!!असंही होऊ शकतं!!
कधी एकदा आभाच्या घरी पोचतोय असं झालं होतं प्रणयला. असं झालं होतं गाडी दोनशेच्या स्पीडने पळवावी. आभाशी लग्न ठरल्यापासून स्वतःवर जाम खुश होता तो!
कारण स्थळ होतंच तसं चहुअंगांनी समृद्ध. तसा तो आभापेक्षा कुठे कमी होता असं नाही. मामला बरोबरीत होता. म्हणजे तो एकदम लख्ख गोरा; जिमवाली मेंटेन्ड बॉडी, स्टायलिस्ट. एकदम हँडसम!… पारखी नजर पुन्हापुन्हा वळून बघेलच असा…
आभा तशी दिसायला जरा सो-सो. थोडी सावळी. नाकी-डोळी नीटस होती म्हणून बरी आहे असं म्हणायचं. नाहीतर फारशी अपिलिंग नव्हती. थोडक्यात त्याच्या दृष्टीने… डाऊनमार्केट!...
पण… आभा सीएस होती. आणि तिला बीपीएल सारख्या नामांकित कंपनीत नोकरी होती. म्हणजे जॉब फिक्स. तिचा स्वतःचा मुंबईत टूबीएचके फ्लॅट होता. शिवाय तिच्या कंपनीच्या क्वार्टर्समध्येही थ्रीबीएचके मिळू शकला असता. भाऊ अमेरिकेत सेटल होता. आईवडिलांचा बोरीवलीला टूबीएचके फ्लॅट होता. तिघांच्याही स्वतःच्या गाड्या होत्या. म्हणजे तो लग्नानंतर मुंबईत नोकरी घेऊन अगदी मजेत राहू शकत होता. एकुलती एक म्हटल्यावर दिमतीला सासूसासरे होतेच…
तसा प्रणयही सुखवस्तू घरातलाच होता. आईवडिल दोघेही पुण्यातले प्रतिष्ठित डॉक्टर होते. त्यांचा पुण्यात बंगला होता. शिवाय मोठा भाऊ, वहिनी दोघे डॉक्टर होते. त्याच्या सगळ्यांच्या गाड्या होत्या. पण त्याचं स्वतःचं मात्र काही नव्हतं. आता गाडीसुद्धा त्याने आईचीच आणली होती.
तो इंजिनिअर होता पण नोकरीत स्थैर्य नव्हतं. पुण्या-मुंबईत ट्राय करून काही झालं नव्हतं. आणि गेली दोन वर्षं बँगलोरलाही नोकरीत चाचपडतच होता. थोडक्यात… धडपडीला कंटाळला होता…
सिग्नलला अर्धा तास एकाच जागेवर थांबून प्रणय अगदी उबला होता. पण मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये फक्त शिव्या घालून संताप व्यक्त करण्यापलीकडे काहीही करणं शक्य नव्हतं. प्रणयच्या मनात आलंच... यार, आभा थोडी फ्री असती तर मस्त गप्पा मारत मारत प्रवास संपला असता...
पण भलतीच शिष्ट दिसतेय. बघायला गेलो तेव्हाही, आणि एंगेजमेंटच्या दिवशीही आपली आपल्यातच होती. आई म्हणाली होती...“जरा प्राऊडी वाटतेय ! मोकळं बोलली नाही! जेवढ्यास तेवढं उत्तर देत होती!”… तिला सांगितलं… “मला अशीच बायको हवीय! तिला नसेल सवय बडबड करायची, असंही होऊ शकतं ना? हायर पोस्टवरच्या मुली थोड्या अशा रिजर्व्हडच असतातच!”...
पण आता प्रणयला वाटत होतं… काही खरं दिसत नाही. मामला आऊटडेटेड वाटतोय. म्हणजे लग्न ठरून दहा दिवस झाले आणि एंगेजमेंट होऊन दोन दिवस झाले. एकदाही स्वतःहून फोन केला नाही. पुन्हा काल आपण घरी फोन केला भेटायचं आहे म्हणून तर आईने घेतला. आणि तिला हाक मारली. मग हीचं तसंच फक्त... "हां, हुं"... चाललेलं. वैताग आणला नुसता...
असं कुठे असतं हल्ली! मुली वाट बघत असतात! नशीब भेटायला तरी तयार झाली! म्हणाली नाही... “लग्न झाल्यावर”...आता आज बघू! काय करतेय. एंगेजमेंटनंतर पहिल्यांदा जातोय भेटायला. आणि आता एकदम लग्नानंतरच भेटणार म्हटल्यावर…
मोबाईलची रिंग वाजली तेव्हा प्रणयला वाटलं, आभाच्या घरून केला असेल. पण बघतो तर निकीचा होता. आता तो निकीशी बोलायच्या अजिबात मूडमध्ये नव्हता... त्याला प्रश्न पडला… काय करावं? कट केला तर तिला कळेल घेत नाहीय ते! तसाच चालू ठेवायचा म्हणजे डोकं फाटणार. पण इलाज नाही. आधीच गेला आठवडाभर तिला टाळतोय हे तिच्या लक्षात आलंय... त्याने फोन तसाच राहू दिला.
तेवढ्यात सिग्नल क्लीयर झाला. त्याला हायसं वाटलं. आता वीस मिनिटात आभाचं घर येणार होतं. थोड्या वेळाने मोबाईलची रिंगही बंद झाली.
प्लॅटिनियम पार्क येताच गाडी गेटजवळच थांबवून प्रणयने आभाच्या घरी फोन लावला. नेहमीप्रमाणे तो आभाच्या आईने घेतला...
ही फोनजवळच बसूनच असते कि काय?... असं त्याच्या मनात आलंच पण डोकं शांत ठेवून शक्य तितक्या नम्रपणे त्याने विचारलं....
"नमस्कार आई! मी प्रणय! मी खाली गेटजवळ गाडीत आहे. आभा तयार असेल तर डायरेक्ट खालीच येईल का?"
"छे! छे! अहो असं कसं चालेल? तुम्ही वरती या बघू!आम्हाला जावयाचं थोडं आदरातिथ्य करुदे ना!"..आभाच्या आईचा उत्साह अगदी बोलण्यातून ऊतू जात होता.
"सॉरी आई! आलो असतो पण मग निघेपर्यंत काळोख पडेल. त्यापेक्षा मी जातांना येतो ना? प्लिssज!"...
