https://www.maayboli.com/node/80987
पूर्वार्ध १
https://www.maayboli.com/node/80996
पूर्वार्ध २
https://www.maayboli.com/node/81025
दिवस पहिला - साचेन
https://www.maayboli.com/node/81122
दिवस २ - छोका
================================================================
छोकाची पहाट अपेक्षेप्रमाणेच प्रसन्न अशीच होती. पर्वतांच्या सानिध्ध्यात सगळ्या गोष्टी सुंदर होऊन जातात. पहाट काय किंवा लालरक्तीम सूर्यास्त काय, फारच लोभसवाणे वाटू लागते. त्यामुळे छोकाची पहाट त्याला अपवाद नव्हतीच.
रोजच्या प्रमाणे बेड टी घेतला आणि बाहेर आलो तर शिरशीरीच आली एकदम. बाहेर चांगलेच गार होते. आत मस्त स्लिपींग बॅगमध्ये काही जाणवले नव्हते जास्त. इथे मोठे गाव असल्याने व्यवस्थित बांधीव टॉयलेट्स होती आणि पाण्याची सोय होती. म्हणलं चला हेही उत्तम झाले. टॉयलेट पेपर वापरणे मला अद्याप जमलं नाही आणि आवडलंही नाही. नंतरच्या मुक्कामात मग त्याचा वापर केल्याशिवाय पर्याय नव्हता त्यामुळे एक दोन रोल आम्ही सामानात ठेवले होतेच. पण जोवर शक्य होते तोवर तरी पाणीच.
सगळं उरकून नाष्ट्याला जमलो तर सगळ्यांची किती बाई थंडी हीच चर्चा सुरु होती. रात्री चांगलेच गारठले होते म्हणे, कित्येकांना झोप पण लागली नाही म्हणे. हायला म्हणलं आपल्याला कशी काय जाणवली नाही थंडी. तोवर एकजण म्हणालाच, तुम्हाला कसल्या भारी झोपा लागल्या. म्हणलं होय का?
"फिर क्या, ऐसा लग रहा था की दोनोंकी खर्राटे लेने की कॉम्पिटीशन चल रही थी.."
म्हणलं, हम लोग खर्राटे ले रहे थे???
"फिर क्या, पूरा कँप गुंज उठा आपकी वजह से, हम लोगोने बाहर आके देखा इतने जोर से कौन आवाज कर रहा है. कैसे सोते हो यार तुम दोनो भाई ?"
आता आम्ही दोघेही झोपेसाठी बदनाम आहोत हे खरे. आम्ही कुठेही आणि कसेही झोपू शकतो. पण आमच्या घोरण्याने लोकांच्या झोपा मोडत असतील हे काय खरे वाटेना. आधी वाटलं आमची खेचत आहेत. पण एक दोन मुलींनी पण सांगितले की तुमच्या टेंटमधून फारच मोठ्याने घोरण्याचे आवाज येत होते.
तोवर लीडर आलाच. त्याने सांगितले की आजचा पल्ला मोठा आहे. मोठा म्हणजे चांगलाच, म्हणाला या आख्ख्या ट्रेकमधले सगळ्यात कस लावणारे जे दोन दिवस आहेत त्यातला आजचा एक. दुसरा आपण ज्या दिवशी समीट चढणार तो. त्यामुळे सगळ्यांनी भरपूर नाष्टा करा. आपल्याला पोचायला संध्याकाळ होईल आणि वाटेत लंच कॅरी करायचे आहे. आपण चांगली उंची गाठणार आहोत त्यामुळे वाटेत कुणाला त्रास व्हायला लागला तर उगाच अंगावर न काढता तातडीने आम्हाला कोणाला तरी सांगा.
