शापमुक्त

Submitted by सामो on 5 April, 2022 - 14:49

मन्डेन या इंग्रजी शब्दाला साजेसा मराठी शब्द कोणी सांगेल का मला? नेव्हर माईंड. नाही सांगीतलात तरी काSSS बिघडणार नाही. कारण? कारण शब्द गेला उडत, जगणच त्या शब्दासारखं होउन बसलय - मन्डेन!!! घिसेपिटे, चाकोरीबद्ध, इतके नियमित की कंटाळा यावा. असे आयुष्य की, 'भाकरीचा चंद्र शोधता शोधता जिंदगी बरबाद झाली' या नारायण सुर्वे यांच्या ओळी चपखल बसतील, अगदी फिट्ट!!! पण .....

एखादा दिवसच असा उगवतो आपण नोकरीला योग्य जागी म्हणजे फाट्यावर मारुन, छानशी दांडी मारतो. भरपेट नाश्ता मग झोप मग परत जेवण मग झोप मग ब्राउझिंग - मग झोप असा दिनक्रम चाललेला असतो. आणि एखादा अनवट, ब्लॉग सापडतो. अचानक, कुठुनतरी 'शनाल' किंवा तत्सम उच्चार न करता येणारे व एग्झॉटिक नाव असलेला पर्फ्युम दरवळावा तसा हा ब्लॉग आपल्याला खुणावतो. अगदी भुरळ घालणारा. मनस्वी लिखाणाचा , थोडासा काव्यमय , बराचसा चिंतनात्मक असा हा ब्लॉग, कोण्या सरस्वतीचा वरदहस्त लाभलेल्या मुलीने, स्त्रीने अगदी भरभरुन लिहीलेला. आपल्याला, प्रचंड आवडतो. अरेच्च्या असे आपणही पूर्वी लिहायचो म्हणजे इतके उत्कट नसेल, इतके शब्दसामर्थ्याने नटलेलेही नसेल पण अशाच भावना, अशीच मनःपूत अभिव्यक्ती. कुठे गेली ती अभिव्यक्ती हरवुन? लिहीले पाहीजे, असे उत्कटतेने व्यक्त झाले पाहीजे. १८० अंशातून फिरले पाहीजे.

कोणता अक्ष आहे हा? नेपच्युनाची मीन ही स्वराशी बरोब्बर कन्या राशीशी अक्ष साधते. अर्थात कन्या व मीन परस्परांच्या १८० अंशात येतात . हाच , हाच तो अक्ष. जिथे कन्या रास नित्य कर्मे , रुटिन , रोजचे आयुष्य व संपूर्ण वास्तवाशी घट्ट बांधली गेलेली असते तिथे च त्याउलट मीन रास ही एस्केपिझम दर्शविते. मग ते स्वप्नाळू एस्केपिझम असो वा मद्याच्या आहारी जाउन आलेले असो पण वास्तवाशी फटकून आभासी जगाची कुंपणं लांघून झेप घेण्याची करामत नेपच्युनच करू जाणे . उच्च पातळीवर नेपच्यून स्पिरिच्युअल एन्लाइटन्मेन्ट, समाधी, परमेश्वराशी तादात्म्य,झपाटलेपण , कला, चॅनलिंग हेसुद्धा दाखवतो. नेपच्यून अर्थात वरुण हा ग्रह ज्योतिषशास्त्रात सागरसम्राट म्हणून ओळखला जातो. मीन रास या ग्रहाच्या अधिपत्याखाली येते. ज्याप्रमाणे जललहरींमध्ये प्रतिबिंब वेडेवाकडे व विचित्र दिसते, तद्वत हा ग्रह कुंडलीत ज्या घरामध्ये पडतो त्या तेथे त्या कारकत्वात, गोंधळ , संभ्रम आदी प्रकार जाणवू शकतात. हिपनोटिस्ट, जादूगार , सायकिक व हीलर्स हे व्यावसायिक या ग्रहाच्या अधिपत्याखाली येतात. पण त्याच बरोबर दारू अथवा ड्रग्ज च्या आहारी गेलेले लोकही येतात. ते नकारात्मक जाऊ देत पण ....... कन्येचे करकचून बांधून ठेवणारे वास्तव व मीनेचे कला/काव्य अन आभासाचे पंख हाच तो अक्ष. अशा एखाद्या जादूभर्‍या दिवशी आपण अक्षाच्या या टोकापासून अचानक हेलकावा खात, ब्लिसफुली दुसर्‍या टोकावर जाउन अलगद स्थिरावतो. इंद्रधनुष्याच्या एका टोकावरुन चढत जाउन दुसर्‍या टोकाला गेले की लेप्रेकॉन्स्नी जमवलेल्या सोन्याच्या नाण्यांचा हंडा सापडतो म्हणे. आपल्याला तो हंडा सापडलेला असतो.