मनातून प्रणय वैतागला होता. त्याला फक्त आभाशी कर्तव्य होतं आणि असं नाईलाजाने तिच्या आईला झेलायला लागत होतं.
"ओके, ओके! बरोबर आहे तुमचं. पाठवते आभाला. बाकी? सगळं ठीक!"
"हो हो! एकदम. ऑलवेल!"...
प्रणयला हायसं वाटलं…“कटलीएकदाची”... म्हणत सहज त्याने साईड मिररमधे चेहरा पाहिला आणि स्वतःवरच खुश झाला. मनात म्हणाला...उगाच नाही पोरी मरत! आजचा आपला हा किलर लूक बघून आभा अगदी स्वतःहूनच गळ्यात पडेल...एस! असंही होऊ शकतं!...
प्रणय आभाला भेटायला जाम उतावीळ झाला होता. अगदी गेटकडे डोळे लावून बसला होता. लगेच त्याच्या लक्षात आलं… निकीचा फोन!... आता आभा आल्यावर डिस्टर्बन्स नको! आणि निकीचा फोन तर अजिबातच यायला नको. बाकी घरचे सगळे समजून जातील... त्याने मोबाईल ऑफ केला... आता दोघांमध्ये कोणीही येणार नव्हतं. काय बोलायचं, कसं वागायचं, याची डोक्यात उजळणी झाली होतीच. आता फक्त प्रात्यक्षिक बाकी होतं…
आभाला येतांना पाहिलं आणि प्रणयने निश्वास टाकला... अर्धी लढाई फत्ते होती…
पण आज त्याला ती पाहिल्याइतकी खास वाटली नाही. लेमन कलरचा लखनवी ड्रेस तिच्या सावळ्या रंगाला अजिबात सूट होत नव्हता. मुळात साडीइतका तिला ड्रेस सूटच होत नाही असं वाटलं त्याला!
आभा गाडीजवळ येताच प्रणयने शेजारच्या सीटवर वाकून तिच्यासाठी दरवाजा उघडला. आणि तिच्याकडे बघून...”हाय!”... म्हटलं. तिने फक्त स्माईल दिलं आणि बसताच सीट बेल्ट लावला. प्रणयने नोटीस केलं… भारी शिस्तीची दिसतेय....
प्रणयने आभासाठी आणलेला बुके आणि मोठं कॅडबरी तिला दिलं, तेव्हा त्याला वाटलं होतं, काहीतरी बोलेल आणि संभाषण सुरु करता येईल. निदान कुठे जायचं विचारेल. पण तिने.. "थँक्स".. म्हणून ते घेऊन समोर ठेवलं आणि नुसतीच बसून राहिली...
आता तिला बोलतं करण्यासाठी आणि वातावरण मोकळं करण्यासाठी त्याला मुध्दाम काहीतरी करायला हवं होतं. त्याने विचारलं…
"निघायचं?"...
आभाने होकारार्थी फक्त मान हलवली.
खरंतर आता अजून त्याला ट्रॅफिकमधे वेळ घालवायचा नव्हता. आणि गोराई बीच तसा घरापासून पाच-दहा मिनिटावर होता. म्हणून त्याने बीचवरच जायचं ठरवलं होतं. पण तेवढंच संभाषण सुरु होईल म्हणून विचारलं…
"कुठे जायचं?"…
"कुठेही चालेल"... आभा मोबाईलमधे बघत होती. तिने मान वर न करताच उत्तर दिलं.
आभाच्या वागण्यात अपेक्षित असलेली एक्साइटमेंट दिसली नाही, तेव्हा प्रणय जरा निराश झाला. तरीही तसं न दाखवता त्याने पुन्हा हसून विचारलं...
"गोराई बीच?" ...
तिने पुन्हा मानेनेच होकार दिला…
प्रणय मनातून थोडा वैतागला होता. आभा त्याच्याकडे अजिबात लक्ष देत नव्हती… समजते काय स्वतःला?... त्याने मिररमधून आभावर नजर टाकली… जराही मेकअप नाही. फक्त रेड कलरची लिपस्टिक लावली होती, जी तिच्या रूड चेहऱ्याला वेगळाच भडक लूक देत होती. फेदरकट केसांना तिने क्लिप लावली होती. त्यात ते नीट बसलेही नव्हते. असं वाटत होतं जसं घरात काम करताकरता आलीय. डेटसाठी विशेष तयार झाली होती असं अजिबात वाटत नव्हतं…
आणि तो इतका मेहनत घेऊन तयार होऊन आला होता तर त्याच्याकडे एक नजरही टाकली नव्हती तिने. आता प्रणयची सगळी एक्साइटमेंट ऑफ झाली होती …
बीचवर आभा थोडं अंतर ठेवून बसली तेव्हा प्रणय समजला… आपले सगळे प्लान आज फेल आहेत… आणि तसंच झालं… आज त्यांची लग्नापूर्वीची पहिली आणि शेवटची भेट होती. आता तो बँगलोरला गेला कि थेट लग्नासाठी सुट्टी घेऊन येणार होता. त्याला वाटलं होतं ती विचारेल… बँगलोरला कधी जाताय. पुन्हा सुट्टी घेऊन कधी येणार. तुम्ही तिकडे कसे राहता...
पण आभा चक्क समोर समुद्राकडे पहात होती. आणि थोडावेळ दोघंही गप्पच होते...
नंतरही एकटा प्रणय बोलत होता. आभा फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होती. मुलाखतीत देतात तशी. प्रणयला कळत नव्हतं… ही अशीच आहे की आपल्याशी अशी वागतेय!? मुद्धाम करतेय असं नाही वाटत. मनाविरुद्ध आलीय असंही नाही वाटत. बोलतेय. पण तरी…
”डेटवाली’ बात नही!”...
त्याला निकी, शुभ्रा आठवल्या... निकीला दूर बसायला, गप्प बसायला सांगावं लागतं. सतत बडबड करत असते. चिकटून असते… शुभ्रा तर आपल्या मोठ्या मोठ्या डोळ्यांनीच इतकं सांगते, की तिला वेगळं बोलायची गरजच पडत नाही. जवळ नसली तरी जवळ असते...
"निघायचं? काळोख पडायला लागलाय!"...
