडायचे एकापेक्षा एक
एकदा असे झाले कि मला रात्री जाग आली. पुन्हा झोप यायचे नाव नाही. अशी कधीही रात्री-बेरात्री जाग आली आणि पुन्हा झोप लागतंच नसेल तर मी उठून थेट वाचत बसायचो. त्याची झोपमोड होऊ नये म्हणून रूममधला लाईट लावण्यापेक्षा माझ्यापुरता टेबललॅम्प लावून बसायचो. त्या रात्री सुद्धा असंच टेबललॅम्प लावून वाचत बसलो होतो. थंडी वाजते म्हणून अंगावर पांघरून आणि डोक्याला कानटोपी असा अवतार होता. अचानक, त्याला कशामुळेतरी जाग आली. आणि टेबललॅम्पच्या अर्धवट प्रकाशात मला तसे बसलेले पाहून तो एकदम घाबरला. अर्धवट झोपेत डोक्यावरचे पांघरून बाजूला फेकून घाबरून माझ्याकडे बघू लागला. पण काही क्षणातच त्याच्या लक्षात आले तो मी आहे. तरीही त्या स्थितीत सुद्धा त्याचा सेन्स ऑफ ह्युमर जागृत होता. मला म्हणाला, "अतुल तूच आहेस होय? मला वाटले रात्री रुममध्ये येऊन कोण चोरून वाचून जातंय कि काय"
ते ऐकून मला प्रचंड हसू फुटले. दोघेही हसू लागलो. इथे आपापली अभ्यासाची पुस्तके/नोट्स आपल्यालाच वाचायला जीवावर येतंय. आणि कोणी बाहेरून रात्री येऊन चोरून ती वाचून जाणे ही कल्पना म्हणजे कहर होता
होस्टेलवर राहत असताना
होस्टेलवर राहत असताना लिहिलेली कविता. आज गाऊन रेकॉर्ड केली
होस्टेल लाईफची तीन मिनिटात झलक:
https://www.youtube.com/watch?v=z-lK75HGenI
मस्त कविता आहे अतुल तुमचा
मस्त कविता आहे अतुल
तुमचा आवाजही छान आहे. तुम्ही गाता का रेग्युलरली?
वरचा किस्साही मस्त!
मी लिहिलेले अनुभव गंभीर नाहीत पण गंभीर होण्याचं पोटेन्शियल त्यांच्यात होतं हे बरोबर. सुदैवाने फार गंभीर अनुभव मला तरी आले नाहीत. थोडेफार ताणतणाव, गैरसमज वगैरे झाले कधीकधी. दुरून काही गंभीर प्रसंग ऐकलेही. पण हा धागा हलकाफुलक्या अनुभवांसाठीच काढलाय.
धन्यवाद विशाखा. अधूनमधून हौस
धन्यवाद विशाखा. अधूनमधून हौस म्हणून गातो. लॉकडाऊनच्या काळात जरा जास्तच सवय लागली
अजून
अजून
Pages