(जुन्या मायबोलीवर प्रकाशित)
"नक्श फ़रियाsssssदी है किसिकी शौखी-ए-तहरीर का
कागजी है ....."
"पैरहन हर पैकर-ए-तसवीर का....
सुभानल्ला, क्या बात है, क्या बात है"
मी माझ्या अफाट उर्दू उच्चारात त्यांनी सुरू केलेला शेर पूर्ण केला. आता मला वेळ काढायला कुणी हवं होतं असं नाही पण एकूण माहोल "कुछ शायरी हो जाय...." वाला. माहोल म्हणजे माझा माहोल....
ऑफिसच्या कामासाठी मी मुंबईत होतो. वरळी सीफेस वर रात्रीच्या ११ वाजता निरुद्देश भटकणे हा काही विरंगुळा होऊ शकत नाही पण अवस्थाच अशी की - खोलीत एकटा की गर्दीत एकटा?
तर आपण बुवा गर्दीत एकटा वाले! टरकेश नंबर वन. म्हणजे तसे कशालाच घाबरत नाही पण स्वत:च स्वत:ची समजूत काढायची, वगैरे सेंटी भानगडी नको वाटतात. त्यामुळेच तर इतकी वर्षं मुली-बिलीच्या भानगडीत पडलो नव्हतो. च्यायला.... पहिलं त्या मुलीला समजवा, मग आई-बापाला समजवा आणि कुणी काही समजून घेत नसलं की मग आयुष्यभर स्वत:ला समजवा.
बघितलेयत ना दोस्त आपले. अरे... असला दंडेल बन्या, त्याला तिरकं जाण्यापूर्वी माणूस दहादा विचार करेल, असला... पोरीच्या भानगडीत रडला, चक्क रडला! थबथबलेल्या स्पंजसारखा झाला होता काही दिवस. जरा धक्का लागला की ठिबक, जरा धक्का लागला की ठिबक!
आमचे आई-बाबा तरी धन्यच. त्यातल्या त्यात आई - ’तू काय तुला कशी हवी ती शोध बाबा’. आता हे काय पँटचं कापड आहे? मातोश्री आमच्या म्हणजे ग्रेटच. आई-बाबांनी शेवटी वैतागून शोधून आणली तिच्याशी लग्न केलं.
पण गळ्याशप्पथ सांगतो, गेल्या दोनच वर्षांत विदुला, आपला जीव की प्राण का काय म्हणतात ते झालीये. त्रिखंडात शोधून मिळाली नसती, हे आई म्हणते ते साक्षात खरंय. बघितल्याक्षणी आवडली. हे दातार लोक मुळचे मुंबईतलेच मग ग्वाल्हेरला शिफ़्ट झाले. म्हटलं ही ग्वाल्हेरचं मराठी किंवा हिंदी बोलणार, दोन्ही उच्चच आपल्याला.
भेटलोही कसल्या सणसणीत ऐतिहासिक, गूढ वगैरे म्हणतात तसल्या जागी! आईशप्पथ... अजून, काही काही विसरलो नाहीये. नाही म्हणजे सकाळी भाजी कोणती खाल्ली ते रात्री विचारलं तर डोकं खाजवणार आम्ही. तिला "बघायला" - हा आईचा शब्द, मला मुळीच पसंत नाही- फोटोत बघितल्याक्षणी आवडली म्हणून "भेटायला" गेलो तेव्हा.
तिच्या घराजवळ ग्वाल्हेरला शहराबाहेर त्या पडक्या गढीत, म्हणजे गढीच्या दरवाजातच. गढीचा मेन दरवाजा सोडल्यास धड असं काही शिल्लक नाही. त्या मॅड दरवाजात एका बाजूला मी, एका हातात मोबाईल आणि दुसरा हात न उडणारे केस बसवत.
दुसर्या बाजूला विदू, गडद निळ्या (तो मोरपिशी रंग होता हे नंतर कळलं) सलवार कुरत्यात (तेव्हा मी त्याला कुडता म्हणायचो). सैल बांधलेली एकच वेणी, विदूच्याही एका हातात मोबाईल आणि दुसरा हात खरेच उडणारे केस (आई म्हणाली तस्से सम्माटाच्या सम्माटा) आणि ती मस्तं ओढणी जागच्या जागी बसवत. मीच खूप बडबडलो, प्रश्न-बिश्नं विचारले.