आतापर्यंत आभा स्वतःहून बोलली असं हे एकमेव वाक्य होतं. आणि ते सुद्धा नको असलेलं! प्रणयचं डोकं सटकल होतं... यार! सगळे प्रेमी इथे काळोख पडायला लागल्यावरच येतात आणि 'ही' जायचं म्हणतेय. डीसगस्टिंग! …
"हो एस!"… म्हणत वरवर हसत शेवटी प्रणय उठला तेव्हा त्याला अगदी सुटल्यासारखं वाटलं. कारण त्याने विचारायचे सगळे प्रश्न आता संपले होते. अधिक काही करण्याची हिम्मत होत नव्हती.
मोबाईल नंबर एक्सेंज करायचा होता. त्यासाठी सुद्धा त्याने आता मनातल्या मनात वेगवेगळ्या वाक्यांची प्रॅक्टिस केली होती. तरीही, आधी ती स्वतःहून तसं म्हणतेय का बघण्यासाठी तिचं घर येईपर्यंत तो थांबला. आणि उतरतांना सहज बोलावं तसं बोलला...
"अरे! नंबर एक्सेंज नाही केले?"...
"मिसकॉल देते”... म्हणत तिने शांतपणे मोबाईल काढून मिसकॉल दिला…“ओके?"...
प्रणयला काय बोलावं सुचलंच नाही. तो पटकन "ओके" म्हणाला... नंतर त्याच्या लक्षात आलं…. म्हणजे आभाकडे आपला नंबर होता. आणि तरीही तिने आपल्याला एकदाही फोन केला नाही…
प्रणयला आता भविष्यातला रोमान्स कसा असेल याची कल्पना आली. कारण आजवर त्याच्याशी बोलायला तळमळणाऱ्या, पण त्याला त्याची पर्वा नसणाऱ्या मुलींशी तो असाच वागला होता... मनात आलंच..
आपला आभाशी लग्नाचा निर्णय चुकला तर नाही ना?... तो थोडा बेचैन झाला…
प्रणय आभाला सोडायला तिच्या घरी गेला तेव्हा त्याला वाटलं होतं त्याहून जरा जास्तच आगत-स्वागत झालं. तसा त्यात आभाचाही सहभाग होता. पण घरी आलेल्या पाहुण्याला अटेंड करावं इतकाच. निघतांना सगळेच गेटपर्यंत आले. त्यात आभाही होती. पण तितकंच! तिच्या वागण्यात स्पेशल वाटावं असं काहीही नव्हतं. आणि बोट दाखवता येईल असंही काही नव्हतं. सगळं अचंबित करणारं होतं…प्रणय हैरान होता..
नुसती नजर टाकली तरी पोरी ओळख करून घ्यायला किती तळमळतात? त्यांच्या प्रत्येक हालचालीतून ती तळमळ दिसते. आणि इथे लग्न ठरलंय तरी...
प्रणयला हे स्वीकारणं जरा अवघडच होतं. त्याची बेचैनी वाढली होती…
गाडी चालवता चालवता प्रणय स्वतःच्या वागण्यावर चरफडत होता...
आज आपण असं कसं काय वागलो? असं वाटत होतं जसं ती आपली बॉस आहे आणि आपल्याला तिची मर्जी सांभाळायचीय...
"आता तू बोल ना काहीतरी" किंवा .."तू काहीच बोलत नाहीयेस" किंवा.. "मी एकटाच बोलतोय"...असं कितीदा मनात घोकूनही शब्द बाहेर फ़ुटलेच नाहीत. निदान थोडं तिच्यासारखंच गप्प बसून तरी बघायला हवं होतं. शीट!...
त्याला वाटलं, आत्ता फोन करून विचारावं... "बाई तुला मी पसंत आहे ना?"...पण लगेच वाटलं… नो! नो! म्हणजे पुन्हा तिलाच भाव द्यायचा. ती मला नापसंत करणार?...
राहून राहून एकच डोक्यात वाजत होतं… यार! फायनली आपलं लग्न होतंय असा फीलच नाहीय... घरी गेल्यावर सरळ असं सांगायचं? मग सगळ्यांना ठरवू देत पुढे काय करायचं ते! कि होऊ द्यावं लग्न? लग्नानंतर होईल सगळं ठीक! असंही होऊ शकतं!...
आयुष्यात पहिल्यांदाच प्रणय आपल्या भविष्याचा इतक्या गांभीर्याने विचार करीत होता. कारणं बरीच होती...
आभाला त्याने जेवढ्या वेळा पुढचं ठरवण्यासाठी फोन करायचा प्रयत्न केला होता, तेवढ्या वेळा आत्ताचाच अनुभव आला होता. कधीतरी बिझीची टेप वाजायची; कधी फोन स्वीच ऑफ असायचा; तर कधी फोन लागलाच नाही. आणि घरी फोन केला तर आधी आई यायची आणि नंतर ती! मग रॅपिड टेस्टसारखी अवस्था. पाच मिनिटात तोच आऊट होऊन बाहेर पडायचा…
एक मन म्हणालं… पण असंही होऊ शकतं! तिच्याकडे दुसरा सेलफोन असेल. मॅट्रीमनी साईटसाठी तिने हा वेगळा नंबर ठेवला होता असेल..
म्हणून आज मुद्धाम त्याने तिच्याकडे मागून नंबर एक्सचेंज केला होता. पण काही उपयोग होईल असं दिसत नव्हतं... डोक्यात धोक्याची घंटी वाजत होती…
आता प्रणयचा लग्नाचा सगळा उत्साह मावळला होता. द्विधा मनःस्थिती झाली होती… त्याच्या आयुष्यात तीन मुली आल्या होत्या. निकिता, शुभ्रा आणि आता आभा...
निकीसाठी त्याने शुभ्राला डावललं होतं. आणि आता आभासाठी निकीला आणि शुभ्राला. पण आता मनात चलबिचल सुरु होती. आभाशी लग्नाचा त्याचा निर्णय व्यवहारी होता. निकी-शुभ्राशी जवळीक भावनिक होती. आता त्याचं मन आभाची; निकी, शुभ्राशी तुलना करीत होतं...
मन सांगत होतं… निकी आपल्यासाठी किती पजेसिव्ह झालीय. लग्न ठरलं कळल्यापासून नुसता पिच्छा पुरवला. रडून, भांडून, अबोला धरून, सगळ्या प्रकारे इमोशनल ब्लॅकमेलिंग करून झालं. इतका मनस्ताप दिला. शेवटी शिव्याशाप देऊन प्रकरण संपवलं. तरी आता पुन्हा फोन करतेय...
