फोटो
आकाशात वीज कडाडल्याचा जोरात आवाज आला आणि क्षीतजनि दचकून केबिनच्या खिडकी बाहेर बघितले. काळ्या ढगांनी आकाशात एकच गर्दी केली होती. आणि मघापासून थांबलेला पाउस पुन्हा एकदा जोरात पडतोय का काय अस वाटत होत. गेले आठ दिवस शहरात जोराचा पाउस पडत होता आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला होता. गेली दोन वर्षे संपूर्ण शहराला पुराने वेढा घातला होता. यावर्षीही पावसाने थैमान घातले होते. नदीकाठच्या घराना पुराने यावर्षीही घेरले होते. पण मोठा पूर येऊन सुद्धा सुदैवाने मनुष्य हानी झाली नव्हती इतकीच समाधानाची गोष्ट.. मनुष्य हानी !! मनुष्य हानी म्हटल्यावर म्हटल्यावर क्षितीज अस्वस्थ झाला ... . दरवर्षी पाउस येतो ... आणि त्याच्या मनात विचारांचे थैमान चालू राहते. ते विचार त्याला नकोसे वाटतात. एका क्षणात मनात आलेले विचार त्याने बाजूला केले. त्याला माहिती होत मनातला एक विचार .. आणि मग विचारांची मालिका आणि तिच अस्वस्थतता.... त्याला ती अस्वस्थता असहय व्हायची.
मनातल्या विचारांच्यावर क्षितीजनि ताबा मिळवला पण निसर्ग ? काही वेळातच मघापासून थांबलेला पाउस पुन्हा कोसळू लागला. स्टुडीओतील हाताखाली काम करणारे सर्व सहकारी केव्हाच घरी निघून गेले होते. अलीकडे पाउस सारखा पडत असल्याने लोकांची वर्दळ फारशी नव्हतीच. आता आपणहि लवकरच घरी जावे म्हणून क्षितीज उठला केबिन मधून बाहेर आल्यावर समोरच उभ्या असलेल्या वॉचमने त्यांला सलाम केला. रात्री घरी जातना स्टुडीओला कुलूप लावायचे आणि आपला मालक गाडीत बसला कि घरी जायचे हा त्याचा दिनक्रम. पण आज पावसापाण्याचे लवकर घरी जावे असे त्यालाही वाटत होते. त्याच्या मनातील विचार क्षितीजनि ओळखले. “ तू जा लवकर आज. मी घालतो कुलूप. आणि उद्या जर पाउस असेल तर येउच नकोस” आपल्या मालकाला त्याने अदबीने नमस्कार केला आणि तो स्टुडीओच्या बाहेर पडला.
आपल्या प्रशस्त स्टुडीओतून रात्री घरी जाताना एक चक्कर टाकायची, सर्व काही व्यवस्थित आहे हे बघायचं हि गेल्या कित्येक वर्षाची क्षितीजची सवय.! कॅमेरा विक्री विभाग... दुरुस्ती विभाग... फोटो काढण्याचा विभाग... प्रत्येक विभागातून त्यांनी चक्कर टाकली आणि शेवटी एका प्रशस्त हॉल मध्ये तो आला. त्याची सर्वात आवडती जागा.... या हॉल मध्ये त्यांनी देशविदेशात काढलेले फोटो विक्रीसाठी ठेवले होते. क्षितीजनि काढलेले फोटो हा लोकांच्यासाठी नेहमी कौतुकाचा विषय होता.
क्षितीज! वयाची पस्तीशी ओलांडलेला उमदा तरुण.पण तरुणवयातच त्यान फोटोग्राफिच्या विश्वात मानच स्थान पटकावल होत.स्वत:च्या हिमतीवर त्यांनी एक प्रशस्त स्टुडीओ शहरांत उभा केला होता.अनेक मान्यवर मग ते राजकारणातील असोत किंवा कलाक्षेत्रातील असोत त्यांचे फोटो काढायला क्षितिजलाच बोलावून घ्यायचे. सगळ्यांची पहिली पसंत क्षितीजच होती.!
