पहिला पाऊस झाला की कांदा भजी न आठवता भारंग आठवते हल्ली. ह्या वर्षी मुंबईत नसल्याने खाणं काही शक्य नाहीये म्हणून आठवणींवरच समाधान. नक्की वाचा आणि तुमच्या ही ह्या भाजीशी असलेल्या आठवणी शेअर करा.
कडू भारंगीच्या गोड आठवणी
आमच्या लहानपणी एक दोन पाऊस झाल्यानंतर बाजारात टाकळा, फोडशी, वालाचे वेल, तेरं अळू ( एक प्रकारचं रानटी अळू ) कंटोळी , अश्या अनेक भाज्या सहजी आणि स्वस्त मिळत असत आणि घरोघरी त्या केल्या ही जात असतं. त्यांना तेव्हा रानभाज्या हे गोंडस नाव ही मिळालेलं नव्हतं आणि आज जसं5 त्या भोवती एक वलय निर्माण झालं आहे ते ही तेव्हा नव्हतं. एक रुटीन मोसमी भाज्या म्हणूनच त्या केल्या जात असत घरोघरी. हल्ली अक्षरशः सोन्याच्या भावात विकली जाणारी कंटोळ ( शहरी भाषेत करटूलं ) कोकणात आमच्याकडे सड्यावरून गडी दुरडी भरून आणून देत असे. ही विकत घेऊन खायची भाजी नव्हतीच कोकणात. असो
आमची आई पावसाळ्याच्या सुरवातीला बरेच वेळा भारंग म्हणजे भारंगीची भाजी करत असे. आमची जवळच्या खेड्यातून दूध घेऊन येणारी गवळणच आणून देत असे आईला ती. ही भाजी ती कांदा लसूण न घालताच करत असे. कारण दुपारी जेवणात कांदा लसूण नाही, चातुर्मास, एकादशी, सोमवार, गुरुवार असे असंख्य दिवस कांदा लसूण वर्ज्य म्हणून आमच्या बहुतेक रेसिपीज बिना कांदा लसूणच असतात ( कृपया जातीवाचक घेऊ नये , जस्ट खाण्या पिण्याच्या पद्धती / सवयी म्हणून सांगतेय ) .
तर सांगत काय होते ही भाजी आमची आई आदल्या रात्री भिजवलेले आणि सालासकटच शिजवलेले वाल घालून करत असे. मोड न आलेल्या ह्या भिजवलेल्या सालासकट असलेल्या वालाना “ मुके वाल “ असं फार गोड नाव आहे. भारंगीची कोवळी पाने चिरून उकडून घ्यायची, उकडतानाच तिचा एक उग्र असा वास घरभर पसरत असे. उकडल्यावर भाजी घट्ट पिळून त्यातलं पाणी काढून टाकायचं. भाजी हिरवी असली तरी पिळून काढलेलं पाणी चहाच्या रंगाचं डार्क चॉकलेटी असे. नंतर ती भाजी आणि उकडलेले वाल फोडणीला टाकून त्यात मीठ, तिखट, गूळ घालून जरा सारखी करायची, हवं असेल तर साधं पाणी थोडं घालायचं, झाली भाजी तयार.
भारंगीची कोवळी पानं
मुके अर्थात भिजवलेले वाल
आणि तयार भाजी
अशी ही भाजी तेव्हा आम्हा भावंडांना मात्र कोणाला ही अजिबात आवडत नसे. भारंगी म्हटलं की कपाळावर अठी उमटत असे आमच्या. पण त्या काळी पानात वाढलेली भाजी संपवावीच लागत असे. भाजी नावडती आहे तर बटाट्याच्या काचऱ्या वगैरे लाड ही नसतच. अगदीच घास तोंडात घोळायला लागला तर थोडासा गुळांबा मिळे फार तर, पण भाजी खावीच लागत असे. दुसरं म्हणजे आमच्या आईच्या मते ही भाजी फारच औषधी होती. त्यामुळे आम्ही ती खायलाच पाहिजे असं तिला वाटत असे. त्याकाळी पावसाळ्यातील दूषित पाण्यामुळे होणारे पोटाचे आजार ही भाजी खाल्ली की होत नाहीत अशी तिची ठाम समजूत होती.
