वेगळे मराठी / हिंदी / इतर प्रादेशिक चित्रपट

Submitted by श्रीधर अप्पा on 25 May, 2022 - 21:28

तमिळ मधे होत असलेल्या वेगळ्या वाटेच्या चित्रपटांची दखल घ्यावी हा मूळ हेतू होता. पण मायबोलीवर चित्रपटाची उत्तम जाण असलेले बरेच जण आहेत त्यांच्या लेखणीमुळे मराठी, बंगाली, मल्याळम तसेच हिंदीतही असे चित्रपट मोठ्या संख्येने बनत आहेत हे लक्षात आले. अशा चित्रपटांची दखल घेण्यासाठी हा धागा.

वेगळे याचा अर्थ पॅरलल इतकाच मर्यादीत नाही. चित्रपट ही कला मानून बनलेले व्यावसायिक / कलात्मक असे सगळेच चित्रपट . या धाग्यावर मसाला चित्रपटांना स्थान न दिले तर बरे होईल. त्यांना तद्दन व्यावसायिक म्हटले जाते. अचाट क्षमतेचा नायक हा पडदा व्यापून उरतो हे राजेश खन्ना , अमिताभ बच्चनने सुरू केलेले ट्रेण्ड्स सगळीकडेच पोहोचले आहे. दक्षिणेत तर नायकाला मॅटिनी आयडॉल म्हणतात. त्याची देवळे असतात. ते राजकारण सुद्धा करतात. त्यांच्या गल्लाभरू चित्रपटांनाही इथे स्थान नको द्यायला. गल्ला एव्हढा एकच निकष न लावता जे चित्रपट बनतात अशांचा आपल्याला इथे विचार करता येईल.

भवानी भिवई, मिर्च मसाला सारख्या चित्रपटांनी लयाला गेलेल्या गुजराथी चित्रपटसृष्टीला ओळख दिली. एक चांगला दिग्दर्शक दिला.
तर श्वास पासून मराठी चित्रपटसृष्टीने मोकळा श्वास घेतला असे म्हटले जाते. खूप वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट येऊ लागले. पण एव्हढ्या मोठ्या संख्येने तयार होणार्‍या मराठी चित्रपटांना पडदा मिळत नसल्याने ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचले नाहीत. याबद्दल काही चित्रपट विश्लेषक मराठी चित्रपट निर्मात्यांनाही दोष देतात. मराठी चित्रपट निर्माते प्रमोशन्स, मार्केटिंग आणि चित्रपटाचा रिलीज याचा विचारच करत नसल्याने त्यांना फटका बसत होता. झी सिनेमा सारख्या संस्थांनी जे चित्रपट बनवले त्यांना आर्थिक पाठबळ असल्याने ते गाजले.

इतर भाषांमधे तयार होणार्‍या चित्रपटांना त्या त्या राज्यातला प्रेक्षकवर्ग पाठिंबा देतो. पश्चिम बंगाल या राज्यात सुद्धा अनेक प्रायोगिक चित्रपट तयार होतात. इथे हिंदी बोलणारे कमी असल्याने बंगाली चित्रपटांना प्रेक्षकवर्ग आहे. बंगाल आणि महाराष्ट्र इथल्या चित्रपटांमधे एक साम्य आहे. या दोन्ही इंडस्ट्रीज स्टारडम वर चालत नाहीत. कंटेण्ट वर भर असतो. प्रयोगांसाठी रिस्क घेतली जाते.

तमिळ मधे कर्णन, असुरन सारख्या चित्रपटात धनुष हा स्टार काम करतो. त्याच्या स्टारडमचा फायदा या चित्रपटांना होतो. हे चित्रपट भारतीय चित्रपटांच्या इतिहासात वेगळे आहेत. जयभीम सारख्या चित्रपटात सूर्या हा सुपरस्टार कामच करत नाही तर तो निर्माता आहे. दक्षिणेचे सर्वच चित्रपट पुष्पा, केजीएफ सारखे तद्दन व्यावसायिक नसतात. मात्र अशा चित्रपटात सुद्धा स्टारडमला पर्याय नाही हे दुर्दैव आहे.

याचप्रमाणे हिंदी बेल्ट मधे बनणारे आयुष्यमान खुरानाचे चित्रपट वेगळे आहेत. बरेली कि बर्फी हा उत्तरेतल्या छोट्या शहरांचा चेहरा आहे. अशा चित्रपटांनी भारतातल्या वेगवेगळ्या भागाचा फ्लेवर आणला आहे. आर्टिकल १५ सारखा चित्रपट आयुष्यमान खुराना करतो. राजकुमार राव हा ही वेगळ्या चित्रपटातून पुढे आला आहे. गँग्ज ऑफ वासेपूर हा एका विशिष्ट भागाच्या दबंग कल्चरचे दर्शन घडवतो. हिंसाचार बॉलीवूडला नवीन नाही. पण तपशीलाने त्या भागाचे राजकारण हा चित्रपट मांडतो.

