शेजाऱ्याचा डामाडुमा - हायो धुआ सलाम - मालदीव भाग २

Submitted by अनिंद्य on 28 February, 2022 - 06:40

लेखमालेचे आधी प्रकाशित केलेले भाग येथे वाचता येतील:
शेजाऱ्याचा डामाडुमा - संवाद चित्रे - मालदीव भाग १
https://www.maayboli.com/node/81160

भारताच्या दक्षिण-पश्चिम दिशेला श्रीलंकेजवळ ११९० मोजलेल्या आणि बाकी काही उथळ आणि आकाराने फारच लहान असल्यामुळे मोजता न येऊ शकणाऱ्या अश्या काही प्रवाळ (कोरल) बेटांचा समूह म्हणजे मालदीव हा आपला शेजारी देश. अलौकिक निसर्गसौंदर्याचे दान भरभरून मिळालेला. तुमच्यापैकी ज्यांनी मालदीवला भेट दिली असेल त्यांना पृथ्वीतलावर हिरवा आणि निळा असे दोनच रंग आहेत असा भास होईल हे नक्की.

7190258D-BBF4-4FA9-8FFA-640A208DBF5A.jpeg

आकारमान आणि लोकसंख्या बघता मालदीव हा सार्क समूहातील सर्वात छोटा देश. उत्तर दक्षिण सीमा सरळ रेषेत मोजली तर देशाची लांबी एका टोकापासून शेवटल्या बेटापर्यंत जवळपास ८२० किलोमीटर आणि पूर्व पश्चिम रुंदी सुमारे १३० किलोमीटर ! म्हणायला देशाच्या ताब्यात असलेले क्षेत्र साधारण ९०,००० वर्ग किलोमीटर (तुलनेसाठी म्हणून - साधारण १० कोंकण किंवा २ केरळ मावतील इतके) पण त्यात जमीन अगदीच नावाला. देशभर विखुरलेली पूर्ण जमीन मोजली तर ३०० स्वेअर किलोमीटर पेक्षा कमीच भरेल - म्हणजे मुंबई शहराच्या निम्मी पण नाही. समुद्रच सगळीकडे. त्यात दक्षिणेकडची 'गान' सारखी काही मोठी बेटे तर पार विषुववृत्ताच्या खाली आहेत. ‘मोठे’ बेट ही संकल्पना सुद्धा मालदीवमध्ये वेगळी आहे. म्हणजे मोठ्यात मोठे ‘भव्य’ बेट लांबीला ८ किलोमीटर एवढेच. देशाची लोकसंख्या ४ लाखांच्या आत-बाहेर.

आपल्या भूगोलाच्या पुस्तकांमध्ये अनेक भारतीय शहरांबद्दल अमके शहर समुद्रसपाटीपासून २००-४०० मीटर उंचीवर असे आपण वाचलेले असते. हे ‘काही शे मीटर’ प्रकरण आपल्याला एवढे अंगवळणी पडले असते की अख्खा मालदीव हा देश समुद्रसपाटीपासून फारफार तर १ मीटरच वर असल्याचे पचनी पडणे सोपे नाही. काही बेटे तर चक्क 'समुद्रसपाटीपासून खाली' ह्या वर्णनाला साजेशी आहेत.

ECCF1C8B-01C1-465B-A73C-336454B47483.jpeg

मालदीवच्या भूमीवर सगळीकडे एक शब्द सारखा कानावर पडतो - ‘अटॉल.’ सगळा देशच दूर दूर विखुरलेल्या उथळ प्रवाळ बेटांपासून बनलेला. काही बेटांना तर नावही नाही. ते शक्यही नाही म्हणा, शेकड्यांनी असलेल्या ह्या बेटांची नावं लक्षात तरी कशी ठेवणार? त्यामुळे व्यवस्थापनाच्या सोयीसाठी मालदीवच्या भूभागाला काही 'अटॉल' मध्ये विभागलेले आहे. अटॉल म्हणजे प्रवाळ पट्ट्याच्या / कोरल रीफच्या लहान मोठ्या बेटांच्या साखळ्या किंवा समुच्चय.

थिलाधूमथी (हा अलीफू), हा धालू, वावू , नूनू , रा, बा, लाव्हीयानी, काफ़ू (माले), अलिफ-अलिफ, अरी/अलिफ धाल, मीमू, फाफू, धालू, था, लामू, हूवधू, द्यावीयानी, शावीयानी, सिनू अशा ऐकायला खूप गोड आणि संगीतमय वाटणाऱ्या नावानी हे अटॉल ओळखल्या जातात. असे एकूण २६ अटॉल आहेत.
प्रत्येक अटॉल मध्ये अनेक बेटे आहेत, पण बहुतेक बेटे निर्जन. मानवी वस्ती असलेली बेटे फार कमी आहेत. बेटांची नावे तर त्याहून मजेदार.
हीथा धू
कुमुन धू
हनिमा धू
ईश धू
फे धू
काढ धू
काढेध धू
कूड धू
धरावान धू
(स्वगत - स्वच्छतेचा काय तो सोस. हे धू आणि ते धू.... कितीदा आणि काय धुवायचे ते तरी कोणी सांगणार का ?)

