आकाशवाणी : फिरूनी नवी जन्मेन मी

Submitted by DJ.. on 14 February, 2020 - 02:20

मागील आठवड्यात विकेंडला गावी जाऊन यावे म्हणुन शुक्रवारी भल्या पहाटे उठुन आवरुन बॅग भरुन ८ वाजताच ऑफिसमधे आलो. येताना ऑफीसच्या बसमधे ड्रायव्हरने मोठ्याने रेडिओ लावलेला होता. अगदी नव्या सळसळत-फेसाळत-उसळणार्‍या गाण्यांनी आणि निवेदकाच्या आरडा-ओरडा करीत कानावर आदळणार्‍या गोंगाटाने जीव मेटाकुटीस आला होता. अधेमधे जाहिरातींचा भडिमार सुरू होताच. कमीतकमी वेळात जास्तीतजास्त शब्द कानावर आदळत एकामागोमाग एक जाहिराती येऊन फेर धरत होत्या. त्यातली एक कसलीशी इंशुरन्स गाठ पॉलिसीची जाहिरात एका ब्रेकमधे ३-४ दा येत होती आणि ती सतत ऐकुन पोटात गोळा उठत होता. कसेबसे ऑफिस गाठल्यावर त्या रेडिओ वाहिनीच्या मार्‍यातुन एकदाचा मुक्त झालो. संध्याकाळी ऑफिसशेजारीच येणार्‍या ४.४५ च्या एसटीने थेट गावी जाता यावे म्हणुन हातातली कामे पटापटा आवरुन वेळेत एसटी स्टॉपवर पोहोचलो. एसटीही वेळेत आली आणि मजल-दरमजल करीत रात्री नऊला मुक्कामी पोचली.

दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर उठुन मूळगावी जाऊन शेतीची आणि घरगुती कामे हातावेगळी करावीत या हेतुने आईसोबत कारने गावी निघालो. सकाळी सकाळी कारमधे रेडिओ लावला तर आधिच आकाशवाणी ट्युन केलेली. कार सांगली जिल्ह्याकडे धावत होती आणि रेडिओवर ट्युन झालेले एफ.एम. सातारा केंद्र खरखरत होतं म्हणुन मग मी सरळ ए.एम. फ्रिक्वेंसीवर सांगली केंद्र सुरु केलं. कितीतरी दिवसांनी नव्हे तर कितीतरी वर्षांनी मी आकाशवाणी ऐकत होतो. मराठी गाणी सुरु होती. गाणं संपलं की एक पॉज घेत मंजुळ आवाजात निवेदिका पुढच्या गाण्याची माहिती द्यायची. कार्यक्रम संपला तेव्हा व्हायोलिनवर एका मराठी गाण्याची आक्खीच्या आक्खी धून वाजली. ते ऐकुन मला फार बरे वाटले.

गाडी रस्ता कापत होती आणि ड्रायव्हिंग करत मी आणि आई रेडिओवर आकाशवाणी ऐकत होतो. आता रेडिओवर जाहिराती लागल्या. "झुळझुळवाणी खेळवा पाणी.. आणायचं कुणी..? सांगतो राणी.. ढिंगटिंग ढिंगटिंग ढिंगटिंग ढिंगटिंग .. फिनोलेक्सनं आणलं पाणी शेतं पिकली सोन्यावाणी.. फिनोलेक्स..!" ही जाहिरात कानावर पडली आणि चेहर्‍यावर अचानक हसु उमटलं Bw . किती छान जाहिरात होती ती. खूप वर्षांपुर्वीपासुन ही जाहिरात ऐकत आम्ही लहानाचे मोठे झालो. त्या लहानपणीच्या आठवणी आपसुक तोंडातुन बाहेर पडु लागल्या आणि आईसोबत आज त्या पुन्हा अनुभवता आल्या. त्याकाळी सांगली आकाशवाणीवर 'अनिल माचिस' आणि 'जी.एस. चहा' च्या बहारदार जाहिराती रोज न चुकता लागायच्या. त्या जाहिरातींचीही नक्कल करुन झाली आणि आपोआप मन प्रफुल्लीत झालं.

"मध्यम लहरी दोनशे एकोणचाळीस अंश आठ एक मीटर्स अर्थात बाराशे एक्कावन्न किलोहर्ट्झवर आपण आकाशवाणीचं सांगली केंद्र ऐकत आहात." अशी मंजुळ उद्घोषणा झाली आणि पुढील बातमीपत्र मुंबई केंद्रावरुन प्रसारीत होईल असं सांगण्यात आलं. मुंबई केंद्रावरील बातम्या प्रसारीत झाल्यावर विविधभारतीवरुन हिंदी गाण्यांचा कार्यक्रम प्रसारीत होईल असं निवेदन आलं. "ये है... विविधभारती......!" अशी माझ्या विस्मरणात गेलेली धुन वाजत कार्यक्रम सुरु झाला. विविधभारतीच्या निवेदकांचं हिंदी निव्वळ लाजवाब कॅटेगरीतलं. त्यानंतर विविधभारतीवरुन फोन इन कार्यक्रम प्रसारीत झाला तोही अफलातुन होता.

