आमची अमेरिका वारी….. (प्रशांत मठकर)
सीएटल- भाग 2
लीव्हनवर्थ
वीकएंडला जोडून सुट्टी आली की इथला ‘लॉन्ग वीकएंड’. अशा वीकएंडला इथला नोकरदार वर्ग सहकुटुंब पिकनिकसाठी बाहेर पडतो. जवळपासची पिकनिकची ठिकाणी अशा वेळी गर्दीने ओसंडून वहात असतात. त्यात सध्या इथला स्प्रिंग सीझन म्हणजे वातावरण एकदम उत्साही. मग आमचाही अशाच एका वीकएंडला पिकनिकसाठी सिएटल जवळच्या लीव्हनवर्थ या ठिकाणी जायचा बेत ठरला. सिएटलपासून 150 किलोमीटरवर कॅस्केड पर्वतांच्या पायथ्याशी पारंपारिक पर्वतीय जर्मन शहराच्या धर्तीवर वसलेल हे शहर पर्वतीय रांगांच नैसर्गिक सौंदर्य आणि दक्षिण जर्मनीच्या बव्हेरियन आल्प्स प्रदेशाशी असलेल साम्य यामुळे पिकनिक स्पॉट आणि हिवाळी खेळासाठी प्रसिद्ध. दर वर्षी नोव्हेंबर ते मार्च या काळात इथल्या जागतिक दर्जाच्या अल्पाइन स्की आणि स्नोबोर्ड रिसॉर्ट्स मध्ये राहून स्कीइंग, स्की जम्पिंग सारख्या हिवाळी खेळांचा आनंद लुटण्यासाठी जगभरातील पर्यटक येतात. हे गांव ‘Living Snow Globe’ म्हणूनही ओळखल जात. आमच सारथ्य करायची जबाबदारी लेकीच्या मैत्रिणीने घेतल्याने जाण्यासाठी एक सेल्फ ड्राइव कार घेऊन सकाळी अकरा वाजता आम्ही निघालो. लीव्हनवर्थला जाणारा रस्ता राखीव जंगल, बर्फाच्छादित पर्वतरांगा आणि सरोवरांच्या सोबतीने जातो. उंच उंच झाडांच्या मधून जाणाऱ्या या रस्त्याच्या आसपासच्या कुरणांमधून कुठतरी हरणांचे कळप बागडताना दिसत होते. काही ठिकाणी डोंगरावरून वितळणारा बर्फ अगदी रस्त्याच्या कडेपर्यंत पसरलेला दिसत होता. पण फ्री वे आणि राखीव जंगल असल्याने बर्फात खेळण्यास किंवा फोटोग्राफीला वाव नव्हता त्यामुळे कार मधूनच भोवतालच्या निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत आणि जमेल तेवढी फोटोग्राफी करत आम्ही दुपारी दोनच्या सुमारास लीव्हनवर्थला पोहोचलो.
गाडी पार्क करून प्रथम पोटपूजेसाठी निघालो. पार्किंगला लागूनच बाजार आणि पादचाऱ्यांसाठी राखीव मध्यवर्ती रस्त्याच्या दोन्ही बाजूला कपडे, स्थानिक हस्तकला, मध, फळं आणि त्यापासून बनलेले विविध पदार्थ, इथली आठवण म्हणून घेण्यासारख्या छोटया छोट्या वस्तु, यासारखी असंख्य दुकान, जिव्हालौल्य पुरविणारी हॉटेल्स आणि वारुणीप्रेमींच खास आकर्षण म्हणजे वायनरीज आणि Breweries ची Testing Outlets. सुट्टीचा दिवस असल्याने सगळीकडे पर्यटकांची गर्दी. अशाच एका Wine Testing Outlet मध्ये डोकावलो असता सहा डॉलरला सहा प्रकारची एक एक ग्लास वाईन अशी लूभावणारी ऑफर दिसली. लेक आणि तिची मैत्रीण मला ती ऑफर स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन देत होत्या पण सहा ग्लास रिते करण्यासाठी लागणाऱ्या वेळेचा अभाव..आणि सौच्या कपाळावरची सूक्ष्म आठी पहाता मी गुपचुप जेवणासाठी हॉटेलमध्ये शिरलो. पण जेवताना मात्र इथल्या स्वीट रोज वाईनच्या एका ग्लासची चव घेतलीच. व्यवस्थित पोटपूजा झाल्यावर मार्केटच्या मधूनच जाणाऱ्या रस्त्याकडेची विविध वस्तूंनी सजलेली दुकान पहात छोटी मोठी खरेदी करत आमच लीव्हनवर्थ दर्शन सुरू झाल. एक दोन मजली दुकान फक्त ख्रिसमसला लागणाऱ्या सर्व साहित्याच...