फोटोत हसली नव्हती, पण तिथे मी बोलताना हसली. आपला स्टॅच्यूच एकदम. अरे मुलीच्या गालाला खळी ठीकय, बघितलीये, आम्हीपण.
पण खळ्या? गालावर एक खोल खळी, मग जरा खाली ओठांच्या कोपर्यात वर थोडी छोटी खळी, मग हनुवटीच्या जवळ परत एक नाजुक खड्डा... हे असलं सगळं परत दोन्ही बाजूला.
मी पड पड पडलोय त्यात....
त्या गढीतून निघताना मीच जरा बयापैकी लपेटून दिली तिची ओढणी तिला आणि ती हसल्यावर परत पडलो सगळ्या खळ्यांत, अजून पडतोच आहे...
आईशप्पथ, आपल्याला एक कविताच व्हायला हवी होती, तिथल्यातिथे.
*****************************************
आपल्याइतकी बिंधास्त नाहीये, विदू. जरा रिझर्व्ह्ड नेचर्-बिचर... पण गेल्या काही महिन्यांत थोडी अधिक मोकळी झालीये. बोलते-बिलते मनातलं वगैरे. आई-बाबांची पेट्ट आहे. वैनीपेक्षाही पेट्टं -हे माझं मत. अरे, दादा सुद्धा कबूल करेल विचारलं तर, वहिनीच्या मागे.
विदूला जरा सेंटीच म्हणायला हवं. दादाचा पुंडू झोपेत हसला तर हिच्या डोळ्यात आनन्दाने पाणी, झाडावरचं घरटं खाली पडलं तर हीचा जीव वर खाली, आमच्या आईचा पाय मुरगळला तर, शेकताना आईपेक्षा हिचंच हाई-हुई. कहर म्हणजे... मला जरा मायग्रेन चा त्रास होतो... कधीतरीच. तर, तुझी डोकेदुखी मला घेता आली तर किती बरं होईल, रे, खूपच दुखतय कारे? दुसरा बाम चोळून देऊ का?... कधी कधी मग मीसुद्धा जरा जास्तच त्रासाचं नाटक करतो, लाड करून घ्यायला आवडतं तिच्याकडून. प्रच्चंड गोड प्रकरण.
माझा सध्या बाड-बिस्तरा अमेरिकेत फिलीत आहे. तर म्हणे आई-बाबा एकटे पडलेत! तिचे नाही, माझे!
माझी बडबडी आई स्वत:शी सुद्धा एकटी नसते. बाबा क्लबमध्ये जातात. दादा, वैनी जवळ असुनसुद्धा ते एकटे कसे? तर म्हणे माझ्याबद्दल जरा जास्तं आहे दोघांनाही. त्यामुळे आजूबाजूला इतर माणसं असूनसुद्धा ’मी’ नाही म्हणून ’एकटे’.
असं हवं ते माणूस जवळ नसलो की आपण माणसातही एकटे होतो. आहे बुवा कन्सेप्ट, म्हटलं!
आईने दोन-तिनदा छेडल्यावर, परवा मी सुद्धा गमतीने म्हटलं ’मी सुद्धा एकटा आहे गं माझ्या अजून न झालेल्या मुलांशिवाय’...
तर एकदम गप्पच. चिडत नाही ती, पण कोमाऊन जाते. आपली लगेच माघार, बिनशर्त! नसेल तयारी अजून.. आत्ता दोनच तर वर्षं होतायत लग्नाला आणि ते काय म्हणतात ना... तसे आम्ही दोघं तसे अजून जवळ येतोच आहोत. म्हणजे मी बुडलोय पूर्णच....
सगळ्यात टॉप गोष्ट म्हणजे विदू "गाते"!
विदू नुसती गात नाही, तर खरच सुंदर गाते. मला गाता-बिता येत नाही. पण गाणं कळतं. म्हणजे विदूच्या भाषेत, "जाण आहे". म्हणजे कुणी अगदी मनापासून म्हटलेलं आपल्या आतपर्यंत पोचतं. अगदी गझल, भावगीतापासून, रागदारी तानफेक आणि संतूर-बिंतूर, सगळं. आपण तालमितले तय्यार "कानसेन"!
विदू जीवघेणं गाते. शास्त्रीय वगैरे शिकलीये पण गझल म्हणजे, जान ओतून गाते.