मराठीत संगीत नाटके मोठ्या पडद्यावर आली. बालगंधर्व सारखा चित्रपट सुबोध भावेने पडद्यावर आणला. काशिनाथ घाणेकर आणला. हे बायोपिक उत्तम होते. कट्यारने तर परदेशातल्या लोकांची सुद्धा मने जिंकली. एलिझाबेथ एकादशी, एक उनाड दिवस, श्वास, देऊळ, नटसम्राट, हायवे एक सेल्फी, जोगवा, शाळा, हरिश्चंद्राची फॅक्टरी, काकस्पर्श असे अनेक चित्रपट वेगळे आहेत. यातले अनेक यशस्वी ठरले. तर काहींना स्क्रीन मिळाली नाही. किंवा प्राईम टाईम न मिळाल्याने लोकांपर्यंत पोहोचले नाहीत.

नीळकंठ मास्तरची गाणी गाजली पण चित्रपट म्हणावा इतका गाजला नाही. अशा चित्रपटांची संख्या वाढल्याने त्याचा परिणाम निर्मितीवर झाला आहे. अलिकडे त्यामुळेच बायोपिक किंवा ऐतिहासिक चित्रपटाकडे चित्रपट व्यावसायिक वळताना दिसत आहेत. प्रेक्षक म्हणून मराठी रसिकांनीही हातचे राखून पाठिंबा दिल्याने एके काळी सर्वाधिक प्रयोग होत असलेली इंडस्ट्री अशी तयार झालेली ओळख आता पुसली जाईल कि काय अशी भीती निर्माण होतेय. मराठी चित्रपट सृष्टी सुद्धा आता स्टारडम चा विचार करतेय ही दुर्दैवी गोष्ट आहे. चित्रपटामुळे कलाकारांना ओळख मिळते. स्टारमुळे मिळू लागली तर वेगळेपण काय राहीले ?

इथे आपण अशा चित्रपटांबद्दल थोडक्यात बोलूयात.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला आवडलेले वेगळे हिंदी चित्रपट-
1. अतरंगी रे- लहानपणी घडलेल्या घटनांचा मानसिक आघात होऊन सारा एक parallel जग तयार करते...
2. फोबिया- राधिका आपटे चा... सायकॉलॉजिकल थ्रिलर आहे...जास्त डिटेल्स देत नाही..

छान लिहिलं आहे.
मराठीत सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर यांचे दोघी, वास्तुपुरुष, देवराई, दहावी फ, अस्तु इत्यादी सगळेच

चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित 'भेट' आणि 'कदाचित' . मी तरी हे दोनच पाहिलेत.
'भेट'ची कथा थोडक्यात म्हणजे घटस्फोट घेताना विचारांती (एकत्र कुटुंबात मुलाची वाढ चांगली होईल) एक आई (प्रतीक्षा लोणकर) स्वखुशीने लहान (दोनतीन वर्षाच्या) मुलाचा ताबा त्याच्या वडिलांना (अतुल कुलकर्णीला) देते. दोघेही नंतर दुसरी लग्नं करतात आणि त्यांचे संसार चांगले सुरू राहतात. मात्र आईला मनात मुलाची आठवण येत राहते. एकदा तो भेटण्याची शक्यता निर्माण होऊनही तो भेटत नाही आणि मग ती जणू त्याचा ध्यासच घेते. जुना काळ, शहरं वेगवेगळी, त्यामुळे हे अजिबात सोपं नसतं. दुसरीकडे मुलालाही आई कुठे आहे ते समजतं, तो तिला पत्र लिहितो आणि तिला भेटायला बोलवतो. यात त्याचा धाकटा काका (श्रेयस तळपदे) त्याला मदत करतो. यातून अतुल कुलकर्णीच्या एकत्र कुटुंबात तणाव निर्माण होतात. हे सगळं भावनिकदृष्ट्या फार छान उभं केलं आहे. प्रतीक्षा लोणकरचा दुसरा नवरा म्हणून तुषार दळवी आहे. अतुल कुलकर्णीचे मोठे भाऊ-वहिनी म्हणून मोहन जोशी-वंदना गुप्ते, आई दीपा श्रीराम, दुसरी पत्नी म्हणून मंजुषा गोडसे आहे. अर्थात सगळ्यांनी उत्तम कामं केली आहेत. प्रिया बापट बालकलाकार आहे Happy प्रतीक्षा लोणकरच्या मुलाचं काम कुणी केलंय त्याचं नाव माहिती नाही. नागपूर-इंदौर भागातल्या घरातलं वातावरण सुंदर उभं केलं आहे.