पुढे उच्च शिक्षणासाठी शहरात हॉस्टेलवर राहणं मग शहरातच नोकरी आणि मधल्या काळात आई ही गेली त्यामुळे आमच्या आयुष्यातला भारंगी अध्याय आम्ही शाळा सोडल्यावर समाप्तच झाला. पण जसं जसं वय वाढू लागलं तसं तसं पहिला पाऊस झाला की कांदा भज्यांऐवजी भारंगी च्या भाजीची आठवण येऊ लागली. एवढ्या वर्षात तिची चव ही खरं तर विसरायला झाली होती पण फोनवर भावा बहिणींशी गप्पा मारताना हमखास भारंगीचा विषय निघू लागला. तिचा तो उग्र वास नुसत्या आठवणीने ही नाकात जायला लागला. भारंगी बरोबरच आमचं ते छोटंसं गाव, तिथलं घर, विहीर, पाऊस, सकाळच्या वेळी साग्रसंगीत पूजा करणारी, हळू आवाजात स्तोत्र, आरत्या म्हणणारी किंवा राम नाम घेणारी आमची आजी, सैपाकघरातल्या सहा इंच उंच ओट्यावर बसून शेगडी आणि स्टोव्हवर सैपाक करणारी आई, शेगडीच्या धुराचा वास, ही भाजी खायला लागू नये म्हणून आम्ही केलेल्या नाना क्लुप्त्या आणि त्याना पुरून उरलेली आमची आई, ओट्याच्या बाजूला बसून जेवणारी आम्ही मुलं हे सगळं सगळं आठवू लागलं आणि भारंगीची भाजी पुन्हा एकदा खाऊन बघण्याची इच्छा दिवसेंदिवस तीव्रच होत गेली.
दोन वर्षांपूर्वी पावसाच्या सुरुवातीला मार्केट मध्ये नेहमीच्या भाजीवाली जवळ एक वेगळी भाजी दिसली. मी कुतूहलाने विचारलं “हे काय ? “ तर उत्तर आलं “भारंगी.” जवळ जवळ झडप घालूनच मी भाजी विकत घेतली. घरी येऊन वाल भिजत घातले. दुसऱ्या दिवशी आईची आठवण काढत, भावंडांना व्हिडीओ कॉल करून गप्पा मारत भाजी केली. आणि नवल म्हणजे सालासकट वालाचे दाणे घातलेली ती थोडी कडसर थोडी गोडसर, थोडी तिखटसर अशी भाजी फारच चविष्ट लागली. मला फारच आवडली. पोळी बरोबर, भाताबरोबर किंवा अगदी नुसती ही खूपच छान लागत होती. जेवण झाल्यावर ही तिची चव जिभेवर रेंगाळत होती म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही.
भारंग खरंच तिच्या वेगळ्या चवीमुळे आवडली की तिच्याशी निगडित आठवणींमुळे आवडली हे सांगणं मात्र कठीण आहे.
हेमा वेलणकर
छान लिहिल्या आहेत आठवणी.
छान लिहिल्या आहेत आठवणी.
खूप छान. तुमच्या आठवणींमध्ये
खूप छान. तुमच्या आठवणींमध्ये मीही रमले.
नेहमीप्रमाणेच सुरेख लेख. छान
नेहमीप्रमाणेच सुरेख लेख. छान वाटले वाचून.
मस्त.
मस्त.
आमच्याकडेही ही भाजी दरवर्षी या दिवसात हमखास. मला आवडायची ही भाजी लहानपणी. म्हणजे अगदी चवीने भरपूर खायचे असं नाही, पण आवडायची.
भाजी पिळून जे पाणी काढतात, तेही पितात. (फोडणी देऊन?) ज्यांना भारंगीची भाजी आवडत नाही, त्यांच्यावर हा जुलूमच. सगळं भारंगीमय त्या दिवशी
मुके वाल तर माझ्या खास आवडीचे. मुक्या वालांची उसळ मला दुसऱ्या दिवशी होणाऱ्या डाळिंब्यांच्या उसळीपेक्षाही जास्त आवडते.
भारंगीच्या भाजीत मुके वाल घालायची आई/आजी की भिजवलेले शेंगदाणे, हे आठवत नाही!
खूप छान लेख.
खूप छान लेख.
मस्त लेख.
मस्त लेख.
मुके वाल म्हणजे नेहमीचेच वाल पण मोड न काढलेले ना? शिजतात लगेच?
