‘इन्स्टा’ आणि एकूणच सोशल मिडीयामुळे स्ट्रीट आर्ट ह्या कलाप्रकाराला चांगले दिवस आले आहेत. प्रवासवर्णन लिहीणारे ब्लॉगर, व्हलॉगर, किंवा ख्यातनाम मंडळी (उर्फ सेलेब्रिटी) हल्ली विविध स्ट्रीटआर्टची चित्रे पोस्ट करतांना दिसतात. आणि तरीही स्ट्रीट आर्ट तसे उपेक्षितच. विचार करा - शेजारची चार-पाच वर्षाची इशिता “मी मोठ्ठी झाले की स्ट्रीट आर्टिस्ट होणार” म्हणाली तर काकूना किती गोरंमोरं व्हायला होईल.
काकूंची ह्यात चूक फारशी नाही. स्ट्रीट आर्टबद्दलचे गैरसमज मुबलक प्रमाणात आहेत. स्ट्रीट आर्टबद्दल गैरसमज कमी व्हावे, थोडीफार रुची वाढावी यासाठी इथे प्राथमिक माहिती संकलित केली आहे. स्ट्रीट आर्ट कशाला म्हणायचं, त्याचे प्रकार, स्ट्रीट आर्टचा थोडा इतिहास, आर्थिक परिणाम, आणि काही स्ट्रीट आर्टस् यांचा समावेश आहे.
(खरं तर स्ट्रीट आर्ट मध्ये सर्व प्रकारच्या कलाकृती समाविष्ट होतात जसे न्यूयॉर्क मधील इन्फ्लेटेबल्स - खालून सब-वे गेली की फुगवता येईल असे शिल्प. पण विस्तारभयास्तव इथे फक्त भित्तिचित्रांची उदाहरणे आणि ऊहापोह आहे).
स्ट्रीट आर्ट कशाला म्हणायचं?
रस्त्यावर दिसलं की म्हणा स्ट्रीट आर्ट इतका ढोबळ उल्लेख कलाकार मंडळी करत नाहीत. उलट विविध प्रकारांसाठी विशिष्ट शब्द प्रचलित झाले आहेत जसे स्ट्रीट आर्ट, पब्लिक आर्ट, ग्रॅफिटी, अर्बन आर्ट, किंवा थेट अगदी “डीफेसमेंट” असे वेगवेगळे शब्द वापरलेले आढळतात. मात्र त्यातील छटांत फरक आहे.
“डीफेसमेंट” शब्द हा सहसा गुन्हा संदर्भाने वापरला जातो. बऱ्याच शहरात सार्वजनिक स्थळांचे स्वरूप कसे असावे याबद्दल नियमावली नि कायदे असतात. यात बरेच वेळा घरांचे रस्त्यावरील दर्शनी भागही येतात (कर्ब अपील!!). अशा सार्वजनिक जागी अशोभनीय काहीबाही चिरखडणे, स्प्रे पेंटींग करणे इ गुन्हा ठरतो आणि त्या संदर्भाने डीफेसमेंट शब्द वापरला जातो.
पब्लिक आर्ट किंवा अर्बन आर्ट सहसा एखाद्या सार्वजनिक किंवा सरकारी संस्थेने कलाकाराला मानधन/मोबदला देऊन (कमिशन्ड) करून घेतलेले असते. यामध्ये जाहिरातींचा समावेश नाही. ह्यात कलाकारांना अर्ज करणे, संकल्पना सांगणे, वेळेवर काम करणे इ चौकटीत काम करावे लागते पण बहुतेक वेळा कलाकारांची याला तयारी असते कारण अशी चित्रे महापालिका काढून टाकत नाही तर उलट ती दीर्घकाळ टिकावी म्हणून प्रयत्न करते. उदा: कोलोरॅडो येथील पब्लिक आर्ट.
