" चाळा !!" - हाताला असलेलया चाळ्यांनी उडणाऱ्या गमती जमती

Submitted by छन्दिफन्दि on 26 November, 2022 - 12:09

परवा वपुं ची "पेन सलामत तो .." ऐकत होते. हाताला असलेल्या चाळ्यांनी काय काय गडबड आणि गोंधळ होऊ शकतो याची फारच रंगतदार गोष्ट आहे. आपण काय करतोय हे हाताचे चाळे करणाऱ्याला कळातही नसतं आणि नंतर कधी कधी इतकी उस्तवार होते बोलता सोय नाही .

मी लहान होते म्हणजे अगदीच पाच एक वर्षांची, आमच्या बाजूला एक छोटी गोड मुलगी होती, स्वाती नावाची. आम्ही सगळे एकलर चॉकलेटच्या सोनेरी चांदीचे छोटे छोटे बॉल्स बनवत बसलो होतो... त्या वयातल्या विरंगुळ्याच्या त्या गोष्टी! अचानक स्वाती रडायला लागली. आम्हाला काही कळेना. तेव्हढयात तिचा रडण्याचा आवाज ऐकून तिची आई आली, माझी आई आली. त्या दोघी तिला "वर बघ. नाकातून जोरात हवा बाहेर टाक. जोरात शिंक." असे काही बाही सांगू लागल्या.

आधीच रडत असलेली स्वाती अजूनच गोंधळली. शेवटी ती जोरात शिंकली .. एकदाची ! तशी तिच्या नाकातून एक सोनेरी बॉल, छोट्या मण्याच्या आकाराइतका बाहेर आला आणि तिच्या आईने "हुश्श " केले.

बाई साहेबांनी आम्ही जे सोनेरी गोळे करत होतो, त्यातला एक छोटासा उचलला आणि नाकात सरकवला. तिला त्याची चमकी करायची होती.

ते ऐकल्यावर दोन्ही आयांनी कपाळाला हात लावले आणि अर्थात आमचा मौल्यवान खजिना, सगळ्या चांद्या आणि बॉल्स , कचऱ्याच्या डब्यात टाकून दिले.

***

माझ्या मुलाची मुंज होती. आदल्या दिवशी संध्याकाळी त्याची मावशी गिफ्ट म्हणून जरा हटके पण मुलांच्या क्रीटीव्हिटीला वाव देणारी अशी भेटवस्तू त्याच्यासाठी घेऊन आली, ती म्हणजे डफली. "आधीच मर्कट त्यातून मद्य प्याला " अशी अवस्था झाली. माझी मुलं, भाचवंड सगळे एकत्र आले कि नुसता दंगा करतात. त्यांचा धुमाकूळ चालू असताना अचानक त्यांना हे नाविन्यपूर्ण खेळणं हातात आले.

इकडे आम्ही कामात, गप्पात दंग.

आता डफली हातात आल्यावर त्यांनी वाजवून वाजवून डोकं भंडावून सोडणं अपेक्षित होत. पण दोनच मिनिटात एकदम शांतता झाली. माझा मुलगा रडकुंडीला आलेला. आणि बाकीचे एकदम गप्प. बघते तर त्याच्या गळ्यात डफली.

त्याचं झालं अस कि, आधीच ते मस्ती करत होते आणि डफली हातात आल्यावर तर चेकाळले. माझा भाचा फारच रंगात आला. त्याने नाचत नाचत ती डफली माझ्या मुलाच्या गळ्यात घातली. आता हा ती डफली काढायला गेला तर काही केल्या निघेना. सगळ्यांची मस्ती कुठच्या कुठे पळून गेली.

ती गळ्यात तर गेली पण बाहेर काही काढता येईना. आडवी, तिरकी सगळं करून बघितलं पण काढायला गेलं कि त्या डफळीच्या चकत्या त्याच्य कपाळाला , नाकाला घासत. डफली नवीन असल्यामुळे त्यांना धार पण होती.