तिचंही बरोबरच आहे म्हणा! शेवटी एवढी इन्व्हॉल्वमेंट ठेवल्यानंतर काहीही चुकलं नसतांना ब्रेकअप झेलणं सोपं नाही ना? पीजीमध्ये रहात असल्याने कसले निर्बंध नव्हते. थट्टेत..."मी लग्नबिग्न नाही करणार हं तुझ्याशी"... म्हटलेलं खरं असेल असं ती कधी समजली नाही... इमोशनल फूल! कॉमनसेन्स नाही. आपल्या घरात अशी मुलगी? नॉट पॉसिबल. तसे आपण क्लीयर होतो. तीच जबरदस्ती गळ्यात पडली…
शुभ्राच्या आठवणीने मात्र प्रणय अस्वस्थ झाला… एंगेजमेंट झाल्यापासून एकदाही भेटली नाहीय...
तसे शेजारी शेजारी बंगले. लहानपणापासून एकत्र वाढलो. घरीही येणंजाणं होतं. तीही अगदी घरच्यासारखी वावरायची. त्यामुळे ते 'एक लडकी' वालं फिलिंग कधी आलं नाही. कॉलेज वेगळं झाल्यावर जाणवलं तिच्या मनात आहे. पण बोलली नाही कधी...
पहिल्यांदा मुंबईला नोकरीसाठी जातांना रडली तेव्हा कळलं. पण तरीही बोलली नाहीच...पण तिकडे गेल्यावर नेहमी स्वतः केलेल्या प्रेमकविता पाठवत राहिली…
प्रणयला आठवलं… तो बँगलोरला जातांना सहज म्हणाला होता... “आईला सून करून घ्यायचीय वाटतं तुला?”… लाजून हसली.
त्यांनतर जरा जास्त मोकळेपणा आला होता तिच्या वागण्यात. दोघांचंही एकमेकांवर प्रेम आहे हे गृहीत धरलं होतं तिने. तसं सांगायची गरज पडली नाही. पण आईच्या ते लक्षात आलं असावं. म्हणून नंतर घरी आल्यावर तिने विचारलं होतं...
“तुमचं काही आहे का?”… तो पटकन म्हणाला…“नो, नो,जस्ट फ्रेंड!”… कारण तेव्हा निकी भेटली होती. मग शुभ्रा बावळट, घरेलू वाटायला लागली होती…
प्रणयाला वाटलं … आभाचं स्थळ आलं म्हणून आपण निकीवर क्रॉस मारला. वाटलं, लाईफ बेटर सेटल होईल. आपली नोकरी हि अशी. आज आहे उद्या नाही. मस्त टेन्शनफ्री जगता येईल. शिवाय सोसायटीत जरा पत वाढेल...बरोबरच केलं आपण..
शुभ्रा मराठीची प्रोफेसर म्हणजे आज उद्या चलनातून बाद होणारं नाणं! तिच्याशी लग्न करून काहीच चेंज झालं नसतं. तीच कॉमन बिवीबच्चेवाली कहाणी सुरु झाली असती… आपल्याला अळणी लाईफ नकोय…
आता प्रणयला कळत होतं... शुभ्राला काय वाटलं असेल ते! आईने सांगितलं होतं त्याला.. आभाशी लग्न ठरतंय कळल्यावर शुभाची आई घरी आली होती. म्हणाली… “दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. शुभ्राच्या मनात आहे प्रणयशी लग्न करायचं”...पण त्याच्या आईने सांगितलं होतं… “प्रणयच्या मनात तसं काही नाही. मी विचारलं होतं त्याला. तो म्हणाला फक्त फ़्रेंडशिप आहे!”...
त्यानंतरच शुभ्राने संबंधच तोडले. तिने घरी येणंजाणंही बंद केलं. आजवर आपल्या घरातल्या लहानमोठ्या सगळ्या कार्यक्रमात असणारी शुभ्रा आपल्या एंगेजमेंटला मात्र नव्हती ...
निकी आणि शुभ्रावरून प्रणयला आठवलं… आपण फोन स्वीच ऑफ केलाय. आणि आज रात्री मुंबईतच मित्रांसोबत पीजीत थांबणार होतो. विचारांच्या नादात विसरून पुण्याला आलोय. आता लोणावळा आलंय. अर्ध्या तासात घरी पोहचू. अकरा वाजलेत. त्यांनी फोन ट्राय केला असणार. वाट बघत असतील. आणि इकडे घरचे येणार नाही समजून झोपले असतील... त्याने मोबाईल ऑन केला...
मित्रांचे बरेच मिसकॉल्स होते. पण आता त्याला बोलायचा अजिबात मूड नव्हता, मेसेज करून सांगावं म्हणून प्रणयने गाडी साईडला लावून व्हाट्सअप उघडलं तर आईचा, शुभ्राचा आणखीही बरेच मेसेज दिसले... त्याने पीजी मुंबई ग्रुप उघडून मेसेज टाकला...
“नॉट कमिंग...विल टॉक टुमारो... जीएन...”
नंतर लगेच त्याने पहिला शुभ्राचा मेसेज उघडला. कारण आज दहा दिवस झाले होते. तिने एकही मेसेज केला नव्हता... आणि आज पुन्हा नेहमीसारख्याच कवितेच्या दोन ओळी होत्या...
ऊन, वारा, पाऊस, पाणी
तसंच असेल सगळं!
तुझं माझं जग मात्र
उद्यापासून वेगळं!!!
पुढे नमस्काराच्या दोन इमोजी होत्या. प्रणय समजला… आपली एंगेजमेंट झालीय म्हणून शेवटचा मेसेज... त्याला आठवलं, सकाळी मुंबईला जातांना तिला खिडकीत बघून त्याने गाडी थांबवली होती तेव्हा ती घरात निघून गेली होती… कदाचित असं केल्यावर आपण उतरून तिला भेटायला जाऊ असं वाटलं असेल का तिला?...