विचार करत तो हॉल मध्ये आला. हॉलमध्ये सुद्धा नेहमीची वर्दळ नव्हती. आपणच काढलेल्या फोटोकडे त्यांनी एक नजर टाकली. आणि अचानक त्याचे लक्ष कोपऱ्यात उभ्या असलेल्या एका व्यक्तीकडे गेले. क्षितीजनि काढलेला एक फोटो ती व्यक्ती तल्लीन होऊन बघत होती. त्या व्यक्तीकडे बघितल्यावर ती कलेचा आस्वादक असावी, फोटोग्राफिचा तिचा अभ्यास असावा असे क्षितीजला वाटले. तिचे लक्ष वेधण्यासाठी क्षितीजनि घसा खाकरला आणि त्या व्यक्तीने लगेच वळून क्षितीजकडे बघितले.
“ ओह, द क्षितीज सर ! नाईस मिटिंग यु सर ! “क्षणभर क्षितीजला आश्चर्य वाटलं. हा माणूस कोण? आणि हा आपल्याला नावान ओळखतो?
“ एक्सक्यूज मी. आपण ओळखतो एकमेकांना?”
“ नो सर. तुम्ही मला ओळखत नाही. पण मी तुम्हाला ओळखतो. आणि मीच कशाला? तुम्हाला कोण ओळखत नाही. द क्षितीज !द ग्रेट फोटोग्राफ्रर!
“ द वगैरे काही नाही. मी फोटो काढतो. आणि जरा बरे निघतात” क्षितीजनि नम्रतेन सांगितले,
“ नो सर. हा तुमचा विनय आहे.”
“ Thank You . बाय द वे, आपला काय परिचय?”
“ मी स्वप्नील.”
“ स्वप्नीलजी ! नाईस नेम. नाईस मिटिंग यु”
“ स्वपनीलजी नाही. फक्त स्वप्नील म्हणा सर. मला आनद होईल”
“ ओके स्वप्नील. स्वप्नील, तुम्ही हे सर्व फोटो बघत असताना मी तुम्हाला बघत होतो. मला तुमची नजर अभ्यासापूर्ण वाटली. तुम्हाला फोटोग्राफी मध्ये रस आहे अस दिसत”
“ होय सर. मला फोटोग्राफीच आवडते”
“ ती चांगली गोष्ट आहे. पण कलेचा आस्वाद घेण्यासाठी त्याचा अभ्यास करायलाच पाहिजे अस नाही. उलट मी तर म्हणेन अभ्यास अधिक केल्याने चिकित्सकपणा वाढतो. आता हेच पहा ना, शास्त्रीय संगीत . संगीताचे सूर नेहमीच आनंद देतात. पण त्याचा अभ्यास करायला लागल्यावर आपण अधिक चिकित्सक बनतो आणि कदाचित टीकाकार होऊ लागतो. मूळ आस्वाद बाजूलाच जातो.”
“ तुम्ही बरोबर सांगितलत सर. पण मी आस्वादक आहे आणि अभ्यासक सुद्धा आहे. तुमच्या या स्टुडीओत मी अनेकदा येऊन गेलो आहे. आणि हे सर्व फोटो मी अभ्यासपूर्ण नजरेने बघितलेत. कारण ...”
“ कळल. तुम्ही फोटोग्राफर आहात.”
“ होय. तुमच्याइतका कुशल नाही. पण या कलेचा मी अभ्यासक आहे.”
“ सो नाईस स्वप्नील.”
बरेच दिवसानंतर क्षितीजला बोलायला वेळ मिळाला होता आणि स्वप्नीलला क्षितीज भेटल्याचा आनंद होत होता. इतका मोठा फोटोग्राफर असून सुद्धा क्षितीज आपल्याशी मनमोकळ्या गप्पा मारतो आहे म्हटल्यावर स्वप्नीलची भीड चेपली होती.
“ सर, हे तुमचे हे सगळे फोटो उत्तम आहेत तरी सुद्धा एक गोष्ट मात्र खटकते.”
“ कोणती?” क्षितीजने कुतुहलाने विचारले.
“ या प्रत्येक फोटोच्या खाली त्याची दिलेली किंमत !
