भाग १ इथे वाचू शकता - https://www.maayboli.com/node/82537
भाग २ इथे वाचू शकता - https://www.maayboli.com/node/82540
भाग ३ इथे वाचू शकता - https://www.maayboli.com/node/82546
१८ सप्टेंबर २०२२
गजर लावला होता पण त्याआधीच व्यवस्थित जाग आली.
सकाळी आपापल्या हॉटेलवरून निघून पोहोण्याच्या ठिकाणी भेटलो सगळे. तिकडे आम्ही सर्वांनी एनर्जी जेल खाल्ले आणि त्यावर पाणी प्यायले. ह्या ठिकाणी आयोजकांतर्फे पाण्याची सोय नसते त्यामुळे तिकडेच सोडून देता येतील अशा बाटल्या न्यायच्या असतात त्या नेल्यामुळे अडले नाही.
तिथे स्पर्धा सुरु होण्या अगोदर स्पर्धकांना उभे राहण्याची व्यवस्था तासाच्या आत पूर्ण करणारी मंडळी सर्वात पुढे आणि दर दहा मिनिटाच्या अंतरानी म्हणजे तास ते १ तास १० मिनिटे, १ तास १० मिनिटे ते १ तास २० मिनिटे, १ तास २० मिनिटे ते १ तास ३० मिनिटे आणि १ तास ३० मिनिटे ते १ तास ४० मिनिटे त्यांच्या मागच्या मागच्या भागात अशा प्रकारे केली होती आणि मग जसजसे पुढचे वेगात पोहणारे स्पर्धक समुद्रात उतरत जातील तसतसे मागची मंडळी हळूहळू पुढे पुढे सरकत जाणार अशी योजना केली होती.
१.
२.
३.
आम्हा सर्व पुणेरी मंडळी पोहोण्याचा वेग पाहता आम्ही दीड तासापाशी उभे होतो. पण एकेक टप्प्यातून पुढे जात असताना माझी जरा तंद्री लागली आणि बाकी पुणेरी मंडळी जरा पुढे निघून गेली. ती तंद्री जेमतेम मिनिटभर टिकली असेल पण मागचे काही दिवस, येतानाचा प्रवास ते मागची दोन तीन वर्षे सगळे क्षण डोळ्यासमोरून सरकले आणि आता स्पर्धा खरोखरच प्रत्यक्ष सुरु होते आहे हे जाणवून डोळ्यात पाणीच आले. लोकांना स्पर्धा संपवल्यावर रडायला येते ते मला आधीच आले. पण मनाला सावरले आणि जरा सावरतोय न सावरतोय तोच एक भारतीय दिसणारा माणूस दिसला. तो मुंबईचा निघाला. गौतम साळसकर म्हणून. मराठीत चार शब्द बोलायला मिळाले. मिनिटा दोन मिनिटाची भेट असेल पण त्यात समजले की तेही दीड तासात पोहोणे संपवण्याच्या प्रयत्नात आहेत आणि मला तर नक्कीच दीड तासाच्या वर वेळ लागणार होता त्यामुळे मागे रेंगाळलो ते योग्यच झाले असे वाटून बरे वाटले.
ध्वनिक्षेपकावरून काय काय प्रोत्साहनपर बोलणे सुरु होते. जिकडे माझे अजिबात लक्ष नव्हते. पोहायला दर दहा सेकंदाला पाच लोकांना ह्या प्रमाणे सोडत होते त्यावेळी आजूबाजूला उभ्या केलेल्या तात्पुरत्या कठड्यामागे स्पर्धकांच्या नातेवाईकांची फोटो काढणे वगैरे लगबग सुरु होती. अखेरीस माझा नंबर आला टायमिंग मॅट ओलांडून पुढे गेलो काही अंतर उथळ पाण्यामुळे चालतच पार करावे लागणार होते. ते करून झाल्यावर पोहायला सुरुवात केली. सुरुवात ठरवल्याप्रमाणे जरा सावकाशपणे वेळ घेऊनच केली. नंतर गॉगल मुळे दिसेनासे होते ते झाले त्याला पोहताना मधेच नीट करून झाले काही लोकांच्या लाथा खाऊन झाल्या काहींना माझ्या देऊन झाल्या सगळे बॉक्सेस चेक टीक झाले देव दयेने जेली फिश चा काहीही त्रास झाला नाही त्यांनाच आमचा त्रास झाला असावा.