आता मात्र मला पण टेंशन यायला लागलं. "उद्या मुंज ह्या मुलाची आणि आदल्या रात्री काय हा प्रकार. काय करावं . कशी बाहेर काढावी हि डफली .. ? "

इकडे मुलगा घायकुतीला आलेला, त्याची पळापळ सुरूच होती आणि वर एकोणी बडबड "आई, आता काय करायचं ? डफली निघतच नाहीये. बहुतेक माझं ऑपेरेशनच करायला लागेल .. माझं डोक तर नाही ना कापावं लागणारं .... "

आता मात्र शर्थ झाली. मी उसनं अवसान आणलं आणि त्याला पहिल्यांदा थांबवलं, पाणी प्यायला दिल. "अरे वेड्या, एवढं काही झालं नाहीये. आपण ती डफली कापून टाकूया. " तेव्हा कुठे त्याचा जीव भांड्यात पडला.

मग मी हळूच माझ्या भाच्याला सांगितलं "तू आठव बर कशी घातलीस ती डफली त्याच्या गळ्यात ? कुठला अँगल होता?" सगळं शांत झाल्यावर भाच्याला पण धीर आला. त्याने हळूच ती ड फली फिरवली, तिरकी केली आणि एका ठराविक अँगलला धरून ती डफली अलगद बाहेर आली. त्या सरशी परत लागले खदखदायला. "उफ्फ "त्या एका सेकांदाच्या चाळ्यांनी अर्धा पाऊण तास सगळ्यांना इतका मनस्ताप झाला !!

***

मी काही कामानिमित्त बाजूच्या डेस्क वर बसलेले. आम्ही दोघी मिळून तिच्या स्क्रीन वर काही बघत होतो. बोलता बोलता सहज चाळा म्हणून मी अंगठी एका बोटातून दुसरी बोटात फिरवत होते. अचानक ती चाफेकळीत गेली आणि काही केल्या बाहेर येईना. मला काळत नाही जाताना जाते तर येताना तशीच बाहेर कशी येत नाही ? असो! पण मग मला आठवलं आई बांगड्या घट्ट होत असतील तर साबण लावून काढते. मी तडक बाथरूम मध्ये गेले हाताला साबण चोपडला आणि अंगठी काढायला लागले. पण ती ढिम्म . काही केल्या पेराच्या पुढे सरकेना. उलट साबण आणि पाणी लावल्यावर बोटच फुगल्यासारखं दिसायला लागलं. रडकुंडीला येऊन डेस्कशी आले आणि बघते तर बोटाचा रंग काळा निळा होतोयंस वाटलं. आता मात्र मला जामच टेन्शन यायला लागलं. काय करावं कळेना. माझ्या बाजूच्या मैत्रिणीला दाखवलं "अग हे बघ ना अंगठी अडकलीय. साबण लावला तर अजूनच जाम झालीये. काय करू बहुतेक बोटच कापावा लागणार कि काय? डॉक्टरांकडे जाऊ का?"

"अग येडी आहेस का. पहिल्यांदा सोनाराकडे जा. ते अंगठी कापून टाकतील. आहे काय नि नाही काय ?" मी तडक निघाले. रिक्षा पकडली. जवळच्या सोनार कडे गेले. त्याने एका मिनटात त्याच्या कडच्या पक्कडीने अंगठी कापली आणि माझे बोट सोडवले. मी पैसे देऊ केले तर तेही नाकारले . हसत हसत मला म्हणे, "अहो ताई, ती अंगठी या बोटात गेली तरी कशी ? केव्हढी लहान आहे . " मी हसून थँक यू म्हणत उत्तर टाळलं , काय सांगणार . "हाताला चाळा ?"

हे किस्से वाचता वाचता तुम्हाला ह्या हातच्या चाळ्यांनी झालेले अजून जास्त गोंधळ आठवत असतील तर जरूर शेअर करा Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाताला चाळा + नसते उपद्व्याप Happy

अंगठी बाबत तर मला मुद्दाम ती बोटात जाते का आणि गेली तर मला ती शर्थीचे प्रयत्न करून बाहेर काढता येते का हे बघायची हौस आहे. (ईथे खाज आहे, किडा आहे असेही बोलू शकता)
आणि जेव्हा ते पटकन नाही जमत, रडकुंडीला येतो तेव्हा हा प्रयोग पुन्हा न करण्याचे स्वत!लाच वचन देतो पण पुन्हा जित्याची खोड मेल्याशिवाय जाईना होते.