गावाकडची कामे आटोपून पुन्हा कारमधे बसलो आणि परतीचा प्रवास करता करता मधेच रेडिओची रेंज गेली म्हणुन पुढचं मागचं कोणतं स्टेशन लागतंय का हे पाहिलं. कुठलंतरी कन्नड स्टेशन लागलं. बहुतेक बेळगाव असावं असा माझा कयास. मग ए.एम. बँडचा नाद सोडुन मी एफ.एम. बँड वर आलो तेव्हा खाजगी वाहिन्यांना ओलांडुन पुढे गेल्यावर १०२ अंश ७ मीटर्स वर आकाशवाणीचं कोल्हापुर केंद्र लागलं. तिथं नाट्यसंगीत सुरु होतं. ४-५ नाटकांतील नाट्यगीतं ऐकवुन झाल्यावर निवेदिकेनं पुढील कार्यक्रम 'पालातील माणसं' या पुस्तकाचं क्रमशः वाचन असं सांगुन पुस्तकवाचन कार्यक्रम सुरु केला. एकेक ओळ वाचताना अधुनमधुन येणारे संवाद त्या-त्या पात्राच्या तोंडुन आलेत की काय असा भास होत होता इतके ते पुस्तकवाचन प्रभावीपणे ऐकवलं जात होतं. कोल्हाट्यांच्या पालावरील तो संवाद संपुच नये असं वाटत होतं परंतु ठरावीक वेळ होताच तो संवाद अलगद संपवुन निवेदिकेनं पुस्तकाच्या लेखक आणि सादरकर्त्यांचं नाव सांगितलं. सादरकर्त्या 'नीना मेस्त्री-नाईक' हे नाव तिच्या तोंडुन ऐकलं तसं मला फार आश्चर्य वाटलं. नीना मेस्त्री-नाईक नामक बाई फार फार वर्षांपुर्वी सांगली आकाशवाणीवर 'प्रभातीचे रंग' हा कार्यक्रम सादर करायच्या. अजुनही त्या तिथे कर्यक्रम करत देखिल असतील पण काळाच्या ओघात माझा आकाशवाणीशी संबंध तुटला असल्याने म्हणा किंवा मी आता सांगली आकाशवाणीच्या परिघात येत नसल्याने म्हणा आता कित्त्येक वर्षांत त्यांचे कार्यक्रम अथवा नाव कधीही ऐकले नव्हते. आज या प्रवासाच्या दरम्यान त्यांचे नाव ऐकताच 'प्रभातीचे रंग' या कार्यक्रमाची आठवण झाली.

त्याकाळी आकाशवाणी सांगली केंद्रावर रोज सकाळी पुणे केंद्रावरच्या प्रादेशीक बातम्या संपल्यावर ७ वाजुन १५ मिनिटांनी प्रभातीचे रंग हा कार्यक्रम सुरु व्हायचा. त्या कार्यक्रमाचे लेखक (बहुदा बापु जाधव की कायसे होते.. आता पुसटसं आठवतं.. किंवा आठवतही नाही..) आणि सादरकर्त्या (ज्या नीना मेस्त्री-नाईकच असायच्या) यांची नावं सांगुन प्रायोजकांचं नाव सांगितलं जायचं जे मला आजही लख्खपणे आठवतंय. त्या प्रायोजकांचं नाव एका दमात घेणार्‍या मेस्त्री-नाईक बाईंचं भारी कौतुक वाटायचं Proud त्या आवाजाला उंची+खोली देत असं म्हणायच्या - "प्रभाssतीचे रंssग ... प्रायोजक - कडक, लज्जतदार आणि उत्साहवर्धक जी.एस. चहाचे वितरक मेसर्स गोविंदराम शोभाराम आणि कंपनी... गणपती पेठ... सांगली..!" आवाजाच्या हिंदोळ्यावर श्रोत्यांना असं झुलवुन त्या प्रास्तावीक करुन कार्यक्रम सुरु करायच्या आणि रोजच्या रोज नवीन आशयावर बेतलेल्या विषयाला धरुन गाणी प्रसारीत करायच्या. कार्यक्रम कधी संपला हे कळायचंही नाही. ते वय कार्यक्रम मन लाऊन ऐकण्याचं नव्हतंच मुळी. तिसरी-चौथीच्या मुलात असलेला अफाटपणा मिरवताना जी काही ४-५ वाक्यं कानावर पडायची तेवढीच पण मनावर आपसुक कोरलेली. सकाळी अंथरुणातुन न उठण्याची इच्छा + त्यामुळे होत असलेला उशीर आणि रागावलेली आई + चिडलेले वडील + आंघोळ + नाश्ता ही सर्व धांदल आकाशवाणी सांगली केंद्राच्या श्रवणीय प्रसारणाच्या पार्श्वभुमीवर आमच्याच काय त्याकाळच्या बहुतेक सर्वच शाळकरी मुलांच्या घरी रोजच्या रोज घडायची Biggrin आकाशवाणी सांगली केंद्राशी नाळ जुळली ती ही अशी.