पोहून बाहेर पडल्यानंतर पाण्यातून निघून बीच पार करून रस्ता गाठायचे अंतर बहुतेक करून अर्धा किमी तरी असेल आणि त्यानंतर सायकल ठेवली होती तो ट्रान्सीशन एरिया जवळपास किमी लांब असेल. दोन्ही स्पर्धा एकत्र केल्यामुळे अडीचहजार फुल च्या आणि तितक्याच हाफच्या सायकली त्यामुळे असा लांबलचक transition एरिया आदल्या दिवशी बघितला होता तरी वाटले तो संपतच नाहीये .
पहिल्यांदा बॅग ठेवायची जागा होती आणि मग सायकली. बॅगेतून सगळ्या वस्तू खाली ओतायच्या म्हणजे आपण जे काही योजून ठेवले असेल त्यातले करायचे राहून जात नाही. माझ्या सायकलच्या बॅगेत अंग पुसायला टॉवेल, पायाला लागलेली रेती पुसायला एक टॉवेल, हेल्मेट, खायला पौष्टिक लाडू, हातमोजे माझा ट्रायसूट स्लिव्हलेस असल्याने हात उन्हाने भाजून निघू नयेत म्हणून वरून घालायला एक पांढरा टीशर्ट अशी योजना केली होती. बॅगेच्या तिथे बाके असतात त्यावर बसून चटचट हे सर्व आटपायाचे असते तिथेच मंगेश भेटला त्याने दशरथ सर नुकतेच आणि जोतिराम, निलेश त्यांच्याही थोडे आधी पुढे गेल्याचे सांगितले. माझे आटपून होई तो मंगेशही गेला. मग मी ही माझे आटपून धावत धावत सायकलपाशी गेलो. सायकल घेतली तरी संपूर्ण transition area पार करून स्टार्टलाईन पर्यंत ती हातात घेऊन जाणे अपेक्षित असते स्टार्टलाईन क्रॉस केल्यावर मग त्यावर सायकल चालवणे सुरु करता येते.
१.
२.
सरते शेवटी सायकलिंग सुरु झाले. रस्ता चांगला होता चुकून कुठे खड्डा वगैरे असेलच तर त्याच्या थोडे आधीपासून फ्लुरोसंट रंगात diversion रंगवले होते जेणेकरून तुम्ही आजू बाजूने जाऊ शकता. लगेचच जिथे फ्लेमिंगो दिसतात ती जागा येऊन गेली.
पहिल्या वीस किमीनंतरचे अंतर दोन लूप मिळून कापायचे होते. अनेक सायकलस्वार मला ओलांडून गेले. मी आपला माझ्या सायकलीनुसार माझ्या गतीने शिस्तीत व्यवस्थितपणे जात होतो. वाटेत मधूनच पंक्चर झालेल्या अपघात झालेल्या सायकली दडपण आणत होत्या. स्पर्धा मार्गावर एक टेकडी असणार होती जिकडे ३-४ किमीचाच असेल पण अति प्रचंड चढ असणार होता. ती टेकडी कधी येणार म्हणून उत्सूकता होती. अचानक माझ्या नावाचा पुकारा करत निलेश विरुद्ध बाजूने पार झाला. स्पर्धेमध्ये ओळखीचे आपलं कोणी दिसले की येणारा हुरूप काही औरच. तसेच टेकडी जवळ आली असावी अशीही जाणीव झाली. अखेर एक गाव आले आणि गावापाशी एक चढ लागला तो फारच फुसका वाटला.