त्याचं लग्न ठरतंय असं कळलं तेव्हाही तीने अश्या कवितेच्या ओळी पाठवल्या होत्या. खाली ब्रोकन हार्ट इमोजी होत्या. मात्र त्याने तेव्हा काहीच रिप्लाय दिला नव्हता. आता प्रणयने स्क्रोल करुन वरच्या त्या ओळी वाचल्या…
अर्धा अर्धा चंद्र होता
तुझ्यापाशी माझ्यापाशी !
तुझा चंद्र वितळला
माझा राहिला उपाशी !!
खोटं होतं का ते सगळं
ते प्रेम ती नशा !
वेगळीच होती का रे,
तुझी माझी भाषा !!
संपलं आता सगळं
मोडून गेला डाव !
तू मी केली वस्ती
वेगळंच होतं ते गाव !!
जाग आली अवेळी
स्वप्न अर्धं पाहिलं !
तुझ्या मनात माझं घर
बांधायचंच राहिलं !!
शुभ्राचा इनोसंट चेहरा आठवून प्रणय उदास झाला… फसवलं गेल्यावरही आपल्याबद्धल असलेला तिचा भाबडा विश्वास बघून त्याला गलबलून आलं….
तिला उगाच आशेवर ठेवलं... खरंच ! चुकलं आपलं!... असं वाटलं. कितीतरी वेळ तो तसाच सुन्न होऊन बसून होता.....
कॉल आला आणि प्रणयची तंद्री तुटली. कॉल निकीचा होता.. थोडं थांबून त्याने विचार केला… जाऊदे! बोलूया. असं पण आता एंगेजमेंट झालीय हे तिला माहित आहेच. आता घरी चाललोय सांगून लवकर फुटवता येईल. आणि आता फोन नाही घेतला तर परवा ऑफिसला गेल्यावर आणखी फाटेल ती!...
त्याने हॅलो करताच निकी एकदम आंनदाने चित्कारलीच...
"हे! हाय! से मी काँग्रॅच्युलेशन्स फर्स्ट!"
"काँग्रॅच्युलेशन्स?"... प्रणयने न कळून प्रतिप्रश्न केला... हिच्या काय डोक्यावर परिणाम झाला कि काय? ... निकी जोरजोरात हसायलाही लागली. त्याला काय बोलावं कळेना. तेवढ्यात निकीच बोलली...
"ओके ओके, लेट मी टेल यू अ बिग न्यूज... तुला माझा तो यूएस वाला फ्रेंड आठवतो... हरीश मुलवानी! …अरे आमची एंगेजमेंट आहे उद्या! सरप्राईझ ना? कुठे माहिताय?... मुंबईत! हॉटेल ह..या..त!... ग्रेट न्यूज ना! तुला सांगू, आय एम सो हॅपी!.. ती पुन्हा खळखळून हसली....हे बघ! मी कधीचाच तुला व्हाट्सअप मेसेज टाकलाय. तू वाचला नाहीस म्हणून कॉल करत होते. लिसन, यू शुड बी देअर विथ युवर फियान्सी! ओके! नो एक्सक्यूज! आणि आणि आणि... अनदर सरप्राईस न्यूज… एनी गेस?... चल सांगून टाकते… त्याने आपला बिजनेस टेकओव्हर केलाय… आहेस कुठे?"... त्यानंतर ती पुन्हा सातमजली हसली. आणि हसून झाल्यावर प्रणयच्या उत्तराची वाटही न पाहता बोलली...
"सॉरी यार, आता मला जरा स्पामध्ये जायचंय. तेव्हा बाबाय! ओके! सी यू!"
प्रणय इतका शॉक्ड होता की तिचा कॉल बंद झालाय हे देखील त्याला कळलं नाही… माय गॉड! निकीला एवढा मोठा बकरा मिळाला? आपण मुंबईला येणार म्हणून भाव खात होतो आणि निकी आता युएसला जाईल! शिवाय आता ती बॉसची बायको असेल. म्हणजे बॉसच!... असंही होऊ शकतं?... त्याने व्हाट्सअप उघडून इन्व्हिटेशन कार्ड पाहिलं... एकदम भारी होतं. त्याचा अजूनच मूड गेला...
व्हाट्सअप बंद करून निघणार इतक्यात प्रणयचं लक्ष गेलं. आभाचा मेसेज आला होता. क्षणभर त्याचा चेहरा खुलला. मनातून... “वॉव! वंडरफुल!..” म्हणत अधीरतेने त्याने मेसेज ओपन केला...
“हाय! आभा हियर... माझं एका मुलावर प्रेम आहे. उद्या रजिस्टर लग्न करतोय. पुढची तयारी करू नये... बाय! अँड सॉरी!”… निर्वाणीच्या दोनच ओळी…
प्रणय धसकला. त्याचा विश्वासच बसेना... आपण काय वाचलं? असं कसं? आत्ता चार तासापूर्वी सोबत होती तेव्हा एकदम नॉर्मल वागत होती. अचानक? असंही होऊ शकतं?... त्याने मेसेज पुन्हा पुन्हा वाचला. तो जागच्या जागी खिळून बसला... आता? कसं निस्तरायचं सगळं!...
प्रणयच्या डोक्यात विचारांचा प्रचंड गोंधळ चालला होता. त्याने कल्पनाही केली नव्हती असंही होऊ शकतं याची… हे सांगितल्यावर घरात वादळ येईल. आपलं एक जाऊदे! पण आई-डॅडींचं नाव आहे समाजात. त्यांना कसं वाटेल? ... तरी बरं, एंगेजमेंट मुंबईला होती. म्हणून फक्त जवळचे नातेवाईकच गेले होते. नाहीतर सगळीकडे किती बदनामी झाली असती? आपण अगदी खरं कारण सांगितलं तरी लोक त्यांचे तर्क लावणारच…
आपलंही काही खरं नाही हे प्रणयला आता स्पष्ट दिसत होतं. आता पुण्यात नाही राहता येणार. आणि बंगलोरला गेलो तर निकीचा सामना करावा लागेल. शिवाय सांगून बसलोय मुंबईत जाणार म्हणून. कळणार लग्न मोडलंय ते. आभा नाही म्हणजे मुंबईतही ठिकाणा नाही. पूर्वीसारखं पीजीत राह्यचं तर…
प्रणयच्या लक्षात आलं… पण आभाशी लग्न मोडल्याचं मनातून आपल्याला फारसं वाईट वाटत नाहीय. उलट बरंच वाटतंय. अगदी सुटका झाल्यासारखं… किती ऍटीट्यूड देत होती. ‘सामानापेक्षा बॅग भारी’ असा प्रकार झाला असता. आयुष्यभर लोंबकळत प्रवास करावा लागला असता. मुक्कामापर्यंत पोहोचायचीही शाश्वती नव्हतीच. शंभर माणसात ठरलेलं लग्न दोन ओळीत तोडून टाकलं तिने. कोणाची पर्वा नाही. शिकलेली आहे. स्वतंत्र आहे. आता घेतलेला निर्णय आधीही घेऊ शकत होती. आपल्यासोबत दुसऱ्याची जाहीर बदनामी कशासाठी? लग्नाआधी कळलं हे एकाअर्थी बरंच झालं. पण उगाच नकाराचा ठप्पा बसला. शुभ्राच्या घरी कळेल तेव्हा?.., अचानक त्याच्या डोक्यात आलं… आपण शुभ्राशीच लग्न केलं तर? असंही होऊ शकतं!...