हा नक्षं शेर... गालिबचा... तिचा आवडीचा म्हणून मग माझाही. हृदयनाथांची चाल आणि लताबाईंनी मूळ गायलेलं असलं प्रचंड डोंगराएवढं गाणं.... पण काय पेलते! तिच्या फरियादी मधल्या या वरचा मिंड.......... नुसतं स्सsssss....!!
’तो कोमल धैवतापासून षड्जापर्यंत आहे’ हे तिने सांगितलेलं....
माझ्यामते, विदू तो मिंड घेते तेव्हा, आपल्याला सोडलेलं धैवताला कळत नाही आणि गळा मिठी पडली याचा षड्जालाही पत्ता नाही. हे म्हणजे कसं? तर .....
आजूबाजूला षडजाचा डोह असावा, धैवताच्या किनार्यावरून नुसतं झोकून द्यावं डोहात तसं.... खळबळ नाही, तरंगही नाही, एकही! एकदम थेट तळंच.
मी मॅडसारखं हे तिला सांगितलं तर वेडी माझ्या गळ्यात पडून रड-रड रडली. मोकळी मोकळी झाल्यासारखी वाटली त्यानंतर. बरोबरच आहे म्हणा... आपल्या जरातरी बरोबरीचा आहे, म्हणजे आपली किलबिल थोडीतरी कळणारा कावळा तरी आहेच, असं काहीतरी वाटलं असणार तिला.
मी पण गझल, उर्दू वगैरेत जरा जास्तं रस घेतो... इतकं आईच्या भाषेतलं त्रिखंडातलं रत्नं हातात पडलय तर अगदीच माकडपणा नको.
आपण तिला आपल्या सगळ्या भानगडी सांगितल्या.... कुठच्या पेपर मध्ये कॉपी केलीये पासून सगळं. पीत होतो हे तिला माहीत होतंच, करून बघायचं म्हणून चिरूट ओढलाय, मित्रांबरोबर पैज लावून गोलपिठ्यात चक्कर मारलीये.. पण मग आईच्या कुशीत शिरून रडलोय पण बेफाम.... काही ठेवलं नाही सगळं सांगितलं.
तेव्हा धीर करून तिनेही सांगितल.... कसली सेंटी मुलगी होती ही! होती कसली, अजून आहे.
त्यांच्या कॉलेजात म्हणे कुणी एक कार्यक्रम बसवायला यायचा. ही अशी दिसते, असलं गाते .... मी समजू शकतो. पण हिने कधी पुढे पाऊल टाकलं नाही, तोच गुंतला. शेवटच्या वर्षाला विचारलंही तिला. तो मुसलमान, हे दातार. विदूने मला सांगायलाच नको, मला माहीत आहे, हिच्या आईने जीवच दिला असता. त्याने घरी यायचा प्रयत्न केला दोनदा तर काकांनी मुंबईच सोडली सगळं गुंडाळून.
आता विदूच्या जीवाची घालमेल का? तर, तो कसा असेल? त्याने जीव-बीव तर दिला नाही ना? पुन्हा लग्न करून सुखी झाला असेल का?
हे असलं काही तरी.
मी विचारलंही - तू नाही ना गुंतलीस? तर, ’नाही रे. पण आपल्यामुळे कोणी कशाला दु:खी व्हायचं? कळलं असतं तर बरं झालं असतं. ओझं नको बाबा जीवावर!’ हे असलं! प्रच्चंड म्हणजे प्रच्चंड सेंटी प्रकर्णं!
मी समजावलंही तिला. पोरं लोक असलं फार दिवस मनावर घेत नाहीत वगैरे. लग्नं बिग्नं करून आरामात असेल पठ्ठ्या. सुखी का काय ते माहीत नाही. कोण महामाया गळ्यात पडते त्याच्यावर आहे.
म्हटलं, आपल्याला भिजवतो तो आपला पाऊस. आंघोळीला मोरीत जाऊनच्या जाऊन उगीच न पडलेल्या पावसाची काळजी करत बसायचं.... शॉवर चालू बिच्चारा.... गळला काय, बरसला काय, ठिबकला काय? काय नाहीच तुम्हा बायकांना.
तर नाक उडवून "तुम्हा पुरुषांना नाही कळायचं" म्हणून पार!