अहल्या शिळा झालेली होती म्हणतात. अशीच दारुण नित्यकर्मांत बुडून गेलेली शिळा झाली असावी ती. आणि एखाद्या सोनेरी क्षणी, कवितारुपी रामाचा परीसस्पर्श झाला असावा तिला. त्या क्षणी, कदाचित तिच्या मनात मृद्गंधी कल्पनांचे धुमारे उमलले असावेत आणि ती 'जिवंत' झालेली असावी. ते काहीही असो. नितांत अलवार, सुरेख ब्लॉग वाचून, आज मला तरी शिळाशापातून मुक्त झाल्यासारखे वाटले. तुम्हालाही असा दिवस अवचित गवसो.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मीन -कन्येचा अक्ष दाखविणारी अर्थात करकचून बांधून ठेवणारे वास्तव अन कला/काव्य अन आभासाचे पंख हा अक्ष दाखविणारी अमरजित कौंके यांची "शिला" नावाची कविता मध्यंतरी वाचनात आली ती पुढीलप्रमाणे.

वह जो मेरी
कविताओं की रूह थी
मेरे देखते ही देखते
एक दम शिला हो गई
.
बहुत स्मृतियों का पानी
छिड़का मैंने उस पर
उसे कमर से गुदगुदाया
अपनी पुरानी
कविताएँ सुनाईं
बीती ऋतुओं की हँसी याद दिलाई
लेकिन उसे कुछ याद नहीं आया
इस तरह
यादों से परे
शिला हो गई वह
.
उसके एक ओर मैं था
सूर्य के सातवें घोड़े पर सवार
किसी राजकुमार की तरह
उसे लुभाता
उसके सपनों में
उसकी अँगुली पकड़
अनोखे नभ में
उसे घुमाता
.
एक और उसका घर था
जिसमें उसकी उम्र दफ़्न पड़ी थी
उसका पति था
जिसके साथ
उसने उम्र काटी थी
बच्चे थे
जो यौवन की दहलीज़
फलाँग रहे थे
.
एक और उसके
संस्कार थे
मंगलसूत्र था
सिन्दूर था
हुस्न का टूटता हुआ गरूर था
.
समाज के बन्धन थे
हाथों में कंगन थे
जो अब उसके लिए
बेड़ियाँ बनते जा रहे थे
उसे लगता था
कि उसके सपनों की उम्र
उसके संस्कार ही खा रहे थे
.
इन सब में
इस तरह घिरी वह
कि एक दम
शिला हो गई ।

येतात कधीकधी असे दुर्लभ क्षण

रोरावत्या रूटीनाचे
यंत्र अखंड घुमते
दंतचक्र त्याचे रोज
नवी जखम करते

अनावर त्या रेट्यात
पिचलेल्या माझ्यासाठी
वाटेवरच्या झाडाची
वाटते सोबत मोठी

त्याचा मायाळू संभार
घाले हिरवी फुंकर
रंगीबेरंगी पाखरू
झुले उंच फांदीवर

इवल्याश्या कंठातून
किती तरल लकेरी
हाक आभाळाची देते
नेते मला दिगंतरी

आवडलं.