साभारः https://www.unco.edu/library/images/art/MosaicPathstoMusic.jpg
स्ट्रीट आर्टमध्ये रस्ता किंवा सार्वजनिक स्थान हे कलाकृतीचा एक भाग असते. जर कलाकृती रस्त्यावरून काढली तर ती निरर्थक वाटली पाहिजे. अर्थात याबद्दल एकमत नाही कारण रस्ता अविभाज्य घटक नसला तरी रस्त्यावर आहे त्याला स्ट्रीट आर्ट म्हणावे हा मतप्रवाह जोर धरतो आहे. स्ट्रीट आर्टला मोबदला बरेचदा नसतो. कलाकार स्वान्तसुखाय म्हणून अशी भित्तिचित्रे काढतात. तसेच स्ट्रीट आर्ट लपून छपून केले जाते तर पब्लिक आर्ट राजरोसपणे करता येते. स्ट्रीट आर्ट मध्ये डीफेसमेन्ट सारखे ‘चिरखडणे’ नसते तर उलट कला म्हणता येईल अशी चित्रे-अक्षरे असतात.
(साभारः https://www.flickr.com/photos/sabeth718/5988108022 )
स्ट्रीट आर्टचे प्रकार
भित्तिचित्रे उर्फ ग्रॅफिटी हा स्ट्रीट आर्टचा प्रकार. ग्रॅफिटी मध्ये अक्षरे ते चित्रे सर्वांचा समावेश होतो. ह्याचे अनेक उप प्रकार आहेत -
- टॅग/ थ्रो -अप/ ब्लॉक-बस्टर - ह्या तिन्ही प्रकारात अक्षरे किंवा शब्द रेखाटलेले असतात. विशेषतः स्वतः चे नाव किंवा एखाद्या विशिष्ट चळवळीचे घोषवाक्य इ लिहिले जाते. टॅग जरा सोपा असतो तर ब्लॉक-बस्टर अधिक रंगीबेरंगी आणि क्लिष्ट असतो.
- ‘हेवन’ - उंच इमारतीवर स्ट्रीट आर्ट करणे. स्ट्रीट आर्ट सहसा लपून छपून केले जाते. त्यामुळे उंचावर जाऊन झटपट चित्र काढणे याला स्ट्रीट आर्ट जगात जास्त मान.
- स्टेन्सिल - स्टेन्सिल आधी तयार करून मग भिंतीवर चित्र तयार करणे. बॅंकसीने हा प्रकार लोकप्रिय केला.
- Piece - तीन किंवा अधिक रंगांचे चित्र रंगवणे. स्ट्रीट आर्ट झटपट उरकायचे असताना असे मोठे चित्र काढणे विशेष कौशल्याचे मानले जाते.
या व्यतिरिक्त ही पोस्टर, स्टिकर इ प्रकार आहेत. स्ट्रीट आर्टचे इतर यार्न बॉम्बिंग, शिल्पकला इ प्रकार ही आहेत.
स्ट्रीट आर्टचा थोडा इतिहास
६०-७० च्या दशकात ग्रॅफिटीची सुरुवात न्यूयॉर्क मध्ये झाली पण लवकरच ते लोण लॉस एंजेलिस, फिलाडेल्फिया इ शहरात पसरले. सार्वजनिक मालमत्तेवर स्प्रे पेंटने स्वतःचे नाव लिहीणे हे विद्रोहाचे प्रतीक होते. एका कलाकाराने ‘टॅग’ केले की त्यावर दुसऱ्या कुणी टॅग करायचे नाही असे अनेक अलिखित संकेत त्याकाळात रुळले. अर्थातच पोलीस अशा टॅग्जची दखल घेत आणि अँटी-टॅग स्क्वाडस कलाकारांना पकडून नेत. मात्र हळूहळू वाईल्डस्टाईल-ब्लॉकबस्टर शैलीच्या सुरेख ग्रॅफिटी येऊ लागल्या.
८०-९०च्या दशकात स्टेन्सिल, स्टिकर, म्युरल अशा विविध प्रकारचे आर्ट अस्तित्वात आले. ह्यातले काही कलाकार “मेनस्ट्रीम” चित्रकारांचे मित्र होते जसे कीथ हेरिंग हा कलाकार अँडी वॉरहोल ह्या प्रसिद्ध चित्रकाराचा मित्र होता. त्याने एच.आय.व्ही बद्दल असलेल्या समाजातील मौनाबद्दल म्युरल्स काढले.
