शेजाऱ्याचा डामाडुमा - मास, अहारू, गारुनु - मालदीव भाग ३

Submitted by अनिंद्य on 7 March, 2022 - 02:36

लेखमालेचे आधी प्रकाशित केलेले भाग येथे वाचता येतील:
शेजाऱ्याचा डामाडुमा - संवाद चित्रे - मालदीव भाग १
https://www.maayboli.com/node/81160
शेजाऱ्याचा डामाडुमा - हायो धुआ सलाम - मालदीव भाग २

https://www.maayboli.com/node/81193

F164DA27-880B-49A3-A1F4-94144A58A591.jpeg

जगाच्या वेगवेगळ्या भागात, वेगवेगळ्या कालखंडात मानवी संस्कृती नांदतात-बहरतात आणि मग कालौघात ह्या ना त्या कारणाने नाश पावतात. ह्या सर्व संस्कृती मागे काही ना काही ठेवा सोडून जातात. पुढील पिढ्यांसाठी असा विस्मृत ठेवा वेचण्याची ठिकाणे म्हणजे सामान्यतः देवळे - धार्मिक उपासनेच्या जागा, राज्यकर्त्यांचे किल्ले - महाल, थोरामोठ्यांची समाधीस्थळे वगैरे.

पण काही समाज आणि संस्कृती थोड्या वेगळ्या असतात - आपल्या शेजारच्या मालदीव बेटांवर नांदणारी प्राचीन संस्कृतीही अशीच - वेगळी आणि त्या सम तीच. (तिला थोडीफार साथ भारताच्या लक्षद्वीप बेटांवरच्या संस्कृतीची) ह्या समाजाचे जीवनच वेगळे. अथांग समुद्रात ठिपक्याएवढी काही बेटे आणि त्यापैकी काही मोजक्या बेटांवर मानवी वस्ती. माणसे साधी. गरजा कमी. राज्यकर्ते म्हणावे तर तीही अगदी साधी माणसे - कोणत्याही बाह्य भपक्याशिवाय साधे सोपे जीवन व्यतीत करणारी. त्यांच्या भौगोलिक परिस्थितीमुळे, साधनांच्या दुर्लभतेमुळे आणि बिनभरवश्याच्या हवामानामुळे असेल कदाचित पण मोठे महाल-किल्ले नाहीत की भव्य समाधी स्थळे नाहीत.

CD737886-8A45-45B6-A86C-C59ABBA0337B.jpeg

खोल समुद्रात पिटुकल्या बेटांवर बिन-भरवशाचे, कमी गरजांचे आणि म्हणून स्वच्छंदी जीवन जगणाऱ्या लोकांसाठी कर्मकांडांचे महत्व नगण्य. त्यामुळे धर्माचे आखीव रेखीव नियम-कानू फारसे अपील न होणारे. त्यामुळेच की काय मोठी भव्य धर्मस्थळे पण नाहीत.

E4F566CA-9969-4519-A04E-8DE85A4D142C.jpeg

माले शहराच्या मधोमध असलेली प्राचीन हुकुरू मिस्की (जामी मस्जिद)

पूर्वापार सर्वात मोठा प्रश्न म्हणजे पिण्याच्या पाण्याचा. 'सारा समुंदर मेरे पास है - एक बूंद पानी मेरी प्यास है' अशी अवस्था. प्यायचे पाणी फक्त आकाशातून पडणारे, ते साठवायचे आणि वर्षभर वापरायचे. म्हणायला सोपे पण प्रवाळ बेटांवर ही साठवणूक कठीण. थोड्याफार गोड्या पाण्याच्या विहिरी, पण त्यातील पाणी संपायला किंवा खारट व्हायला फार काळ जावा लागत नाही. त्यामुळे लोकांनी मुक्काम सारखा ह्या बेटावरून त्या बेटावर हलवणेही नवे नाही. त्यामुळे आहे त्या साधनांत काही धर्मस्थळे-इमारती बांधल्या तरी पुढे त्यांचा वापर आणि जतन होईलच याची खात्री नाही.

* * *

मालदीवचे प्राचीन नाव 'माला-द्वीप'. मालदीवचे भारतीय मुख्य भूमीशी आणि श्रीलंकेशी संबंध शेकडो वर्षांपासून आहेत. मालदीवच्या दोन्ही शेजाऱ्यांच्या, म्हणजे पूर्व किंवा दक्षिण भारत आणि श्रीलंकेच्या दर्यावर्दी व्यापाऱ्यांना पश्चिमेच्या समुद्रमार्गानी कोठल्याही दुसऱ्या देशाकडे जहाजे हाकायची तर मालदीवची बेटे हाच मार्गातला पहिला थांबा. त्यामुळे ह्या भूमीचे महत्व अनन्यसाधारण होते (आजही आहे,पण त्याबद्दल नंतर). नेहमीचा व्यापारी मार्ग असल्यामुळे भेटीगाठी, व्यापारी देवाण देवाण, सांस्कृतिक संबंध वर्षानुवर्षे आहेत.

