बेस्ट फ्रेंड

Submitted by Swamini Chougule on 16 August, 2022 - 15:16

#बेस्टफ्रेंड

ती आणि तो एकाच वर्गात शिकत होते. शेजारी घरे असल्याने एकत्र शाळेत जाणे येणे आलेच!तिच्या आईने तिला शाळेत नेण्याची आणि आणण्याची जबाबदारी तिच्या नकळत त्याला दिली होती आणि त्याने ही ती सहर्ष घेतली होती.त्यांच्या ही नकळत ते बेस्टफ्रेंड झाले.

काळपुढे सरकत होता. ती पायाने लंगडत पुढे पळायची आणि तो तिच्यामागे तिची मात्र चिडचिड व्हायची.
“धडधाकट मुलगा असून मुंगीच्या पायाने चालतोय?”

तो मात्र गालात हसायचा आणि मनात बोलायचा
“मी तर तुझ्यापुढे धावू शकतो पण बेस्टफ्रेंड आहे ना तुझा म्हणून तुझ्यामागे असतो.”

वर्षे लोटली दोघांनी एकाच कॉलेजमध्ये एकाच फॅकल्टीमध्ये इंजिनियर केले.तो मात्र तिचा कायम बेस्टफ्रेंड होता.

पुढे दोघांना जॉब लागला आणि दोघांच्या ही घरात लग्नाचा विषय सुरू झाला.

त्याच्या मनाची मात्र चलबिचल झाली पण तो तर तिचा फक्त बेस्टफ्रेंड होता.तिने त्याला एक दिवस भेटायला बोलावले.

“माझं लग्न ठरतंय माहित आहे ना तुला?” तिने रोखून पाहत त्याला विचारले.

“माहित आहे मला, तुला तुझ्या या बेस्टफ्रेंडकडून शुभेच्छा!”त्याने डोळ्यातले पाणी रोखत कुसनुस हसत उत्तर दिले.

“हो बेस्टफ्रेंडच आहेस तू माझा! तुला काय वाटतं की मला इतक्या वर्षांत तुझे मन कळले नसेल का?अरे बेस्टफ्रेंड आहे ना मी तुझी! मी वाट पाहत होते इतकी वर्षे की माझा बेस्टफ्रेंड त्याच्या मनातले कधी मला सांगतो पण कशाच काय?मग मीच घरात सांगून टाकले की तोच माझा बेस्टफ्रेंड माझा बेस्ट लाईफ पार्टनर होऊ शकतो.”ती त्याला पाहत नाटकीपणे बोलत होती.

“म्हणजे तुझे लग्न माझ्याशीच ठरत आहे?” त्याने आश्चर्याने आवंढा गिळत विचारले.

“ हो मग आईने तुला मला शाळेत व्यवस्थित न्यायाची आणायची जबाबदारी दिली होती तर तू मला सगळे शिक्षण होई पर्यंत साथ दिली. कायम माझ्यामागे चालायचास मला सावरायला, मी किती ही चिडले तरी मग आता आयुष्यभर मला तुझ्याशिवाय कोण कसा काय व्यवस्थित सावरू शकेल?”ती हाताची घडी घालून त्याला रोखून पाहत बोलत होती.

त्याच्या मात्र डोळ्यात आनंद आश्रु वाहत होते. त्याने फक्त तिला मिठी मारली.

तिला तिच्या बेस्टफ्रेंडची अबोल भाषा केंव्हाच कळली होती कारण ती त्याची बेस्टफ्रेंड होती!
©स्वामिनी चौगुले

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

So Cute