मागच्या महिन्यातल्या एका रविवारच्या संध्याकाळी धोधो पाऊस कोसळत होता. त्यामुळे घरातच अडकून पडलो होतो. आंतरजालावर पुरेसे बागडून कंटाळा आला होता. मग वेळ घालवायचा म्हणून छापील इंग्लिश वृत्तपत्राची साप्ताहिक पुरवणी बारकाईने पाहू लागलो. त्यातला एक लेख दुबईबद्दल होता. त्या शहराची अनेकविध वैशिष्टे सांगितल्यावर तिथल्या एका संग्रहालयाचा त्यात उल्लेख होता. त्यामध्ये सर्व देशांच्या आतापर्यंत छापल्या गेलेल्या चलनी नोटांचे प्रदर्शन आहे. त्यात जगभरातील जवळजवळ सर्व नोटा असून ‘त्या’ जगप्रसिद्ध १००ट्रिलियन झिंबाब्वे डॉलर किमतीच्या नोटेचाही समावेश आहे. हे वाचून स्तिमित झालो. कित्येक दिवसांनी एवढी मोठी संख्या ऐकली होती. आपल्या नेहमीच्या आर्थिक व्यवहारात दशलक्षच्या पुढे मोजायची वेळच येत नाही ! अगदी भारतीय लोकसंख्येबाबत बोलताना सुद्धा (दीड) अब्ज ही मर्यादा असते. हा अंक तर त्याच्याही पुढे पळत होता. मग गंमत म्हणून ही मोठी संख्या कागदावर लिहून काढली :
१००, ०००,०००,०००,०००
मराठी अंकमोजणीनुसार या संख्येला दशपद्म म्हणतात (चढती अंकमोजणी अशी : अब्ज, दशअब्ज , खर्व, दशखर्व, पद्म, दशपद्म.).
आतापर्यंत मी पाहिलेली भारताची सर्वाधिक मूल्याची नोट २,००० रु. ची. माझ्या लहानपणी मी दहा हजार रुपयांची नोट असल्याचे ऐकले होते पण नंतर १९७८मध्ये ती रद्द झाल्याने बघायला काही मिळाली नव्हती. अर्थशास्त्राचा माझा काही अभ्यास नाही. परंतु वरची झिम्बाब्वेची महाकाय रकमेची नोट त्या देशातील चलनाचे प्रचंड अवमूल्यन झाल्याचे सुचवते इतपत समजले. मग या विषयावरील कुतूहल चाळवले गेले. आर्थिक मागास देशांच्या चलनी इतिहासावर एक धावती नजर टाकली. तेव्हा लक्षात आले की वरील दशपद्मच्या झिम्बाब्वेच्या नोटेने चलनांच्या अवमूल्यन इतिहासात एक विक्रम घडवलेला आहे !
बरं, जेव्हा ती नोट वापरात होती तेव्हा तिचे बाजारमूल्य तरी काय असावे ? एखाद्याला वाटेल की त्या एका नोटेत एखादी लहानशी कार किंवा गेला बाजार, एखादी स्कूटर तरी येत असेल. पण छे ! तेवढ्या रकमेत जेमतेम ब्रेडचे एक पुडके किंवा सार्वजनिक बसचे शहरांतर्गत प्रवासाचे एक तिकीट येत होते !!
...
आता झिम्बाब्वेच्या 1980 ते 2009 पर्यंतच्या चलन इतिहासावर एक नजर टाकू. 1980मध्ये तिथे पूर्वीचा ह्रोडेशियन डॉलर रद्द करून त्या जागी झिंबाब्वे डॉलर ( ZWD) हे चलन अस्तित्वात आले. तेव्हा त्याचे अमेरिकी डॉलरशी १:१ असे समकक्ष नाते होते. सन 2000 पर्यंत हे चलन ठीक चालले. परंतु त्यानंतर मात्र तिथे प्रचंड चलनफुगवटा (hyperinflation) होत गेला. परिणामी त्यांच्या चलनाचे नीचांकी अवमूल्यन झाले. २००६-०९ च्या दरम्यान त्या चलनाचे तीनदा पुनर्मूल्यांकन केले गेले. तेव्हाच वर उल्लेखलेली दशपद्म ZWD ची नोट छापली गेली. अखेर एप्रिल 2009 मध्ये त्यांचे हे चलन पूर्णपणे रद्द करण्यात आले. त्यानंतरचा चलन इतिहास लेखाच्या कक्षेबाहेर आहे.