लेख वाचताना थोडी गंमत वाटली. माझ्या आजुबाजुला भारंगी फुललीय पण मला भाजी कशी करतात ते माहित नाही. फुलांची भाजी करतात ऐकलेले. इकडे भाजी करतात हे काही जणांना माहित आहे पण कोणी सहसा करत नाही.
खूप छान लेख.
खूप छान लेख.
पावसाळ्याच्या सुरुवातीला भारंगी आणि हिवाळ्याच्या सुरुवातीला मोहरी ह्या दोन भाज्या होतातच. कडवट तुरट असल्या तरी खातो आम्ही. इतर पालेभाज्या असतातच पण वेगळ्या चवीमुळे ह्या दोन भाज्या लक्षात रहातात. तसे तर एका जातीच्या मुळ्याचा पाला, सुरणाचा अगदी वरच्या तुऱ्याचा पाला हेही कडसर असतातच. पण हे पावसाळा स्पेशल नव्हेत. पावसाळा स्पेशल इतर भाज्या म्हणजे फोडशी, चवळीचे आणि लाल भोपळ्याच्या वेलीचे कोवळे तुरे, लाल भोपळ्याच्या कळया, फुले, कोरळा/ कोरळ, कुर्डू , टाकळा, तेरं, अळू, कुड्याच्या शेंगा ह्या खाल्ल्या नाहीत तर पावसाळा साजरा झाल्यासारखा वाटत नसे. पण मुंबईत कुड्याच्या शेंगा मिळत नाहीत आणि अलीकडे टाकळा आणणं सोडलं आहे. केनी आणि टाकळा कुठेही उगवतो म्हणून आणला जात नाही.
कितीतरी गोष्टी आठवल्या तुमच्या लेखामुळे.
ता. क. आदिवासी लोक पोटदुखीवर भारंगीच्या बिया चावून खातात.
नॉस्तॅल्जिआ!
नॉस्तॅल्जिआ!
माझी आई आणि काकू दोघीही कोकणातल्या. त्या अशा मौसमी अनवट चिजा हाती लागल्या की त्यांचं योग्य ते चीज ( ) करून आवर्जून एकमेकींना डबे पाठवायच्या!
औषधी गुणधर्मांच्या
वदंताचर्चा मीही ऐकल्या आहेत. नावडती भाजी आणखीनच नावडायला हवी असेल तरच तिच्या औषधी असण्याबद्दल सांगावं मुलांना - हे कळत नव्हतं या बायांना.माझी आई भारंगी, कुर्डूची फुलं
माझी आई भारंगी, कुर्डूची फुलं, टाकळा असं त्या वेळी जे मिळेल ते सक्तीने खाऊ घालायची. घोळाच्या भाजीतून मात्र, उपाशी ठेवलंस तरी मी खाणार नाही इतकं निक्षून सांगितलं तेव्हा सुटका झाली.
केळफूलाची भाजी, उकडगरे, लसणीची चरचरीत फोडणी घातलेली अंबाडीची भाजी, चिंचगुळाचं अळूचं फदफदं, ऋषीपंचमीच्या भाज्या (भेंडी सोडून) हे सगळं माझं आवडीचा, पण आता फारसं नाही मिळत. आईला पण होत नाही आता.
मस्त मस्त! आमच्याकडेही कधीमधी
मस्त मस्त! आमच्याकडेही कधीमधी होत असे ही भाजी. कोणी मुंबईहून येताना वगैरे आणली तरच घरी येणारी ही भाजी. पुण्यात मिळताना मी तरी पाहिली नाहीये.
भाजी जहर कडू असली तरी खाताना मजा यायची. माझी आई ते भाजी पिळून काढलेलं थोडं पाणी ताकात मिक्स करून (आणि बहुधा त्याला फोडणी घालून) ते ही प्यायला देत असे. तो पण एक भन्नाट प्रकार आहे.
मस्त लिहील्यात आठवणी. एकदम
मस्त लिहील्यात आठवणी. एकदम छान.
गोड आठवणी….
गोड आठवणी….
खुप छान लिहिलय. देवगड आणि
खुप छान लिहिलय. देवगड आणि लांज्याच्या आठवणी आल्या. १४ वर्षे तिथे होतो. आई इथे आली आहे. तिला फोटो दाखवून विचारते.