अंगठी बोटात अडकली असेल तर बोटाभोवती दोरा गुंडाळत नेऊन अंगठी वरवर सरकवायची - अशी एक हॅक माहिती आहे. अंगठी बाहेरून बोटात सहज गेली आणि वर काढताना जमत नाहीये - अशा प्रसंगी ती उपयोगी पडते. एकदा करूनही बघितली होती. ज्यांना हौस असेल त्यांनी आपपल्या जबाबदारीवर करून बघा (अडकून बसल्यास कं ज ना). Happy

डफली किस्सा धमाल आहे.

मी कॉलेजला असताना एकदा घरी टीव्ही बघता बघता सहज चाळा म्हणून मागे असलेल्या दाराच्या कडीसाठीच्या भोकात (ज्यात कडी सरकवतो तिथे) बोट घातलं. मग ते निघेना. एकीकडे टीव्ही बघताना मी बोट काढायचा खूप प्रयत्न केला. शेवटी जमेना म्हटल्यावर सगळ्यांना सांगितलं. बाबांनी प्रयत्न केला, साबण वगैरे लावून पाहिला, पण निघेना. शेवटी कुणाला तरी बोलवून तो लूप कापावा लागणार असं वाटायला लागलं. तेवढ्यात कसं माहिती नाही, पण निघालं बोट!

शेवटी कुणाला तरी बोलवून तो लूप कापावा लागणार असं वाटायला लागलं. तेवढ्यात कसं माहिती नाही, पण निघालं बोट!
>>>>

हुश्श! चला आता कोणीतरी येऊन आपल्याला सोडवेल... असे मनाशी म्हणताच स्ट्रेस रीलीज झाले असावे Happy

छान धागा...

अगदी लहान असतांना पाटीवर लिहीण्यासाठी पेन्सिल वापरायचो.... प्रत्येक वेळी लिहीतांना पेन्सिलचा एक छोटा भाग नकळत पोटात जायचा, चवदार असायच्या Happy . एक दिवस अपघातांने एक छोटा तुकडा नाकात गेला. पेन्सिलचे समोरचे तोंड लिहून गोलाकार झालेले असते, आणि नाकांत आद्रता असते त्यामुळे प्रत्येक वेळी काढायला गेल्यावर तो तुकडा अजून आत सरकायचा... Sad

निकडीचा प्रसंग आला होता. वडिल बाहेरगावी कामावर होते, आईने शेजारच्या ताईंला सोबत घेतले आणि २-३ वेगवेगळ्या डॉक्टरांकडे नेले... शेवटी त्यापैकी कुणाला तरी यश आले. हुश्श. Happy

कडीसाठीच्या भोकात (ज्यात कडी सरकवतो तिथे) बोट घातलं. ... शेवटी कुणाला तरी बोलवून तो लूप कापावा लागणार असं वाटायला लागलं. तेवढ्यात कसं माहिती नाही, पण निघालं बोट!<<< बाप रे!

मी लहान असताना आई मला गणपती मंडपात पडद्यावर लागलेली मुव्ही पाहायला घेऊन गेली होती आम्ही सर्व घरून नेलेल्या सतरंजीवर बसलो होतो मुव्ही बघता बघता हाताला चाळा मातीत खड्यांबरोबर खेळता खेळता एक सहज नाकात घातला आणि तो निघेना झाले आधी आईने व तिच्या मैत्रिणींनी प्रयत्न करून बघितले तो खडा काही निघेना मग वडिलांनी डॉक्टरांकडे नेले व त्यांनी नाकात चिमटा घालून खडा काढला . आईने मग २/३ धपाटे मारून आपला मुव्ही न बघता येण्याचा राग काढला।