पार चौथ्या शतकापासून भारताच्या ओरिसा प्रातांतील व्यापारी ह्या मार्गावर व्यापारासाठी ये-जा करत असावेत. कलिंग सम्राटांच्या प्रदीर्घ राजवटीत भारतातून पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात व्यापारी दले आधी श्रीलंका आणि मग मालदीवला पोचलीत. समुद्रमार्गे पूर्वेकडे येणारे आफ्रिकन आणि अरब व्यापारी मालदीवला एक थांबा घेत असल्यामुळे देशोदेशीच्या व्यापाऱ्यांमध्ये परस्पर व्यापार आणि करार करण्यासाठी ही भूमी प्रसिद्ध झाली.
* * *
मालदीवच्या इतिहासात डोकावायचे म्हणावे तर मुख्य मुद्दा खात्रीशीर पुराव्यांच्या दुर्मिळतेचा आहे. मुळात प्राचीन इतिहासाच्या खाणाखुणा कमी आहेत. स्थानिक भाषेतील हस्तलिखिते किंवा उत्खननात सापडलेले पुरावे दुर्मिळ आहेत आणि जे आहेत ते बऱ्याच अलीकडच्या काळातील आहेत. त्यामुळे लोकश्रुती, विदेशी प्रवाश्यांची प्रवासवर्णने, त्यांनी बनवलेले नकाशे आणि स्वतःच्या मायदेशी लिहिलेली पत्रे एव्हढाच ऐवज हाताशी उरतो. त्यावरून थोडेफार निष्कर्ष काढता येतात. अन्य सबळ पुराव्याअभावी हे निष्कर्ष विवादाला कारणही होतात Happy

A19AAABB-77D3-442A-B904-CD8177AF8D09.jpeg

मालदीवच्या उत्तरेला वर असलेल्या लक्षद्वीप बेटांचे रहिवासी मूळचे केरळ प्रांतातले दर्यावर्दी आहेत हे बऱ्यापैकी मान्य मत आहे. त्यामुळे भारतातील मल्याळी आणि तमिळ दर्यावर्दी आणि कोळी लोक हे बहुदा मालदीवचे आद्य रहिवासी असावेत. स्थानिक प्राचीन जमातींमध्ये काही प्रमाणात आढळून येणारी मातृसत्ताक कुटुंबे त्यांच्या मल्याळी पूर्वजांची साक्ष पटवतात. अरबस्तानातील आणि श्रीलंकेच्या व्यापाऱ्यांपैकी काही मंडळी वस्ती करती झाली असावीत असे आडाखे बांधता येतात.

पाचव्या शतकात पाली भाषेत लिहिलेल्या 'महावंश' ग्रंथात मालदीवच्या राज्यकर्त्यांबद्दल पहिला लेखी उल्लेख सापडतो. पूर्व भारतातून मगध राज्याचा परागंदा राजा / राजपुत्र 'विजय' आधी श्रीलंका आणि पुढे मालदीवला आपले नवे राज्य स्थापन करता झाला असे उल्लेख आहेत. पण लिहिणाऱ्यांनी हे 'असे मी ऐकून आहे' अशा प्रस्तावनेसह लिहिले आहे, त्यामुळे नेमका कालखंड ठरवता येणं कठीण आहे.

१२ व्या शतकात इस्लामच्या आगमनापूर्वी जवळपास १३०० वर्षे बुद्ध धर्माचा प्रभाव मालदीवच्या संस्कृतीवर होता, हे मात्र बहुमान्य मत.
बुद्धकाळाच्या आधी स्थानिक लोक सूर्यपूजक होते, स्वतःला 'आदित्यकुलीन' म्हणवून घेत. मालदीवच्या राजाला 'राधून' (राजनचा अपभ्रंश वाटतोय ना?) आणि त्याच्या पत्नीला 'रानींन' (राणी?) किंवा रातीन संबोधतात. 'आदीत्ता' वंशीय सूर्योपासक राधून मालदीव बेटांवर शासन करतात. काही बेटांवर 'रानीन' म्हणजे स्त्री शासक आहेत - काही राधून 'होमा' (सोम?) वंशीय आहेत असे पुसट उल्लेख विदेशी व्यापाऱ्यांच्या पत्रात मिळतात. दामहार नावाची आदित्यकुलीन राणी माले येथे ठाणे करून मालदीव बेटांवर राज्य करते, तिला आम्ही प्रवासी कर आणि नजराणा देतो असा उल्लेख अरब व्यापाऱ्यांनी स्वतःच्या राज्यकर्त्याना पाठवलेल्या पत्रात आहे. पण या पत्रांवर तारीख नाही !