छान
छान
छानच लेख. आम्ही शुद्ध्
छानच लेख. आम्ही शुद्ध् पुणेकर त्यात जिमखाना वाले त्यामुळे ही भाजी पोस्टासमोर बसली तर कळ णार. आईवडील पक्के देशावरचे त्यामुळे असले काही खावे लागले नाही. पन मी मोने बाईंच्या पुस्तकात वाचले आहे. केनी कुर्डु ची भाजी टाकळा बिया अंघोळीसाठी वाटुन ठेवल्या आहेत हे शनिवारच्या शनी देवासाठी धाकट्या सुनेने केलेले लाड हे कहाणी वाचून माहीत आहे.
खरंच उपयोग व्हायचा का पोट बिघड ण्यावर?
भारंगीच्या बिया पोटदुखीवर औषध
भारंगीच्या बिया पोटदुखीवर औषध म्हणून पूर्वी खाल्ल्या जायच्या इतकेच ठाऊक आहे. कधी स्वतः: घेतलेलं नाही.
बाकी कुडा, अडुळसा/आडाळसा, काढे चिराईत/ किराईत, वावडिंग, सुरपी, मुरुड शेंग, परिपाठ, काटे मायफळ, बेहडा, हिरडा,कोष्ठ कोलंजन, वेखंड हे सर्व लिंपवून, चाटवून, घशात ओतवून, अंगावर ओतवून घेऊन झाले आहे. ह्यातल्या काही वनस्पती आता ओळखायलाही जमणार नाही, पण बऱ्याचशांच्या बाबतीत जमेलही.
सुरेख लेख! यंदा करून बघितली
सुरेख लेख! यंदा करून बघितली पाहिजे यंदा. मुके वाल हा शब्दप्रयोग किती वर्षांनी ऐकला!
आपल्याकडे पूर्वी किती विविधता होती अन्नात आता इन मीन चार भाज्या खातो आपण आलटूनपालटून.
छान आठवणी. नेहमीप्रमाणे
छान आठवणी. नेहमीप्रमाणे आम्हालाही आपापल्या तत्सम आठवणींशी जोडणारा.
छान आठवणी ! मजा आली वाचतना
छान आठवणी ! मजा आली वाचतना
छान स्मरणरंजन !! मुके वाल
छान स्मरणरंजन !! मुके वाल शब्द माहीत नव्हता . आवडला पण
!!
भारंगी च्या फुलांची भाजी केली
भारंगी च्या फुलांची भाजी केली जाते. त्यात गुलाबी आणि पांढरी असे दोन प्रकार आहेत. त्यातल्या पांढऱ्या ची भाजी केली जाते.
मस्त आठवणी आणि प्रतिसाद
मस्त आठवणी आणि प्रतिसाद सगळ्यांचे.
वावे मला ही आवडायची ती उसळ. आमची आई कधी कधी न भिजवता थोडे भाजून घेऊन मग इन्स्टंट उसळ करायची वालाची. ती पण छान लागायची. आई नागपंचमीला विकतचे चणे न आणता घरातली सगळी कडधान्य (वाल, चवळी, मूग, मटकी, मसूर , हरभरे वाटाणे ,जी असतील ती ) भाजून त्याचा प्रसाद करायची. त्याला नागाणे म्हणत. थोडाच मिळायचा प्रसाद हातावर पण ते कुडुम कुडुम खायला मजा यायची. पटकन चावता ही नाही यायचं त्यामुळे भरपूर वेळ पुरायच ही. ☺️
माझ्या आजुबाजुला भारंगी फुललीय पण मला भाजी कशी करतात ते माहित नाही साधना , कांदा लसूण आणि मुके वाल (म्हणजे एक रात्र भिजवलेले , सालं न काढलेले वाल ) घालून करून बघ.
घोळाच्या भाजीतून मात्र, उपाशी ठेवलंस तरी मी खाणार नाही इतकं निक्षून सांगितलं तेव्हा सुटका झाली. >> प्रज्ञा ☺️
नावडती भाजी आणखीनच नावडायला हवी असेल तरच तिच्या औषधी असण्याबद्दल सांगावं मुलांना - हे कळत नव्हतं या बायांना >>> हो ना औषधी आहे , खा खा अस इतके वेळा सांगितलं जायचं की ती भाजी न वाटता औषध आहे असंच वाटत असे.
आदिवासी लोक पोटदुखीवर भारंगीच्या बिया चावून खातात. >> चांगली माहिती.