शुभ्राशी लग्न करू शकतो या विचारसरशी प्रणयच्या मनाला उभारी आली... म्हणजे सगळ्यांना सांगायचं; मला शुभ्राशीच लग्न करायचं होतं. आमचं एकमेकांवर प्रेम आहे. आणि शुभ्राला सांगता येईल; तुझ्यासाठी मी ठरलेलं लग्न मोडलं. फुल फिल्मी ड्रामा म्हटल्यावर एकदम फिदा होईल ते वेगळंच! अर्ध्या काय? पुऱ्या वचनात राहील. भोळी आहे थोडी! कसले प्रश्न विचारत नाही. हवं तसं मोकळं जगता येईल…
प्रणयाला माहित होतं… एक इन्कम सोडलं तर शुभ्रा आपल्या घराला वरदानच ठरेल. सगळे गुण आपल्या घराला हवे तसेच आहेत. तिच्यापेक्षा आपल्या घरातच जास्त वावरलीय. आणि अगदीच घाट्याचा सौदा नाहीय तसा. एकुलती एक म्हणजे सगळं पदरात पडेलच! वर ती, तिची फॅमिली खुश कारण मुलीच्या मनासारखं झालं. पुन्हा आपली फॅमिलीही खुश. बेअब्रू टळली. आणि शुभ्रा घरातल्या सगळ्यांना आवडते. एस!
असंही होऊ शकतं !...
प्रणय थोडा रिलॅक्स झाला… त्याने गाडी स्टार्ट केली. गाडी चालवता चालवता तो मनात कसं करायचं, काय करायचं विचार करीत होता...
गाडी लॉक करून प्रणय घरात शिरला. तेव्हा त्याने विचार केला होता; आता इतक्या रात्री घरातल्यांना आभाने लग्न मोडल्याचं सांगूच नये. सरळ जाऊन झोपावं. सकाळी आधी शुभ्राकडे जाऊन यावं आणि तिचा निर्णय कळला कि सांगावं. म्हणजे कदाचित तेवढा धक्का बसणार नाही. म्हणून तो सरळ आपल्या रूमकडे निघाला होता. पण आई समोर हॉलमधेच बहुतेक पेशंटचे रिपोर्ट्स बघत बसली होती. आईचं त्याच्याकडे लक्ष गेलं…
"काय रे मित्रांकडे जाणार होतास ना?"...
आईने थांबवताच प्रणयला नाईलाजाने थांबावंच लागलं...
"नाही गेलो."... म्हणत, तिच्या शेजारी बसताबसता प्रणयचं लक्ष सेंटर टेबलवरच्या इन्व्हिटेशन कार्डवर गेलं…
“हे कोणाचं कार्ड”… म्हणून त्याने उचललं तोच आई म्हणाली...
"अरे हो! बरं झालं तू घरी आलास. उद्या शुभ्राची एंगेजमेंट आहे. तिचंच आहे ते. कार्ड! जायला हवं. चल, मी पण आता आवरते सगळं"
"शुभ्राची एंगेजमेंट?"... अचानक बातमीने प्रणयाच्या हातातून कार्ड खाली पडलं. आईचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं. तीने पसारा आवरता आवरता माहिती दिली...
"हो रे! बरं झालं ना? तुझं लग्न होतंय आणि तिचंही. नाहीतर मला उगाच गिल्टी वाटत होतं. अँड शी इज व्हेरी लकी! आपल्या डॉक्टर दातारांची सून होतेय ती! तू पण ओळखतॊस त्याला? निनाद दातार! तुझ्या वर्गात होता…”
आई बोलत होती. पण प्रणयला काही ऐकू येत नव्हतं. त्याच्या डोळ्यासमोर... केवड्याच्या पातीच्या कांतीची, भारी शालू नेसलेली, हिऱ्याचे दागिने घालून नटलेली शुभ्रा..आणि निळ्या डोळ्यांचा, सडसडीत, साडेसहाफूट उंच, निनाद..एकमेकांना अंगठी घालताहेत हे दृश्य दिसत होतं… निनाद गोल्ड मेडलिस्ट होता. पुण्यात शिवाजी नगरला डॉक्टर दातारांचं स्वतःचं सुसज्ज हॉस्पिटल होतं. हल्लीच त्याच्या हॉस्पिटलमध्ये नवीन फर्टीलिटी सेन्टर ओपन केलं होतं... प्रणयला काय ऐकतोय असं झालं होतं. असंही होऊ शकतं याचा त्याने विचारच केला नव्हता. दातारांच्या हॉस्पिटलमध्ये आपले आई-डॅडी कॅन्सल्टिंग घेतात. म्हणजे ते त्यांचे मालक आहेत. आणि आता शुभ्रा त्यांची सून होऊन इथेच डोळ्यासमोर राहणार होती…
आईचं बोलणं चालूच होतं ...
"दोन्हीकडून आमंत्रण आलंय. म्हणजे आम्हाला तर जावंच लागेल पण तुही चल आता आहेस तर. शुभ्राला बरं वाटेल.."… प्रणयने थोडी चुळबुळ केली.