छोका आहे ९७०० फुटांवर आणि आम्ही वाटेत फेडांग (१०,५०० फुट) मार्गे झोंगरी (Dzongri ; १२,९८० फुट) गाठणार होतो. थोडक्यात चांगलीच चढाई होती. एकच चांगली गोष्ट होती ती म्हणजे झोंगरी ला पोचल्यावर दुसरा दिवस पुर्ण आराम होता. अक्लामटाईज होण्यासाठी असे केले जाते. सर्वसाधारणपणे ८ हजार ते १२ हजारापर्यंत हाय अल्टीट्युट मानले जाते, १२ हजारच्या पुढे व्हेरी हाय अल्टीट्युट आणि १८ हजारच्या पुढे एक्स्ट्रीम हाय. त्यामुळे लीडरने अजिबातच बेपर्वाइ करायची नाही हे तीन तीनदा निक्षून सांगितले.
आजही नाष्ट्याला पॅन केक्स होते आणि सोबत पॉरेज (मी हा प्रकार पहिल्यांदाच खाल्ला, पण त्याला खीर म्हणणे डाऊनमार्केट असतं म्हणे, त्यामुळे त्याला पॉरेजच म्हणायचं). कहर म्हणजे इतक्या बेस्ट खाण्याला नाके मुरडणारेही होते. स्पेशली बंगलोरचे ट्रेकर्स. रोज रोज काय तेच म्हणे. म्हणलं याना काय आता इडली डोसा सांबर हवं का काय नाष्ट्याला. म्हणजे जरी पैसे भरले असले तरी इतक्या उंचीवर गरमागरम आयते खायला मिळते आहे हेच मला आणि अमेयला भारी वाटत होते. त्याला नावं ठेवणे वगैरे म्हणजे आमच्या आकलनापलीकडचे होते. सह्याद्रीत ट्रेक करताना आपल्याला काहीही मिळेल ते आनंदाने पोटात ढकलायची चांगली सवय लागलेली असते त्यामुळे असले चोचले कधी केल्याचे आठवतच नाही. असो. तर सामान पॅक केले, तोवर स्टाफने आमचे भरलेले डबे हातात दिले.
हे आता फाडिंगला रेस्ट घेऊ दुपारी तिकडे खायचे असे सांगितले. आजचा ट्रेक होता ९ किमीचा. बरोबर निम्म्या वाटेत म्हणजे ४.५ किमीवर फाडिंग आणि तेवढ्याच अंतरावर झोंगरी. तर हुप्पा हुय्या करत निघालो.
सुरुवातीला जरा ग्रॅज्युअल चढ होता पण त्याचा रिदम येईपर्यंतच दमदार चढ सुरु झाला आणि लक्षात आले आज कस लागणार खरा. दोन दिवस सगळे मस्त बागडत वगैरे ट्रेक करत होते पण टूर दी फ्रान्स मध्ये कसे माउंटन स्टेज आली की अव्वल सायकलपटू मुसंडी मारतात तसे फक्त दमाचे भिडू पुढे सरकले लीडर सोबत, बाकी आमच्यासारखे हिले डुले करत थांबत दम घेत वाट कापू लागलो.
तो रूट होताही मस्त. मस्त घनदाट जंगलातून जाणारी पायवाट, दुतर्फा डेरेदार वृक्ष आणि त्यांचे आभाळाला भिडणारे शेंडे, बघायला जावं तर टोपी पडावी इतके उंच. काही ठिकाणी तर एखादे वठलेले झाड आडवे पडलेले असायचे त्याच्या खालून वाकून जावं लागत होतं. मला तर तिथून जाताना हरिश्चंद्रगडाची टोलारखिंडीतून जाणाऱ्या वाटेची आठवण झाली. थंडी मस्तच होती पण चढ चांगले घामटे काढत होता. बघता बघता सगळ्यांचे जॅकेट्स, लोकरी टोप्या सॅकमध्ये गेल्या आणि हाशहुश करत एकेक पाऊल नेटाने टाकू लागलो.
अर्थात त्यातही बंगाली ट्रेकर काही स्वस्थ नव्हतेच, त्यांची अखंड टकळी सुरुच होती. इतक्या चढावरही ते कसे काय इतकं बोलू शकत होते देव जाणे. त्यांना मला एकदा थांबून सांगावे वाटले बाबांनो मध्ये श्वास तरी घ्या आणि मग बोला.
