कोबालामिन (ब-१२) : एक अनोखे व्हिटॅमिन

Submitted by कुमार१ on 22 January, 2019 - 23:37

जीवनसत्वे : भाग ७

(भाग ६ : https://www.maayboli.com/node/68772)
**************************************

‘ब’ गटातले हे जीवनसत्व वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामध्ये कोबाल्ट हे मूलद्रव्य असून अशा प्रकारचे ते आपल्या शरीरातील एकमेव संयुग आहे. त्याचा शोध १९४८ मध्ये लागला आणि त्यानंतर जीवनसत्वांच्या अधिकृत यादीत एकाचीही भर पडलेली नाही. निसर्गातील विशिष्ट जीवाणूच ते तयार करू शकतात. आपल्या मोठ्या आतड्यांत तसे काही उपयुक्त जीवाणू असतात आणि त्यांच्यामार्फत आपल्याला थोडे ब-१२ मिळते. अर्थात तेवढ्याने आपली गरज भागू शकत नसल्याने आपल्याला ते आहारातूनही घ्यावे लागते.
ब-१२ चे आहारस्त्रोत, शरीरातील कार्य आणि त्याच्या अभावाची कारणे व परिणाम यांचा आढावा लेखात घेतला आहे.

आहारस्त्रोत
:

b12.jpg

ब-१२ चे बाबतीत एक मूलभूत गोष्ट म्हणजे कुठल्याही वनस्पतीत ते नसते. पण, जर पालेभाज्या रसायनमुक्त शेतीतून निर्माण केल्या तर त्यांच्यात काही उपयुक्त जीवाणू राहतात आणि त्यांच्या माध्यमातून या भाज्यांत ब-१२ येते. तसेच शिळ्या अन्नातही जीवाणूंची वाढ होते आणि अशा अन्नसेवनातून ते आपल्याला मिळू शकते.

प्राणिज पदार्थ मात्र भरपूर ब-१२ पुरवतात. यकृत, अंडे, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हे त्याचे महत्वाचे स्त्रोत.
यीस्ट हाही एक त्याचा वैशिष्ट्यपूर्ण स्त्रोत. त्याचा वापर करून बनवलेले शाकाहारी पदार्थ हा अशा लोकांसाठी दिलासा असतो. ‘व्हेगन’ खाद्यशैलीतून मात्र ते मिळणे अवघड असते. अलीकडे ब-१२ ने ‘संपन्न’ केलेली काही खाद्यान्ने बाजारात मिळतात.

ब-१२ चे पचनसंस्थेतून शोषण:
हा एक गुंतागुंतीचा विषय आहे. अन्नातले ब-१२ प्रथिनांशी घट्ट संयोग झालेले असते. प्रथम ते जठरात येते. तिथल्या हायड्रोक्लोरिक आम्ल आणि एन्झाइमच्या मदतीने ते सुटे केले जाते. नंतर तिथले IF नावाचे एक प्रथिन त्याच्याशी संयुग पावते. ही एक आवश्यक क्रिया आहे. पुढे हे संयुग लहान आतड्यांतून मार्गक्रमण करीत आतड्याच्या शेवटच्या भागात पोचते. तिथे त्याचे विघटन होऊन ब-१२ शोषले जाते. पुढे ते रक्तप्रवाहातून यकृतात पोचते आणि तिथे त्याचा मोठ्या प्रमाणात साठा होतो. पुढे ते गरजेनुसार सर्व शरीराला पोचवले जाते.

शरीरातील कार्य :
अन्य ‘ब’ जीवनसत्वांप्रमाणेच तेही काही रासायनिक क्रियांमध्ये सह-एन्झाईमचे काम करते.
१. याद्वारे ते पेशींतील DNA व RNA या मूलभूत रेणूंच्या उत्पादनात मदत करते. याकामी त्याला फोलिक असिड या अन्य ‘ब’ जीवनसत्वाचीही मदत होते.
२. मज्जातंतूंच्या कामातही त्याचे योगदान आहे.

३. अलीकडील संशोधनातून त्याचा हाडांच्या आरोग्यासाठीही संबंध असल्याचे दिसले आहे. ते अस्थिजनक पेशींच्या योग्य वाढीसाठी मदत करते.