२००० च्या दशकात बॅन्क्सीचा उदय झाला आणि पठ्ठ्याने एकहाती ‘कहानी में ट्वीस्ट’ आणला. त्याची चित्र इतकी लोकप्रिय झाली की आता पोलिसांनी, शहरातील नगरसेवकांनी ग्रॅफिटी पुढे शरणागती पत्करली. उलट वाटाघाटीची बोलणी सुरु झाली. शहरातील मुख्य रस्ते सोडून द्या नि गल्ली-बोळात वाट्टेल तितकी ग्रॅफिटी करा अशा पद्धतीचे तह झाले. गंमत म्हणजे बॅन्क्सीमुळे इतकं घडलं पण जसा बिटकॉइनचा निर्माता कोण ते गोपनीय आहे तसाच हा बॅन्क्सीपण कोण ते माहिती नाही.
भारतात भित्तिचित्रांची परंपरा असली तरी आधुनिक शैलीचे स्ट्रीट आर्ट आता जोर धरत आहे. दिल्ली, मुंबई इ महानगरात चांगले स्ट्रीट आर्ट बघायला मिळाले तरी जागतिक स्तरावर कोचीनच्या ‘गेस हू’ या कलाकाराने आघाडी मारली आहे. एक रोचक भाग म्हणजे जरी स्ट्रीट आर्ट तसे ‘रिस्की’ असले तरी ह्या क्षेत्रात अनेक महिला आहेत. “फिमेल बॅन्क्सी” म्हणून जिचा उल्लेख होतो ती ‘बॅम्बी’, वेक्सता, ऐको अशा अनेकजणी चित्रे काढतात.
आर्थिक परिणाम
स्ट्रीट आर्टच्या आर्थिक परिणामांविषयी प्रतिक्रिया संमिश्र आहेत. स्ट्रीट आर्ट सहसा दुर्लक्षित, काना-कोपऱ्यात, गरीब वसाहतीत केले जाते. पण चांगली ग्रॅफिटी असेल तर बघायला लोक येतात आणि तो भाग सुधारू लागतो (जेण्ट्रीफिकेशन). हे जेण्ट्रीफिकेशन अनेकांना पटत नाही. त्यात हल्ली सोशल मिडीयामुळे हा बदल फार झटपट घडतो आणि तेथील निवासी लोकांना तिथे राहणे परवडेनासे होते. स्ट्रीट आर्टमुळे त्या परिसरातील घरांच्या किंमती साधारण ५% ते १५% सहज वाढतात. मात्र त्यात एखादा बॅंकसी किंवा एडवरडो कोब्रा सारखा कलाकार आला तर भाव अस्मानाला भिडतात. ($८८०,००० चे एक घर कोब्राचे चित्र घराजवळ आल्यावर $२,०७५,००० ला विकले गेलं !!!)
स्ट्रीट आर्ट मुळे परिसरात आर्थिक उलाढाल वाढते जसे कॉफीची फुलांची दुकाने, सुपर मार्केट इ. फिलाडेल्फिया सारख्या शहरात केवळ स्ट्रीट आर्टमुळे $२.७ मिलियन ची उलाढाल होते. जवळ जवळ २५० कलाकारांना रोजगार मिळतो. आकडेवारी उपलब्ध नसली तरी न्यूयॉर्क, लंडन, लिस्बन, आणि मेलबर्न ही शहरे आघाडीवर आहेत.
स्ट्रीट आर्ट उत्पन्नाचे साधन होऊ शकत असले तरी त्याला विद्यापीठात/आर्ट स्कूल्स मध्ये मान्यता नाही. स्ट्रीट आर्ट मूळातच विद्रोही आणि काहीसे उत्सफूर्त असल्याने त्याचे “शिक्षण” विद्यापीठात देणे अवघड. याशिवाय बहुतेक स्ट्रीट आर्टिस्ट हे कामातच रमणारे असल्याने विद्यापीठात विषय शिकवायला आवश्यक प्रोफेसर्स, क्रमिक पुस्तके इ सगळ्याचा अभाव आहेच. अमेरिका, युरोप, इजिप्त, भारत इ सर्व जागी स्ट्रीट आर्ट आढळत असले तरी त्याचा जागतिक स्तरावर संशोधनात्मक अभ्यास अद्याप फारसा झालेला नाही.
सध्या उपेक्षित असले असलं तरी नाविन्यामुळे, वैविध्यामुळे स्ट्रीट आर्ट बद्दल लोकांत रूची वाढते आहे आणि नवीन नवीन स्ट्रीट आर्टिस्ट लोकांसमोर येत आहेत.
