मित्र मंडळीनो, जरा गंभीर लिखाणाचा पहीलाचं प्रयत्न आहे.. कदाचित काही चुका झाल्या असण्याची शक्यता आहे.. सांभाळुन घ्या.. अपेक्षा आहे तुम्हाला आवडेल... काही सुचना असतील तर नक्की कळवा.
कथा जरा मोठ्ठी असल्याने संथ वाटु शकते पण सर्व बारकावे मला नमुद करावेसे वाटत आहेत म्हणुन हा सगळा खटाटोप.. सगळे भाग लवकर लवकर पोस्ट करेनच.. अभिप्राय जरुर कळवा..
*****************************************************
आजची संध्याकाळ खुपचं हुरहुर लावणारी जाणार होती याची प्रियाला कल्पना आली होती..पण प्रेमात पडलं की असचं होणार...
तशी प्रिया मुळची कोकणातल्या गुहागर ची... शांत समुद्र, छोटंसं कुटुंब, टुमदार घर आणि वाडी, आपुलकी-जिव्हाळ्याची माणसं... एवढं सगळं सोडुन, खुणावणार्या क्षितीजांना गवसणी घालण्यासाठी, महत्वाकांक्षांची व्याप्ती मोजण्यासाठी तीनं गाव सोडलं..आधी शिक्षणासाठी आणि नंतर नोकरीच्या निमित्याने...पुणे त्या दृष्टीने तीला फारचं जवळचं वाटलं आणि पुण्यानंही तीला पटकन आपलसं केलं..जेवढं तीचं आणि पुण्याचं नातं जुनं आणि आपलसं तेवढचं तीचं आणि प्रतापचं नातं! किंबहुना त्यापेक्षाही अजुन थोडं जुनं आणि जिव्हाळ्याचं..कारण ते नातं होतचं तसं! इतकी वर्ष दुर राहुनही त्यांच्या नात्याचे बंध हे तितकेच रेशमी आणि सुंदर विणीचे होते...इतकी वर्ष दुर राहुनही..त्यांच्यातली ओढ किंचीतही कमी झाली नव्हती आणि होणारही नव्हती...माणसाचं बघा ना कसं असतं जो दोन मनातला निर्मळ निर्गुण असा बंध आहे त्याला नाव देण्याचा अट्टाहास त्याला स्वस्थ बसु देत नाही हेच खरं..असं कोणतं नातं होतं त्यांच्यात? खरं तर हे त्या दोघांनाही सांगता आलं नसतं..
काही वर्षापुर्वी पर्यंत, एवढ्याश्या गावात राहुनही, एकमेकांना 'कुठेतरी पाहील्यासारखं वाटतयं' एवढ्या ओळखीपलीकडे काहीच नव्हते; मात्र नंतर बापट गुरुजींकडे गाण्याच्या वर्गाच्या निमित्याने दोघांची गाण्याची आवड, त्या दोघांच्या मधला दुवा कधी बनला हे त्यांचं त्यानाचं कळलं नाही. काही महीन्यातच गाण्याचं वेड, दोघानाही वेडावुन गेलं.. गाणं हा एक जणु ध्यासचं बनला..प्रतापला मिळालेली दैवी आवाजाची देणगी आणि प्रियाचे कष्ट्..दोन्ही आकार घेत होते दिवसेंदिवस्.. अशाच काही मंतरलेल्या दिवसांनंतर, जसंजसं नवं जग उलगडत गेलं तसं वेळ आली आयुष्यात निर्णय घेण्याची ! प्रियाला संगीत आणि गाण्याची आवड असली तरी तीला पुर्ण आयुष्य त्यात ओतायचं नव्हतं आणि मुख्य म्हणजे तीला अभ्यासात गती असल्याने शहरात शिक्षण पुर्ण करुन नोकरी करायची होती.. आणि प्रतापचं संगीत म्हणजेच आत्मा होता..त्याच्या जगण्याचं उद्दिष्ट होतं ते... एव्हाना त्यांनाही एकमेकांमधले बंध आणि आकर्षण उमजायला लागले होते...सामंजस्य दाखवुन प्रतापनी संगीत क्षेत्राकडे पुर्णपणे वळायचं ठरवलं आणि प्रियानी शिक्षण व नोकरी असा सरळ सोप्पा मार्ग निवडला. पण त्यांचे मार्ग वेगळे झाले असले तरी दिशा भिन्न झाल्या नव्हत्या...किंबहुना त्या वेगळ्या होऊ द्यायच्या नाहीत या एकाच निग्रहाने दोघे आपल्या आपल्या मार्गाने निघाले..प्रेम आणि व्यवहार याची आपण उत्तम सांगड घालु शकतो यावर दोघांचाही ठाम विश्वास होता.. एकमेकांसोबत शरीराने एकत्र राहण्यापेक्षा भिन्न शहरात राहुन आपल्या निग्रहाला आणि आयुष्यातल्या महत्वकांक्षाना न्याय देण्याचं त्यांनी ठरवलं.. शारिरीक आकर्षणापासुन दुर ठेवत त्यांनी मानसिक, सात्विक आणि व्यवहारीक गरजांना महत्व दिले...त्या कारणांसाठी काही काळ एकमेकांना दुर ठेवण्याचा त्यांनी निश्चय केला.. आणि तसंही आता आपल्या प्रिय व्यक्तीपासुन दुर राहणं कितीसं अवघड राहीलयं.. कधीही वाटलं फोन केला नाहीतर भेटुन आलं.. पुणे-मुंबई अंतर राहीलय असं कितीसं!
आजही प्रियाला ती हुरहुर जाणवत होती..तेच सुरवतीचे मोरपीशी दिवस! त्या दिवसातला हवाहवासा वाटणारा प्रताप, त्याचा सहवास आणि ते शक्य-अशक्य, योग्य-अयोग्य, होकार-नकाराचं मनामध्ये चाललेलं द्वंद्व्...तसा तो गाण्यामध्ये तिच्यापेक्षा बराच उजवा.. पण तो तिच्यापेक्षा सरस असला तरीही खरं तर त्याच्यापेक्षाही ती त्याच्या गाण्यामध्ये, सुरांमध्येच जास्ती रमलेली असे...त्याचं ते डोळे बंद करुन तान घेणं तीला वेड लाऊन जायचं.. प्रिया जणु एका सात्विक प्रवासाला निघायची तो गायला लागल्यावर.. असा प्रवास कि जो फक्त ती आणि तोच अनुभवु शकत होते...असा धुंद करुन टाकणारा प्रवास की, शरीर पॄथ्वीवर ठेऊन अनंतात आसमंतात भरुन राहील्याचा अनुभव्.. हाच अगदी अस्साच अनुभव प्रत्येक गाण्यातुन, प्रत्येक सुरातुन, त्याच्या प्रत्येक भेटीतुन असायचा.. या मृत्यु लोकात परत यावसं वाटुचं नये असा...