“ त्यात खटकायचे काय? माझा व्यवसाय आहे हा”
“ सर, किंमत लावली आहे हे खटकत नाही मला खूप कमी लावली आहे हे खटकत. मी जर तुमच्या ठिकाणी असलो असतो तर दुप्पट किंमत लावली असती”
“ तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे किंमत थोडी नक्कीच कमी आहे. पण किंमती पेक्षाही लोक येथे येतात, फोटो बघतात, माझ्या कलेची कदर करतात. यापेक्षा एका कलाकाराला काय हव असत याहून?” काही सेकंद स्वप्नील थांबला. त्या सगळ्या फोटोत एका फोटोने त्याच लक्ष वेधून घेतलं होत. त्याने कुतुहलाने क्षितिजला विचारले.
“ सर, अजुनी एक गोष्ट खटकते आहे मला. या सगळ्या फोटोत.!
“ कोणती?”
“ या सगळ्या फोटोच्या खाली किंमत आहे पण तो मध्ये लावलेला जो फोटो आहे त्याची तुम्ही काहीच किंमत कशी लावली नाही?” क्षितीजनि त्या फोटोकडे नजर टाकली.हॉलच्या मध्ये लावलेला तो फोटो ! तो फोटो सर्वांना आवडायचा .. बऱ्याच लोकांनी तो विकत मागितला होता. निसर्गाच्या कुशीत दडलेलं एक खेड. ...ढगाळ वातावरण.... पावसाचे हलकेसे पडणारे तुषार.... घराकडे जाणारी छोटीशी पाउलवाट ..... आणि समोरच गेल्यावर झोपडीवजा छोटेसे घर. पावसाच्या तडाक्याने केव्हाही ते घर केव्हाच वाहून गेले असते. .. आणि घराच्या बाहेर कुणाची तरी वाट बसलेली एक म्हातारी बाई .. त्या म्हातारीच्या डोळ्यात दिसणारी आर्त करुणा .. चेहऱ्यावर माया ... तो फोटो.. जिवंत फोटो वाटत होता आणि स्वप्नील त्या फोटोवर बेहद्द खुश होता. त्या फोटोकडे क्षितीजनि नजर फिरवली आणि क्षणात त्यांनी आपली मान स्वप्नीलच्या दिशेने वळवली. घशात आलेला आवंढा त्यांनी गिळला. क्षितीज काहीच बोलत नाही म्हटल्यावर स्वप्नील पुन्हा एकदा त्यांना म्हणाला,
“ सर, तो फोटो मी आत्ता विकत घ्यायला तयार आहे. तुम्ही म्हणताय त्याच्यापेक्षा जास्त किंमत देऊन. माझ्या हॉल मध्ये हा फोटो शोभून दिसेल” क्षितीज काही सेकंद काहीच बोलले नाहीत. पण आपला आवाज गहिवरू नये याची दक्षता घेत ते म्हणाले,
“ स्वप्नील, आय ऑम सॉरी. तो फोटो विकायचा नाही मला”
स्वप्नीलला आश्चर्य वाटले. तो फोटो त्याला आवडला होता. यापूर्वीही स्वप्नीलनि तो फोटो बर्याचदा पाहिला होता. क्षितीज सरांना भेटून त्या फोटो बाबत विचारायचे असे त्याने ठरवले होते. पण त्याची भेट होऊ शकली नव्हती. आणि आज भेट झाली तर क्षितीज तो फोटो विकायचा नाही अस म्हणत होता . स्वप्नीलच कुतूहल चाळवल.
“ पण सर, का? इतके फोटो तुम्ही विकताय पण तो का नाही?”
“ कारण अस काहीच नाही स्वप्नील. तो फोटो मलाच इतका आवडलाय कि तो मी कुणाला विकू इच्छित नाही इतकच काय ते”
क्षितीजनि निर्णायक स्वरात सांगितल. स्वप्नील काहीसा नाराज झाला. पण त्या नाराजीपेक्षाही आज क्षितीज सरांची ओळख झाली याचा त्याला विशेष आनंद वाटत होता. आणि हि ओळख तो वाढवणार होता. कारण फोटोग्राफी मध्ये क्षितीज सर त्याचा आदर्श होते.
त्या दिवसापासून स्वप्नीलच स्टुडीओतील येणजाण वाढत गेल. कधी त्यान काढलेले फोटो दाखवण्यासाठी, कधी क्षितीजन लिहिलेलं आर्टिकल आवडल हे सांगण्यासाठी तर कधी घरी चहाचे अगत्य पूर्ण आमंत्रण देण्यासाठी. क्षितीजना हि स्वप्नील आवडला होता त्याच्या लाघवी स्वभावामुळे आणि त्याच्या शिकण्याच्या इच्छेमुळे.