फाडिंग येता येता चढ अजूनच तीव्र झाला. एक वळणावर चढलो आणि खिंड आल्यासारखे वाटले, थोडे वरती जाताच सगळे श्रम वसूल व्हावेत असे दृश्य अचानक समोर आले. मस्त मोकळे पटांगण आणि त्यासमोर विस्तिर्ण अशी पसरलेली बर्फाच्छदित डोंगरांची रांग. अहाहा, इतकं विलोभनीय होतं ते सगळं. केवळ तोच अनुभव पुन्हा घेण्यासाठी काही पावले परत खाली उतरलो आणि परत त्या खिंडीतून वर येताना डोळे भरून ती रांग पाहीली.
तोवर पुढे आलेले मस्त हिरवळीवर पसरले होते आणि डबे वगैरे उघडून जेवणाची तयारी सुरु केली होती. मीही उत्सुकतेने डबा उघडला तर काय, एक जॅम सँडविच, उकडलेले अंडे आणि एक फ्रुटीचा पॅक. हायला म्हणलं हा पॅक लंच होय. त्या वेळी तेही अमृतासमान वाटलं पण पोटाच्या कुठल्या कोपऱ्यात गडप झालं कळलंच नाही. म्हणलं ठिके, पोटाला आधार मिळाला हेही नसे थोडके. तोवर स्लो गँग एकेक करत येऊ लागली होती. मग वॉव कितना बढीया है, फोटो, सेल्फि वगैरे सुरु झालं.
लीडर म्हणाला अभी ये आधा रस्ताही हुवा है, चलो जो रेडी है वो चलना शुरु करे
मला अजून थोडं थांबून चालणार होते पण माझ्या स्पीडचा मला चांगलाच अंदाज असल्याने म्हणलं एकदम मागे राहण्यापेक्षा वाटेत थांबत थांबत जाऊ. ते एकप्रकारे बरेच झाले कारण इथून पुढे तर रस्ताच नव्हता. दगडधोंड्याने, घसाऱ्याने सजलेली वाट एकदम आभाळात जात होती. मध्ये एक ठिकाणी थांबून पाणी प्यायलो आणि पुढे पाहिले तर लांबवर एक उंच डोंगर दिसला आणि त्यावर काही ठिपके. निरखून पाहिले तर पोर्टर आणि खेचरांची रांग. म्हणलं बापरे आपल्याला आता तिथून जायचं आहे का काय. हे म्हणजे इतका वेळचा चढ काहीच नव्हता इतकी चढण होती. पोटात गोळाच आला आणि तो कमी करायला एकच मार्ग होता, शेअर करणे. मागूनच एक त्रिपाठी म्हणून येत होता, त्याला ते दाखवलं म्हणलं वो देखो वहांं जाना है. तर तो वैतागलाच. म्हणे चुपचाप चल रहा था, अभी टेन्शन आ गया. म्हणलं मलाही आलं आहे म्हणन तुला सांगितले तर अजूनच वैतागला.
तो चढ खरेच फार वाईट होता आणि त्यापेक्षा वाईट होते आम्हाला ओव्हरटेक करत आरामात पुढे चालणारे पोर्टर. ते अवाढव्य बोजे पाठीवर घेऊन, सरळ रस्त्यावरून जावं तितक्या आरामात गप्पा मारत, गाणी म्हणत जायचे. आम्ही आपले पाच पावले चालून थांबायचो तर हे बघता बघता दिसेनासे होत. शेवटी एकाला थांबवून विचारलेच भाई और कितना है, तर म्हणे ये क्या आ गया, अभी थोडी देर. एक सेकंद बरे वाटले पण लक्षात आले हे काही खऱ्यातले नाही. अजून भरपूर असणारे आणि तसेच झाले.
