अन्नपूर्णेच्या नोंदी

Submitted by ज्येष्ठागौरी on 3 October, 2022 - 14:32

अन्नपूर्णेच्या नोंदी
लाडक्या लेकीचं लग्न ठरलं आणि आणि लग्नाच्या दिवसापर्यंत पाच महिन्यांचा अवधी मिळाला.लग्न छान थाटात आणि अभिरुचीसंपन्न असावं ह्यासाठी बरीच धडपड केली.सगळ्यांना द्यायच्या भेटवस्तू त्या त्या व्यक्तीला आवडतील अशा घेतल्या,त्यासाठी ठिकठिकाणी जाऊन ,खेटे घालून वस्तू आणल्या.खूप छान नवीन नवीन कल्पना सुचत गेल्या.त्या प्रत्यक्षात आणताना मजा आली.वस्तू, त्याची वेष्टणे, नावांच्या चिठ्ठ्या हे पर्यावरपूरक असावं, कलात्मक असावं आणि त्याला खास आमचा 'स्पर्श'असावा असं ठरलं.पत्रिका हातानं लिहिल्या,वेष्टण बहुतांशी कागदाची,पिशव्या कापडी, नावांच्या चिठ्ठया लेकीने पेपर quilling करुन सुंदर हस्ताक्षरात लिहिल्या, विहीणबाईना साडया अनोख्या वेष्टणांमध्ये दिल्या.वर वधू दोघेही महाराष्ट्रीय असल्यानं
अगदी छान पारंपरिक महाराष्ट्रीय पद्धतीनं लग्न आणि लग्नाआधीचे विधी असणार होते.त्यामुळे सगळ्यांना खूप आपलेपणा वाटणार होता.
लेकीचा आणि जावयाचा पोशाख, जेवण ,विधी सगळंच पारंपरिक आणि खानदानी असणार होतं तर मग त्यात आपली परंपरा म्हणून रुखवत द्यावं असं ठरवलं.लेकीच्या सासूबाईंनी सांगितलं की तुम्हाला हौस म्हणून करायचं असेल तर करा ,नाहीतर सगळं सामान खूप आहे. त्यामुळे हौस म्हणून करायचं ठरलं आणि मनात खूप कल्पना यायला लागल्या.एक नक्की ठरवलं होतं की जी वस्तू भरपूर वापरता येतील आणि टिकतील अशाच वस्तू द्यायच्या.काही वस्तू शकुनाच्या म्हणून आणि काही अगदी जवळच्या माणसांनी प्रेमानं दिलेल्या वस्तू जमायला लागल्या. काकू आणि मामीनी भरतकाम करुन दिलं होतं, गव्हले घरचे तर पाच खिरी दारच्या होत्या,फराळाचे पदार्थ ,लोणची मुरंबे हेही द्यायचं असं ठरवलं.मावशीनं केलेला मोरावळा,मामीनं केलेल्या करंज्या अशा आपलेपणाच्या वस्तू जमल्या.लग्नाच्या वेळी रुखवत छान सजलं.आलेल्या पाहुण्यांनी रुखवत आवर्जून पाह्यलं. रुखवत बघून ते खूप आवडल्याचं कळवलं कारण इतर गोष्टींबरोबर ह्या सगळ्यात होती, ती एक अनोखी वस्तू आणि ती म्हणजे अन्नपूर्णेचं बाड!त्याचं झालं असं की मी लग्नाच्या दोन महिने आधी
माझ्या मैत्रिणी, जावा, बहिणी,वहिन्या, सगळ्यांना एक छोटा निरोप पाठवला तो असा ~
Hi! माझ्या डोक्यात एक कल्पना आहे,ऋचाला लग्नात एक विशेष भेट द्यावी असं डोक्यात आहे.मी तिला एक डायरी देणार आहे,पाककृती लिहून! पण फक्त मी नाही तर तूसुद्धा! तुझी एखादी आवडती, हातखंडा पाककृती A 4 च्या निम्म्या आकारात म्हणजे डायरीत बसेल एवढ्या कागदात,तुझ्या अक्षरात लिहून देशील का? कृती मोठी असेल तर पानं वाढली तरी चालेल!खाली नाव घाल,त्याबरोबर तुझ्या काही विशेष टिप्पणी, स्वयंपाकबद्दलचा एखादा विचार,तुझं स्वयंपाकाशी असलेलं नातं असं किंवा तुला अजून काही सुचेल ते लिहून देशील का?मी ते खास डायरीत चिकटवून तिला देणार आहे..more the merrier!पानांचं ,कृतींच्या संख्येचं कुठलंही बंधन नाही. पण कमीत कमी एक तरी हवीच हवी..ही एकदम वेगळी भेट ठरेल असं वाटतं आहे.भरपूर वेळ आहे, साधारण मे महिन्याच्या मध्यात माझ्याकडे पोचली तरी चालेल.सक्ती नाही पण लिहून दिलंस तर मला फार आनंद होईल आणि तू तो पदार्थ करताना तुझ्या मनात ऋचा आणि तिच्या मनात तू असशील.माझी आई आमच्या दहा माणसांच्या घरात चार ठाव वेगवेगळे पदार्थ आनंदानं करत असायची..मी नोकरी करत असल्यानं तो कमी केला आणि ऋचाचा पेशा बघता तिला अजून कमी वेळ मिळणार आहे पण जो पदार्थ करेल,तो ती मनापासून आणि आनंदानं करेल अशी अपेक्षा आहे..
