पाककृती स्पर्धा-२ - कडधान्यांपासून तिखट पदार्थ - मूग ज्वारी मेथीचे नोफेल वॅाफल्स/अप्पे- म्हाळसा

Submitted by म्हाळसा on 9 September, 2022 - 11:45

आई अमेरीकेत आली कि आम्ही मायलेकी मिळून एकएक करत सगळ्या अमेरीकन रेसिपीजचा जीव घेतो. बाजरीचं पीठ घालून बनवलेल्या पॅनकेक्स पासून ते अगदी कांदा टोमॅटो बेसणाचे तिखट फ्रेंच टोस्ट पर्यंत काही म्हणजे काहीच सोडत नाही.. जवळपास सगळ्या वेस्टर्न पदार्थांना जमेल तितका देसी तडका मारतो. त्यात माझी आई ठरली आमिर खान.. बोले तो एक नंबर परिफेक्शनिस्ट ..सगळं कसं अगदी मोजून मापून लक्षपूर्वक करते त्यामुळे रेसिपी कधी फेल जातच नाही.. तर आज मी तीचीच एक सोप्पी नोफेल रेसिपी घेऊन येत आहे आणी तीही माझ्या सोप्प्या शब्दांत.. चला मग, पूर्वतयारीपासून सुरू करूयात

पूर्वतयारी आणि लागणारे साहित्य-
सर्वप्रथम, आदल्या रात्री कितीही मरणाची झोप आली असली तरीही आळस न करता ११ सेंटीमीटर उंची आणि ४.४ सेंटीमीटर त्रीज्या असलेली एक दंडगोलाकार वाटीभर मूग अर्धा लिटर पाण्यात आठ तास भिजत ठेवावे.
मग सकाळी उठताच कोणाकडून तरी मेथीची साडे अठ्ठावन्न पानं आणि कोथिंबीरीची सव्वा पंचवीस पानं पाव इंच देठासकट निवडून घ्यावी, साधारण १० मिलिमीटर लांबीच्या दोन लसणाच्या पाकळ्या सोलून घ्याव्यात, पंचवीस पूर्णांक चार मिलिमिटर लांबीचा आल्याचा तुकडा चिरून घ्यावा, वाटीत मोजून ९८ पांढरे तीळ घ्यावेत, त्रेसष्ठ पूर्णांक पाच मिलिमिटर लांबीची एक हिरवी मिरची घ्यावी, दोन पूर्णांक चौऱ्यांशी ग्रॅम हळद, तेवढाच बेकिंग सोडा आणि त्याच्या दुप्पट काळं मीठ घ्यावं.
pH लेवल ४.४ ते ४.८ असलेलं एकशे वीस ग्रॅम दही घ्यावं. ११५ ग्रॅम ज्वारीचे पीठ घ्यावे.
अशी सगळी साहित्य जमावाजमवीची हलकी कामं इतरांकडून करून घेतली की वॅाफल बनवणाऱ्याने मैदानात उतरावे.

साहित्य
60B81B76-3A9E-45C3-BF9F-A0E581F38447.jpeg

वॅाफल ची कृती -
सर्वप्रथम एका मिक्सरच्या भांड्यात भिजलेले मूग, आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि दही हे सगळं ०.११८ लिटर पाणी घालून वाटून घ्यावं.. वाटलेलं बॅटर एका पातेल्यात काढून चिरलेली मेथी, ज्वारीचे पीठ, मीठ हे सगळं ०.२३७ लिटर पाणी घालून साडे आठ मिनिट भिजत ठेवावे