स्वप्नीलची आणि क्षितीजची जवळीक वाढत होती. त्या दिवसापासून त्यान त्या फोटोचा विषय कधीच काढला नाही. पण असे असल तरी त्या फोटोचा विचार मात्र त्याच्या मनात अधून मधून डोक वर काढतच होता. कधीतरी क्षितीज सरांना आपण कारण विचारायचं हे त्यान मनाशी ठरवलं होत. पण ती संधी त्याला मिळत नव्हती. .. पण तो योग लवकरच जुळून आला.
त्या दिवशी क्षितीज स्वप्नीलला आपणहून म्हणाला
“ स्वप्नील, आज घरी चल. मस्त हवा पडली आहे. ड्रिंक्स घेऊ. तुझी हरकत नसेल तर.. “ द क्षितीजनि स्वत: ऑफर दिल्यावर स्वप्नील नाही म्हणण शक्यच नव्हत. एका पायावर तो तयार झाला. त्याला आज क्षितीजचा सहवास मिळणार होता आणि ते सुद्धा त्याच्या बंगल्यात.
क्षितीजचा बंगला. शहरापासून लांब. आणि कदाचीत त्याचमुळे निसर्गरम्य. बंगल्याच प्रशस्त आवार. आणि त्याच्या सौंदर्यात भर घालणारी बंगल्यासमोरील बहरलेली बाग. गेटमधून प्रवेश करताच स्वप्नीलला क्षितीजच्या बंगल्यातील सौंदर्य जाणवले.
“ सर, किती निसर्गरम्य बंगला आहे तुमचा.”
“ आहे आपला” काहीतरी बोलायचे म्हणून क्षितीज बोलला. खर तर या बंगल्यातील प्रत्येक गोष्ट न गोष्ट त्याने स्वत:च्या देखरेखीखाली करून घेतली होती. कलात्मकतेत कुठेही कमी पडणार नाही हे त्याने आवर्जून पाहिले होते. त्याचमुळे बंगल्याचे कोतूक झाल्यावर तो मनोमन सुखावला. बंगला बघत बघतच स्वप्नील हॉल मध्ये आला. प्रशस्त हॉल मधील मंद दिवे आणि हलकेसे लावलेलेली संगीताची धून. क्षितीजचा कलात्मक स्वभाव हॉलच्या सजावटीत सुद्धा दिसत होता. पण हॉलच्या एका भिंतीकडे लक्ष गेले आणि त्याच्या मनातल्या विचारांनी पुन्हा एकदा उसळी मारली. तोच फोटो. जो क्षितीजनि स्टुडीओत ठेवला होता तसाच फोटो एका भिंतीवर दिसत होता. क्षितीजचा आवडता फोटो म्हणून त्याने बहुदा अशीच कॉपी घरीपण करून घेतली असावी. स्वप्नीलच्या मनात विचार आला.
स्वप्नील विचारात असतानाच ड्रिंकस ची व्यवस्था नोकराने केव्हा केली हे स्वप्नीलला कळलेच नाही. क्षितीजने दोघांचे पेग भरले आणि दोघांनीही पहिला लार्ज सिप घेतला. स्वप्नील काहीतरी विचार करतोय हे क्षितीजच्या लक्षात आल होत.
“ कसला विचार करतोयस स्वप्नील?”
“ कसलाच नाही.”
“तरीही ...?” स्वप्नील क्षितीजचा अंदाज घेत बोलू लागला,
“ सर, गेल्या पाच सहा महिन्यात आपण खूपच जवळ आलो. आणि त्याचमुळे सुरवातीला वाटणारी भीड आता वाटत नाही. म्हणूनच एक गोष्ट विचारावीशी वाटते”
“ कळल तू काय विचारणार ते?” स्वप्नीलन चपापून क्षितीज कडे बघितलं.
“ मी लग्न का केल नाही हेच कुतूहल आहे ना तुला?”
“ नो सर. नो. मी ते विचारणार नव्हतो तुम्हाला. सॉरी तुमचा जर काही गैरसमज झाला असेल तर”
“ अरे नाही. तुझी गंमत करीत होतो. बोल. त्यात काय एवढ?”
