खान वकीलांनी बावाजींची बारीक-सारीक माहिती काढायला सुरु केली. पण त्यांच्या लक्षात आलं की सारा व्याप सांभाळून या बावाजींच्या प्रकरणात घुसणं काही व्यवहार्य नाही. म्हणूनच त्यांनी बिनॉयला आवश्यक सूचना देऊन कामाला लावलं होतं. ते काम फत्ते करून बिनॉय आज आला होता.
ते उतावीळपणे ज्या निरोपाची वाट पहाट होते, तो निरोप अखेरीस आला. बिनॉयचा फोन आला. त्याला खान वकिलांनी संध्याकाळीच भेटायला बोलवलं.
बिनॉयनं अगदी बित्तंबातमी काढली होती. बावाजी एकटेच रहात. घरी कोणीच नाही. शेजा-यांशी बोलून-चालून साखरेपेक्षा गोड. पण त्यांच्या बायको-पोरांबाबतची माहिती कोणालाच नव्हती, त्यांनी कधी सांगितलं नाही. बावाजी दुकानही एकटेच सांभाळत होते म्हणजेच जी काही लिखापढी आहे, ते एकटेच करत होते. ते गेल्यानंतर वारस नाही. पोलिसांनी पेपरला फोटोसह बातमी दिली. महिनाभरात कोणीतरी लांबचा नातेवाईक येऊन सारं सामान घेऊन गेला होता. आता त्याचा पत्ता शोधता-शोधता बिनॉय वैतागला. पत्ता होता मुंबईचा. तिथं पोहोचल्यावर बिनॉयला कळालं की तो एन.आर.आय. आहे. त्याचा संपर्क होईना. बिनॉयनं डोक्याला हात लावला. पण आता हे खान वकीलांना सांगून फायदा नव्हता. शेवटी इकडून तिकडून सारं जुळवून बिनॉय त्याच्यापर्यंत पोहोचला. त्याच्याकडून बावाजीच्या पसा-याची माहिती घेतली आणि स्वत: गेला. त्या पसा-यात त्याला जे हवं ते मिळालं होतं. बावाजीच्या दुकानाचं स्टॉक रजिस्टर आणि त्यांची डायरी.
हे असे उद्योग तोच करु जाणे. म्हणून तर खान वकीलांनी त्याला धरुन ठेवलं होतं.
खुनाच्या दिवशी स्टॉक रजिस्टरला डीव्हीच्या हस्ताक्षरातल्या नोंदी होत्या. त्याखाली बावाजींनी रोजच्या सवयीनं वेळ लिहून सही केली होती. वेळ होती रात्री २:३०. बावाजी दैनंदिनी न चुकता लिहीत होते. रोजच्या घडामोडी अगदी २-२ पानभर लिहीलेल्या सापडल्या. त्या रात्री पोरानं बावाजीला सांगितलेला किस्सा बावाजीनं ८-१० ओळीत लिहून ठेवला होता. आज त्यामुळं घरी यायला रात्रीचे पावणेतीन वाजले हेही लिहिलं होतं.
हे पुरावे खान वकिलांनी सादर केले. डायरी आणि स्टॉक बुक हस्ताक्षर तज्ञाकडं गेलं. त्यावर पोलिसांच्या हस्ताक्षर तज्ञाचं अनुकूल मत आलं. पोराची इतकी सबळ अॅलीबी खोडून काढणं तपास अधिकारी आणि सरकारी वकील दोघांनाही जमलं नाही. प्रकरणाचा निकाल त्याच दिवशी आरशासारखा लख्ख दिसू लागला.
प्रकरण युक्तीवादावर आलं.
खान वकील बोलू लागले, “अंडाभुर्जीवाल्यानं दोघांना केवळ त्याच्या गाडीवर आल्यावर एकत्र पाहिलं होतं. पण एकत्र येताना पाहिलं नव्हतं. एकत्र जाताना पाहिलं नव्हतं. दोघं मागं-पुढं गेले. पण त्यांना एकत्र कधीही पाहिलं नव्हतं. त्यावेळी त्याच्या गाडीवर अजून गि-हाईकं होतीच. तीही भुर्जी खाऊन निघून गेली होती. मग त्यापैकी हाच गुन्हेगार कसा? निव्वळ संशय म्हणून?