ही सर्व माहिती संदर्भातून वाचता वाचताच मला पूर्वायुष्यातील एक प्रसंग आठवला- साधारण 2007 चा. तेव्हा माझे वास्तव्य परदेशात होते. तिथल्या आमच्या रुग्णालयात ८५ देशांचे डॉक्टर्स एकत्र काम करीत होते. त्यातले एकजण झिम्बाब्वेचे नागरिक होते. परंतु गेली 20 वर्षे ते अन्य देशांतच स्थिरावले होते. एकदा असेच आम्ही काहीजण चहापानासाठी एकत्र बसलो होतो. गप्पा मारताना गाडी विविध देशांच्या चलनाच्या विनिमय दरावर आली. मग प्रत्येक जण आपापल्या देशाच्या चलनाचा अमेरिकी डॉलरशी विनिमय दर सांगत होता. शेवटी या झिम्बावेच्या डॉक्टरांची पाळी आली. प्रथम ते कसेनुसे हसले. एखादा नापास विद्यार्थी जसे आपले गुण सांगायला अनुत्सुक असतो तसा त्यांचा चेहरा भासला. मग ते म्हणाले,
“मी जर माझी बचत झिंबाब्वे डॉलर्समध्ये रूपांतरित केली तर मला अक्षरशः पोतंभर पैसे मिळतील ! पण उपयोग काय त्या पैशांचा ? ते सगळं अवमूल्यित चलन आहे. तेव्हा मी तो नाद सोडला आहे. मी आता माझी सर्व बचत अमेरिकी डॉलर्समध्येच बँकेत ठेवतो”.
आज १०दशपद्म च्या नोटेसंबंधी वाचल्यावर मला त्यांच्या तेव्हाच्या उद्गारांचा खरा अर्थ समजला.
…
जेव्हा या मोठ्या चलनाच्या नोटा छापायची वेळ सरकारवर आली तेव्हाची झिम्बाब्वेची अवस्था दारूण झालेली होती. तिथल्या मध्यवर्ती बँकेला ज्या कागदावर चलन छापायचे तो कागद देखील परवडत नव्हता दुकानदार एकाच दिवसात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती दुप्पट करून टाकत. लोकांना खरेदीला जाताना या नोटा अक्षरशः टोपलीत भरून नव्या लागत. ! राष्ट्राध्यक्षांनी विविध वटहुकूम काढून किमती नियंत्रणात ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.
अशा प्रकारे नागरिकांमधील असंतोष शिगेला पोहोचला होता. विविध निषेधाचे फलक हातांत घेऊन लोकांचे देशभर मोर्चे निघायचे. त्यातला एक फलक लक्ष्यवेधी होता :
“आम्ही अब्जाधीश भिकारी आहोत”
2009 मध्ये या चलनाचा अमेरिकेशी अमेरिकी डॉलरची असलेला विनिमय दर हास्यास्पद पातळीवर उतरला होता :
१अमेरिकी डॉलर = (३४ अंकी संख्या) ZWD.
या सर्व कोलमडलेल्या आर्थिक परिस्थितीचा शेवट हे चलन रद्द करण्यात झाला. त्यानंतर तिथे अमेरिकी डॉलर आणि दक्षिण आफ्रिकी रँड ही चलने मुख्यत्वे वापरात आली.
