बॉलीवूडसाठी धंदेवाईक ऐतिहासिक चित्रपटाची कथा - मायबोलीकरांनो पूर्ण करा

Submitted by शांत प्राणी on 10 July, 2022 - 11:32

बॉलीवूडचे चित्रपट राजमौली यांच्या सारख्या निर्मात्यांच्या चित्रपटांसमोर आचके देताना २०२२ सालात पाहतोय. पण उगीच हळहळ व्यक्त करून किंवा नैराश्यातून कठोर टीका करून सुद्धा चालणार नाही. हो, कठोर टीका ही आपुलकीतूनच होत असते. जसे सध्या शिवसेना संपली कि काय म्हणून पक्षाच्या चुका उगाळणार्‍यात त्या पक्षाचे समर्थकच आघाडीवर आहेत, तसेच यशराज फिल्म्स, जोहरी चित्रपट, अक्षयकुमार, लेडी अक्षयकुमार कंगना राणावत यांचे चित्रपट धडाधड कोसळताना पाहून बॉलीवूड प्रेमींचा संताप होत आहे. या अवस्थेतून बाहेर पडायचे तर आपल्याला काही तरी केले पाहीजे. घरात बसून क्रांती होत नसते वगैरे व्हॉट्स अ‍ॅप संदेश वाचून थोडे जरी रक्त सळसळले असेल तर आपण सर्वांनी मिळून एक कथा बनवून बॉलीवूडच्या हवाली करूयात. ही कथा एका अतिभव्य चित्रपटाची असायला पाहीजे ...

मराठी चित्रपटसृष्टीला पण दिली असती पण ते नितीन देसाईंकडे जाऊन स्वस्तात सेटस बनतील का हे विचारणार. अगदी स्वस्तातला म्हणजे थर्माकोलच्या दगडी भिंतीला काळ्या रंगात स्प्रे पेंट मारलेला सेट पंधरा लाखात देतो म्हटले तर हे म्हणणार दीड लाखात बघा काही होत असेल तर. मग देसाई पण म्हणणार, कागद आणि शाई आणून द्या, बघू काही जमते का. आख्खे युनिट मग घरातल्या रद्दीचे कागद घरातल्या गृहीणीचा रोष पत्करून आणणार (यात नायिका सामील होणार नाहीत) , देसाई मग शिकाऊ मंडळींना हे कागद रंगवून बुरशी लागलेल्या भिंतींना चिकटवून त्याला महाल बनवून देणार. त्याला आतून मिलटरीच्या युनिटच्या बाहेर चुना आणि वीटा कुस्करून त्यांचा रंग बनवलेला असतो, त्या रंगात पेंट करून राजवाडा बनवणार. तर हे आपल्या कथेला कसे चालेल ? चाललं तर हरकत नाही. फक्त कॉस्ट कटिंग मधे मुक्काम पोस्ट धानोरी मधे दाखवलेत तसे पॉवरपॉइण्टमधे सीजी केले नाही म्हणजे मिळवली.

कथेला सुरूवात होते.
एरीयल शॉट मधे आपल्याला वरून डोंगराच्या माथ्यावरचे एक नगर दिसते. ड्रोन स्थिरावते. खाली एक भव्य राजमहाल दिसत असतो. ड्रोन खाली येते. इथून क्रेन शॉट सुरू होतो. महाल एका डोंगराच्या कड्यावर असतो. तिन्ही बाजूला खाई. मधेच एक निमुळता पट्टा. चौथ्या बाजूला एकच एक अरुंद पूल जो पुढच्या डोंगरातल्या बोगद्यात शिरतो. तो पलिकडे गोल गोल घाटाला जोडला गेलेला असतो. (इतक्या वर बांधकाम साहीत्य कसे पोहोचवले अशा शंका विचारणार्‍यांना आपल्या टीम मधून वगळा. प्राचीन काळी शास्त्र अत्यंत प्रगत होते. खाली एक विंच सारखे मेकॅनिझम असायचे. त्याला आताच्या स्प्रिंगच्या ऐवजी लवचिक अशा फायबरच्या पानांचा स्त्राव ( एलियन्सच्या दाखवतात तसला चिकट स्त्राव) लावलेला असायचा. विंचला एक मोठी पळी जोडलेली असायची. या पळीत दगड ठेवायचा. पळी लांबलचक दोरखंडाने खाली ओढायची , ताणली कि स्त्राव ताणला जायचा आणि सोडून दिली कि दगड अज्जात डोंगराच्या शिखराच्या वर हवेत. तिथून पुढे पॅराबोलिक मोशन मधे तो सुळक्यावरच्या एका फायबरच्या जाळीत झेलला जायचा. त्यात पडला कि कुंतीने स्वर्गातून ऐरावताला खांद्यावर घेऊन अर्जुनाच्या बाणांच्या शिड्यावरून उतरणार्‍या भीमाला शिडी मोडल्याने पडताना अलगद पदरात झेलावे तसे ही जाळी मोठमोठी दगडी झेलून त्यांचा मोमेण्टम शून्य करत आईच्या मायेने जमिनीवर उतरवून घेत. ( हे आपल्याला सीजी द्वारे दाखवायचे आहे).