माझ्या अशीलानं पाण्यात काय टाकलं? किंवा टाकलं की नाही हे ही सरबतवाला ठाम सांगू शकत नाही. त्यानं प्रखर उजेडातून ५० मीटर अंतरावर रस्त्यावरच्या एका ट्यूबलाईटच्या मंद प्रकाशात यांना जाताना पाहिलं. तेही पाठमोरं, चेहरा दिसत नसताना, जवळचा चष्मा घालून. डॉक्टरांची साक्ष पाहिली तर अशा परिस्थितीत साक्षीदार स्पष्ट पाहू शकणार नाही. इतक्याच अंतरावर समोर लावलेला ‘पार्किंगचा’ बोर्ड साक्षीदार भर दिवसा वाचू शकला नाही; तेही कोर्ट रुमपेक्षा रस्त्यावर उजेड प्रखर असताना.
केवळ शर्ट पांढरा होता, एवढंच सरबतवाला सांगू शकतो. पण दुकानात येणारे अर्धे लोक पांढरा शर्ट घालतात हेही त्यानं स्वत:हून सांगितलं आहे. म्हणजेच सायकलवर माझा अशील होता. हाही केवळ संशयच.
अशीलाच्या चपलेला मयताच्या रक्ताचा चिखल लागला होता. पण घटनास्थळी अशीलाच्या चपलेचे ठसे मिळाले हे सरकारी पक्ष सिद्ध करु शकला नाही.
सायकलच्या मडगार्डला लागलेलं रक्त मयत व्यक्तीचं आहे. म्हणजेच दंडावर झालेली जखम अशीलानं सांगितलं त्यानुसार सायकलमुळं झालेली आहे. हे फोरेन्सिक अहवालात सिद्ध झालंय. तेच रक्त त्या मुलीला आधार देताना अशीलाच्या शर्टला लागलं आणि तेंव्हाच मयताच्या नखानं अशीलाच्या हाताला ओरबाडलं गेलं. हे खोटं आहे हे सिद्ध करण्याचं बर्डन सरकारी पक्षावर आहे. ते तो सिद्ध करु शकला नाही.
बाटली, कोल्ड्रींकचा कॅन, शर्ट, चाकू हे सारे पुरावे नष्ट करण्यासाठी अशीलाकडं आठ दिवस होते. पण त्यानं ते नष्ट केले नाहीत कारण आपल्यामागं त्या मुलीचा खून झाला हे त्याला माहितच नव्हतं. कोणताही गुन्हेगार पुरावा नष्ट करतो, सांभाळून ठेवत नाही.
अशीलानं चाकूनं मयताचा गळा कापला असता तर रक्त अशीलाच्या शर्टच्या कुशीत कसं लागेल? यावर सरकारी पक्षाकडं उत्तर नाही. अशील सायकल घेऊन तिथं गेला, तर तिथं उमटलेल्या सायकलच्या टायरची नक्षी आणि आरोपीच्या सायकलची नक्षी एकच आहे हे सरकार पक्ष सिद्ध करु शकला नाही.
बावाजींच्या स्टॉक रजिस्टरची एन्ट्री आणि डायरीतल्या नोंदी बावाजींनीच केल्या आहेत असं फोरेन्सिकचा अहवाल म्हणतो. आणि त्या रात्रीच ते मरण पावले. म्हणजेच खून उघडकीला आल्यानंतर मयत व्यक्तीनं डायरी लिहिली का? अशील पोलीस कस्टडीत आणि नंतर एमसीआरवर होता. म्हणजे त्यानंही स्टॉक रजिस्टरला नंतर नोंदी लिहिण्याची शक्यता शून्य आहे. म्हणजेच खून झाला त्यावेळी अशील बावाजींच्या दुकानात नव्हता, घटनास्थळी होता हे सरकारी पक्ष सिद्ध करु शकला नाही.
महोदय, हा एका व्यक्तीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. केवळ संशयावरुन अशीलाला यात अडकवलं गेलं आहे. सरकारी पक्षाकडं कोणताही ठोस पुरावा नाही. पण आमची ॲलिबी सरकार पक्ष खोडून काढू शकलं नाही. त्यामुळं निव्वळ संशयाचा फायदा आम्हाला नको. एकही संशयातीत पुरावा नसताना गुन्हा सिद्ध होऊच शकत नाही हे माझं म्हणणं आहे.
सोबत खान वकीलांनी किमान अर्धा डझन केस लॉ मांडले. सरकारी वकीलांनी बोलण्यासारखं आता काही राहिलं नव्हतं. खान वकीलांनी बचावाची जी मांडणी केली होती, ती पाहिली तर या प्रकरणात अपील होण्याची शक्यता शून्य होती.
चौथं वर्ष संपता संपता पोरगं निर्दोष सुटलं. इतक्या झटपट निकाल लागलेली कदाचित राज्यातली ही एकमेव केस असावी. पाणावलेल्या डोळ्यांनी खान साहेबांनी त्याला उरी घट्ट धरलं.
