थॉट एक्सपेरीमेंट

Submitted by केशवकूल on 31 October, 2022 - 09:42

खयालोमे
तो सगळा आठवडा आमच्या कुटुंबाला चांगला गेला होता. माझे आणि बायकोचं एकदाही भांडण झाले नव्हते. ती सात दिवस दररोज भेंडीची भाजी करत होती. भेंडी म्हटलं कि माझ्या अंगावर हे भेंडी एवढे काटे येतात पण ह्या आठवड्यात नाही. ताकातली भेंडी, भेंडी आणि ताक, भेंडीतले ताक, ताक भेंडी रस्सा, भेंडी दो ताक, भेडीया भेंडी, क्रश्ड लेडीज फिंगर ऑ बटरमिल्क असे भेंडीचे विविध प्रकार खाऊन अंतरात्मा तृप्त झाला होता. मी चवीने खातोय बघून बायकोही नवीन नवीन प्रकार शोधून काढत होती. छोट्या चंकी मंकीचा समजूतदारपणा तर वाखाणण्यासारखा होता. सात दिवसात एकदाही त्याने भोकाड पसरलेले नाही. का चॉकलेटसाठी हट्ट केला नव्हता.
त्यामुळे भिंतीवरचे “कौटुंबीक सुखाचे घड्याळ” खूप दिवसांनंतर शंभरावर शंभर असा परफेक्ट स्कोर दाखवत होते.
“एक सेलेब्रेशन तो बनता ही है.” पुष्पा म्हणजे बायको म्हणाली.
मी लगेच सहमती दर्शवली. “ऑफकोर्स!”
मग कुठे जायचं यावर चर्चा सुरु झाली. माझं मत होतं कि पॅरीसला “मुलायम सुगंध संग्रहालय” आहे तिकडे जाऊ.
“आपण लंडनमध्ये मायकेल जॅक्सनचा “थरार” ऑडीटोरियामध्ये कार्यक्रम आहे. माझ्याकडे पास आहेत. तिकडे जाऊ.”
माझी बायको “कूच-का-कू” वर एक मान्यवर थॉट इन्फ़्लुएन्सर आहे त्यामुळे तिला अशा कार्यक्रमाचे फ्री पास मिळतात.
आमच्या कुटुंबाचा “विचार निर्देशक” आमचा मुलगा चंकी मंकी आहे. तो म्हणाला “किती दिवसात आपण बाहेर खायला गेलो नाही. चला आज जाऊ.”
विचार परिवर्तन व्हायच्या आधी आम्ही सर्वानुमते हाच प्रोग्राम फिक्स केला.
“रेस्टॉरंट अॅट द एंड ऑफ युनिवर्स” ला जाउया. तिथून बाहेरचा नज्जारा एकदम क्लासिक दिसतो. पण चंकी तिथून हात बाहेर काढायचा नाही बरका. ह्या विश्वाच्या बाहेर हात काढला तर काय होते, माहित आहे ना.”
“रेस्टॉरंट अॅट द एंड ऑफ युनिवर्स” हा “मॉलेक्युलर कॅफे” आहे. ह्यांचा स्वताचा रेप्लीकेटर-सर्वर आहे. आमच्या घरी होम रेप्लीकेटर आहे. पण तो “झॉम ऑटो”च्या मुख्य सर्वरला जोडलेला आहे. आम्ही जिथे राहतो तिथे लहरी खूप लहरी आहेत. त्यामुळे त्या पकडमध्ये येत नाहीत. वायरलेस लॅन काम करत नाही. म्हणून आम्हाला वायर्ड कनेक्शन घ्यावे लागले. त्यामुळे दुसऱ्या केबल मधले पदार्थ आमच्या केबल मध्ये झिरपून मिक्स होतात. म्हणजे कोंबडी वडे ऑर्डर केले तर उडीद वडे येऊ शकतात.
लोकांचा “स्वीस घी”च्या होम रेप्लीकेटरचा अनुभव चांगला आहे अस म्हणतात.
“आमच्या इथे सर्व पदार्थ स्वीस गाईच्या शुध्द घी मध्ये बनवतात” अशी त्यांची स्लोगन आहे.
पण काय आहे ना कि एका सर्विस प्रोवायडर कडून दुसऱ्याकडे मायग्रेट होताना किती किच किच होते त्याचा तुम्हाला अनुभव असेलच.