त्यावरून मला सिंहगड वारी दरम्यान एक किस्सा झालेला आठवला. गड चढून खाली उतरत होतो तर नेहमीची गर्दी होतीच. जीन्स आणि हिल्स मध्ये टळटळीत उन्हात पायवाट चढणाऱ्या धाडसी कॉलेज कुमारिका आणि त्यांना बस अभी थोडा ही रह गया है अशी पट्टी पढवणारे त्यांचे हिरो, दादा अजून किती आहे चढायला अशी केविलवाणी प्रश्नमालिका
एक येरुतर इतका पेटला
त्याला मी नेहमीच्या पद्धतीने झालं आता आलंच दहा मिनिटे लागतील म्हणालो तर
"साला पीछले एक घंटेसे सब लोग बस आया दस मिनिटं बोल के चुत्या बना रहे, सच्ची मैं बताव कितना बाकी है?"
मी त्याला एक तास म्हणल्यावर भेलकंडला जागीच. बिचारा निम्या वाटेतच होता, जीन्स, स्पोर्ट्स शूज आणि हातात पेप्सी ची बाटली घेऊन साहेब चढत होते, त्याच्या स्पीडने तो संध्याकाळीच पोचला असणार.
त्रिपाठी पण अफाट हैराण झाला होता. तो आणि त्याच्या सोबत अजून काही जणी आणि मी असा ग्रुप करून चालू लागलो. आणि आता एक पाऊलही उचलणार नाही अशा स्थितीत येईपर्यंत अखेरीस डोंगरमाथा गाठला. इथे गेल्यावर कळलं हा देवराली टॉप.
इथे तर अजूनच रमणीय दृश्य होते. म्हणजे फाडिंगचे काहीच नाही म्हणावं इतकं. इतक्या उंचीवर आल्याने बाकी डोंगर आता खुजे दिसत होते आणि त्यावरून जाणारी ढगांची रांग. अक्षरश स्वर्गात आल्याचा फिल होता तो. समोरच अवाढव्य पसरलेली कांचनगंगा पर्वतरांग दिसत होती.
बस्स, याचसाठी केला होता अट्टाहास. जगातील तिसऱ्या क्रमांकाचा पर्वत आमच्यासमोर त्याचे विस्तृत रुप घेऊन उभा ठाकला होता. त्यावेळी हे मनातून माहीती होते की आपली अजिबात शारिरीक आणि आर्थिक कुवत नाहीये पण तरीही मनापासून वाटलं की एकदा तरी या नगाधिराजावर आरोहण करण्याची संधी मिळावी.
तिथे उंचीवर चांगलेच गार वारे वाहत होते, आणि इतका वेळ घामाने थबथबून निघाल्यावर तर जास्तच. पटापटा सगळ्यांचे जॅकेट्स बाहेर आले. त्यावेळी मस्त गरमागरम चहा मिळायला हवा होता यार. थोडे फोटोसेशन वगैरे झाले तोवर लीडरने एक भारी गोष्ट सांगितली की आपल्या जुन्या १०० च्या नोटेवर जो फोटो आहे तो इथलाच आहे. नशिबाने एकाकडे ती नोट होती आणि आम्ही ताडून पाहिले तर हुबेहुब. तोच स्पॉट. असलं भारी वाटलं ना त्यावेळी.
पुरेसा वेळ दिल्यावर लीडरने पुन्हा सगळ्यांना हाकलायला सुरुवात केली. अभी झोंगरी आया नही है करत. अनिच्छेनेच तिथून निघालो आणि पुन्हा ती वाट तुडवायला सुरु केली. आता नशिबाने चढ फारसे नव्हते. सरळ रस्ता होता आणि मधे मधे थोडेसे चढ मग परत उतार. पण आता पाय बोलू लागले होते आणि नको वाटत होतं ते सरळ रस्त्यावरून चालणेही. देवराली टॉपच्या चढणीने सगळ्यांचांच दम उखडला होता आणि कधी एकदा कॅंपवर जाऊन गरमागरम चहा ढोसतोय असे वाटत होते.