'कदाचित' मध्ये अश्विनी भावे, सचिन खेडेकर, सदाशिव अमरापूरकर हे प्रमुख कलाकार आहेत. सदाशिव अमरापूरकरांना पत्नीच्या खुनासाठी जन्मठेप झालेली असते आणि गुन्हा सिद्ध होण्यात त्यांच्या मुलीची साक्ष महत्त्वाची ठरलेली असते. मुलगी बुद्धिमान असते. ती अनाथाश्रमात मोठी होते आणि न्यूरोसर्जन होते. पुढे वीस वर्षांनी शिक्षा संपवून वडील बाहेर येतात आणि मुलीशी भांडायला येतात (की मी खून केला नव्हता, तो एक अपघात होता). मुलीला वडिलांबद्दल तीव्र तिरस्कार असतो, पण त्यांच्याकडून ऐकलेल्या या 'व्हर्जन'मुळे तिचा आत्मविश्वास डळमळीत होतो. शेवट सांगत नाही.
अलीकडे एका पुस्तकाबद्दल वाचलं. नेमकं लेखकाचं नाव लक्षात नाही. पत्नीच्या खुनासाठी जन्मठेपेची शिक्षा भोगून बाहेर आलेल्या एका माजी पत्रकाराचं पुस्तक आहे. ते वाचून मला हा चित्रपट आठवला.

मराठी चित्रपट सृष्टी सुद्धा आता स्टारडम चा विचार करतेय ही दुर्दैवी गोष्ट आहे. चित्रपटामुळे कलाकारांना ओळख मिळते. स्टारमुळे मिळू लागली तर वेगळेपण काय राहीले ? >>

जिथे पैसा, तिकडे कला आणि व्यवसाय दोन्ही आपसूक वळणार हे कटू सत्य आहे. केवळ वेगळेपण टिकावं म्हणून मराठी कलाकारांनी प्रयोग करत रहावे व इतर भाषकांनी स्टारडमच्या मार्गाने पैसा कमवावा हे कुणाला पटेल? जर प्रयोगशील चित्रपट हवे असतील तर मराठी लोकांनी ते डोक्यावर घ्यावेत, त्यांना चांगला मोबदला मिळावा, मग ते करतीलच आवडीने. शिवाय त्यांनी पब्लिकला आवडेल असं बनवलं तरच पब्लिक चित्रपट बघायला येणार. उगीचच कुठल्याही चित्रपटाला, केवळ तो प्रायोगिक आहे म्हणून, परोपकार म्हणून लोक डोक्यावर घेणार नाहीत. त्यामुळे हा दुहेरी रस्ता आहे.

सैराट हे उदाहरण अशा वेळी विशेष ठरते. तो पारंपरिक मराठी चित्रपटांपेक्षा अतिशय वेगळ्या धाटणीचा असूनही भरपूर चालला आणि यशस्वी झाला. मिळत नसलेले प्राइम टाइम ह्या चित्रपटाने पब्लिक डिमांडवर खेचून आणले. आता झी चे कितीही आर्थिक पाठबळ असले तरी प्रेक्षकांना इतक्या मोठ्या संख्येने खेचून आणायला ते पुरेसे नाही. ह्यात कुणी स्टार नाही. हा चित्रपट ऐतिहासिक विषयावर नाही. त्यामुळे वरील कुठल्याच निकषांत न बसूनही हा जोरदार चालला. पण म्हणून काय इतरांनी असेच सिनेमे काढावेत का? अजिबात नाही. शिवाय ते चालतील असंही नाही. जे लोकांना आवडेल ते त्यांना करायलाही आवडेल ना? मग स्टारडम असल्यास वाईट का मानावे?

वावे, पोस्ट आवडली.

हपा - तुमच्या पोस्टमधे आलेले बरेचसे मुद्दे मूळ पोस्टमधे आहेत. प्रायोगिक चित्रपट काढल्यावर प्रेक्षकांनी प्रतिसाद द्यायला हवे हे पण मूळ पोस्ट मधे म्हटले आहे. सैराटला झी सिनेमाचे प्रमोशन होते, शिवाय सोशल मीडीयात या चित्रपटाच्या निर्माता टीमने वेगळा प्रयोग केला होता. मराठी सिनेमाच्या बजेट मधे प्रमोशनचे बजेट धरलेले नसायचे ही फॅक्ट आहे जी तुम्हाला कदाचित माहिती नसेल. इथे जे चित्रपट क्षेत्रातील लोक आहेत ते लिहीतील त्याबद्दल.

त्यामुळे चित्रपट चांगला असूनही लोकांपर्यंत पोहोचला नाही ही खंत आहे. अशा चित्रपटांना उजाळा देणे, माहिती देणे हा धाग्याचा उद्देश आहे.
गल्लाभरू चित्रपट काढावेत कि नाही याबद्दल एक वेगळा धागा आहे. तो या धाग्याचा विषय नाही. गल्लाभरू चित्रपट ही लोकांना लागलेली सवय आहे. श्वास सारख्या चित्रपटांनी ती मोडली हा मुद्दा आहे. मराठी निर्मात्यांना सक्ती करणे हा धाग्याचा विषय नाही. तसे तुम्हालाही म्हणायचे नसेल.

