प्रायश्चित्त
द्राय्व्हारने गाडी स्टार्ट केली तेव्हा सकाळचे सात वाजले होते. आता साडे तीन चार तासात गाडी पुण्याला पोचेल असा विचार करत मी डुलका काढायचे ठरवले. दर महिन्याला कंपनीच्या कामासाठी पुण्याला जायचे, साहेब लोकांना भेटायचे, कामाबाबत चर्चा करायची, फार तर एक दिवस मुक्काम करायचा आणि लगेच परतायचे हे माझे रुटीन ठरून गेले होते. पण या वेळी मात्र मी ठरवल होत कि कामाचा विषय डोक्यात ठेवायचाच नाही. हि पुणे ट्रीप फक्त अवधूत साठी.! कित्येक महिने मी आणि अवधूत भेटलो नव्हतो. अधून मधून फोन होई इतकच काय ते. पण यावेळी मात्र संपूर्ण दोन दिवस मी त्याच्या सहवासात घालवणार होतो, मनसोक्त गप्प्पा मारणार होतो, झालेल्या घटनेबद्दल त्याचे सांत्वन करणार होतो.
अवधूत हा काही माझा फार जवळचा मित्र होता अस नाही. पण तरीही दोघांच्यात स्नेहपूर्ण संबध निश्चितच होते. तो आणि मी एकाच कंपनीत काम करत होतो. थोड्याच अवधीत त्याने स्वत:च्या कर्तबगारीवर कंपनीत वरच्या पोस्ट मिळवल्या होत्या. सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व म्हणजे अवधूत. दिसायला देखणा, चांगली नोकरी, चांगला पगार, देखणी बायको त्याच्याकडे काही नव्हते अस नाही. पण तरीही अजुनी चांगले करिअर करायचे म्हणून त्याने हि नोकरी सोडली आणि दुसरी कंपनी जॉईन केली. दोघेही आपापल्या कामात व्यस्त राहिलो पण अस असल तरी दोघांच्या संबधात फार फरक पडला नाही. दोघांच्यातली आदरयुक्त मैत्री, भावनिक ओलावा तसाच होता. पण आज अवधूतला भेटायला मी आवर्जून चाललो होतो त्याला कारण त्याच्यावर आलेला दु:खाचा प्रसंग.
अवधूत त्याच्या जीवनात सुखी होता, पण तरीही या सुखी जीवनाला सुद्धा एक दु:खाची किनार होती त्याचा धाकटा भाऊ नंदू. डोळ्याने अधू, काहीसा मंद. पण या आंधळ्या भावाचे सुद्धा अवधूतने आणि त्याच्या बायकोने सर्व काही केले. प्रेमाने .. मायेने.. पण त्याचा हा भाऊ महिन्या दीड महिन्यापूर्वी एका अपघातात मरण पावला. या घटनेनंतर मला अवधूतचा फोन आला होता. फोनवर आम्हा दोघांचेही आवाज गहिवरले होते. मी फार काही बोलू शकलो नाही.. खर तर मी लगेच पुण्याला जायचे ठरवले होते पण ते जमू शकले नाही. पण आज मी जाऊन त्याच्याशी बोलायचे . त्याचे सांत्वन करायचे म्हणून पुण्याला चाललो होतो
दारावरची बेल मी वाजवली आणि स्वत:अवधूतनेच दार उघडले. त्याची अवस्था बघून मला वाईट वाटले. गालफडे बसलेली दाढीचे खुट वाढलेले, डोळे लाल कित्येक दिवस तो झोपलेला नसावा. त्याचा सख्खा भाऊ गेलेला आणि ते सुद्धा एका अपघातात या दु:खातून तो अजुनी बाहेर आलेला नव्हता. मला पाहताच तो मंदसे हसला आणि म्हणाला “ तू? ये आत ये” मी येणार हे त्याला माहिती होत पण आजच येईन याची त्याला कल्पना नव्हती. काही क्षण शांतता. मग मीच बोलायला सुरवात केली
“ अवधूत, हे अस काय रे झाल अचानक?” बोलण सुरु होण्यासाठी मी प्रास्तविक केल.
“ काही कळत नाही रे.” अवधूत शून्यात बघत म्हणाला. प्रास्तविकाला प्रास्तविकाने उत्तर दिल. पुन्हा तीच भयाण शांतता.
“ पण अवधूत हा अपघात नेमका कसा झाला?”
“ कसा आणि काय ..? अवधूत पुन्हा शून्यात बघत म्हणाला.