खेळता खेळता एक सहज नाकात घातला आणि तो निघेना झाले आधी आईने व तिच्या मैत्रिणींनी प्रयत्न करून बघितले तो खडा काही निघेना मग वडिलांनी डॉक्टरांकडे नेले व त्यांनी नाकात चिमटा घालून खडा काढला . आईने मग २/३ धपाटे मारून आपला मुव्ही न बघता येण्याचा राग काढला।<<<< आता हसू येत पण तेव्हा आईच्या तोंडच पाणी पळालं असेल

मला लहान पाणी पडद्या वरचे सिनेमे पहिल्याच आठवतंय ... एखाद वेळा रात्री ट्रेन मधून जात असताना पण बाबानी लांबवर दाखवल्याचे आठवतंय

यातला डफलीचा किस्सा वाचून मी किमान १५ मिनिटं डोळ्यातून पाणी येईस्तोवर हसलीये.

माझे केस अगदी सरळ होते (अजूनही आहेत). पण लहानपणी ते उगीच कुरळे करायचा, किमानपक्षी टोकं तरी वळती करायची अफाट क्रेझ होती. त्यामुळे मी बऱ्याचदा आपला साधासा कंगवा घेऊन त्याने केस पिळत बसायचे. वाचनाची प्रचंड आवड होती आणि वाचताना जाम तंद्री लागायची. असाच एकदा काहीतरी वाचताना एकीकडे कंगव्याभोवती केस गुंडाळणं चालू होतं. आणि त्या नादात अगदी पुढची एक बट मी पूर्णपणे कंगव्यात अडकवली आणि ती सुटत नाहीसं पाहून कंगवा केसात तसाच अडकवलेला ठेऊन शेवटी आईकडे गेले. आमच्या माताजी सुद्धा इतक्या भारी की आधी स्वतःच १०-१५ मिनिटं हसत राहिल्या, मग फायनली केस सोडवायची मोहीम हाती घेतली. त्यात एकीकडे नको ते उपद्व्याप केल्याबद्दल तोंडी उद्धार चालू होताच..अधेमधे "नाही सुटले तर सरळ ती बट कापून टाकीन"अशा धमक्याही मिळत होत्या. पण शेवटी खोबरेल तेल, शेजारच्या २ काकू आणि आई यांच्या एकत्रित प्रयत्नाने केस मोकळे झाले...आज याला किमान २० वर्षं नक्की झाली असतील पण आमच्या मातोश्री अजूनही हा किस्सा अलम दुनियेला रंगवून रंगवून सांगून आपली कार्टी किती धांद्रट आहे हे दाखवून देतात.

धम्माल किस्से आहेत, चाळ्यांचे.

धुळ्याला असतांना जवळच राहणार्या सख्ख्या काकांकडे गेले होते. तसे नेहमीच जायचे. कारण साधारण बरोबरीच्या चुलतबहिणी. दोन दोन वर्षाचे अंतर. तिन नंबरची माझ्या बरोबरची होती. आणि एक आमच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी. बर्यापैकी मोठ्या होतो आम्ही तेव्हा. म्हणजे १२वी/फर्स्ट इयर अश्या. तर या मोठ्या चुलत बहिणीने गप्पा मारता मारता हातातले किचेन तोंडात घातले. किचेनची मोठी रिंग समोरील वरच्या पटाशीच्या दातात अडकवली... तिचे दात तसे पक्केच होते... अजिबात फट नाही. अन अडकली ना ती रिंग! खुप काढायचा प्रयत्न केला..पण निघेनाच. तेव्हा तश्याच अवस्थेत आमची वरात डॉक्टरकडे गेली अन तिथे कुठे ती निघाली. Proud
हे आठवुन आजही आम्ही सगळे जाम हसतो.

मी_आर्या
किचेन चा किस्सा काहीच्या काहीच.

गोगा
केसांच्या कंगव्याने बरेचदा घोळ झालेत पण तेवढ्यात सुधारले गेले

Back to top