‘श्री’ पेढा शहरात प्रसिद्ध. खान वकिलांनी त्याच्या दुकानाला अकरा वाजताच कुलूप लावलं. सारं दुकान खरेदी करून टेम्पोभर मिठाई पूर्ण कॉलेजमध्ये वाटली.
या वर्षी डीव्ह्यानं पेटून अभ्यास केला होता. कॉलेजचं नाव गाजवलं. कॅम्पस इंटरव्ह्यूला त्याला नावाजलेल्या जर्मन कंपनीनं उचललंच होतं. इकडं डीग्री घेतली अन् तिकडं तो निघून गेला. एक-दीड वर्ष बघता बघता निघून गेलं. डीव्ह्यानं बुद्धीची झलक तिथंही दाखवली. पहिल्या सहा महिन्यातच मॅनेजमेंटनं त्याला वर घेतलं.
दोन्ही पाटील कुटूंबं डीव्ह्याच्या आई-बापासोबत त्यानं पाठवलेली तिकीटं हाती धरून रात्री अकराच्या विमानाची वाट पहात विमानतळावर बसली होती. खान वकीलांनासुद्धा त्यानं तिकीट पाठवलंच होतं. पण त्या तिकीटावर सरळ सरळ जाऊन येतील तर ते खानसाहेब कसले?
खान वकीलांनीत्यांना पाठवलेलं तिकीट रद्द करून या सहा जणांच्या जंबो युरोप सहलीचं पॅकेज डीव्ह्याच्या घरी पाठवलं आणि डीव्ह्याला फोन केला, “मेरे रसगुल्ले, गधे! माझ्यापेक्षा मोठा झालास की माझं तिकीट काढशील.”
डीव्ह्याला रडू आवरेना झालं होतं.
समाप्त
अंत भला तो सब भला
अंत भला तो सब भला
पब्लिकच्या प्रेशरमुळे घाईत केलाय का शेवट
कथेचा सुखांत मस्त.
कथेचा सुखांत मस्त.
डीव्ह्या परदेशात गेला ते बरंच झालं.
सगळे भाग वाचले . डीव्ह्या चे
सगळे भाग वाचले . डीव्ह्या चे पुढे काय होणार याची उत्सुकता छान ताणली गेली . पण सुखांत झाला बघून खूप बरे वाटले . सगळीच दुनिया वाईट नाही अशी आशा करायला हरकत नाही .
शेवट जरा घाईत झाला आणि तसा
शेवट जरा घाईत झाला आणि तसा सरळसोट झाला.
पण एकंदरीत कथा वाचायला मजा आली.
वावे +१
वावे +१
साठा उत्तराची कहाणी पाचा
साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.. पण ठिकै, शेवट गोड झाला. कथा मस्त रंगतदार होती.
सर्वप्रथम धन्यवाद... कथा
सर्वप्रथम धन्यवाद... कथा पूर्ण केल्याबद्दल
छान शेवट! वाचताना डोळ्यात
छान शेवट! वाचताना डोळ्यात पाणी आले. एकंदर खिळवून ठेवले कथेने..
मस्तच ! पण त्या मुलीचा खून
मस्तच ! पण त्या मुलीचा खून कोणी केला हे रहस्य तसंच राहिलं. त्यालाही closure मिळालं असतं तर अजून भारी वाटलं असतं.
वावे_ +१ कथा छान होती.
वावे_ +१
कथा छान होती.
काय राव गुंडाळून टाकला शेवट,
काय राव गुंडाळून टाकला शेवट, बघा विचार करा आणि थोडं सविस्तर लिहा. शेवटचा भाग आमच्या दबावाखाली आटोपता घेतलाय काय?
वा .. मस्तच .
वा .. मस्तच .
ह्म्म... खरच आमच्या दबावामुळे
ह्म्म... खरच आमच्या दबावामुळे खूप घाईघाईत शेवट केल्यासारखा वाटतेय..
शेवट गोड झाला ते एक बरं झालं.
शेवट गोड झाला ते एक बरं झालं.... पण त्या तरुणी चा खुन कोणी केला हे पण उलगडलं असतं तर संपुर्ण क्लोजर मिळालं असतं असं वाटलं
पण खुपच आवडली ही कथा... रोज वाट बघत होतो पुढच्या भागाची...
Khuni kon hota te hi savistar
Khuni kon hota te hi savistar kalayla pahije.
खून त्याने केला नव्हता हे
खून त्याने केला नव्हता हे माहितच होते.....खुनी कोण आहे हे सुद्धा कथेच्या ओघात आले असते तर कथा खुप रंगली असती
़कोणी काहीही म्हणू दे खूप
़कोणी काहीही म्हणू दे खूप छान कथा आणि खूप गोड शेवट