सुरळी वडी

Submitted by लंपन on 23 March, 2022 - 09:04
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी बेसन,
१ वाटी ताक,
२ वाट्या पाणी,
१ टे स्पून मिरची आणि लसूण पेस्ट,
१ टी स्पून साखर,
दीड वाटी ओलं खोबरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर (एकत्र केलेले),
हळद अर्धा टी स्पून,
मीठ चवीनुसार,
फोडणीसाठी तेल, हिंग आणि मोहरी,
३ मोठी नैवेद्याची ताटे उपडी करून अन तेलाचा हात लावून ठेवलेली.

क्रमवार पाककृती: 

प्रथम ताकाच्या गंजात किंवा कुठल्याही भांड्यात ताक, पाणी, बेसन, हळद, मीठ, साखर, मिरची लसूण पेस्ट एकत्र करून सर्व मिश्रण चांगले कालवून घ्या. नंतर एका जाड बुडाच्या कढईत फोडणीकरता तेल तापत ठेवा. तेल तापले की त्यात मोहरी आणि हिंग घाला. त्यात वरील मिश्रण घाला. आता १० ते १५ मिनिट हे मिश्रण चांगले घोटून / वाफवून घ्या. दहा पंधरा मिनिटांनी मिश्रण कढईच्या मध्ये जमा व्हायला लागेल, पाणी आटून मिश्रण कढईच्या कडा सोडेल. झाऱ्यावर मिश्रण घेऊन जर मिश्रणाचा गोळा तसाच कढईत पडला तर मिश्रण झाले असे समजा. मिश्रण पातळ राहिले तर वड्या अजिबात पडणार नाहीत. जास्त शिजले तरी वड्या पडणार नाहीत. 

मिश्रण झाले की ३ तेल लावलेल्या उपड्या ताटांवर मिश्रण मध्यभागी (३ समभागात) घाला. एक वाटी घ्या तिच्या बुडाला तेल लावा आणि  मध्यभागात असलेले मिश्रण पूर्ण ताटावर एकसारखे पसरवा (धान्य निवडताना बोटे जशी चालवतो तसेच). ह्याला थोडे स्किल लागेल, हलका हात चालवायचा , अजिबात तुटत नाही, चिकटत नाही. (हे डोश्यासारखे पसरवायचे नाही.) आणि मिश्रण एकदम पातळ पसरवायचे, जाड झाले की खांडवी समजून खावे. ०५ मिनिटांनी ह्यावर खोबरे आणि कोथिंबीर घालावी आणि मग वड्या पाडाव्यात. त्यासाठी सुरीचा वापर करावा, मिश्रणाचे दोन / तीन भाग करावेत आणि सुरीच्या मदतीने अलगद हाताने सुरळी (रोल) करावी व नन्तर वड्या पाडाव्यात :)  

Surali Vadi 1.jpgSurali Vadi 2.jpg

वाढणी/प्रमाण: 
३-४ जणांसाठी
अधिक टिपा: 

हा नाशवन्त पदार्थ आहे, फारतर ४/५ तास टिकेल. दुकानात जी मिळते ती वडी एकतर जाड असते आणि त्यात बहुदा गोडसर ताक वापरतात किंवा बेसन / पाणी ह्याचे प्रमाण बदललेले असते. लसूण नाही घातला तरी चालेल. पहिली फोडणी न करता शेवटी वेगळी फोडणी करून ताटावर पसरवलेल्या मिश्रणावर आधी फोडणी मग कोथिंबीर अन खोबरे घातले तरी चालेल, बहुदा पारंपरिक पद्धत अशीच आहे पण सुरुवातीलाच फोडणी केली की छान लागते चव, तेलकट लागत नाही. पाणी, ताक आणि बेसन ह्याचे प्रमाण अजिबात चुकवायचे नाहीये, पहिल्याच प्रयत्नात जमतीलच असे नाही, पण नाहीच जमल्या तरी उकड / पिठलं समजून खायचे, चवीला छानच लागते.

माहितीचा स्रोत: 
पारंपरिक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह!!! मस्त. सुरेख आहे. ताटाऐवजी सिलीकॉन कुकी शीट्स असतील तर त्यावरही सुरळी करणे सोपे जाते.
ताटे तेलाने ग्रीस Happy तेलाचा हात लावलेली, तेल चोपडलेली, तेलाने माखलेली, तेलाचा थर दिलेली यापैकी कुठली चालतील का? Happy

वा , मस्त !! रंग छान आलाय . मी ताट ऐवजी ओट्यावरच पसरते , मोठे एक सलग पसरता येते. रोल करायला ही सोपे जाते .