कुठे पाहिले ते लिहा >>> +१

वळू आणि टिंग्या आवडले. देऊळ तरल होता पण वळू इतका नाही आवडला.
हायवे एक सेल्फी बघताना बराच वेळ काय चालले आहे हे समजलेच नाही. चित्रपटाचे शीर्षक पण भरकटवणारे होते. संपताना हा प्रयोग समजला. शीर्षकाचा अर्थ समजला पण ते समर्पक नाही असे मत झाले.
पुणे ५६ कि ५२ अजिबात समजला नाही. पोस्टकार्ड पण नाही समजला. तीन कहाण्या हायवे एक सेल्फी प्रमाणे समान सूत्रात असाव्यात , ते सूत्र सापडले नाही. पुन्हा बघणे झाले नाही. बघायचा आहे.
मसाला राहिलाय बघायचा. एकादशी पण राहिला आहे. या धाग्याने आठवण झाली. बघण्यासारखे बरेच आहे.
अजून एक कुठला तरी मराठी चित्रपट आठवत नाहीये. श्राद्धावर आहे.

सिनेमा सिनेमा, मी तुमच्याच वाक्यावर माझं मत नोंदवलं आहे. शिवाय त्यातले बरेचसे मुद्दे लेखात आलेत असं तुम्हीच म्हणताय, तरी त्या विषयावर इथे बोलायचं नाही का? ठीक आहे. तुमचं इथलं वाक्य घेऊन त्यावर वेगळ्या धाग्यावर माझं मत मांडणं मला जमणार नाही. क्षमस्व.

शिवाय त्यातले बरेचसे मुद्दे लेखात आलेत असं तुम्हीच म्हणताय, तरी त्या विषयावर इथे बोलायचं नाही का? >>> समजले नाही. मुद्दे लेखात आलेत याचा अर्थ त्या मुद्द्यांशी मुद्दलात सहमत आहे असा का घेत नाही आपण ? जे काही सिनेमे चालण्याबद्दलचे निवेदन आहे तो लेखाचा आत्मा नाहीये. हे सिनेमे चालले नाहीत ही खंत आहे हे सांगतानाच न चालण्याचे कारण स्क्रीन न मिळणे आणि प्रमोशन्स न होणे हे दिले आहे. पण तो चर्चेचा विषय नाही हे सांगितले यात वाईट का वाटले हे समजले नाही.

पश्चिम बंगाल मधे प्रसेनजित चटर्जी यांनी गुंडे या यशराज फिल्म्सला ठणकावून सांगितले होते कि तुम्ही तुमची फिल्म हिंदीत रिलीज करा. बंगालीत करू नका. बंगाली मार्केट इथल्या कलाकारांसाठी आहे. त्याच्या आवाहनानुसार गुंडेचे बंगाली डब्ड वर्जन रिलीज झाले नाही. बंगाली लोकांनी चित्रपट बनवताना हिंदी आणि बंगालीत एकाच वेळी चित्रपट बनवले. त्यात बंगाली कलाकारांनाच जास्त करून प्राधान्य मिळाले. असे मराठीत होत नाही. मराठी निर्माते मराठीबरोबर हिंदीत चित्रपट बनवत नाहीत अशी अनेक कारणे आहेत. त्यासाठीचा एक वेगळा धागा आहे म्हणून त्यावर लिहूयात असे म्हटले. ही काही सक्ती नाही. तसेच असे म्हणणे हे भावना दुखावणारे कसे ठरते हे ही समजले नाही.
आपल्या विचारांबद्दल आभार.

छान धागा

@ वावे, कदाचित चित्रपटाची जी कथा लिहीलीय तशीच एक कथा वाचलेली. माबोवर का? फरक ईतकाच की त्यात वडीलांच्या डोक्यात केमिकल लोचा असतो त्यामुळे त्यांच्याकडून तो खून झाला असतो. जेलच्या वास्तव्यात उपचार घेऊन त बरे झाले असतात. मुलीने आपल्याला पुन्हा बाप म्हणून स्विकारावे अशी त्यांची ईच्छा असते.

गुजराथी लेखक ध्रुवं भट यांच्या 'तत्वमसि' कादंबरीवर आधारीत 'रेवा' हा सिनेमा मागच्या आठवड्यात पाहिला. सिनेमा गुजराथी असला तरी मोस्टली भाषा हिन्दि, इन्ग्रजी असल्याने चांगला समजतो. नर्मदेकाठच्या आदिवासींचे जीवन चित्रीत केले आहे, सोबतच सिनेमॅटिक लिबर्टी म्हणुन हिरो हिरोईन, थोडी कथानक फोडणी वै आहेतच. नर्मदामैय्याचे सुखद दर्शन मधुन मधुन होत असते. फार आवडला चित्रपट.

https://www.mxplayer.in/movie/watch-reva-movie-online-2e61a950a9e3368e85...
इथे आहे हा चित्रपट.

'भेट' मी थिएटरमध्ये पाहिला होता. आता प्राईमवर आहे. 'कदाचित' शोधला पण ओटीटीवर कुठे सापडला नाही. मी सह्याद्री वाहिनीवर दहाबारा वर्षांपूर्वी पाहिला होता. ऋन्मेष, तू म्हणतोयस ती कथा मला माहिती नाही. पण या चित्रपटात केमिकल लोच्या वगैरे नाहीये.