आपल्याकडे पूर्वी किती विविधता होती अन्नात आता इन मीन चार भाज्या खातो आपण आलटूनपालटून. >> अगदी खरं आहे. वेगवेगळ्या भाज्या तर नाहीच होत पण भाज्या करण्याच्या प्रांतीय आणि जातीय वैशिष्ट्य ही नष्ट होत चालली आहेत. सगळ्या भाज्या सगळे जण एकाच पद्धतीने करतात अस माझं निरीक्षण.
औषधी गुणांबद्दल म्हणजे जास्त विश्वास नाहीये माझा पण असेल ही तथ्य थोडं फार .
सगळ्या भाज्या सगळे जण एकाच
सगळ्या भाज्या सगळे जण एकाच पद्धतीने करतात अस माझं निरीक्षण.>> खरं आहे अनुराधाज किचन मधील आजी पण पनीर बटर मसाला, मशरूम मसाला व पालक पनीर अगदी हाटिल सारखे घरी बनवा म्हणून कायतरी दाखिवते तेव्हा वाइट वा टते.
वाह बुआ !
वाह बुआ !
स्मरणरंजन फारच भावले, हृद्य लेखन आहे अगदी, एक म्हणायला साधीशी भाजी पण आईच्या आठवणी आणि भावंडांच्या सलोख्याचे प्रतीक होऊ शकते हे मानवी संवेदनांचे सौंदर्यच म्हणावे लागेल.
आयुष्यात एकदाही भारंगी खाल्लेली नाही पण मिळाली तर नक्की खाऊन पाहण्यात येईल, अन ती भाजी केल्यावर तुमची आठवण काढली जाईलच, एरवी वाल भिजवून सोलून त्याची उसळ तर भरपूरच खाल्ली आहे.
- (लेखन चाहता) वांडो
छान लेख.
छान लेख.
कालच घेतल्या रानभाज्या,
कालच घेतल्या रानभाज्या,
गंमत म्हणजे काल मला या भाज्या घेताना बघून 4 बायका आल्या (माझ्या पेक्षा15 20 वर्षांनी मोठ्या असतील) आणि ह्या कोणत्या ग,ही कशी करतात,मग ही पण उकडून करायची का??असं विचारत होत्या,कुलू,भारंगा, टाकळा आणि कुर्डु होती, मी प्रत्येकाची रेसिपी सांगितली पटकन..मला जाम भारी वाटलं की मला माहितेय ते यांना माहीत नै, लै म्हणजे लै भारी फिलिंग होत ते
आदू, तुमचा प्रतिसाद वाचून मला
आदू, तुमचा प्रतिसाद वाचून मला रिलेट करता आला. माझ्या एका सुग्ररररण आत्याने (जुन्या नव्या रेसिपींत) मला शेवभाजी कशी करतेस हे विचारल्यावर मलाही लैच भारी वाटलं होतं. अवांतराबद्दल क्षमस्व.
कित्ती सुरेख लेख, छान आठवणी.
कित्ती सुरेख लेख, छान आठवणी. भाजीही छान.
भारंगी ऐकून महितेय, कधी खाल्ली नाही त्यामुळे रीलेट करून शकणार नाही पण चातुर्मास कांदा लसूण विरहित (दृष्टीसही पडायच्या नाहीत ह्या वस्तु घरात), एरवी नवरात्र तसेच बाराही महिन्याचे सोमवार, एकादशीही तशीच हे जाम रीलेट केलं . मातोश्री कट्टर त्याबाबत.
जेम्स वांड, देवकी, आदु अंजू
जेम्स वांड, देवकी, आदु अंजू ..थॅंक्यु so much.
जेम्स वांड प्रतिसाद खूपच आवडला आहे , लिहिताना माझ्या हे लक्षत आलं नव्हतं थॅंक्यु so मच.
आदु देवकी अशी कोण्या खास सुगरण व्यक्तीने आपल्याला रेसिपी विचारली की भारी वाटत खरंच.
अंजू आपल्या कडे भारंगी जास्त पाहिलेली नाहीये , अलिबाग पट्टा रायगड जिल्हा जास्त पॉप्युलर आहे ही भाजी. डोंबिवलीत मिळाली कधी सहज तर ट्राय कर .
छान आठवणी .
छान आठवणी .
Pages