स्वयंपाक करताना तो उत्तम भावनेनं करावा असं माझी आई सांगायची, स्वतः गोविंद गोविंद नाव घ्यायची.मला हे अगदी त्याच्या जवळचं वाटतंय..
तुला काय वाटतंय..~
आणि आश्चर्य म्हणजे ,म्हणजे खरं तर आश्चर्य नाहीच पण सगळ्यांनी अगदी सकारात्मक आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.लग्नाच्या आधी एक महिना माझ्याकडे कृती लिहिलेले कागद यायला लागले.ऋचाच्या चुलत बहिणीपासून ते आमच्या शेजारी राहणाऱ्याअठ्ठ्याऐंशी वर्षाच्या अम्मांनी लिहलेल्या पायनॅपल स्नोच्या कृतीपर्यंत,वेगवेगळ्या टप्प्यावरच्या गृहिणींनी लिहलेला अनुभवानंद वाचताना खूप उत्साह आणि उल्हास मिळाला.आपल्यावर प्रेम करणारी इतकी माणसं आपण बाळगून आहोत हे जाणवून आत शांत वाटलं.
ऋचासाठी ही surprise gift होती त्यामुळे त्या भेटीला सुंदर मूर्त स्वरुप येईपर्यंत त्या पाककृतींचे कागद जपून ठेवण्याची अतिरिक्त पण आनंददायी जबाबदारी येऊन पडली.तरी माझ्या एका मैत्रिणीनं सगळ्या मैत्रिणींचे कागद जमा करुन एकगठ्ठा मला दिले, परदेशातल्या मंडळीनी मेलवर, पुण्यात नसलेल्या मंडळीनी व्हाट्सएपच्या माध्यमातून, कोल्हापुरातल्या जावेनं चक्क वही कुरियर करुन, धडपड करुन कृती माझ्यापर्यंत पोहोचवल्या.
लग्नाच्या आधी एक आठवडा शिवाजीनगरला हातकागदाच्या मोठ्या दुकानात, कापडी बांधणीचं एक मोठं बाड मिळालं आणि मनासारखी आणखी एक गोष्ट घडली,बाड छान घट्टमुट्ट बांधणीचं आणि खणाच्या कापडाचं आहे ,आतले कागद चांगले दणकट आहेत.आता त्याच्यात एकेक कागद चिकटवायला घेतले, सुरवात केली ती आदि शंकराचार्य ह्यांच्या श्री अन्नपूर्णा श्लोकानं !दुसऱ्या पानावर माझ्या पुतण्याच्या बायकोनं सुंदर छोटी छोटी चित्र काढली होती.पहिला कागद होता तो माझ्या आईनं माझ्यासाठी लिहिलेल्या कृतीची झेरॉक्स, नंतर माझ्या सासूबाईंच्या हस्ताक्षरातील एक कृती ,तिसरी होती ऋचाच्या लाडक्या मामाची आवडती कृती आणि त्याचा फोटो मामीनी इतकं हृद्य जुळवलं आहे की ज्याचं नाव ते.माझ्या,जावा मैत्रिणी, ऋचाची वहिनी,चुलत बहीण अशा सगळ्यांचे कागद वाचताना ,ते योग्य पद्धतीनं कलात्मकरीत्या लावताना, मला फार मजा आली.ह्या सगळ्या सुगृहिणींनी हे काम इतक्या प्रेमानं आणि आपलेपणाने केलं आहे.काहींनी एकापेक्षा जास्त कृती लिहिल्या, त्यात नुक्से आहेतच, काही विशेष क्लुप्त्या आहेत, स्वयंपाकबद्दलचे विचार आहेत, पारंपरिक आणि आधुनिक कृतींचा संगम आहे त्यात."टुकीची टिक्की" आहे,"सैन्यात शिरा" पण आहे.दडपे पोहे,साबुदाणे वडे,अळीवाचे लाडू, मटार उसळ, कोथिंबीर वडी, घुटं पानगी,दाक्षिणात्य मुळगा पुडी,आवियल,अडई, पोंगल आहे, सांज्याच्या पोळ्या आहेत, निनावं, मसूर बिर्याणी ह्यासारखे सी के पी खासियत असणारे पदार्थ आहेत.पायनपल स्नो ,अपल पुडिंग,कॅरट सूप आहे अशा अनेक पाककृतींनी ही वही श्रीमंत आहे.वहीचा शेवट मावशीच्या कवितेनं झाला आहे.