त्यानंतर रोजचं न संपणारं हे जीवनचक्र अव्याहतपणे फिरतच राहिलं. दिवसांमागुन दिवस सरले, महिन्यांमागुन महिने आणि वर्षांमागुन वर्षंही सरली. शाळेतुन हायस्कुल, हायस्कुल मधुन कॉलेज आणि कॉलेजमधुन नोकरीधंद्यानिमित्त मोठं शहर अशी स्थित्यंतरं होत गेली. ह्या सर्वात मी आकाशवाणी सांगलीच्या परिघाबाहेर गेल्यामुळे आकाशवाणी सांगलीशी आणि पर्यायाने सहक्षेपीत कार्यक्रमांमुळे ऐकण्यापुरता का होईना संबंध येणारी पुणे, मुंबई, दिल्ली अशी केंद्रेपण जीवनातुन हद्दपार झाली. कधीकधी गावी जाणं होतं तेव्हा माझ्या चुलत्यांना रोज सकाळी न चुकता ७ च्या बातम्या रेडिओवरच ऐकायच्या असतात. तेव्हा सकाळी ७ च्या ठोक्याला सुरु होणार्‍या आणि बातमीपत्र संपताच बंद होणार्‍या रेडिओमुळं जो काही १-२ मिनिटांचा सहवास सांगली आकाशवाणीशी यायचा तेवढाच. ती १-२ मिनिटं का होईना पण सांगली आकाशवाणीच्या निवेदकांचा आवाज कानी पडायचा आणि खाजगी रेडिओ केंद्रांच्या गराड्यात आकाशवाणी अजूनही तग धरुन आहे याची जाणीव व्हायची.

मोठ्या शहरात आल्यावर पहिल्यांदाच खाजगी रेडिओ केंद्रं ऐकली. मला एकदम भारी वाटलं. नवीन नवीन हिंदी गाण्यांची खैरात, हिंदी+इंग्लिश्+मराठी ची भेळमिसळ करत अतिशय वेगवान आणि उच्छॄंकल शैलीत सादरीकरण करणारे रेडिओ जॉकी जाम खुश करायचे. जोडीला कसलेसे विनोद, फोनवर घेतलेल्या फिरक्या, शेरो-शायरी आणि कसलाच धरबंद नसलेल्या जाहिरातींचा भडीमार अशी साधारणत: सर्वच खाजगी वाहिन्यांची तर्‍हा. त्या तर्‍हेला अंगीकारत आणि कामाचा व्याप सांभाळत मधे एवढी वर्षं लोटली.

ऑफिसला जाताना बसमधे एका रेडिओ स्टेशनवर जाहिरातींचा भडीमार सुरु झाला की लगेच दुसरीकडे फ्रीक्वेन्सी ट्युन करणार्‍या हजरजबाबी ड्रायव्हरची तारीफ कराविशी वाटते. पण बदललेल्या स्टेशनवरही तीच तर्‍हा Uhoh . मग तिसरं.. मग चौथं.. पाचवं.. असं करत पुन्हा परत येरे माझ्या मागल्या पहिलंच स्टेशन येतं. कितीही गाणी व आर.जें.ची बडबड ऐकली तरी मन काही रमत नाही अशी अवस्था होते. अशा वेळेस मला आकाशवाणीची आठवण यायची. कधीतरी हे असह्य होऊन इथल्या आकाशवाणी केंद्राची फ्रेक्वेंसी ट्युन केली तरी का कुणास ठाऊक पण इथल्या केंद्राशी नातं कधी जुळंतच नाही. आकाशवाणी सांगली, सातारा, कोल्हापुरशी असलेला आपलेपणा इथे जाणवत नाही. आपल्या मातीची ओढ स्वस्थ बसु देत नाही. पण आता या सर्वांवर उपायदेखील अलगद सापडला... तोही आकाशवाणीवरच बरं का..! Bw .

