माऊंट रेनियर- माऊंट रेनियर नॅशनल पार्क
सीएटलला आलो त्या दिवशी सकाळीच मुलीच्या फ्लॅटच्या किचनमधून एका बर्फाच्छादित पर्वताच दर्शन झाल. त्याच नाव ‘माऊंट रेनियर’ असल्याच समजल आणि रोज सकाळी पहिल्यांदा खिडकीतून त्याच दर्शन घ्यायचा नादच लागला. पण दर्शन द्याव की नाही हे त्याच्या मर्जीवर.. आकाश स्वच्छ असेल तरच त्याच दर्शन व्हायच. शेवटी त्याच्या प्रत्यक्ष भेटीला जायचा बेत ठरला. मधल्या काळात त्याच्याविषयी बरीच माहितीही जमा केली. माऊंट रेनियर नॅशनल पार्क मधला हा सध्या निद्रिस्त अवस्थेत असलेला सक्रीय ज्वालामुखी, कॅस्केड पर्वतरांगांमधल सर्वोच्च शिखर. गेल्या 500,000 वर्षांमध्ये झालेल्या ज्वालामुखीच्या अनेक उद्रेकांमधून घडलेला, बर्फ आणि 25 हिमनद्यांनी आच्छादिलेला हा पर्वत सीएटल पासून फक्त साठ मैलांवर. याच्या शिखरावर असलेल्या दोन ज्वालामुखीय विवरांमधून ज्वालामुखीचा उद्रेक होतो. त्याचा शेवटचा उद्रेक 1894-95 मध्ये झाला. याच शिखर गाठण्यासाठी 8 मैलांपेक्षा जास्त 9,000 फूट उभ्या ऊंचीपर्यन्त जाणार अंतर पार कराव लागत त्यामुळे या भागातील गिर्यारोहकांसाठी हे आव्हानच. इथे माउंट एव्हरेस्टच्या चढाईसाठीच प्रशिक्षणहि दिल जात. आमच उद्दिष्ट मात्र त्याच्या पायथ्याशी बर्फात थोडेफार हातपाय मारण आणि आजूबाजूच्या नॅशनल पार्क मधील निसर्गाचा आस्वाद घेणं एवढच, त्यामुळे टूर कंपनीच्या एक दिवसाच्या टूरच आम्ही बूकिंग केल आणि एका सकाळी आठ वाजता कंपनीच्या व्हॅनमध्ये स्थानापन्न झालो . दीड तासाच्या प्रवासानंतर एका सुंदर लेकच्या किनाऱ्यावर टूर कंपनी आयोजित नाश्ता उरकून आम्ही रेनीयरच्या पायथ्याशी असलेल्या व्हिजिटर्स सेंटरसमोर उतरलो.
समोरच माऊंट रेनियरच धवल वस्त्राकित शिखर दिसत होत. आम्ही स्वेटर्स, कानटोप्या वगैरे आयुध चढवली. आमच्या टूर गाईडने बर्फात चालताना घ्यायच्या काळजी बद्दल सूचना दिल्या आणि सर्वांना बर्फात चालताना वापरावयाच्या स्टिक्स देऊन मार्गस्थ केल. एक मैलभर बर्फात चालत जायच होत. सुरवातीला चालताना घसरायला होत होत पण स्टिक्सचा वापर करत सावरायला हळू हळू जमायला लागल. जसजस पुढ जाऊ लागलो तसतशी आजूबाजूची बर्फाची झालर दाट होऊ लागली आणि रेनियरची विविध रूप समोर दिसू लागली. सगळ्यांचे मोबाईल्स आणि कॅमेरे छायाचित्रणात व्यस्त झाले. भुसभुशीत बर्फात चालताना मजा येत होती. काही ठिकाणी वाट चिंचोळी आणि दुसऱ्या बाजूला असलेल्या घळीमुळे थोडी धाकधूक होत होती.. पण तीही एक वेगळी मजा. गाईडच्या माहितीप्रमाणे यावर्षी उन्हाळ्याच आगमन लांबल्यामुळे पर्वताच्या पायथ्याच्या भागातल बर्फ पूर्णपणे वितळल नव्हत. ते वितळल्यानंतर हा भाग रंगीबेरंगी फुलांचा गालीचाच बनतो आणि ते दृश्य खूपच मनमोहक असत. पण आमची ती संधी हुकली. दोन तास बर्फात घालवल्यानंतर टूर गाईडने आम्हाला परत व्हिजिटर्स सेंटरला आणल.
आमच या टुरमधल पुढच ठिकाण होत तिथून 17 मैलांवरचा माऊंट रेनियर नॅशनल पार्क मधल्या पॅराडाइज नदीवरचा ‘नारडा फॉल्स’. इथे पॅराडाइज नदी बॅसाल्ट खडकांच्या भिंतीवरून 170 फूट खाली कोसळते. मुख्य रस्त्यावरून या धबधब्याचा थरार लक्षात येत नाही. त्यासाठी समोरच्या बाजूने 200 फूट खाली उतरणाऱ्या पायवाटेने उतरून त्याच समोरूनच दर्शन घ्यायला हव. हो ना करत आम्ही त्या वाटेने उतरलोच आणि समोरच दृश्य पाहून परत 200 फूट चढ चढून जाण्यासाठी लागणाऱ्या श्रमाच सार्थक झाल. धबधब्याच्या पाण्याचे तुषार अंगावर घेत समोरून त्याच रौद्र रूप पहाण एक रोचक अनुभव होता.
