पाऊसवेळ

Submitted by साजिरा on 2 November, 2022 - 06:40

पद्मावतीपर्यंत आलो तेव्हाच आईचा फोन आला, आणि तो उचलल्यावर लगेच चिटणीसांचा कॉल वेटिंगवर. आता आई लवकर फोन ठेवणार नाही, आणि तोवर हे साहेब पुन्हा पुन्हा कॉल करत राहणार, हे ठरलं. याच्या अगदी विरूद्ध झालं असतं, म्हणजे समजा यांचा फोन आधी आल्यामुळे तो घेतल्यावर कॉल वेटिंगवर आईचा फोन आला असता तरी हेच झालं असतं. म्हणजे चिटणीस आपले बोलताहेत, बोलताहेत, आणि आई लेकराच्या अपार काळजीपोटी पुन्हापुन्हा माझ्या कॉल वेटिंगवर येतेय. माझी अवस्था दोन्ही केसेसमध्ये सारखीच.

आईचं फोनवर अर्थातच तेच ते नेहेमीचं- अरे, असा कसा वेंधळा तू, आणि किती दिवस असंच करत राहणार, आणि सकाळी तू इतकी पळापळ घाईघाई करत जाऊ नकोस बघू, आणि त्यामुळे तू नीट खाऊनही जात नाहीस, आणि त्यामुळे तुझी सारखी काहीतरी गडबड होते, आणि त्यामुळे काहीतरी विसरलं जातं, आणि त्यामुळे काहीतरी घोळ होतो, आणि त्यामुळे..

मी स्क्रीनवर चिटणीसांचं नाव बघून म्हणालो- आई काय झालं ते सांगतेस का पटकन? म्हणजे कसं की तू तुझ्या कामाकडे, आणि मी माझ्या. तर म्हणे- माझं कसलं काम डोंबलाचं? आता तुझ्या आयुष्यात कुठे काय मागे काहीतरी राहून गेलंय, हे बघत राहणं हेच माझं काम. बाकी अख्खं आयुष्य लढाया करत घालवलं ते म्हणजे यापुढे काहीच नाही! मीच वेंधळी असते तर बरं झालं असतं बाबा. तुझे बाबा म्हणत होते ते खरं तर..

आईने इथं पॉझ घेतला ते बरं झालं. मी कमीत कमी- आई काय झालंय सांगतेस का- इतकं उच्चारू शकलो. मग ती नाईलाजाने म्हणाली- इथं हॉलमध्ये टीपॉयवर तुझा एक चेक राहिलेला दिसतो. आणि बेडरूमध्ये आणखी काहीतरी कागदं. तू ब्रेकफास्ट करत असताना तावातावाने काहीतरी लिहित होतास की नाही हातवारे करत? तर ते तुला नकोय का? जा बापडा, मला काय-

पद्मावतीचा सिग्नल यू-टर्न घ्यायला बरा आहे हे नशीबच म्हणायचं. एक चौक पुढे गेलो असतो, तर आणखी बरंच पुढे जावं लागून यात्रा वाढली असती. आईला प्रणाम करून मी शेवटी चिटणीसांचा फोन घेतला. नाहीतर हा इसम मला कल्पांतापर्यंत फोन करत राहिला असता.
****

आईला आणि घराला प्रदक्षिणा घालून मी परत आलो, तेव्हा चिटणीस माझ्या ऑफिसच्या बाहेर ऐटीत सिगरेट ओढत उभे होते. माझ्या ऑफिसचं दारही त्यांनीच उघडून मला- या या- म्हणून वेलकम वगैरे केलं, तेव्हाच हे साहेब डोक्यात काहीतरी भन्नाट आयडिया घेऊन आले होते, आणि अपार उत्साहात होते हे मला कळलं.

मग म्हणे- त्यांच्या फर्मचं स्वरूप मुळातच मल्टिटास्किंग आहे. त्यामुळे काय आहे, की लोगो ग्राफिक फार क्रिएटिव्ह नसलं तर चालेल, पण 'सिरियस' पाहिजे. 'कॉर्पोरेट' पाहिजे. आम्ही सीए आहोत, सीएस आहोत, टॅक्स कंसल्टंट आहोत, लेबर लॉ-पेरोल-ट्रेनिंग-प्लेसमेंट इ. कंसल्टंट आहोत, बिझनेस डेव्हलपमेंट अँड अ‍ॅनालिसिस एक्स्पर्ट आहोत, फायनान्स-कॉस्टिंग-अकौंटस तज्ज्ञ आहोत..

आता या कंपनीतले हे तीन पार्टनर इतके काय काय आहेत हे मला ऐकून माहितीच होतं, तरी चिटणीसांनी ते पुन्हा सांगितल्यावर मला काँप्लेक्स आलाच- एकच काम वर्षानुवर्षे करून तेही नीट कसं जमत नाही आपल्याला?

मग मी आमच्या आर्टिस्टला आत बोलावलं, आणि नंतर मला काहीच करावं लागलं नाही. कारण चिटणीसांनीच परस्पर त्याला चार उपदेश केले. शेवटी सफाईदार काम कसं करावं हेही सांगितलं, पण त्यानंतर- तसं तू केलेलं काम आम्हाला आवडलंच आहे- असंही सांगायला विसरले नाहीत.