गेल्या आठवड्यात गावाला जाताना मी आकाशवाणी सांगली ट्युन केली नसती तर मी अजुनही तिच्यापासुन दूरच राहिलो असतो. त्या दिवशी मी रेंजच्या उपलब्धतेनुसार सांगली, कोल्हापुर आणि सातारा केंद्रांचं प्रसारण ऐकलं तेव्हा प्रत्येक वेळेस निवेदक अधुन-मधुन आकाशवाणीच्या अ‍ॅपची माहिती देत होते. newsonair असं त्या अ‍ॅपचं नाव.

गावाहुन पुन्हा इथे आल्यावर मी सहज म्हणुन newsonair अ‍ॅप प्ले स्टोअरवर सर्च केलं, ते माझ्या फोनवर डाऊनलोड केलं आणि काय आश्चर्य! आता मी भारतातल्या कोणत्याही आकाशवाणी केंद्राचं प्रसारण बसल्या जागी सुस्पष्ट आवाजात ऐकु शकत होतो. मला क्षणभर विश्वासच बसेना. आकाशवाणी सांगली लावलं तर स्पष्ट आवाजात ते तात्काळ सुरु झालं. सातारा केंद्र लावलं तर तेही त्याच क्षमतेनं आणि स्पष्टतेनं सुरु झालं मग मी कोल्हापुर आकाशवाणी ट्युन केलं तर 'पालातील माणसं'चं वाचन सुरु होतं. मी तिथल्या तिथे कार्यक्रमाशी कनेक्ट झालो. Bw

आकाशवाणीनं कात टाकली म्हणुन त्यांचं अभिनंदन करावसं तर वाटतंच पण सांगली आकाशवाणीनं महापुराने झालेल्या नुकसानाची झळ जाणवु दिली नाही याचंही कौतुक वाटतं.
https://www.loksatta.com/maharashtra-news/akashwani-sangli-radio-station...

आता आमच्या घरातली रोजची सकाळ पुन्हा एकदा आकाशवाणी सांगलीच्या पार्श्वभुमीवर सुरु होते याचा आनंद फार मोठा आहे. सगळं कसं जसंच्या तसं... तीच अंथरुणातुन न उठण्याची इच्छा + त्यामुळे होत असलेला उशीर आणि रागावलेली आई + चिडलेले वडील + आंघोळ + नाश्ता ही सर्व धांदल सुरु आहेच फक्त एक पिढी पुढे सरकली इतकाच काय तो फरक...! Bw

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सदर लेख आकाशवाणी सांगली केंद्रापर्यंत पोहोचल्याने माझ्या लेखाचा काही भाग परवा रात्री साडेनऊ वाजता सांगली केंद्रावर प्रसारित झाला. >>
हार्दिक अभिनंदन Dj..

मोहना. यांचेही कौतुक आणि आभार. आमच्या मायबोलीवरच्या डीजेंचा लेख आकाशवाणी वरून वाचला गेला. लय भारी.

सदर लेख आकाशवाणी सांगली केंद्रापर्यंत पोहोचल्याने माझ्या लेखाचा काही भाग परवा रात्री साडेनऊ वाजता सांगली केंद्रावर प्रसारित झाला. >>
अरे वा! अभिनंदन !!

सदर लेख आकाशवाणी सांगली केंद्रापर्यंत पोहोचल्याने माझ्या लेखाचा काही भाग परवा रात्री साडेनऊ वाजता सांगली केंद्रावर प्रसारित झाला. >>
हार्दिक अभिनंदन Dj..

@ anjali_kool, सुजा, sonalisl, फारएण्ड , अ‍ॅमी धन्यवाद Bw

आपल्या माबो सदस्य, एक उत्तम संवादिनी अन तितक्याच उत्साहात खुमासदार शैलीत लिखाण करणार्‍या चतुरस्र लेखिका मोहना यांचा आवाज उद्या म्हणजेच १२ फेब्रुवारीला संध्याकाळी ६.३० आकाशवाणीच्या पुणे 'अ' केंद्रावर वर ऐकायला मिळणार आहे...!! सर्वांनी जरूर ऐका..!! Bw

ऐकण्यासाठी मोबाईलवर newsonair हे अ‍ॅप डाऊनलोड करायला विसरू नका..!!

अभिनंदन DJ!

वेळेत बघितली पोस्ट, आता ऐकत येईल.

उद्या संध्याकाळी म्हणजे 13 February रोजी देखील प्रसारित होणार आहे मात्र वेळ आहे संध्याकाळी 6.15 ची अन् केंद्र - विविधभारती पुणे केंद्र.

मला आधी वाटले होते की या लेखाचे वाचन त्यांच्या आवाजात पुन्हा प्रसारीत होत आहे.

मोहना यांची परदेशस्थ मराठी या कार्यक्रमा अंतर्गत मुलाखत होती. आवडली. मराठी तिकडे शिकवण्यास, नाटक, एकांकिका करण्यास चांगलीच धडपड केली. अस्खलीत मराठी ऐकुन खूप छान वाटलं.

