नमस्कार, मायबोली गणेशोत्सव संयोजकांनी यावर्षी अतिशय जिव्हाळ्याचा विषय दिला आहे त्याबद्दल सर्वात प्रथम संयोजकांचे आभार.
मी दहावीनंतर पदवीची पाच वर्ष, पदव्युत्तर डिप्लोमा चे एक वर्ष आणि पदव्युत्तर डिग्री ची दोन वर्ष अशी सुमारे आठ वर्ष वेगवेगळ्या महाविद्यालयांत गेले. तसेच त्याबरोबर परकीय भाषा शिक्षण आणि संगणक शिक्षण मी घेतलं त्यामुळे माझ्या गाठीला विविध मोरपंखी, रोमांचकारी आणि आनंददायक असे अनेक अनुभव आहेत.
संयोजकांनी फिशपॅांड चा उल्लेख केला आहे म्हणून मी माझा लेख फिशपॉंड चा अनुभव सांगून सुरू करते. स.प महाविद्यालय- अकरावी वाणिज्य. आम्ही अजून शाळेतून मनाने पुरते बाहेर पडायचे होतो. तेवढ्यात आमच्या वर्गातल्या एक मुलगा आणि एका मुलीने पुढाकार घेऊन फिशपॅांड डे आयोजित केला होता. ते दोघेही एकमेकांशी खूप छान बोलायचे. आम्हाला त्यांची खूप निखळ मैत्री वाटायची. मुलगा आणि मुलगी यांचे कशी मैत्री हवी तर अशी असं आम्ही नेहमी बोलायचो. आमचा फिशपॅांड डे दणदणीत झालाच. पण आम्हाला सगळ्यांना धक्का बसला जेव्हा त्यांनी पदवीच्या तिसर्या वर्षाला असताना एकमेकांशी लग्न करायचा निर्णय घेतला तेव्हा. आम्हाला ते दोघं अति छान क्युट मित्र-मैत्रिणी वाटायचे.
आता अशाच प्रकारचा एक गमतीशीर जर्मन डिप्लोमातील किस्सा. एक मुलगा आणि एक मुलगी. पहिल्या दिवसापासून शेजारी बसायचे. मुलगी एकदम तेल लावून घट्ट मोठी वेणी घातलेली आणि मुलगा मोठा चष्मा लावलेला, चोपून भांग पाडलेला, फुल-शर्ट खोचलेला असा. दोघेजण एकत्र यायचे आणि एकत्र जायचे. नेहमी गंभीर चेहरा.आम्हाला का कुणास ठाऊक; ते दोघं बहिण-भाऊ वाटायचे. पण त्यांनीही जर्मन डिप्लोमा संपता संपता लग्न ठरवून आम्हाला धक्काच दिला.
आम्ही महाविद्यालयीन जीवनात काय केलं यापेक्षा काय केलं नाही हेच विचारणं योग्य ठरेल. अकरावी ते एमसीमपर्यंत खूप धमाल केली. मराठी वाड्मय मंडळ, संस्कार भारती, प्रचिती आणि खूप काही.
खूप गप्पा, चर्चा, वादविवाद आणि काही मोहिमाही!
मी यात एक प्रामाणिक आणि उत्साही मेंबर होते. एक किस्सा आठवतो. संस्कार भारतीचा आमचा एक छान कार्यक्रम होता. त्यात हॅाल झाडण्याची जबाबदारी माझ्यावर होती. मी कुंचा घेऊन आले होते आणि त्याच दिवशी टिळक स्मारक मंदिरात एक वक्तृत्व स्पर्धा होती. तर माझं झाडण्याचं काम झाल्यावर मी तो झाडू घेऊन बिनधास्त मैत्रिणीबरोबर वक्तृत्व स्पर्धा ऐकायला गेले होते.
आठ वर्षाच्या या महाविद्यालयीन काळात मी बर्याच गोष्टी करुन बघितल्या. मला माझ्या आई वडिलांचा आणि इतर नातेवाईकांचा नेहमीच पाठिंबा होता मी या आठ वर्षांत अभ्यास केला; सामाजिक काम केलं ;अनेक प्नायोगिक नाटके, चांगले कार्यक्रम बघितले. स्नेहसदन, सुदर्शन, भरत नाट्य, टिळक इथे पडीक असायचो.
अंधमित्र ,मेळघाट मित्र,रोटरॅक्ट अशा अनेक सामाजिक संस्थांशी संलग्न होते. आठवड्यातून प्रत्येक दिवस मी वेगवेगळ्या संस्थांमध्ये सामाजिक काम करायला जायचे. सोमवारी निवारा वृद्धाश्रम; मंगळवारी एका अंध शिक्षिकेच्या घरी जाऊन त्यांना पुस्तक वाचून दाखवायचे; नोट्स काढायला मदत करायचे. एक दिवस अंध कवयित्रींच्या घरी जाऊन त्यांना जे काही त्या दिवशी करायचं आहे ते करायला मदत करायचे.रविवारी रिमांड होम मध्ये जाऊन तेथील मुला-मुलींशी खेळायचे किंवा अभ्यास घ्यायचे. मेळघाट मित्रच्या ॲाफिस मध्ये बसून जे काही काम करता येईल ते करायचे. तसेच डॉक्टर आनंद नाडकर्णी आणि मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र यांनी संयुक्तपणे सुरू केलेल्या जिज्ञासा प्रकल्पात एफ वाय पासून पुढे सहा सात वर्ष मी महानगरपालिकांच्या शाळात जाऊन नववीच्या मुलांबरोबर या प्रकल्पातील विषय मांडायचे.
