सजल नयन नितधार बरसती.. (भाग – 4 – अंतीम भाग )

Submitted by SharmilaR on 21 March, 2022 - 00:10

भाग – १,२,३
https://www.maayboli.com/node/81304

https://www.maayboli.com/node/81310

https://www.maayboli.com/node/81318

सजल नयन नितधार बरसती.. (भाग – 4 – अंतीम भाग )

वीणाताईंना माईंबरोबर रूम मध्ये ठेवून प्रिती कँटिन कडे वळली. तिच्या मनात विचारचक्र चालूच होतं. ज्या स्वाभिमानी माईंनी, मिळालेले आयुष्य निमूटपणे स्वीकारलं, कधी एकटेपणाचा सुर लावला नाही, त्या माईला आत्ता आयुष्याच्या शेवटी तरी का नानांना भेटायचं होतं? सांगायचं होतं का त्यांना, ‘की मी एकटीने माझ्या संसाराची नाव किनाऱ्यावर आणली? माझ्या मुलीला मी घडवलं, कुणाच्या मदतीशिवाय?’

एकदा नानांच्या घराची पायरी उतरल्यानंतर, माई तिथे परत कधीही गेली नव्हती, अगदी संधी असली तरी. प्रिती आत नानांच्या घरात असेल, तेव्हा तिची वाट बघत माई बाहेरच, कोपऱ्यावर थांबायची. नंतर नंतर तर प्रितीनेच तिथे जाणं बंद केलं होतं. पण तिच्या नकळत्या वयात, वीणाताईंच तिला आमंत्रण आलं की माई पाठवायचीच तिला तिथे. ‘माझ्यामुळे तुला तुझे वडील दिसत नाही’ असं व्हायला नको म्हणायची. आणी वीणाताई निमित्ता निमित्ताने तिला बोलवयच्याच. कसली तरी भरपाई करत होत्या का त्या? लहानपणी काही कळायचं नाही.

मुळात नानांच्या त्या घरातून माईबरोबर कायमचं बाहेर पडणं तरी कुठे नीट कळलं होतं? तिथे असतांना, घरात सतत येणाऱ्या मोठ मोठ्या माणसांमुळे, त्यांच्या चाललेल्या चर्चां मुळे आपले वडील खूप मोठे आहेत ही जाणीव होती. पण तरी, काही तरी कमी होतं. इतर मैत्रिणींच्या वडिलांसारखे आपले वडील घरात हसून खेळून रहात नाही, एवढंच कळत होतं. माई, नानांना खूप गप्पा मारतानाही तिने कधी बघितलं नव्हतं. तिला तर धाकच वाटायचा नानांचा नेहमी. नाना घरात आले, की ती माईचा पदर धरून तिच्या मागे मागे फिरायची.

एरवीही तशी ती माईबरोबरच असायची. तिच्याच शाळेत माई शिकवायची मोठ्या वर्गांना. मग तिची लहान वर्गांची तिची शाळा लवकर संपली तरी, ती माईची वाट बघत तिच्या स्टाफ रूम मध्येच थांबायची. घरात नानांनी अगदीच काही प्रश्न विचारले तर, त्यांना जेमतेम उत्तर देण्या इतपतच नानाशी संबंध यायचा.

‘आपण दोघींनी दुसरीकडे राहायला जायचं आहे.’ असं माईने सांगीतल्यावर ‘का जायचं?’ हा प्रश्न पडला, तरी तिने तो विचारला नाही. जेमतेम सात वर्षांची तर होती तेव्हा ती. त्यांचं नवीन घर आधीच्या घरापेक्षा खूपच लहान होतं, पण त्यांच्या शाळेजवळच होतं. तसंही आता घरात दोघीच असायच्या. आता जगच फक्त त्या दोघींचं झालं होतं. माई मुळात शांत आणी अबोल स्वभावाची होती. मग प्रिती पण तशीच झाली. शांत आणी अबोल. भोवतीच्या पुस्तकात रमून जाणारी. हळू हळू नानांच लेखक असणं कळत तिला गेलं.