चिटणीस त्यानंतर गेले, पण त्याआधीचं त्यांचं हस्तांदोलन नेहेमीसारखंच जोरदार होतं. जाताना पुढच्या आठवड्यात येतो, आमच्यासाठी वेळ ठेवा- अशी धमकी देऊन गेले.

***

पुढच्या आठवड्यात चिटणीस आले तेव्हा जरा आणखी खुश दिसले. त्यांच्या मनाप्रमाणे आमच्या माणसाने काम केलं असावं. पण मला म्हणाले- जरा तुमची मतं हवी आहेत.

मी आमच्या अर्टिस्टने केलेलं आणि चिटणीसांनी जवळपास फायनल केलेलं आर्टवर्क समोर घेतलं. रेषा, चौकोन, त्रिकोण, आयत, वर्तुळ वगैरेंची एक भौमितीय रचना होती ती. त्याचा अर्थ काय होत होता, ते एक चिटणीसच जाणे.

वरती बघा- चिटणीस म्हणाले- वर, त्या एका आडव्या लाईन आणि सर्कल मधे जी स्पेस आहे ती वाढवून लाईनचा थिकनेस आणखी वाढवला तर कसं वाटेल. मला सारं कॉर्पोरेट हवं आहे. तुमचा अनुभव आणि नजर तयार आहे. म्हणून तुमचा सल्ला घ्यावा वाटला.

मी पुन्हा एकदा त्या ग्राफिककडे बघितलं. सध्याची रचना जितकी ठोकळेबाज होती, तितकीच ठोकळेबाज तिच्यात चिटणीसांनी सांगितलेले बदल केल्यानंतर ती राहिली असती असं मला वाटलं. मला काय बोलावं हे सुचेना, म्हणून मी नेहेमीचा संवाद म्हणून टाकला- व्हिज्युअल तयार आहे. आता यात ज्या काही खूप छोट्या गोष्टी इन्कॉर्पोरेट करून ते फायनल करायचं आहे, त्यात आमची नाही, तर तुमची मतं जास्त महत्वाची आहेत, कारण हे ग्राफिक तुम्हाला आणि तुमच्या कंपनीला कदाचित आयुष्यभर कंपनीचा लोगो आणि चेहेरा म्हणून वागवायचा आहे.

चिटणीसांचा चेहेरा झरझर बदलला. त्यांच्या काळ्या ओठांवर समाधानाचं हसू आलं. माझ्या एका पाठ करून ठेवलेल्या संवादाने त्यांच्यावर इतका परिणाम होईल असं मला खरंच वाटलं नव्हतं.

मी विचार करतो, पार्टनर्सशी बोलतो, मग उद्या परवा आपण ठरवू आणि ट्रेडमार्क रजिस्टर करू- चिटणीस म्हणाले. निघताना नेहेमीप्रमाणेच हस्तांदोलन. मात्र यावेळी ते विचारमग्न होते बहुतेक. सारं शरीर हलवणारं त्यांचं हस्तांदोलन अगदीच मृदू आणि सौम्य होतं.
***

चिटणीस मग नंतर अनेक वेळा आले, त्यांनी अनेक गोष्टी अनंत घोळ घालत, शंका काढत आणि फार बारीक बघत, निरीक्षण करत, माझे सो-कॉल्ड सल्ले आणि मतं घेत एकदाच्या फायनल केल्या. मी कधी सिरियसली आणि कधी गांभीर्याने उत्तरंही दिली. पण त्यांच्या सततच्या- तुमचं मत महत्वाचं आहे, यातली अनुभवी माणसं तुम्ही- या पालुपदाचा कंटाळा येऊ लागला होता. मात्र तो सहसा दाखवायचा नसतो, हे इतक्या वर्षांनंतर मला कळलं होतं. यतीन, आमचा आर्टिस्टही तसा धीराचा. कुणी कितीही चुका सांगितल्या, शंभर वेळा दुरूस्त करायला सांगितलं, तरी हा आपला शांत. काही क्लायंट्सबद्दल तर त्याला मला सांगावं लागे- बाबा, आता बस. इतकी व्हेरिएअश्न्स करायला, आणि त्यांच्या सततच्या बदलत्या लहरी सहन करण्याबद्दल तर आपल्याला ते देत आहेत, त्यापेक्षा कितीतरी पट पैसे मिळाले पाहिजेत-
***

असेच एकदा आमच्या यतीनशी भरपूर आट्यापाट्या खेळून झाल्यावर चिटणीस शेवटी फारच खुष दिसले. मनासारखं काहीतरी झालं असावं. ते सरळ माझ्याकडे येऊन म्हणाले- चला खाली कॅंटीनीत चहा घेऊ.

मी म्हणालो- इथंच येईल की चहा. तर म्हणे ऑफिसमध्ये वेगळं, दुकानातल्या चहाच्या आवाजी आणि सुगंधी वातावरणात चहा पिणं वेगळं-
टेबलावरचा पसारा आणि कॉल्स बघता मला ते शक्य नव्हतं. चिटणीसांनी आणखी दोनदा तेच सांगितलं, तेव्हा मी किंचित खालच्या पण व्यावसायिक सुरात म्हणालो- सॉरी चिटणीस, चहा इथं येईल पाहिजे तर. मला खूप काम आहे.