या महाविद्यालयीन जीवनातील वेगवेगळे किस्से सांगायचे म्हणले तर एक ग्रंथच होईल. रानडे इन्स्टिट्यूट मधून जर्मन शिकतानाचा एक किस्सा. आम्हाला पहिल्या दिवसापासून जमेल तसं मोडकंतोडकं का होईना जर्मनच बोलायची सक्ती होती. त्यावेळी मी जर्मन क्लासची सीआर होते. एकदा मी वर्गात येण्याची परवानगी मागताना थोडंसं लवून “Darf ich hereinkommen?” असं विचारलं. आमचे सर गमतीने म्हणाले की अशा पध्दतीने लवून विचारण्याची पद्धत आपल्या म्हणजे जर्मन संस्कृतीत नाही. त्यावर मी म्हणाले; दुसऱ्या संस्कृतीतून म्हणजे इथे जपानी संस्कृतीतून ही पद्धत उचलली तर बिघडले कुठे! अर्थात हे सर्व संभाषण जर्मन मधून चालू होते. आणि त्या आगाऊपणावर सर आणि सगळेच हसायला लागले.
आता महाविद्यालयातील एक गंमत सांगते. एफ वाय पासून कॉलेज बंक करणे सुरू झालं आणि एस वाय मध्ये इतकं वाढलं की ओरलमधे एका सरांनी मला त्यांचं नाव विचारलं आणि तू जर मला माझं नाव व्यवस्थित सांगितलं तर मी तुला पैकीच्या पैकी मार्क देईन असे म्हणाले पण मला त्यांचा चेहरात आठवत नव्हता; नाव तर पुढची गोष्ट.
दहावी आणि नंतर टीवाय पर्यंत सर्वसामान्य मिडल बेंच मुलगी पण अचानक डि.टी.एल ,जर्मन, एनआयआयटी,एमसीएम मध्ये सतत वर्गाचे नेतृत्व करायची संधी मिळाली आणि आम्ही अनेक वर्ष खूप धमाल केली.
असाच एक किस्सा एमसीएम मधला. “बेस्ट मॅनेजमेंट स्टुडंट” अॅवॅार्ड करिता माझा इंटरव्ह्यू चालू होता त्यात त्यांनी मला बाकीच्या प्रश्नांबरोबर सहज विचारलं की “तुझा अटेंडन्स किती आहे?”
मी उत्स्फूर्तपणे म्हणाले “100%” .
ते म्हणाले, “पुरावा काय?
मी लगेच म्हणाले “तुम्ही वर्गात कोणालाही विचारा”
त्यावर त्यांनी दिलखुलासपणे हसून दाद दिली.
आम्ही शिक्षक दिन खूप दणक्यात साजरा केला. आमच्या वर्गात खूप एकी होती.
आम्हाला डेटा स्ट्रक्चर शिकवायला अतिशय आदरणीय असे टंडन सर होते. टंडन सरांचे वैशिष्ट्य म्हणजे ते बोलत सुटायचे आणि विद्यार्थ्यांना ते प्रचंड एकाग्रतेने ऐकायला लागायचं .आत्मसात करून घ्यायला लागायचं. ती एक बौद्धिक मेजवानी असायची. यात गंमत म्हणजे अख्ख्या वर्षभरात मी आणि माझा एक मित्र या दोघांनीच त्यांना एकदा थांबून प्रश्न विचारायचे धाडस केले होते. डेटा स्ट्रक्चर्स क्लास संपला कि मी आणि तो मित्र वर्गाला वर्गातील काही मुलांना आज काय झालं ते शिकवायचो.
माझ्या एका मैत्रिणीचा या वर्षात मोठा अपघात झाला होता. त्या अपघातात तिच्या घरातील काही जण मृत्युमुखी पडले होते. तिला सावरायला अख्खा वर्ग, कॉलेज प्राध्यापक, प्राध्यापकेतर वर्ग वर्षभर धडपडत होते. माझ्यासारखं कोणी शिकवायला जायचं, कोणी गाडीवरून तिला घेऊन यायचं, कोणी नियमित फोन करायचं. आमच्या वर्गात खूपच घरगुतीपण होता, मोकळेपणा होता.
प्लेसमेंट मध्ये आम्ही सर्वांनी खूप धमाल केली.
माझी सनी १४ फेब्रुवारीला जंगली महाराज रोडवर आम्ही मैत्रिणी जेवायला गेलो असताना चोरीला गेली.त्यावेळी आम्ही २०-२५ जणांनी मिळून तिथले बरेच रस्ते पालथे घातले होते.