076E27A4-89BF-4BFE-8754-6DF26A7C7B03.jpeg

तोपर्यंत वॅाफल मेकरच्या प्लेट्स ला एखाद्या ब्रशने चार चार थेंब तेल लावून त्यावर प्रत्येकी १२ तीळ भुरभुरावेत. त्यानंतर भिजत ठेवलेल्या बॅटरमधे बेकिंग सोडा घालून ३६० अंशात पाच वेळा चमचा फिरवत सगळं बॅटर एकजीव करून घ्यावं.
आता वॅाफल मेकर गरम करायला ठेवावा.. वॅाफल मेकरचं तापमान १९१ अंश सेल्सियसला पोहोचले की १०० चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळ असलेल्या प्रत्येक प्लेटवर ५५ ग्रॅम बॅटर ओतावं. मग एखाद्या चमच्याच्या मदतीने सर्वप्रथम बॅटर अग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य दिशेला पसरवून घ्यावे. एकदा का बॅटर चौरसाच्या चारही कोनांपर्यंत व्यवस्थित पोहोचलं कि तोच चमचा पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण दिशेला फिरवावा. आता या प्रकारे बॅटर पसरवून झालं की वॅाफल मेकरचं झाकण बंद करा. बरोब्बर ७२ सेकंदानंतर एकदा झाकण उघडून त्यात शिजलेला वॅाफल बाहेर काढून पलटा आणि झाकण ठेऊन पुन्हा ७२ सेकंद शिजवा.

5FE4E4EC-BA7B-46FE-8847-13C5DE3FF7E4.jpeg

वॅाफल शिजत असताना एका वाटीत १२२ ग्रॅम दही घ्या, अंगठा आणि तर्जनीच्यी चिमटीत २ ग्रॅम काळं मिठ, २.५ ग्रॅम जीरा पावडर, २.७५ ग्रॅम लाल मिरची पावडर घेत दह्यावर भुरभूरा. घरात लोणच्याची बरणी असेल तर चमच्याने बरणीतलं वरवरचं तेल घेऊन दह्यावर ओता. तोपर्यंत तुमचा वॅाफलही तयार झाला असेल. त्याला छानश्या एका प्लेटमधे घ्या, सोबत दह्याची वाटीही घ्या आणि प्रत्येक घास दह्यात बुडवत वॅाफलचा आस्वाद घ्या.
75C043AC-0B59-4A3C-907C-3DD409088C23.jpeg

आहे की नाही सोप्पी वॅाफल नोफेल सेसिपि.. हे सगळं करूनही ज्याचे वॅाफल्स फसणार त्यांनी वॅाफल गेला खड्ड्यात म्हणत सरळ माझ्यासारखा अप्पे पॅन घ्या आणि पटापट खाली दिलेत तसे अप्पे बनवा.

3FDDCBBE-708F-421F-98DE-5C23FDB61200.jpeg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मी करून बघितले, ज्वारीच्या पिठाऐवजी 'टेन ग्रेन वॉफल मिक्स' व दोन चमचे रवा वापरला. थोडे जड झाले व तितकी घरंही पडली नाही, पण छान झाले.
Screenshot_20220911_094455.jpg

आमच्याकडे काल पुन्हा वॉफल पात्र घ्यायचे का ही चर्चा चालू होती. तेव्हा याचीच आठवण झाली. यात वेगवेगळ्या इनोवेटीव्ह पण पोरांना आवडतील अश्या रेसिपी करता येतात का? आय मीन तू काही प्रयोग करतेस का? नाहीतर एकदा वापरायचे आणि पडून राहायचे Sad

<<त्यानंतर भिजत ठेवलेल्या बॅटरमधे बेकिंग सोडा घालून >> ये कित्ता डालते जी? कल करने का सोच्राऊं.

रेसिपी छान, लिहलेही छान आणि दिसतेही मस्तच!! Happy

परंतु लिखाणात ते
पंचवीस पूर्णांक चार >>>
पंचवीस पूर्णांक चार दशांश
दोन पूर्णांक चौऱ्यांशी>>>>
दोन पूर्णांक चौऱ्यांशी शतांश

इत्यादी किरकोळ दुरुस्त्या कराव्या म्हणजे नवोदितांचे प्रमाण चुकणार नाही! Proud

आमच्याकडे काल पुन्हा वॉफल पात्र घ्यायचे का ही चर्चा चालू होती. तेव्हा याचीच आठवण झाली. यात वेगवेगळ्या इनोवेटीव्ह पण पोरांना आवडतील अश्या रेसिपी करता येतात का? आय मीन तू काही प्रयोग करतेस का? नाहीतर एकदा वापरायचे आणि पडून राहायचे >>
वॅाफलमेकर मधे वेगवेगळ्या टाईप्सचे वॅाफल्सच बनवते. कधी कणकेचे, कधी कोको पावडरचे, कधी बदाम पावडरचे तर कधी ओट्सचे.