मंडळी, कुणी म्हणाल “लंकेत सोन्याच्या विटा! आपण कुठे कोचिन किंवा न्यूयॉर्कला स्ट्रीटआर्ट पहायला जाणार”. खरं तर आपल्या घराजवळच एखादे चांगले स्ट्रीट आर्ट असण्याची शक्यता आहे. आणि नसलं तरी काळजी करू नका. बॉलिवूडने काही चांगली स्ट्रीट आर्टस् बघायची सोय घरबसल्या केली आहे:
‘दिवाना दिल दिवाना’ - ह्यात ७०-८० च्या दशकातील ग्राफिटी बघू शकता.
‘ओ गुजारिया’ - हे ‘पीस’ पद्धतीचे चित्र आहे.
‘सखियां ने मेरे’ - ह्यात ग्लासगो म्युरल ट्रेल मधील बरीच चित्रे आहेत.
‘दिल सरसों दा खेत, है जमीदार तू’ आणि ‘आंख मारे’ - इंटरॅक्टिव्ह आर्ट म्हणून “एंजल विंग्स” काढायची सुरुवात लॉस एंजलिस मध्ये झाली पण लवकरच इतर जागीही ते लोण पसरले.
‘संग तेरे पानियोंसे बहता रहू’ - स्ट्रीट आर्ट काढणारा आणि लाजणारा जॉन… !!!
अजून कुठलं आठवतं आहे?
_______________
संदर्भ:
- https://academic.oup.com/bjaesthetics/article/55/4/481/2195110?login=true
- https://ojed.org/index.php/jise/article/view/1419
- https://graffitocanberra.wordpress.com/styles-of-graffiti/
- https://www.bbc.com/news/blogs-trending-30447979
- https://www.mdpi.com/2071-1050/11/3/580/htm
- https://www.theartstory.org/movement/street-art/
वेगळ्या विषयावरील रोचक माहिती
वेगळ्या विषयावरील रोचक माहिती आवडली.
छान. लेखात स्ट्रीट आर्ट्स आणि
छान. लेखात स्ट्रीट आर्ट्स आणि रॅप यांचा एकमेकांशी असलेला जवळचा संबंध यायला हवा होता असं वाटलं.
मस्त! विस्तृत माहीती बद्दल
मस्त! विस्तृत माहीती बद्दल धन्यवाद!
सध्या रस्त्यांवर अशी चित्रे नुकत्तीच पाहिल्याने रिलेट झाले.
नवीन माहिती.. छान लेख.
नवीन माहिती.. छान लेख.
मराठी सिनेमा आरोनमधे नायिका Paris मधे स्ट्रिट आर्टीस्ट असते आणि तिथं स्ट्रीट आर्ट ban असल्याने लपून राहत असते हे आठवलं.
छान माहिती.
छान माहिती.
रंग दे बसंतीमध्ये अस्लम अशीच चित्रं काढताना दाखवलाय ना? पण ती रस्त्यावर नाहीत बहुतेक.
मस्त माहिती.आता स्ट्रीट आर्ट
मस्त माहिती.आता स्ट्रीट आर्ट जास्त निरखून पाहेन.
<< दिल्ली, मुंबई इ महानगरात
<< दिल्ली, मुंबई इ महानगरात चांगले स्ट्रीट आर्ट बघायला मिळाले >>
भारतात स्ट्रीट आर्ट हा प्रकार फार पूर्वीपासून आहे. लोकांनी लघवी करू नये, पानाच्या पिचकाऱ्या मारू नये म्हणून भिंतींवर देवीदेवतांची चित्रे काढली जातात.
लेखिकेचा हेतू तसा नसेल, पण का
लेखिकेचा हेतू तसा नसेल, पण का कोण जाणे, लेख स्ट्रीट आर्टचे उदात्तीकरण करणारा वाटला.
मस्तच!
मस्तच!
स्ट्रीट आर्ट, पब्लिक आर्ट मला कायम इंटरेस्टिंग वाटतं.
इथे खूप काही स्ट्रीट आर्ट कधी पाहिलेलं नव्हतं. माबोच्या एका दिवाळी अंकात (२०१०) नीधपने 'सेमो म्हणे' नावाचा एक लेख लिहिला होता. स्ट्रीट आर्टबद्दलचा तो मी वाचलेला पहिला लेख जो जरा सविस्तर आणि खोलात जाऊन लिहिलेला होता. (आणि अर्थात मराठीत लिहिलेला, त्यामुळे लक्षात राहिलेला.)