मग त्यांचा नाईलाज झाला असावा. किंचित पडेल चेहेर्‍याने, पण तरीही त्यांनी निरोपाचा शेकहॅंड केला. आताही त्यांचा शेकहँड नेहेमीप्रमाणे बळकट नव्हता. मला स्पष्ट जाणवलं- त्यांचा हात जरा जास्त रेंगाळला होता.
***

पुढच्या वेळी एकदा ते आले तेव्हा जाताना पुन्हा आत आले. मी कर्तव्य म्हणून आणि नाईलाजाने विचारलं- बसा, चहा घेणार?
ते किंचित हसून म्हणाले- चहा चालला असता, पण इथं नको. पुन्हा तेच की. तुम्ही खाली येत नाही..
मी नाराजी न दाखवता, काहीच न बोलता किंचित ओठ आवळले, पण त्यांच्या लक्षात आलं. मग घाईघाईने म्हणाले- सिगरेट ओढता का? ओढत असाल असं वाटतं. जरा बाहेर जाऊ मग मोकळ्या हवेत, तुम्ही ओके असाल तर.

चिटणीस अपेक्षेने माझ्याकडे बघत होते. ते एक असो, पण आताची त्यांची नजर जरा वेगळी होती. मला अगदीच अवघडल्यासारखं झालं , आणि मी नजर वळवली. नाही, मी ओढत नाही- मी कसाबसा, आणि खोटंच बोललो. तसे ते नाईलाज झाल्यासारखे ते सावकाश उठले.

मग पुन्हा निरोपाचं हात हलवणं. इच्छा नसतानाही काहीतरी जाणवल्यागत, पण यांत्रिकपणे त्यांचा हात हातात हात घेतला. तोच मऊ ऊबदार हात. मला किंचित शिसारी आली. मी त्यांचा हात हलक्यानेच, पण झटकून टाकल्यासारखं केलं आणि पटकन वळून मोबाईलमध्ये काहीतरी बघू लागलो.

चिटणीस गेले तेव्हा कसलं तरी अनामिक दडपण उतरल्यागत झालं. मला इतकं अस्वस्थ वाटायचं काय कारण होतं? मला अनेक जिवलग मित्रांच्या मिठ्या आणि शेकहॅंड, अंगचटीला येऊन मस्ती करणं असं कितीतरी पटापट आठवून गेलं. आताच का मला असं वाटतंय?

वय वाढलं, की एकेकाळच्या निखळ-निरागस असलेल्या आपल्या संवेदना आता वेगळं वळण घेत आहेत, की आणखी काय?
की मग चिटणीसांच्या सावळ्या चेहेर्‍यातून, किंचित थरथरणार्‍या काळ्या ओठांतून, आणि आर्द्र तळहातांतून आपल्याला काही नव्याने जाणवलं? समोरचा काहीतरी सांगायचा प्रयत्न करत असल्यागत, काहीतरी मागायचं असल्यागत किंवा आधार पाहिजे असल्यागत- असं काहीतरी त्या स्पर्शामध्ये होतं?

बराच वेळ मला उगाच अस्वस्थ वाटत राहिलं. झटकून टाकायचा प्रयत्न करूनही ते मनातून जाईना. नंतर घरी आलो, आणि मग मात्र सारं विसरलो. अनेक पुटं चढून, ते दुपारचं घडलेलं सारं कुठेतरी पार तळाशी गेलं.

मग झोपताना अचानक ते सारं आठवलं, तर हसूच आलं. उगाच डोक्याला असले शॉट लावून घायची सवय मोडली पाहिजे. काहीही मनात घेऊन खेळत बसायचं म्हणजे काय खरं नव्हे. काहीही स्क्रिप्टं उगाच जन्म घेतात आणि आपला फुकट्चा सिनेमा होऊन बसतो झालं.
***

एक दिवस ऑफिसमध्ये आलो, तर चिटणीस आधीच हजर.

माझ्या कपाळावर नकळत आठी चढली. आधीच घरात काही कागदपत्रं सापडत नसल्याने वैतागलो होतो. खूप वेळ झाल्यावर आई चिडून म्हणाली- हे बघ, तुला शेवटचं सांगत्ये- तुझ्या वस्तू तू नीट ठेवत जा. एक ड्रॉव्हर किंवा एक बॅग किंवा एकाच कपाटात सारं काही वगैरे, अशी काही तरी व्यवस्था कर. तुझाच वेंधळेपणा, नंतर तूच घर डोक्यावर घेणं आताशा मला सहन होत नाही- वगैरे. मग तसाच निघालो तिरमिरीत ऑफिसला.

मी काही न बोलता आत आलो, तसे हे महाशय माझ्या पाठोपाठ आत. मग काही न बोलता खाली मान घालून विचारांत बसून राहिले. हे प्रकरण आता लवकर मार्गी लावावं म्हणून मी मग स्वतःच विचारलं- काय चिटणीस, आज काय विशेष? कसं येणं केलंत?

विशेष काही नाही. पण तरी तसं आहेच- चिटणीस जरा पडेल आवाजात म्हणाला- जरा तुमचं मत विचारायला आलो होतो.

पुन्हा मत. पुन्हा सल्ला.