“ सर. स्टुडीओला तो फोटो.. तोच फोटो तुमच्या बंगल्यात सुद्धा दिसतोय.. तुम्ही तो विकायचा नाही म्हणताय.. .. स्टुडीओत जेव्हा या बाबतीत मी विचारल तेव्हा त्या फोटो बाबत बोलताना तुम्ही थोडेसे हळवे झाला होतात. .. मला कुतूहल नक्की आहे या सगळ्या बाबतीत.. पण हे खाजगी होत असेल तर सोडून द्या”
क्षितीज क्षणभर विचारात पडला. समोर असणार्या टेरेसमधून आकाशातल्या काळ्या ढगांच्या कडे त्याची नजर गेली डोळ्यात आलेले पाणी त्यांनी पुसून टाकल. दोघांच्या ग्लासात त्यांनी पेग भरला. आणि क्षितीजने बोलायला सुरवात केली.
“ क्षितीज तू हा विषय कधीतरी काढणार याची मला कल्पना होती. पण आज तू आपणहून विषय काढला आहेस तर मी तुला सगळ सांगून टाकतो,” क्षितीजची नजर नकळत शून्यात गेली.
“ मी या शहरात जरी स्थायिक झालो असलो तरी हे शहर माझ मूळ गाव नाही. मी मुळचा कोकणातला. नीलकंठ भोसले माझ नाव. कोकणातल्या एका खेडेगावात माझ बालपण गेल. सगळीकडे विखुरलेली घर आणि काबाडकष्ट करून जगणारी माणस. अशा खेड्यात आमच घर होत. मी, आणि माझे आईवडील. ! एखाद्या दिवशी जर वडील कामावर गेले नाहीत तर खायचे काय असा प्रश्न आम्हाला असे. आईही घरी बसल्या बसल्या लोकांची छोटीमोठी काम करून देत असे. कधी शिवण काम, कुणाचे पापड करून दे तर कधी कुणाच्या घरी लागणाऱ्या पोळ्या करून दे. एकूण परिस्थिती हलाखीची होती” क्षितीजनि एका दमात तो पेग संपवला. पण स्वप्नीलच हळूहळू पिण चालूच होत. त्याला पिण्यापेक्षा त्या फोटोच रहस्य जाणून घेण्यात जास्ती स्वारस्य होत. क्षितीजनि पुन्हा एक पेग भरला
“ त्या दिवशी जोराचा पाउस होता आणि माझे वडील नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. त्या दिवशी एरवी कधीही त्यांच्या बरोबर न जाणारी आई सुद्धा त्यांच्या बरोबर गेली होती. शेजारच्या एका मुलीला माझ्याकडे बघ अस सांगून आई बाबा दोघेही गेले. थोड्या वेळात आई परत येते असे सांगून बाहेर पडली होती. पण रात्री उशिरापर्यत कुणीच आल नव्हत. ज्या मुलीला माझ्याकडे बघ म्हणून सांगितल ती मुलगी रात्री कुणीतरी हाक मारली म्हणून घरी गेली. मी एकटाच रडत घरी बसलो होतो...”
“ पण सर त्यावेळी ..
“ त्यावेळी माझ वय फक्त पाच वर्षे होत.”
“ सकाळी जेव्हा मला जाग आली तेव्हा माझ्या डोक्यावर एक सुरकुतलेला हात होता. एक म्हातारी बाई माझ्या गालावरून हात फिरवत होती. ती कोण आजी आहे मला माहित नव्हत. पण ती माझ्या आईवडिलांच्या घराशेजारीच राहत असावी. माझे आई बाबा कुठ दिसतायत का हे मी बघत होतो.पण कुणीच दिसत नव्हत. मला गहिवरून येत होत. पण तो प्रेमळ हात मला थोपटत होता.”
--- आणि तो हात मला नंतर तसाच थोपटत राहिला. आजीचा सहवास .. तीच प्रेम .. तीन खालेल्या खस्ता या सगळ्या गोष्टी अनुभवत मी लहानाचा मोठा होत चाललो. माझ्या जन्मापासूनची कहाणी मला आजी सांगत रहायची आणि मी कुतुहलाने तिला प्रश्न विचारात राहायचो.