पण वाटेतली दृश्ये थांबून फोटो काढायला भाग पाडत होती. ते म्हणजे किती घेशील दोन्ही कराने असा प्रकार होता. जिकडे नजर जावी तिथे सिनीक लोकेशन. वाटेत तर एक चक्क बांधीव वाट आली. म्हणलं इतक्या सुंदर ठिकाणी वाटही तितकीच सुंदर असावी हा योगायोग का कुणी सौंदर्यदृष्टी असणाऱ्याने बांधली असावी.
थोडे पुढे जाताच एक गोठलेला झरा दिसला आणि बर्फाचे क्रिस्टल. इतक्या दुपारी कडकडीत उन्हात देखील बर्फ बघून जाणवलं की भौ रात्री तर सॉलीड वाट लागणारे. लीडरच्या मते झोंगरीचे तापमान मायनसमध्येच असते बरेचदा. ते बर्फ बघून चहाची अजूनच तल्लफ आली आणि फोटोचे मोह टाळून भराभर पावले उचलायला लागलो.
झोंगरी काय येता येईना पण. आणि त्यात एका पोर्टरने सॉलीड प्रॅँक केला. मी आपलं दीनवाणा होऊन विचारले की झोंगरी कितना दूर है, तर म्हणे वो क्या रहा सामने, आणि एका डोंगराकडे बोट दाखवले. तिकडे दूरवर उंचावर एक झोपडीवजा काहीतरी दिसत होतं. मला वाटलं की आपण आता आलोच असू, आता अजून इतकं चढायचं आहे म्हणल्यावर पाय गळाले. तिथेच बसून पाणी प्यायलो, शेवटचाच घोट उरला होता. दहा मिनीटे कसातरी फरफट करत चालत राहीलो तर समोर दगडावर लीडर सुस्वागतम करता झाला. मी अत्यंत मेणचट सुरात, अभी है ना और. तर म्हणे नही आ गया. मी त्या झोपडीकडे बोट दाखवून म्हणालो वो ना. तर म्हणे, नही वो तो किसी लोकल बंदोका घर है, हमारा कँप ये हे, म्हणत दगडाच्या मागे दाखवलं तर तिकडे झकास लाकडी केबीन आणि त्याच्या मागेच आमचे निळे तंबू.
हायला, मला इतकं हसू आलं आणि त्या पोर्टरचा राग यायच्या ऐवजी मजाच वाटली. सॉलीड फिरकी घेतली भाऊने.
गेलो तो अमेयने तंबू पकडला होताच, सॅक तिथेच टाकली आणि तसाच चहा प्यायला पळालो. ते गरमागरम पेय घोटाघोटाने घशाखाली जाताना जाणवलं की सुख सुख म्हणतात ते हेच.
रात्री जेवणाच्या वेळी लीडरने घोषणा केली की उद्या आपला विश्रांतीचा दिवस आहे पण पहाटे उठून आपण झोंगरी टॉपला जाणार आहोत. पण जे फिट असतील त्यांनाच परवानगी मिळेल. मग फिटनेस टेस्ट म्हणजे काय तर सगळ्यांची ऑक्सिजन लेवल तपासली. कित्येकजण त्यातच नापास झाले. मी अगदी काठावर होतो पण मला किंचित डोके दुखल्यासारखे वाटत होते. पण मला वाटत होतं की ते अल्टीट्युड नाही तर थंडीमुळे कारण देवराली टॉपच्या इथून निघताना मी टोपी काढून ठेवली होती आणि नंतर दमणूकीमुळे ती घालायची विसरलो. गार वारे कानात जाऊन माझी ट्रेकच्या आधीची सर्दी पुन्हा डोके वर काढू लागली होती आणि त्यानेच डोके दुखत असावे. पण लीडर काही ऐकून घेईना, म्हणे आप नही जायेंगे, रेस्ट करेंगे. अमेय फिट अँड फाईन होता पण मला बाद केल्यावर त्याने स्वखुशीनेच न जाण्याचा निर्णय घेतला. म्हणलं अरे तू जा की. नकोच म्हणला.