“ भाउजी, चहा !” चहा घेऊन सुचेता वहिनी हॉल मध्ये आल्या.
“ हो. वहिनी, नंदूच कळल. वाईट वाटलं”
“ भाउजी, त्या दिवसापासून अवधूतला झोप नाही. बघताय ना कसा झालाय ते. तुम्हीच समजावा त्याला काय ते” अवधूतची रया गेली होती. गेलेलं माणूस परत येत नाही हे खर पण शोक तर वाटणारच. अवधूतला आपल्या भावाबद्दल वाईट वाटण यात काहीच गैर नव्हत. पण हे मी त्याला बोलून दाखवणार नव्हतो. नाहीतर त्याच्या दु:खाला खतपाणी घातल्यासारख झाल असत.
“ अवधूत, मन थोड टणक कर आणि या दु:खातून बाहेर ये आणि पुन्हा कामावर जायला सुरवात कर” वहिनीनी माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेन बघितल. मला त्यांच्या नजरेचा अर्थ कळला नाही. मग पुढे त्याच म्हणाल्या
“ म्हणजे, तुम्हाला काही माहित नाही?”
“ नाही. काय झाल?”
“ यांनी नोकरी सोडून सहा महिने होऊन गेले”
“ अवधूत, बोलला नाहीस मला”
“ अहो, नंदू भाउजी अलीकडे खूपच त्रास देत होते. घरात इकड तिकड करताना सुद्धा धड्कायाचे, कोणत्याच गोष्टीवर त्यांचा ताबा राहिला नव्हता, सगळ्या गोष्टी अलीकडे अंथरुणात होऊ लागल्या होत्या. आईबाबा गेल्यावर तर फारच अवघड झाल होत सगळ त्यांना सांभाळायला कुणी ठेवाव तर तेही कुणी तयार होईना, जोपर्यत शक्य होत तोपर्यंत मी सगळ केल. पण मी तरी किती दिवस करणार. शेवटी त्यान नोकरी सोडली.”
“ आणि आता .... ?”
“ आता काहीच नाही. त्यांना वाटल तर करतील दुसरी ते नोकरी.पण सध्या काय करतात ते त्यांनाच विचारा ..”
“ काय रे अवधूत?
“ काही नाही. आपण बाहेर जाऊ. जाता जाता बोलू”
मी आणि अवधूत बंगल्याच्या बाहेर आलो आणि काही अंतर चालून गेल्यावर त्याने मला दुमजली इमारत दाखवली. इमारतीवर नाव लिहील होत “ निवारा” त्या इमार्त्तीत आम्ही प्रवेश केला.अचानक औषधांचा उग्र वास नाकात शिरला आणि मला पोटात ढवळल्यासारखे झाले. अवधूतने मला कुठे आणले तेच कळत नव्हते. तरीही मी त्याच्या बरोबर आत गेलो. इमारती मधील एका हॉल मध्ये काही वृद्ध माणसे विकलांग अवस्थेत बेडवर झोपलेली होती. कुणी जीर्ण आवाजात बोलत होते, कुणी नुसतेच विव्हळत होते. कुणी खोकत होते. मधूनच एखाद्या खोलीतून फक्त ओरडण्याचा आवाज येत असे. एखादा डॉक्टर त्याच्याकडे जाई, त्याला इंजेक्शन देई आणि पुन्हा आपल्या जागेवर येई. औषधांचा उग्र वास, मलमुत्रांची दुर्गंधी .. एकूणच सगळे वातावरण मला असह्य झाले होते. त्यातल्या प्रत्येक वृधाकडे अवधूत जाई, त्याची विचारपूस करी, त्याच्या तोंडात आलेली लाळ स्वत: पुसे. अवधूत हे सगळे करत असताना मला आश्चर्य वाटत होते. कारण नीट नेटका आणि टापटीप अवधूत मी बघितला होता. त्याच्या नुसत्या येण्याने अत्तराचा सुगंध वातावरणात दरवळून जायचा आणि इथे तो काय करत होता? मला तिथे उभ राहाण सुद्धा जड झालेलं होत आणि अवधूत मात्र त्या वातावरणातून बाहेर पडू इच्छित नव्हता. एकीकडे मला त्याच कौतक वाटत होत आणि दुसरीकडे मला कुठ फसवल म्हणून मला चीड पण येत होती. मी नाईलाज म्हणून तिथे उभा राहिलो. अवधूत त्या रुग्णांचे सगळे करत होता पण हे करत असताना त्यालाही जड जात होते. माझ्या मनात येत होते हे सगळ तो नाईलाज म्हणून करतोय. त्याच्या मनाविरुद्ध तो करतोय. पण का कशासाठी? याची गरज होती? अवधूत सुखवस्तू माणूस होता. अभिजात श्रीमंत होता. मग हे सर्व ? माझे कुतूहल मला शांत बसू देत नव्हते.