स्ट्रीट आर्ट हा प्रकार मग मनात घर करून राहिला.
२०१९ मध्ये अनुभव मासिकात गणेश विसपुतेंनी या कलाप्रकारावर, पाश्चात्य जगातल्या त्याच्या प्रवासावर लेखमालिका लिहिली. तेव्हा मी त्या लेखांमधले संदर्भ नेटवर शोधून वाचायचे. स्ट्रीट आर्ट म्हणजे vandalism असं सरसकट म्हणता येत नाही, हा त्या लेखांमधला मुख्य मुद्दा माझ्या लक्षात राहिला आहे.
त्याच वर्षी स्कॅन्डेनिव्हियात फिरायला गेलो. जमतील तिथे स्ट्रीट आर्ट चित्रं शोधून मुद्दाम जाऊन पाहिली. विशेषतः ऑस्लोत. ऑस्लोचा Toyen हा भाग त्यासाठी ओळखला जातो. तिथेच स्थलांतरितांची मोठी वस्ती आहे. दोन्हीचा काही संबंध आहे का, त्या भागातच ती चित्रं का, त्यांची शैली कशी, कलाकार कोण, याबद्दल माझं ज्ञान नव्हतं. (अजूनही नाही.) पण ते बघायला फार भारी वाटलं होतं.
फिनलंड, डेन्मार्कमध्ये अशीच काही चित्रं, दगडातली रॉ वाटणारी ३-डी इन्स्टॉलेशन्स/ पुतळे अगदी अचानक समोर आले. काही चित्रांमधले बारकावे, तर काही ढोबळ वाटणारी चित्रं, यांच्यातला फरक वगैरे खूप काही समजलं असं नाही. पण मला ती सगळीच चित्रं आवडली. रॉ पुतळे तर प्रचंड आवडले.
स्वीडनमध्ये गॉथेनबर्ग रेल्वे स्टेशनवर एक फार भारी पब्लिक आर्ट अचानक दिसलं होतं.
८-१० वर्षांची एक मुलगी रुसून, भिंतीत डोकं खुपसून रडणारी. पुतळा फॉर्म होता, म्हणजे ३-डी आर्ट होतं, चित्र नव्हे. चंदेरी, पांढरट एकाच रंगातला. पण बारकावे फार मस्त दाखवले होते.
त्याच वेळी तिथून एक फॅमिली चालत निघाली होती. त्यांतली ८-१० वर्षांची मुलगी तशीच रुसून, मुसमुसत रडत होती. तो योगायोग फार मस्त होता. त्या मुलीमुळे पुतळ्यातली मुलगी रडत असावी असं वाटायला लागलं. कारण नाहीतर पुतळा मुलीचा चेहरा अजिबात दिसत नव्हता.
सॉरी, प्रतिसाद खूप मोठा झाला.
काल रात्री हा धागा पाहिल्यावर मी पुन्हा तेव्हाचे सगळे फोटो पाहिले. आणि हे लिहावंसं वाटलं.
कुमारसर, नीलाक्षी, मी_अनु, उ
कुमारसर, नीलाक्षी, मी_अनु, उ बो प्रतिसादासाठी आभार!!
फिल्मी, खरं आहे रॅप-हिपहॉप इ आणि ग्रॅफिटी याबद्दल थोडे हवे होते पण त्याबद्दल पुन्हा कधी लिहीन. मृ, आता बहुतेक देशात स्ट्रीट आर्ट बॅन नसतो. म्हणजे काढायला एक विशिष्ट परिसर असतो, तिथे ओके पण अन्यत्र नाही. वावे, मलाही पुन्हा बघावा लागेल "रंग दे"
ललिता-प्रीति, मस्त पोस्ट! नी
ललिता-प्रीति, मस्त पोस्ट! नी नेहमी दोन पावले पुढेच असते तिने १२ वर्षापूर्वी लेख लिहीला ऐकून I was not surprised त्या काळात स्ट्रीट आर्टला नुकतीच मान्यता मिळू लागली होती. स्ट्रीट आर्ट मध्ये त्या त्या देशातील समस्या बर्याच वेळा दिसतात. त्यामुळे ऑस्लो मध्ये वेगळी शैली आणि इतरत्र वेगळी शैली असणे अगदी शक्य आहे. तितका बारीक अभ्यास माझाही नाही. स्कल्पचर्स पेक्षा बँक्सी सारखी स्टेन्सिल भित्तीचित्रे समजायला सोपी वाटतात. अर्थात जसं जसं जास्त बघणे होईल तसं तसं स्कल्पचर्स इ पण समजू लागतील अशी आशा आहे.