दरम्यान, बऱ्याच लोकांना श्वास घेताना त्रास होत होता, काही जण थंडीने बेजार झाले होते, दोघांच्या पावलांना सूज आलेली तर रचीत कुठेतरी धडपडला होता आणि त्याच्या पायाला चांगलेच लागले होते. तरी पठ्ठ्या निवांत होता. पण एकेक जण बाद करत शेवटी मोजकेच लोकं झोंगरी टॉपला जातील असे ठरले आणि त्यांना मग मस्त फोटो काढा वगैरे सांगून आम्ही आमच्या शयनकक्षात झोपायला गेलो.
मस्त. सगळे फोटोज उत्तम आहेत.
मस्त. सगळे फोटोज उत्तम आहेत. हा भाग सुद्धा छान झालेला आहे.
पण खूपच खंड पडला मध्ये.
पोटात गोळाच आला आणि तो कमी
पोटात गोळाच आला आणि तो कमी करायला एकच मार्ग होता, शेअर करणे >>>
अगदी असंच होतं. आणि मागचे पुढे गेल्यावर तर सेमच.
"साला पीछले एक घंटेसे सब लोग बस आया दस मिनिटं बोल के चुत्या बना रहे, सच्ची मैं बताव कितना बाकी है?" >>> अरेच्चा ! मीच लिहीलंय काय असं वाटावं इतकं सेम !
औली ला मी राहत होतो तिथे समोर नंदादेवी शिखर होतं. आम्ही दहा हजार फूटांवर होतो. तेवीस किलो वजन, तीन तीन किलोचे शूज एव्हढं सगळं घेऊन हातात अॅक्स वगैरे घेऊन दहा हजार ते चौदा हजार फूट चढायला लावलं. तेव्हां हेच फिलींग आलेलं. पण का चढतोय हेच ठाऊक नसल्याने शेवटी आम्ही तिघे जे बसलो ते उठलोच नाही. नंतर समजले फक्त पंधरा पावलांवर केबल कारचं जगातलं सर्वात उंचावरचं स्टेशन होतं. सगळे त्यातून आले. आम्ही झक्कत पायदळ करत खाली आलो.
मस्त! १०० च्या नोटेचा संदर्भ
मस्त! १०० च्या नोटेचा संदर्भ भारीच आहे की !
रोज रोज काय तेच म्हणे. >>>>>>>> चिडचिड होते असली किटकिट करणारी लोकं सोबत असली की!
म्हणजे जरी पैसे भरले असले तरी इतक्या उंचीवर गरमागरम आयते खायला मिळते आहे हेच मला आणि अमेयला भारी वाटत होते. त्याला नावं ठेवणे वगैरे म्हणजे आमच्या आकलनापलीकडचे होते. >>>>>>>>>+++१११११११११
वा वा, मस्त. मी विचारच करत
वा वा, मस्त. मी विचारच करत होतो कि पुढच्या भागांचं काय झालं!
मस्त! १०० च्या नोटेचा फोटो
मस्त! १०० च्या नोटेचा फोटो भारीच!
मस्त! १०० च्या नोटेचा फोटो
मस्त! १०० च्या नोटेचा फोटो भारीच! >> +१०
खूप खूप जबरदस्त ट्रेक, वर्णन,
खूप खूप जबरदस्त ट्रेक, वर्णन, अनुभव व फोटोज!!!
मस्त ट्रेक ( खरे तर चांगलाच
मस्त ट्रेक ( खरे तर चांगलाच दमवणारा ) आणी फोटो. विशेष म्हणजे अगदी रखरखत्या उन्हात नुसते वाचुनच गार वाटले. आता कळते गारव्याची किंमत्. अजून येऊ देत.