नानांनी दुसरं लग्न केल्याचं तिला कळलं. म्हणजे बाहेरून कळायच्या आधी, एक दिवस माईनेच तिला सांगितलं. तेव्हा तिला त्याचं विशेष काही वाटलं नाही, कारण मुळात त्यांच्याशी काही संबंध आलाच नव्हता तिचा.

मग कधी मधी वीणाताईंचा तिच्याकरता फोन यायला लागला. तिला त्यांच्या घरी बोलवायला. त्या प्रेमाने तिची चौकशी करायच्या, तिच्या करता काहीतरी गिफ्ट आणून ठेवायच्या.. माई सोडायची तिला तिथे. मोहनच्या जन्मानंतर तर वर्षातून दोनदा तरी, राखी पूर्णिमा आणी भाऊबीज ती तिथे असायचीच.

पण मग मोठी झाल्यावर, तीचं ती ठरवायला लागल्यावर, तिने बंद केलं वीणाताईंकडे जाणं. तिला त्यांचा राग यायला लागला. त्यांच प्रेम, प्रेम नं वाटता त्या कशाची तरी फेड करताहेत असं वाटायला लागलं. आता तिला कळायला लागलं होतं. जे घर कधीतरी आपलं होतं, ते आता नानांबरोबर वीणाताई आणी मोहनचं आहे हे समजलं होतं. मग कधीतरी तिला माईंचाच राग यायचा. एवढी कशी सहनशील ही? कधीच कसं हिला चिडलेली बघितलं नाही? त्या घरातून बाहेर पडताना आणि त्या आधीही?

“तू कधीही त्यांच्याकडून काही घेतलं नाहीस माई. अगदी तुझ्या हक्काचं पण सगळं सोडलस.” एकदा तिने माईला म्हटलं.
“मागून इस्टेट मिळाली असती गं, प्रेम नाही.” माईने अगदी शांतपणे उत्तर दिलं होतं.
“पण तू त्यांना सरळ मोकळीक दिलीस. तू घटस्फोट दिला नसतास, तर करता आलं असतं त्यांना दुसरं लग्न?”
“असं जबरदस्ती बांधून ठेवता येतं का पियू कुणाला? आणी कुणाचं लोढणं होऊन जगण्यात काय मजा गं?” माईचा स्वर सुद्धा कधी चढा नसायचा.

प्रीतीचं नानांकडे जाणं बंद झालं, तरी पण तिची राखीपूर्णिमा अन भाऊबीज चुकली नाही. मोहन आता त्यांच्याकडे यायला लागला होता. त्याच्या दृष्टीने, लहानपणापासून माहीत असलेली बहीण तीचं होती. मग एरवीही कधीतरी तोच यायचा त्यांच्याकडे. मोठा गोड मुलगा होता तो. त्याच्याशी फटकून वागणं कधी तिलाही जमलं नाही आणी माईलाही नाही, तो बराचसा नानांसारखा दिसत असला तरी.

नानांकडे पैसा होता, इस्टेट होती, नावलौकिक होता आणि सगळे शब्दांचे बुडबुडे होते. भाषा प्रभूच ते. पण हे काहीच नसताना, एकही शब्द नं उच्चारता माई शांतपणे आयुष्य जगत होती, विना तक्रार. जणू काही नाना कधी तिच्या आयुष्यात नव्हतेच.

प्रीतीला आधी वाटायचं, ‘माईने लवकर हार मानली. पण नाही. ती खरी लढवय्यी. हिमतीने एकटी राहिली. माझा सांभाळ केला. मला शिकवलं, मोठं केलं. स्वत:च्या वागणुकीतून मला बरं वाईट शिकवत राहिली. मला कायम निर्णय स्वातंत्र्य दिलं, मी लग्न नं करणाचं ठरवलं तेव्हाही अन पुढे सहा महिन्यांच्या नेहाला दत्तक घ्यायचं ठरवलं तेव्हाही.’