त्याचं काय झालंय- चिटणीस म्हणाले- इतका विश्वास ठेऊन मी या दोघा पार्टनर्सशी माझा धंदा शेअर केला. तर हे उलट्या काळजाचे निघाले. किती छोट्या मोठ्या गोष्टींत फसवलं हे आता एकेक कळतंय. बॅकेच्या व्यवहारांत, क्लायंटच्या पैशांत, ऑफिसच्या भागीदारीत. इतकंच नव्हे, तर माझ्या धंद्याच्या नावासकट ट्रेडमार्कही त्यांनी रजिस्टरही करून घेतला त्यांच्या नावानं. आता क्लायंट्सना काय वाटेल ते खोटंनाटं सांगून फितवायला सुरूवात केली आहे. पण मी असा हरणार नाही. या धंद्यासाठी मी रक्ताचं पाणी केलं आहे. जुने इन्व्हॉईस, चलनं, वर्क ऑर्डर्स, नाववापराचे पुरावे आणि प्रोप्रायटरशिपचे कागद हे सारं माझ्याकडे आहे. मी असा सोडणार नाही यांना-

मग त्यांनी त्यांची लेदरची बॅग टेबलावर ठेवली आणि तीतून खूप कागद आणि फायली बाहेर काढले. माझ्या अंगावर काटा आला. आता माणूस किती बोलत नसणार, काय सांगणार, आणि मी त्याला काय सल्ला देणार?

मग एकेक कागद ते असोशीने दाखवत राहिले आणि अपेक्षेप्रमाणेच खूप बोलतही राहिले. मी काहीतरी थातूरमातूर उत्तरं देऊन त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला, पण तेवढ्यानंच ते जरा आश्वस्त झाल्यागत दिसले. काळेकरडे ओठ थरथरवत त्यांनी आभार मानले. सगळे कागद पुन्हा बॅगमध्ये भरले. त्यांनी नेहेमीप्रमाणेच हातात हात घेऊन हलवलाही. माझं लक्ष चिटणीसांच्या नावाची ब्रासची इनिशियल्स डौलदारपणे मिरवत असलेल्या त्या सुबक सुंदर बॅगकडे होतं.

आपणही अशी एक छान बॅग आता घेतली पाहिजे, कायमस्वरूपी सोबत ठेवली पाहिजे--
***

दोन तीन महिन्यांनंतर चिटणीस पुन्हा ऑफिसला माझ्या आधीच हजर. मी अता जरा घाईत आहे, नंतर भेटू- असं म्हणणारच होतो, पण तेवढ्यात त्यांच्याकडे पाहिलं तर ते आजारल्यागत दिसले. दाढीचे काळेपांढरे खूंट, डोक्यावरच्या केसांची पर्वा नसल्यागत आणि मुख्य म्हणजे आज पहिल्यांदाच शर्ट पँटीत खोचलेला नव्हता..

मला आधी नवल वाटलं. पण मग- धंद्याची भांडणं विकोपाला गेली असावीत. त्यामुळे असं अस्वस्थ होणं साहजिकच आहे- असं मनात आलं.

नेहेमीप्रमाणे मी न बोलावताच ते माझ्यामागून आत आले आणि खांदे पाडून, तळहात खुर्चीत थकल्यासारखे टेकवून बसून राहिले.

नाईलाजाने मी स्वतःच विचारलं, तर म्हणे- आता माझ्या घरातही फसवाफसवी सुरू झाली. या बिझनेस पार्टनर्सनी चुलतभावांचे कान आधीच भरले होते, आता सख्खे भाऊही त्यांना जाऊन मिळाले. घरामध्ये माझा वाटा नसल्याची भाषा करताहेत, कारण काय तर तीन-चार वर्षांपुर्वी मी ऑफिस विकत घेतलेलं ते घरातनं पैसे उचलून! बिचारी आमची आई भोळी. ती किती दिवस माझ्याबाजूने नेट लावून या भामट्यांसमोर बोलणार? पण मी असातसा सोडणार नाही कुणाला. हे बघा, सारी कागदपत्रे मी माझ्याकडे ठेवली आहेत. वकिलाची नोटिस देणारच आहे, पण त्याआधी रीतसर पोलिस तक्रारही करणार आहे. हे बघा, डिटेल तक्रार अर्जच तयार करतो आहे मी-

पुन्हा त्यांची ती बॅग त्यांनी टेबलावर ठेवली. चेन तुटल्यामुळे आणि खूप कागद आत कोंबून भरल्यामुळे तीही आता जरा चिटणीसांसारखी अस्ताव्यस्त दिसत होती. त्यांनी उचकपाचक करून तीनचार फुलस्केप भरून सुबक अक्षरांत लिहिलेला, पण किंचित चुरगाळलेला त्यांचा तो तक्रार अर्ज बाहेर काढला.

आता या अशा प्रकरणात मी त्यांना काय सल्ला देणार? मला खरंच वाईट वाटत होतं, पण आपल्यालाही सगळ्या बाजू नीट कुठे माहित असतात? सांगणारा त्याच्या बाजूने आणि त्याच्या परीने सांगतो त्यातून जेवढं कळतं तेवढंच. मी त्यांना आमच्या दोन वकील क्लायंटचे नावनंबर दिले, शिवाय पोलिस स्टेशन मधली एक जुजबी ओळखही सांगितली. तेवढ्यानेही त्यांचं समाधान झालं.