झिंबाब्वे डॉलर्सचे निश्चलनीकरण पूर्ण झाल्यानंतर देशभर साठलेल्या त्या नोटांना पाय फुटले. अनेक बँकर्स व दलालांनी त्या परदेशातील आपल्या ओळखीच्या व्यक्तींना देऊन टाकल्या. आता वस्तुसंग्राहक जमातीचे या नोटांकडे लक्ष गेले नसते तरच नवल ! अशा शौकिनांकडून या बाद झालेल्या नोटांना मागणी येऊ लागली. मग त्या नोटा पुरवणारे देखील हुशार झाले. शालेय विद्यार्थ्यांपासून ते मुरलेल्या दलालांपर्यंत अनेकांनी या नोटा चढत्या भावाने विकण्यास सुरुवात केली. १-२ अमेरिकी डॉलरला ती नोट घेऊन विविध देशांमध्ये जास्तीत जास्त रकमेला विकण्याची चढाओढ सुरू झाली. इंग्लंडमधील एका पिता-पुत्रांनी याचा जोरदार धंदा केला आणि अल्पावधीतच त्यांनी त्यातून तब्बल १५००% टक्के नफा कमावला. तर काही गुंतवणूक सल्लागारांनी त्यांच्या अशिलांना ही नोट दाखवून चलनाचे अवमूल्यन म्हणजे काय ते समजावून दिले आणि योग्य त्या गुंतवणुकीचे महत्त्व पटवले.
जगातील काही संग्रहालयांनी देखील ही ऐतिहासिक नोट जतन केलेली आहे. सध्या ही नोट काही इ-विक्री संस्थळांवर उपलब्ध आहे. ‘ॲमेझॉन’ वर ही एक नोट US $200 ला विक्रीस ठेवलेली आहे.
....
या ऐतिहासिक चलनाचा एक मजेशीर उपयोग अमेरिकेत केला जातो. तिथे दरवर्षी सप्टेंबर महिन्यात विचित्र आणि विनोदी संशोधनासाठी ‘अज्ञान नोबेल पुरस्कार’ दिले जातात (https://www.maayboli.com/node/71538). त्यातील विविध विजेत्यांना १ पद्म झिंबाब्वे डॉलर्सची नोट समारंभपूर्वक भेट दिली जाते. २००९चे अंकगणिताचे अज्ञान नोबेल पारितोषिक तर चक्क झिम्बाब्वेच्या रिझर्व बँकेचे तत्कालीन गव्हर्नर Gideon Gono यांना देण्यात आले.
“त्यांनी केलेल्या नीचांकी अवमूल्यनामुळे सामान्य नागरिकांना दैनंदिन व्यवहारात महाप्रचंड अंकांशी खेळण्याची संधी सहज मिळाली”.
असे मानपत्र देऊन गौरव समितीने त्यांचा सत्कार केला !!
Gono यांनी त्यांच्या या ‘संशोधनाची’ कारणमीमांसा करणारे हे पुस्तक लिहीले आहे :
Zimbabwe’s Casino Economy — Extraordinary Measures for Extraordinary Challenges.
दारूण अर्थव्यवस्थेचे प्रतीक असलेल्या झिम्बाब्वेच्या ऐतिहासिक चलनाची अशी ही कहाणी.
.....................................
१. मराठी अंकमोजणी संदर्भ : https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4...
२. चित्रे जालावरून साभार !
वा, वेगळी माहिती नेहमी
वा, वेगळी माहिती नेहमी प्रमाणे रोचक! या नोटेची माहिती नव्हती, धन्यवाद डॉक्टर. त्या नोटेवरचं वाचताना कसलं भारी वाटतय, उपयोग नाही पण तरीही
अज्ञान नोबल पुरस्कार ऐकलं नव्हतं हे. वाचते तोही लेख
घसरणारे चलन यावर पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीतला असा एक किस्सा सांगितला जातो. तेव्हा जर्मनीची आर्थिक परिस्थिती अगदीच ढासळलेली होती. युद्धाची भरपाई म्हणून इंग्लंड, फ्रान्सला प्रचंड पैसे द्यावे लागत होते. ते नसल्याने त्या ऐवजी तयार होणारं सगळे उत्पादन त्या देशांना द्यावे लागे. स्वाभाविकच चलनाचे मूल्य नगण्य झाले होते.
या वर एक किस्सा सांगितला जातो. की एकदा एका माणसाला तेल आणायचे होते त्यासाठी लागणाऱ्या टोपलीभर नोटा घेऊन तो निघाला. दारात आल्यावर लक्षात आले की तेलासाठीची बाटली आतच राहिली. टोपली कुठे परत आत न्या; म्हणून त्याने टोपली दारातच ठेवली अन बाटली आणायला आत गेला. बाहेर येऊन पहातो, तो टोपलीतले सगळ्या नोटा जमिनीवर ओतलेल्या अन टोपली गायब.