मग एक चर्च समोरचे aid स्टेशन लागले तिकडे अनेक शाळकरी लहान मुलेही स्वयंसेवक म्हणून चढाओढीने काम करत होती. गावाबाहेर पडल्यावर डावीकडचे वळण पार केल्यावर समोर थोडा चढ दिसला म्हटले हा दिसतोय मग तिकडून उजवीकडे वळल्यावर अजूनच चढ असलेला रस्ता लागला.ऊनही चटका देत होते. मग अजून थोडे पुढे अजून जास्त चढ लागला. झाडांच्या सावलीमुळे जरा बरे वाटले. पण चढ संपेच ना. दुतर्फा काही माणसे जोरजोरात ओरडून प्रोत्साहन देत होती. पुढे भारी सायकल असणारा एक जण उतरून जाताना दिसला. तितक्यात वेगाने जाणारे अनेक सायकलस्वार आल्याने मला बाजुबाजूने सायकल चालवावी लागली. गियर बदलूनही शेवटाकडे जाता जाता अगदी १००मी अंतर असेल पण उतरून चाललो. अर्थात उतरल्यावर नंतर कळले की चढाचे इतके कमी अंतर उरले होते म्हणून. पुढच्या खेपेला मात्र अंदाज असल्याने संपूर्ण चढ सायकल वरून ना उतरता पार केले. पहिली संपवून दुसरी फेरी सुरु करते वेळी अनेक सायकलस्वार परतीच्या मार्गावर जाताना दिसले म्हणजेच माझी पहिली फेरी झाली तेव्हा त्यांच्या दोन्ही फेऱ्या संपवून शेवटचे केवळ वीस किमी उरले होते. म्हटले आपल्याला कधी जमावे असे जोरात चालवायला. अर्थात तिथल्या सर्व स्पर्धकांमध्ये माझी सायकल एन्ट्री लेव्हल ची सर्वात स्वस्त असावी. दुसऱ्या फेरीच्या वेळेस रस्त्यावरची स्पर्धक संख्या एकदम कमी झाली.
पण त्या मार्गावरून आधी एकदा जाऊन आल्यामुळे वळण चढ वगैरे कुठे काय असणार ह्याचा अंदाज आलेला होता. त्यामुळे दुसरी फेरी अधिक आत्मविश्वासाने करता आली. दुसऱ्या फेरीच्या वेळी परतताना बऱ्यापैकी वारा होता त्यामुळे उन्हाचा त्रास झाला नाही पण वेग मात्र जरासा मंदावला. अर्थात शंभरच्यावर पार केलेल्या अंतरामुळेही नंतर वेग कमी झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सायकलिंगच्या दरम्यान एकूण पाच सहा वेळा एनर्जी जेल खाऊन पाणी पिण्याकरता तर त्या व्यतिरिक्त तीनवेळा लघवी करता म्हणून थांबलो. एकूणच शरीराला पाणी कमी न पडू देणे आणि लघवी जास्त वेळा लागू न देणे ह्यात समतोल साधणे ही अगदी तारेवरची नसली तरी जरा कसरतच असते. पोहोणे आणि सायकल अशा प्रकारे करावे की धावताना ताकद शिल्लक राहिली पाहिजे असे सांगण्यात आले होते आणि त्याप्रमाणे मी वागलो असे वाटत तरी होते.
अखेर सायकलिंग संपवून परत पोचलो. दिवस मावळतीकडे झुकायला लागला होता. परत फिनिश लाईन जवळ सायकलवरून उतरून फिनिश लाईन क्रॉस करायची असते तसे केले. माझ्या नंबरावर आधीच कोणीतरी सायकल लावून गेले होते बघतो तर त्या सायकलीवरही माझाच नंबर होता हाफ आयर्न वाला असावा. हे कोणाला सांगावे तर आजूबाजूला कोणी स्वयंसेवक नव्हता. मग त्याची सायकल जरा बाजूला सरकवून माझीही सायकल तिकडे लावली. हेल्मेट हातमोजे काढून ठेवले. हल्ली आमच्या ग्रुपचे नाव बदलले असल्याने आमच्याकडे वेगळे टी शर्ट आहेत पण मी स्पर्धेकरता नाव नोंदणी केली त्यावेळी जुनेच नाव असल्याने आणि त्या टी शर्टावर आपल्या झेंड्यातल्या तीन रंगाचे डिझाइन असल्याने रनिंगच्या वेळेस माझा ढक्कन टीशर्टघालायचा असे मी ठरवले होते त्याप्रमाणे तो चढवला. मात्र जरा गारठा वाटल्याने आधीचा पांढरा टी शर्ट तसाच ठेवून त्याच्यावरच चढवला आणि धावणे सुरु केले.