खरं तर प्रितीच्या आय. टी. तल्या पूर्ण वेळेच्या नोकरीत, एवढं लहान बाळ सांभाळणं तिला अवघड होतं. पण तिला मुलगीच दत्तक घ्यायची होती, अन् तीही अगदी लहान. तिला आईपण हवं होतं, पण बायकोपण टाळायचं होतं. सगळं जमलं ते माईच्या खंबीर पाठिंब्यानेच.

नेहा जेमतेम दोन वर्षांची असतांना, प्रीतीला सहा महीने परदेशी जावं लागलं. ती आधी ते टाळायचा प्रयत्न करत होती. पण माईनेच परत धीर दिला. नेहाची अगदी पूर्ण जबाबदारी घेतली, अन् प्रीतीला जायला लावलं. तसाही नेहाला आजीचाच लळा जास्त होता. आताही एक दिवस का असेना घाई घाईने भेटून गेली होती ती आजीला. तिच्या फायनल्स जवळ आल्या होत्या. अहमदाबाद ला एम. बी. ए. करत होती ती. दिवसातून दोन कॉल तरी असायचेच तिचे आजीच्या तब्बेती करता.

मोहनशी अजूनही संबंध टिकून होते प्रीतीचे. त्याच्या लग्नानंतर तर मग अर्चनाशीही तिचे संबंध जुळून आलेच. मोहन आणी अर्चनाचा विचार मनात येताच तिने नकळत उसासा सोडला. किती छान आयुष्य चालू होतं आता पर्यंत मोहन, अर्चना आणी इशुचं! किती प्रयत्न केले होते तिने मोहनशी बोलण्याचे? पण तो फक्त अर्चनाचा विषय सोडून कशावरही बोलायला तयार असायचा. अर्चनाकडे पण सांगण्यासारखं काही नव्हतंच.

नजर लागणं खरं असेल, तर मोहन अर्चनाच्या संसाराला नजरच लागली म्हणायची. नानांना कारण तरी होतं, माईंशी त्यांचं लग्न त्यांच्या आईवडीलांनी ठरवलं म्हणून.

मोहनने तर अर्चनाच्या प्रेमात पडून लग्न केलं होतं. माई मुकाट्‍याने घरातून बाहेर पडली. अर्चनाने मोहनला थांबवायचे सगळे प्रयत्न केले. पण शेवटी सगळ्याची परिणती एकच. त्यांचा एकटेपणा. इच्छा, निर्णय हे त्या त्या पुरुषांचेच राहिले. मग तिला वाटलं, निदान आपलं बरं आहे, कुणा दुसर्‍यांमुळे, आपलं आयुष्य नाही बदललं. आपण स्वत: आपले निर्णय घेतले. पण ते तरी कितपत खरं आहे? लहानपणी घरात आई वडील दोघंही मिळाले असते, तर कदाचित माझे निर्णय पण वेगळे राहिले असते.... पण आता शेवटी आपण सगळ्या एकट्याच........

कॉफी चा कप ठेवून ती उठली. बराच वेळ झाला होता. वीणाताई निघाल्या असतील. कॉरीडॉर मध्येच तिला अर्चना भेटली.

“आईंना घ्यायला आले. खालून बरेच फोन केले, पण त्यांनी घेतले नाही म्हणून..” अर्चना म्हणली.

प्रिती काहीच बोलली नाही. तिने रूम चं दार ढकललं. अर्चना तिच्या मागोमाग गेली. त्या दोघीही तिथेच थबकल्या. ईसीजी मॉनिटर वरची रेषा सरळ झाली होती. माईंचा हात हातात धरून, वीणाताई तिथेच कलंडल्या होत्या. जवळच त्यांची पर्स वेडीवाकडी पडली होती.

थकले पैंजण चरणही थकले
वृन्दावनीचे मोहन सरले ||
तुझ्या स्मृतींची फुले प्रेमले
अजुन उखाणे मला घालिती ||
सजल नयन नित धार बरसती
भावगंध त्या जळी मिसळती ||
********************

(समाप्त)

Group content visibility: 
Use group defaults

ओह...