प्रतापची अवस्थाही काही वेगळी नव्हती, रोजच्या त्या नजरभेटीतुन त्याने चांगलचं ओळखलं होतं कि गुरुजींच्या शिकवण्यापेक्षा कधी कधी आपला रियाज आणि गाणं तीच जास्ती तन्मयतेने ऐकत असते.. तीची ति तन्मयता त्यालाही दिवसेंदिवस वेड लावत होती पण आपलं लक्ष विचलीत न होऊ देता तो तस्साच गात राही.... त्याला कधी कधी तीच्या डोळ्यात मीरेसारखी तल्लीनता दिसायची तर कधी राधेचा अवखळपणा.. ती कधी कोणत्या आणि कश्या रुपात दिसेल काही नेम नव्हता... पण जसं जसं तीच ते हलक्या आवजातलं अफाट गोड गाण त्याला आवडत होतं ... तसं तीही त्याच्या मनात खोलवर रुजायला लागली होती.. दोघांचीही गाण्याची ओढ आता स्वस्थ न राहता अजुन एका अनामिक ओढीने अस्वस्थ व्हायला लागली होती..
अशा या परिस्थितीत, गुरुजींकडुन आल्यावर, हातपाय धुवुन तिन्हीसांजेला देवापुढे दिवा लावला की तीला खुप प्रसन्न वाटायचं आणि जगातल्या सगळ्या वाईट गोष्टी अचानक नाहीश्या झाल्यासारखं वाटायचं, विशेषत: प्रताप विषयी मनात चाललेली घालमेल! त्या श्री कॄष्णाच्या पितळी मुर्तीकडे पाहुन शांत शांत होऊन जायची. तीची त्या मुर्तीवर जीवापाड श्रद्धा होती.. ती नेहमीच सांगायची त्याला "देवा सर्वाना सुखी ठेव आणि माझ्यासाठी विचारशील तर मला मीरेसारखी सहनशक्ती आणि राधेचा अल्लडपणा दे..ज्या प्रमाणे त्या दोघींच्याही मनात तु सामावला होतास तसाच तु पण माझ्या मनात सामावुन जा..तुझी आठवण काढण्यासाठी तुला मी विसरूच नये असं काहीतरी कर... मला तुझ्या सान्निध्यात नेणारा जो दुवा आहे.. सात्विक आवाजाचा.. तो प्रतापच्या गळ्यात तसाच भक्कम कर्".. तीच्या या विचारांनी श्री कॄष्णाही भारावल्यासारखा भासे तीला.! त्या मिणमिणत्या दिव्याच्या प्रकाशातही त्या पितळी मुर्तीचं तेज झाकोळण्यासारखं राहत नसे..
अशाच सुंदर सांजवेळी क्वचित आजी तीला मीरेची भजनं गायला लावायची.. म्हणायची
"पियु, असं वाटतं ग की तु असचं गात रहावसं आणि मी तुझं गाण ऐकतचं प्राण सोडावा अगदी तुझ्या मांडीवर डोकं ठेऊन्"...असं आजी बोल्ली की ती आजीच्या गळयात पडुन म्हणायची "असं असेल तर मग मी गाणारच नाही, गाणं हे नेहमी असं असावं जे दुसर्याला जीवन देइल, ईतरांना जगण्याची उमेद देईल. एखाद्याचा जीव घेणारं गाणं म्हणजे पापच नाही का?"याविषयावर तीची आणि आजीची नेहमीच चर्चा होई "तॄप्तीने आलेला मॄत्यु चांगला की आंनदाने जगलेलं आयुष्य चांगलं" आई असताना शेवटी आईच्या मध्यस्थीने तो विषय सांजवेळी नको म्हणुन बंद होई. अजुनही प्रियाला आत्ताही आजीनी शिकवलेली रामरक्षा आठवल्यावर भरुन आलं..आजी नेहमी सांगायची भिती वाटायला लागली की रामरक्षा म्हणावी, राम आपल्या मदतीला धावुन येतो आणि त्याला नाहीच जमलं तर संकटाशी लढण्याचं बळ देतो. आजीचे सुरकुतलेले थरथरणारे हात जपाची माळ ओढताना फार सुंदर दिसायचे. प्रियाला नकळत हातावर आजीनी हात ठेवल्याची जाणिव सुखावुन गेली, आजीच्या हाताला जी मायेची ऊब होती, ती या क्षणालासुद्धा अनुभवु शकत होती. मागच्यावेळी आजीला पाहीली ति पाच महिन्यापुर्वी, ती उन्हाळ्यात आंबे खायला गेली होती तेव्हा.. हक्काच्या चार दिवसांचा मुक्काम संपल्यावर गंभीर झालेली आजी तीला आठवली, निघताना तीने नेहमीप्रमाणे सल्ला दिला होता.."रोज संध्याकाळी देवासमोर दिवा लावत जा आणि रामरक्षा म्हणायला विसरू नकोस्..लक्षात ठेव माझा राम आणि तुझ कृष्ण नेहमीच तुझ्या पाठीशी आहे.. सुखी रहा"... नमस्कार करताना आजीचा थरथरता हात डोक्यावरुन फिरला आणि फार बरं वाटलं प्रियाला.. प्रिया घरातुन निघाली तशी आजीचे डोळे पाणावले. आजीला प्रियाच्या आई वडिलांची आठवण आली..गेल्या तीन वर्षात काय काय सोसलं पोरीनं.