स्पर्धा मार्ग म्हणजे १० किमी चा लूप होता जो चार वेळा करून मग शेवटचे दोन करण्याकरता बीच कडे जाऊन रेड कार्पेट वरून धावून शेवट करायचा अशी योजना होती. मनाशी आधी योजल्या प्रमाणे होता होईल तो aid स्टेशन वगळता इतर कुठेही चालायचे नाही असे ठरवले होते त्याची अत्यंत योग्य प्रकारे अंमलबजावणी करत मार्गक्रमणा सुरु ठेवली. इथे अनेक जण रन-वॉक प्रकारे मार्गक्रमणा करत होते कोणी चालताना बघितले की आपणही चालावे असे अनावरपणे वाटायचे पण मग मनाला आवर घालून त्यांनी सायकल आपल्या खूप आधी संपवली आहे; ही त्यांची शेवटची फेरी असू शकते असे समजावून धावत राहिलो.
इथेही दुतर्फा प्रोत्साहन देणारे अनेक नागरिक आपले बळ वाढवून जातात. शिवाय येता जाता ओळखीचे स्पर्धक दिसल्यावर एकमेकांना हाकामारी करत असतात ते ही छान वाटते. मलाही आमची पुणेरी मंडळी भेटली. प्रज्वल प्रसादही दिसला नुसती हाक मारून न थांबता छान धावतोय असे म्हणून क्रॉस झाला. त्यामुळे धावत राहायला अजूनच जोर मिळाला. त्याची शेवटची फेरी असावी कारण तो नंतर परत दिसला नाही. दोन फेऱ्या झाल्यावर प्रॉपर अंधार पडला होता. तिसऱ्या फेरीच्या वेळी एकाला मागे टाकून जात असताना त्याची हर्षदभाई अशी हाक ऐकू आली. तो दिल्लीचा ऋषी सरीन म्हणून होता. अर्थात मी त्याला आधी अजिबात ओळखत नव्हतो पण धावताना अशी कंपनी मिळते आहे तर मी ती नक्कीच सोडणार नव्हतो. शिवाय त्याला नक्की किती वाजले तेही विचारावे असेही वाटले. पण हाय रे माझ्या कर्मा! त्याच्या घड्याळाची बॅटरी संपली होती. त्याची ही शेवटची फेरी होती. गप्पा मारत मारत आम्ही एकूण ३-४ किमी अंतर एकत्र धावलो असू पण तेवढ्यात त्याने मला वाटेवरचे एक काटेघड्याळ दाखवून माझा भरपूर वेळ शिलकीत आहे असे सांगून मला आश्वस्त केले.
त्याची सोबत संपल्यावर परत एकदा अंधारात एकट्याने धावत मार्गक्रमणा सुरु ठेवली. पहिल्या दोन तीन फेऱ्यांदरम्यान स्पर्धा मार्गावर दुतर्फा असलेले प्रोत्साहन देणारे नागरिक नातेवाईक कमी झाले होते. पण रस्त्यात एका ठिकाणी असणारे एक टोळके चारही वेळा जोरजोरात ओरडून प्रोत्साहन देत होते. ओळखीचे ना पाळखीचे आणि शेवटच्या दोन वेळा तर मला दुरून पाहूनच त्यांनी ओरडायला सुरुवात केल्याचे माझ्या विशेष लक्षात राहिले आहे. तिसऱ्या फेरीच्या वेळी ऋषी भेटायच्या अगोदर किती वाजलेत किती वेळ उरलाय देव जाणे असा विचार करत मी माझ्या तंद्रीत धावत होतो आणि अचानक ब्राव्हो ब्राव्हो आले आले अशा आरोळ्या कानी आल्या. आणि चौथ्या वेळी ते तिथेच असावे म्हणून मी मिनी-प्रार्थनाच केली होती. I was looking forward to seeing them. आणि त्यांनी मला निराश नाही केले. ते अजूनही तिथेच होते आणि लांबून मला पाहून आरोळ्या कानी आल्या. मला आता हे लिहिताना देखील अंगावर शहारा आणि डोळ्यात पाणी आलंय. मनात अतीव कृतज्ञता आहे. ती त्यांच्या पर्यंत पोचायचा काहीही मार्ग नाहीये पण ती जरूर पोचेल अशी आशा आहे.