डॉ. ननवरे ह्यांनी रेप्लीकेटरचा शोध लावून मानव जातीवर अनंत उपकार केले. त्यांच्या संशोधनाचा मुख्य गाभा हा कि ह्या विश्वात १०^८६( one-hundred thousand quadrillion vigintillion.) इतके अणु इतक्या प्रचंड प्रमाणात अस्ताव्यस्त विखुरले आहेत. ते री-कॉनफिगर करून आपण काय वाट्टेल ते बनवू शकतो! त्या दिवसापासून सोन्याचे भाव गडगडले. सोने सत्तर रुपये किलोच्या भावाने विकू लागले. इन फॅक्ट लोखंड सोन्यापेक्षा जास्ती उपयोगी आहे ह्याची जाणीव लोकांना झाली. असो.
तर आम्ही “रेस्टॉरंट अॅट द एंड ऑफ युनिवर्स” कडे प्रयाण केले. आधी “विचार” करून त्या रेस्टॉरंटला शोभेलसा पोषाख केला. मग पार्किंग मधून आमची “थॉट हायपर राणी” गाडी बोलावली. गाडीत बसलो आणि निघालो.
गाडी गाडीच चालवत होती. हल्ली मानवांना लायसन देत नाहीत. मानवाने गाडी चालवणे हा अक्षम्य गुन्हा झाला आहे. मानवाने फक्त विचाराचे इंधन पुरवायचे. गाडीने वेग पकडला तेवढ्यात पोलीसी शिट्टीचा आवाज आला. हायपर हायवे पॅट्रोल ने आमच्या गाडीला थांबण्याचा इशारा केला होता.
आता काय बिघडले?
एक थॉट पोलीस पुढे आला आणि गाडीशी बोलू लागला.
“तू दोन एफ़टीएल पेक्षा कमी वेगाने गाडी चालवते आहेस? इथे मिनिमम स्पीड लिमिट तीन एफ़टीएल आहे अस जागोजागी लिहिले आहे ते वाचले नाहीस? का तुझ्या प्रोग्राम मध्ये किडा घुसला आहे? ओएस व्हर्शन काय आहे? अरेरे अजूनही डब्लू ७ ? आता डब्लू १२ आली आहे. नुसता विचार केला कि सिस्टीम ऑटो अपडेट होते. तेवढे पण कष्ट करायची तयारी नाही.”
ते वाक्ताडन ऐकून आमची गाडी बिथरली आणि मुळूमुळू रडायला लागली.
“अरे बापरे, ही तर रडायला लागली. बाई ग उगी उगी रडू नग. वायपर मार नि डोळे पूस बर. एक चांगला आवाज दे आणि सूट. कमी स्पीडने चालली की इकडे ट्राफिक जाम होतो, साहेब आम्हाला रागावतात. सध्या आमचा “स्त्री दाक्षिण्य सप्ताह” चालू आहे म्हणून तुला फक्त वार्निंग देऊन सोडून देतो.” पोलीस दादाचे आभार मानून गाडी पुढे चालू लागली.
थोडे अंतर गेल्यावर गाडी आमच्यावरच डाफरायला लागली. म्हणाली, “तुम्ही माझ्याबद्दल विचार करत नाही. म्हणून मला इंधन कमी पडलं आणि पोलिसाला काय त्याला चान्सच मिळाला. कसा मानभावीप्रमाणे बोलत होता ऐकलत ना. ट्रकला पकडायची हिम्मत आहे त्याची? सगळा दाब बिचाऱ्या गरीब गाड्यांवर. आता जोरदार विचार करा. म्हणजे माझा वेग वाढेल. आणि आपण टकाटक हॉटेलात पोहोचू.”
जेवायच्या वेळी आम्ही हॉटेलात पोहोचलो.
कुठे बसायचे? तिकडे एक लाल टेबल मोकळे होते. मला लाल रंग आवडतो. तर बायकोला हिरवा निळा असे मध्यम वारंवारीतेचे रंग आवडतात. स्पेक्ट्रमच्या मध्ये राहायचा तिचा प्रयत्न असतो. टोकाचे विचार तिला आवडत नाहीत.