असल्या वेडाबाईला अजून काय समजावणार? संभाळून घ्यायचं झालं. आई म्हणते ना, एखादं आलं किरकिरं माझ्या सारखं की होईल कणखर आपणंच.
सुरुवातीला सुरुवातीला खूप उदास व्हायची एकदम. म्हटलं.... घरच्यांची आठवण वगैरे येत असेल, संकोचानं जात नसेल म्हणून स्वहस्ते माहेरी सोडून आलो दोन-तीन वेळा. पण हल्ली हल्ली लग्गेच दोन दिवसात फोन!
"घायला ये रे, कंटाळले". की आम्ही उड्या मारत एका पायावर आणायला छू....
सगळ्याच लग्नं करून नवयाच्या घरी जाणाया मुली ग्रेट बाबा. सगळं सोडून आपली मुळं उचलून दुसरीकडे रुजायचं. काय खायची गोष्टंय? आपल्याला चार दिवस हॉटेलात रहायला लागलं तर कावतो आपण. आईच्या हातचा चहा, वहिनीच्य हातचे पोहे, दादाच्या हातातून काढून घेतलेला सकाळचा पेपर, बाबांच्या घरातल्या घरात म्हणत पार शेजारच्यांच्या अंगणात पोचलेल्या शतपावली, विदूचंन नुसतं आजूबाजूला वावरणं आणि....हं! आणि असलं बरंच काही.
हॅ. यातलं काहीही आठ दिवसांपेक्षा जास्त मिळालं नाही की आपण बेचैन.
लग्नाआधी दोस्त लोकांबरोबर, टुरवर कलीग बरोबर, दुसरं काही करायला नाही म्हणुन प्यायचो... गं म्म त! एकट्याने कधीच नाही. पण विदूच्या सांगण्यावरून सोडली... साफ सोडली. हल्ली त्यामुळेच टूरवर एकट्याने यायला नको वाटतं झक्कासपैकी विदूला बरोबर घेऊनच फिरतो जमेल तेव्हा. विशेषत: भारतात येणार असेन तर नक्कीच. विदुची मग मुंबई, ग्वाल्हेर अशी फेरी होते.
तशीच आता ग्वाल्हेरला घरी गेलीये. त्यावेळच्या कॉलेजातल्या चार तरी चिमण्या यावेळी जमणार आहेत म्हणे. ही तिची तिथली मैत्रिण म्हणजे कहर आहे. कुठुन कुठुन पत्ते आढून गोळा केल्यात इतर मैत्रिणी... नुसता चिवचिवाट असणार चालू, अखंड.
आजच विदूशी बोलायला फोन केला. काँन्फरन्सच्या दोन सेशन्समध्ये, तर ही आहेच कबाबमे..... हिची सत्त्याणव वाक्यं ऐकल्यावर विदूची तीन ऐकायला मिळाली. तिन्ही दिवस रहाते म्हणतेय....
या बायकांना ना, एक बोलायला मिळालं की पुरे. कुणी ऐकायला नसलं तरी चालेल एक वेळ..... नवरा-बिवरा गेला तिकडे तेल लावत....
*****************************************जरा थकल्यासारखा वाटला का आवाज तिचा? जाम धम्माल चालली असेल. थकेल नाहीतर काय?
’विदू’ म्हटलं की, मनोजवंम मारुततुल्य वेगंम ने विचार सुमडीत भटकून येतात. तोपर्यंत समोरच्या जगाचा पत्ता नाही आपल्याला. खरच कठीण आहे माझं.
माझ्याकडे वळुनही न पहाता हाताने तस्लीम करून माझ्या वाहवाचा स्वीकार करणारा हा वीर पुरुष एकदम आपल्याच गावचा, ’गर्दीत एकट्यांच्या गावचा’ वाटला. पण नक्कीच माझ्यापेक्षाही एकटा. कारण मी गर्दीकडे तोंड करूनतरी होतो, तो तर पाठ करून.
भरमसाठ उच्च उर्दू-हिंदीचं पीठ मळून मी एक चकली गाळली, "क्यू बरखुरदार, क्या माजरा है?"
इतकं देशाबाहेर भटकूनही माझ्या इंग्रजीला मुंबईचा वास मारतो तिथे उर्दूच्या पट्टीत हिंदी बोललो तर काय होतं? पचका! तेच झालं.