अखेरीस चौथी फेरी संपवून शेवटच्या दोन किमी कडे जायची वेळ आली तेव्हा खोटे वाटेल पण तेव्हा माझी १० किमी ची अजून एक फेरी मारायला सांगितले असते तरी त्याची तयारी होती.
कोणत्याही स्पर्धेचा शेवट आम्ही नेहेमीच झोकात, जोमाने आणि जोरात करतो त्यामुळे जरा वेग पकडला. अर्थात दमून लगेच चालायला लागेल इतक्या जोरातही नाही धावलो. रेड कार्पेट जवळ आले. तिथेही दोन्ही बाजूला गर्दी अशी नसली तरी काही माणसे होतीच, त्यांचे, बहुदा गायीच्या गळ्यात बांधतात त्या प्रकारच्या घंटा वाजवणे सुरु होते. जर पुढे जातोय तो आपले पुणेरी मित्र माझी वाट बघतच होते. त्यांनी माझ्याकडे आपल्या देशाचा झेंडा सुपूर्त केला आणि तो फडकावून पुढे जाताना मी तो योग्य प्रकारे पकडला आहे ह्याची खात्री करून घेतली आणि मग परत वेग पकडून संपूर्ण रेड कार्पेटचे अंतर जोरात धावत फिनिश लाइन क्रॉस केली.
जगभरातील आयर्नमॅन स्पर्धेदरम्यान अशी एक प्रथा आहे की फिनिश लाईन पाशी तिथे असलेला उद्घोषक आपले आणि आपल्या देशाचे नाव घेऊन म्हणतो " You are an Ironman " उदा. हर्षद पेंडसे फ्रॉम इंडिया, (इथे एक छोटा पॉज) यु आर अॅन आयर्नमॅन.
आणि अशा रीतीने शेवट गोड झाला.
शिस्त सातत्य आणि कठोर परिश्रमानंतर झालेल्या स्वप्नपुर्तीचा आनंद काही औरच!
माझ्या हातून आयर्न मॅन स्पर्धा पार पडेल ह्याची माझ्यापेक्षा जास्त खात्री असलेल्या अनेक लोकांच्या शुभेच्छांमुळेच हे होऊ शकले.
त्यांच्या ऋणात राहावे हेच ठीक.
I totally believe in Ubantu. I am because we are!
मला लागलेला वेळ १४ तास ३४ मिनिटे २० सेकंद इतका होता.
निकाल https://www.ironman.com/im-emilia-romagna-results इथे जाऊन बघता येईल
शाम, एनर्जी बार कितीही
शाम, एनर्जी बार कितीही खाल्लेस, तरी त्यात प्रेमाचा कणही नसतो हो. तुला स्पर्धा पूर्ण करायचं बळ, पौष्टिक लाडवांतल्या प्रेमानेच दिलं बरं.
Bravo! खुप खुप अभिनंदन आणि
Bravo! खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा!
लेखन ही खुप छान केलय! तुमच्याबरोबर जणू माझाही प्रवास झाला.
तो झेंडा फडकावत धावण्याचा फोटो बघून अभिमान वाटला तुमचा Happy >> +११
मला तो तुम्हाला लागलेला
मला तो तुम्हाला लागलेला वेळेचा तक्ता बघून ह्या चालेंजच्या काठिण्याची त्रिमितीय कल्पना आली.
णिषेढ आहे बरं लाडू रेसिपी न
भरत
अभिनंदन हर्पेनजी . उबांटू
अभिनंदन हर्पेनजी . उबांटू मस्त . अजून एका स्पर्धेसाठी शुभेच्छा . नक्कीच कराल .
खूप खूप गुणिले infinity
खूप खूप गुणिले infinity
इतके अभिनंदन
अरे किती अप्रतिम लिहीले आहेस,
अरे किती अप्रतिम लिहीले आहेस, हर्पेन! एकसलग चारही भाग वाचले आणि खूप भारी वाटलं. चित्रदर्शी अनुभवकथन आहे तुझं. पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन. Proud of you!