थोडीशी ॲड माझ्या वॅाफल मेकरची. बेसिकली मी वापरते तो ब्रेकफास्ट मेकर आहे.. चार प्रकारच्या प्लेट्स असतात. त्यामुळे चार प्रकारचे ब्रेकफास्ट बनतात - वॅाफल्स, ग्रिल,ॲामलेट्स आणि सॅंडविच.. ग्रिलिंगच्या प्लेट्सवर कबाब्ज्स जबरदस्त बनतात. ॲामलेट्ससाठीच्या प्लेट्स सोडून बाकी तीन्ही प्लेट्स मी पूर्ण वसूल केल्यात.

DBA47AD7-5464-4193-BB58-EA5F58437131.png

मी दिलेल्या प्रमाणात बरेच अप्पे बनतील. तुम्ही दोघांसाठीच बनवणार असाल तर अर्धेच प्रमाण घ्या. मी बेकिंग सोडा खरं तर अंदाजे टाकते. तीन एक चिमूट बास होईल बहुतेक.

आमचा इतका आखुडशिंगी नाही. गोल आहे आणि त्यात फक्त वॉफल्सच (ते पण केले तरच Wink ) बनतात.
आम्ही वर्षांतुन दोन -तीन वेळा पेक्षा जास्त करत नाही. आता अशा रेसिपी द्या इकडे की तो वॉफलमेकर वारंवार बाहेर निघायचा मुहुर्त सापडेल.

ओके धन्यवाद
तो चार प्लेट वाला ब्रेकफास्ट मेकर मस्त आहे. जे वापरले जाईल ते वसूल होईल. चेक करतो..

अख्खी बॅच फेल व्ह्यायली का काय वाटत होते. पण एक सोडून बाकीचे काठावर पास झाले. एकाला भोपळा मिळाला त्याला धीर द्यायचा आतच त्याने मान टाकली. आहुती देणाऱ्यांचा फोटो काढण्याची आमच्यात पद्धत नाही तेव्हा काठावर पास झालेल्या पैकी अर्धा डझन होतकरुंचा तेवढा फोटो काढला.
Screenshot_20220914-103120_Gallery.jpg

पुढच्या ATKT त अजून जास्त मार्क मिळवूच.

रुनमेस आपल्या इथे रिला यन्स डिजिटल मध्ये वाफल मेकर मिळतो. माज्याकडे आहे तो २५०० ॠ ला आहे . एका वेळी दोन वाफल बनतात.
जे चालते आम्हाला. मैद्याच्या साध्या वाफलच नीट केल्या आहेत. एकदम मस्त लागतात. बरोबर नुटेला व ऑरेंज मार्मलेड असेल तर डब्यात पण छान लागतात पण गरम बेटर आहे. उरलेल्या पिठाच्या बाळ वाफल्स घातल्या तरी नंतर बिस्किट सारख्या खाता येतात.

तुमच्यात केक करतात म्हणजे साध्या वाफल चे साहित्या आरामात असेल.

धन्यवाद मामो, आतून कच्चे राहिलेत, अजून थोडे जरी जास्त शिजवले असते तर वरून करपले असते. पीठ पातळ होते असे वाटते. पुढच्या वेळी जरा घट्ट कालवून बघेन. मेथी पण अजून जास्त घालायला हवी होती.

आतून कच्चे राहिलेत, अजून थोडे जरी जास्त शिजवले असते तर वरून करपले असते. >>

मानव, शेगडीची आच थोडी कमी केल्यास आतून शिजतील आणि बाहेरून करपणार देखिल नाही असे वाटते.

पुढच्या ATKT त अजून जास्त मार्क मिळवूच>> आप्पे फेल गेले की सरळ डोसा बनवून मोकळं व्हायचं .. ते मस्त खरपूस लागतात.

रुनमेस आपल्या इथे रिला यन्स डिजिटल मध्ये वाफल मेकर मिळतो. माज्याकडे आहे तो २५०० ॠ ला आहे . एका वेळी दोन वाफल बनतात.
>>>>
अच्छा.. धन्यवाद अमा.. महाग प्रकरण आहे... मुले बाहेरून जे वॅफल मागवतात ते ही काही स्वस्तातले प्रकरण नसते.. त्यावर हे परवडत असेल आणि याचा खरेच वापर होणार का चेक करायला हवे..

अभिनंदन म्हाळसा..

Pages