“ सर, पण तुमचे आई वडील?”
“ ते त्या दिवशी परत आले नाहीतच आणि नंतर कुठे गेले ते कळलच नाही. कुणी म्हणत त्यांनी गरिबीला कंटाळून आत्महत्या केली. कुणी म्हणत त्या दिवशी पूराच पाणी वाहत होत त्यात बुडून मेले असतील... पण त्यांचा कोणताच पत्ता लागला नाही.”
“ बघता बघता मी बारा वर्षाचा झालो. मी त्या म्हातार्या आजी कडेच राहत होतो. मला पोसण्याची तिची ऐपत नव्हती. पण तरीही तीन मला लहानच मोठ केल होत. .. कोणत्या तरी शाळेत सुद्धा घातलं होत . पण शाळेत माझ लक्ष फार लागत नव्हत.. तुला सांगतो, माझ शिक्षण खूप कमी आहे.. शिकून काय करायचं अस वाटायचं? ज्या आजीन मला लहानाच मोठ केल त्या आजीसाठी काहीतरी केल पाहिजे अस वाटायचं. म्हणूनच बारा वर्षाचा झाल्यावर वाटलं आपण काही काम कराव आणि आजीला सांभाळाव !.पण इतक्या लहान वयात मला काम कोण देणार? लोक मला खाऊला पैसे द्यायचे पण मला काम द्यायचे नाहीत. पण एक दिवस मी शेजारच्या जवळच असणार्या गावातील फोटो स्टुडीओत गेलो. त्याला स्टुडिओ म्हणतात हे सुद्धा मला नंतर कळल. एक भला माणूस त्या स्टुडीओत बसला होता. त्याने विचारलं.
“ काय रे पोरा? फोटो काढायला आलास का? जरा बरे कपडे तरी घालून यायचस?
“ नाही. मला काम पाहिजे” मी म्हणालो होतो.
“कसलं काम? आणि काय करणार तू? किती लहान आहेस”
“ काही पण द्या. घरी आजी आहे. आजारी असते. जेवायला पैसे नाहीत. गरीब आहोत आम्ही. आम्हाला कुणी नाही”
“ आणि तुझे आई वडील ?”त्याने विचारले.
“ माहित नाही. मी लहान असतानाच काय तर झाल”
त्या माणसाला माझी दया आली. तो पण मला खाऊला पैसे देत होता. पण मी सांगितल त्याला
“ पैसे नकोत. मला काम पाहिजे”
त्याने थोडावेळ विचार केला. आणि म्हणाला
“ देतो मी काम तुला. माझा हा स्टुडीओ झकपक ठेवायचा. सकाळी दहा वाजता यायचं आणि रात्री आठला जायचं. दोन वेळच जेवण देईन तुला आणि म्हातारीला जगवायला पुन्हा हजार भर रुपये देईन. चालेल का तुला?”
माझ्या डोळ्यातून पाणी वाहत होत. दोन वेळच जेवण आणि शिवाय हजार रुपये. मला काय पाहिजे होत अजुनी? लगेच गरिबी कमी होणार नव्हती. पण अगदीच असणारा खडखडाट आता कमी झाला. मला मिळणाऱ्या जेवणातून आजीला सुद्धा घरी डबा घेऊन जायचो.
माझे दिवस जात होते. पण आजी रात्र झाली कि माझ्या वाटेकडे डोळे लावून बसलेली असायची. कधी एकदा मी स्टुडीओतून बाहेर पडतो आणि आजी कडे जातो असे मला वाटायचे. तिच्या डोळ्यातील माया, कारुण्य मला घराकडे खेचून न्यायचे,
हळूहळू मला कामाची समज येऊ लागली आणि मालकाची मर्जी माझ्यावर बसली. त्यांनी मला स्टुडीओत फोटो कसे काढायचे, त्यातील तांत्रिक बाजू अशा बर्याच गोष्टी शिकवल्या. इतकच नव्हे तर ते नसताना मी त्यांचा स्टुडीओ सांभाळू लागलो.
