झोका....!! ( भाग-३) अंतिम
__________________________________________
" मी शितल मॅडम..!!" शितल आत येत उत्तरली.
चित्रगंधाच्या प्रश्नाने शितल चकीत झाली. शितल चित्रगंधाची मॅनेजर होती.
" ये..!" चित्रगंधा ओशाळली.
" तब्येत बरी आहे ना तुमची..??" शितलने काळजीने विचारले.
" मला कसली धाड भरलीय्..!'" चित्रगंधा खिडकी बाहेर बघत म्हणाली.
शितलला वाटले, आजकाल मॅडम जरा तिरसटपणांनी वागू लागल्यात. गेल्या काही दिवसांपासून त्यांचं कामात पूर्वीसारखं लक्ष नसतं.
" निखिल सरांचा फोन होता..!!"
" बरं..! का केला होता निखिलने फोन ..?"
"उद्या डहाणूला जायचं आहे असं म्हणत होते... काही सीन शूट करायचे आहेत त्यांना तिथे...!"
" कुठे जायचंय् म्हणालीस..??" चित्रगंधा विस्मयचकीत होत म्हणाली.
" डहाणूला .. मॅडम..!!"
" अचानक ठरलं का डहाणूला जायचं..? ते शुटींग तर वसईला होणार होते ना..?"
" हो मॅडम, पण निखिल सरांना पुढे उंबरगावच्या
स्टुडीओत काही काम आहे म्हणून डहाणूला जायचं ठरवलंय् त्यांनी ...!"
" बरं..!" असं म्हणत चित्रगंधाने दिर्घ श्वास घेतला.
" शूटिंग आटपलं की, संध्याकाळी मुंबईसाठी निघायचं आपण..!" डायरीत पहात शितल म्हणाली.
" नाही मी येणार नाही ... थांबेन मी तिथे एक दिवस ..!"
"पण मॅडम दोन दिवसांनी आपलं पुढचं शेडयुल लागणार आहे फिल्मसिटीमध्ये..!"
"मी येईन परत दुसऱ्या दिवशी..!"
" मग मी थांबते तुमच्यासोबत तिथे..!"
" नको, मी एकटीच थांबेन. काही लागलं तर तुला फोन करेल मी.. काळजी करू नकोस ... मी मुंबईला दुसऱ्या दिवशी परतेन..!"
शितल थोडा वेळ तिथेच घुटमळली. विचार करून सुद्धा तिला चित्रगंधांच्या मनाचा थांग लागला नाही.
" तू निघ आता..!" उष्ण कोरडा श्वास सोडत चित्रगंधा म्हणाली.
दुसऱ्या दिवशी शुटींग आटपल्यावर चित्रगंधा डहाणूलाच थांबली.
कारण ...?
कारण एकच.....! जो कटू भूतकाळ ज्या गावात सोडून पंधरा वर्षांपूर्वी ती मुंबईला आली होती , ते तिचं आजोळचं गाव तिथून जवळच होतं.
पंधरा वर्षांपूर्वी घेतलेली शपथ ती आज मोडणार होती. आजोळच्या गावी जाऊन कडू- गोड ज्या काही जुन्या आठवणी होत्या, त्यांना ती उजाळा देणार होती.
आजीची भेट घेणार होती ... जमलं तर सुनिलची सुद्धा... !
ती माफी मागणार होती दोघांची..!
तिला वाटलं, गेल्या आठ - दहा दिवसांपासून जाणवणारी बैचेनी, अस्वस्थता त्यामुळे कदाचित कमी तरी होईल.
तिथे जाण्यास तिची पावले आतुर झाली होती खरी , मात्र आता ती पंधरा वर्षांपूर्वीची निराश , अगतिक ' चित्रू' नव्हती. ती आता प्रसिद्ध 'नटी चित्रगंधा' होती.
आपल्या चेहर्यावरचा मेकअप उतरवत चेहरा पूर्ण झाकून घेत आजोळच्या गावात जाणारी एस्टी तिने पकडली.
तिला आपली खरी ओळख कुणासमोरही उघड करायची नव्हती.