असा हा देखणा महाल अभेद्य असल्याने या राजाचा अंमल पंचक्रोशीतल्या सर्व राज्यावर होता. (इथे एक भला मोठा नकाशा दाखवायचा आहे. पण हा नकाशा बघताना आताच्या भारतातला नेमका कोणता भाग हे कधीच समजले नाही पाहीजे. दक्षिणेच्या प्रेक्षकाला तो आंध्र, तमिळनाड, कर्नाटक , केरळाच्या सीमेवरचा वाटायला पाहीजे, तर उत्तर भारतियांना तो राजस्थान, हिमालय, बंगाल असा कुठेही वाटला पाहीजे.

तर या राज्यात एक राजा राज्य करत असतो. प्रजा किती आनंदात असते हे दाखवण्यासाठी सुरूवातीलाच एक आयटम साँग दाखवले आहे. टू पीस मधे नाचणार्‍या नर्तकींनी पायात पारदर्शी विजारी नेसलेल्या आहेत, नाचरे पुरूष उघड्या अंगाने जंगली जनावराच्या शि़कारीच्या कपड्याची मांडीच्या इथे फाडलेली लुंगी (आठवा सदमा मधली सिल्क स्मिताच्या ड्रीम सिक्वेन्समधे कमलने नेसलेली जंगली शॉर्ट्स ) नेसून डान्स करत असतात. मागे मोठ मोठ्या नगार्‍यावर काही सुंदर स्त्रिया नाचत असतात पण मुझिक मधे तर ड्र्मबीट्सचा आवाज येत असतो.

राजा राजवाड्याच्या गवाक्षात येऊन प्रसन्नपणे नाणी खाली फेकत असतो. आमच्या सोसायटीत खाली दहीहंडीची गडबड सुरू झाली कि पब्लीक गवाक्षात येऊन विरोध करतं. मैदानात जा म्हणतं. ( इथे तुम्ही पाईपमधे राहता मग सोसायटीत कसे काय ही शंका विचारणार्‍या क्युट पब्लीकला आसामची दहा गावे बक्षीस).

हा काळ कोणता हे नेमके समजले नाही. पण आजूबाजूच्या राज्यातल्या दुष्ट राजांची आपसात युती होत असते. पहिल्या गाण्यातच कथानक बिल्ड व्हायला सुरूवात होते. आजूबाजूचे राजे कपट कारस्थान करून सम्राटाच्या गावापासून दूर एका जंगलात शिकारीचा कार्यक्रम आखतात. त्याचे निमंत्रण घेऊन सर्व राजे राज्यात येतात तेव्हांही स्वागत गीत, डान्स कॉम्पिटिशन, युद्धकलेच्या स्पर्धा भरवल्या जातात. यात डान्समधे पहिली आलेली सुंदरी अनुष्का शेट्टी हीस गोल्ड मेडल देण्यासाठी जय शहा आलेले दाखवले आहे. तर युद्धकलेत पहिले आलेले दोन युवक ऋत्विक रोशन आणि प्रभास हेच चित्रपटाचे नायक आहेत हे आपण ओळखलेच असेल.