टोपलीभर नोटांना फार किंमत नव्हती शिवाय त्या ठेवणं अडचणीचे म्हणून, चोराने नोटा दारात ओतल्या अन त्याहून जास्त किंमतीची टोपली पळवली.
रोचक...
रोचक...
जेव्हा जेव्हा जगभरात कुठे असे झाल्याची बातमी वाचनात येते तेव्हा पहिला प्रश्न हाच मनात येतो की आपला असा बॅंड वाजणे शक्य आहे का.. आणि असे झालेच तर एक सामान्य नागरीक म्हणून आपण सर्व्हाईव्हलसाठी काय करायचे?
चर्चा उद्घाटना बद्दल आभार !
चर्चा उद्घाटना बद्दल आभार !
1. म्हणून, चोराने नोटा दारात ओतल्या अन त्याहून जास्त किंमतीची टोपली पळवली.
>>>>
हा किस्सा केवळ जबराट आहे ! मूल्य गमावलेले चलन म्हणजे काय ते उमगते.
..
२. असे झालेच तर एक सामान्य नागरीक म्हणून आपण सर्व्हाईव्हलसाठी काय करायचे? >>
याबद्दल अर्थतज्ज्ञांनी जरूर लिहावे. वाचायला आवडेल.
लेखात उल्लेख केलेले झिम्बाब्वेचे डॉक्टर मी जवळून पाहिले आहेत.
ते जास्तीत जास्त काळ परदेशातच काढून तिकडे स्थायिक व्हायचा विचार करतात. अर्थात हे मूठभर लोकांना शक्य होत असावे.
संबंधित देशातील बहुसंख्य जनतेचे काय हा खरा प्रश्न असतो.
आपल्याकडे बहुतांश घरात सोने
आपल्याकडे बहुतांश घरात सोने असते त्यामुळे नीचांकी अवमूल्यन झालं तरी सोन्याच्या जोरावर आपण सावरू शकतो
धन्यवाद.
धन्यवाद.
मी एक सामान्य वाचक या नात्याने काही बाळबोध शंका विचारतो :
नीचांकी अवमूल्यनाच्या परिस्थितीत सामान्य नागरिकांनी नक्की काय करायचे ?
१. आपल्या जवळील सोने सरकारला देऊन त्याबदल्यात अवमुल्यीत चलन स्वीकारायचे का ? मग सरकार पुढे असे जमलेले सगळे सोने आंतरराष्ट्रीय बाजारात ठेवून आपल्या रुपयाची किंमत सावरते का ?
२. दुसरी शक्यता ही फक्त माझ्या मनात आली आहे.
सामान्य नागरिकांना जीवनावश्यक वस्तू विकत घ्यायला स्वतःच्या देशाचे चलनच लागते. तर मग त्या ऐवजी सोन्याच्या रुपात वस्तुविनिमय सुरू करता येतो का ? तो कायदेशीर असतो का ?
जर्मनीच्या चलनाची अवस्था
जर्मनीच्या चलनाची अवस्था आकड्यात लिहिली तर अंदाज येईल.
1919 मधे इंग्लडचे चलन आणि जर्मनीचे चलन याचा रेश्यो एकास 20 होता.
तर 1923 मधे तो एकास 6,000,000,000
इतका घसरला.
अर्थव्यवस्थेचे गाडे ठप्प होते
अर्थव्यवस्थेचे गाडे ठप्प होते तेव्हा आर्थिकमंदी उद्भवू शकते. पैशाचा समाजातील प्रवास थांबणं म्हणजे आर्थिक मंदीला आमंत्रण. बाजारातील क्रयशक्ती कमी झाली, उत्पादन भरपूर पण ग्राहकच नाही अन मग कालांतराने उत्पादनाला उठाव नाही म्हणून उत्पादन घटणे. उत्पादन घटले, मालाला उठाव नाही यातून पैसा न मिळणे, पैसा नाही म्हणून क्रयशक्ती नाही. असे दुष्टचक्र चालू झाले की आर्थिक महामंदी उद्भवते.