मालदीवच्या इतिहासाचे जे थोडेफार संशोधन झाले आहे आणि उत्खननात जे पुरावे मिळाले आहेत त्याआधारे साधारण सम्राट अशोकाच्या काळात श्रीलंकेप्रमाणे मालदीवमध्येही बौद्ध धर्म रुजला आणि पुढे अनेक शतकांपर्यंत बुद्ध धर्माचा प्रभाव मालदीवच्या संस्कृतीवर होता हे ठरवता येते. त्याकाळचे काही राज्यकर्ते स्वतःला ‘सिंहपुत्र’ म्हणवत - बहुदा श्रीलंकेच्या सिंहली राज्यांच्या प्रभावामुळे.

3904F86E-A4F0-4BB8-B8DD-6C65B888D6EC.jpeg

नव्याने झालेल्या उत्खननात बुद्धमताचा प्रभाव दाखवणाऱ्या खाणाखुणा सापडतात. बुद्धधर्माच्या अहिंसक शिकवणीमुळे बहुतेक प्राचीन धर्मस्थळे जमिनीखाली पुरली आहेत, तोडफोड करून पूर्णतः नष्ट केलेली नाहीत. (पण आता हे बदलतंय - २०१२ मध्ये काही स्थानिक माथेफिरूंनी मालेच्या राष्ट्रीय संग्रहालयात घुसून तिथे जतन केलेला ६ ते १२ व्या शतकातील दुर्मिळ बौद्ध अवशेषांचा अमूल्य ठेवा ठेचून नष्ट केला - मूर्तिपूजा इस्लामला मंजूर नाही म्हणून !)

4820F917-4CD6-438E-8FF2-31722C562A30.jpeg

*

5CA9690A-CB99-4C89-920D-45B2F262C264.jpeg

काही उत्खननात मंडलाकार बुद्ध मंदिरांचे - स्तूपांचे जोते असावेत अश्या खुणा सापडतात.

04FC3CC4-F5B3-4D82-B3BF-99AD0D7B1E00.jpeg

एक मात्र आहे, मूर्तिपूजा पूर्णपणे निषिद्ध असलेल्या इस्लाम धर्माचा पूर्ण स्वीकार केल्यानंतर अनेक शतकं उलटली तरी आजही मालदीवचे लोक कुठल्याही मूर्तीला किंवा शिल्पाला 'बुधू' म्हणजे 'बुद्ध'च म्हणतात.

AC260225-F471-4764-AE56-2196199179F5.jpeg

* * *
मालदीवची प्रमुख भाषा 'धिवेही'. भाषा-अभ्यासकांच्या मते ही इंडो-आर्यन गटातील एक प्राचीन भाषा. लिपी वेगळी असली तरी व्याकरण, शब्द, शब्दांचे उच्चार, वाक्यरचनेची पद्धत सगळेच श्रीलंकेच्या सिंहली भाषेला जवळीक साधणारे. त्यामुळे माझ्या श्रीलंकन मित्रांना धिवेही बोलायला जमले नाही तरी ऐकलेले बरेचसे समजते पण वाचता येत नाही कारण वेगळी लिपी ! परत धिवही भाषा अरेबिक प्रमाणे उजवीकडून डावीकडे लिहिली जाते. त्यामुळेही थोडा संभ्रम.

406EC0E6-B6C6-4BEE-9AE6-A6FF1DF1FE44.jpeg

धिवेही भाषेची झलक.

00152FA6-2A13-4DDE-B554-94D985D8B23C.jpeg

इराणच्या बसरा खाडीत मिळणारे नैसर्गिक मोती म्हणजे जगभरातल्या राजे-महाराजे आणि श्रीमंतांच्या जिव्हाळ्याचा विषय. भारत, चीन, बर्मा आणि थायलंड ह्या मोत्यांची फार मोठी बाजारपेठ. अरब व्यापारी अगदी दहाव्या शतकाच्या पूर्वीपासून इराणच्या खाडीतून हे मोती घेऊन मोठ्या प्रमाणावर श्रीलंका, भारत आणि पलीकडे आग्नेय आशियात जात. त्यांचा पहिला थांबा हूवधू, माले किंवा गान बेटावर असे. त्यामुळे की काय इस्लामिक सत्ता स्थापन होण्याच्या बरेच आधी मालदीवमध्ये व्यापाराची अधिकृत भाषा अरेबिक होती. पर्शियन किंवा उर्दू सारख्या भारतीय उपखंडात स्थिरावलेल्या भाषांचा फारसा वावर ह्या भागात दिसून येत नाही. धिवेही भाषा अरेबिक लिपीत लिहिली जाण्याचे हे ही एक कारण असू शकेल.