या दरम्यानच द्रोणाचार्यांचे आगमन होते. ते सम्राटाला सावधगिरीचा इशारा देतात. त्यांना चाणक्याने खबर दिलेली असते की बाहेस्मती (याचाच अपभ्रंश पुढे बारामती झाला असे विकीपीडीयात लिहीले आहे) राज्याच्या विरोधात कटकारस्थान चालू आहे तरी आपण जाऊ नये. सम्राट खलीबली गंभीर होत विचारतात कि चाणक्यमंडळाची बातमी म्हणजे गंभीर आहे. पण त्यांचा सोर्स ? यावर द्रोणाचार्य सांगतात "महाराज स्वतः नादरमुनींनी ही बातमी त्यांना दिली आहे "

महाराज यावर खळखळून हसतात. म्हणजे सूत्रांच्या हवाल्याने म्हणताय का ? माझा कधीही सूत्रांवर विस्वास नव्हता. तरीही द्रोणाचार्य म्हणतात कि महाराज मर्जी आपली. गरज लागलीच तर मी अर्जुन आणि भीमाला सांगून ठेवतो. महाराज त्यावर धन्यवाद म्हणत , त्याची गरज पडणार नाही असे सांगतात.

पण हाय रे कर्मा !
शिकारीच्या दिवशी जंगलात घात होतो.
एका काळवीटाचा पाठलाग ( इथे आपणास स्पेशल इफेक्ट्स दाखवायचे आहेत) करताना महाराज आणि इतर राजे जंगलाच्या आतपर्यंत शिरतात. तिथे औरंगजेब आणि तैमूरलंग जॉईण्ट कोलॅबरेशन मधे दबा धरून बसलेले असतात. ते महाराजांना कैद करतात.

इकडे ही बातमी राज्यात वायूच्या वेगाने पसरते !
पुढे....

नोट : प्रोडक्शनच्या प्रॉपर्टीमधे फायबरच्या सिक्स पॅक असलेल्या बॉड्या, मोठ मोठ्या गलोली, एक भले मोठे धनुष्यबाण जे फिक्स करून उभे केले आहे, त्याच्या बाणाला लटकून एका वेळी शंभर सैनिक पलिकडच्या किल्ल्यात जाऊ शकतात अशा विविध गोष्टींचा समावेश आहे.

तर उचला आता लेखण्या आणि पूर्ण करा ही बाहुबलीचे रेकॉर्ड मोडणारी ऑल टाईम ब्लॉकबस्टर कलाकृती

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दर्जेदार असे बॉलिवूड मध्ये आता काही शिल्लक नाही
बंद झाले तर उत्तम.
हिंदी भाषिक काय दर्जेदार कार्यक्रम देणार.
दक्षिण भारतीय,मराठी ,बंगाली,ओडिशा ह्यांचे सिनेमे हिंदी मध्ये dub करून बॉलिवूड लं दर्जेदार काय असते ह्याची ओळख करणे गरजेचे आहे

राजा राजवाड्याच्या गवाक्षात येऊन प्रसन्नपणे नाणी खाली फेकत असतो.>> इथे काही पब्लीक नाराज दाखवता येईल, बंडखोर म्हणा हवं तर.
दादा.. सॉरी राजा एकाच बाजुला नाणे फेकतात.. आमच्या वाट्याला काही येतच नाही.. बंडखोरांचा नेता म्हणुन शारुकला आणता येईल.

एका काळवीटाचा पाठलाग ( इथे आपणास स्पेशल इफेक्ट्स दाखवायचे आहेत) करताना महाराज आणि इतर राजे जंगलाच्या आतपर्यंत शिरतात. >> काळवीटाची शिकार.. फारच मिळमिळीत होईल. त्यापेक्षा डायनोसॉर मिळाला तर बघा. म्हणजे कसं महाराज पाणघोड्यावर बसून डायनॉसॉर च्या शिकारीला जातात.. असं काही भव्य दिव्य बघा.. आणि शिकारीला निघण्याआधी एक गाणं मस्टच.. शोलेतल्या मेहबूबा मेहबूबा सारखं..

वीरू धन्यवाद. आमच्या पाणघोड्याला काम मिळावे असा विचार मनात आला नव्हता. त्याला काम दिले तर कंगना बाई नेपोटिझम नेपोटिझम करत रील्स बनवेल त्याची भीती वाटते.

वीरू धन्यवाद. आमच्या पाणघोड्याला काम मिळावे असा विचार मनात आला नव्हता. त्याला काम दिले तर कंगना बाई नेपोटिझम नेपोटिझम करत रील्स बनवेल त्याची भीती वाटते.