ती ' चित्रू' म्हणूनच तिथे जाणार होती.
" रानशेत आलं मॅडम.. उतरा ..!" कंडक्टरच्या
हाकेने आणि ड्रायव्हरने करकचून मारलेल्या ब्रेकच्या आवाजाने ती भानावर आली.
एस्टी थांबली.. भरदुपारी ती एकटीच एस्टीतून उतरली. एस्टीतून उतरल्याक्षणीच उन्हाचा भयंकर तडाखा तिला तिथे जाणवला.
तिने इकडे तिकडे पाहिलं. गावात जाणारी सडक पक्की झाली होती. बस थांब्यावर आप्पा देसाईच लहानसं पत्र्याचे शेड असणारं टपरीवजा दुकान अदृश्य झालं होतं. तिथे विटा - सिमेंटने बांधलेलं पक्कं दुकान होतं आणि त्याच्यावर पाटी होती 'आप्पा जनरल स्टोअर' ..! दुकान बंद होतं. आप्पा बहुतेक दुपारी दुकान बंद ठेवत असणार, तिच्या मनात विचार आला.
रस्त्याच्या कडेला जुने आंब्याचे झाड होते. पूर्वी ते तिथेच होते पण आता त्या झाडाभोवती पार बांधलेला होता.
तिने पाहिलं कोणीतरी पारावर बसलेले होते.. एकटेच.. डोक्याला फडके बांधलेले..!!
कोण असेल..??
ह्याक्षणी कुणाची कुणाला ओळख असण्याची काहीच शक्यता नव्हती. गेली पंधरा वर्षे ती इथे आली नव्हती. कदाचित नटी चित्रगंधा म्हणून तिला ओळखलं असतं ही... मात्र पंधरा वर्षापूर्वीची ' चित्रू' म्हणून कोणी ओळखेल की नाही कोण जाणे..!!..
ती चालत पुढे आली. क्षणभर पारासमोर थांबली. तिला थकवा आला होता. ती पारावर बसली. बसल्या- बसल्या तिने हळूच एक दृष्टिक्षेप पारावर बसलेल्या व्यक्तीकडे टाकला.
त्या व्यक्तीचा चेहरा उन्हातान्हात फिरल्याने करपलेला होता. डोळ्यांपाशी , ओठांपाशी सुरकतलेला होता. डोळे विझलेले, निष्प्राण होते.. तिला त्या व्यक्तीची दया आली.
चेहरा तर ओळखीचा वाटतोय् पण आपल्या लक्षात कसा येत नाहीये.. चित्रगंधा विचारात पडली.
" चित्रू, तू आलीस ...?"
अचानक त्या व्यक्तीचा प्रश्न कानावर पडल्याने चित्रगंधा दचकली.
" कोण.. कोण तुम्ही..??"
" मी सुन्या गं... तुझा सुनील..!" तिला तो आवाज चमत्कारिक भासला.
पावसात भिजल्या पाखरागत पारावर बसलेली ती व्यक्ती म्हणजे दुसरं -तिसरं कुणीही नसून आपला जिवलग बालमित्र सुनिल आहे हे कळल्यावर तिच्या काळजात कुठेतरी लखलखल्यासारखं झालं.
गेल्या पंधरा वर्षात सुन्या जराही तिच्या स्मरणात नव्हता. दोन दिवसांपूर्वी डोक्यातल्या गोंधळाने त्याला अनपेक्षितपणे स्मृतीत आणलं आणि आज अचानक हा असा तिच्यासमोर उगवला..!!
गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या स्वप्नांची आठवण तिला याक्षणी झाली.
किती चमत्कारिक योगायोग म्हणावा..!!
कुणीतरी आपल्याला साद घालतंय् , आपली आठवण काढतंय् असं आपल्याला सतत वाटते काय आणि मग योगायोगाने आजोळच्या गावाजवळ चित्रीकरणासाठी आपण येतो काय... इथे येऊन पाहतो तर सुनील अचानक ह्या पारावर भेटतो काय ...सगळंच कसं चमत्कारिक..!!