“लाल रंग खुनशी रंग आहे. लाल टेबलावर पदार्थ गडद रंगाच्या तेलात सिंथेसाईझ करावे लागतील. त्याचा वास मला आवडत नाही. प्लस सध्या ग्रीनचा जमाना आहे. आपण त्या खिडकीपासच्या हिरव्या टेबलावर बसू. तिथून आपल्याला दुसऱ्या तरंगणाऱ्या समांतर विश्वांंचं मनोहारी दर्शन होईल.”
हिरवे तर हिरवे. आयुष्यातले महत्वाचे निर्णय घ्यायचे पूर्ण स्वातंत्र्य मी बायकोला दिले आहे. तर युक्रेनला पाठिंबा द्यायचा का नाही का पुतिनचे समर्थन करायचे असे फुटकळ निर्णय मी करतो. असो.
कॅफेमध्ये “थिंक मेरी जान फटा फटा फट...” हे गाणे वाजत होते.
आम्ही स्थानापन्न झाल्या झाल्या बाजूच्या संगणकाच्या पडद्याला जाग आली. आणि तो मेनू दाखवू लागला.
मधेच एक रोबोट पडद्यावर प्रकट झाला.
“वेलकम टू “रेस्टॉरंट अॅट द एंड ऑफ युनिवर्स””
हेच वाक्य नंतर त्याने विश्वाच्या दहा मान्यवर भाषांत पुन्हा ऐकवले.
आमचे चेहरे बघून त्याने ताडले ही मराठी मंडळी आहेत.
“”रेस्टॉरंट अॅट द एंड ऑफ युनिवर्स”मध्ये आपले स्वागत आहे.” इतके बोलून त्याने मराठी मेनू कार्ड लावले. प्रगत कृत्रिम बुद्धिमत्तेचा जय हो!
“तुम्हाला जी डिश पाहिजे असेल त्याचा क्रमांक तुम्ही तुमच्या समोरच्या टेबलावर बोटाने गिरवा. बस्स.”
“रोबोट...“
“एक्स्युज मी प्लिज. मी रोबोट नाहीये. मी माणूस आहे. माझे नाव आहे रॉबर्ट. पण तुम्ही मला प्यारसे रॉबी म्हणू शकता.”
“ओके रॉबी, पैले कांदा काटके लाव. बादमे हम ऑर्डर करेगा.”
“समजल. तो तुमचा गोड मुलगा आहे ना त्याला सांगा हात बाहेर काढायचा नाही. हे रॅप-अराउंड विश्व आहे. तो हात विश्वाच्या विरुध्द टोकातून आत येईल.”
विश्वाची वक्रता उणे आहे का अधिक आहे की शून्य आहे, विश्व फुटबालसारखे गोलमटोल आहे कि घोड्याच्या खोगीरासारखे आहे कि फुटबालाच्या मैदानासारखे सपाट आहे हे वादाचे विषय आहेत. आत्ता ह्या क्षणी मला त्यावर चर्चा करायची नव्हती.
“ओके, कांदा...”
“विचार करा. रिअॅलिटी इज व्हाटएवर यू थिंक. विचार करा कांदा हजर होईल.”
अस बोलून रॉबी अदृश्य झाला.
आम्ही आमचा मेनू स्वतःच सिद्ध करायचा ठरवलं. बायकोनं लसणाची झणझणीत फोडणी दिलेली केनु कुरडूची भाजी आणि ज्वारीची भाकरी “विचार” करून बनवली. तर मला अळूचं फतफतं पाहिजे होते. मुलाने काय विचार केला कोण जाणे पण त्याच्या ताटात ढीगभर आईसक्रिमं येऊन पडली.
चव घेऊन बघितलं तर एकाही पदार्थाला चव नव्हती. चंकी मंकीनं नवीन शोध लावायच्या इर्षेने जे काही बनवले होते ते त्यालाच ओ वाटायला लागलं.
“डॅड्स, काय केलं मी हे. आईसक्रिमला मी फोडणी दिली. मला वाटलं होतं... बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड...”