आर्थिक मंदीमधे सरकारची भूमिका हीच महत्वाची ठरते. बाजारात पैसा उपलब्ध व्हावा यासाठी विविध सरकारी कामे निर्माण करणे(रस्ते, रेल्वे, विविध समाज उपयोगी बांधकामे), कर्ज कमी दरात उपलब्ध करणे असे काही उपाय सरकार करू शकते. यामुळे सामान्य माणसाला रोजगार अन त्यातून पैसा उपलब्ध होतो; त्याची क्रयशक्ती वाढते अन ठप्प झालेले अर्थव्यवस्थेचे गाडे पुन्हा चालू होते.
त्यामुळे सामान्य माणूस फार परिस्थिती पालटू शकतो का, याबाबत शंका आहे.
सामान्य माणूस आपले सोने सरकार जमा करायला का तयार होईल? कारण एकूणच संशयाचे वातावरण असल्यावर एकमेव आधार त्याला सोने हाच वाटू शकतो.
आणि सोने हे चलनासाठी वापरले जाणे आता तरी शक्य वाटत नाही.
माझा सोन्याबाबत फार अभ्यास नाही, तेव्हा तज्ज्ञांनी प्रकाश टाकावा.
अवल,
अवल,
काही प्रमाणात शंकानिरसन झाले. धन्यवाद !
पण,
समजा, आर्थिक महामंदीमध्ये अन्नधान्य मिळण्याची मारामार आहे.
अशा वेळेस सामान्य माणूस साठवलेले सोने सरकारला देणार नसेल किंवा त्याचा विनिमयासाठी उपयोग नसेल,
तर मग अशा सोन्याचा फायदा काय असतो ?
आणीबाणीत ते उपयोगी पडेल असे आपण म्हणतो ना ?
शीर्षकाचा आकडा बघूनच गरगरले
शीर्षकाचा आकडा बघूनच गरगरले
खर्व, निखर्व, पद्म... आकडे मोजणीची ही परिमाणे कधी वापरावी लागली नाहीत, माहिती मात्र आहेत !
वेगळ्या विषयावरचा छान लेख.
https://mashable.com/feature
https://mashable.com/feature/german-hyperinflation
ह्या साईटला अवश्य भेट द्या. मनोरंजन होईल तेव्हढीच भीति पण वाटेल.
खर्व, निखर्व, पद्म... आकडे
खर्व, निखर्व, पद्म... आकडे मोजणीची ही परिमाणे >>>
बरोबर. मीदेखील पद्मच्या पुढचे विसरून गेलो होतो.
यानिमित्ताने उजळणी करून घेतली.
.....
ह्या साईटला अवश्य भेट द्या. >>>
एक धावती भेट तिथे दिली. त्यातील एक फोटो लक्षणीय वाटला. तो दुकानदार दुरुस्ती सेवेच्या बदल्यात थेट अन्नच मागतो आहे. अशा वेळी विनिमयाचे एकमेव माध्यम !
यावरून भीषणता समजते.
धन्यवाद !
झिम्बाब्वे: मार्च 2007 ते
झिम्बाब्वे: मार्च 2007 ते मध्य-नोव्हेंबर 2008
सर्वोच्च मासिक महागाई दर: 7.96 x 10^10% !!!
दैनिक महागाई दर: 98%
किमती दुप्पट होण्यासाठी लागणारा वेळ: २४.७ तास
चलन: झिम्बाब्वे डॉलर
अतिशय रोचक व माहितीपूर्ण लेख.
अतिशय रोचक व माहितीपूर्ण लेख.
नेहमीप्रमाणेच नवीन माहिती!
नेहमीप्रमाणेच नवीन माहिती!
अबब आणि अरेरे ! >> एकदम समर्पक शीर्षक !
असे सगळे वाचले की वाटते आपले बार्टर एक्सचेंज होते ते चांगले होते का ?
२०२३ मध्ये आपल्याला जागतिक
२०२३ मध्ये आपल्याला जागतिक मंदीचे धक्के बसू शकतात असे ऐकतोय. Credit Suisse दिवाळखोर होतेय. Cascading effect आपल्या बॅंकींग व्यवस्थेवर एवढा होणार नाही असे एक्स्पर्ट सांगतात कारण भारतात त्यांचा व्यवसाय एवढा नाही. यांची तुलना Lehman brothers ने आणलेल्या २००८ च्या मंदीशी होतेय.