तिला वाटलं आपलं आयुष्य चमत्कारांनी भरलेले आहे हे निश्चित..!!
"किती वाट पाहायला लावलीस तू..?? पण मला खात्री होती एक ना एक दिवस तू नक्की येशील ..!" थरथरत्या आवाजात सुनिल म्हणाला.
" सुन्या, मी तुला ओळखलंच् नाही रे..!" तिच्या आवाजात दिलगिरी होती.
"कसं ओळखशील ..?? आता मोठी सिनेमा नटी झाली आहेस ना तू...!" तो क्षीण हसला.
तिने उत्तर दिले नाही. त्याच्या बोलण्याने तिच्या मनात अपराधीपणाची भावना आकार घेऊ लागली.
"गेले दहा दिवस झाले , मी रोज इथे पारावर येऊन बसतो ...तुझी वाट पाहत..!" असं म्हणता - म्हणता त्याचा आवाज एकदम कापला.
" सुन्या तुझी काय ही दशा झालीये रे..!" त्याचा अवतार पाहून चित्रगंधाला गलबलून आलं.
" नशिबाचे भोग..!" तो विचित्र हसला.
" काय झालं सुनील ...??" तिने काळजीने विचारलं.
" तुला आमराई आठवते का गं चित्रू..?" अचानक सुनीलने विषय बदलला.
"कशी विसरेन मी ...!"
" तू मला वचन दिलं होतं तिथे, आठवते ना तुला..?? मला सोडून जाणार नाहीस अशी शप्पथ घेतली होतीस तू....पण तू गेलीस .... खूप वाट बघितली मी तुझी..! पण मला खात्री होती, एक ना एक दिवस तू नक्की येशील मला भेटायला..!!"
त्याच्या ह्या बोलण्यावर चित्रगंधा साफ ओशाळली.
त्याने तिच्यावर ठेवलेला भरवसा साफ खोटा ठरला होता.
तिच्या वाटेकडे डोळे लावून जेव्हा तो बसला होता, तेव्हा ती वैभवाच्या गादीवर आरामात लोळत होती. यशाच्या, वैभवाच्या धुंदीत , कधी देवदत्तसाहेबांच्या तर कधी अनिकेतच्या मिठीत ती सगळा वेळ त्याला पार विसरून गेली होती.
__आणि सुन्या ..??
तो मात्र पार खुळ्यागत तिची वाट पाहत राहिला होता.
आयुष्याच्या झुल्यावर दोघांना एकत्र झोके कधीच घेता येणार नव्हते हे लक्षातच न घेता ...!
चित्रगंधाच्या डोळ्यात पाणी जमा झाले.
तिला वाटलं, ह्या खुळ्या पोराने आपल्या हृदयात कसल्या कसल्या गोष्टी जपून ठेवल्या आहेत कोण जाणे..!!
" विसरलीस ना ..?" त्याच्या आवाजाने ती भानावर आली.
" नाही.. नाही विसरले रे मी...!" तिची जीभ हे बोलताना अडखळली.
तो क्षीण हसला.
चित्रगंधाने लहानपणी वचन दिलं होतं हे खरं होतं, पण भावनेच्या भरात मनुष्य वाहवत जातो आणि काहीही वचन देऊन बसतो... ज्या वयात पूर्ण समजही आली नव्हती त्या वयातल्या अजाण शब्दांवर त्याने एवढं अवलंबून राहावं..???
तिला त्याच्या भाबड्या आशावादावर हसू आलं. तिला देवयानीची आठवण आली. तिला तो मूर्खपणाच वाटला.
' चल आमराईत जाऊया ...!!" आपलं क्षीण शरीर सांभाळत जागेवरून उठत तो म्हणाला.
" आजीची भेट घ्यायची आहे ..!" चित्रगंधा उठत म्हणाली.
" आजी ह्या जगात नाही चित्रू..!" त्याने असं म्हटल्यावर आजीच्या आठवणीने तिला हुंदका फुटला.
" तू घर सोडून गेलीस आणि बिचाऱ्या म्हातारीने खाट धरली..!"
"__ आणि मामा..??" तिने अश्रू पुसत विचारले.