धन्यवाद शर्मिला Bw

@मानव जी, या लेखातील निवडक भागाचं वाचन सांगली आकाशवाणी वर झालं आहे. Bw

मस्त

अरे हा धागा मी कसा काय मिस्स केला? वाचताना असे वाटले कि अरे या तर सगळ्या माझ्याच आठवणी, मी लिहिले असते तर असेच लिहिले असते. इथे सगळे समआठवांनी जोडले गेलेले एकत्र आलेले पाहून भरून आले. धागा वाचताना अगदी अगदी झाले.

सांगली आकाशवाणीचे पूर्वीचे प्रसिद्ध निवेदक वामन काळे यांचे दोन-तीन आठवड्यापूर्वी (९ ऑक्टोबर २०२२) दु:खद निधन झाल्याची बातमी काल वाचायला मिळाली. वाईट वाटले Sad लहानपणी खूप खूप ऐकलेला आणि परिचित आवाज. स्वच्छ सुस्पष्ट उच्चार, अतिशय परिणामकारक निवेदन. अतिशय लोकप्रिय निवेदक होते. श्रोत्यांच्या ह्रदयावर त्यांनी अनेक दशके अधिराज्य गाजवले. इतकी वर्षे ज्यांच्या आवाजाशी परिचय झाला त्यांचा फोटो अखेर काल त्यांच्या निधनानंतर पहायला मिळाला.

दु:खद घटना धाग्यावर वामन काळे यांच्याविषयी लिहिले तेंव्हा वावे यांनी या धाग्याचा संदर्भ दिला. इथे येऊन पाहतो तर रेडिओच्या (विशेषत: सांगली/कोल्हापूर आकाशवाणी) एकाहून एक आठवणींची मांदियाळीच आहे जणू या धाग्यावर आणि प्रतिसादांतून. एके काळी रेडिओ हे एकच करमणुकीचे मध्यम होते. त्यामुळे इथे जसे त्याकाळातले सर्व रेडिओ-व्यसनी प्रतिसादकर्ते आहेत, मी सुद्धा त्यांपैकीच एक. विशेषत: जुन्या गाण्यांचे कार्यक्रम. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कोण्या वेळेत कोणत्या स्टेशन वर कोणते कार्यक्रम असतात हे सगळे माहित झाले होते. यामध्ये सांगली/पुणे आकाशवाणी, विविध भारती, ऑल इंडिया रेडिओची उर्दू सर्विस, रेडिओ सिलोन ही केंद्रे असायची.

"मध्यम लहरी दोनशे एकोणचाळीस अंश आठ एक मीटर्स, अर्थात बाराशे एक्कावन्न किलोहर्ट्झवर आपण आकाशवाणीचं सांगली केंद्र ऐकत आहात."

"विविध भारतीच्या जाहिरात प्रसारण सेवेचं हे मुंबई केंद्र आहे"

"श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कार्पोरेशन का ये विदेश विभाग है पच्चीस मीटर बँड में बारा हजार आठसौ और इकतालीस मीटर बँड में सात हजार एकसौ नब्बे किलो हर्ट्झ पर"

या उद्घोषणा त्या त्या आवाजात डोक्यात तशाच फिट्ट बसलेल्या आहेत. अजूनही कधीमधी कंटाळा आल्यानंतर आळस देऊन जांभई देऊन झाली कि टीपी म्हणून मी त्याच टोन मध्ये हे म्हणत असतो Proud

"पर्णपाचू सावळा सावळा" किंवा "रवी आला हो रवी आला" यासारख्या बाबूजींच्या देवघरातल्या आवाजातील भक्तिगीतांनी पावन झालेल्या कितीतरी पवित्र पहाटवेळा लहानपणीच्या आठवणींत कायमच्या कोरल्या गेल्या आहेत. आईवडील, गावाकडचे घरदार परस, आणि मुख्य म्हणजे तेंव्हाचा काळ यातले आता काहीच अस्तित्वात राहिले नसल्याने आता ही गाणी ऐकताना सद्गदित व्हायला होते. मागच्या वर्षी सोसायटीमध्ये दिवाळी पहाट कार्यक्रमात "संथ वाहते कृष्णामाई" गाताना अक्षरशः भरून आले होते.