"अगं, उद्या माझ्या कलिगचीही एंगेजमेंट आहे मुंबईला. निकिताची. तिथे मला जावंच लागेल"... प्रणयला हायसं वाटलं… बरं झालं कारण आहे…
"चल मग आता तूही झोप. थकला असशील. पुन्हा उद्या एवढं ड्राइव्ह करून जायचंय तुला." ... आईने असं म्हणताच प्रणय लगेच उठला…
झोप येत नव्हती. पडल्यापडल्या प्रणय विचार करीत होता … कधी वाटलं नव्हतं असंही होऊ शकतं! चक्रव्यूहात सापडल्या सारखी अवस्था झालीय. आईला सांगितलंय मुंबईला निकीच्या एंगेजमेंटला जाणार आहे म्हणून. तसं निकीला सांगता येईल शुभ्राची एंगेजमेंट अटेंड करावी लागणार म्हणून... तिला माहित आहे शुभ्रा फॅमिली फ्रेंड आहे ते. पण मग? आपण जायचं कुठे? मुंबईला मित्रांकडे जावं का? पण मस्ती करायचा मूड नाहीय. म्हणजे मग तिथेही त्यांना सगळं सांगावं लागेल. प्लेबॉय इमेज होती. उगाच आता चेष्टा होईल… तसं नंतर कळेलच. पण आता नको. तेव्हाच तेव्हा बघू! मग? इथेच कुठे तरी हॉटेलमध्ये रुम घेऊन राहिलं तर? हं! असं होऊ शकतं! थोडं मन शांत झालं होतं...
नंतरही कितीतरी वेळ प्रणय तळमळत होता. मनात विचारांची गर्दी झाली होती. आता लग्नाचं काय करायचं? मार्ग सापडत नव्हता. आपल्या आजवरच्या सगळ्या वागण्याचा त्याला आता पश्चाताप होत होता… नोकरी, लग्न सगळाच जुगार झाला. घरातल्यांना लग्न मोडल्याचं कळेल तेव्हा? काय माहित आता कायकाय होणार? कायकाय करावं लागणार? शुभ्रा खात्रीची होती. आपण तिला गृहीत धरलं. चुकलं!... त्याला शुभ्राचा सकाळचा मेसेज आठवला. त्याने व्हाट्सअप उघडून मेसेज पहिला…
ऊन, वारा, पाऊस, पाणी
तसंच असेल सगळं !
तुझं माझं जग मात्र
आजपासून वेगळं !!
आता प्रणयला या ओळींचा खरा अर्थ कळत होता. तिचं जग वेगळं झालंय हे शुभ्राने सांगितलं होतं! म्हणूनच आपल्याला बघून आत गेली होती ती! आपण आपल्याला सोईस्कर अर्थ घेतला. विचारच नाही केला...
असंही होऊ शकतं! याचा…
प्रणयाला आता समजत होतं... उद्या आभाचं लग्न होईल. निकी-शुभ्राची एंगेजमेंट होईल. त्या आपापल्या माणसात आनंदात असतील. आणि मी?...मी.हॉटेलच्या एका रूममध्ये, आपल्या माणसांपासून दूर, एकटा भविष्यातला अंधार लपेटून पडून राहीन... कारण मी कधी विचारच नाही केला…
हो! आता असंच होऊ शकतं!
समाप्त...
मी मानसी..
छान लिहिली आहे. आवडली.
छान लिहिली आहे. आवडली.
पण जssरा सुखांत केली असती तर?
आवडली
आवडली
आवडली कथा
आवडली कथा
आवडली
आवडली
छान!!!
छान!!!
आवडली कथा
आवडली कथा
आवडली कथा आणि अप्पलपोटी
आवडली कथा आणि अप्पलपोटी प्रणय बद्दल जराही वाईट नाही वाटलं
अप्पलपोटी प्रणय बद्दल जराही
अप्पलपोटी प्रणय बद्दल जराही वाईट नाही वाटलं
प्रचंड अनुमोदन
मगाशी घाईत लिहायचं राहून गेलं
छान लिहिली आहे. आवडली. >>>>>>
छान लिहिली आहे. आवडली. >>>>>>>> +++१
पण जssरा सुखांत केली असती तर?>>>>>> मला आवडला शेवट.....
जरा आता असा विचार करूया.
जरा आता असा विचार करूया.
स्त्री पात्रांच्या ऐवजी पुरुष पात्रे आणि पुरुष पात्रांंच्या ऐवजी स्त्रीपात्रे.
आता कस वाटतंय?
अशी कथा होऊ शकते की नाही?
!! असंही होऊ शकतं !!
आवडली. स्त्री असो वा पुरुष,
आवडली. स्त्री असो वा पुरुष, ह्या प्रवृत्तीसाठी माफी नाही..
आवडली कथा. Well he deserved
आवडली कथा. Well he deserved that. ही नाहीतर ती, ती नाहीतर ती, अशा माणसाला शेवटी तेल, तूप, बटर .. काहीच मिळालं नाही.
वेगळी आणि छान कथा.
वेगळी आणि छान कथा.
निकी खुश राहील.. शुभ्राचे
निकी खुश राहील.. शुभ्राचे अवघड आहे... प्रणय ला दुसरी मिळेलच...
मस्त आहे कथा. एकदम वेगळी.
मस्त आहे कथा. एकदम वेगळी. आवडली .
हा हा.. मजेशीर आहे
हा हा.. मजेशीर आहे
म्हणजे घटनाक्रम घडतानाच समजत होते कथा कुठे चाललीय. पण छान फुलवलीय. मजा आली वाचायला.
आणि लोकहो त्या पोरग्याला व्हिलनही ठरवू नका. एवढा काही मोठा अपराध नाही हा. शाळा कॉलेजात आणि शेजारच्या मुलामुलीशी प्रेमप्रकरण जवळपास आपल्या सर्वांचेच एखादे झाले असेल जे लग्नापर्यंत पोहोचले नसेल. वयच असते हे
आणि तुर्तास झटका बसलाय ते फक्त त्याच्या ईगोला. प्रेमप्रकरणे आयुष्यात येत जात राहतात. कथेच्या पार्ट टू मध्ये त्यालाही कोणीतरी भेटेलच
वर कोणीतरी लिहिलेय की यातले मुलगा मुलगी उलटे झाले तर.. पण तसे होणे सोपे नाही. म्हणजे त्याच्या ईगोला धक्का बसतो ते त्याने नाकारलेल्या मुली मोठ्या घरच्या सुना होतात म्हणून. हे मुलींबाबत शक्य आहे. पण मुले अचानक नशीब उघडून मोठ्या घरचे जावई होणे तितके सोपे नाही
“हाय! आभा हियर... माझं एका
“हाय! आभा हियर... माझं एका मुलावर प्रेम आहे. उद्या रजिस्टर लग्न करतोय. पुढची तयारी करू नये... बाय! अँड सॉरी!”… निर्वाणीच्या दोनच ओळी…
आता घेतलेला निर्णय आधीही घेऊ शकत होती. आपल्यासोबत दुसऱ्याची जाहीर बदनामी कशासाठी?