ओह!
ही कथा खुप छान लिहिलीत शर्मिला.
ओघवती तरल भावनिक.
प्रत्येकीच्या कथेत गुंतायला झालं. खुप आवडली.
लिहित रहा.

देवकी +१
कथा खूप छान रंगवलीत मात्र.
इथे हे लिहिणं उचित आहे की नाही हे माहिती नाही. योग्य वाटत नसेल तर काढून टाकेन नंतर.
मला सुरुवातीपासून ना.सी.फडके यांची कहाणी डोळ्यासमोर आली ही कथा वाचताना. त्यांची पहिल्या पत्नीपासूनची कन्या लीला पाटील (शिक्षणतज्ज्ञ) यांचा 'बापलेकी' पुस्तकातला लेख वाचला होता तेव्हा ती बाजू समजली होती. त्यानंतर तीनचार वर्षांपूर्वी ना.सी.फडके आणि त्यांची दुसरी पत्नी कमल फडके यांच्या मुलीने लिहिलेला लेख वाचला आणि तिची बाजू समजली.
तुम्ही ना.सी.फडक्यांना डोळ्यासमोर ठेवून ही कथा लिहिली असेल किंवा नसेल, पण उत्तम जमली आहे. भावभावना उत्तम उतरल्या आहेत.

वावे, अगदी खरंय.मलाही तेच मनात आले होते. डॉ.लीला पाटील यांचा लेख एका दिवाli अंकात वाचला होता.

कमल फडकेंच्या मुलीचा लेख वाचनात नाही आला.आता ती रुखरुख राहील.अर्थाअर्थी काहीही संबंध नसताना.

धन्यवाद रुपाली, देवकी, वावे.

ना सी फडक्याचं आत्मचरित्र मी खूपच पूर्वी (जवळपास लहानपणीच )वाचलंय. मला अजिबात आवडलं नव्हतं. ह्याचं महत्वाचं कारण म्हणजे त्यात कुठेही चुकून सुद्धा पहिल्या संसाराचा उल्लेख नव्हता. आणी ते त्या वयातही मला खूप खटकलं होतं.

मी लिहिलेली कथा पूर्ण काल्पनिक आहे. आधी त्यातली अर्चना आणी ईशा फक्त डोळ्यासमोर होत्या. पण लिहितांना आणखीन सुचत गेलं.

शेवट लिहितांना मला वाटलं वीणाताईंनी आयुष्याभर एक अपराधी पणा मनात बाळगला. मग शेवटचं माईंना बघताना त्यानां ताण आला असणार....

वावे, तुमच्या प्रतिक्रिये मुळे विसरलेलं आठवणीत आलं आणी माहिती मिळाली नवीन. प्रतिक्रिया कशाला काढायची?
आपल्या लेखनाच्या सर्व बाजूनी विचार झाला की छान वाटतं.

शर्मिला, दीर्घकथा आवडली. तुम्ही फार छान लिहिता.

हो मला पण शेवट नव्हता आवडला पण मग प्रतिसादातील तुम्ही दिलेलं कारण पटलं. वर्षानुवर्षे मनात असलेलं गिल्ट आणि अति स्ट्रेसमुळे असं होऊच शकतं.

सुंदर, आवडली!
अर्चना, प्रिती, वीणाताई, माई यांचे आयुष्याचे कोन किती वेगवेगळे आहेत आणि ते वेगळेपण तुमच्या शब्दांतून पोहोचतय. वीणाताईचं जाणं सोडून सगळंच practical वाटतं.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा! Happy

काहीशी रुखरुख लावणारी फार सुंदर कथा आहे ही...
सजल नयन शीर्षकामुळे चटकन लक्ष गेले कथेकडे आणि किती सुंदर गुंफले आहे हे गाणे तुम्ही कथेत.

लीला पाटील यांचा लेख मी वाचला आहे. कमल फडके यांच्या मुलीचा लेख कधी वाचायला मिळाला तर आवडेल.