पण या दिवाळीला आजीकडे दोन आठवडे सुट्टी काढुन आजीची सेवा करायची आणि ही दिवाळी हौसेनी साजरी करायची असा बेत प्रिया मनात आखत होती आणि याच खेपेत आजीला प्रतापशी भेटवायचंही ठरवलं होतं. तसा या नाजुक विषयावर त्या दोघांचाही निर्णय झाला होता. पुढच्या वर्षाच्या सुरवातीला लग्न करायचं आणि आजीला आपल्याकडे न्यायचं असा. दरम्यानच्या काळात गाण्याच्या क्षेत्रात प्रतापने आपले पाय चांगलेच रोवले होते. शास्त्रीय गायकीत त्याने अनेक पारितोषीकं मिळवली होती. दर्दी आणि रसिक प्रेक्षकांच्या भरघोस प्रतिसादामुळे आता तो स्वतंत्र कार्यक्रमही करू लागला होता. एकंदरीत त्याने उत्तम नावलौकीक आणि बर्यापैकी पैसा मिळवला होता. प्रियाही तिच्या आवडीच्या कामामुळे नोकरीमध्ये खुश होती. गाण्याची आवड तीनं छंद म्हणुन जोपासली होती. आणि आता लग्नानंतरही तीला तिच्या या छंदात साथ द्यायला उत्तम असा जोडीदारही मिळाला होता. शिवाय त्यांच्यामधे जातपात हाही काही प्रश्न नव्हता.. तेव्हा या दिवाळीत त्यांनी आपापल्या घरी सांगायचं ठरवलं होतं... आपण निवडलेल्या साथीदाराविषयी..!!
प्रियाच्या मनात सतत घालमेल सुरु होती, खरंतर ते दोघंही आजचं काम संपल्यावर गुहागरला जाणार होते.. ती पुण्याहुन आणि तो मुंबईहुन, पण प्रियाचं काम संपलं नव्हतं त्यामुळे तीला ते उद्या संपवुनच जावं लागणार होतं. तेव्हा आहे त्या परिस्थित तीनं काम संपवुन मगचं गुहागरला जायचं ठरवलं... एका दिवसाचाच तर प्रश्न होता..!! आणि तीनं आपलं लक्ष कामात केंद्रीत केलं.
आजची संध्याकाळ ही सगळी गावला न्यायच्या सामानाची बांधाबांध करण्यातच गेली. मोठ्या कौतुकाने ती हौसेने घेतलेल्या गोष्टीं न्याहाळत होती. हि दिवाळी खरचं खुप वेगळी होती, तीचा उत्साह वेगळा होता. मनातली ओढ काही केल्या कमी होत नव्हती. मन अनेक वर्ष मागे पळालं.. दिवाळीची पहाट... घराबाहेरची ती आईनी काढ्लेली रेखीव रंगीत रांगोळी आणि पहिली पणती आई नेहमी रांगोळीवर ठेवत असे.. आणि मग बाकीच्या पणत्या अंगणात ठराविक जागी ठेवण्यात येत.. त्यानंतरची आईची मुर्ती ही नेहमी तुळशी वृंदावनाला पाणी घालणारीच असे.. तीच्या मोत्याच्या नथीला त्या पहाटे वेगळीच लकाकी असे.. बाबा सोवळं नेसुन पुजेला बसलेले असत आणि माझी मधे मधे लुड्बुड.. आजी त्या दिवशी तेल उटणं लाऊन मला कढत पाण्यानी अंघोळ घालायची आणि मग सगळे मिळुन फराळ करत असु... आयुष्यातले काही दिवस खरचं काही सुंदर असतात नाही? सगळे वाईट दिवस विसरायला लावणारे..
आयुष्यात सामान्य माणसाच्या अपेक्षाच काय असतात? गरजेपुरते पैसे आणि प्रेमळ सोशिक कुटुंब ! आई बाबा एकदम एकमेकांना पुरक असे.. नेहमी समजुन घेणारे... मी एकुलती एक मुलगीच असुन त्यांनी कधीच मुलगा नाही म्हणुन खंत केली नाही.. उलट मला नेहमी संधी दिली, शिक्षण, वाचन, खेळ, छंद कशातही कमी केलं नाही, मोठ्या विश्वासानं गाव सोडुन शहरात पाठवलं... आणि एके दिवशी अचानक तार आली.. ताबडतोब निघुन ये.. नाशिकला जाताना आई बाबांच्या बसला अपघात झालाय. तीला तो दिवस आठवला, गुहागरला घरी गेल्यावर आलेली शववाहीका आणि त्यातुन बाहेर काढलेले, कापडात घट्ट बांघलेले दोन मृतदेह...मृतदेहच ते आई बाबा उरलेच कुठे होते? मृतदेहांचे चेहरेही न बघण्याची सुचना ...अपघातानी छिन्नविछिन्न झालेल्यां त्यांच्या देहांचेही पोस्टमॉर्टम केले होते.. त्याच त्यांच्या शेवटच्या आठवणी !!