छान आहे.
सध्या वाचनमात्र. फ्री झाल्यावर येईन पुन्हा.

भेट फार सुरेख, संयत चित्रपट आहे. मध्यंतरी कुठल्या तरी टीव्ही चॅनेलवर सर्फ करताना लागला होता. पूर्ण पाहूनच बंद केला. नाव आत्ता समजले.
हिंदी असता तर पार मेलोड्रामॅटिक करून टाकला असता.

शुभ मंगल ज्यादा सावधान सुध्दा आवडला. टिपीकल उत्तर प्रदेशीय एकत्र कुटुंबातील मुलगा गे असणे, यातून त्याची व कुटुंबाची होणारी कुचंबणा विनोदी ढंगाने मांडली आहे. समलिंगी संबंधांची अतिशय थिल्लर पद्धतीने चेष्टा करणार्या चित्रपटांपेक्षा हा चित्रपट खरा वाटतो. आयुष्मान खुराणाला फ्लॅमबॉयंट भुमिका मिळाली असली तरी खरी कमाल करतात ते जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, गजराज राव, मनु ऋषी चढ्ढा, सुनिता राजभर.

प्राक्तन
बेला शेषे

दोन्हि बेंगाली

शुभ मंगल ज्यादा सावधान मलाही नाही आवडला... त्यापेक्षा बधाई दो जास्त आवडला - विषय सेम आहे गे...
राजकुमार आणि गुलशन ची फर्स्ट मिटिंग चेमिस्ट्री जबरी आहे...

बधाई दो नक्कीच बढिया होता.

एक लडकी को देखा तो ऐसा लगा - हा सुद्धा छान होता. अनिल कपूर, राजकुमार राव आणि सोनम. अपेक्षा नसताना पाहिला आणि आवडला. याच विषयावरचा, नक्की बघा.

मातीमाय -दिग्दर्शिका चित्रा पालेकर
हा एक उत्तम मराठी चित्रपट आहे. तो कुठल्या ओटीटीवर असण्याची शक्यता वाटत नाही. असल्यास नक्की पाहण्यासारखा आहे.

प्रमुख कलाकार अतुल कुलकर्णी आणि नंदिता दास.
हे दोघे नवराबायको असतात. नंदिता दासचे वडील स्मशानात प्रेत पुरण्यासाठी मदत करण्याचं काम वंशपरंपरेने करत असतात. (बहुतेक लहान मुलांचं हे वेगळं स्मशान असतं) त्यांना ही एकच मुलगी असते. वडील गेल्यावर ती हे काम पुढे सुरू ठेवते. तिला या कामाचं सवयीने काही वाटेनासं झालेलं असतं. आणि अगदी रोजच्या रोज काही हे काम करावं लागत नसतं. कारण लहान गाव. पण मग गावात एक साथ येते आणि अनेक लहान मुलांचे मृत्यू व्हायला लागतात. तोवर तिला स्वतःला बाळ झालेलं असतं. नेमका तिच्या मैत्रिणीच्या मुलीचा, जिच्यावर नंदिता दासचा खूप जीव असतो, यात मृत्यू होतो. तिचं अंत्यविधीचं काम हिच्यावरच पडतं. तेव्हा तिला शोकाने आणि वात्सल्याने पान्हा फुटतो. याचा अर्थ अंधश्रद्धेमुळे गावातली माणसं वेगळाच घेतात. ते तिच्यावर चेटकीण ( मला वाटतं लाव की लावसट असा काही तरी शब्द आहे) असल्याचा आरोप करतात. त्यामुळे, आणि स्वतःच्या बाळाला खाली ठेवून इतर मुलांचे अंत्यसंस्कार करायला लागण्याचे प्रसंग वारंवार यायला लागल्यामुळे ती सैरभैर होते. ती कळवळून विनंती करते की मला आता हे काम सहन होत नाही. मला बाळ नसताना मी हे केलं, पण आता नाही जमत. दुसऱ्या कुणीतरी करा. पण गावकरी तिचं ऐकत नाहीत, कारण त्यांच्या मते ते तिचंच कर्तव्य आहे. शेवटी तिला वेड लागायची पाळी येते. तिच्या विचित्र वागण्यामुळे तिच्या चेटकीण असण्यावर शिक्कामोर्तब होतं आणि तिला गावाबाहेर काढलं जातं. एक झोपडी तिला बांधून देतात. नवरा तिला रोज जेवण पोचवतो.
गावाशेजारून एक रेल्वे लाईन जात असते. त्या रेल्वेवर दरोडा घालण्याचा दरोडेखोरांचा बेत ती स्वतःचा जीव गमवून उधळून लावते असा शेवट आहे.

मी हा पुण्यात थिएटरमध्ये बघितला होता. नंतर इथे बंगळूरला कुठल्याशा चित्रपट महोत्सवात परत बघितला होता. तेव्हा चित्रा पालेकरही आल्या होत्या. गिरीश कार्नाडही आले होते बघायला.