" तुझा कंस मामा ...?" एकदम विचित्र हसत सुन्याने प्रतिप्रश्न केला.
"हो ..!" त्या परिस्थितीतही तिला हसू फुटलं.
" ढगात पाठवलं त्याला..!!" तो विचित्र हसला.
" कोणी ..??" भयचकीत होत ती शहारली.
" मी..!!" पुन्हा एकदा तो विचित्र हसला.
" गंमत करतोयस् का माझी....?" तिने अविश्वासाने त्याच्याकडे पाहत म्हटलं.
तिला त्याचं बोलणं खरं वाटलं नाही.
" खोटं का सांगू..?" त्यानेच उलट प्रश्न तिला केला.
" काय झालं ते सांग..!" तिची छाती अनामिक भीतीने धडधडू लागली.
" कसं सांगू आणि काय सांगू..?
" जे घडलं ते खरं खरं सांग..!"
" आमची अक्का माहित आहे ना तुला..!"
" हो , तुझी आई ..!"
"सावत्र ..!" पुन्हा एकदा तो विचित्र हसला.
" हं..!" तिने हुंकार भरला.
" तिच्या अंगावर हात टाकत होता दुःशासन ...सावत्र असली तरी नात्याने आईच ना माझी.. मी डोळ्यासमोर कसं सहन करणार ..?? "
" पुढे..?" तिने दीर्घ श्वास घेत विचारलं.
"फळीला अडकवलेला कोयता उचलला आणि मग एक घाव दोन तुकडे..!" त्याचे निष्प्राण , कोरडे डोळे अचानक वीज चमकल्यासारखे चमकू लागले.
चित्रगंधा क्षणभर स्तब्ध झाली. त्याच्या बोलण्याने तिच्या अंगावर सरसरून काटा आला.
" नंतर..??" तिचा आवाज भलताच कापू लागला.
" नंतर काय होणार... गेलो तुरुंगात खडी फोडायला..!" त्याचा स्वर फारच कडवट झाला होता.
तिने त्याच्याकडे पाहिलं. बोलून - बोलून खूप थकला होता तो..!
तिला आठवलं , पूर्वी अत्यंत सहनशील , अबोल , शांत असणारा सुन्या आज अचानक खुनी म्हणून समोर उभा कसा काय राहिला..?
खरंतर हे सगळं त्याच्या तोंडून ऐकून ती प्रचंड भेदरली होती.
काही न बोलता त्याच्यासोबतीने ती चालू लागली , पण प्रत्येक पाऊल पुढे टाकताना तिला अडखळल्यासारखं झालं.
" मी तुरुंगात गेलो आणि धक्का बसलेल्या बापूचं प्यादं पटावरून नियतीने अलगद उचललं, बापू गेले आणि माझा उरलासुरला आधार सुद्धा हरपला..!" तो विषण्ण हसला.
" खूप वाईट झालं ..!" ती हळहळली.
" तुझी खूप आठवण आली चित्रू, तू जवळ असायला हवी होतीस त्यावेळेस.. असं बऱ्याचदा वाटलं..!!"
चित्रगंधा निरुत्तर झाली.
दोघे रस्त्याने चालत असताना समोरून एक कोवळं पोर सायकलवरून उलट्या दिशेला गेलं...
चित्रगंधाकडे विचित्र नजरेने पाहत पुढे जाऊन काही क्षण रस्त्यात ते पोरं थांबलं.
आपण एका खुनी माणसांसोबत चालतोय् हे पाहून त्या पोराला नक्कीच धक्का बसला असणार ..तिच्या मनात विचार आला.
ऊन्ह वाढत चालले होते. रस्त्याने चालताना मध्येच लांबून माडाचं बन दिसू लागलं ... बाजूला भरनाळीचा ओढा होता. भरदुपारी ओढ्यावर माणसं जमली होती.
" माणसं जमल्यात तिथे..!" लोकांची गर्दी पाहून तिने विचारलं.