“ अवधूत, हे काय आहे ? आणि कुठ आलो आहोत आपण?”
“ अरे, हे काही नाही. नंदू गेल्यानंतर मी वृद्ध लोकांना, विकलांग लोकांना आसरा देण्यासाठी “निवारा “ हे केंद्र मी चालू केल. विनामूल्य.
“ पण हे ..”
“ मला आल लक्षात काय म्हणायच ते. सामाजिक कार्य हा कल नव्हता कधी असच तुला म्हणायचं आहे ना? मी मानेनच होकार दिला.
“ हे सामाजिक कार्य म्हणून मी करतोय अस मला वाटत नाही. यातल्या प्रत्येक व्यक्तीत मी माझा नंदू बघतोय... बोलता बोलता अवधूतला गहिवरून आल आणि तो रडू लागला. त्या रडण्यामध्ये दु:खापेक्षाहि मनातली कमालीची अस्वस्थता जास्त दिसून येत होती. मी त्याला थोपटू लागलो.
“ अवधूत, तू नंदू वर खूप प्रेम करत होतास हे माहित आहे मला. पण झालेल्या गोष्टीला काही इलाज आहे का? सगळ काही परमेश्वर घडवत असतो हे तुलाही माहिती आहे” अवधूतच्या खांद्यावर हात ठेऊन मी त्याच सांत्वन करत होतो. केवळ नंदूची सेवा करता यावी या एका उद्देशाने त्याने नोकरी सोडली आणि ती सेवा अपूर्ण राहिली म्हणून त्याने अनेक नंदू उभे केले आणि त्यांची सेवा तो करत राहिला. अवधूत किती ग्रेट आहे.
त्या दिवशी रात्री जेवण झाल्यावर अवधूतच्या बंगल्याच्या टेरेसवर गप्पा मारण्यासाठी बसलो. आज मी बरोबर असल्याने का होईना अवधूत चार घास जेवला याचे वाहिनिना समाधान वाटले. अवधूतचे मला नेहमी कौतुक वाटत आले आहे. हा माणूस जे जे ठरवतो ते सर्व काही करत असतो. मग कंपनी असो किंवा त्याने काढलेले हे नवीन निवारा केंद्र असो. एखादी गोष्ट ठरवली कि तो करणार म्हणजे करणार.
“ अवधूत, तू ग्रेट आहेस यार. नंदू गेल्यावर एकच महिन्यात तू निवारा केंद्र काढलेस आणि पुन्हा ते तू त्यागी वृत्तीने चालवतोयस. सगळ्यांना सांभाळतोयस ,, “
“ जो आपल्या एका भावाला सांभाळू शकला नाही तो सगळ्यांना काय सांभाळणार?” अवधूत मला मधेच तोडत म्हणाला.
“ अवधूत, कशाला ती गोष्ट सारखी उगाळतोस? शेवटी तो अपघात होता ना? “ “अपघात “ असे स्वत:शीच म्हणत अवधूत विषादाने हसला.
“ काय झाल रे अवधूत त्यादिवशी? नंदूला ट्रकने धडक मारली इतक तू फोनवर बोललास पण कस काय?”
काही सेकंद अवधूत बोलला नाही. नंतर नजर शून्यात लावून स्वत:शीच बोलल्यासारखे तो बोलू लागला.