अभावाची कारणे
:
१. अतिशुद्ध शाकाहारी (व्हेगन) खाद्यशैली: गेल्या दोन दशकांत हा खूप कुतूहलाचा व चर्चेचा विषय झालेला आहे. येथे काही मुद्दे लक्षात घ्यावेत. सहसा जन्मल्यापासून कुणीच अशी शैली आचरत नाही. तेव्हा तथाकथित ‘शाकाहारी’ हे दूध वा दुग्धजन्य पदार्थ खात असतात आणि त्यातून ब-१२ मिळते. त्याची रोजची गरज काही मायक्रोग्राम इतकीच आहे. पुन्हा आपल्या यकृतात त्याचा भरपूर साठा होत असतो. साधारणपणे हा साठा आपल्या ५ वर्षांच्या गरजेइतका असतो. तेव्हा व्हेगन शैली आचरणात आणल्यानंतर काही वर्षांनी अभावाची लक्षणे दिसतील.

२. जठरातील पेशींची वयानुरूप झीज होते आणि त्यामुळे वृद्धांमध्ये IF चे उत्पादन कमी होऊ लागते. तसेच अन्य काही आजारांमध्येही अशी झीज होते.
३. पचनसंस्थेचे काही आजार : यांत ब-१२ चे शोषण नीट होत नाही.

४. IF ची अनुवांशिक कमतरता : हा ऑटोइम्युन प्रकारातील आजार आहे.
५. अलीकडे लठ्ठपणा कमी करण्यासाठी पचनसंस्थेवर काही शस्त्रक्रिया केल्या जातात. त्यात जठराचा काही भाग काढून टाकला जातो. त्यामुळे IF चे प्रमाण खूप कमी होते आणि त्याचा परिणाम ब-१२ चे शोषणावर होतो.

अभावाचे परिणाम:
शरीरातील सर्वच पेशींच्या वाढीवर परिणाम होतो परंतु, तो लालपेशी आणि मज्जासंस्थेवर प्रकर्षाने दिसून येतो. रुग्णात साधारण खालील लक्षणे दिसतात:
१. रक्तक्षय आणि त्यामुळे येणारा अशक्तपणा: हा रक्तक्षय लोहाच्या कमतरेतून होणाऱ्यापेक्षा वेगळ्या प्रकाराचा असतो. यात लालपेशी मोठ्या आणि विचित्र आकाराच्या होतात.

२. हातापायांना ‘मुंग्या’ येणे आणि चालताना अस्थिर वाटणे: मज्जारज्जू व मज्जातंतूवर दुष्परिणाम झाल्याने हे होते.
३. काही रुग्णांत मनस्वास्थ्य बिघडू शकते आणि विस्मरण होते.

४. वृद्धावस्थेत हाडे ठिसूळ होणे.

वृद्धावस्था आणि ब-१२ चा पुरवठा:
या अवस्थेत जठराची पचनशक्ती बरीच कमी झालेली असते. त्यामुळे नैसर्गिक आहारातील ब-१२ शरीरात नीट शोषले जात नाही. याउलट ‘संपन्न’ खाद्यांतले अथवा गोळ्यांच्या रुपातले ब-१२चे व्यवस्थित शोषण होते. त्यामुळे अशा स्त्रोतांचा वापर वृद्धांमध्ये गरजेनुसार जरूर करावा.

‘ब १२’-ची रक्तपातळी:
अलीकडे समाजात रक्तावरील चाळणी चाचण्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याची जाहिरातबाजीही भरपूर होते. काही वेळेस गप्पांतून अशी टूम निघते की, “शाकाहारी आहात ना, मग मग घ्या एकदा ब-१२ मोजून”. पण वैद्यकीय सल्ल्याशिवाय या फंदात पडू नये. याची काही कारणे आहेत.

ब-१२ मोजण्याच्या ज्या प्रयोगशाळा-पद्धती आहेत त्यांच्यात एकवाक्यता नाही. आंतरराष्ट्रीय पद्धती सतत विकसित होत असतात, पण गरीब देशांत त्या वेगाने प्रस्थापित होत नाहीत. ‘नॉर्मल पातळी’ कशाला म्हणायचे याबाबतीतही गोंधळ आहे. एकाच रक्तनमुन्याची दोन ठिकाणी केलेली मोजणी बरेचदा जुळणारी नसते. काही वेळेस पातळी ‘नॉर्मल’ पेक्षा कमी असेल तरीही त्या व्यक्तीत संबंधित आजाराची लक्षणे बिलकूल नसतात. म्हणून काही त्रास नसेल तर उठसूठ या चाचणीच्या फंदात पडू नये.
********************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डॉ. कुमार,
ब 12 पुरेसे मिळवण्यासाठी दूध व अंडे यातील अधिक योग्य काय राहील ?

साद, चांगला प्रश्न.