एनआयआयटी मधला एक किस्सा सांगते. कोर्सचे शेवटचे सत्र कॅंपमध्ये होते.त्या वातावरणाला मी बिचकून राहणारी. त्यामुळे मी जरा शेवटच्या सेमिस्टर मध्ये शांतच असायचे. तिथे येणारी सगळे हायफाय, चारचाकी मधून येणारे, हिल्स घालणार्या मुली. मूलेही ब्रँडेड वस्तू वापरणारे. त्यामुळे मी जरा दबून असायचे. कॉलेजमध्ये माझं शेवटचं वर्ष चालू होते आणि आमच्या स.प प्रचितीतर्फे आनंदवन दौरा ठरला होता. एके दिवशी अचानक मी सर्वांसमोर गेले आणि माझ्या मराठमोळ्या इंग्रजीमध्ये आनंदवनाकरिता आर्थिक मदतीचे आवाहन केले. आणि पुढच्या तासाभरातच मला खूप मदत मिळाली.आणि तिथूनच माझे तिथेही मित्र मंडळ बहरले.
आनंदवन दौर्याकरिता पहिली पावती मी फाडली ती पावतीपुस्तक ज्या दुकानातून घेतलं त्यांची!
या महाविद्यालयीन जीवनात माझे पैसे कमवायचे ही अनेक उद्योग चालू होते. अकरावीपासून कुठे पोस्टर्स विक, भेटकार्ड विक, एलआयसी एजन्सी घे,लहान मुलांच्या ग्राउंड वर शिकव, कम्प्युटर शिकव,वेगळ्या विषयांच्या ट्युशन्स घे असे करत महिन्याला थोडे का होईना पैसे कमवायचे आणि वडिलांना द्यायचे ही शिस्त मी पाळली होती.
मोरपिशी दिवसांतील अपरिहार्य आणि मस्त भाग म्हणजे क्रशेस, एकतर्फी प्रेम, दोन्हींकडून गंभीर प्रेम आणि प्रेमभंग! हे मी ही केलं आणि मित्र-मैत्रिणींना साथही दिली.
अरूण भाटियांना पुण्यात परत बोलवण्याकरिता जे आंदोलन झाले त्यात घोषणा, मोर्चा, पोलिसांची इच्छा नसताना अटक करून घेणे आणि तीन तासांचा तुरूंगवासही !
पुलाच्या वाडीत पाणी शिरले असताना त्यांच्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांकरिता घरोघरी जाऊन जमा केलेले जेवण.
प्रबोधिनीच्या गणपती विसर्जनात केलेले वाहतूक नियमन.
पडसरे साखरशाळेतील ३ दिवस.
पोलिओमुक्त भारत मोहिमेत नोंदवलेला अल्प सहभाग.
महानगरपालिका शाळेतील मुलांनी व्यसनमुक्तीचे सत्र झाल्यावर आमच्याकडे उत्सफुर्तपणे जमा केलेल्या गुटख्यांच्या पुड्या.
आनंदवन अभ्यासदौर्यात बाबा आमट्यांबरोबर सकाळी चुकलेली फेरी आणि पुढच्या प्रकाश काकांबरोबरच्या फेरीत सहभागी होताना बाबा आमट्यांचे “कशी उशीरा उठलीस” म्हणणारं मिस्कील हसू.
खूप खूप आठवणी आहेत या मोरपिशी दिवसांच्या.
गेल्या ३ वर्षांपासून परत एकदा जर्मन विद्यार्थीनी म्हणून ॲानलाईन का होईना विद्यार्थीजीवन अनुभवतेय. त्याचे किस्से पुन्हा केव्हातरी!
लेख आज वाचला! खुप मस्त लिहिले
लेख आज वाचला! खुप मस्त लिहिले आहे.
या निमित्तने स.प. मधले दिवस आठवले !
धन्यवाद निकु.
धन्यवाद निकु.
बाप्रे, केवढ्या धडाडीच्या
बाप्रे, केवढ्या धडाडीच्या आहात!
खुप छान लेखाजोखा मांडला आहे.
मस्तच! केवढं काय काय केलंयस
मस्तच! केवढं काय काय केलंयस तू!
धन्यवाद आर्या, वावे.
धन्यवाद आर्या, वावे.
पुढच्या गणेशोत्सवात सुद्धा
पुढच्या गणेशोत्सवात सुद्धा असेच उत्साहाने सहभागी व्हा !
तुमचे प्रशस्तीपत्र खालीलप्रमाणे.
धन्यवाद संयोजक, सर्व वाचक आणि
धन्यवाद संयोजक, सर्व वाचक आणि मतदार.
मजा आली या स्पर्धेत आणि इतर उपक्रमांमध्ये भाग घ्यायला.
अभिनंदन मोहिनी..
अभिनंदन मोहिनी..
धन्यवाद रूपाली.
धन्यवाद रूपाली.
अभिनंदन!
अभिनंदन!
मस्तच महाविद्यालयीन जीवन __/\
मस्तच महाविद्यालयीन जीवन __/\__
Pages