झब्बा, शेरवानी, जुल्फंच म्हणावीत असे कपाळावर रुळणारे केस, सहा फूट उंच, सावळलेला आणि फेरीवाल्याच्या पेट्रोमॅक्सच्या उजेडात केशरी दिसणारा रंग..... हा असला अॅड्समध्येच शोभणारा प्राणी शुद्ध मराठीत, ’नमस्कार,’ म्हणाला.
"हॅ! धत तिच्या मारी, मराठीच का!!" मी पोटभर हसलो... तो ही हसलाच शेवटी.
"कुठचे?" थोडा संभाषणाच्या मालगाडीला धक्का देत म्हटलं.
"इथला नाही..." गाडी थोडी डगडगून परत होती तिथेच.
"वाटलंच! उंची वरून मला वाटलंच... की चंद्रावरचे...." मी जरा जोरदार धक्का दिला
"मुळचा नेपच्यून... आमच्यात मी सगळ्यात बुटका आहे...!"
आयला ये तो अपना बाप निकला. महाशय एकदम ’नॉट टू बी लूझली शंटेड’ निघाले. मी टाळीसाठी हात पुढे केला.
दोघेही आपसूकच चालू लागलो, गर्दी पासून दूर.
"घेणार?" मी विचारलं.
"मी सोडलीये"
"अहो, उसाचा रस कुणी सोडतं का?"
"कहर आहेस, यार" अस म्हणून आता मात्रं माझ्या पाठीवर थाप मारून तो भरपूर हसला. दोघे ठिय्या मारून बसलो एक एक ग्लास घेऊन. ग्लास हातात येण्यापूर्वीच आम्ही अरे-तुरेवर आलोसुद्धा.
हातातल्या ग्लासाकडे बघून मी म्हणालो "जाने क्या हाल हो कल शीशेका, पैमानेका,..."
"आय हाय! गहरी चोट खायी लगती है कंबख्त दिलने...." तो हसून शुद्ध उर्दूत हळहळला.
"नाही यार, हातात ग्लास आहे म्हणून ती गझल आठवली. मधू इथे अन, चंद्र तिथे झालंय." त्याला सांगताना माझ्याच लक्षात आलं आपण विदूला किती मिस करतोय. काळजात कळ का काय म्हणतात ती उठली. "...आणि उद्या, परवा .. अं.... तेरवा भेटणारचये". माझं मलाच हसू आलं. त्याला सांगतोय की च्यायला आपल्यालाच समजावतोय आपण?
"नवीन नवीन?" थोडी मान वाकडी करून हसत त्याने विचारलं.
"दोन वर्ष झाली...." मी माझं व्हिजिटिंग कार्ड पुढे करत, ओशाळं हसंत कबुली दिली. कुणाही अनोळखीशी बोलताना दहाव्या वाक्याला प्रतिक्षिप्त क्रियेसारखं व्हिजिटिंग कार्ड बाहेर पडतं खिशातून - जातिवंत सेल्समन! माझ्या जीन्स मध्येच म्युटेशन का काय म्हणतात ते झालं असणार.
"वर्षांचं काय घेऊन बसलास यार, काही काही फुलं आसमंतच नाही तर रुजतात ती मातीही गंधाळतात. रोप नेऊन लावा दुसरीकडे, इथली माती परमळतेय आपली युगंनयुगं....कायमची."
"जाने क्या हाल हो कल शीशेका, पैमानेका
आज दर छोड चला है कोई मैखानेका
हाथ थर्राने लगे, जाम गिरा, टूट गया
ये कोई वक्त न था आपके याद आने का" त्याने मतला पूर्ण करून एक शेरही म्हटला.
"क्या बात है" मी मनात म्हटलं. "बेटा रुतलाय खोलवर...... आता फक्त गहराई बघायची"
माझं आपलं एक मत आहे. आपण बोललच पाहिजे असं नाही. कधी कधी समोरचाच आपल्या आतलं बोलतो... नुसतं ऐकलं तरी पुरतं. आज ऐकणेकी हवा है तर. चलेगा चलेगा! अरे, चलेगा क्या, दौडेगा! एकटा एकटा झुर झुरके रात बितानेमे क्या मजा है क्या? आ?