माझ्या जवळच्या सगळ्यांनी प्रेमानं त्यांच्या वारशात ऋचाला सामील करुन घेतलं ह्याचं इतकं कौतुक मला आहे..
हळुहळू वही आकार घ्यायला लागली,एका मैत्रिणीनं त्या बाडाला छान कापडी आवरण आणून दिलं,घरचं केळवण झालं त्या दिवशी कुंकू लावून ऋचाच्या हातात ही वही ठेवली आणि बरोबर एक पत्र ...
प्रिय ऋचा
आपल्याकडे एक प्रथा म्हणून मुलीच्या लग्नात रुखवत देतात.त्यात काही खाद्यपदार्थ, काही कलाकुसरीच्या वस्तू आणि सहजीवनाबद्दलचे अनुभवाचे बोलही लिहिलेले असतात.शकुनाचं म्हणून तुलाही रुखवत द्यायचं ठरवलं!तुझं रुखवत थोडं पारंपरिक आणि थोडं वेगळं आहे.पारंपरिक खाद्यपदार्थ आणि वस्तू आहेतंच,तर काही तुझ्या जवळच्या माणसांनी दिलेल्या भेटवस्तू आहेत आणि सगळ्यात अनन्य गोष्ट आहे ती एक डायरी!
तुला रुखवतात काय काय द्यायचं ह्याचा विचार करताना असं वाटलं की काहीतरी पाककृतीशी निगडित द्यावं. म्हणून ही छोटीशी डायरी.ह्यात काही कृती मी लिहिलेल्या आहेत आणि बऱ्याच कृती ह्या माझ्या जवळच्या, जिवाभावाच्या मंडळींनी लिहिल्या आहेत, ह्या बहुतेक सगळ्या जणी तुला जन्मापासून ओळखतात आणि काही तू थोडी मोठी झालीस तेंव्हापासून आणि काहींनी तर तुला पाहिलं नाहीये पण माझ्या बोलण्यातून तू त्यांना भेटली आहेस.म्हणूनच मी ही कल्पना मांडली तेंव्हा सगळ्यांनी ती उत्साहानं आणि प्रेमानं उचलून धरली.ह्या पाककृती माझ्याकडे प्रत्यक्ष आणि email वरही आल्या.ह्या सगळ्यांनी फक्त कृती नाही तर अन्नासंबंधी, आहारासंबंधी आणि कधी आयुष्यासंबंधी गोड लिहिलं आहे.ह्यातलं वाचून पदार्थ करताना, त्या त्या व्यक्तीची छान आठवण तुझ्या मनात असेल आणि तो पदार्थ उत्तम होईल ह्याची खात्री मला आहे.माझ्या आजूबाजूला आई आजी काकू ह्या सुगरणी होत्याच पण बापू,मोहनमामा, संजयमामा,पपाजोबा हे सगळे पुरुषही पदार्थ उत्तम करायचे.ह्या सगळ्यांमुळे मला एक कळलं चांगल्या मनानं स्वयंपाक केला की उत्तमच होतो..ह्यात माझी आई म्हणजे तू जिला दादी म्हणायचीस, जिचा तुला छान सहवास लाभला, जिच्या हातचं तू मनापासून जेवली आहेस,तिनं माझ्यासाठी लिहिलेल्या तिच्या अक्षरातल्या काही कृती आहेत आणि आजीच्या(बाबाच्या आईच्या)जिला तू कधीच बघितलंही नाहीयेस पण जिच्या सुगरपणाचं कौतुक बाबाकडून ऐकलं आहेस..आणि लीलाकाकू जिच्याही हातचं तू खाल्लं आहेस, ह्या तिघी आत्ता नसल्या तरी त्यांची अक्षरं,कृती आणि त्यामागची भावना तुला नक्कीच उपयोगी पडतील.माझ्या सगळ्या सुह्रदांनी चांगल्या मनानी लिहिलेले हे शब्द वाचताना मला इतका आनंद मिळाला आहे आणि त्यांची माझ्यापर्यंत पोहोचवायची धडपड जाणवून केवळ भरुनही आलं आहे..
ही अनोखी भेट म्हणजे खरंतर
खजिनाच तुझ्या हातात सोपवते आहे मी! तो तू असोशीनं सांभाळशील याची मला खात्री आहे!
Love!
आई.....