D8477C34-3EFA-4E49-BB07-6AD2E59A3194.jpeg

खुद्द राजधानीचे शहर असलेले माले म्हणजे 5.8 स्क्वे कि मी चे छोटेखानी बेट. अगदी पायी फिरायचे ठरवले तरी अर्ध्या तासात पूर्ण शहर पालथे घालता येते. मालदीव मध्ये फक्त माले बेटावरच बहुमजली इमारती बांधायला परवानगी आहे आणि देशाची साधारण अर्धी लोकसंख्या माले शहरात दाटीवाटीने राहते. मालेच्या अगदी जवळ दुसऱ्या हुलहुले बेटावर देशातला मोठा आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. त्याजवळच हुलहूमाले नावाचे एक छोटे रहिवासी बेट, आणखी एका बेटावर पेट्रोल / डिझेल साठवणुकीची सोय आणि अजून एका जवळच्याच बेटावर कचरा विल्हेवाटीची व्यवस्था असे राजधानी माले शहराचे साधारण स्वरूप.

43A12390-8238-4F6D-9EAA-9CE71B622EFD.jpeg

देशात लहानमोठे मिळून 6 विमानतळ (खरेतर छोटी विमाने उतरू शकतील अश्या धावपट्ट्याच) आहेत पण मालदीवमध्ये खरी मजा ‘सी प्लेन’ ची. ही छोटी विमाने पाण्यावर उतरू शकतात म्हणून यांना हवाईपट्टी किंवा हवाई तळाची फारशी गरज नसते. तसेही अथांग समुद्रात विमान असो की बोट, दिवस असो की रात्र, मदत जीपीएसचीच. नाहीतर मार्ग भटकणे अगदी साहजिक कारण लक्षात ठेवायला काही खाणाखुणा जवळपास नाहीतच. आकाशातून काय आणि पाण्यातून काय एक बेट दुसऱ्यापेक्षा फार वेगळे दिसत नाही.

मालदीवला पहिल्यांदाच जाणाऱ्या माझ्या सर्व मित्रमंडळाला माझा एक आग्रही सल्ला असतो - वेळेच्या काही तास आधी चेक-इन करा, तत्परतेने ऑन लाईन बुकिंग मिळवा, हवं तर विमान कंपनीच्या कर्मचार्यांशी वाद घाला, काहीही करा, पण कसेही करून विमानात खिडकीची जागा मिळवा. आणि मग माले विमानतळ जवळ आल्याची घोषणा होताच खिडकीबाहेर बघा.... निळ्याशार समुद्रात हिरवी-निळी- फिक्कट हिरवी - फिक्कट निळी- गडद निळी- अझूर - ऍक्वा - सी ब्लू - ओशन ब्लू, मरीन ब्लू.... तुम्हाला माहित असलेल्या प्रत्येक भाषेतील निळ्या रंगाची वर्णन एकत्र केली तरी कमी पडतील अश्या असंख्य रंगछटा असलेले पाणी आणि त्यात ती पांढऱ्याशुभ्र वाळूची ठिपक्याएवढी बेटं. ही प्रवाळ बेटं आकाशातून बघितली की डोळे निवतील आणि पृथ्वीग्रहावर मानव जन्म घेतल्याचा आनंद मनात उचंबळून येईल.

D6D8F622-35AD-43CC-9EAA-6FE8D0E11952.jpeg

मालेच्या वेलाना आंतराष्ट्रीय विमानतळाच्या पिटुकल्या धावपट्टीचे दर्शन होईल आणि जमिनीवर उतरतांना विमान थोडेही घरंगळले तर पार समुद्रातच जाईल अशी भीती दाटून येईल.

0D792053-8463-46EE-A6A7-851EB24AFCA4.jpeg

बाहेर पडल्यावर सगळीकडे टॅक्सी स्टॅन्ड ऐवजी तुम्हाला तुमच्या पुढील गंतव्य स्थानी पोचवायला आलेल्या बोटी आणि सी प्लेन दिसतील. आणि मालदीवचे वेगळेपण तुमच्या लागलीच लक्षात येईल.

