अलिकडेच महाराष्ट्रातील विविध सीमावर्ती भागांमधील गावांनी आपल्याला शेजारच्या राज्यांमध्ये समाविष्ट व्हायचे आहे, असं म्हटलं आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावादानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. स्वातंत्र्यानंतर भाषा-आधारित घटकराज्यांची निर्मिती करण्यात आली. त्यामुळं काही घटकराज्यांमध्ये वांशिक, धार्मिक, भाषिक असे वैविध्य मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. पुढील काळात विविध कारणांनी देशातील प्रत्येक समुदायाकडून आपल्यासाठी स्वतंत्र घटकराज्याची मागणी लावून धरली जात आहे. त्यामुळं भाषेच्या आधारावर घटकराज्यांची निर्मिती करण्याचे तत्व मागे पडले आहे. भारतातील विविध घटकराज्यांदरम्यान असलेल्या सीमावादांची (Inland border disputes) माहिती देणारा हा लेख. स्पर्धा परीक्षांची #UPSC #MPSC तयारी करणाऱ्यांसाठी हा लेख विशेष करून उपयुक्त ठरेल.
स्वातंत्र्यपूर्व काळात भाषावार प्रांतरचनेवर विचार
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने सुरुवातीच्या काळात देशातील प्रांतांची भाषेच्या आधारावर पुन:निर्मिती करण्याला विरोध केला होता. 1917 मध्ये कोलकातामध्ये भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात डॉ. ॲनी बेझंट यांनी भाषेचा आधार घेऊन प्रांतरचनेला काँग्रेसचा विरोध असल्याचं म्हटलं होतं. पण 1920 मध्ये नागपूरमध्ये झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात काँग्रेसनं देशातील प्रांतांची भाषेच्या आधारावर पुनर्रचना करण्याचा विचार स्वीकारला.
भारतीय राज्यघटनेचा अंमल
स्वातंत्र्यानंतर अखंड भारताची फाळणी होऊन भारत आणि पाकिस्तान अशी दोन स्वतंत्र राष्ट्रे अस्तित्वात आली. त्यानंतर भारतातील संस्थानांचं भारतीय संघराज्यात विलिनीकरण करण्याचे काम प्राधान्यानं हाती घेण्यात आलं. त्यानंतर 26 जानेवारी 1950 ला भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाली. भारतीय राज्यघटनेमध्ये भारतीय संघराज्य कसं असेल, याबाबतचा उल्लेख करण्यात आलेला आहे.
राज्यांचा संघ – भारतीय राज्यघटनेच्या कलम 1 मध्ये असं नमूद करण्यात आलं आहे की, ‘इंडिया म्हणजेच भारत हा राज्यांचा संघ आहे.’ याद्वारे देशाचे नाव आणि तेथील राज्यपद्धतीविषयी स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
भारतीय राज्यघटनेचं स्वरुप संघराज्य पद्धतीचं असलं तरी राज्यघटनेत ‘भारत हा संघ’ असल्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते, ‘राज्यांचा संघ’ असा उल्लेख जाणीवपूर्वक करण्यात आलेला आहे. कारण,
भारतीय संघराज्याची निर्मिती अमेरिकेप्रमाणे विविध घटकराज्यांमधील कराराने करण्यात आलेली नाही.
घटकराज्यांना भारतीय संघराज्यातून बाहेर पडण्याचा अधिकार देण्यात आलेला नाही.
कलम 1 नुसार, भारतीय क्षेत्राचे तीन भागांमध्ये वर्गीकरण करण्यात आलेले आहे.
1) घटकराज्यांचे क्षेत्र
2) केंद्रशासित प्रदेश
3) भारत सरकारद्वारे कोणत्याही वेळी आपल्या प्रदेशात समाविष्ट केला जाणारा भूभाग.
घटकराज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची नावं आणि त्यांच्या विस्तारासंबंधीचा उल्लेख राज्यघटनेच्या पहिल्या परिशिष्टात करण्यात आलेला आहे. तसंच घटकराज्यांच्या सीमा कायमस्वरुपी नसून संसदेला घटकराज्याच्या नावामध्ये आणि क्षेत्रफळामध्ये बदल करण्याचा अधिकार आहे.
- घटकराज्यांचे वर्गीकरण
भारतीय राज्यघटनेचा अंमल सुरू झाला, तेव्हा सर्व घटकराज्यांचे 4 विभागांमध्ये वर्गीकरण करण्यात आले होते. जसे,
विभाग अ – ब्रिटिश भारतातील गव्हर्नरच्या अखत्यारीतील प्रांत
विभाग ब – विधिमंडळ असलेली 9 संस्थाने
विभाग क – पूर्वीचा मुख्य आयुक्तांच्या अखत्यारीतील ब्रिटिश भारतातील प्रांत आणि काही संस्थाने
विभाग ड – अंदमान व निकोबार बेटे
घटकराज्यांच्या निर्मितीसंबंधीच्या घटनात्मक तरतुदी
घटकराज्यांची निर्मिती कशी केली जाईल यासंबंधीचा उल्लेख भारतीय राज्यघटनेच्या कलम 3 मध्ये करण्यात आलेला आहे. त्यानुसार, संसद भारतात नव्या घटकराज्यांची निर्मिती करू शकते, एखाद्या घटकराज्याचा प्रदेश दुसऱ्या घटकराज्यात समाविष्ट करू शकते किंवा काही घटकराज्यांच्या काही प्रदेशांचे एकत्र नवे घटकराज्य निर्माण करू शकते. संसद एखाद्या घटकराज्याचा प्रदेश वाढवू किंवा कमी करू शकते. राज्यांच्या सीमा आणि नावांमध्येही बदल करण्याचा अधिकार संसदेला आहे. त्यासाठी कोणती पद्धती अवलंबावी याबाबतचा उल्लेखही कलम 3 मध्ये करण्यात आलेला आहे.