आपण नोकरीला योग्य जागी म्हणजे फाट्यावर मारुन, छानशी दांडी मारतो. >> हा क्षण कधी भेटला नाही नोकरीत असतांना.. वर्षातून मिळणाऱ्या फक्त बारा सुट्ट्या डोळे वटारून उभ्या असायच्या.

जिज्ञासा व्यनि करते.
-----------
अनंत यात्री कविता अप्रतिम आहे.
------------
शर्मिला, दीपक पवार, समाधानी, अनिंद्य, मीरा, कुमार सर आणि रानभुली धन्यवाद.

विंदांची कविता आठवली...
सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते !! तेच ते !!
माकडछाप दंतमंजन,
तोच चहा तेच रंजन
तीच गाणी तेच तराणे,
तेच मूर्ख तेच शहाणे
सकाळपासुन रात्रीपर्यंत
तेच ते तेच ते

खानावळीही बदलून पाहिल्या
कारण जीभ बदलणं शक्य नव्हतं.
काकू पासून ताजमहाल,
सगळीकडे सारखेच हाल
नरम मसाला, गरम मसाला,
तोच तो भाजीपाला
तीच ती खवट चटणी,
तेच ते आंबट सार
सुख थोडे दु:ख फार

संसाराच्या वडावर स्वप्नांची वटवाघुळे
त्या स्वप्नाचे शिल्पकार,
कवि थोडे कवडे फार
पडद्यावरच्या भूतचेष्टा;
शिळा शोक, बुळा बोध
नऊ धागे एक रंग,
व्यभिचाराचे सारे ढंग
पुन्हा पुन्हा तेच भोग
आसक्तीचा तोच रोग
तेच ‘ मंदिर ‘ तीच ‘ मूर्ती ‘
तीच ‘ फुले ‘ तीच ‘ स्फुर्ती ‘
तेच ओठ तेच डोळे
तेच मुरके तेच चाळे
तोच पलंग तीच नारी
सतार नव्हे एकतारी

करीन म्हटले आत्महत्त्या
रोमिओची आत्महत्त्या
दधीचिची आत्महत्त्या
आत्महत्त्याही तीच ती
आत्मा ही तोच तो
हत्त्याही तीच ती
कारण जीवनही तेच ते
आणि मरणही तेच ते
– विंदा करंदीकर

>>>कारण जीवनही तेच ते
आणि मरणही तेच ते
वाह!!! विंदाही मस्त.

पुनरपि जननं पुनरपि मरणं
पुनरपि जननी जठरे शयनं

नेपच्युन शिकवताना कै. धुंडिराज पाठक सरांनी काही शब्द सांगीतले. अबोध, अस्पष्ट आणि ग्रेस यांची कविता " भय इथले संपत नाही" चे नेपच्युन च्या कारकत्वा साठी केलेले रसग्रहण आठवले

https://www.moma.org/collection/works/44814

प्रसिद्ध फोटोग्राफर Lewis Wickes Hine यांनी काढलेला खालील फोटो हा "कन्या" राशीचे प्रतीक मला वाटतो. कारण एक तर एका लहानशा पण अतिशय मेहनती मेकॅनिकचा हा फोटो आहे. कन्येचे जातक स्वभावाने लाजाळू किंवा प्रसिद्धीपड्मुख असतात अन कष्टाळू व सदैव कार्यरत तर अगदी १००% असतात.
"Big doors swing on little hinges."
या प्रसिद्ध वचनानुसार, पडद्याआड, प्रसिद्धीविन्मुख पण सातत्याने कार्यमग्न राहून अचूक काम करतात, अन बारकावे ओळखण्यात, सांधण्यात कुशल असतात.
पहाता क्षणी या फोटोच्या प्रेमात पडले होते.