"असलं काही नसतं. आपण गेल्यावरही मयखाना तसाच चालू, शराब, नकाब, साकी सगळं असतंच. आपल्यालाच साली उत्सुकता आपण गेल्यावर काय झालं असेल? नांदतायेत सुखाने की ’हाथ थर्राने लगे, जाम गिरा टूट गया’ होतंय? हं? ...... महत्वाचं नाहीये... मी मयखान्याला सोडलं की मयखान्यातून धक्के मारून बाहेर काढलं! काय फरक पडतो? .... साथ छूट गया.. , बस"
अशा वेळी काहितरीच बोलतो आपण, "इस मुहब्बत ने कर दिया नाकाम वर...."
मला अर्ध्यावरच थांबवत म्हणाला, "एकतर्फ़ीच रे, सगळं. आधी कुणाचीतरी वाट बघायची, मग येत नाही म्हटल्यावर वाट चालायची...... बरं, वाट चालायला काहीच हरकत नाही पण कधीतरी कुठेतरी पोचणार माहीत असलेल तर ना? "आयुष्याची वाट लागली" म्हणतात ना, तेच. निव्वळ फकिरी रे दुसरं काही नाही."
त्यानंतरचा त्याचा नि:श्वास कुठेतरी मलाच डसून गेला. असहाय्य, म्हणतात तसं वाटलं. थोडसं अपराधीही. म्हटलं च्यायला दोन दिवस बायको भेटली नाही म्हणून आपण रडतोय... ह्याचं अख्खं आयुष्यंच हरवलंय. अशावेळी उगीच काहीतरी बोलणं म्हणजे आकाशाला पॅचवर्क केल्यासारखं.....
"फकिराच्याही छातीत कोवळ्या कोंबासारखं एक जिंदा दिल असतं. कुणालाच कळत नाही, पण त्याची त्याला कळते ना.... उठणारी प्रत्येक आह, येणारी हरेक कळ, हर धडकन? जिवंत असेपर्यंत!
कसं नाकारायचं आपलंच जिवंत असणं? फकीर झाला म्हणून काय झालं?"
"दिल मे फ़िर गिरया ने इक शोर उठाया ’गालिब’
आह जो कतरा न निकला था, सो तूफ़ा निकला....", माझ्या तोंडून अख्खा शेर अस्खलित निघून गेला... सट्टाककन.
त्याला चढलेला दिसत होता, मला वाटलं की मला अजून चढायचा होता, उसाचा रस. पण ह्याचं ऐकता ऐकता चढायला लागलाच होता बहुतेक कारण ह्यावेळी मला शेर आठवायला लागला नाही... आपोआप निघून गेला तोंडातून.
"तोबा... वाह" त्याने हसून दाद दिली. "गालिब, वाचण्याची नाही, जडण्याची चीज आहे, यार, जीवघेण्या बिमारी सारखी." असं म्हणून तो बांधावर चढला. एव्हाना आम्ही चालत दगडी भरावाच्या पार टोकाला आलो होतो. मला पोहता येतं पण माझा मी तरंगण्यापुरतंच. या सहाफुटी पुतळ्याला वाचवायला अजून कुणीतरी लागेल हाताशी असं म्हणून मी सुद्धा त्याच्या मागे मागे चालू लागलो.
"तिच्या मनात काही नव्हतं रे... नसावं.... नव्हतंच! साध्या मराठी घरातली साधी मुलगी. पण गझलेसाठी गळ्यात वेगळी जान होती तिच्या. शिकवलेला हर लब्ज, हरकत... हूबहू उचलायची. शेवटच्या वर्षी मीच जरा जोर करून विचारलं. तोंडाने नाही म्हणाली. पण रडलीही बेदम. काय कळलंच नाही, मनात होतं का नव्हतं!
घरातून काय विरोध वगैरे असेल, म्हणून घरी गेलो... दुसर्यांदा गेलो तर, मुंबई सोडून ग्वाल्हेरला गेलेले कळले सगळे.... मनात आणलं तर शोधून काढेन पाताळातून सुद्धा......
आत्ता होती, आत्ता नाही सारखी गायब झाली. वादळात सापडलेल्या पानांसारखं भिरकाटून दिलं दैवाने दोघांना. कुठच्याकुठे. बरं, नाही म्हणावी तर या समुद्राच्या गाजेसारखी बरोबर, रे. अखंड....