रशियन युद्धामुळे Europe घायाळ झालेय. ग्यास नाही...कुठेतरी Christmas लाही विजेचे दिवे लावू नका असे अपील होतेय. आपण रशियाकडून crude oil स्वस्तात घेतोय ही जमेची बाजू.
महागाई काबूत आणण्यासाठी जगभर वाढते व्याजदर ही चिंतेची बाब.
आपला ग्रोथ रेट ५ च्या आसपास असेल असे ऐकले.
मी जे ऐकले ते लिहितोय...यातलं जास्त कळत नाही.
.....
या लेखाने बरीच नवीन माहिती झाली. अवल यांचा प्रतिसादही रंजक.
धन्यवाद मंडळी !
धन्यवाद मंडळी !
आपल्या प्रत्येकाकडून काही ना काही वेगळे पैलू समजत आहेत.
मला त्या विक्रमी चलनी नोटेसंबंधी कुतूहल वाटल्याने काही जुजबी वाचन करून हे लिहिले.
अर्थशास्त्रातले काही समजत नाही. या चर्चेच्या निमित्ताने आपल्याकडून चांगली माहिती मिळत आहे.
काही वेळेस प्रगत देश देखील ( ? चीन /जपान ) त्यांचे चलन अमेरिकी डॉ. च्या तुलनेत मुद्दाम घसरवतात असे ऐकले होते. त्याची कारणे काय असतात ? आयात/ निर्यात ..वगैरे ?
आर्थिक शिस्त आणि देशात सर्व
आर्थिक शिस्त आणि देशात सर्व प्रकारचे उत्पादन होत असेल.इम्पोर्ट वर देश अवलंबून नसेल तसे जागतिक आर्थिक मंदीत पण देश संकटात सापडत नाही
देशांतर्गत बाजारावर त्याचा फार मोठा परिणाम होत नाही.
मौज मजेच्या वस्तू आयात करण्यावर काही अलिखित नियम स्वतः चे असावेत.
अमूल्य परकीय चलन फक्त गरजेच्या वस्तू आयात करण्यासाठी च वापरले जावे.
विदेशी कर्ज घेताना त्या पैशाचा उपयोग योग्य होत आहे का ह्या वारसा
आपले बार्टर एक्सचेंज होते ते
आपले बार्टर एक्सचेंज होते ते चांगले होते का ? >>> ते यातील अभ्यासक मंडळींनी सांगावे !
एक छोटेसे उदाहरण देतो - पाच वर्षांपूर्वी वाचलेले.
कोकणातील एका खेड्यात एक कुटुंबवैद्य आहेत. त्यांनी तिथल्या लोकांची आर्थिक परिस्थिती जाणली आहे. उचलून पैसे देणे हा भाग त्या लोकांना जड जातो. डॉक्टर त्या लोकांकडून तपासणी फी न घेता थेट गरजेचा शेतमाल घेतात ( गहू, तांदूळ, भुईमूग शेंगा इत्यादी).
अशा अल्पस्वल्प प्रमाणात असा विनिमय कुठे ना कुठे चालू असेल. परंतु खूप मोठ्या प्रमाणावर जनतेसाठी ते कितपत व्यवहार्य होईल हे सांगता येत नाही.
मौजमजेच्या वस्तू आयात
मौजमजेच्या वस्तू आयात करण्यावर काही अलिखित नियम स्वतः चे असावेत. अमूल्य परकीय चलन फक्त गरजेच्या वस्तू आयात करण्यासाठी च वापरले जावे.
>>> चांगला मुद्दा आहे.
एक छोटेसे उदाहरण देतो - पाच
एक छोटेसे उदाहरण देतो - पाच वर्षांपूर्वी वाचलेले.