“ नंदू अलीकडे फारच विचित्र वागत होता. त्याला संभाळण अशक्य होत चालल होत. तुला माहित आहे माझे आईवडील माझ्या जवळ राहत होते. पण ते दोघेही एका वर्षाच्या काळात गेले आणि खरी समस्या सुरु झाली. सुचेताने बऱ्याच गोष्टी बघितल्या पण एकट्या सुचेताला त्याला सांभाळण शक्य नव्हत. म्हणून मी नोकरी सोडली.नोकरी सोडल्यावर नंदूला बघण इतकच माझ काम होऊन गेल. मी ते प्रेमाने करायची कारण तो माझा पाठचा भाऊ होता. दिवसभर त्याला बघायचं आणि संध्याकाळी सात नंतर त्याला समोरच्या एका बागेत घेऊन जायचं हा माझा दिनक्रम ठरून गेला होता. त्याला थोडा वेळ बाहेर नेल्यावर त्यालाही मोकळ्या हवेत भटकल्याच समाधान वाटायचं आणि घरी सुचेताला सुद्धा हलक हलक वाटायचं. मी हे सगळ जरी प्रेमान करत असलो तरीसुद्धा मला सुद्धा या रुटीनचा अलीकडे उबग येऊ लागला होता. माझे आणि सुचेताचे खटके उडू लागले होते. आणि अवधूत हा आमच्या स्वातंत्र्यावर घातलेला घाला आहे अशी तिची समजूत होऊ लागली होती. मी सगळ्या गोष्टी समजुतीने घ्यायचो पण कधी कधी माझ्याही सहनशक्तीचा अंत व्हायचा. मनातून या सगळ्या गोष्टीचा उबग यायचा.” अवधूत क्षणभर थांबला. समोरच्या बाटलीतले त्याने पाणी प्याले. आणि दीर्घ श्वास घेतला. काही सेकंद गेल्यावर त्याने बोलायला सुरवात केली.
“ त्या दिवशी मी त्याला असेच बागेत फिरायला घेऊन चाललो होतो. रात्रीचे सात साडे सात वाजले होते. रस्त्यावर वाहतूक नेहमीप्रमाणेच होती. पण त्या वाहतुकीची सवय मला झाली होती. अवधूतचा हात धरायचा आणि हळूहळू त्याला रस्त्याच्या पलीकडे असणार्या बागेकडे घेऊन जायचे असे कित्येक दिवस चालले होते. त्या दिवशी मी त्याचा हात धरला होता ..”
अवधूत बोलायचे थांबला. मी त्याच्या पाठीवरून हात फिरवला.
“ तुला त्रास होत असेल तर राहू दे अवधूत ..”
“ नाही बोलू दे मला. तो आणि मी जेव्हा जात होतो.... तेव्हा जोरात ट्रक आला.... मी नंदूचा हात हातात घेतला होता .. तो खेचून मी त्याला मागे ओढू शकलो असतो ,, पण मी त्याचा हात सोडला आणि त्याला पुढे ढकलला... वेगाने येत असणारा ट्रक त्याच्या अंगावरून गेला आणि नंदू सोडून गेला.. मी नंदूचा खून केलाय .. खून ... हे कुणालाही माहित नाही .. कि नंदू अपघातात गेला नाही त्याचा खून झालाय आणि तो मी केलाय.” अवधूत हमसून हमसून रडत होता. आणि मला काय बोलाव ते कळत नव्हत.
अवधूतने जे केल याला कुणीच साक्षीदार नाही, कदाचित या अफाट गर्दीत त्यान नेमक काय केल हे कुणाला कळलहि नसेल. त्याने हे कुणाला सांगितलहि नाही, कुणाला तो सांगेल अस वाटत सुद्धा नाही अगदी सुचेता वहिनीला सुद्धा. पण प्रत्येक गुन्हा हा कोर्टात जाऊन सिद्ध करायला लागतो अस नाही. अवधूतने त्याचा गुन्हा स्वत:शीच कबुल केला होता आणि त्याचे प्रायश्चित सुद्धा घेतले होते… निवारा केंद्र काढून. पण तरीसुद्धा तो शांत नव्हता कारण पश्चतापाची आग त्याला होरपळून काढत होती.
सतीश गजानन कुलकर्णी
बाप रे!!! असं कसं ढकललं?
बाप रे!!! असं कसं ढकललं? काळजी घ्यायचा कंटाळा आलेला म्हणुन? पण मग निवारा केंद्रात कशी काळजी घेतायत?
सुन्न!
सुन्न!
मी रोज संध्याकाळी फिरायला जाते तिथे असे एक दोन जण येतात, आपल्या बरोबर कुणीतरी अवलंबून असलेली व्यक्ती घेऊन..
रोज मनात विचार येतोच.. कसं सांभाळत असतील..?
अवधूत हा आमच्या
अवधूत हा आमच्या स्वातंत्र्यावर घातलेला घाला आहे अशी तिची समजूत होऊ लागली होती.
>>> इथे नंदू हवं ना !
शिर्षक आणि सुरूवात वाचून अंदाज आलेलाच काय असेल याचा.
अंदाज आला होता शेवट काय असेल
अंदाज आला होता शेवट काय असेल याचा +१२३४