विविध प्रकारची सुंदर ख्रिसमस ट्रीज, सांता क्लॉज, लाइट्स इत्यादि वस्तुनी दुकानाचे दोन्ही मजले व्यापलेले. हा गाव ख्रिसमस लाइट फेस्टिवलसाठीही प्रसिद्ध. डिसेंबरमध्ये या फेस्टिवलसाठी इथे मोठ्या संख्येने पर्यटक येतात. आणखी एक आकर्षण म्हणजे अडकित्त्यांच संग्रहालय (Nutcracker Museum) ज्यात जगभरातील पाच हजारपेक्षा जास्त अडकित्ते आहेत. पण आमच दुर्दैव म्हणजे हे संग्रहालय दुपारी एक ते पाच या वेळेतच उघड असत आणि आम्ही तिथे पांचनंतर पोहोचलो. मार्केटचा एक भाग स्थानिक चित्रकारांनी काढलेली चित्र आणि हस्तकलाकृतींच्या विक्रीसाठी राखीव, त्यात दहा वीस डॉलर पासून पाच हजार डॉलर किमतीची चित्र विक्रीसाठी ठेवलेली होती. बाजाराचा फेरफटका झाल्यावर इथल्या ‘वेनाची’ नदीच्या किनाऱ्याने जाणाऱ्या ट्रेलने केलेला छोटासा ट्रेक आमच्या पिकनिकचा हाय पॉइंट.. अविस्मरणीय अनुभव..नदीच्या किनाऱ्याने जंगलातून पायवाटेने जाणारा रस्ता.. वळणावर अचानक समोर अनोखा नजारा घेऊन येणारा..दूरवर कुठेतरी दिसणारी संधिप्रकाशात न्हाऊन निघालेली छोटी छोटी घर.... सोबत घरट्यात परतणाऱ्या विविध पक्ष्यांच्या किलबिलाटाच आणि वाहत्या पाण्याच पार्श्वसंगीत...किती फोटो काढावे नी किती डोळ्यात साठवाव..निसर्गाचा ओंकार ऐकवत डोळे आणि मन शांत करणारा तो अनुभव....वाटत होत की तिथून हलूच नये.. पण संध्याकाळचे आठ वाजत आले होते आणि परतीच्या प्रवासाचा वेळ झाला होता त्यामुळे जड अंत:करणाने लीव्हनवर्थला अलविदा करून आम्ही मार्गस्थ झालो.
या सर्व भागातून फिरताना प्रकर्षाने जाणवलेली इथली स्वच्छता. सर्व भाग पर्यटकानी गजबजलेला असूनही, कसलेही बोर्डस, सूचना किंवा गार्डस तैनात नसताना कुठेही कचरा फेकलेला दिसला नाही. प्लास्टिक पिशव्या तर अजिबातच नाही.. लहान मुलंसुद्धा कचरापेटीतच कचरा टाकताना दिसत होती. अगदी जंगलातल्या पायवाटेवरहि फक्त झाडांच्या पालापाचोळ्यांचा नैसर्गिक कचरा....आपल्याकडील पर्यटन स्थळ, डोंगर-जंगलातील ट्रेकिंग ट्रॅक्सच्या आसपास फेकलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, गुटक्याची पाकीट यासारख्या कचऱ्याचे ढीग पहायची सवय झालेल्या आमच्या डोळ्यांना अगदी चुकल्या चुकल्या सारख वाटत होत. स्वच्छता हा गुण अंगभूत असण किती गरजेच आहे या विचाराने लीव्हनवर्थवरुन परतताना अंतर्मुख केल.
डिसेप्शन पास स्टेट पार्क… डिसेप्शन पास ब्रिज
‘डिसेप्शन पास स्टेट पार्क’ या अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यामधील राष्ट्रीय उद्यान आणि तिथल्या प्रसिद्ध डिसेप्शन पास ब्रिज विषयी पूर्वी थोडफार वाचल होत त्यामुळे या पार्कविषयी कुतूहल होतच. हे पार्क सीएटलपासून फक्त साठ मैलांच्या अंतरावर. एका रविवारी दुपारी एकच्या सुमारास आम्ही व्हिडबे बेटावर या पार्कजवळच्या ओक हार्बर या शहरात पोचलो.