ह्या कथेला अनेक कंगोरे आहेत. त्यातला हा सगळ्यात जास्त टोचणारा. लेखकाने विभाने असा सूड का घेतला ह्याचे काही कारण दिलेलं नाही. एका स्वतंत्र कथेचे बीज आहे इथे. प्रणयची तगमग आणि विचारमंथन छान दाखवले आहे.
आवडली कथा. Well he deserved that. ही नाहीतर ती, ती नाहीतर ती, अशा माणसाला शेवटी तेल, तूप, बटर .. काहीच मिळालं नाही.
अस काही नसते.
सध्या आपण जी विवाह पद्धत फॉलो करत आहोत त्यात हेच अध्याहृत आहे.
पण मुले अचानक नशीब उघडून मोठ्या घरचे जावई होणे तितके सोपे नाही
स्त्रियश्चरित्रं पुरुषस्य भाग्य देवो न जानाति.... इत्यादि
आ.न.
कुणीतरी केशवकूल
प्रतिसाद देता येत नाहीय..
प्रतिसाद देता येत नाहीय..
Error येतय..
प्रतिसाद देता येत नाहीय..
प्रतिसाद काॅपी पेस्ट करता येत नाही का?
प्रतिसाद काॅपी पेस्ट करता येत
प्रतिसाद काॅपी पेस्ट करता येत नाही का?
>>>येतोय की.
मी करतेय तर save होत नाहीय.
मी करतेय तर save होत नाहीय.
पन्नास वेळा करुन पाहिलं. सगळ्यांना एकत्रच सविस्तर लिहावा म्हणून नोटमध्ये टाईप केलं होतं..
पहाते.. नाहीतर पुन्हा इथे टाईप करते.
आबा.. आभारी आहे!
व्हॉ अॅ वरून कॉपे करत असशूल
व्हॉ अॅ वरून कॉपे करत असशील तर स्माईली वापरू नको तिकडच्या.
गोष्ट आवडली सांगायला आले अन
गोष्ट आवडली सांगायला आले अन तेच राहिलं : हात डोक्याला लावणारा इमोजी:
अवल..
अवल..
हा हा हा
मीही हात डोक्याला लावून बसलेय..
पुन्हा सगळं टाईप करावं लागणार म्हणून!
व्हाॅटस् अॅपवरून नाही, नोटस् मधून घ्यायचंय!
मनःपूर्वक धन्यवाद !
वेगळी आहे गोष्ट. आवडला शेवट,
वेगळी आहे गोष्ट. आवडला शेवट, शिर्षकाला एकदम समर्पक.
धनुडी.
धनुडी.
<< शेवट आवडला >>
मनःपूर्वक धन्यवाद !
केशवकूल..
केशवकूल..
सर्वप्रथम कथा आवडली त्यावर विचार केला आणि वेळोवेळी प्रतिक्रिया दिलीत यासाठी मनापासून आभार !
सुखांत केली असती तर >>>
प्रणयला मुंबईहून मैत्रिणीचा कॉल आला..
"काय हे मुंबईत येऊन भेटला नाहीस! मी किती वाट पाहिली"..
एवढंच लिहून सुखांत करता आलाअसता. पण आशयाचं गांभिर्य उरलं नसतं.लेखनाचा हेतू प्रवृत्तीनिर्देश हा आहे.
स्त्री पात्रांच्याऐवजी पुरुष पात्र >>
जरुर असू शकतं. पण स्त्री दिसायला बरी असेल आणि पैसेवाला हवा हाच हेतू असेल तर काही अवघड नाही. असे घडतेही!
विभाने असा सूड का घेतला? लेखकाने याचे कारण दिले नाही>>>
विभाने सुडबुद्धीने केलेलं नाहीय. तिनेही प्रणयसारखा स्वतःपुरताच विचार केला. असं मला अभिप्रेत आहे.
अर्थात कारणं नेहमीचीच.. दोन्ही घरचा नकार पालकांच्या दबातंत्राचा तात्पुरता प्रभाव.. म्हणून दिली नाहीत. शिवाय कथा उगाच लांबली असती आणि आशयापासून भरकटली असती असंही वाटलं.
कथेला अनेक कंगोरे आहेत >>>
हो ! कादंबरी होऊ शकते इतके ! पण नेमका विचार प्रभावीपणे पोहचवण्यासाठी मला कथा लिहिणं योग्य वाटलं.
आभाच्या नकारात एक स्वतंत्र कथाबीज आहे >> हो बरोबर ! पण मला वाटतं ते नविन नाही. असे विषय झालेत.
असं काही नसतं. आपण सद्या जी विवाहपद्धती फॉलो करतो आहोत त्यात >>
यामुळेच असमाधान आणि पर्यायाने ब्रेकपचं प्रमाण वाढतंय हेमावैम आहे.
स्त्रियश्चरित्रं पुरुषस्य भाग्यम् >>
हे सुद्धा उलटं होऊ शकतं बरं!
यात एक स्वतंत्र कथाबीज आहे.
कुणीतरी केशवकूल >>
माझ्यासाठी तरी..
कथा वाचल्यावर त्यावर विचारमंथन करणारा प्रत्येक वाचक हा सक्षम वाचक आहे. म्हणूनच आदरणीय आहे !
मनापासून धन्यवाद !
प्रतिसाद देता आला नाही.. Error येत होता.. त्यासाठी क्षमस्व !
आईची लेक
आईची लेक
जाई
सस्मित
Ajnabi
समाधानी
अभिप्रायासाठी मनःपूर्वक धन्यवाद !
आबा..
आबा..
जाई..
<< प्रणयबद्दल वाईट वाटलं नाही >>
प्रणयबद्दल फक्त प्रणयलाच वाईट वाटू शकतं ! हा हा हा
King..
King..
शेवट आवडला >>
मनापासून धन्यवाद !
Pages