" हो , चालू असेल एखाद्याचा दशक्रिया विधी तिथे.. कावळा शिवला नसेल पिंडाला , मग थांबले असतील वाट पाहत... कधी शिवेल कावळा पिंडाला म्हणून... नाही तर भटजी तयारच असतील दर्भाचा कावळा बनवून पिंडाला शिवायला..!" भकास हसत तो म्हणाला.
ती शांत राहिली.
" एखाद्याला जिवंत असताना कावळ्याच्या चोचीने टोचायचं आणि मग मेल्यावर पिंडाला कावळा शिवावा म्हणून प्रार्थना करायची .. एखाद्याच्या मयतावर दुःखाची गाणी गाणारा हा ढोंगी समाज आहे...!" त्याच्या बोलण्यात अत्यंत कडवटपणा भरलेला होता.
ती काही न बोलता चालू लागली.
" पुढे काय झालं ऐकायचं आहे चित्रू तुला..?" त्याने शांततेचा भंग करीत विचारले.
" काय झालं पुढे..?" तिच्या चेहर्यावर प्रश्नचिन्ह आले.
" मी तुरुंगातून सुटून आल्यावर अक्काने माझ्याविरुद्ध कट करायला सुरुवात केली..!"
" कारण...???" तिला हे धक्कादायक वाटलं
ती क्षणभर जागेवर थांबली.
" कारण___ कारण बापूची दहा एकर जमीन आणि घर ... जे तिला आपल्या भावाच्या नावावर करायचे होते...!"
" पण कायद्याने त्यावर तर तुझा हक्क आहे ना...!"
" पण तो हक्क मला मिळू द्यायचा नव्हता ना तिला..!"
" मग...??"
" मग काय, तिच्या भाचीला तिने आमच्या घरी आणून ठेवलं.. मला शह द्यायला..! आत्या-भाची दोघी जणी मिळून माझ्यावर भलतेच आरोप करायला लागल्या .. ..!" त्याचा स्वर अत्यंत भकास वाटू लागला.
" आरोप..?? कसले..??"
" सांगायला शरम वाटते चित्रू, तुझा विश्वास बसणार नाही... कसं सांगू तुला..?" त्याच्या निष्प्राण डोळ्यांत पाणी जमा झाल्याचा भास तिला झाला.
" एक दिवस सकाळी उठताच तिच्या भाचीने मी तिच्या अंगावर हात टाकला म्हणून कांगावा सुरु करत अख्खं गावं दारात जमा केले...!" त्याचा स्वर शरमेने क्षीण झाला होता.
" क्काय..?" चित्रगंधाची पावले जमिनीला खिळली.
" अख्ख्या गावाने मला वाळीत टाकलं गं चित्रू..!" तो रडवेला झाला.
तिला हे ऐकून खूप वाईट वाटलं.. त्याच्या सावत्र आईचा संताप आला.
तिला वाटलं, आपल्या स्वार्थासाठी माणसं कुठल्याही थराला जातात.. मात्र क्षणभर ती आपल्या ह्या विचारांवर थबकली...
त्याच्या सावत्र आईला दोष देण्याचा आपल्याला तरी कुठे अधिकार आहे... आपणही स्वार्थासाठी खालचा थर कधीतरी गाठला होता... !!
" चित्रू...!!"
" अं...!" सुन्याच्या हाकेने ती भानावर आली.
" तुला सांगायला लाज वाटते मला, पण अक्काचं आणि तुझ्या मामाचं अनैतिक नातं होतं.. ते मागाहून कळलं मला... त्यादिवशी अनपेक्षितपणे मी घरात आलो आणि समोर जे दिसलं ते खरं वाटलं... आपली अब्रू झाकायला तुझ्या मामावर आळ घेतला अक्काने ... आणि माझ्या हातून संतापाच्या भरात त्याचा खून झाला...!"
" तुझ्या हातून गुन्हा घडला ते वाईटच झालं पण तो त्या लायक होताच..!" तिने त्याची समजूत घालत म्हटलं.