मी काही काही मॅरेथॉन्ससाठी अश्या प्रोत्साहन देणार्यांचा भाग झाले आहे. अगदी त्या घंटा वगैरे वाजवून दिलेलं प्रोत्साहन
मला खात्री नव्हती की या अश्या गोष्टींचा खरंच पळणार्या लोकांना काही उपयोग होतो का? पण तू लिहीलेले वाचून ती खात्री पटली आणि छान वाटलं.
सर्वच भाग मस्त लिहिले आहे,
सर्वच भाग मस्त लिहिले आहे, हा प्रत्यक्ष स्पर्धेचा भाग आरामात वाचण्यासाठी ठेवला होता. खूप छान लिहिला हा भाग.
ब्राव्हो, परत एकदा अभिनंदन!
शिस्त सातत्य आणि कठोर
शिस्त सातत्य आणि कठोर परिश्रमानंतर झालेल्या स्वप्नपूर्तीचा आनंद काही औरच! >> अगदी पटलं.
वाचतांना अंगावर काटा येत होता. थरारक अनुभव. तुम्हाला सलाम आणि मनापासून अभिनंदन!!
तुमच्याबरोबर भाग घेतलेल्या लिस्ट्मध्ये बाकी पण बरेच भारतीय बघून फार मस्त वाटलं. त्यात एक नूपुर शिखरे म्हणून आहे तो सेलिब्रिटी फिट्नेस ट्रेनर आहे आणि आमिर खानचा भावी जावई
भरत - हाऊ क्यूट.
भरत - हाऊ क्यूट.
धन्यवाद निकु
पुन्हा एकदा धन्यवाद झकासराव हे होऊ शकले कारण शिस्त सातत्य आणि कठोर परिश्रम असे मी मोहोब्बते तल्या अमिताभ च्या style मधे म्हणत असतो
बा, उखाणे मस्त असतात तुझे त्यांच्या करता काय पण
धन्यवाद विक्रमसिंह अजून करु नक्की शकेन पण करेन असे वाटत नाही
धन्यवाद किल्ली
धन्यवाद rmd, तू अगदी पुण्याचे काम केले आहेस, मी देखील स्वयंसेवक म्हणून पाणी देण्याचे काम करताना असे cheering केले आहे पण म्हणूनच सांगतो की ते फार कंटाळवाणे वाटू शकते सलग इतका वेळ एका जागी उभे राहून घसा बसवून घ्यायचा वगैरे
त्यामुळे मी स्वतः धावताना अशा सर्वांना आणि इतर स्वयंसेवकाना जसे की पाणी वाहतूक व्यवस्था बघणारे पोलीस वगैरे ह्यांना नेहेमीच धन्यवाद म्हणत असतो त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो तो बघायला देखील छान वाटते.
धन्यवाद मानव सुदैवाने स्पर्धा देखील आरामात झाली
मॅगी - गाव तसं लहान असल्याने मला आदल्या दिवशी बरेच भारतीय भेटलेले नुपूर ही भेटला होता, शिवाय स्पर्धेत running part च्या वेळी loop असल्याने तेव्हाही दिसला आणि आम्ही हाकामारी केलेली.
प्रोत्साहन देणाऱ्या लोकांच्या
प्रोत्साहन देणाऱ्या लोकांच्या खरच कायम ऋणातच रहावं ! आम्ही गोव्याच्या ७०.३ मध्ये टीम मध्ये उतरलो होतो सहज अनुभव म्हणून.. टीम म्हणजे स्विम, सायकलिंग व रनिंग वेगवेगळ्या लोकांनी करायचं आणि तिघांचा मिळून टीमचा फिनिश टाईम धरला जातो. मी रनिंग ला होतो म्हणजे सगळ्यात शेवट. तेव्हाही ७ किमी चे ३ लूप होते. धावायला सुरुवात केल्यावर लगेच एका टोळक्याने जोरदार आरोळी ठोकली ..ऐ भाई, तू अपने वाला है.. जल्दी खतम कर .. शाम को बैठते है ! प्रत्येक वेळेला त्यांचा उत्साह वाढतच राहिला!! शेवटच्या वेळी तर बेरीकेडच्या पलीकडून चीअर करत सोबत धावत राहिले.... ! प्रत्येक वेळच्या अपनेवाला है तू .. या आरोळीचा अर्थ माझ्या लगेच लक्षात येउन हसतच उत्साहाने पुढे जायचो... कारण आमच्या टीमचं नाव Team OLD MONK होतं... फिनिश झाल्यावर तू लिहिल्याप्रमाणे तो अनौन्स करणाराही आमचं नाव पुकारल्यावर जोरात हसला होता ...