घटकराज्यांचे नाव, प्रदेश, सीमा इत्यादी बदलांसंबंधीचे विधेयक राष्ट्रपतीच्या पूर्व शिफारशीद्वारेच संसदेत मांडता येईल.
राष्ट्रपतीने संसदेला याबाबतची शिफारस करण्याआधी संबंधित घटकराज्याच्या कायदेमंडळाकडे हे विधेयक पाठवून त्याचे मत घेणे आवश्यक असेल.
मात्र संबंधित घटकराज्याच्या विधिमंडळाचे मत राष्ट्रपतीवर बंधनकारक असणार नाही.
केंद्रशासित प्रदेशांच्या बाबतीत संसद यासंबंधीचा निर्णय थेट घेऊ शकते.
अशा तरतुदींमुळे भारताचं वर्णन “नाशवंत घटकराज्यांचा कधीही नाश न पावणारा संघ (An indestructible union of the destructible states)” असे केले जाते. यातून भारताच्या प्रादेशिक अखंडतेची शाश्वती देण्यात आली आहे.
कलम 4 नुसार, नव्या घटकराज्याची निर्मिती किंवा नव्या घटकराज्याचा संघातील प्रवेश किंवा घटकराज्याच्या सीमांमधील बदल या बाबींना घटनादुरुस्ती मानता येणार नाही. त्यामुळे त्यासंबंधीची विधेयके साध्या बहुमताने संमत करता येतील.
धर आयोग आणि जेव्हीपी समिती
स्वातंत्र्यानंतर भाषेच्या आधारावर घटकराज्यांची पुन:रचना करण्याची मागणी जोर धरत होती. त्यावर विचार करण्यासाठी जून 1948 मध्ये एस. के. धर यांच्या अध्यक्षतेखाली ‘भाषिक प्रांत आयोग’ स्थापन करण्यात आला होता. त्या आयोगानं घटकराज्यांची निर्मिती भाषेऐवजी प्रशासकीय सोयीच्या आधारावर केली जावी, अशी शिफारस केली होती. त्यानंतर या विषयावर सर्व बाजूंनी विचार करण्यासाठी जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सितारामैय्या यांच्या (जेव्हीपी) समितीची स्थापना करण्यात आली. भाषावार प्रांतरचनेमुळे देशाच्या अखंडतेला भविष्यात आव्हान मिळेल, या विचारानं नेहरूंचा अशा रचनेला किंवा छोट्या-छोट्या घटकराज्यांच्या निर्मितीला विरोध होता. त्यामुळेच जेव्हीपी समितीनेही भाषेच्या आधारावर घटकराज्यांची निर्मिती करण्याला विरोध दर्शवला. मात्र तेलुगु भाषिकांच्या स्वतंत्र घटकराज्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या पोच्ची श्रीरामुलु यांच्या निधनानंतर केंद्र सरकारला ऑक्टोबर 1953 मध्ये आंध्र प्रदेश हे तेलुगु भाषिकांसाठीचे स्वतंत्र घटकराज्य निर्माण करावे लागले. त्यामुळं भाषेच्या आधारावरच देशात अन्य घटकराज्यांची निर्मिती केली जावी, अशी मागणी देशभरातून जोर धरू लागली.
वाचतोय..
वाचतोय..
केंद्राला सर्व अधिकार असले
केंद्राला सर्व अधिकार असले आणि केंद्र सरकार कोणत्या ही राज्याचे नाव,सीमा बदलू शकत असले.
तसा अधिकार संसदेला असला तरी तो वापरणे सहज शक्य नसते.
आणि तो वापरू सुद्धा नये विनाकारण .
हीच अपेक्षा राज्य घटनेची पण असावी.
भारतात अनेक भाषा आहेत.
मातृभाषेतून राज्य कारभार असल्या मुळेच लोकांना स्वतःच्या देशात राहतं असल्या सारखे वाटते.
आणि भाषिक तत्व वर राज्य निर्माण केल्या मुळे तो हेतू साध्य झाला .
नाही तर कन्नड राज्यात मराठी लोक,मराठी राज्यात कन्नड लोक..
राज्यकारभार स्थानिक भाषेत चालणार आणि बाकी लोकांना परक्या देशात राहतं आहोत अशी भावना निर्माण होणार .(स्थलांतरित लोकसंख्या हा वेगळा विषय आहे)
ह्या समस्या आल्या असत्या.
भारत पाकिस्तान च्या सीमावाद सारखा दोन राज्यातील सीमावाद पण गंभीर असतो.
महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादावरून त्याची जाणीव होत च आहे.
केंद्राला अनेक अधिकार दिले आहेत पण ते वापरायचे कधी ह्या साठी विवेकबुद्धी चा वापर सरकार करीत असतात.
नाही तर लहान समस्या सोडवण्याच्या नादात मोठी समस्या निर्माण होवू शकते.
छान! समयोचित लेखमाला!!
छान! समयोचित लेखमाला!!
पुभाप्र...