अगदी खरं सांगायचं तर मला तुमच्यासारख्यांचा आधार वाटतो- चिटणीस ओठांत हसत म्हणाले- आजपासून माझ्या सार्‍या क्लायंट्सना भेटायला सुरूवात करणार आहे. फार पुर्वीपासून त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला, तो असाच वाया जाणार नाही. ऑफिसात काय घडलं हे सगळं सांगणार त्यांना. या नालायक लोकांना माझ्या जागेत आणि माझ्या जगात सुखासूखी बूड टेकू देणार नाही मी-

नंतर ते सावकाश उठले. हातात हात घेऊन हलवला. त्यांच्या ओलसर मऊ तळहातांतून या वेळी मी जरा झटका देतच हात सोडवून घेतला. न राहवून त्यांच्याकडे पाहिलं तर मघाचं स्मित मावळलं होतं. चेहेरा केविलवाणा झाला होता, डोळे सशासारखे झाले होते.
***

आणखी काही महिन्यांनी मला चिटणीस पद्मावतीच्या फुटपाथवर अचानक दिसले.

म्हणजे दिसले ते चिटणीस आहेत हे मला नंतर कळलं.

मला जरा शंका आली म्हणून मी गाडी कडेला पार्किंगच्या जागेत थांबवली, आणि नीट बघत राहिलो. या ठिकाणी बराच रूंद फुटपाथ आहे, शिवाय सायकल ट्रॅकही. पाठमोरे चिटणीस पन्नासेक पावलं चालून परत फिरले, आणि मला चटका बसल्यागत झालं. चिटणीस ओळखू येणार नाहीत इतके बदलले होते. दाढी आणि केस अस्ताव्यस्त वाढलेले, पायांत चप्पल-बूट काही नाही. पाठीवर प्लास्टिकची एक मोठी थैली होती. (तीत अर्थातच त्यांचे ते महत्वाचे कागद असतील. पण मग त्या लेदर बॅगचं काय झालं?) डोळे लालभडक आणि खोल गेलेले, पाठीत पोक आलेलं. कपडे स्वच्छ दिसत असले तरी शर्ट चुरगाळलेला, पँट खाली कशात तरी अडकून फाटलेली.

धक्का बसून मी पाहत राहिलो. ते परत येऊन माझ्या गाडीला ओलांडून पुढे तसेच पन्नासेक पावलं गेले, आणि आधीच ठरलेलं असल्याप्रमाणे पुन्हा वळले. मला ओलांडून फुटपाथवरून खाली मान घालत सावकाश मला ओलांडून गेले. सिग्नलपर्यंत गेल्यावर पुन्हा यू-टर्न.

या अशा फेर्‍या कधीपासून मारताहेत हे? आता, किंवा कदाचित आणखी एका फेरीनंतर कदाचित थांबतील, म्हणून मी त्यांच्या पाच-सहा फेर्‍या बघत राहिलो. पण ते जबरदस्त तंद्रीत हा नेम असल्यागत करत होते. समोर जाऊन त्यांना काहीतरी विचारावं म्हणून मी गाडीचा दरवाजा उघडला, पण धीर झाला नाही. फ्रीझ झाल्यागत मी दोन मिनिटे तसाच बसून राहिलो. मग नाईलाज झाल्यागत गाडी काढून निघालो.

बर्‍याच पुढे जाईस्तोवर मी आरशात बघत राहिलो. चिटणीस त्या फुटपाथवर एकाग्रतेने चकरा मारतच होते.
***

एक दिवस कोसळत्या पावसात गाडी चालवत ऑफिसला आलो आणि चिटणीसांना दारात बघून नखशिखांत हादरलो.

चिटणीस शब्दशः हॉरिबल दिसत होते. कपड्यांवर चिखल, घाण, ऑईल-ग्रीस असं काय काय होतं. शर्टाची काही बटणं तुटली होती. पॅट अनेक ठिकाणी फाटली होती. अख्खं शरीर हाडकलं होतं, आक्रसलं होतं, चेहेर्‍यातून हाडं बाहेर पडतील असं वाटत होतं. डोळे तसेच लाल आणि सुजलेले, ओठ चटके दिल्यासारखे काळे. पूर्ण भिजलेले, केसांतून दाढीतून पाणी ओघळत होतं. पार खोल गेलेल्या डोळ्यांतून आणि नाकातूनही पाणी गळत होतं, पावसाचं असेल..

पायांखालच्या फरशीत पाय घट्ट रुतल्यागत मला झालं. मला इतके हादरे बसले की तोंडातून शब्द फुटेना. चिटणीसांची भयानक अवस्था मी पाहत राहिलो. त्यांनी त्यांच्या पाठीवरची पिशवी खाली ठेवली आणि मला नमस्कार घातला, तसा मी भानावर आलो. आवाजही आधीचा नव्हता. खोल गुहेतून अस्पष्ट चित्कारल्यासारखा त्यांचा आवाज येत होता. मी दोन पावलं मागे सरकलो.

त्यांच्या त्या प्लास्टिकच्या पिशवीचीही दशा झाली होती आणि त्यातल्या त्यांच्या त्या महत्त्वाच्या कागदांचा जवळजवळ लगदा. ते पिशवीत उचकपाचक करत असताना कुठूनतरी अर्ध्या-ओल्या पुडक्यातून अर्धा खाल्लेला वडापाव खाली फरशीवरच्या पाण्यात पडला. त्यांनी धांदल करत तो पुन्हा उचलून पुडक्यात कसाबसा गुंडाळला, आणि पुन्हा पिशवीत टाकला. मग पुन्हा सारे कागद तशाच ओल्या हाताने चाफलून बघत शेवटी काही कागद काढले तर ते तेच, पोलिसातल्या तक्रारीचे मला मागच्या वेळी दाखवलेले कागद होते.