हा माझा नेहमीचा अनुभव आहे. आपण दोन चांगल्या गोष्टी एकत्र करून नवीन गोष्ट बनवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा असाच ओम फस होतं.
मी त्याची “फोडणीच आईसक्रिम फ्राय”ची डीश उचलली आणि आमच्या दोघांच्या ताटांच्या सह रिसायकल बिन मध्ये टाकली.
मुलगा हट्टाला पेटला होता. त्याने आता रॉकेटच्या आकाराचा केक बनवायचा विचार केला. मी “अमृत कोकम विथ डॅश ऑफ विस्की” चा विचार सुरु केला. तर संगणकावर घंटा वाजली.
“असल्या रानटी पकाव पदार्थाचा प्रोग्राम आमच्या स्मरणिकेत नाही. क्षमस्व.”
आता रॉबी पडद्यावर आला.
“सॉरी, तुमची निराशा झाली. तुम्ही नेमके असे पदार्थ ऑर्डर केले ज्याची रेसिपी आमच्याकडे नाही. तुम्ही पुण्याहून आलात काय? तुम्ही खरतर मुंबईला आमची गिरग्रामला मध्ये एक शाखा आहे. तिथे जायला पाहिजे होतं.”
आम्ही त्याचे आभार मानून काढता पाय घेतला.
कोणीही बोलायच्या मूडमध्ये नव्हते.
“तुम्हाला पॅरीसला “मुलायम सुगंध संग्रहालय”ला जायचे होते ना? आम्हाला घरी सोडा आणि तुम्ही पुढे जा.” बायको.
“त्यापेक्षा अस करूया कि तू मायकेल जॅक्सनच्या कार्यक्रमाला जा. तुला सोडून आम्ही घरी जातो.” मी.
माझा आणि बायकोचा एकमेकांसाठीचा स्वार्थत्याग बघून मुलाचा उर भरुन आला. तो म्हणाला, “मला देखील काही तरी बोलायला पाहिजे, नाही का? आपण सगळे घरी जाऊन छान पैकी झोपूया झालं.”
झोपेचा विचार मनात आला तशी झोप यायला लागली.
गाडी पाशी आलो तर गाडी म्हणाली. “गाडीची टाकी खाली झाली आहे. थोडे विचारइंधन भरायला लागेल.”
हॉटेलात विचार करकरून आधीच आम्ही तिघेही थकलो होतो. गाडी सरळ विचार पंपावर नेली आणि एक गॅलन विचार गाडीत टाकले.
परत जाताना बायकोच्या डोळ्यात अश्रू तराळले.
“मला ह्या सिंथेटिक जेवणाचा कंटाळा आला आहे. त्यापेक्षा आपण मामाच्या गावाला जाऊ, पळती झाडे पाहू. मामाची बायको सुगरण आहे. रोज रोज पोळी, शिकरण, गुलाबजामुन खाऊ. ज्वारीची भाकरी, पिठलं खाऊ. तुम्ही बुक्कीने कांदा फोडून द्या. कांदा भाकर गोड गोड. आडाचे पाणी पिऊ. गुगल ऑटोनॉमस कार विकून टाकून आत्म बैल कंपनीची बैलगाडी घेऊ. मागचा पुढचा “विचार” न करता मनमुराद जगू.”
“हो हो बाबा, आई म्हणते तसच करू. गावाला भागवतांचा बन्या आहे, टॉम सायर आहे, गोट्या ताम्हणकर आहे. चिंगी आहे. किती दिवस झाले त्यांना भेटून. चला...”
अश्या ह्या अतृप्त इच्छा केव्हापासून “विचाराधीन” आहेत. देव करो नि त्या लवकर पूर्ण होवोत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख...
कोट्या धीश अशी उपाधी तुम्हाला द्यावी असा थाॅट एक्सपेरीमेंट करतोय....