FE1D2722-5561-4401-A9CB-0489E95AB9EB.jpeg

'लोमाफानू' - धिवेही भाषेत लिहिलेले ताम्रपट्टिकांचे पुस्तक. - १२ वे शतक.

थोडे अवांतर:

त्यांच्या मताला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही...
कवडीमोल भावाने विकावा लागला सगळा ऐवज ...
फुटकी कवडी नाही खिश्यात...
कौडी-कौडी जमा कर के ये मकान खरिदा पिताजी ने...

4D3033FD-BD4E-45E0-B1DB-D241A7444965.jpeg

आपल्या बोलण्या-लिहिण्यात येणारे हे 'कवडी' प्रकरण रोचक आहे. चलन म्हणून प्राचीन भारत, ब्रम्हदेश आणि श्रीलंकेत कवड्या वापरल्या जात. कवड्या चलन म्हणून वापरण्याचा फार मोठा कालखंड भारत आणि शेजारी देशांनी अनुभवला आहे.
साधारण हिशेब : -
३ फुटक्या कवड्या = १ कवडी
१० कवड्या = १ दमडी
२ दमडी = १ धेला
१.५ पाई / पै = १ धेला
३ पाई / पै = १ पैसा
४ पैसे = १ आणा
१६ आणे = १ रुपया
स्थानिक चलनांची नावे वेगळी असली तरी थोड्याफार फरकाने आजूबाजूच्या देशांमध्ये प्रमाण असेच होते. आपल्याकडे जुन्या लोकांकडून 'पै-न-पै' ची वसुली, 'आणेवारी', 'दीड-दमडी' ची ऐपत, 'पाई-पाई' चुका दूंगा असे डायलॉग सुद्धा ऐकले असतील तुमच्यापैकी काहींनी. मालदीव हा हा देश भारतीयांना माहित असण्याचे आणि तेथे आपल्या दर्यावर्दी व्यापाऱ्यांची विशेष ये-जा असण्याचे एक खास कारण होते - ते म्हणजे तेथे असलेला कवड्यांच्या प्रचंड साठा ! चलन म्हणून आपल्याकडे ज्या कवड्या वापरल्या जात, त्या कवड्या मालदीवमध्ये अगदी 'कवडीमोलाने' मिळत. होडीभर धान्याच्या बदल्यात होडीभर कवड्या असा साधा सोपा हिशेब. त्यामुळे ही पाचूची बेटे भारतीय व्यापाऱ्यांसाठी अगदी सोन्याची खाण होती.

क्रमश:

(मालिकेतील काही चित्रे / नकाशे जालावरून साभार)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कवडीमोलाने कवड्या Happy हे इंटरेस्टिंग आहे! मस्त माहिती. बेटाचे ते पहिले २ फोटो तर फार सुंदर आहेत!

खूप सुंदर लेख आणि फोटो. नेपाळ चा डामडुमा ही खूप आवडला होता. मालदीव ही आवडला. तुमच्या मुळे शेजारील देशांची माहिती समजत आहे.

@ SharmilaR
@ कुमार१
@ आबा.
@ maitreyee
@ रागीमुद्दे
@ मार्गी

आपणा सर्वांचे आभार !

सुरेख लेख !! जुन्या लोकांच्या काय नव्या लोकांच्या तोंडी पण ही नाणी येतात-
रात के ढाई बजे म्हणून एक गाणे आहे त्यात "दिल का बाजार लगा, धेला टका पाई बजे" आहे. माईय्या माईय्या म्हणून एक दुसरे गाणे आहे त्यात "सौदा रात का, कौडी चांद की" आहे. नि "आने चार आने बचे है चार आने, वेस्ट न करना यार" पण आहे... (अर्थात नव्या मंडळींना या शब्दांचा अर्थ माहिती असेल हे माहिती नाही Happy )

... "सौदा रात का, कौडी चांद की....

क्या शानदार बात कही है !

अवांतर - 'सौदा' हा शब्द हिंदीत साधारण रोकड देवाण-घेवाण याअर्थी वापरतात. पंजाबी (भारतीय व पाकिस्तानी, दोन्ही) त्याचा थोडा वेगळा वापर करतात. उदा. पटियाला / अमृतसर / दिल्ली ६ भागात हलवायांच्या दुकानातल्या पाट्या - यहाँ हर सौदा शुद्ध घी में बनता है Happy

प्रतिसादाबद्दल आभार.