प्राईमवर तेलुगू 'गमनम' पाहिला होता.
कमला (श्रीया) कर्णबधीर असते, एका शिलाई कंपनीत काम करते..नवरा बाहेर देशात..काही महिन्यांच्या बाळाला घेऊन एकटी राहत असते.
स्वरयंत्र घ्यायला पैसे जमवेपर्यंत, बाळाला कसं सांभाळत असते? एकदा खूप पाऊस होऊन घरात पाणी येते, दोघे घरात अडकतात,तिथून बाहेर कशी पडते.??.बाहेरदेशात असलेला नवरा परत येतो का?? स्ट्रगलींग स्टोरी..
चांगला सिनेमा.

मातीमाय
https://youtu.be/JfadyUWTJj8

दोनतीन महिन्यापूर्वी पाहिला होता. बघण्यासारखा आहे. नंदिता दासचे उच्चार थोडे लाडिक वाटतात

नीळकंठ मास्तर गजेंद्र अहिरेचा चित्रपट आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातल्या क्रांतीची पार्श्वभूमी लाभलेली प्रेमकहाणी अशी टॅगलाईन असलेला चित्रपट आहे. काळ बहुतेक स्वातंत्र्य मिळण्याच्या अलिकडचा असावा. वातावरणनिर्मिती उत्तम आहे. विश्वनाथ ( ओंकार गोवर्धन) या त्या काळातल्या अनेक ध्येयवेड्या तरूणांपैकी एक. त्याला क्रांतीचा हिस्सा बनायचा असते. तो व्यंकटेश (आदिनाथ कोठारे) च्या टोळीचा हिस्सा बनतो. त्याच रात्री व्यंकटेश त्याची परीक्षा पाहून एका कारवाईत त्याला स्वतःसोबत घेऊन जातो. एका पोलीस ठाण्यावरच्या हल्ल्यात व्यंकटेशला गोळी लागते. तो मरताना त्याच्या होणार्‍या बायकोला यशोदेला (नेहा महाजन) त्याचा निरोप पोहोचवण्याची जबाबदारी देतो.

तिथून विश्वनाथ बैरागी बनून घरी येतो. काही दिवसात रावसाहेब ( किशोर कदम) हा पोलिसात असणारा पण क्रांतीकारकांना मदत करणारा अधिकारी त्याला ताबडतोब पळून जायला सांगतो. दुसर्‍या गावात इनामदारांच्या (विक्रम गोखले) वाड्यात त्याला नीळकंठ मास्तर ही ओळख दिली जाते. यशोदेला खरं काय ते कळवण्याची जबाबदारी त्याच्यावर टाकली जाते. हे क्रांतीकारकांचे केंद्र असते. इनामदार हे ज्येष्ठ क्रांतीकारी असतात. या वाड्यात सगळेच आलबेल नसते. त्यांचा वेडसर पुतण्या कुणालाही चाबकाचे फटकारे मारत असतो. रात्र रात्र चित्रविचित्र आवाज काढत भटकत असतो. त्याची पत्नी बाईसाहेब वाड्याची कारभारीण असते. बाईसाहेब मास्तरला बोलावून घेतात तेव्हां दोघांनाही धक्का बसतो.

बाईसाहेब म्हणजे त्याची बाल मैत्रीण इंदू असते. गरीबीमुळे तिला या वेड्याच्या गळ्यात बांधलेली असते. त्या आधी ती विश्वनाथ वर वेड्यासारखी एकतर्फी प्रेम करत असते. पण तो ध्येयवेडा असल्याने तिला निश्चयाने नाकारत राहतो. तिला कारणही त्याने सांगितलेले असते. तिचीही तक्रार नसते. पण तो गेल्यानंतर तिच्या आयुष्यात उलथापालथ होते ते आता अशा विचित्र परिस्थितीत तो समोर आल्यावर तिचे स्वतःवरचे नियंत्रण सुटते. त्यामुळे अनेकदा तो अडचणीत येईल अशा घटना घडत राहतात . वाड्यातल्या नोकराला त्यांच्या संबंधाचा उलगडा झाल्यावर तो पोलिसांना टीप देतो.
दुसरीकडे यशोदेला तो खरं सांगू शकत नाही. त्याला तिच्याबद्दल काहीतरी वाटत असते. अशी गुंतागुंतीची कथा आहे.

एखादी वळणावळणाने जाणारी कादंबरी असावी तशी कथा आहे. पण १९४० चा काळ पाहिला तर पूजा सावंत (इंदू) इतक्या खुल्या पद्धतीने प्रेम व्यक्त करू शकेल का ? अर्थात कुणीतरी विश्वनाथला तिच्याबरोबर पाहते तेव्हां अपेक्षित प्रतिक्रिया दाखवली आहे. अशा अपेक्षा प्रेक्षक ठेवू लागतो म्हणजे कुठेतरी इतर कामगिरी अपेक्षा वाढवणारी आहे असेही म्हणता येते. (ट्रिपल आर ने स्वातंत्र्य युद्धाची ज्या पद्धतीने अ‍ॅव्हेंजर कथा करून टाकली तसे काही असते तर अपेक्षा ठेवणे बंदच झाले असते).