‘डिसेप्शन पास’ ही अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यातील व्हिडबे आणि फिडाल्गो या दोन बेटाना विभागणारी सामुद्रधुनी. जून 1792 मध्ये ब्रिटिश एक्सप्लोरर कॅप्टन जॉर्ज व्हँकुव्हरच्या शोधमोहिमेतील एचएमएस डिस्कव्हरीचे मास्टर आणि मुख्य नेव्हिगेटर जोसेफ व्हिडबे यांनी सिद्ध केलं की हा पास म्हणजे स्पॅनिश खलाश्यांच्या मानण्याप्रमाणे छोटीशी खाडी नसून ‘Juan de Fuca’ सामुद्रधुनीला साराटोगा पॅसेजशी जोडणारी आणि व्हिडबे आणि फिडाल्गो या दोन बेटाना विभागणारी एक खोल आणि खवळलेली सामुद्रधुनी आहे. हा पास पार करण्याच्या अगोदरच्या प्रयत्नात व्हिडबे बेट हे द्वीपकल्प आहे अशी दिशाभूल झाल्याने कॅप्टन व्हँकुव्हरने या पासला " डिसेप्शन पास" हे नाव दिलं.
उंचच उंच डोंगर, खोल दऱ्या, खडकाळ भूभाग, घनदाट जंगल, छातीत धडकी भरवणारा उंच पूल आणि खाडीतून होणारं विहंगम सूर्यास्त दर्शन यामुळे हे उद्यान स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांच आवडीच ठिकाण. सरोवरात मासे पकडणं, पोहणं, समुद्रकिनाऱ्यावर शंख शिंपले गोळा करणं, जंगल आणि कडेकपारीमधून हायकिंग, ट्रेकिंग, पक्षी निरीक्षण या सर्व वयोगटांच्या लोकांच्या आवडीच्या गोष्टी इथे आहेत.
या फिडाल्गो आणि व्हिडबे बेटांना जोडणारा, वायव्य पॅसिफिक भागातल निसर्गरम्य आश्चर्य म्हणून ओळखला जाणारा डिसेप्शन पास ब्रिज हे इथल्या अनेक आकर्षणांपैकी एक प्रमुख आकर्षण. 20 व्या शतकाच्या सुरवातीच्या काळात या दोन बेटांमध्ये वाहतुकीसाठी फेरीबोटीचा वापर केला जाई. या फेरीला बोलविण्यासाठी प्रवासी करवतीवर धोपाटण्याने (Mallet) आवाज करीत. या बेटांना जोडणाऱ्या दोन पूलांच काम ऑगस्ट 1934 मध्ये सुरू होऊन 31 जुलै 1935 रोजी ते वाहतुकीसाठी खुले झाले. या दोन पूलाना ‘डिसेप्शन पास ब्रिज क्रॉस डिसेप्शन पास’ म्हणून एकत्रितपणे ओळखल जातं. 1982 साली या पूलाची राष्ट्रीय ऐतिहासिक ठिकाण म्हणून नोंद झाली. पूलाची पाण्यापासून रस्त्यापर्यंतची उंची साधारणपणे 18 मजली इमारतीएवढी आणि लांबी पाऊण मैलापेक्षा जास्त आहे. ऊंची आणि दाट धुकं यामुळे या पूलाची गणना अमेरिकेतील दहा भीतीदायक पूलांमध्ये केली जाते. पुलाच्या दोन्ही बाजूना पादचाऱ्यांसाठी जेमतेम एकजण जाऊ शकेल एवढी अरुंद वाट आहे. पण भणाणणारा थंडगार वारा, पूलाची ऊंची आणि खाली वाहणारं गर्द हिरव पाणी यामुळे या वाटेनं पूल पार करण आमच्यासाठी जरा धाडसाचच. जेमतेम 100 मिटर गेल्यावरच आणखी पुढे जायची हिम्मत होईना....तरी त्यावेळी तिथे धुकं नव्हत..