कोकणातील एका खेड्यात एक कुटुंबवैद्य आहेत. त्यांनी तिथल्या लोकांची आर्थिक परिस्थिती जाणली आहे. उचलून पैसे देणे हा भाग त्या लोकांना जड जातो. डॉक्टर त्या लोकांकडून तपासणी फी न घेता थेट गरजेचा शेतमाल घेतात ( गहू, तांदूळ, भुईमूग शेंगा इत्यादी). >> हो! वैद्य सुविनय दामले म्हणता आहात का ? त्यांचे लिम्का बुक कि की गिनिज बुक रेकॉर्ड आहे ना यासाठी.
मौजमजेच्या वस्तू आयात करण्यावर काही अलिखित नियम स्वतः चे असावेत. अमूल्य परकीय चलन फक्त गरजेच्या वस्तू आयात करण्यासाठी च वापरले जावे. >>+११
निकु
निकु
बरोबर ! तेच असावेत असे वाटते आहे. अंधुकसा त्यांचा फोटो आठवतो आहे.
छान पूरक माहिती दिलीत.
मला खालील माहिती व्हाॅटस अप
मला खालील माहिती व्हाॅटस अप वर आली होती. आपले पूर्वज किती प्रगत होते ते पहा.
अतिप्राचीन अतिप्रगत हिंदुस्तानी संख्या मापन.
खालील संख्या तुम्हाला मोजता येईल? आणी हो १००० कोटी (एक हजार कोटी) असं वापरायचं नाही तर एकच परिमाण वापरुन मोजा.
१०,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,०००
एकं, दहं, शतं, सहस्त्र, दशसहस्त्र, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अर्व, दशअर्व, खर्व, दशखर्व, पद्म, दशपद्म, नील, दशनील, शंख, दशशंख, क्षिति, दशक्षिति, क्षोभ, दशक्षोभ, ऋध्दि, दशऋध्दि, सिध्दि, दशसिध्दि, निधि, दशनिधी, क्षोणी, दशक्षोणी, कल्प, दशकल्प, त्राही, दशत्राही, ब्रम्हांड, दशब्रम्हांड, रुद्र, दशरुद्र, ताल, दशताल, भार, दशभार, बुरुज, दशबुरुज, घंटा, दशघंटा, मील, दशमील, पचूर, दशपचूर, लय, दशलय, फार, दशफार, अषार, दशअषार, वट, दशवट, गिरी, दशगिरी, मन, दशमन, बव, दशबव, शंकु, दशशंकु, बाप, दशबाप, बल, दशबल, झार, दशझार, भीर, दशभीर, वज्र, दशवज्र, लोट, दशलोट, नजे, दशनजे, पट, दशपट, तमे, दशतमे, डंभ, दशडंभ, कैक, दशकैक, अमित, दशअमित, गोल, दशगोल, परिमित, दशपरिमित, अनंत, दशअनंत.
मोजा आणि इतरांनाही सांगा.
पाहिले आमच्या गावात पण असे
पाहिले आमच्या गावात पण असे प्रकार असायचे.
शिकेकाई आमच्या गावात होत नाही आणि काही भागात शिकेकाई खूप होते पण ज्वारी किंवा बाकी कड धान्य होत नाहीत..तेव्हा फक्त वस्तू ची अदलाबदल होत होती काही प्रमाणात.
ह्या व्यवहारात पैसे वापरले जायचे नाही
वस्तू च वापरल्या जायच्या .
पण हे फक्त देण्यासाठी आपल्याकडे पण काही तरी असायला हवं ना.
धान्य,आणि कष्ट ,कला ह्या पलीकडे माणसाकडे स्वतचं काय असते.ह्याचा विनिमय करता येईल.
आमची ज्वारी काढून दे आणि त्या बदल्यात तू कडबा घे.
किंवा नांगरून दे त्या बदल्यात मी कपडे शिवून देईल .
असे व्यवहार आज पण होतात.
जिथे पैसा वापरला जात नाही.
पण हे सर्रास शक्य नाही.
चलन हे हवं च
हिंदुस्तानी संख्या मापन. >>>
हिंदुस्तानी संख्या मापन. >>>
मी लेखाच्या तळटिपेमध्ये जो विकिपीडियाचा संदर्भ दिला आहे तीच ही माहिती आहे. ही भारतीय दशमान पद्धत आहे.