यशोदेबरोबरचे त्याचे सर्व प्रसंग गोंधळात टाकणारे आहेत. ओंकार गोवर्धन हा मख्ख चेहर्‍याने वावरला असल्याने त्याच्या यशोदेबाबतच्या भावना उघडच होत नाहीत. इथे थोडं लक्ष दिलं असतं तर हा चित्रपट अजून चांगला झाला असता. विश्वनाथच्या भूमिकेत अनिकेत विश्वासरावला घ्यायला हवे होते. त्या मानाने आदिनाथचा चेहरा या चित्रपटात बोलका (सुखद धक्का) वाटला. तो पाहुणा कलाकार आहे. विक्रम गोखले छोट्या भूमिकेत उत्तम काम करतात.

अधीर मन झाले हा चित्रपटाचा युएसपी आहे. या गाण्याचे छायाचित्रण नेत्रसुखद आहे. अनेक दृश्यात सैराट प्रमाणे उत्तम निसर्गदृश्ये दिसतात. अंधारातली थरारदृश्येही परिणामकारक रित्या टिपली आहेत. बारवांवरची दृश्ये किंवा घरातल्या विहीरीवरचे स्नान करताना त्या विहीरीचे दगडी बांधकाम हे तपशील लक्षवेधी आहेत.

अशा कथेचा वेग संथ असू शकतो. त्यामुळे कंटाळवाणा वाटू शकतो. क्रांतीकारक आणि पोलीस यांच्यातल्या चकमकी चांगल्या घेतल्या आहेत.
शेवटी सगळी पात्रे आपापल्या जागी राहतात. ही कथा फिल्मी वळण घेत नाही आणि एका अधुर्‍या शेवटावर ती थांबते.

संदूक
या धाग्यावरच बहुतेक वाचल्याने पाहिला. यातले अष्टपुत्रे हे पात्र आणि घराण्याचा अभिमान, तलवारीच्या शौर्यगाथा हे सर्व संयत खिल्ली उडवत घेतलेले आहे. ज्यांनी कधी कुणाच्या घरात भिंतीवरची तलवार पाहीलेली नसेल त्यांना या गोष्टी रिलेट होणार नाहीत. इतिहासाचा अभिमान, घराण्याचे शौर्य याचे ओझे आजच्या स्वतंत्र भारतातही बाळगणारे लोक आजूबाजूला असतात. अशा सर्व गोष्टी अष्टपुत्रे या पात्राला चिकटलेल्या आहेत. सुमित राघवन हे ते पात्र अपेक्षित इफेक्टने पोहोचवतो. बासू चटर्जी, हृषिकेश मुखर्जी यांच्याप्रमाणेच इथे ट्रीटमेंट दिली आहे. मात्र हे अष्टपुत्रे पात्र वावरते ते स्वातंत्र्यपूर्व काळात. आपल्या घराण्याच्या शौर्याचा ऐतिहासिक वारशाचा जाज्वल्य वगैरे अभिमान पाहिल्यावर एका संघटनेची आठवण नाही झाली तरच नवल. मात्र कुठेच चिमटासुद्धा न काढता संबंधितांच्याही चेहर्‍यावर सूक्ष्म स्मित येईल अशा बेताने गोष्ट सांगितली आहे. कुणालाही चावे न काढता गोष्ट पुढे सरकते. खरं तर व्यक्तीचित्रण हाच या सिनेमाचा आत्मा आहे. गोष्ट आपली नावापुरती. जो जो रॅबिट पण अशाच पद्धतीचा आहे. जर्मनीचा पाडाव ही गोष्ट आपली चवीपुरती आहे.

क्रांतीकारकांच्या बातम्या ऐकून या अष्टपुत्रेची छाती बळेच अभिमानाने भरून येत असते. प्रत्यक्षात मात्र हा सरकारी नोकरी करत असतो. प्रपंच करत असतो. मात्र आपल्याला काही तरी करायचे आहे या भ्रमात वावर असतो. त्याला क्रांतीची स्वप्ने पडत असतात. त्यावरून त्याच्या घरावर अर्धा कब्जा केलेला कुडमुड्या ज्योतिषी (शरद पोंक्षे ) त्याला रोज टोमणे मारत असतो. त्याच्या आदर्श अशा जयहिंद या क्रांतीकारी संघटनेच्या म्होरक्यावर कुत्सित विनोद करत असतो. पोंक्षेंची विचारसरणी खासगीत काहीही असो, ते काम मस्तच करतात.

प्रत्यक्षात जेव्हां जयहिंद संघटना कामगिरीवर चल म्हणते तेव्हां हा बायकोला विचारून, चर्चा करून येतो म्हणतो. आयजीच्या जिवावर बायजी उदार तसेच सैन्याच्या जिवावर छाती फुगवणारे आज आपण बघतो. क्रिकेट टीमच्या जिवावर इतरांशी भांडण उकरून काढणारे सोशल मीडीयात पाहतो. अशांना अष्टपुत्रे हे पात्र खूपच रिलेट होतं. प्रत्यक्षात त्याच्या हातून झालेली कामगिरी आणि पूर्वजांची कामगिरी याचं रहस्य शेवटच्या प्रसंगात उघड होतं.
काही काही पंचेस भारी आहेत. त्याच्या मुलाचं नाव भारत असतं. बायको सांगते पोरगा इतिहासात नापास झाला तेव्हांचा त्याचा प्रश्न..
" काय माझा भारत इतिहासात नापास झाला ?" भारी.
इतर कुणाला आवडो ना आवडो, मला तरी आवडला.