तीला भडभडुन आले तशी ती चहा प्यायला उठली.. चहा पोटात गेल्यावर कुठे तीला बरे वाटले.. अजुनही अनेकदा तीला आई बाबा आपल्याकडे कौतुकाने पाहताहेत असा भास व्हायचा. आज शुक्रवार, घरी जायचं या कल्पनेनचं प्रिया आज खुशीत होती. भरभर काम आटोपुन तीन पर्यंतची बस पकडायची.. नाही म्हंटलं तरी पुणे-गुहागर पाच एक तासाचा प्रवास होता... प्रियाचा दिवस भरभर चालला होता. काम संपल्याक्षणी ती मॅनेजरला सांगुन, सर्वांना दिवाळीच्या शुभेछ्या देऊन निघाली. कालची संध्याकाळ आपल्याला किती हळवं करुन गेली याचा हिशोब लावतचं ती रिक्षामधे बसली. "स्वारगेट चलो भैय्या" सांगुन शांतपणे ती रस्त्यावरची रहदारी, लोकं न्याहाळु लागली, नंतर तीच्या लक्षात आलं की रिक्षावाला हळुच आरश्यातुन तिच्याकडे कधी प्रश्नार्थक तर कधी संशयास्पद पाहत होता. तीला जरा विचित्र वाटलं पण तीनं फारसं मनावर घेतलं नाही. एरवी जर असं झालं असतं तर तीनं त्याला चांगलचं झापलं असतं आणि वर सर्व स्त्रीयांचा आदर करावा यावर एक छानसं भाषणही दिलं असतं. पण आजचा दिवस रोजच्यासारखा नव्हताचं, आज ती तिच्याच विश्वात गुंग होती.प्रतापसोबतंच आयुष्य या विचारापासुन तीला वेगळं होताच येत नव्हतं. त्या दोघांचेच असे स्वतंत्र क्षण!! कल्पनेनीच ती शहारली. आज एक अग्नीपरिक्षा पार पडली होती, त्यांच्या प्रेमाने एक वेगळीच पातळी गाठली होती आणि एक आश्वासन दिलं होतं की इतकी वर्ष दुर राहुनही त्यांचं एकमेकांवरचं प्रेम, जिव्हाळा यत्किंचीतही कमी झाला नव्हता. तोच तो निर्वाणीचा दिवस ज्या दिवशी आपण प्रेमाची खरी परीक्षा बघायची ठरवली, आपल्याला जे प्रेम वाटतेय ते निव्वळ शारिरीक आकर्षण तर नाही ना हे आजमावायचा घेतलेला निर्णय! आणि आजचा दिवस- त्या कालावधीचा शेवटचा दिवस! तश्या अधे मधे भेटी झाल्या पण कोणत्याही शारिरीक ओढीशिवाय, निर्मळ मनानी, त्याच गाण्याच्या बंधांनी, त्याच उत्कटतेनी शारिरापेक्षा मनानी जवळीक साधण्यासाठीच! आजचा दिवस सगळं सगळं बदलुन टाकेल, आजपर्यंतच्या प्रत्येक भेटीतुन जो विश्वास माझा माझ्या कृष्णावर आहे तोच विश्वास माझा प्रतापवर बसलाय... आणि प्रत्येक त्याच्याबद्दलच्या विचारातुन तो अधिक अधिक दृढ होत चाललाय. मीरा ज्या कृष्णाचं वर्णन करतेय तो प्रत्येक गुण मी प्रतापमध्ये ओळखु लागलेय.. तीची एक एक ओळ गुणगुणताना मला त्या पितळी मुर्तीतही त्याचाच चेहरा दिसायला लागतोय.. त्याच्यावरचा विश्वास आता माझी श्रद्धा बनु लागला आहे.. त्यापेक्षा निर्मळ त्यापेक्षा सहज काहीच नाही असा वाटायला लागलय.. आपल्याला जे हवं ते आपण देवाकडे मागतो पण देव आपल्याकडुन काहीच अपेक्षा ठेवणार नाही हे मात्र आपण आपल्या सोयीनं ठरवतो तसचं काहीसं माझं होतय.. मी प्रतापला ज्या ठिकाणी बघतेय, तसंच तो माझ्याविषयी काय आणि कसा विचार करतो हे मी आपलं सोयीनी समजुन घेतलेलं आहे.माझ्याजागी त्याला देव दिसण्याइतकी मी महान नाहीये, पण 'मी' त्याच्यावर श्रद्धा ठेवावी इतका सात्विक आणि निर्मळ तो नक्कीच आहे. त्यानी बोलावं आणि मी ऐकत रहावं, आयुष्य असचं भुरकन उडुन जावं असं तृप्त करणारं.. या क्षणाला मी आजीचं म्हणणं पुर्णपणे समजु शकतेय की एखाद्याच आपल्या आयुष्यात असणं ही गोष्टचं इतकी अमुल्य आहे की त्यापुढे सगळ्या आशा अपेक्षा वासनाच संपुन जातात.. अशी तृप्ती आयुष्यात येणं हेच खरं जगलेलं जीवन आहे.. आणि या भौतिक जगापलीकडच्या जगाची व्याप्ती त्यानंतरच तर सुरु होते... खरचं मला काय हवय हे कळायला लागलय बहुदा.. असा खरा मृत्यु की जो कोणत्याही इच्छेची पुर्ती न करता सुद्धा समाधानानी आत्म्याला मुक्त करतो... छे काय हे माझे विचार? आणि हे काय मी गुहागरला जाणार्या गाडीत बसले सुद्धा??
प्रिया खरचं तीच्या विचारात गुंगुन एखद्या रोबोसारखी गाडीत जाउन बसलीसुद्धा..काही तासातच तीचं गुहागर येणार होतं. फार मोठं नसलं तरी कोकणी पद्धतीची घरं! मोठठ अंगण, नारळी पोफळीची वाडी, सोप्यातला झोपाळा, सगळं आपलसं वाटायला लागायचं एकदम!! बस स्थानकापासुन चालत जाण्याचं अंतर, घर म्हणजे! रस्त्यात महादेवाचं मंदीर, डाव्या बाजुला कुंड, त्यातलं पाणी नेहमीच हिरवंशार आणि त्यावर नाचणारे बारिक बारिक डास.. छोटी छोटी दुकानं, त्यांच्या बाहेर विकायला ठेवलेली शहाळी.. दुकाने मागे टाकली की थोडी वस्ती मग बर्व्यांची शेती लागायची. मग एक छोटासा ओहोळ वजा ओढा. त्यावरचा छोटासा पुल.. लहानपणी त्या पुलावर बसुन ओहोळातल्या इटुकल्या माश्यांच्या करामती बघण्यात दिवस भुरकन उडुन जायचा.. तिथुन पुढे गेलं की अर्ध्या किलोमीटरवरुन उजवी कडेवळुन पायवाटेनी गेलं की कमळांनी गच्च भरलेला असा देवीचा कुंड! पुढुन उजवीकडे आर्यादुर्गेचं सुंदर आणि शांत मंदीर! संध्याकाळी असं या दिवाळीच्या सुमारास देवळात भजन, गाण्याचे कार्यक्रम होत, त्या वेळेस देवळाच्या आवारात गजबजाट असे. देवळाच्या बाजुची पायवाट पकडली की मुख्य रस्त्यावरच तर आपलं घर! एक हमर॑स्ता आणि दोन्ही बाजुला घरं, वरचा पाट आणि खालचा पाट कि संपला गाव. अंहं असं कसं संपलं? घरामागच्या वाडीतुन पुढे गेलं की खवळलेल्या समुद्राचा आवाज आणि पायाला झालेला तो ओलसर वाळुचा स्पर्श, रेतीत लुटुलुटु पळत जाणारे खेकडे.. गंमत वाटायची लहानपणी ! समुद्राचं अप्रुप नसलं तरी त्याच्यावर जीव पहिल्यापासुनच. याच समुद्राला साक्षी ठेउन प्रिया आणि प्रतापने ठरवलं होतं .. आपले मार्ग देगळे करुन दिशा एकच ठेवायची आणि हे प्रेम खरं ठरलं तर रितीरिवाजाप्रमाणे लग्नाच्या बंधनात बांधुन घ्यायचं!