सकाळी सातच्या बातम्या म्हणजे सुधा नरवणे हे ठरलेले असायचे. "आकाशवाणी पुणे. सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहे" सकाळी सकाळी त्यांचा तरतरीत तरोताजगी देणारा आवाज असायचा. म्हणूनच वरील अनेक प्रतिसादांत त्यांचा उल्लेख स्वाभाविकपणे आलेला आहे. सकाळच्या बातम्यांमध्ये जोशी-अभ्यंकर हत्याकांडाचा निकाल लागून ज्या दिवशी त्या चौघांना फाशी झाली त्या दिवशी सकाळच्या बातम्या अंधुकशा आठवताहेत. "जेंव्हा तुम्ही हे बातमीपत्र ऐकत असाल तेंव्हा या चारही आरोपींना फाशी दिली गेलेली असेल" अशा काहीशा पद्धतीने तेंव्हा बातम्यांत ते सांगितले होते.

मग सव्वासात वाजता "प्रभातीचे रंग" हा कार्यक्रम प्रसारित व्हायचा. धाग्यात आकाशवाणी सांगली केंद्राचा उल्लेख आहे. सांगलीवरून वामन काळे आणि दत्ता सरदेशमुख यांनी सुद्धा या कार्यक्रमाचे अनेकदा निवेदन केले आहे असे आठवते. पण सांगलीच्याही आधी पुणे केंद्रावरून मला वाटते "सुप्रभात" या नावाने हा कार्यक्रम "बंडा जोशी" म्हणून निवेदक होते ते सादर करत असंत. माझ्या आठवणीनुसार या कार्यक्रमाची सुरवात तिथूनच झाली.

धाग्यात जो उल्लेख आहे पुस्तकांच्या वाचनाचा तो कार्यक्रम सकाळी पावणे आठच्या आसपास असायचा. मी जेंव्हा ऐकला आहे हा कार्यक्रम तेंव्हा रारंगढांग या कादंबरीचे (लेखक प्रभाकर पेंढारकर?) वाचन सुरु होते. यानंतर आठच्या हिंदी बातम्या असायच्या. दिल्ली केंद्रावरून वरून दिल्या जाणाऱ्या. या बातम्या खूप गंभीर आवाजात प्रसारित होत. बातम्यांआधी एक दोन मिनिटे जाहिराती, मग काही सेकंदांची विलक्षण गंभीर शांतता. पिन ड्रोप सायलेन्स. आणि मग "य्ये, आकाशवाणी है. अब आप रामानूज प्रसादसिंग से समाचार सुनिये" अशी अतिशय दमदार आवाजात त्या बातम्यांची सुरुवात व्हायची. (यातला य्ये हा शब्द तसाच जोर देऊन म्हटला जायचा म्हणून तो तसा लिहिला आहे. 'ये' नाही, 'य्ये')

एक दिवस सकाळी याच बातम्यांत राजीव गांधींच्या हत्येची बातमी ऐकली होती. त्याआधी आईने ही बातमी पहाटेच्या बातमीपत्रात ऐकली असल्याने तिने आधीच याची कल्पना दिली होती. त्यामुळे त्या दिवशीच्या या आठच्या बातम्या कधी नव्हे ते रेडिओशेजारी बसून लक्ष देऊन ऐकल्या गेल्या. वृत्त निवेदकाने वरीलप्रमाणे बातम्यांना सुरवात केल्यानंतर...

"आकाशवाणी से बडे दुख के साथ हम ये सूचित करते है कि भूतपूर्व प्रधानमंत्री तथा कॉंग्रेस आय अध्यक्ष श्री राजीव गांधी कि कल मद्रास के पास पेराम्बुदूर मे एक शक्तीशाली बमविफोट में हत्या की गयी. श्री गांधी वहां एक कॉंग्रेस आय कार्यकर्ताओंकी रेली को संबोधित करने जा रहे थे"

ही सगळी वाक्ये त्या आवाजासहित अजून जशीच्या तशी स्पष्ट आठवताहेत.

या बातम्या झाल्या कि इंग्लिशमधून बातम्या असायच्या. त्या झाल्या कि साडेआठ पर्यंत (दहा मिनिटे) सुगम संगीत किंवा "लोकरुची बातमीपत्र" असायचे. या लोकरुची बातमीपत्रात नेहमीच्या नव्हे तर चित्रविचित्र किंवा जगावेगळ्या काही घडामोडी सांगितल्या जायच्या. आणि मग साडेआठवाजता दिल्ली केंद्रावरूनच पण मराठीतून दिल्या जाणाऱ्या बातम्या असंत. नंदकुमार कारखानीस, दत्ता कुलकर्णी हे निवेदक अगदी रुबाबात या बातम्या देत. मृदुला घोडके, सुनंदा कोगेकर यांचेसुद्धा आवाज अगदी आजही आठवताहेत. प्रत्येकाची आपापली अशी शैली होती.