माझ्या आईनं कधी स्वतः कृती लिहून ठेवल्या नाहीत, सगळी प्रमाणं तिच्या डोक्यात असायची,नंतर माझ्या आग्रहाखातर माझ्यासाठी तिनं काही कृती लिहिल्या, त्या अक्षरात तिच्या वयाची साक्ष देणारा सूक्ष्म कंप जाणवतो, त्यामुळे तिच्या हातून जास्त लिहिलं गेलं नाही. तिच्या काही कृती माझ्या वहिनींनी लिहून ठेवल्या, सासूबाईंनी कृती लिहिल्या पण त्या एकत्रित नाहीत, पण हे त्यांनी करायला हवं होतं हे मनापासून वाटलं.माझ्या सख्या सोयऱ्यांनी केलेली सुरुवात माझ्या लेकीने पुढे न्यावी असं मनापासून वाटलं.कुठंतरी ह्या गोष्टीची नोंद व्हायला हवी, एकेका घराची खाद्य परंपरा असते, एकेका करणाऱ्या हाताची खासियत असते,क्लुप्ती असते,नजाकत असते,ती जपायला हवी.तो खजिना असतो जतन करायला हवा.अन्नपूर्णांचे हे वेचे सांभाळायला हवेत.एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आणि एका 'कर्त्या' हाताकडून दुसऱ्या करणाऱ्या हाताकडे जाताना,काही बदल त्यात नक्कीच घडतील आणि काही गोष्टी अगदी तशाच राहतील हेही खरंच आहे.पण ते लिखित स्वरुपात, निदान नक्कल केलेल्या स्वरुपात टिकले पाहिजेत.
मी गाडगीळांच्या दुकानात
लग्नात गौरीहरासाठी द्यायची चांदीची अन्नपूर्णा चांगली निरखून बघत असताना, का कोण जाणे नाही, पण सर्व अर्थानं आई डोळ्यासमोर उभी राहिली,तिची खूप मोठी उणीव कार्यात जाणवणार होतीच, माझ्या लग्नात माझ्यासाठी तिनंच तर आणली होती अन्नपूर्णा! मनातून भरुन आलं आणि डोळ्यात ढग आपोआप जमले आणि अचानक नवऱ्याच्या पणजोळी, कर्नाटकात हलशी ह्या खेड्यातल्या झरोका असलेल्या स्वयंपाकघरात कुंकवाने लिहिलेली ।।श्री अन्नपूर्णा प्रसन्न।। ही अक्षरं डोळ्यासमोर आली.तिथंही आईच आली होती मनात,आताही लेकीच्या लग्नामुळे सारखं सारखं डोळ्यात येणाऱ्या आडमुठ्या पाण्यामागे,पापण्यांच्या आड प्रसन्न ,संतुष्ट ,समाधानी अन्नदा आई दिसली आणि असं जाणवलं की अन्नपूर्णा कधीच कुठेही जात नसते , उलट आपल्यात सामावून घेत पुढे जात असते. ती कोणत्या ना कोणत्या रुपात येत असते समोर, मलाही आईच्या रुपात साक्षात लाभली,पणजी, आजी, काकू, सासूबाई, मामी ह्यांच्याच नव्हे तर वडिल,दोन्ही भाऊ, सासरे,नवरा,मुलगा,मित्र ह्या पुरुष मंडळी रुपात सामोरी आली. त्यांनी केलेल्या रसना "आत्माराम"तृप्त करत राहिल्या.
सुग्रास अन्न रांधणारं माणूस हीच अन्नपूर्णा!
आपल्या हातूनही तीच उत्तम स्वयंपाक रांधून घेत आहे, कधीकधी तर नैवेद्याच्या स्वयंपाकाला येणारी चव, ही तर त्या साक्षात अन्नपूर्णेनं आपल्याकडून घडवून घोटून घेतली आहे हा विश्वास मला वाटत राहिला आहे.ती परंपरा तर चालू राहणार आहे,लेक दुसऱ्या घरी गेली तरी अन्नपूर्णा तिच्या बरोबर देत आहोत , मातृस्वरुप ती ,लेकीला नीट सांभाळून घेईल, शिकवेल, सामावून घेईल अशी ओळख पटली. लग्नात गौरीहर पूजताना त्या अन्नपूर्णेनं माझ्या लेकीची नोंद घेतली असणार.सदैव आपल्या लेकीबरोबर मूर्त स्वरुपात ,अमूर्त स्वरुपात, आठवणीत,चवीत, मिळालेल्या प्रेमात आणि त्या अनेक अन्नपूर्णानी नोंदवलेल्या ऐवजात, त्या अन्नपूर्णेच्या बाडात माझ्या लेकीबरोबर राहणार आहे असं अगदी आतून वाटलं.त्या विश्वासाच्या कल्पनेनं मळभ पळून गेलं आणि अन्नपूर्णा अगदी लखलखीत दिसली.मनातून एकदम प्रसन्न आणि पवित्र वाटलं,लेकीच्या लग्नात अन्नपूर्णेचं बाड हा सगळ्यांच्या कौतुकाचा भाग असला तरी तो खरा संस्कृतीचा मोठा वारसा आहे, कुठलीही तळी न उचलता, घराघरात असलेल्या,आपापल्या क्षेत्रात लखलखीत काम करणाऱ्या अष्टभुजा अन्नपूर्णा देवींचा हा आशीर्वाद माझ्या लेकीला लाभलाय ही निजखूण मला फार सुखावून गेलीय हे अगदी अगदी खरं!
ज्येष्ठागौरी