हो, बॅन्क्सीची चित्रं मलाही
हो, बॅन्क्सीची चित्रं मलाही आवडतात.
निर्वासितांवरच्या लेखनादरम्यान मी एक लेख अशा पब्लिक आर्टवर लिहिला होता. तेव्हा त्या समस्येच्या संदर्भाने शोधाशोध केली होती. तिथेही बॅन्क्सीची एक्सप्रेशन्स आघाडीवर आहेत.
वा, माहितीपूर्ण लेख, मलाही
वा, माहितीपूर्ण लेख, मलाही आवडतं भित्तिचित्रं बघायला. (काढायला ही आवडेल.) ललिने उल्लेख केलेला नीधप चा लेख शोधून वाचायला पाहिजे.
सीमंतिनी, उत्तम लेख. स्ट्रीट
सीमंतिनी, उत्तम लेख. स्ट्रीट आर्ट बद्दल फार छान माहिती दिली आहे.
यूरोप मधे खुप ठिकाणी सुंदर आर्ट पहायला मिळाली, पण मी बर्लिन वॉल वरची हजारो लोकांनी काढलेली चित्रं, अक्षरं आणि एकुणच ती रंगीबेरंगी वॉल पाहुन मी भारावून गेले होते. (वॉलच्या इतिहासाचा परिणाम). आणि दुसरं देशातील उदाहरण, बांद्रा मधील चॅपेल रोड आणि परिसरातील म्युरल पेंटिंग्ज (by रणजित दहिया). इरफान खानचं तर विशेषच आवडलं. लहान असताना पुणे स्टेशनजवळ रस्त्यावर शंकराचं चित्रं पाहिलं होतं. तो आर्टिस्ट आणि त्यावर लोकांनी केलेला पैशांचा वर्षाव खुप वर्ष लक्षात होता आणि मग तसच रस्त्यावर काढलेलं चित्र बेल्जियमला पाहिलं. तिथे hat मधे पैसे पडत होते, एवढाच फरक. दोन्ही कलाकारांची बाजुचे प्रेक्षक विसरून चित्र रंगवण्यातील तन्मयता अगदी समान होती.
Curb appeal वाचुन आठवलं ते युरोप मधील घरं. बैठी घरं असतील तर मुख्य दाराजवळ केलेली सजावट, मूर्ती, खेळणी, सायकल किंवा काहीही आकर्षक शेपचे फुलांचे stands असं काहीबाही असतंच आणि बिल्डिंग असेल तर बाल्कनीतुन बाहेर लटकणारी फुलं. (मलेशियात लिटिल इंडिया भाग बाल्कनीत वाळत घातलेल्या अतोनात कपड्यांमुळे पटकन ओळखता आला ) आणि तिथुन दोनच दिवसात प्रागला गेल्यावर चार्ल्स ब्रिजवर शिरताना छोट्याशा बिल्डिंगच्या बाल्कनीतुन डोकावणारी भरगच्च फुलांची रोपं पाहिल्यावर किंचित खेद वाटला होता.
नीधप चा लेख कुठे होता. तो ही शोधून वाचायला आवडेल.
छान लेख.
छान लेख.
छान लेख!
छान लेख!
नीधप चा लेख कुठे होता. तो ही शोधून वाचायला आवडेल. >>>> https://vishesh.maayboli.com/diwali-2010kaj/762
छान लेख. हे एवढे प्रकार
छान लेख. हे एवढे प्रकार वर्गीकरण माहीत नव्हते. दंडणीय गुन्हा हे ऐकूनही कौतुक वाटले. कारण स्ट्रीट आर्ट म्हणजे एखादी जागा दिसायला मुद्दाम रंगवलेल्या भिंती असेच समजायचो. ईथे वाशीला सागरविहारला जातानाच्या रस्त्यावर छान भिंती रंगवल्या आहेत. मला फार आवडतात त्या. फोटो असल्यास शोधतो गूगलवर.