ब १२ ची रोजची गरज २मायक्रो ग्रॅम.
१५० मिली दूध : १.२ ----,,-----–-
१ अंडे : ०.४४ ---,,-–---
समकक्ष ब १२ मिळण्यासाठी २ पर्याय राहतील:
१) रोज १ ग्लास दूध +१ ग्लास ताक , किंवा
२) ४ अंडी

तसेच दुधातून मिळणाऱ्या ब ची उपलब्धता अंड्यापेक्षा थोडी जास्त आहे.
वरील तुलना करून आवडीनुसार निर्णय घ्यावा.

धन्यवाद डॉक्टर!
अगदी परिपूर्ण माहिती मिळाली. आता दूध, दही व अंडे यांचा समतोल आहारात ठेवेन.

माहितीपूर्ण लेख.
शेवटचे दोन परिच्छेद D साठीदेखील होते ना?

===
> मी जाड नाही आणि माझ्यासाठी जाड होण्यासारख दुसरं दु:स्वप्न नाही. > +१ Lol

शेवटचे दोन परिच्छेद D साठीदेखील होते ना >>>>
होय. एकंदरीत जीवनसत्वे मोजण्याच्या प्रयोगशाळा पद्धती अतिसूक्ष्म प्रकारच्या असतात. पुन्हा त्या सतत विकसित होत असतात. आपल्या 'नेट' च्या ४-G, ५-G सारख्या.

लेख आवडला..
हातापायांना ‘मुंग्या’ येणे आणि चालताना अस्थिर वाटणे: मज्जारज्जू व मज्जातंतूवर दुष्परिणाम झाल्याने हे होते.>> हे B-१२ च्या कमतरते मुळे होत तर ब-१२ सप्लिमेन्ट ने बर वाटेल का ?

अपर्णा, धन्यवाद.
'मुंग्या' येण्याची इतरही कारणे असू शकतात. तेव्हा डॉ चा सल्ला घ्यावा.
जर ब १२ चा अभाव हे नक्की झाले तर त्या गोळ्या घ्याव्यात.

माझं ब१२ चक्क खूप वाढलय असं तपासणीतून लक्षात आलं. त्याचेही काही दुष्परीणाम आहेत का? माझी टाच दुखायला लागली म्हणून सगळ्या तपासण्या झाल्यात.

त्याचेही काही दुष्परीणाम आहेत का>>>
नाही. जेव्हा याच्या गोळ्या अतिरिक्त घेतल्या जातील तेव्हा एका प्रमाणापर्यंत ते यकृतात साठवले जाईल. पण त्यानंतर सरळ लघवीतून बाहेर जाईल.
टाचे ची कारणे अस्थीरोग स्वरूपाची असावीत.

मागे माझे B12 कमी होते म्हणून डॉक्टरांनी गोळ्या दिल्या होत्या. ४ महिने खाल्ल्या.
काल रिपीट टेस्ट केली तेव्हा रिपोर्ट असा आला आहे
VitB12 ( CMIA) – 233 (187-883 pg/ml)
डॉक्टर म्हंटले अजून चालू ठेवा

साद
सुधारणा होते आहे .चालू ठेवा
शुभेच्छा

B12 च्या उपयुक्ततेसंबंधी नवे संशोधन सतत चालू असते. अलीकडच्या काही संशोधनानुसार या जीवनसत्त्वाचा खालील आजारांमध्ये उपयोग होऊ शकतो:

विषाणू संसर्ग : पूरक उपचार
पार्किन्सन आजार: प्रतिबंधात्मक उपचार

B12 सप्लिमेंट नाकात फवारा द्वारे उपलब्ध झाले आहे.
याचा कितपत फायदा होतो यावर पुरेसा विदा उपलब्ध आहे का?

२०२१ सप्टेंबर मध्ये मी पाच इंजेक्शन्स आणि नंतर हा फवारा घेतला. B12 ची रक्तपातळी नंतर मोजली तेव्हा 90 वरून 900 च्या घरात आली होती.

या वर्षी सप्टेंबरमध्ये फवारा घेतला पण आधी नंतर b12 पातळी मोजली नाही.
पुढल्या वर्षी बहुतेक मोजून घ्यायला सांगतील तेव्हा आधी आणि नंतर वैयक्तिक काय फरक पडतो बघता येईल.

मानव
तो फवारा निवडक रुग्णांमध्येच वापरावा अशी शिफारस आहे. त्याचे फारसे दीर्घकालीन अभ्यास आणि विदा उपलब्ध नाहीत.

अच्छा, धन्यवाद.
म्हणजे डॉकने मला निवडक रुग्ण म्हणुन निवडलेय तर.

Pages