आता मी सारं नीट आणि रीतसर करायचं ठरवलं आहे- चिटणीस त्याच चिरकत्या आवाजात म्हणाले- तक्रार करणार आहेच. शिवाय माझ्या जुन्या काही क्लायंट्सनाही भेटलो. काहींना माझं पटलं नाही, किंवा कळलंही नसेल नीट. पण मला घाई नाही. माझं सारं मला मिळालं पाहिजे पुन्हा. फक्त जरा काही गोष्टी सांगायच्या, विचारायच्या होत्या. तुम्ही जवळचे वाटता. तुमचा आधार वाटतो. म्हणून आलो. आता हे बघा-

असं म्हणून ते माझ्या जवळ आले. आणि एक भयानक उग्र दर्प मधमाशांच्या मोहोळासारखा माझ्यावर घोंघावत आला. मी नकळत मागे सरकलो. जरा चक्करही आली असावी म्हणून मी तिथल्या हँडरेलचा आधार घेतला. मला उलटी होईल असं वाटत होतं. चिटणीसांनी माझा हात हातात घेण्याचा प्रयत्न केला तसा मी नव्याने हादरलो. मग मी झटकन मागे सरकून, आणि न राहवून कसाबसा म्हणालो- तुम्ही जा इथून- जवळजवळ ओरडलोच असेन.

चिटणीस माझ्याकडे बघत राहिले. त्यांच्या डोळ्यांत भिती, कारूण्य, विश्वास, दु:ख, अपेक्षा असं आणि आणखी बरंच काही एकाच वेळी दिसत होतं. त्यांचे ओठ हुडहुडी भरल्यागत थरथरू लागले. वेडावाकडा चेहेरा पिळून काढल्यागत त्यांनी तोंड उघडून एक पाऊल आणखी पुढे टाकलं आणि मी शहारलो. बाजूला होऊन पुन्हा ओरडलो- जा इथून, एकदा सांगितलं मी. जस्ट गेट लॉस्ट. पुन्हा येऊ नका आणि-

चिटणीस खिळल्यागत क्षणभर तसेच उभे राहिले. मग शक्ती संपल्यागत हळूच खाली वाकले आणि त्यांची पिशवी कशीबशी उचलली. एवढं करायलाही त्यांना चार-पाच सेकंद लागले. थरथरत ते पुन्हा उभे राहिले तर तोंडातून लाळ गळत होती. नमस्कार-असं पुटपुटत ते खाली मान घालून हळुहळू निघून गेले. पॅसेजच्या कोपर्‍यावर त्यांनी पुन्हा वळून माझ्याकडे बघितलं. कृष्णविवराच्या टोकाकडून बाहेर बघितल्यागत. केसांतून, दाढीतून अजूनही पाणी गळत होतं. नाकातून, डोळ्यांतूनही.
***

मला मग नंतर दिवसभर काहीतरी राहून गेल्यागत, काहीतरी संपत आल्यागत, अस्वस्थसं वाटत राहिलं. यांत्रिकपणे काहीतरी काम करत राहिलो खरा, पण त्यालाही काही अर्थ नव्हता. शेवटी घरी जायची वेळ झाली तसा उठलो आणि बाहेर आलो. सकाळी चिटणीस उभे होते ती नुसती रिकामी जागा बघून भयंकर मळभ दाटून आलं. संध्याकाळचा कातर अवकाश आणि प्रकाश अशुभ-अभद्र वाटू लागला. पुर्वी एकदा याच जागेवर रुबाबात सिगरेट ओढणारे चिटणीस मला आठवले, आणि मी पटकन पाठ फिरवून निघालो.

रात्री झोप येईना. काय होऊन गेलं हे चिटणीसांचं? कशानं झालं असेल? अनेक लढाया जिंकत-हरत, तडजोडी करत, अनेक वाटा वळणं पार करून पुढे यावं आणि एखाद्या अभद्र वळणावर बेसावध असताना आयुष्यानं क्रूरपणे आपल्याला असं केविलवाणं करून टाकावं- म्हणजे काय खरं नाही. नक्की काय झालं असेल चिटणीसांचं? विचारायला हवं होतं. आपण इतके जबरदस्त हादरून गेलो होतो, की आपण सरळ हाकललंच त्यांना. पुन्हा येऊ नका म्हणूनही सांगितलं. विचारायला हवं होतं- असं कशानं झालं? विचारायला हवं होतं.

मला आता कणकण आणि थकवा आल्यासारखं वाटू लागलं. काहीतरी दुखत असल्याने मंद सुरात विव्हळत असल्यासारखा पावसाचा आवाज येत राहिला. पडल्या पडल्या कुस बदलत असा किती वेळ गेला कुणास ठाऊक.

नुसतं असं विचारून काय फायदा? कुणी काय केलं म्हणजे तुम्ही पुर्वीसारखे व्हाल, वागाल- असंही विचारायला हवं होतं. आता हा विचार येताच मी ताडकन उठून बसलो. चिटणीस माझ्याकडे कशाला आले होते? काही सांगायला? मदत मागायला? सल्ला, मत विचारायला? की नुसतंच मन हलकं करायला? तुमचा आधार वाटतो- असं ते बोलले होते. आपण लक्षच नाही दिलं. विचारायला हवं होतं आपण. किमान काय बोलतात ते ऐकून तरी घ्यायला हवं होतं. आपल्याला नक्की काय वाटलं होतं तेव्हा? किळस, घृणा, राग, दहशत, असुरक्षितता की आणखी काही? की भर पॅसेजमध्ये ऑफिससमोर एक वेडा वाटणारा ओंगळ दिसणारा माणुस इतक्या सलगीने माझ्याशी बोलतो आहे- हे सार्‍यांना दिसण्याची भिती?

