लेह लडाख वारी भाग एक

Submitted by pravintherider on 13 September, 2022 - 21:55

पूर्वतयारी
दिवस पहिला... शकुन की अपशकून ? १०-८-२०२२
आम्ही एकूण चार जण मिळून ही ट्रीप पूर्ण केली आहे तर सर्व प्रथम आम्ही काय काय तयारी केली आणि कसं केली ते पाहूया.
लडाख ट्रीप साठी आम्ही पहिले ऑफिस मध्ये सुट्टी घेतली आणि ती पण एक दोन नाही तर तब्बल सहा महिने अगोदर पासून. गेल्या काही वर्षांत खुप वेळा ठरवलं होतं पण नेहमीच काही ना काही कारणाने सहल रद्द करण्याची वेळ आली होती. या वेळी मात्र नक्की जावू असं ठरवलं होतं पण शेवट पर्यंत धाकधूक होतीच (झाली पण होती कॅन्सल सहल का ते कळेलच). आम्ही चौघे जण मी प्रविण, गणेश, समीर आम्ही बालमित्र आहोत आणि बुरहान ऑफिस मित्र.
आम्ही साधारण जानेवारी मध्ये सहज ऑफिस मध्ये सांगून दिलं की, ऑगस्ट महिन्यात आम्ही लडाख ला जाणार आहोत आणि आमच्या वरिष्ठांना पण वाटलं की ४ -५ वर्षा पासून बोलत आहेत आणि गेले तर नाही मग हो बोलून गेले मात्र आम्ही या वेळेस जरा जास्त सिरीयस होतो. जानेवारी नंतर खुप वेळा कानावर घालत होतोच की आम्ही जाणार आम्ही जाणार. जुलै महिन्यात एक नविन काम दिलं आणि हे सांगून की हे पूर्ण कर आणि जा (होणार नाही याची खात्री). मी रात्री चा दिवस करून २७ जुलै ला काम पूर्ण करूनच दिलं आणि त्यामुळे आम्ही नक्की जात आहोत याची जाणीव झाली सर्वांना मग... वातावरण किती खराब आहे, तूम्ही आल्यावर आजार पणा साठी एक ही सुट्टी मिळणार नाही या पासुन ते इमोशनल ब्लॅकमेल केलं जातं होत.
माझ्या कडे फोर्ड इकोस्पोर्ट हि गाडी आहे. अजून दोन वर्ष पुर्ण नाही झाले गाडी ला. तसही मी मागील वर्षी तिरुपती बालाजी गाडी घेवून गेलो होतो. फक्त थोडी सर्व्हिसिंग ची गरज होती. एक पूर्ण दिवस शोरुम ला जावून गाडी तयार करुण घेवून आलो. ईकडे बाकी मित्रांनी मिळून आवश्यक खरेदी केली होतीच जसं काजु, बदाम, अक्रोड, खजूर, पिस्ता, वेफर्स, जाम आणि बरच काही. मित्रा कडून ऑक्सीजन सिलिंडर फ्री मध्ये मिळाले. एका मित्राने गाडीत हवा भरणारे आणि पंक्चर किट दिलं. माझं सतत फिरणं चालू असतं त्यामुळे गरम कपडे खुप होते. ज्यांचा खरतर फक्त फोटो साठी उपयोग केला.
आम्ही आमची ट्रीप ही इगतपुरी वरून सुरू करनार होतो. समीर आणि बुरहान सकाळी येणार होते माझ्या घरी. गणेश तर माझ्या घरा जवळ राहतो. तसही आम्ही सर्वांनी ठरवलं होतं की, रक्षा बंधन ला सकाळी औक्षण करून निघायचं आणि त्या प्रमाणे तयारी सुरू केली होती पण...
समीर भाउ चा CA गायब झाला आणि त्याची Balnace Sheet काही झाली नाही मग तो १० तारखे ला रात्री पर्यंत ऑफिस मध्ये बसून काम पूर्ण करणार असल्याचे समजले. समीर विरार ला राहतो, बुरहान मुंबई आणि मी आणि गणेश इगतपुरी. समीर ला सकाळी तपोवन एक्स्प्रेस कशी मिळणार याचं टेन्शन आलं होतं आणि मी १० तारखेला ऑफिस वरून लवकर आलो कारण गाडी मध्ये डिझेल, हवा एकदा टाकून घेवू आणि बाकी तयारी करू या हिशोबाने. मी घरी आलो आणि गाडी बाहेर काढायला चालू केली तर समोर धूर निघत असल्याचं समजलं मी घाबरून गाडी बंद केली आणि बोनेट खोलून पाहतो तर इंजिन जवळ धूर निघत होता त्या क्षणा क्षणाला मी डोळ्यात पाणी आणून गप्प उभा राहिलो कारण सर्व तयारी करून आज फक्त काही तास बाकी असताना माझ्या समोर एक मोठं आव्हान किंवा संकट उभ होत.
मी दोन मिनिट शांत विचार केला आणि सरळ शोरुम मध्ये फोन लावून गाडी घेवून जायला सांगितली पण उशीर झाला होता आणि शोरुम पण बंद झालं होत मग RSA मध्ये फोन करून गाडी पाठवायच ठरवलं कारण सकाळी गाडी नेली तर मला मिळणार नाही हे माहीत होत मग रात्री दहा वाजता ते लोकं येवून गाडी घेवून गेले. ईकडे मी   तिघांना हि फोन करून सांगितले की मी सांगत नाही तो पर्यंत तुम्ही निघू नका. माझ्या घरी मी जाणार म्हणून ताई, दाजी, भाचे कंपनी आलेली मला भेटायला आणि सहल रद्द करण्याची वेळ आली होती.

