कॉलेजचे मोरपिशी दिवस - बेटर लक नेक्स्ट टाइम - सामो

Submitted by सामो on 11 September, 2022 - 10:35

कॅालेजचे दिवस असतात खरे मोरपिशी.
- विविध मखमली रंगांच्या उधळणीचे
- आणि डोळे असूनही आंधळे.
आंधळे का तर प्रचंड जज’मेंटल’ असतो आपण. निदान आमची दूरदर्शनच्या चित्रपट-रेशनवर पोसलेली पिढी तरी होती. आणि मग या जजमेंटल वृत्तीतूनच उगम होतो काही अशाही फिशपॅांडसचा - ‘अटकमटक चवळी चटक, उंची वाढच नसेल तर खुंटीला जाउन लटक.’ शुभ्र कपड्यांत आलेल्या एखाद्या मुलीला - अमका अमका ग्रुप तू अंड्यासारखी दिसते आहेस असे चिडवतोय - अशी विनाकारण माहिती देण्याचे दिवस. समवयस्कांच्याउतरंडीतील आपले स्थान जाणून घेण्याची जीवघेणी स्ट्रगल, हुरहूर, वेगळेपणाने उठून दिसण्याचा आटापिटा. भविष्याची अनिश्चितताआणि प्रचंड सेल्फडाऊटचेही दिवस.

पण याच नाण्याची दुसरी बाजू म्हणजे - छोड ना यार! म्हणुन पटकन बाउन्स बॅकही होता येत असे. समानशील व्यसनेषु सख्यम वाल्या मित्रमैत्रिणींमध्ये रममाण होता येत असे. इन फॅक्ट अ‍ॅकॅडेमिक स्पर्धेचीही केमिस्ट्री मस्त जुळून येइ, एका कॉफीच्या कपवरती रंगलेल्या गणिताच्या चर्चा. मित्र-मैत्रिणीबरोबर झालेल्या भांडणांची, पेल्यातली वादळे - मस्त होती.

या काळात, संप्रेरकांच्य चढ उतारांमुळे, बायपोलर डिसॉर्डरने प्रचंड उचल खाल्ली होती. तीव्र चढ आणि अँग्झायटीचे वादळ आलेले होते. मानसिक दृष्टीने प्रचंड उत्पात होत होता आणि तेव्हाच्या मर्यादित मोडमध्ये कोणालाही हे कळणे दुरापास्तच होते की औषधांची नितांत आवश्यकता आहे. असो. पण त्यामुळे म्हणा किंवा स्वतःच्याच तेव्हाच्या क्रिटीकल, परफेक्शनिस्ट आणि अति-अभ्यासू स्वभावामुळे कॉलेज लाईफ एन्जॉय वगैरे अजिबात केलेले नाही. मोरपिशी वगैरे तर फार दूरचीच गोष्ट. आजही फर्ग्युसनच्या आवारात गेले की अँग्झायटीचा अ‍ॅटॅक येइलसे वाटते.

हां मात्र त्या काळी, आठवीपासून खूप आवडणार्या एका आख्ख्या वर्गात, हुष्षार, गोरागोमटा मुलाने मात्र आमच्याच वर्गात प्रवेश घेतल्याने काय ती "जिंदगी धूप तुम घना साया' सिच्युएशन तयार झालेली. पार पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत आम्ही एकत्र राहीलो. मात्र आमचे, सख्य विळ्ञा भोपळ्ञाचेच राहीले. म्हणजे तो आवडायचा पण त्या आवडण्यापेक्षाही, त्या नात्यातला, स्पर्धात्मक कंगोरा फार तीव्र . त्यामुळे ते नाते नेहमीच 'तुझे माझे जमेना, तुझ्या वाचून करमेना' राहीले. व तसेच अजुनही आहे. सवयीने आजही त्याच्या यशाच्या मापदंडावरच स्वतःचे यश नकळत तोलले जाते.

जंगिअन, आर्केटाइपमध्ये, एखादा ' आदर्श कॉलेजिअन आर्केटाइप' असायला खरं तर हरकत नसावी. पण हायली कल्चरल आर्केटाइप असल्याने, तो सर्वमान्य झाला नसावा. अर्थात 'ग्रीस' सिनेमात ते तसे सापडतातच. सांगायचा मुद्दा हा की 'आदर्श कॉलेजिअन आर्केटाइप' प्रत्येकीच्या मनात असतो. अ‍ॅकॅडेमिक यश, स्मार्टनेस, अफाटमित्रसंग्रह आणि अगदी महत्वाचे म्हणजे पॉप्युलॅरिटी अशा काही वैशिष्ठ्यांनी सजलेला हा आर्केटाइप, जगता नाही आला तर, क्लोजर नाही मिळाले तर आयुष्यभर पाठपुरावा करतो. यु नेव्हर आऊटग्रो इट.

बाकी आमच्या मित्रमैत्रीणीतले झाडून, सारेजण 'सो कॉल्ड' यशस्वी आहेत. फेसबुकमुळे, इमेलमुळे, कॉन्टॅक्ट्मध्येही आहेत. बाकी खरच विशेष काही घडलेच नाही. एक जन्म परत घ्यावा लागणार कॉलेज लाईफ 'कन्व्हेन्शिअली=पारंपारीक रीत्या' उपभोगण्यासाठी.
बेटर लक नेक्स्ट टाइम. : )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पोचलं. पण हे तुम्ही गणेशोत्सव ग्रुप मध्ये का नाही लिहिलं? हा फाउल आहे.

सामो
प्रांजळ न प्रामाणिक
आवडलं

'प्रांजल आणि प्रामाणिक. ' +११
तुमची मुळे घट्ट होती म्हणून त्या वादळात एखादे झाड पिळवटून निघावे आणि उन्मळून न पडता वादळ हळू हळू शमत जाईल तसतसे स्वतः: ला सावरून पुन्हा ताठ उभे राहावे त्याप्रमाणे तुमचे आयुष्य पुन्हा उभे राहिले आहे.
मानसिक आंदोलने फार जवळून बघितली आहेत. म्हणून तुमच्या लेखनाशी सुरुवातीपासूनच फार रीलेट होता आले आहे. अर्थात केवळ आभासी जगातले लेखन वाचून.

मनातले लिहिले आहेस सामो. पुढच्या जन्माबद्दल वाचून मजा वाटली. पुनर्जन्म घेण्यासाठी हे कारण युनिक हो. Lol

सामो
प्रांजळ न प्रामाणिक +१
नेहमीप्रमाणे छानच..!!

प्रामाणिक प्रकटन आवडलं.
"सवयीने आजही त्याच्या यशाच्या मापदंडावरच स्वतःचे यश नकळत तोलले जाते" हे फार रिलेट झाले!

:)सामो <3 गोड लिहीले आहे. पण पुनर्जन्मच घेणार असशील तर मग एखाद-दोन सेमिस्टर कॉलेज कर नि मग ड्रॉपाऔट होऊन बिलीयेनरच हो की थेट. (तेव्हा लक्षात ठेव मात्र की बार्सिलोना माझी खूप जवळची मैत्रिण आहे Wink )