या व्यतिरिक्त सकाळी नऊ ते दहा या वेळेत शालेय कार्यक्रम असायचे. ते सुद्धा नियमितपणे ऐकले जात (अर्थात त्यातले मात्र आता फार काही आठवत नाही Proud ) सकाळी फिनोलेक्स, मगदूम चहा, डीएसचहा, प्रकाशचे माक्याचे तेल यांच्या जाहिराती असंत. त्यांच्याविषयी इतर प्रतिसादांतून तपशील आले आहेतच. काही प्रतिसादांत संवाद सुद्धा दिले आहेत. ते वाचून फार मौज वाटली. मलासुद्धा या जाहिराती स्पष्ट आठवतात.

दुपारी वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम. तेच जर रविवारची दुपार असेल तर "आपली आवड" (हे तर प्रसिद्धच होते). आणि महिन्याच्या शेवटच्या रविवारी मुलांनीच सादर केलेली बालगीतांची "आपली आवड" असायची. ही पुणे केंद्रावरून प्रसारित व्हायची. पण सांगलीवरून त्याचे सहक्षेपण होत नव्हते. आणि आमच्याकडे पुणे केंद्राचे थेट प्रसारण अत्यंत क्षीण येत असल्याने प्रचंड खरखरीत अक्षरशः कानात प्राण आणून ती बालगीते आम्ही तेंव्हा ऐकत असू हे आठवते.

संध्याकाळी सातच्या प्रादेशिक बातम्यासुद्धा सर्वत्र नियमितपणे ऐकल्या जात. कपाटात ठेवलेला रेडिओ. घरात सर्वत्र चुलीचा धूर. आणि त्या कपाटाशेजारी पलंगावर मान खाली घालून व डोळे झाकून अतिशय लक्षपूर्वक त्या सातच्या बातम्या ऐकत बसलेले आजोबा, हे दृश्य जसेच्या तसे अजूनही डोळ्यासमोर आहे. सकाळी सातच्या बातम्या ताज्या तरतरीत वरच्या पट्टीतल्या आवाजात दिल्या जात. तेच संध्याकाळच्या या बातम्या मात्र संथ आवाजात, खालच्या पट्टीत नी थोड्या थकलेल्या सूरात सांगितल्या जात.

"आकाशवाणी मुंबई. कुसुम रानडे प्रादेशिक बातम्या देत आहे" हे अजूनही कानात अगदी जसेच्या तसे ऐकायला येतंय. ललिता नेने, कुसुम रानडे, शरद चव्हाण हे संध्याकाळच्या प्रादेशिक बातम्या सांगणारे आवाज होते.

सांगली आकाशवाणीवर वामन काळे, चित्रा हस्नाळकर हे खूप लोकप्रिय निवेदक होते (यांच्या सोबत "जयश्री हंचे" असे सुद्धा एक नाव होते माझ्या आठवणीप्रमाणे. अतिशय गोड आणि मधाळ आवाज होता त्यांचा. पण त्या नंतर कुठे गायबच झाल्या). अनेक वर्षे हे दोघे-तिघेच निवेदक होते. पुढे दत्ता सरदेशमुख हे अजून एक ताकतीचे निवेदक आले. त्यांच्या निवेदनाची पद्धती फार सहजसुंदर, नैसर्गिक व ओघवती होती. कुठेही कृत्रिमपणा नसे म्हणून ते निवेदन फार भावत असे. म्हणूनच हे कार्यक्रम आणि आकाशवाणी सांगली हि त्या आणि आसपासच्या भागात श्रोत्यांच्या मनात घर करून राहिली. काही महिन्यांपपूर्वी दत्ता सरदेशमुख यांच्या आवाजातली एक क्लिप व्हाट्सप वर ऐकली. अनेक वर्षांनी तो आवाज ऐकायला मिळाला.

या लोकप्रिय निवेदकांना भेटायची फार इच्छा लहानपणी असायची. (अजूनही आहे काही प्रमाणात Proud ) त्याकाळी "आमचे हिरो" असा शब्दप्रयोग जरी रूढ नसला तरी ते आमचे हिरो होतेच. लेखनात व्यंकटेश माडगुळकर. कथाकथनात शंकर पाटील, वपू काळे. गाण्यात सुधीर फडके. आणि निवेदनात वामन काळे, चित्रा हसनाळकर, दत्ता सरदेशमुख हे माझे तेंव्हाचे मराठीतले त्या त्या क्षेत्रातील हिरो होते. या सर्वांनाच भेटायची तीव्र इच्छा तेंव्हा असायची. आकाशवाणीच्या स्टुडीओ आतून पाहणे आणि या 'हिरो' निवेदकांना प्रत्यक्ष भेटणे या लहानपणीच्या इच्छा होत्या. सुदैवाने पुढे त्या काही प्रमाणात पूर्ण झाल्या. कोल्हापूर आकाशवाणी सुरु झाले तेंव्हा निवेदकांच्या जागा भरण्यासाठी ज्या मुलाखती घेतल्या गेल्या तिथे अस्मादिक हजेरी लावून आले. त्यानिमित्ताने स्टुडीओ आतून (म्हणजे जिथून हे निवेदक बोलत असतात त्या वातानुकूलित साऊंडप्रुफ दालनातून) पाहता आला. इतकेच काय त्या मायक्रोफोन समोर बसून एक मिनिट त्यांच्यासारखे बोलण्याची संधी मिळाली हेच तेंव्हा खूप अप्रूप वाटले होते. आणि निवेदकांच्या भेटीचे स्वप्न थेट दत्ता सरदेशमुख यांच्या घरी जाऊन भेटून पूर्ण झाले होते. मावशीने कुठूनशी त्यांची ओळख काढली आणि आम्ही दोघे त्यांना भेटायला गेलो. फार विलक्षण अनुभव होता. प्रत्यक्ष रेडीओशी बोलत आहोत असे मला क्षणभर वाटून गेले होते. तो दिवस अजुनी स्मरणात आहे.