त्यानंतरचा स्टॉप लंच ब्रेकचा. आमच्या टूर गाईडने त्यासाठी पॅराडाइज नदीकाठी एक सुंदर ठिकाण निवडल होत. इथे नदीच पात्र मोठ आणि पाणी कमी असल्याने अगदी नदीच्या पात्रात जाता येत होत. नदी, जंगल आणि माऊंट रेनियर असा त्रिवेणी संगम.. फोटो आणि सेल्फी सेशनसाठी योग्य ठिकाण. मग काय.. लंच विसरून सगळे फोटो सेशन्समध्ये व्यस्त झाले. शेवटी गाईडला सर्वांना लंचची आठवण करून द्यावी लागली.
लंचनंतर परत आसपास थोडा फेरफटका मारून आम्ही टुरमधल शेवटच ठिकाण म्हणजे नॅशनल पार्कमधील ‘ट्रेल ऑफ शॅडोज’ या जंगल ट्रेलसाठी निघालो. हेसुद्धा एक रेन फॉरेस्ट..हिरवगार आणि घनदाट. इथल वैशिष्ट्य म्हणजे बुडबुडे येणारे पाण्याचे झरे आणि अमेरिकन एक्सप्लोरर जेम्स लाँगमायरने 1883 मध्ये या झऱ्यांच्या आसपास रहाण्यासाठी बांधलेल्या लाकडी केबिन्स. एका गिर्यारोहण मोहिमेदरम्यान घोड्यांसाठी पाणी शोधताना लाँगमायरला या भागात बुडबुडे येणाऱ्या गरम पाण्याचे झरे आढळले. लाँगमायरने ही जमिन घेतली आणि झर्यापर्यंत तेरा मैल पायवाट बांधली, रहाण्यासाठी केबिन उभारल्या. पुढे 1890 मध्ये स्पा साठी एक हॉटेलही बांधल आणि ‘अनेक असाध्य व्याधी बरे करणारे लॉन्गमायर मेडिकल स्प्रिंग्ज्’ अशी या झऱ्यांची जाहिरात केली त्यामुळे इथे मोठ्या संख्येने लोक येऊ लागले. रेनियर नॅशनल पार्कने 1939 मध्ये लाँगमायरची मालमत्ता विकत घेतल्यानंतर या झऱ्याच पाणी तपासल असता त्यात कोणतेही औषधी गुणधर्म आढळले नाहीत आणि पाण्यातुन येणारे बुडबुडे म्हणजे जमिनीतून उत्सर्जित होणारा कार्बन डाय ऑक्साइड असल्याच सिद्ध झाल त्यामुळे या झऱ्यांबद्दलच औषधी आकर्षण कमी झाल. आजही बुडबुडे येणारे हे झरे इथे पाहायला मिळतात मात्र आता त्यांच पाणी गरम नाही. आज हे ‘सोडा स्प्रिंग्ज्’, लाँगमायर केबिन्स आणि इतर इमारती माउंट रेनियरच्या इतिहासाचा आणि पर्यटनाचा महत्त्वाचा भाग आहेत. साधारण एक किलोमीटरचा इथल्या इतिहासाच्या पाऊलखुणांवरुन जाणारा हा ट्रेल संपवून आमच्या टूर गाईड ने आम्हाला परत पार्किंग एरियाकडे परतीच्या प्रवासासाठी मार्गस्थ केल. (क्रमश)
आमची अमेरिका वारी….. भाग 4 (प्रशांत मठकर) सीएटल- माऊंट रेनियर- माऊंट रेनियर नॅशनल पार्क
Submitted by Prashant Mathkar on 13 December, 2022 - 04:50
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
निवांत वाचणार आहे. खूप सुंदर
निवांत वाचणार आहे. खूप सुंदर फोटो, ओघवते प्रवास वर्णन. विशेषत: ह्या भागात जे फोटो आहेत ना ते पाहुन आता लक्षात आले की निसर्ग सौंदर्य हे जेवढे रसरशीत असते तेवढेच भव्य दिव्य पण असते. सॉलिड्ड !!
फोटो मस्त आहेत.
फोटो मस्त आहेत.
खूप छान. आम्ही ऑक्टोबर मध्ये
खूप छान. आम्ही ऑक्टोबर मध्ये जाऊन आलो तिकडे. एक गोष्ट ऍड करतो, तो 'नारदा' waterfalls आणि हे नाव नारद मुनींवरुन ठेवले आहे
सुंदर फोटो. तो भाग आहेच
सुंदर फोटो. तो भाग आहेच अप्रतिम.
हाही भाग व फोटो मस्त.
हाही भाग व फोटो मस्त. शेवटच्या फोटोतील पायरीवर पडुन पुलंचे एखादे पुस्तक वाचत बाकरवडी खावी. हाताशी आंबा बर्फी असु द्यावी.
मला काही ट्रेक व बर्फ आजिबातच आव डत नाही त्यामुळे फोटो व वर्णनच वाचायला छान आहे. आम्ही पण बघुन आलो.
मला ते नार्डा म्हणजे वेताळ कि मँड्रेकच्या कॉमिक मधील एक गर्ल्फ्रेंडचे नाव आहे ते वाटले. पण तेतर नारदा निघाले.
सुंदर!
सुंदर!
फोटो खूप सुंदर आले आहेत.
फोटो खूप सुंदर आले आहेत. कोणता कॅमेरा आहे ?
सिऍटलला शेवटचे २०१६ मध्ये गेले होते. हे वर्णन वाचून तेव्हाची आठवण झाली. परत गेले पाहिजे कधीतरी.
छान लिहीलंय. फोटो मस्त.
छान लिहीलंय. फोटो मस्त.
(No subject)