त्या दिवशीची ती संध्याकाळ तशीच समोर आली.. आदल्या दिवशीच्या त्यांच्या विचारविनिमयानंतर ते आज दोघेही समुद्रावर भेटणार होते आपले निर्णय सांगायला. ती तर वेळेच्या बर्याच आधी येऊन खडकावर बसली होती त्याची वाट पाहत.. तळपत्या सुर्याकडे पाहत.. आणि त्याची क्षितिजं किती दुर असतील याचा विचार करत! प्रताप दिलेल्या वेळेत आला, तो बोलायला लागला "प्रिया आज तु नेहमीपेक्षा फार वेगळी दिसतेस, काल आपण ज्या गोष्टी बोललो त्याबद्दल तु खरचं खुप विचार केलेला दिसतोस.. आज तु खुप गंभीर आणि परिपक्व वाटतेस..पण माझा विचार पक्का आहे.. मुंबईमधे जाऊन गाणं हेच आयुष्याचं ध्येय बनवायचं आहे मला आणि तुझ्या आई बाबा आणि आजीनी तुझ्यासाठीपण संधीची कवाडं उघडुन दिली आहेत.. आपलं हेच वय आहे गं काहीतरी करण्याचं, आयुष्यातल्या संधीचं सोनं करण्याचं.. मला मला माहिती आहे की आपल्या भावना अगदी निर्भेळ आहेत. तु फारसं बोलली नसलीस तरी तुझे डोळे फार बडबडे आहेत ग. सगळं बोलुन जातात ते.. आणि माझ्यावर विश्वास ठेव.. एक दिवस आपण एकत्र असु..फक्त प्रेमावर जगत व्यवहाराच्या या जगात नाही जगता येत.. तेव्हा आपण आधी व्यवहार सांभाळु मग फक्त तु आणि मी!" त्याच्या डोळ्यातलं आणि आवाजातलं आर्जव ऐकल्यावर तीला शब्दच सुचेनात्, तीला हुंदका आवरला नाही तीने चेहरा हातानी झाकुन घेतला.. त्याचा पहिला स्पर्श !!... त्यानी तिचा हात बाजुला केला आणि टचकन पडणारा अश्रु आपल्या तळहातावर झेलला. त्या स्पर्शात किती दिलासा होता... तीला त्याच्या मिठीत शिरावसं वाटलं..पण त्यानी ते लगेच ओळखलं आणि म्हणाला आपण हे स्पर्श त्या संध्याकाळी साठी ठेऊया, जेव्हा पाच वर्षानी याच समुद्राला साक्षी ठेवुन तु आणि मी इथे कायमचं एकत्र येण्यासाठी भेटु! त्याने तिचा हात हलकेच दाबला, तसा त्या क्षणाना तिथेच थांबवण्याच्या इच्छेनी तिच्या मनात फेर धरला आणि तो बोलला "हे क्षण धरुन ठेवलेस तर आपले एकत्र येण्याचे क्षणही दुर निघुन जातील कदाचित कायमचे... विश्वास ठेव आपल्या श्री कृष्णावर!" त्याचे ते शब्द, तो निघुन गेल्यावर पण तीच्या कानत घुमत होते "आपल्या श्री कृष्णावर!". का कोणास ठाऊक पण त्या दिवशी तीला धन्य वाटलं. अश्या मंतरलेल्या क्षणांना अलगद मनात तीने बंदिस्त केले आणि त्या सागराला वचन देऊन निघाली की आम्ही परत इथेच भेटु आणि तु आमच्या प्रेमाची साक्ष देशील . असे ते क्षण, तो समुद्र आणि त्यांचा तो अतुट बंध प्रियाला विसरवणे अशक्य होतं.
अचानक मोठ्ठा आवाज झाला धाड्डड्ड... गचके देत बस थांबली, खिडक्यांच्या काचा थरथरल्या आणि बस बंद झाली. चालक ओरडला "टायर पंचर झालय..म्हनुन बस थांबल्या.. ष्टेपनी काडावी लागल.. बोंबा मरु नगा... आत्ता चालाय लागतीया तासाभरात". तीनं घड्याळ पाहीलं आणि चकीत झाली, रात्रीचे आठ वाजले होते. विचारांच्या भरात वेळ कसा गेला तीचं तीलाच कळलं नाही. खरं तर सात पर्यंत गाडी पोहोचायला हवी होती पण आता ही पीडा म्हंटल्यावर पोहोचायला नाही म्हटलं तरी दहा वाजतील. त्याच्यापुढे रिक्षा मिळणं किंवा कोणाची सोबत मिळणं ही शक्य नाही. आजीला निरोप द्यायचा पण मार्ग नाही.गावात मोबाईल ला रेंज नाही, एवढ्या रात्री टेलीफोन बुथ उघडं मिळायचं नाही. आली का आता पंचाईत? प्रतापशीही काही संपर्क शक्य नाही. आजीही काळजी करत बसली असेल आता उशीर झाला म्हणुन.छे हे काय होऊन बसलं? मला काहीच कसं लक्षात नाही आलं, अर्थात ही बस पंक्चर होईल हे मला काय आकाशवाणी होऊन कळणार होतं का? जाउदे जे होईल ते बघता येईल. तिन्ही सांजेला रामरक्षा म्हणते म्हणजे बरं वाटेल .. " भीमरूपी महारूद्रा वज्र हनुमान मारूती..." अरे हे काय हे तर मारुती स्तोत्र आहे... आज काही खरं नाही.. छे माझं चित्तचं थार्यावर नाहीये...पण मारुतीराया पण रक्षणकर्ता आहेच की शिवाय तो रामदुत आहे मग तो माझा निरोप देईल रामाला... ई हे काय विचार करतेय मी? रोज रामरक्षा म्हणणारी मी, आज मला तेही आठवेना. काहीतरी बिनसलय खरं... प्रियाला काहीच उमजेना.शेवटी तीनं मन वळावायला खिडकीतुन बाहेर चांदण्या बघायला सुरुवात केली... त्यातले निरनिराळे आकार शोधायला लागली. रिकाम्या पोटानी पण मोठ्ठ्या आवाजात साद घालायला सुरुवात केली होती. भुकेचं लक्षातच आलं नव्हतं ती निघाली तेव्हा... शेवटी आजचा दिवस खरंच काहीतरी अफाट वेगळा होता असं तीच्या ध्यानात आलं.. तीला ती रिक्षात बसल्यानंतरचं काहीही आठवत नव्हतं... खरंच मी इतकी गुंतले होते का? गुंतले असेन तर कोणात? प्रतापमध्ये कि त्याच्या विचारामध्ये?.. पुन्हा तीचं विचारचक्र सुरु झालं.