मामी, मानव पृथ्वीकर , दत्तात्रय साळुंके सर्वांचे आभार!
मानव
सुधारणा केली आहे.

जबरी लिहिले आहे..
मजा आली वाचताना...

बादवे-
गाडीने वेग पकडला तेवढ्यात पोलीसी शिट्टीचा आवाज आला.
>>> स्पीड ऑफ साऊंड फास्टर than 2 ftl ?

च्रप्स
हायपर हायवे पोलीस नाक्यावर थोडेच तंबाखू मळत उभे असणार? ते पण दोन एफटीएल गाडीत बसून पॅॅट्रोलिंग करणार ना.

अवल
आभारी आहे. पण मला एक सांगा तिकडे ऐसी अक्षरे चा दिवाळी अंकात माझी कथा आहे
"क्रॉसओवर आणि परत" वाचली नाही का ? ती पण वाचा.
https://aisiakshare.com/node/8573

भारी आहे .. Lol

जमलेय हे.. लिहीत राहा केशवकूल

मस्त

Mala hee thodi repetitive vatali.
(Gairasamaj nasava - pramanik pane lihilay mat)

नानबा
प्रामाणिक मताचे स्वागत आहे. आणि आदर पण.

0100100110100010110001100110000101011101001101010001100011111111100001111110010000100101100011001110001001100000

माझी प्रतिक्रिया! Happy

हायपर हायवे पोलीस नाक्यावर थोडेच तंबाखू मळत उभे असणार? ते पण दोन एफटीएल गाडीत बसून पॅॅट्रोलिंग करणार ना.
>>> तरीपण शक्य नाही.. साऊंड स्पीड vs लायीट स्पीड

अस असत तर आगगाडीत बसलेले दोघेजण एकमेकांशी बोलूच शकले नसते. किंवा सुपरसोनिक विमानातले.
खरी वैद्न्यानिक पद्धत अशी आहे. हायपर स्पेस मध्ये मरणाची थंडी असते. त्यामुळे पोलिसाने शिट्टी मारली कि त्या आवाजाचे बर्फात रुपांतर होते. दुसऱ्या गाडीतले प्यासेंजर बर्फाचे तुकडे झेलतात ते फोडल्यावर त्यातून शिट्टीचा आवाज बाहेर येतो.
अशी आहे नवीन टेक्नोलोजी!

केशवकूल, एकाच गाडीत, विमानात बसलेले लोक आणि सारख्या वेगाने जाणाऱ्या दोन वेगळ्या गाडीत बसलेले लोक यात फरक आहे.

ध्वनी लहरींना मूर्त माध्यम* (material medium) लागते, पहिल्या उदाहरणात सगळे या मधल्या मूर्त माध्यमा सकट प्रवास करत आहेत, दुसऱ्या उदाहरणात दोन गाड्यांमधले मूर्त माध्यम तुलनेत स्थायी असेल हा फरक.

अर्थात कथा म्हणुन पोलिसांची शिट्टी ऐकू आली हे मानायला मला काहीच अडचण नाही. 2FTL वेगाने चालणारी गाडी बनवत असतील आणि ते मानत असू तर शिटी ऐकू येण्याची तशी काही सोय केलीच असे मानणे अजिबात अवाजवी नाही.
तांत्रिक चर्चा होत आहे म्हणुन ही पोस्ट.

(* मूर्त माध्यम हे योग्य भाषांतर आहे की नाही माहीत नाही, समर्पक शब्द सुचवावा.)

ह्या असल्या साध्या सुध्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यामुळे माझ नोबल प्राईझ हुकल.
खर तर दोन गाड्या प्रथम सिन्क्रोनाइज़ केल्या जातात. मग एक गाडी मास्टर होते आणि दुसरी स्लेव मोड मध्ये जाते . दो जिस्म एक जान! नंतर काडेपेटीचा टेलेफोन वापरून ते संभाषण करतात.
...तशी काही सोय केलीच असे मानणे अजिबात अवाजवी नाही.>>आवाजाची वाजवी सोय करण्यासाठी आणि मिडीअम झमेला सॉर्ट आउट करण्यासाठी दोन उपाय योजले आहेत. तुम्हाला पाहिजे तो तुम्ही वापरू शकता.
काडेपेटीचा धागा सारखा तुटतो म्हणून हल्ली मोबाईल फोन वापरतात अस ऐकिवात आले आहे. खखोदेजा.