पाच सात वर्षे अशीच निघून गेली. माझे स्टुडीओत बस्तान बसत चालले होते. आजी पण आता आणखी म्हातारी होत चालली होती. तिची आठवण म्हणून एक दिवस मी तिचा फोटो काढला. घराच्या बाहेर माझी वाट बघत बसलेला. ढगाळ वातावरणात आजी माझी वाट बघत बसली होती. तेव्हा मी तो फोटो टिपला आहे. तुला जो फोटो आवडला आहे म्हणतोस ना तो तिचा फोटो आहे. “ मी तिचा फोटो काढला. आणि दुसर्या दिवशी आजी देवाघरी गेली”
बोलता बोलता क्षितीज गहिवरला. स्वप्नीलने आपल्या ओल्या झालेल्या पापण्या पुसल्या.
“एक दिवस मालकांनी मला बोलावलं आणि सांगितल तू आता येथे राहू नकोस. तू शहरात जा. तिथे तुझ्या कलेच चीज होईल. चांगला फोटोग्राफर होशील. नाव कमावशील. सुरवातीला तुला त्रास होईल. पण या खुराड्यात राहू नकोस तू. कलेला अंत नसतो बेटा जा. तू अस का करीत नाहीस , नवीन नाव घे. नव्या आयुष्याची सुरवात कर. क्षितीज या नावाने फोटो काढ. क्षितिजाला अंत असतो का बेटा? तसच कलेच आहे. कलेलाही अंत नसतो. त्याने त्या दिवशी माझ्या हातावर पाच हजार ठेवले. आणि तो स्टुडीओ मी सोडला.”
“ या शहरात आलो. फुटपाथ वर झोपून दिवस काढले अनेक काम केली. आणि संघर्ष करत, बंकेच कर्ज काढून एक स्टुडीओ काढला. हळूहळू वाढवत नेला आणि सध्या हे दिवस दिसतायत.
“ पण सर ते घर तुमच ... तुमचे आई वडील ...
“ आई वडिलांचा पत्ता लागलाच नाही. काय झाल ते कळल नाही. पण ते घर मात्र अजुनी तसच तिथ आहे. मी जात असतो तिथे त्याची देखभाल करायला एक बाई ठेवली आहे मी. बरीच लोक मला म्हणतात ते घर पाडून तिथे आधुनिक काहीतरी करा, खेड्यातही सुधारणा होत चालल्या आहेत. पण मला त्या घराच मूळ रूप बदलायचं नाही. माझ्या आठवणी आहेत त्या घरात. .. ते घर .. माझी आजी ... आणि म्हणून स्वप्नील तो फोटो मी विकत नाही. .. त्या माझ्या मनातल्या स्मृती आहेत.
क्षितीज बोलायचे थांबला. स्वप्नीललाही काय बोलायचे ते कळत नव्हत. कळत नकळत स्वप्नील त्या वातावरणात गेला होता. क्षितीजच्या विश्वात तो हरवून गेला होता. समोरील टेरेस मधून आकाशात साठलेली ढगांची गर्दी दिसत होती. पावसाची रिपरिप सुरूच होती . पण तिकडे दोघांचेही लक्ष नव्हते.. क्षितीजच्या डोळ्यापुढे आता फक्त कोकणातले घर होते आणि स्वप्नीलच्या डोळ्यापुढे भिंतीवरचा तो फोटो...
सातिश गजानन कुलकर्णी
छान. तरल आहे
छान. तरल आहे
छान
छान
छान आहे कथा
छान आहे कथा
कथा आवडली ...
कथा आवडली ...
छान कथा
छान कथा
त्या आज्जींचे काय झाले पण?
त्या आज्जींचे काय झाले पण?
हूर हूर लावून गेली.
हूर हूर लावून गेली.
छान आहे कथा.
छान आहे कथा.
क्षितीज तू हा विषय कधीतरी काढणार याची मला कल्पना होती. पण आज तू आपणहून विषय काढला आहेस तर मी तुला सगळ सांगून टाकतो >>> या वाक्यात स्वप्नील हवंय का?
पेरुजी
पेरुजी
क्षितीजने फोटो काढला आणि त्यानंतर ती आजी गेली असा उल्लेख कथेत आहे. प्लीज बघून घ्या.
आरएम डी जी
आरएम डी जी
आपण दाखवलेली चूक बरोबर आहे. तिथे स्वप्नील असे पाहिजे आहे. धन्यवाद
कथा, आवडली.
कथा, आवडली.