"मैं जानु नाही प्रभुको मिलन कैसे हुई, हाये मेरे सजना फिर गये अंगना, मै अभागन सोयी नही" गातानाचा प्रताप आणि त्याच्या आवाजातली वेदना जशीच्या तशी त्याच्या चेहर्यावर उतरायची.. जणु ती मीराबाईच त्याच्या गळ्यातुन आपली वेदना सांगतेय.. जणु काही ती त्याच्या समोर बसली आहे आणि ती त्याच्याकडुन गाऊन घेतेय... तीच दु:ख त्याला पुर्ण उमगलयं.. पण त्याचं अशी विरक्ती आणणारी गाणी ऐकुन ती कधीच कष्टी नाही व्हायची.... पण अशी गाणी तीला नेहमीच व्याकुळ करुन जात... देहभान हरपणं म्हणजे काय हे तीला उमजायला लागायचं .. किंबहुना तीला त्याचं व्यसनचं लागलं होतं जणु!
विचारांची तन्द्री भंगली कारण आता गाडी परत रस्त्यावर धावु लागली होती म्हणुन... भुकेनी आता तीला ग्लानी यायला लागली तसं तीनं सीटवर डोकं टेकवलं आणि तीचा डोळा लागला. दिड तासानी तीला जाग आली तेव्हा गाडी गुहागर स्थानकात पोहोचली होती...रात्रीचे साडे नऊ वाजुन गेलेले होते.. सगळं स्थानक रिकामं झालेलं! दुकानं, चहाचे गाडे सगळं काही बंद! जणुकाही आज कर्फ्यु लागला आहे गावात. एक चिटपाखरुही नाही.. तीला जरा जास्तीच आश्चर्य वाटलं... अरे कोणीच कसं नाही?भीतीची एक लहर तीच्या अंगातुन गेली...पण भ्यायचं कशाला? इतक्या सुंदर विचारांची सोबत असताना कसली आलीये भिती? हे तर आपलं गाव, नेहमीचा रस्ता... चालत चालत घर आलेलं पण कळायचं नाही... इथेपर्यंत नाही का आले इतक्या सहज... तसचं पोहचुन पण जाईन कळायच्या आत... अनोळखी का आहेत हे रस्ते मला? आणि याच विचारात प्रियाचे पाय घराची वाट चालु लागले. आज आकाश एकदम स्वच्छ होतं, चांदणंपणं बरंच होतं ... शहरातुन गावात आलं की आधी मोकळा श्वास घ्यावा आणि रात्रीच असं निरभ्र आकाश न्याहाळावं.. महादेवाचं देऊळ आलं तसे तीचे पाय आपोआपच तिकडे वळले.. पायातले चप्पल बाजुला काढुन तीनं महादेवाला बाहेरुनच मनोभावे नमस्कार केला आणि सांगितलं उद्या नक्की निवांत येइन! चालता चालता, सुंदर मन प्रफ्फुल्लीत करणारे विचार होतेच सोबतीला. दुकानं कधीच बंद झाली होती, रस्त्यावर रातकीड्यांशिवाय कोणाचाच आवाज नव्हता, दुर एखादं कुत्रं कुठुनतरी लांबुन केकाटत होतं... जरा विचित्रच होते वातावरण! एकंदरीतच तीला असा अनुभव कधीच आला नव्हता. थोडसं अमानवीय वाटत होतं तीला काहीतरी.. नक्की काय ते सांगता आलं नसतं... पण तीचे कान आपोआपच कानोसा घ्यायला लागले.. सगळ्या बारीक सारीक हालचालींचा..सगळे बारीक आवाज तीचे कान टिपत होते आणि तीला काहीतरी अघटीत घडणार आहे याची क्षणाक्षणाला जाणिव करुन देत होते... तीच्या मेंदुमध्ये मुंग्या यायला लागल्या.. मती गुंग व्हायला लागली.... छातीत ह्रदयाचे ठोके अजुन अजुन वाढायला लागले... ऊर फुटतो की काय अशी परिस्थिती आली... तीची मागे फिरायची पण हिम्मत होईना.. पाय पुढे उचलवेना.. म्हणतात ना वैरी न चिंती ते मन चिंती... तीने हे सगळे विचार मागे टाकुन पुढे जाण्याचा निर्णय घेतला... कमळाचं कुंड जवळ आलं तसं तीला अधिकाधीक बैचैनी जाणवायला लागली... प्रत्येक श्वासागणिक काहीतरी विचित्र आपल्या शरिरात भिनतयं असं तीला जाणवु लागलं... प्रत्येक उचलणारं पाऊल हे आपल्याला कोणतीतरी शक्ती जबरदस्ती उचलायला लावतेय असं वाटयला लागलं.... एक उग्र दर्प येऊ लागला... कदाचित कुंडातल्या शेवाळलेल्या पाण्यामुळे किंवा दलदलीमुळे असेल.. डोक जड जड होत चाललेलं... पायातले त्राण कमी होत चाललेले...उचललेल्या दर पावलानंतर शरिरातल्या प्रत्येक सांध्यात कोणीतरी शेकडो सुया टोचतयं असं जाणवु लागलेला.. डोळ्यावर गुंगीची झापड आलेली.. आणि नेमक्या त्याच क्षणाला पायात काहीतरी सळसळलं ....त्या वळवळणार्या जनावराची भिती छातीतुन धडधडत मेंदु... आणि तीथुन नसानसात भिनली.... तीनं खाली पाहीलं... ते कधीच निघुन गेलेलं... दुसर्या सेकंदाला तीन वर पाहीलं आणि तीचा चेहरा आणि त्या पांढरट विद्रुप आकृतीच्या चेहर्यामध्ये एक वितीचं अंतर होतं... तीची पापणी लवली आणि तो चेहरा गायब झाला... तीला जोरात किंचाळावसं वाटत होतं पण गळ्यात जणु काहीतरी अडकलं होतं ... तीला आपल्या असहायतेची चीड आली... पावलं अजुनही चालतचं होती पण... ती आहे त्या जागेवरच जणु चालत होती.. ती अजुनही त्याच कुंडाजवळ होती.. अंतर काहीच पार झालं नव्हतं... अचानक तीचे पाय तिथेच थिजले.. हवेत अनेक अस्पष्ट पांढुरक्या विद्रुप झालेल्या आकृत्या आपले छिन्नविछिन्न झालेले चेहरे घेउन मुक्त विहार करत होत्या... त्यांचे आकार सामान्य माणसापेक्षा बरेच मोठ्ठे होते... त्यातले काही काही तर तीच्या अगदी जवळ तरंगत होते...किती किळसवाणं होतं त्यांचं ते रूप.... काहींच्या डोळ्याच्या खोबणीतुन काळसर रंगाच्या द्रवाची धार लागली होती... काही जणांच्या अंगावर मोठाल्या जखमांचे व्रण, काहीजणांचे काही अवयव तसेच अर्धवट तुटलेल्या अवस्थेत होते...