धन्यवाद सर्वांना
धन्यवाद सर्वांना
शांत माणूस - भौ तुमचे एकसे एक अनुभव आहेत जबराट
लिहा की त्यावर
चिडचिड होते असली किटकिट करणारी लोकं सोबत असली की>>> फारच, त्यांना सगळ्याच गोष्टीबद्दल प्रॉब्लेम होते
खूप सुंदर वर्णन .. सगळे लेख.
खूप सुंदर वर्णन .. सगळे लेख. वाचून काढले.. पु.भा. शु.
जबरी.
जबरी.
नोटेवरचा फोटो भारीच.
मस्त झालाय हा पण भाग..
मस्त झालाय हा पण भाग..
शेअर करणे >> हा हा हा ... कन्या रास का ?
मस्त झालाय हाही भाग. आता
मस्त झालाय हाही भाग. आता पुढचा लवकर येऊदेत.
कन्या रास का ?>>>>
कन्या रास का ?>>>>
हो अहो खरंच आहे मी कन्या राशीचा
आशुचँप,सगळे भाग वाचत आहे.
आशुचँप,सगळे भाग वाचत आहे. तुमच्या सविस्तर लिहीण्याच्या शैलीमुळे आम्हा वाचकांना तुमच्यासोबत आम्हीपण हा ट्रेक करत आहोत असेच वाटत राहते. मस्तच!
मस्त लेख.
मस्त लेख.
फोटो सुंदर.
पुढचा भाग येऊ द्या लवकर.
हा ही भाग मस्त .
हा ही भाग मस्त .
सुरेख भाग! फोटोंनी चार चांद
सुरेख भाग! फोटोंनी चार चांद लागले आहेत लेखाला. शंभराच्या नोटेवरचा फोटो भारीच!
मस्त भाग. १०० च्या नोटेचा
मस्त भाग. १०० च्या नोटेचा फोटो भारी.
हाही भाग फार मस्त ! फोटोही
हाही भाग फार मस्त ! फोटोही सुरेख आहेत.
धन्यवाद सर्वांना
धन्यवाद सर्वांना
खूपच सुंदर लेख. इथे येऊन वेळ
खूपच सुंदर लेख. इथे येऊन वेळ सत्कारणी लागला.
तुमचे लिखाण ओघवते आहे. शंभर रूपयाच्या नोटेचा फोटो खासच आहे.
बाकीचे फोटोज सुद्धा अप्रतिम आहेत. मजा आली वाचताना.
मागचे भाग नंतर वाचेन... मार्क केले आहेत.
झोंगरीचे वर्णन भारीच. १००
झोंगरीचे वर्णन भारीच. १०० नंबरी नोटेवरील दृश्य विलोभनीय. नवीन माहितीबद्दल धन्यवाद.
मस्त लेख. वाचतोय
मस्त लेख. वाचतोय
खूप छान चालली आहे लेखमाला.
खूप छान चालली आहे लेखमाला.
धन्यवाद सर्वांना, पुढचा भाग
धन्यवाद सर्वांना, पुढचा भाग टाकतो लवकरच
पुढचा भाग लिहा की मालक..
पुढचा भाग लिहा की मालक..
फार दिवसांनी मायबोलीवर येऊन सलग लेख वाचून काढले. मस्त सुरू आहे लेखमाला, पण फार जास्त खंड न पडता पुढचे भाग येऊ देत...
तू आठवड्याला एक असा रतीब घाल बरं..
छान सुरू आहे, सगळेच फोटो
छान सुरू आहे, सगळेच फोटो अप्रतिम, 100 च्या नोटेचा विशेष
हा ही भाग मस्त. फोटो बघून हा
हा ही भाग मस्त. फोटो बघून हा ट्रेक लगेच करावाच वाटू लागले आहे.
आम्ही ट्रेक मेटस् च्या बाबतीत खूप लकी होतो. एकही जण कुरकुर करणारा नव्हता. खूप मस्त ग्रूप मिळाला आम्हाला.
आणि अभी कितना दूर हा प्रश्न आणि त्याचं एकच उत्तर, वो क्या उधर ही है , हे वेळ घालवायला बरं असतं