ये लेखात धागालेखकाने सांगितल्याप्रमाणे आता रेडीओशी संबंध पूर्णपणे तुटला आहे. मध्यंतरी रेडीओच्या आठवणी जिवंत करण्यासाठी रेडीओ घेऊन आलो होतो. परंतु आता मोबाईल, इंटरनेट, एफएम आलेत. शिवाय रेडिओ लहरींचे उत्सर्जन करणारी लॅपटॉप डेस्कटॉप यासारखी सतराशे साठ डिव्हाईसेस आजूबाजूला असल्याने रेडिओचा एएम बँड, ज्यावर ही केंद्र पूर्वी ऐकायला मिळंत, तो आजकाल ऐकायलाच येत नाही. पर्याय म्हणून अँड्रॉइड ऍप आहे खरे. पण त्यासाठी रेडिओ सारखे स्वतंत्र्य डिव्हाईस घ्यायला हवे (मिळत असेलही) जे इंटरनेटला कनेक्ट करून ही स्टेशन ऐकता येतील. मोबाईलवरच्या स्पीकरवर किंवा स्मार्ट टीव्हीवर कधीतरी गंमत म्हणून रेडिओ ऐकणे ठिक आहे पण नेहमीसाठी ते पर्याय व्यवहार्य वाटत नाही. शिवाय, रेडिओ आता पुन्हा ऐकायला सुरवात केली तरी पूर्वीप्रमाणे त्यात मन रमेल कि नाही हा भाग सुद्धा आहेच. Life has moved on.

असो. काळाच्या प्रवाहाप्रमाणे पुढे पुढे जायलाच हवे. वामन काळे गेले ही बातमी काल वाचली आणि रेडिओच्या या साऱ्या आठवणी उफाळून आल्या. आठवणींच्या राज्यातली सफर घडवून आणणारा लेख लिहिल्याबद्दल धागालेखकाचे आभार.

खूप उत्कट प्रतिसाद.. >> +१
या उत्कट स्मृती असलेल्या प्रदीर्घ व तपशीलवार प्रतिसादाचा स्वतंत्र लेख लिहायला हवा होता, अतुल !!!

किती सुंदर लेख!

मी अगदी आत्तापर्यंत newsonair वर ही सगळी वेगवेगळी स्टेशन्स ऐकत होते. मराठी गाणी ऐकण्याकरता. पण गेले काही महिने भारतातल्या संध्याकाळी सगळी स्टेशन्स विविधभारती किंवा आकाशवाणी पुणे सहक्षेपित करत आहेत त्यामुळे पूर्वीसारखे आपली आवड वगैरे मला ऐकता येत नाही आहेत. Sad कोणाला कल्पना आहे का की हे कार्यक्रम आता कुठल्या वेळेला लागतात? लागतात का?

@धनवन्ती, @उपाशी बोका, @rmd, @अस्मिता... खूप खूप धन्यवाद

अस्मिता, खरे आहे आणि मलाही अगदी तसेच जाणवले प्रतिसाद पोस्टल्यावर. हे अनेकदा होते असे. प्रतिसाद लिहायला म्हणून जातो आणि तो मोठा लेख होऊन बसतो. हरकत नाही, थोडाफार संपादित करून, भर घालून हा प्रतिसाद वेगळा लेख म्हणून सुद्धा पोस्ट करतो.

छान लेख डिजे.

खूप उत्कट प्रतिसाद.. >>>>>>+१११११. अतूल, अस्मिताला मम म्हणीन. स्वतंत्र लेख येउदे.

खूप उत्कट प्रतिसाद.. >>>>>>+१११११. अतूल, अस्मिताला मम म्हणीन. स्वतंत्र लेख येउदे.>>>>+२

Pages