बरेच जण तार स्वरात विव्हळत होते... एक गोष्ट तीला कळली की हे सगळे वाईट मृत्यु आलेल्या लोकांचे अस्वस्थ, मुक्ती न मिळाल्याने असेच भटकत असणारे आत्मे आहेत... आणि आपल्याला असा मृत्यु अपेक्षीत नाहिये... मृत्युनंतरचा आपला संचार सुंदर असला पाहिजे...प्रिया जणु त्या जागीच थिजली होती... मरताना या अश्या आठवणी घेऊन आपण डोळे मिटणार या कल्पनेनीच तीला हुंदका दाटुन आला.. आवंढा गिळायचीही तीला हिम्मत होत नव्हती... आपण हा सगळा चाललेला तमाशा असाच बघत राहायचा? छे!! तीला अचानक आजी आठवली... हातपाय गोठायला लागलेले.. रामरक्षा... रामरक्षा...?? तीला ओळी आठवेनात्..मेंदुने असहकार आंदोलन सुरु केलं.... एव्हाना त्या सगळ्या आकृत्यांनी तीच्या भोवती फेर धरलेले...जणु काही तीला व्यापुनचं टाकणार.. तीच अस्तित्वचं नाहीसं करणार आता त्या... सगळं वातावरण थंडथंड होऊ लागलं, रक्त गोठवणारं... आपल्या शरिरातुन कोणीतरी सगळा जीवनरसचं काढुन घेतय असं तीला जाणवु लागलं.. घेरी यायला लागली... एक मन सांगत होतं आता सगळं संपलं!!! तर दुसरं मन अजुनही सांगत होतं तु लढशील.. तुझी श्रद्धा पणाला लाव... स्मरण कर्....स्मरण कर...आयुष्यातले सुंदर क्षण ती आठवु लागली.. आजी, प्रताप, मीरेची भजनं, देवघरातली श्रीकृष्णाची मुर्ती.... माझ्या कृष्णाचा चेहराही मला आठवत नाहीये या विचारानीच प्रिया कोलमडली...ती स्वतःला समजावत होती की आपण कदाचित एखाद्या दु:स्वप्नात असु आणि डोळे उघडले की सगळं पुर्ववत असेल.. पण जसजसा तीचा श्वास क्षीण होत गेला तसतसं तीला कळुन चुकलं आता आपण वाचत नाही... जे काही तिच्यासमोर घडत होतं ते सगळ खरं होतं आणि ते का होत होतं याची तीला काहीच कल्पना नव्हती..... देवाच्या धावा करायलाही डोळे मिटेनात, विस्फारलेल्या डोळ्यांनी तीला ते पाहणं भाग होतं... ती हारली होती.. सगळी स्वप्न धुळीला मिळाली होती.. ती त्या दोघांची तपश्चर्या अर्ध्यावर सोडुन चालली होती... हेच का ते दुर्भाग्य म्हणतात ते... ती कोसळली शेवटचीच... सगळं संपलं... उद्या कदाचित तीचं शरीरही उरणार नव्हतं इथे... आयुष्यात तृप्तीने आलेलाच मृत्यु खरा.. मी जर तृप्त असेन तर मला कशाचीही ओढ राहणार नाही ...या आत्म्यांसारखी कष्टी राहणार नाही... मला मुक्ती मिळेल..मी माझ्या आयुष्याचा कार्यभाग पुर्ण केलेला आहे आणि मला कोणत्याही वासना उरलेल्या नाहीत मी मरणासाठी सिद्ध आहे... आता मला कशाचीच भिती नाही... मला राग लोभ मत्सर वासना क्रोध.. कोणत्याच भावना उरलेल्या नाहीत... तीनं मनात आजीला नमस्कार केला... आणि तीच्या कानात स्वर घुमु लागले... "अस्यश्री रामरक्षा..स्तोत्रमंत्रस्य... बुधकौशिक ॠषी......" कोणाचा हा आवाज?? ओळखीचा एकदम... प्रतापचा आवाज !!!... तीने शांतपणे डोळे मिटले......
प्रियाचे डोळे उघडले तेव्हा सकाळ झाली असावी... तीच्या हातात तोच थरथरणारा किंचीत अजुन कापरा झालेला आजीचा हात होता... आजीचा उबदार हात?? आणि जे काही रात्री घडलं ते?? निव्वळ स्वप्न?? शक्यचं नाही.. ते स्वप्न नव्हतं ते सगळं तीन अनुभवलं होतं... ते स्वप्न नव्हतं.. प्रिया आपल्या मनाची समजुत घालत होती.. प्रियाच्या मनात विचारांचं काहुर उठलं.. डोळे उघडायची पण ताकद नव्हती... किंबहुना आपण जीवंत आहोत हेच तिच्या मनाला पटत नव्हतं.. तीची हालचाल जाणवल्यावर आजीनी मायेनी तीच्या डोक्यावरुन हात फिरवला.. तसे प्रियानी डोळे उघडले.. आजीनी डोळ्याला लावलेला पदर तीनं हेरला.. आजीनी तीच्या नावानी हाक मारली तशी तीला तरतरी जाणवली आणि आपण जीवंत आहोत हे लक्षात आलं... तीला आनंद झाला.. मी त्या भयानक अनुभवातुन हरलेली असताना आज मी इथे कशी? तीच्या चेहर्यावर चिंतेच जाळं पसरलं...... डोकं जड होऊ लागलं.. शेवटची आठवण म्हणजे प्रतापचा आवाज.. !!! प्रतापचा विचार आला तसं ती निपचीत पडली.. अचानक तीला त्याची गरज भासु लागली.. एक अनामिक ओढ जाणवु लागली.. आत्ता या क्षणी तो इथे हवा होता.. मी काय दिव्य्यातुन गेलेय हे सांगणं अशक्य आहे ..कोण विश्वास ठेवणार माझ्यावर? आजीलाही काही माहित नाहीये प्रतापबद्दल.. छे काय दिवस येतात.. इतके दिवस स्थितप्रज्ञ राहीलेली मी अशी अचानक का विचलीत झाले.. काहीतरी कारण असले पाहीजे.. उगाचच नाही होणार असं... आजी तीच्यासाठी लिंबुपाणी बनवायला ऊठली आणि तीने हाक दिली.. "प्रताप आत या लवकर.. प्रियाला जाग आलीये.." त्या हाकेसरशी प्रिया इतकी प्रफुल्लीत झाली की तीला प्रश्न पडला.. काल रात्री आपण अनुभवलेलं ते स्वप्न? की आपण ज्याचा विचार करतोय तीच व्यक्ती त्याच क्षणी समोर ऊभी राहते हे स्वप्न?.. प्रताप आत आला तसा तीचा बांध फुटला.. आजीनी खुणेनीच तीला सांगितले.. प्रतापने तीला सगळं सांगितलं आहे आणि सर्वकाही ठिक आहे.. शांत रहा.. !!