चिटणीसांना काहीतरी बोलायचं, सांगायचं, विचारायचं होतं. विश्वासाने आले होते ते. आपण हाकलून दिलं.

पावसाचं दुखणं वाढलं तो आणखी मोठ्या आवाजात कोसळू लागला. मी अशक्तपणे गादीवर बसून राहिलो. अवचित समोर पाहिलं तर टेबलावर माझी ऑफिसची बॅग होती. चिटणीसांच्यासारखी लेदर बॅग. मी तिरमिरीत उठलो आणि ती बॅग दिसणार नाही अशी, कपाटात ठेऊन दिली. परत येऊन झोपायचा प्रयत्न करत राहिलो.

नंतरही किती वेळ गेला कळलं नाही. माझा डोळा लागला की नाही तेही नीट समजलं नाही, आठवलं नाही. पण भान आल्यागत खिडकीतून बघितलं तर फटफटलं होतं. घड्याळ बघितलं तर आठ वाजलेले. मी चरकून उठलो आणि पडदा बाजूला केला तर भयंकर अंधारून आलेलं. पाऊस वेदना असह्य झाल्यागत कोसळतोय. हा असा कसा पाऊस? रात्रभर वेड्यागत पडूनही याचं समाधान होत नाही, म्हणजे काय?

मी बॅग पुन्हा बाहेर काढली. आज काय करायचंय ते तपासलं. पुन्हा सारे कोटेशन्स, महत्वाच्या ईमेलच्या प्रिंट्स आणि काही टेंडरची कागदपत्रे सॉर्टिंग करून पुन्हा बॅगेत भरली. नंतर एकदम लक्षात आलं - आज सतरा ठिकाणी जावं लागणार. या बॅगेचं काय खरं नाही. वॉटरप्रुफ बॅग पाहिजे.

किंवा मग सरळ प्लास्टिकची पिशवी. चिटणीसांसारखी.

बॅग रिकामी केली. मग आईला हाक मारली. चांगलीशी एक मोठी प्लास्टिकची पिशवी दे म्हणून सांगितलं. आईने नेहेमीप्रमाणे कामाला लावलं म्हणून त्रागा, बडबड सुरू केली. मग ढीगाने पिशव्या आणून दिल्या. शेजारी आल्यावर तिचा चुकून मला हात लागला आणि ती ओरडली- अरे केवढा तापलायस तू! तू-तू झोप. ऑफिस नको आज.
आणि मग माझा चेहेरा बघून एकदम बावचळल्यागत गप्प झाली.

मागची दोन टेंडरं असाच काहीतरी गचाळपणा, गहाळपणा केल्याने हातातून गेली. हिला एक काही कळत नाही, त्रागा करायला काहीतरी कारण पाहिजे असतं. तो पाऊस एक वेडसरासारखा आडवातिडवा कोसळतोय. त्याच्या नादी लागून कसं चालेल? काम तर केलंच पाहिजे. आणि ही पॉलिथिन बॅगही आठवणीने आता सोबत ठेवायला पाहिजे. गाडीतही जास्तीच्या अशा पिशव्या ठेवल्या पाहिजेत.

कागद भिजतील सारे नाहीतर.
***
*******

पूर्वप्रसिद्धी - 'माहेर' दिवाळी अंक- २०२०

***

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाऊस वेळ का नाव आहे हे कळलं नाही
म्हणजे पावसाचा आधी काही रेफरन्स आलाय का म्हणून मी परत सुरवातीला जाऊन पाहिले
पण कथेत अगदी शेवटीच आलाय पाऊस

मला थोडं उलगडून सांगणार का?

आशुचँप, आबा. -
पाऊस आधीही आला आहे. 'एक दिवस कोसळत्या पावसात' संपूर्ण बदललेले चिटणीस नायकाला भेटतात तेव्हा. चिटणीसांना याआधीही पाऊस कधीतरी भेटला असेल अनेकदा आणि त्यांची मानसिक विघटनाची प्रक्रिया तेव्हा केव्हातरी सुरू झाली असेल- पावसाच्या साक्षीने.
नायकही त्याच रस्त्याने हळुहळू जाणार आहे- हे त्याला नाही, पण आपल्याला कळतं थोडं आधी. चिटणीसांच्या झालेल्या दैनेने जबरदस्त हलून गेलेल्या नायकाला ताप भरतो, आणि मग त्याच रात्रभर पडत असलेल्या 'वेडसर' पावसाच्या साक्षीने नांदी वाजते, त्याचीही ती प्रक्रिया सुरू होतेच. अगदी चिटणीसांसारखीच. दोघांची 'वेळ' ठरली होती कदाचित, आणि पावसाचा योगही.
मूळ दिवाळी अंकातल्या कथेत शीर्षक वेगळं होतं. आता ते बदलण्यात जरा घाई झाली असेल कदाचित. 'विनाशवेळा' हेही सुचलं होतं, पण हे फार थोर लेखकाचं टायटल आहे, आणि शिवाय शीर्षकाला न्याय देणारा, तशा मानसिक पातळीवरचा पट आपल्याला रंगवता येईल का- अशी शंका आल्याने ते घेतलं नाही.