मस्त फोटो.
मी आर्च च्या मेथडने करते. मायक्रोवेव्ह मधली आहे .एकदम फुलप्रुफ रेसीपी आहे. गेली सात आठ वर्ष ही रेसीपी वापरत आहे आणि कधीही चुकली नाही.

मस्त. मला फक्त खांडवी मिक्सच्याच सुरळीच्या वड्या फक्कड जमतात. बाकी अशा पद्धतीने जरा धाकधूक वाटते. मी मिश्रणात आलं, मिरची आणि कोथिंबीर वाटून घालून शिजवते आणि काऊंटरवर फॉईल पसरुन त्यावर मिश्रण पसरते. भांडी घासायचा त्रास जरा कमी होतो.

7723A765-A11C-4C28-A2AD-B0D4C6A29CBE.jpeg

भारी!
सायो, तुमच्या वड्यापण एकदम सुंदर दिसतायत!

मस्तच रेसिपी आणि वड्यापण छान आहेत.
सायोच्या वड्यापण भारी!

मी आपली ओगले आजींच्या रेसिपीने करते. एक माप बेसन तर पावणेतीन माप ताक-पाणी मिश्रण.

छान क्रुती आणी फोटो, सायोच्या पण भारी दिसतायत
मिश्रणात आधी तेल/ फोडणी टाकल्याने पदार्थ जास्त वेळ टिकेल का ?>>> नाही टिकणार

धन्यवाद लोक्स _/\_ भरत ट्राय करून बघा, नाहीच जमली तरी ते पिठलं सुद्धा फार टेस्टी लागतं. ब्लॅककॅट, हो शेवटी घालतात पण तेलकट लागते मग चवीला, आधी फोडणी करून सुध्दा टिकणार नाही , ताकामुळे लवकर खराब होते. स्वाती मी करून बघेन त्या पद्धतीने आता , प्रमाण सेम आहे. तेलामुळे वडी सुटेल नाहीतर तुकडे होतील, तेलावर सुध्दा पसरवता येते. एस आर डी धन्यवाद. सीमंतिनी बदल करतो, हो शिट्स वापरून जमेलच. अश्विनी, ओटा तेवढा स्वच्छ हवा ना Proud किशोर, वावे, प्राजक्ता, प्रज्ञा, अंजली धन्यवाद. सीमा, मी करून बघेन तशा, पातळ निघाल्या वड्या तर मी पण तीच पद्धत वापरेन, कमी खटपट आहे Happy सायो, एकदम मस्तच दिसत आहेत वड्या.

भारीच लंपन , हे फार कौशल्याचे काम आहे, सुरेख झाल्यात. मी अशा प्रकारे फार क्वचित करते.

सायो एकदम भारी.

मस्त मस्त माझ्या आईची हीच पद्धत. त्या आतील खोबरे कोथिंबीरलाच आम्ही सारण बनवायचो फोड णी व मीठ साखर लिंबूरस घालायचो. मग हे पस्रून वळकट्या करून त्या ताटा वरून लगेच फस्त करायच्या.

सुगरणेश्वर आहे हो मुलगा.

मी हेच मिश्रण कुकरमधे टोपात ठेवून तीन शिट्या घेते आणी पाच सात मिनीटांनी कुकर उघडून लगेच ताटावर पसरवते. मिश्रण किती शिजवायचे ह्याचे टेंशन नाही. व्यवस्थित होतात.
सायो, एकदम tempting झाल्या आहेत वड्या. लंपनच्या पण मस्त.

पहिल्याच प्रयत्नात जमतीलच असे नाही, पण नाहीच जमल्या तरी उकड / पिठलं समजून खायचे, चवीला छानच लागते.>>> माझ्यासाठी हीच टीप महत्वाची आहे. Lol
खूप दिवस करायचं मनात आहे, पण धीर होईना.

लंपनच्या पाककृती?
जपानमध्ये करायच्या झाल्यास काय काय अडचण येईल?
ट्रेकिंगला नाही जमणार.
-------
उपमामिश्रण केलं आहे. तीन मेणबत्यांवर शिजवायचं.

भारीच रे!!

सुगरणेश्वर आहे हो मुलगा. >>> Lol अगदीच Happy

Pages