प्रताप जवळ आला तसं तीला रडु आवरेना.. ती त्याच्या गळ्यात पडुन खुप खुप रडली.. त्यानं तीला थांबवलं नाही.. उलट तीला मोकळं होऊ दिलं... तीचे हुदंके ओसरले तसे तो बोलु लागला... " काल संध्याकाळ पासुनच मला हुरहुर लागली होती.. तु येणार या कल्पनेनीच मी खुप आनंदात होतो.. आई बाबांशी कालच बोलुन घेतलं .. त्यानाही तुला भेटायची उत्सुकता होती... तुला सरप्राईज द्यायला म्हणुन काल संध्याकाळीच मी आजींशी बोलायचं ठरवलं अगदी तु पोहोचायच्या आत!! मी पोहोचलो तेव्हा दिवेलागणीची वेळ झालेली... ओसरीवर आजी त्यांच्या मैत्रिणींसोबत गप्पा मारत होत्या.. ही वेळ योग्य नाही म्हणुन मी समुद्रावर भटकुन यावं ठरवुन तिथुन थेट समुद्र गाठला.. गार गार हवा आणि तुझ्या आठवणींनी मला भरुन यायला लागलं.. तुझ्या आवडीची गाणी मी गुणगुणायला लागलो.. आणि मी कधी आणि किती वेळ तसाच गुंगलो होतो काही कळलंच नाही... मला काहीतरी अभद्र घडण्याची चाहुल लागायला लागली.. पण मी तीथेच थिजलो होतो... माझ्या डोळ्यासमोर फक्त तु आणि तुझे विचार होते.. मी जसे डोळे मिटले तशी मला तु स्पष्ट दिसायला लागलीस... मला सगळं दिसत होतं ... तु पायवाट चालते आहेस.. रात्रीच्या वेळी.... त्या कमळांच्या कुंडाजवळ आल्यानंतरची प्रत्येक गोष्ट न गोष्ट मला दिसत होती... समाधी लागणं यालाचं म्हणतात बहुदा.. तुझ्या त्या अवस्थेनी मला संधी दिली... तुझ्या निर्मळ आणि निर्भेळ प्रेमामुळे मला ही उंची गाठता आली प्रिया.. मी तिथुन तडक उठलो आणि कुंडाच्या दिशेनी निघालो.. मला कसलीच भावना उमगत नव्हती.. मी अंगारानी पेटलो होतो.. सत्य विरुद्ध असत्य... जीवन विरुद्ध मृत्यु... "तुझा" लढा आता "आपला" लढा झाला होता.. तुझ्या संकटात जेव्हा तु कमजोर पडलीस तेव्हा मी तुझ्या बाजुने लढायला समर्थ झालो... तु कोसळलीस तेव्हाच मी तीथे पोहोचलो.. रात्रभर तेच चालु होतं त्यांनी मलाही काबीज करण्याचा प्रयत्न केला... आपण लढुन थकल्यावर नेहमीच गुरुला शरण जाणं हे सगळ्यात महत्वाचं आहे... मी तोच शेवटचा आणि जालीम उपाय योजला.. आणि आज आपण दोघंही सुखरुप आहोत... विजय नेहमी चांगल्याचाच होतो.. लक्षात ठेव.. आपला या जगातला कार्यभाग अजुन बाकी आहे... आणि ज्या दिवशी तो संपेल.. त्या दिवशी आपण एकत्रच जाऊ अनंतात..या जगाला आपली अजुनही गरज आहे... आपल्या प्रेमाची साक्ष अजुन त्या समुद्राला द्यायची आहे.. आपण त्याला दिलेलं वचन आज पुर्ण होणार आहे .. आज आपण समुद्रावर भेटणार आहोत ते राखुन ठेवलेले क्षण जगायला आणि तु अर्ध्या रस्त्यातच निघुन जाणार होतिस?? माझ्यावरचा तुझा विश्वास आणि तुझ्यावरचा माझा विश्वास हा अखंड राहणार आहे... त्याचा प्रवासही आणि त्याचं आस्तित्वही आपल्या या प्रेमासारखाच नितांत असणार आहे!!! कधीही न संपणारं!!! नितांत!!!"
(समाप्त)
अगदि. उत्तम. वेल लावलात. पन
अगदि. उत्तम.
वेल लावलात. पन मस्त जमवलत.
खुप चान्गली लिहली आहे.
खुप चान्गली लिहली आहे.
सुंदर लिहिलियं. म्हणुनचं त्या
सुंदर लिहिलियं.
म्हणुनचं त्या कुंडाचं पाणी हिरवं झालयं वाटतं .
फारच छान !!
फारच छान !!
छान
छान
..आवडली! .. ...sorry पण
..आवडली! ..
...sorry पण प्रिया बस मधुन उतरल्यानंतरच नाही कळ्लं!(कमळांच्या कुंडाजवळच्यानंतरच)
सॉरी पण कळली नाही. तिचा अपघात
सॉरी पण कळली नाही.
तिचा अपघात झाला का?
हं!!
हं!!