" चित्रू, तुझ्याशिवाय मला समजून घेणारं कुणीही नव्हतं गं... !! अगं, काय सांगू तुला.. काय - काय भोगलंय् मी...! कधी गावातल्या रस्त्यावरून चालत निघालो, तर मला पाहून पोरी-बाळी आपल्या खांद्यावरचा पदर सावरू लागायच्या, घराच्या ओट्यावर बसलेल्या असतील तर उठून घरात पळायच्या, दार लावून घ्यायच्या.. मी इतका बेशरम आहे असं वाटतं तुला...??" त्याच्या खप्पड गालावरून अश्रू ओघळू लागले.
" नाही... नाही... तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे.. तू वाईट कधीच वागू शकणार नाहीस..!" तिला त्याची समजूत कशी घालावी तेच कळेना..
त्याच्या तोंडून हे सारं ऐकून मात्र ती सुन्न झाली.
" आता मी आलेय् ना परतुन .. सगळं ठिक होईल बघ..!"
त्याची समजूत घालत ती म्हणाली.
" पुन्हा सोडून जाणार नाहीस ना मला...!"
" नाही.. कध्धीच नाही....!"
" खरंच्..!" त्याचे निष्प्राण डोळे चमकू लागले.
" अगदी खरं.. तुझी शप्पथ..!" तिने आपल्या गळ्याला चिमटा घेत म्हटलं.
हं..!" त्याने आपल्या क्षीण आवाजात हुंकार भरला.
रस्त्याने चालता - चालता आमराई लागली.
आमराईतल्या आंब्याच्या झाडांच्या रांगा, तिथली मातट जमीन, त्या जमिनीतून उगवलेलं हिरवं, ताजं गवत, दूरवर तरंगणारा रानमोगऱ्याचा सुगंध , आमराईतला एकुलता एक; एखाद्या नवथर तरुणीसारखा सळसळणारा पिंपळ... हे सारं पाहून तिचा जीव वेडावला.
भूतकाळातलं आमराईतलं बालपणाचं चित्र डोळ्यांसमोर तरळलं... मागचं सारं आठवून तिच्या मनात सुनिल बद्दल अनुकंपा दाटून आली.
रानमोगर्याच्या सुगंधाने तिचा जीव भारावला. कित्ती तरी वर्षांनी तो सुगंध ती अनुभवत होती. तिथल्याच एका आंब्याच्या वृक्षाला झुला टांगलेला होता.
भान हरपल्यागत ती झुल्याकडे धावली. तिच्याही नकळत झुल्यावर बसून ती हळूवार झोके घेऊ लागली. झोके घेताचं तिचं शरीर सुखावलं.. शिथिल झालं.
" पुन्हा झोक्यांचा खेळ न खेळण्याची शपथ मोडलीस तू चित्रू .!" सुनिलचा आवाज खोल दरीतून आल्यासारखा आमराईत घुमला.
" असू दे, सुन्या... आज मोडूया आपण ती शपथ... जुना आनंद परत मिळवायचायं मला..!!"
तो पुन्हा एकदा विचित्र हसला.
" मला झोका घाल ना सुन्या..!"
" हो, घालतो..!"
" आणि तुझ्या गोड आवाजात गाणंही म्हणं बरं... मला आज ऐकायचंय तुझं गाणं...!"
" हो..!" तो क्षीण हसला.
एक झोका तुझा .. एक झोका माझा...
वेड लावी खुळ्या जीवास...
एक झोका तुझा ... एक झोका माझा...!
झुल्याला अलगद हेलकावे देत गोड पण क्षीण आवाजात सुन्या गाऊ लागला..
धरी डोईवरी प्रेम सावली...
खोल आभाळाची ती निळाई...
झोका घाली सखा तो बावरा...
वाटे त्यास नव्या भेटीची नवलाई...
तिला वाटलं, हा स्वर त्या सुन्याचा नाही .. ज्या स्वरात पूर्वी अवखळपणा , निरागसता भरलेली होती... तो स्वर बदललायं त्याचा.. नक्कीच्.... !
की मग आपला सुन्याच बदललाय् ..??
त्याच्या गीतात, स्वरात तिला वेदना , आर्तता जाणवू लागली.
ओढ लागे नव्या भेटीची खुळ्या जीवास...
सखे, झोका गेला तुझा उंच आकाशी...