Team OLD MONK >> छान नाव.
Team OLD MONK >> छान नाव.
हेम, छान आठवण, शेअर
हेम, छान आठवण, शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
बाकी दोन पार्टनर कोण होते?
इथे लिहिले आहेस का त्या अनुभवाबद्दल ?
वाचायला आवडेल.
फार छान झालीय मालिका.
फार छान झालीय मालिका.
सविस्तरपणे लिहिल्या मुळे हे किती कठीण होतं ह्याची जास्त चांगली कल्पना आली आणि म्हणूनच शेवटचे दोन फोटो बघताना तर उर अभिमानाने भरून आला. काय वाटलं हे सांगणं शब्दातीत आहे.
पुन्हा एकदा अभिनंदन आणि शुभेच्छा .
हर्पेन! जबरदस्त! तुझे
हर्पेन! जबरदस्त! तुझे मनापासुन अभिनंदन! खरच कौतुक करण्यासारखी कामगिरी केलीस!
तुला धावताना एनकरेज करणार्या ग्रुपबद्दल वाचताना मला माझ्या १९९६ च्या अॅटलांटा ऑलिंपिक्सच्या अनुभवाची आठवण आली!
"शर्यत सुरु झाली. मी माझा या शर्यतीबद्दलचा थोडा अभ्यास आधीच घरुन करुन आलो होतो. त्यावरुन मला माहीत होते की १९९२ मधे बार्सिलोना मधे ही शर्यत इथिओपियाची डिरार्टु टुलु हिने जिंकली होती व याही वेळी तिच संभावीत विजेती होती. पहिल्या दहा फेर्यांनन्तर टुलुच पहिली होती. त्यामुळे जेव्हा जेव्हा टुलु माझ्या समोरुन पास होत होती तेव्हा मी जोरात ओरडुन 'गो टुलु गो' असे ओरडुन तिला प्रोत्साहन देत होतो. मी पहिल्या रांगेत असल्यामुळे तिला माझा आवाज ऐकु येत होता. तिला वाटले असेल की हा कोण आहे माझ्या नावाने मला प्रोत्साहन देणारा? माझ्या मनात मात्र टुलु ही मला आतापर्यंत माहीत असलेल्या ऑलिंपिक्स हिरोंचे प्रतिनिधीत्व करत होती... माझ्या मनात तीच झाटोपेक होती,तिच अलाय मिमु होती,तिच फ़ॅनी ब्लॅन्कर्स कुन होती व तीच स्टिव्हन अखवारी होती... त्या महान ऍथलिट्सनी जेव्हा ऑलिंपिक्सच्या रंगमंचावर आपापले मास्टरपीस(स्लार्टीच्या भाषेत.... मालकतुकडे!:-))सादर केले होते तेव्हा मी त्याला मुकलो होतो... आज टुलुला प्रोत्साहन देताना माझ्या मनात मी अप्रत्यक्षरित्या त्या व त्यांच्यासारख्या महान ऍथलिट्सना पोस्थ्युमसली एनकरेज करत होतो... माझे अंग पावसात पुर्ण भिजले होते पण त्याहीपेक्षा माझे मन माझ्या ऑलिंपिक्सच्या आठवणींनी त्याक्षणी जास्त भिजले होते. असा अनुभव आपल्याला आयुष्यात परत कधी अनुभवयाला मिळेल की नाही हे मला माहीत नव्हते म्हणुन मनापासुन टुलुला नावाने व बाकीच्यांनासुद्धा प्रोत्साहन देत मी संपुर्ण शर्यत संपेसपर्यंत उभा होतो. शर्यत संपली... टुलु पहीली आली नाही... तिला यावेळेला पदकही मिळाले नाही. पण मला त्याची पर्वा नव्हती. ती आणी हे सगळे वर्ल्ड क्लास ऍथलिट्स शर्यतीत भाग घेउन..... माणसाचे जे स्वाभावीक नेचर असते की आपण आपले सर्वस्व पणाला लावुन ट्राय टु बी द बेस्ट..त्याचे उत्तम उदाहरण होते. माझ्या मनात ते सगळे विजयी होते. मला शेवटचा नंबर आलेल्या ऍथलिटची तिने या ऑलिंपिक्समधे भाग घेण्यासाठी केलेली आयुष्यभरची मेहनत दिसत होती व म्हणुन तिचेही टाळ्या वाजवुन मी कौतुक करत होतो. "
त्यामुळे हर्पेन.. त्यांचाही मनात.. तुच झाटोपेक असावास , तुच अलाय मिमु असावास , तुच फॅनी ब्लॅम्कर्स कुह्म असावास व तुच जॉन स्टिव्हन अखवारी असावास!