नक्ष फरियाssssदी है......." तोल सावरत निमुळत्या बांधावरून चालत तो म्हणाला.
तीच चाल, तोच मिंड, तोच षडजाचा डोह..... आणि कोमल धैवताचा किनारा .........मला एकदम कान गरम झाल्यासारखे वाटले. मानेवर काटे आले.
"....... अरे, शोधून काढलीच, शेवटी."
तटकन थांबून वळून माझ्या डोळ्यात थेट बघत म्हणाला,"तुझा कोण देव असेल... तर आज माझ्यासाठी मन्नत मांग, दोस्त! ... म्हणावं अपने यारको बक्ष दे इस बार..... या वेळी यश दे. एक घाव दोन तुकडे.... आर या पार. सगळं सांगणार तिला. शब्दांत, आंसुओंमे.... जमेल तसं दिल खोलून दाखवणार... कर म्हणावं फैसला.
भेटणारेय उद्या ग्वाल्हेरला तिच्याच घरी जाऊन. लग्नं झालंय कळलं.... पण शेवटी फैसला तिच्याच हातात..... झोकून द्यायचं बळं आलं असेल आई-बापाच्या पंखाखालून बाहेर पडल्यावर.....
नाही तर आहेच याची गाज आपल्याला कवेत घ्यायला केव्हाही....." हंसत हंसत असं म्हणून त्याने समुद्राकडे तोंड करून हात फैलावले. तेव्हढ्या निमिषातही त्याच्या डोळ्यात चकाकणारा दर्या आणि त्यातलं वादळ मला दिसलंच.
त्याचा थोडा तोल जातोय असं बघून मी .....
*****************************************
हॉटेलात परत येईपर्यंत घामाने थबथबलो होतो. परत परत स्वत:ला बजावत होतो - त्याचा तोल गेला..... त्याचा तोल गेला..... त्याचाच तोल गेला.....
सगळ्यात आधी हे हॉटेल सोडायचं. सगळं सामान भरेपर्यंत तास तरी गेलाच. खाली लॉबीत आलो. बिलाचे सोपस्कार पूर्ण होईपर्यंत समोरच्याच सोफ्यात बसलो आणि मोबाईल वाजला.
"विदू...."
"हो रे, खूप उशीरा फोन केलाय नं? काय करू, झोपच येईना. तुला कळायलाच हवं सगळ्यात आधी..... तुलाच..... कसं सांगू?"
"विदू.... माझं ऐक ज...."
"थांब, राजा. मला बोलूंदे. तू म्हणाला होतास ना? तेच खरंय आपल्याला भिजवतो तोच आपला पाऊस. आता नाही एकटा पडायचास कध्धी कध्धी...... मी... तू ... आपण दोघे..... नं..... ए, नाव काय ठेवायचं रे होणार्या बाळाचं?.... मुलगा का....."
माझ्या डोळ्यासमोर लाजून कुजबुजत विचारणारी विदू येईचना काही केल्या... फ़्रंट डेस्क जवळ माझं भिजलेलं विजिटिंग कार्ड दाखवत चौकशी करणारा पोलीस इंस्पेक्टर, माझ्या थिजलेल्या डोळ्यांतून... जाईचना काही केल्या.....
कानात मात्रं गाज.... अखंड.....
नक्श फरियाsssदी है......
समाप्त.
फालतू कचरा मागे सारण्यासाठी
फालतू कचरा मागे सारण्यासाठी प्रतिसाद
पाटील,
पाटील,
तुम्ही रस्त्यावर पडलेला कचरा मागे सारण्याचा प्रयत्न करत आहात, ते तिकडे झाड हलवत बसताय. कसा कमी होणार?
वाह...
वाह...
माय गॉड, शेवटी शेवटी तर धडधड
माय गॉड, शेवटी शेवटी तर धडधड वाढलेली होती.
हे इतक सुन्दर लिखाण इतके दिवस
हे इतक सुन्दर लिखाण इतके दिवस का नव्हत वाच्लं ??
अप्रतिम!!!!! हा शब्दसुद्धा कमी पडतोय... +११
हे कसलं भारीय!
हे कसलं भारीय!
हे कसं मिस केलं होतं मी?
हे कसं मिस केलं होतं मी?
केवळ अप्रतिम!
अप्रतिम लिहिलंय. मस्तच.
अप्रतिम लिहिलंय. मस्तच.
Pages