केशवकूल, ९६क, rmd, थँक्स! Happy

दोघांची 'वेळ' ठरली होती कदाचित, आणि पावसाचा योगही.>>>
ओक्के

मानसिक विघटनाची प्रक्रिया तेव्हा केव्हातरी सुरू झाली असेल- पावसाच्या साक्षीने.>>> हां

तरीही पाऊसवेळ मला काहीसं रोमँटिक टायटल वाटलं
म्हणजे तसेच वाटायला लागून शेवटी धक्कातंत्र द्यायचं असेल तर मग बरोबर आहे

विनाशवेळ भारी आहे टायटल
जास्त चपखल वाटलं

परफेक्ट विश्लेषण साजिरा! छान आहे कथा.
असंच काहीतरी मनात आलं होतं की प्रत्येक पावसागणिक माणूस कुजण्याची प्रक्रिया वाढतेय. पावसाळी वातावरणाचा थोडा तरी डिप्रेसिंग परिणाम होतो तसं काहीसं.

लेखकाने पावसाची जी वर्णने केली आहेत त्याला समांतर चिटणीसही "कोसळत" जातात. मला वाटत हि स्क्रिज़ोफ़्रेनियाची केस आहे. तिथेही पेशंटचा कुणावरही विश्वास नसतो. सगळे जग आपल्या विरुद्ध उठले आहे अशी भावना असते.
आता तुम्ही म्हणाल कि हायला दस्तुरखुद्द लेखकाने स्पष्टीकरण दिले आहे मग तुम्ही कशाला मध्ये...
त्याचे काय आहेकी एकदा का कथा सार्वजनिक झाली कि ती ती त्याची राहत नाही.
बघा पटतंय का.

मला वाटत हि स्क्रिज़ोफ़्रेनियाची केस आहे. तिथेही पेशंटचा कुणावरही विश्वास नसतो. सगळे जग आपल्या विरुद्ध उठले आहे अशी भावना असते. >>>> हो अगदी. मलाही तसेच वाटले.

वा!
देर आये दुरुस्त आये, साजिरा! Happy

साजिरा, जबरदस्त परिणामकारक कथा.

असंच काहीतरी मनात आलं होतं की प्रत्येक पावसागणिक माणूस कुजण्याची प्रक्रिया वाढतेय. >> अंजली, हे भारी आहे.

मस्त! शीर्षक उलगडून सांगितल्यावर चपखल वाटले आणि मुख्य चित्रही कथानकाशी सुसंगत आहे.

सही, अंगावर आली गोष्ट. साजिरा आणि केशवकूल दोघांचंही विश्लेषण आवडलं. जास्त समजायला मदत झाली.
असंच काहीतरी मनात आलं होतं की प्रत्येक पावसागणिक माणूस कुजण्याची प्रक्रिया वाढतेय. >> अंजली, हे भारी आहे.+१११

दोघांची 'वेळ' ठरली होती कदाचित, आणि पावसाचा योगही.>>> येस्स, आता जास्त स्पष्ट झालं . धन्यवाद Happy

मस्त लिहिली आहे कथा. पाऊसवेळ शीर्षकातून काही स्पष्ट होत नसले तरी कथा वाचुन ते ठीक वाटले. विनाशवेळ असते तर कदाचित आधीच हिंट मिळाली असती शेवटाची.

केशवकूल, मलापण ही डिल्यूजनल डिसऑर्डरची केस वाटली. तुम्ही म्हणताय त्याला डिल्युजनल डिसऑर्डर म्हणतात. आधी यालाच पॅरॉनोईड स्क्रिज़ोफ़्रेनिया असे म्हणायचे पण हा आजार स्क्रिज़ोफ़्रेनिया पासुन काही बाबतीत ठळकपणे वेगळा असल्याने त्याचे डिल्युजनल डिसऑर्डर हे नाव करून त्याचेही वेगळे प्रकार डिफाईन केले आहेत.

स्वाती, गेलो नव्हतोच कुठे, इथंच असतो की रोज. रोजच्या रामरगाड्यात आपला चिटणीस होईल की काय- अशी भिती वाटू लागली की लिहिणं वगैरे कमी होतं इतकंच. Proud

मामी, धनुडी, दत्तात्रय, Barcelona.. Hearty Thanks!!

मानव, पॅरानोईया हे डोक्यात होतंच लिहिताना. याबद्दल अधिक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. Happy

तुझ नाव वाचून कथा उघडली आणि अपेक्षाभंग मुळीच झाला नाहीं.
भारीच लिहिलेस. शांतपणे उलगडत गेली कथा. एकाच वेळी भय+ रहस्य+ दुःख या सगळ्याच बेमालूमपणे मिश्रण असलेली कथा. जबरी झालिये

रत्नाकर मतकरीन्ची आठवण झाली

कितीतरी दिवसांनी दिसलास इथे

ट्रिट मिळाल्यासारखे वाटले

कथा आवडली आणि त्याचे नावही. जरी सुरवातीला संबंध कळत नाही तरी वाचत जाताना पाऊस जाणवतोच सोबतीला असलेला कथाभर आणि मग प्रतिक्रिया वाचल्यानंतर अरेच्या! हे शिर्षक क्लिक नाही झाले होय काहींना!" असे वाचून मगच समजते तोपर्यंत ते आणि कथा डोक्यात परफेक्ट ब्लेंड झालेल्या असतात म्हणून ते डोक्यात आलेलेही नसते