वेड्या स्वप्नांची बांधूनी गाठोडी ...
जपूनी राखली मी अपुल्या उशाशी...
त्याच्या आर्त स्वरातलं गाणं ऐकता - ऐकता तिचे डोळे पाणावले. तिने डोळे मिटले. हरवलेलं काही तरी तिला गवसू पाहत होतं. तिला काही काळ तंद्री लागली.
एक झोका तुझा .. एक झोका माझा...
वेड लावी खुळ्या जीवास...
एक झोका तुझा ... एक झोका माझा...!
तिने डोळे उघडले. मात्र तिला सुन्या आजूबाजूला कुठेही दिसेना. ती घाबरली.
ती सुन्याला हाक घालू लागली. पण त्याचा कुठेही मागमूस नव्हता.
अचानक वातावरणात बदल झाल्यासारंख् तिला जाणवलं.
मघासपासून नवथर थरथरणारा पिंपळ अचानक वेगाने सळसळू लागला. पाखरं पंख फडफडवत घरटी सोडून उडू लागली. झाडांच्या पानांतून वारा सुसाट वाहू लागला.
__ ज्या फांदीला झुला टांगला होता ती आंब्याच्या वृक्षाची फांदी जोरजोराने हलू लागली. झोका वेगात झुलत होता... हे पाहून चित्रगंधा प्रचंड घाबरली. तिला झुला थांबवता येईना..
_ आणि तेवढ्यात काही कळायच्या आत कडकड आवाज करत झुल्यासकट आंब्याची फांदी चित्रगंधाला घेऊन जमिनीच्या दिशेने येऊ लागली.
जीवाच्या भीतीने तिने डोळे गच्च बंद केले. तिने मोठ्याने किंकाळी फोडली.
___ आणि अचानक तिला जाणवलं की, कुणीतरी आपल्याला मिठीत अलगद झेलले आहे.
तिने डोळे उघडले.
" सुन्या तू..??... मला माहित होतं सुन्या , मला वाचवायला तू नक्की येशील ..!" डोळे विस्फारित त्याच्याकडे पाहत चित्रगंधा म्हणाली.
तो फक्त हसला.
सुन्याच्या घट्ट मिठीत तिला पिसासारखं हवेत तरंगत असल्यासारखं वाटलं. त्याच्या मिठीत ती सुखावली. आताच्या क्षणापुरत्या तिला कोणत्याही विवंचना नव्हत्या... प्रश्न नव्हते... मनातली बैचेनी.. अस्वस्थता सारं.. सारं काही संपल होतं...
" आता आपण कायम एकत्र राहू.... आता कोणीही आपल्याला वेगळं करू शकणार नाही...!!" सुन्या म्हणाला.
" हो... कध्धी म्हणजे कध्धीच एकमेकांपासून वेगळं व्हायचं नाही...!" ती हसली.
" खरंच्...!" तो विस्मयचकित झाला...
" तुझी शप्पथ...!!"
__ आणि मग तो समाधानाने हसला.
दोघांची मिठी अधिकच घट्ट झाली.
__ तेवढ्यात आमराईत स्त्रीच्या आवाजातली किंकाळी ऐकून मघासचं ते सायकलवालं कोवळं पोर धावत आमराईत आलं.
आमराईत आल्यावर समोरचं दृश्य पाहून ते पोर भरनाळीच्या ओढ्याच्या दिशेने बोंबलत धावत सुटलं.
" बळी घेतला... बळी घेतला...सुन्याने बळी घेतला... त्याने ज्या झाडाला फास लावला ... तिथं एक बाई मरून पडलीयं... या ... सगळे या इथे... आमराईत.. या..!"
त्या पोराच्या आरोळ्या ऐकून पिंडाला कावळा शिवावा म्हणून भरनाळीच्या ओढ्यावर वाट पाहून थकलेली सगळी माणसं आमराईच्या दिशेने धावली.
__ आणि मग तिथे भरनाळीच्या ओढ्यावर ठेवलेल्या पिंडाभोवती मघासपासून घिरट्या घालणारा एक कावळा येऊन पिंडाला शिवला एकदाचा...!!
__________________ XXX___________________
समाप्त..!