दिवस दुसरा
रक्षा बंधन... ११-०८-२०२२
आज फक्त दिवस कधी उजाडतो याची वाट पाहत होतो कारण झोप तर एक मिनिट हि आली नाही. मनात काय विचार येत होते आता विचार केला तर हसू येते आहे. सहल रद्द असं वाटत होत. सकाळी ९ वाजता आवरून लगेच शोरुम ला निघालो तर तिकडे कोणी फोन उचलत नाही. शोरुम बंद आहे की काय या मधे निम्मे अंतर पार पडले. मधे एका जागी थांबून फोन वर बोललो आणि तसपण त्यांना माहीत होत की मी जाणार आहे कारण ३-४ दिवसापूर्वीच मी गाडी घेवून गेलो होतो मग काय विचारता पटापट काम करायला गाडी लावली तर एक पार्ट ब्रेक झाला होता. दादा बोलतो की मागवावा लागेल पण मी बघतो असेल तर आणि नशिबाने तो पार्ट उपलब्ध होता. लगेच सर्वांना फोन करून सांगितले की, आपण जात आहोत या तुम्ही उद्या पहाटे निघू या. मला किती आनंद झाला होता हे मी आज पण सांगू शकत नाही पण माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं हे नक्की. गाडी हि घरी खराब झाली हे आमचं नशिब कारण इतके खराब रस्ते आणि सोबत कोणी नसताना असं झालं असतं तर आम्ही काय केलं असतं. नक्कीच आम्ही नशीबवान होतो. कारण त्या नंतर घरी येईपर्यंत गाडी ने बाकी काही त्रास नाही दिला. जो दिला तो होणार होता हे माहीत होत त्या मुळे तो त्रास नाही वाटला.
घरी आल्यावर मी रक्षा बंधन साजरे केले आणि तो पर्यंत २ जण इगतपुरी ला येत आहेत असे 5समजलं मग मी आणि गणेश त्यांना आणायला स्टेशन वर गेलो. सकाळी लवकर निघायचं आहे असं ठरवलं पण दोघांनी मिळून ६ बॅग आणल्या होत्या मी तर कपाळाला हात लावला. सामान कमी घ्या म्हणून बोललो पण ऐकेल कोण...
मग एक्स्ट्रा सामान माझ्या घरी ठेवून सर्वांचं सामान मस्त पैकी गाडी मध्ये लावून ११वाजता झोपी गेलो. मस्त उद्या आपली सहल चालू होणार... गेल्या किती वर्षा पासून वाट पाहत होतो या क्षणाची.... झोप तर आज पण येणार नव्हतीच...
भेटू पुढील भागात....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता जाऊन आलात म्हणून बरं वाटलं. काही ना काही नवीनच अडचणी येत असतात सहलीला पण कसेतरी चार गोष्टी वजा होऊनही परत आलो याचं नंतर बरं वाटू लागतं. म्हणजे प्रत्येक सहल १००टक्के यशस्वी होत नाही. पण पूर्ण रद्द होण्यापेक्षा थोडी९०टक्केसुद्धा आनंद देतेच. बाकी अगदी इगतपुरी ते लडाख कारने म्हणजे बरेच साहस आहे.
वाचत आहे. कृपया प्रत्येक भागास दोन तरी फोटो टाका.

हो नक्की प्रयत्न करतो...
खरंतर ही सहल यशस्वी होण्या मागे @केदार यांचा मोलाचा वाटा आहे...

हो...