या जंगलामध्ये बरेच लहानमोठे ट्रेल्स आणि तंबू ठोकण्यासाठी जागाही (Camping Sites) आहेत. एक ट्रेल तर पुलाच्या बाजूनेच थेट खालच्या ‘Little North Beach’ किनाऱ्यावर उतरतो. आम्हीही पार्कच्या घनदाट जंगलामध्ये थोडी भ्रमंती करून सूर्यास्त पाहण्यासाठी किनाऱ्यावर आलो. किनाऱ्यावर विविध आकाराच्या आणि रंगांच्या दगडांचा सडाच पसरलेला. गोळा करावे तेवढे थोडेच. इथे आम्हाला समुद्रात मजेत पोहणाऱ्या सीलच दर्शनही झालं. समोरच्या क्षितिजावर चाललेला सूर्यास्ताचा रंगीन नजारा डोळ्यात साठवत उंचच उंच वृक्षांमधून पार्किंग बे कडे जाणाऱ्या सुंदर पायवाटेने आम्ही परतीच्या प्रवासाला सुरवात केली..... (क्रमश:)
सुंदर!
सुंदर!
सुंदर, फोटोही फार सुंदर
सुंदर, फोटोही फार सुंदर
खूप छान लिहिले आहे. अनेक
खूप छान लिहिले आहे. अनेक कारणांसाठी ही मालिका खूप आवडते आहे.
मागच्या अमेरिका वारीतल्या लीवनवर्थच्या खूप आठवणी तुमच्या लेखाने जाग्या केल्या. आम्ही ऑक्टोबरफेस्ट दरम्यानच तिथे होतो त्यामुळे जर्मनीला न जाताही बीअर फेस्टिवलचा मोहोल काय असतो त्याचा खूप छान अनुभव घेता आला. त्या दरम्यान पर्यटकांची गर्दी अगदी पूर्ण लीवनवर्थ मध्ये मावत नाही. थंड हवा, फॉल सीझन, डोंगररांगा, हवेत विरत जाणारे ख्रिस्मस जिंगल्स आणि बव्हेरिअन स्टाईल दुकाने, रेस्टॉरंट्स अगदी स्विस आल्प्सचा फील येतो.
लीवनवर्थची सगळ्यात मोठी आठवण म्हणजे मी चार महिन्यांची प्रेग्न्नंट असतांना केलेली ८ मैलांची साधारण २४०० फीट एलेव्हेशनची कुलचॅक लेक हाईक. ग्लेसिअर लेकच्या दर्शनाने ८-९ तासांचा शिणवटा, डिहायड्रेशन, थंडी वगैरेंच्या जाणीवा कुठल्याकुठे नाहीशा होत मनात हर्ष दाटून राहिला.
आणि हाईक नंतर पोटात ऊसळलेला आगडोंब शमवण्यासाठी तुम्ही फोटो टाकला आहे त्याच बाकड्यांवरच्या मागच्या मंगोलिअन ग्रिल मध्ये न भुतो न भविष्यति खादाडी केली होती ते सुद्धा लख्ख आठवले.
मस्तच झालाय हा भाग ही. फोटो
मस्तच झालाय हा भाग ही. फोटो तर अप्रतिम आलेत सगळेच.
छान.
छान.
दुसरा फोटो पाहून जर्मनीत पाहिलेल्या lake Titisee परिसराची आठवण झाली.
रंगीत दगडगोट्यांचा फोटो आहे का?
खूप छान माहिती आणि सुंदर
खूप छान माहिती आणि सुंदर फोटोज्
मनमोहक !
मनमोहक !
इसे कहते है असली प्रवास वर्णन
इसे कहते है असली प्रवास वर्णन. अप्रतीम, मस्त. अजून सफर घडवा शक्य असेल तर. सुरेख लिहीलत. कुठेही हात आखडता घेतला नाहीत यात खरी मज्जा. फोटो फार देखणे आहेत.
मस्त झालाय हाही भाग!
मस्त झालाय हाही भाग!
लिखाण आणि फोटो, दोन्ही उत्तम
लिखाण आणि फोटो, दोन्ही उत्तम आहेत.
वाह. मस्त लिहीलंय. फोटोही
वाह. मस्त लिहीलंय. फोटोही अप्रतिम.
आत्ताच वाचायला लागलो ही
आत्ताच वाचायला लागलो ही मालिका फार छान. या मंथ ला जायचा प्लॅन आहे तिकडे. तुम्ही सांगितलेले स्पॉट बघून घेईन नक्कीच.
सुंदर फोटोस आहेत.
छान आणि माहितीपूर्ण लेख.
छान आणि माहितीपूर्ण लेख. लीव्हनवर्थ खूपच सुंदर दिसते आहे. एखादी ट्रिप करायला हरकत नाही असं वाटून गेलं.
सगळे फोटो अप्रतिम आहेत.