त्यांच्या मनातले मला माहीत नाही पण माझ्या मनात तरी तु त्यांचेच प्रतिनिधित्व करतोस! सलाम तुला व तु घेतलेल्या मेहनतीला!
मनीमोहोर - मनापासून धन्यवाद.
मनीमोहोर - मनापासून धन्यवाद.
मुकुंद - हा प्रतिसाद स्टारमार्क्ड केलाय मी माझ्याकरता. याआधीही वाचला होता बहुतेक पण "माझ्या मनात तरी तु त्यांचेच प्रतिनिधित्व करतोस!" हे वाक्य म्हणजे मोठाच सन्मान आहे माझा. अनेकानेक धन्यवाद.
Wow! Wow!
Wow! Wow!
Heartiest congrats! Bravo!!
धन्यवाद नानबा.
धन्यवाद नानबा.
पोहणे, सायकल चालवणे व धावणे
पोहणे, सायकल चालवणे व धावणे (तेही सलग व मर्यादित वेळेत), केवळ अशक्यच. धाडसी कामगिरीबद्दल खूप खूप अभिनंदन!
मला स्वप्नातही असा विचार करू शकत नाही.
हर्पेन, तुमच्या या
हर्पेन, तुमच्या या प्रवासाबद्दल इथेच वाचले होते की असे करणार आहात म्हणून. प्रत्यक्ष आता हे चारही भाग वाचताना इतकं भारी वाटलं. किती मोठं काम आहे हे, आणि ते इतक्या चांगल्या रीतीने पूर्ण केलत. खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. फार छान झालं आहे हे लिखाण. सलग चार भाग वाचताना खूपच मजा आली.
चारही भाग वाचले. आश्चर्य,
चारही भाग वाचले. आश्चर्य, अभिमान अश्या अनेक भावना एकत्र वाटून गेल्या.एका वेगळ्या देशात, वेगळ्या हवामान, वातावरणात हे आव्हान पूर्ण करणाऱ्या सर्वांनाच मोठा सलाम.
तो झेंडा घेऊन फिनिश लाईन वाला फोटो बघून फारच भारी वाटलं.
(अवांतर : आता काही प्रॉडक्ट च्या जाहिराती,फोटोशूट वगैरे करायला मिळतील का?)
धन्यवाद राहुल, निर्मल आणि अनु
धन्यवाद राहुल, निर्मल आणि अनु
अनु - जाहिरातींकरता मायबोलीकर उद्योजकांनी मनावर घेतलं तर बघू

मी तयार आहे
मी आधी एक फिटनेस ब्रँड लॉंच
मी आधी एक फिटनेस ब्रँड लॉंच करते आणि तुम्हाला संपर्क करते हरपेन
जबरीच रे !! पुन्हा एकदा
जबरीच रे !! पुन्हा एकदा अभिनंदन.
अनु - मी वाट बघतो.
अनु - मी वाट बघतो.
धन्यवाद पराग.
खुप खुप अभिनंदन हर्पेन!!
खुप खुप अभिनंदन हर्पेन!!
तो तिरंगा घेऊन धावतानाचा फोटो पाहून अंगावर अक्षरशः काटा आला.
अभिमानास्पद कामगिरी!!!!
धन्यवाद आबा.
धन्यवाद आबा.
Pages