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

ग्रेट! लेकीच्या लग्नाच्या लगबगीतून आता जरा मोकळ्या झाल्याने मायबोलीवरही नियमीतपणे लिहीत रहा हीच विनंती.

फार फार छान हृद्य लिहीले आहे तुम्ही. शेवटचे वाचताना माझ्याही डोळ्यात ढग जमा झाले आणि बाहेरही भरपूर पाऊस कोसळतोय इथे मुंबईत. खुप सुंदर. आज सकाळी भेटली तरी आता लेख वाचताना आईची सण सणउन आठवण आली. धन्यवाद

फार छान लिहिले आहे.
डायरी वगैरे न वाटता अनेक अन्नपूर्णांनी भावना ओतून बनवलेले हस्तलिखितच वाटले.

स्वांतसुखाय,सामी, आशू, मेघ आणि अश्विनी, तुम्हां सगळ्यांना आवडलं हे वाचून खूप छान वाटलं, धन्यवाद!

IMG-20221009-WA0011.jpgIMG-20221009-WA0010.jpg

आज आवरत असताना एक डायरी सापडली. संजीव कपूरच्या खाना खजाना मधल्या रेसिपीज Happy बऱ्याच लिहून घेतल्या आहेत, तो सांगत असताना भरभर खरडून घ्यायच आणि मग छान अक्षरात डायरीत लिहायचं. Proud

आपला आनंद शेअर केल्याबद्दल धन्यवाद. आत्मजाला खूप शुभेच्छा व आशीर्वाद. 'दूधो नहाओ पूतो फलो".
सुंदर कल्पना आहे व आपला, उत्साहसुद्धा. हे असे हातून घडायलाही पुण्य लागते. शंकराचार्यांच्या श्लोकाची कल्पना उत्तमच आहे.

Pages