सुरळी वडी

Submitted by लंपन on 23 March, 2022 - 09:04
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी बेसन,
१ वाटी ताक,
२ वाट्या पाणी,
१ टे स्पून मिरची आणि लसूण पेस्ट,
१ टी स्पून साखर,
दीड वाटी ओलं खोबरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर (एकत्र केलेले),
हळद अर्धा टी स्पून,
मीठ चवीनुसार,
फोडणीसाठी तेल, हिंग आणि मोहरी,
३ मोठी नैवेद्याची ताटे उपडी करून अन तेलाचा हात लावून ठेवलेली.

क्रमवार पाककृती: 

प्रथम ताकाच्या गंजात किंवा कुठल्याही भांड्यात ताक, पाणी, बेसन, हळद, मीठ, साखर, मिरची लसूण पेस्ट एकत्र करून सर्व मिश्रण चांगले कालवून घ्या. नंतर एका जाड बुडाच्या कढईत फोडणीकरता तेल तापत ठेवा. तेल तापले की त्यात मोहरी आणि हिंग घाला. त्यात वरील मिश्रण घाला. आता १० ते १५ मिनिट हे मिश्रण चांगले घोटून / वाफवून घ्या. दहा पंधरा मिनिटांनी मिश्रण कढईच्या मध्ये जमा व्हायला लागेल, पाणी आटून मिश्रण कढईच्या कडा सोडेल. झाऱ्यावर मिश्रण घेऊन जर मिश्रणाचा गोळा तसाच कढईत पडला तर मिश्रण झाले असे समजा. मिश्रण पातळ राहिले तर वड्या अजिबात पडणार नाहीत. जास्त शिजले तरी वड्या पडणार नाहीत. 

मिश्रण झाले की ३ तेल लावलेल्या उपड्या ताटांवर मिश्रण मध्यभागी (३ समभागात) घाला. एक वाटी घ्या तिच्या बुडाला तेल लावा आणि  मध्यभागात असलेले मिश्रण पूर्ण ताटावर एकसारखे पसरवा (धान्य निवडताना बोटे जशी चालवतो तसेच). ह्याला थोडे स्किल लागेल, हलका हात चालवायचा , अजिबात तुटत नाही, चिकटत नाही. (हे डोश्यासारखे पसरवायचे नाही.) आणि मिश्रण एकदम पातळ पसरवायचे, जाड झाले की खांडवी समजून खावे. ०५ मिनिटांनी ह्यावर खोबरे आणि कोथिंबीर घालावी आणि मग वड्या पाडाव्यात. त्यासाठी सुरीचा वापर करावा, मिश्रणाचे दोन / तीन भाग करावेत आणि सुरीच्या मदतीने अलगद हाताने सुरळी (रोल) करावी व नन्तर वड्या पाडाव्यात :)  

Surali Vadi 1.jpgSurali Vadi 2.jpg

वाढणी/प्रमाण: 
३-४ जणांसाठी
अधिक टिपा: 

हा नाशवन्त पदार्थ आहे, फारतर ४/५ तास टिकेल. दुकानात जी मिळते ती वडी एकतर जाड असते आणि त्यात बहुदा गोडसर ताक वापरतात किंवा बेसन / पाणी ह्याचे प्रमाण बदललेले असते. लसूण नाही घातला तरी चालेल. पहिली फोडणी न करता शेवटी वेगळी फोडणी करून ताटावर पसरवलेल्या मिश्रणावर आधी फोडणी मग कोथिंबीर अन खोबरे घातले तरी चालेल, बहुदा पारंपरिक पद्धत अशीच आहे पण सुरुवातीलाच फोडणी केली की छान लागते चव, तेलकट लागत नाही. पाणी, ताक आणि बेसन ह्याचे प्रमाण अजिबात चुकवायचे नाहीये, पहिल्याच प्रयत्नात जमतीलच असे नाही, पण नाहीच जमल्या तरी उकड / पिठलं समजून खायचे, चवीला छानच लागते.

माहितीचा स्रोत: 
पारंपरिक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा!

अंजू, ssj, अमा, श्रवू, मृणाली, मी चिन्मयी, मानव, आबा, धनवंती, कुंद खूप धन्यवाद. @अमा, कुकिंग अन लताबाईंची गाणी असली की बास.. कुकिंग एकदम रिलॅक्सिंग आहे Happy चिन्मयी ट्राय करा नक्की जमेल. श्रवू भारी दिसत आहेत वड्या.

Pages