अन्य प्राचीन संदर्भांत 'शंकू' नंतर :
जलधी, अंत्य, मध्य व परार्ध अशी परिमाणे आहेत.
संदर्भानुसार काही फरक दिसतात.
पहिली मंदी येते की पहिला चलन
पहिली मंदी येते की पहिला चलन फुगवटा निर्माण होतो.
काय संबंध आहे दोघांचा
चलन हे हवंच >>>
चलन हे हवंच >>>
अगदी बरोबर ! यावर दुमत नाही.
मानवजात जेव्हा प्राचीन वस्तुविनिमयाकडून चलनाकडे उत्क्रांत झाली, त्यासंदर्भातील 'सेपियन्स' या हरारी यांच्या पुस्तकातील 'पैशाचा सुगंध' हे प्रकरण अप्रतिम आहे. त्यातील एकच वाक्य उद्धृत करतो :
जेव्हा मोठ्या संख्येने अपरिचित लोक सहकार्य करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा उपकार-परतफेडीचे अर्थकारण व्यावहारिक ठरत नाही.
मंदी , चलन फुगवटा, तेजी,
मंदी , चलन फुगवटा, तेजी, वाढीव व्याजदर ,मंदी ही भांडवलशाही अर्थव्यवस्थेची व्यवच्छेदक लक्षणे आहेत. अशी सायकल कायम चालू असते. तेव्हा देशाची GDP GROWTH सतत सरळ रेषेत वर नेणे हे येरा गबाळ्याचे काम नाही. तेथे पाहिजे जातीचे.
तुमच्या नेहमीच्या
तुमच्या नेहमीच्या विषयांपेक्षा वेगळ्या विषयावरचा हा लेखही छान झालाय.
झिंबाब्वे त्या hyper inflation बद्दल कानावर पडायचं.
चलनाचा शोध हा चाक आणि विस्तवाच्या शोधांइतकाच महत्त्वाचा वाटतो. फक्त त्यामुळे मध्यस्थ हा प्रकार उदयाला येऊ शकला, हे चांगले झाले की वाईट असा प्रश्न पडू शकतो.
धन्यवाद.
धन्यवाद.
त्यामुळे मध्यस्थ हा प्रकार उदयाला येऊ शकला, हे चांगले झाले की वाईट असा प्रश्न पडू शकतो. >>>
हा तर लाखमोलाचा प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर पटकन देणे खरेच अवघड आहे !
सवांतर :
बँक या शब्दाचा उगम 'बाजारात सावकार निरनिराळ्या बाकांवर बसत' इथूनच झालेला आहे ! (banca)
हे वाचायचे राहून गेले असल्यास जरूर वाचाच :
https://www.loksatta.com/navneet/bhashasitra-bank-budget-market-loan-in-...
तसा खूप गुंतागुंत असणारा विषय
तसा खूप गुंतागुंत असणारा विषय आहे.
उत्पादन खर्च कमी करणे बरोबर कामगार कपात येंत्रिकी करण,स्वस्तात कच्चा माल.
म्हणजे कच्चा माल पुरवण्या लोकांना कमी नफा.कामगार कपात म्हणजे उत्पादक कंपनीच्या नफ्याच्या हिस्से दारी मध्ये कमी लोक सहभागी.
क्रयशक्ती वर परिणाम.
स्वस्त दरात कर्ज मिळाल्यामुळे पैसे बाजारात आले की महागाई वाढते.
बँका स्वस्तात घर कर्ज देवू लागल्या आणि मुंबई मध्ये घराच्या किंमती वाढल्या.
हे डोळ्या समोर च उदाहरण आहे..
Mediclaim असले की उपचार खर्च वाढतो.
म्हणजे महागाई वाढते.
कर्ज महाग झाली की नवीन उद्योग निर्माण होत नाहीत.
बेकरी वाढते..उत्पादन कमी होते आणि महागाई वाढते.
पण कर्ज स्वस्त झाल्यावर महागाई जास्त वाढते पण कर्ज महाग झाली तर महागाई वाढते ती प्रमाणाने कमी असते.
साठेबाजी वाढते ,वस्तूंचा तुटवडा निर्माण केला जातो आणि महागाई कृत्रिम पने वाढते.
Pages