हा धागा खाली गेल्याने सापडत नव्हता. नावही आठवत नव्हते. निवडक दहात टाकून ठेवलाय आता.

Hellaro (गुजराती सिनेमा)
https://www.mxplayer.in/movie/watch-hellaro-movie-online-f2490bd743f840b...

१९७५ सालाच्या आसपास घडणारी कथा - गुजरातमधील एका गावातील दडपलेल्या महिलांच्या गटाला वाळवंटात कोणीतरी एक सापडतो आणि त्यांचे बदलून गेलेले आयुष्य. या महिलांचे जीवन त्यावेळच्या रूढी, प्रथा यांमुळे रुक्ष, नीरस झालेले असते. अशावेळी गावात आलेल्या थोडे शिक्षण झालेल्या नववधूमुळे आणि घडत जाणाऱ्या काही घटनांमुळे जे काही घडते याचं सुरेख चित्रण केलंय. १९७५ च्या आणीबाणीच्या आणि गावातील पुरूषी वर्चस्व या पार्श्वभूमीवर, या महिलांच्या जीवनातले बदल उठून दिसतात. कथा, सादरीकरण, अभिनय, गाणी आणि गरबा नृत्ये सर्व मस्त जुळून आलं आहे.

<https://www.mxplayer.in/movie/watch-hellaro-movie-online-f2490bd743f840b...<<<

काय सुरेख आहे हा सिनेमा. आता पाहिला. त्या कष्टाळु स्त्रीयांच्या नीरस , रखरखीत जिवनात तो अनाहुत ढोलवाला काय येतो. . त्या स्त्रीयांचे जीवनच बदलुन जाते. सुरवातीला त्या नव्या नवरीचे ढोलच्या तालावर पाय थिरकायला लागतात हे फार सुंदर घेतल आहे. कच्छचे ग्रामिण जीवन खुप छान चित्रीत केले आहे.
शेवट अंगावर काटा आणणारा.. सुन्न करुन जातो.

तामिळ चित्रपट "seththumaan" पाहिला. काहीही भडक directional tricks न वापरता, अतिशय subtle पणे समाजातील वैगुण्यावर बोट ठेवले आहे. त्या मुलाची expressions तर भारीच. सर्वांची कामे अगदी सहज वाटतात

मस्त माहितीपूर्ण धागा! इतरांच्या पोस्टही आवडल्या. कदाचित, भेट वगैरे पाहिलेले नाहीत. नीळकंठ मास्तर बहुधा अर्धाच पाहिला आहे. हेल्लारो बद्दल चांगले ऐकले आहे.

असे चित्रपट बघायला आळस झटकावा लागतो. आपल्याला लेझी करमणूक बघायची सवय झाल्यावर सुरूवातीला पेशन्स टेस्ट करणारे पण प्रत्यक्षात चांगले असणारे असे पिक्चर बघायला खास प्रयत्न करावे लागतात असे मला जाणवले आहे Happy

ह.पा. लिहीत राहा. थोडेफार ओव्हरलॅपिंग झाले तरी हरकत नाही.

वळू आणि टिंग्या आवडले. देऊळ तरल होता पण वळू इतका नाही आवडला. >>> मला देऊळ व टिंग्या आवडले. वळू मधे आवर्जून केलेले विनोद फार खास नाहीत पण पात्रांच्या संवादांमधून आपोआप होणारे विनोद जास्त आवडले.

'जयभीम' (बहुधा ओरिजिनल तमिळ) चांगला होता. पूर्वी अनुष्का वगैरे बरोबर नाचणारा तो सूर्या हाच का हा प्रश्न पडला. मराठीत "रेगे" आणि "मुळशी पॅटर्न" हे दोन्ही गुन्हेगारीबद्दल चांगले आहेत.

वळू बद्दल फा शी सहमत.

पाँडीचेरी हा सिनेमा अर्धवट राहिला पहायचा. सुंदर लोकेशन्स, लक्षवेधी भित्तीचित्रे, फोटोग्राफी, पाँडीचेरीचे रस्ते, वैशिष्टपूर्ण घरं हे आवडले होते. वेगळा आहे. कुणी पूर्ण पाहिला असेल तर कळवा.

मी ट्रेलर बघितला होता पॉंडिचेरीचा. दिग्दर्शक सचिन कुंडलकर आणि साडी नेसून सायकल चालवणारी सई ताम्हणकर पाहून मला 'वजनदार' आठवला Lol पण हा चित्रपट चांगला असेल तर बघायला मलाही आवडेल.

Pages