हे हौशी लोकांचे विडिओ सापडले
https://www.youtube.com/watch?v=b7hjzxHpR38
https://www.youtube.com/watch?v=ieFX4iRzGog
पराग... :thumbs-up:
पराग... :thumbs-up:
काल मला लेख सापडला नाही. (किंवा मला शोधता आला नाही.) नाहीतर तिथे लिंकच देणार होते.
ते न्यूयॉर्कमधले इन्फ्लेटेबल्स पाहिले. काय एक एक भारी विचार करतात कलाकार !!
वाशीची भिंतही इंटरेस्टिंग आहे
वाशीची भिंतही इंटरेस्टिंग आहे. त्यांतली काही चित्रं आवडली.
पराग... :thumbs-up: >> +१०० ;
पराग... :thumbs-up: >> +१०० ; धनुडी, लंपन - थँक्यू.
मीरा.. - छानच पोस्ट, विशेषतः बर्लिन वॉल. लिटील इंडिया वाचून तनु वेड्स मनु रिटर्न्स मधली कंगना आठवली - पहले ये साऊथ हॉल मे रहता था जहां लोगोंके कच्छे बाहर सुखते थे
ऋन्मेष - वाशीची भिंत खासच. त्यावर ३ चित्रे खरंच फार सुरेख आहेत. एक एंजलविंग्ज, दोन - दि क्रिएशन ऑफ अॅडम्/अॅटम (हे मायकलेंजलोच्या चित्रावरून केलेले टेक व्हर्जन आहे.) आणि तिसरे एक ब्लॅक अँड व्हाईट म्हातारा आहे. कॅमस्केल म्हणून एक ऑस्ट्रेलियन आर्टीस्ट आहे तो अशी चित्रे काढतो. अशा वर्ल्डक्लास गोष्टींना भारतात वृत्तपत्रात, टूरिझम ब्रोशूअर्स इ वर का प्रसिद्धी देत नाहीत? बिचारे आर्टीस्ट स्वतःच यूट्यूबवर टाकत आहेत
छान विस्तृत माहिती.
छान विस्तृत माहिती.
मुंबईत काळया घोड्याला तिथल्या उत्सवकाळात अशी छोटी चित्रे पाहिली आहेत.
बाकी भित्तीचित्रे अनेकदा पाहायला मिळतात. मध्यंतरी रेल्वे स्टेशन्सचे जिने, पायऱ्या,बाजूचे बंदिस्त कठडे असे चितारले गेले होते. गंमत म्हणजे त्यांचे फोटो असेच फिरत फिरत आमच्या काही परदेशस्थ नातलगांपर्यंत पोचले आणि काही दिवसांनी त्यांच्याकडून माझ्याकडे. पण तोपर्यंत प्रत्यक्ष चित्रे मात्र पुसून आणि विटून गेली होती.
मुंबईत रस्त्यांवर रांगोळ्या मात्र अनेकदा दिसतात. बहुतेक वेळा देवी देवतांचीच चित्रे असतात. आणि भली मोठी असतात. पूर्ण गल्ली व्यापलेली असते. जमिनीवरच्या रांगोळीला स्ट्रीट आर्ट म्हणता येईल किंवा नाही हे माहीत नाही. पण रांगोळी म्हणजे सफेद दगडाचा ( कदाचित संगमरवराच्या उरलेल्या तुकड्यांचा) चुरा. तो जड असतो. आणि वाऱ्याने, वर्दळीमुळे तो बाजूच्या पर्जन्यवाहिन्यांत ढकलला जातो. शेकडो किलो दगडपूड अशी गटारात पडू नये असे वाटते.
पूर्वी गुणवंत मांजरेकर नावाचे कलाकार उत्कृष्ट रांगोळ्या काढायचे.बारीक बारीक तपशील आणि छटा सुंदर दाखवायचे. ह्या रांगोळ्यांचे बंदिस्त सभागृहात प्रदर्शनही असायचे.
लेख आवडला.
सुरेख लेखन. वाचनीय लेख.
सुरेख लेखन. वाचनीय लेख.