धन्यवाद...!
©रूपाली विशे - पाटील
rupalivishepatil@gmail.com
( सदर कथा काल्पनिक असून कथेद्वारे कुणाच्याही भावना दुखावणे हा कथालेखिकेचा उद्देश नाही.)
_________________ XXX____________
ओह...
ओह...
पटपट भाग आले त्यामुळे अजून उत्सुकता टिकून राहिली.
लिहीत रहा.
चांगली फुलवलीत.
चांगली फुलवलीत.
शेवटी मात्र फार वाईट वाटलं.
नुकताच येऊन गेलेला 'कला' या
नुकताच येऊन गेलेला 'कला' या हिंदी चित्रपटाची मराठी आवृत्ती . फारच छान लिखाण। अजून येऊ दे।
बापरे !! सॉलिड आहे. शेवट
बापरे !! सॉलिड आहे. शेवट वेगवान होता, पण अपेक्षीत होता. मात्र सुन्या भेटल्यावर चित्रा कायमची जग सोडेल असे वाटले नव्हते. एखाद्याच्या नशीबाचे भोग असतात बहुतेक.
छान केलात शेवट. कथा आवडली
छान केलात शेवट. कथा आवडली
छान... आवडली.
छान... आवडली.
अंतिम भाग आल्यावर पूर्ण कथा
अंतिम भाग आल्यावर पूर्ण कथा वाचून काढली . छान झालीय कथा . शेवटी शेवटी अंदाज आला पण कथा छान फुलवली आहे .
छान लिहिलंय. .. पण शेवटी वाईट
छान लिहिलंय. .. पण शेवटी वाईट वाटलं.
धनवन्ती - तुमचे विशेष आभार ..
धनवन्ती - तुमचे विशेष आभार ... तुम्ही तिन्ही भागावर पहिला प्रतिसाद दिलात.
झकासराव - धन्यवाद
रमड - धन्यवाद
दिपक - धन्यवाद
रश्मीजी- धन्यवाद,
मात्र सुन्या भेटल्यावर चित्रा कायमची जग सोडेल असे वाटले नव्हते. एखाद्याच्या नशीबाचे भोग असतात बहुतेक<< पूर्ण कथा एकच भागाची गूढ, धक्कादायक अशी लिहायची होती पण मारुतीच्या शेपटीसारखी वाढत गेली मग तीन भागांची लिहिली..
अजनबी - धन्यवाद..
नुकताच येऊन गेलेला 'कला' या हिंदी चित्रपटाची मराठी आवृत्ती . >> पाहिला नाही चित्रपट पण पाहेन आता...
फारच छान लिखाण। अजून येऊ दे।>> हो , नक्कीच..!!
सामी - धन्यवाद
प्राचीन - धन्यवाद
छान झाली कथा, शेवटपर्यंत
छान झाली कथा, शेवटपर्यंत खिळवून ठेवलं
छान लिहिली आहेस कथा...
छान लिहिली आहेस कथा....नेहमीप्रमाणे मस्तच...
छानच झालीय.
छानच झालीय.
सुन्या चा आत्मा असणार हे तो अचानक समोर आला आणि तिला ओळखलं तेव्हाच कळलं. मला वाटलं होत काहीतरी अनपेक्षित शेवट असेल.
खूप आभार अज्ञातवासी ,
खूप आभार अज्ञातवासी , लावण्या, फुलराणी..!!
रूपाली
रूपाली
झोक्याप्रमाणेच वर खाली फिरवणारी कथा
मस्त लिहिली आहे . पुलेशु
छान झाली कथा, शेवटपर्यंत
छान झाली कथा, शेवटपर्यंत खिळवून ठेवलं+१
कथा छान आहे, पुढील लेखनासाठी
कथा छान आहे, पुढील लेखनासाठी शुभेच्छा!
बिपिनजी, दत्तात्रेयजी, संजना
बिपिनजी, दत्तात्रेयजी, संजना धन्यवाद..!
कथा फार महिन्यांनी वर आली.. छान वाटलं..