युरोपात पहिल्यांदा ओळख झाली, तेव्हा हा प्रकार अपील झाला नव्हता, नीटनेटक्या जागा कशाला विद्रूप करतात असे वाटले होते. पुढे न्यूयॉर्क, बर्लिनच्या भिंती आणि काही कलाकारांमुळे त्यामागचे artistic intent वगैरे समजले.
आपल्याकडे भारतात हे आर्ट फारच बाळबोध लेव्हल ला आहे असे माझे मत.
तुम्ही फार छान आढावा घेतलाय, समग्र.
मस्त लेख सी! पण मला शीर्षक
मस्त लेख सी! पण मला शीर्षक नीट समजले नाही
Austin मध्ये हा प्रकार भरपूर ठिकाणी आहे.. फोटो काढून घ्यायला छान जागा असतात या! गुगल वर शोधले तर एक मस्त लिंक मिळाली Austin मधल्या सगळ्या Street arts ची - https://do512.com/p/street-art-in-austin
हिंदी सिनेमात इतक्यात गली बॉय मध्ये कल्की बरोबर एका रात्री ते रंगांचे स्प्रे घेऊन बाहेर पडतात तो सीन आठवला.
Netflix च्या The half of it सिनेमात street art चा छान वापर केला आहे.
ऑस्टिन स्ट्रीट आर्ट कसलं भारी
ऑस्टिन स्ट्रीट आर्ट कसलं भारी आहे!!
मला आता स्कॅन्डिनिव्हियातले फोटो टाकायचा फार मोह होतोय.
पराग, नीच्या लेखाच्या
पराग, नीधप च्या लेखाच्या लिंकसाठी आभार.
सीमंतिनी, धन्यवाद.
मुंबईकर, बांद्रा आणि ठाणे व्यतिरिक्त अजुन कुठे काही भारी कलाकृती माहित असेल तर इथे लिहित जा.
मीरा.. ही इर्फानची लिंक https
हीरा, रांगोळी व पाऊस असा विचार डोक्यात कधी आला नव्हता. रांगोळी स्ट्रीट आर्ट होईल बहुतेक. अनिंद्य, धन्यवाद. भारतातील स्ट्रीट आर्टला प्रोत्साहनाची गरज नक्की आहे.
जि, लेखात प्राथमिक माहिती आहे म्हणून स्ट्रीट आर्ट १०१ असे काहीसे शीर्षक मनात होते. पण "१०१" ही संकल्पना तशी मराठी नसल्याने बाळबोध म्हणून जसं स रे समईचा म्हणतो तसं स रे स्ट्रीट आर्टचा. अर्थात मूळाक्षरे शिकवताना स रे सदरा, समई इ पूर्ण स असलेले शब्द वापरतात. असं स्ट्री जोडाक्षर वापरणे हा माझा माफक विद्रोह
मीरा.. ही इर्फानची लिंक https://www.cntraveller.in/story/irrfan-khan-mural-lives-street-mumbai-n...
ललिता-प्रीती, असतील तर दे की फोटो... हे पडतं फळ आज्ञा देतंय बघ तुला...
#नॉटस्ट्रीटार्ट
सी, अच्छा! आत्ता कळलं.. माझं
सी, अच्छा! आत्ता कळलं.. माझं मला नसतं कळलं हे!
हे आमच्या शहरातले... ला
लेख आवडला. Filmy+१
हे आमच्या शहरातले... ला कांटेरा पार्कवे ला
फारच सुरेख आहेत.
हे कोबी ब्रायंटचे, त्याचं जाणं फारच धक्कादायक व अघटीत होतं. तेव्हा बऱ्याच ठिकाणी त्याचे म्युरल्स काढलेले होते. हे एल ए चे
Love Kobe_/\_
#www.kobemural.com
#https://www.discoverlosangeles.com/things-to-do/discover-kobe-bryant-mur...
हे San Antonio downtown
Rap Stars.., Nas, Eminem, Big Pun, Pimp C, Andre 3000 and Big L.
हे आणखी काही मुलांच्या पार्क मधले
अस्मिता, सुरेखच आहे हे!!!
अस्मिता, सुरेखच आहे हे!!! कोबे खरंच _/\_
डायनासोर पण मस्त आहे.
अस्मिता, भारी चित्रे सगळीच..
अस्मिता, भारी चित्रे सगळीच..
Pages