880A5E57-FEA4-465A-B745-60ECACE6BD84.jpeg

प्रत्येक देशाचा एक 'क्लेम टू फेम' असतो. मालदीवची मिजास आहे तेथील राजेशाही पर्यटन व्यवसायामुळे. जगभरातील गर्भश्रीमंत लोकांमध्ये मधुचंद्रासाठी सर्वोत्तम देश म्हणून मालदीवचे नाव प्रसिद्ध आहे. समुद्रावरील निवांत सुंदर बेटे तर आहेतच पण ‘समुद्राखालील’ असामान्य सुंदर जागांमुळे हौशी समुद्रखेळांसाठीही दरवर्षी शेकडो पर्यटक मालदीवला भेट देतात. श्रीमंत हॉलीवूडकर, ब्रिटिश आणि अन्य युरोपियन पर्यटक तर वर्षानुवर्षे हिवाळी सुट्टी साजरी करायला येत आहेत. एकूणच पर्यटन हे मालदीवच्या राष्ट्रीय उत्पन्नाचे सर्वात मोठे साधन आहे आणि त्या देशाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर पर्यटकांच्या धनावर अवलंबून आहे.

DA440B01-F242-4682-AFF1-55C861EDC4E3.jpeg

मालदीव 'एक बेट - एक रिसॉर्ट' ही संकल्पना प्रत्यक्षात आणणारा बहुदा पहिलाच देश. संपूर्ण देशालाच निसर्गसौंदर्याचे भरभरून दान मिळाले आहे. त्यातील सर्वोत्तम बेटे रिसॉर्ट साठी निवडण्यात आली आहेत. संपूर्ण बेट त्या रिसॉर्टच्या खाजगी मालकीचे आणि तेथे पर्यटकांसाठी हात जोडून उभ्या असलेल्या पंच-सप्ततारांकित सुविधा-सेवा. भर समुद्रात उभारलेले सी व्हिला, बेटावर पोचण्यासाठी सी प्लेन किंवा अत्याधुनिक यॉट, आंतरराष्ट्रीय चवींचे उत्तमोत्तम जेवण-खाण देणारी अनेक उपाहारगृहे, साहसी समुद्री खेळांसाठी सुसज्ज टर्मिनल्स आणि अर्थातच स्पा. सगळे प्रचंड महाग.

0E53FEE1-CD16-44D2-AC53-26AC7AEBBD96.jpeg

*

05889A89-515F-46BD-BD20-7AC115D67FB7.jpeg

आणि हो, राजधानी माले आणि अन्य मानवी वस्ती असलेल्या बेटांवर मद्यपानास पूर्णपणे बंदी असली तरी विदेशी पर्यटकांसाठी असलेल्या खाजगी रिसॉर्टमध्ये अशी बंदी नाही. मालेच्या विमानतळावर उतरल्याबरोबर तुम्हाला स्वतःकडे असलेल्या मद्याचा सर्व साठा तेथील कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन करावा लागतो, पुढे नेता येत नाही. माले ह्या राजधानीच्या बेटावर आणि अन्य वस्ती असलेल्या कुठल्याही बेटावर अर्थातच मद्यपान करता येत नाही, तो अतिगंभीर गुन्हा आहे.

D0C6F783-1F74-46F2-B70D-2BC8DB370625.jpeg

मोहम्मद शफिक नावाच्या स्थानिक वास्तुशात्रज्ञाने काही इटालियन तज्ञ मंडळींच्या साहाय्याने डिझाईन केलेले 'कुरुंबा' हे मालदीवमधले आद्य रिसॉर्ट. स्थानिक भाषेत कुरुंबा म्हणजे नारळ. ह्या बेटाचा नैसर्गिक आकार एखाद्या नारळासारखा आहे, त्यामुळे कुरुंबा हे नाव. हे सुरु झाले १९७२ मध्ये. त्याआधी अनेक युरोपिअन तज्ञ मंडळींनी प्रत्यक्ष पाहणी करून ही जागा काही पर्यटनासाठी फारशी योग्य नाही असा अहवाल दिला होता. पण तत्कालीन सरकारची मदत, काही उद्यमशील मंडळीचा उत्साह आणि तुटपुंज्या आर्थिक भांडवलावर सुरु झालेले हे रिसॉर्ट पुढे बरेच विस्तारले, पंचतारांकित झाले आणि आजही आपला राजेशाही आब राखून आहे.

C3F339E4-3759-4143-9765-676DA8E94A72.jpeg

विलक्षण सुंदर, स्वच्छ-नितळ, हिरव्या-निळ्या रंगाच्या निरनिराळ्या छटा ल्यालेल्या निरनिराळ्या कोरल बेटांवर अगदी निवांत पण जागतिक दर्जाच्या सोई-सुविधा असलेले शंभर तरी रिसॉर्ट आता मालदीवमध्ये आहेत.

जगात धनिकांची कमी नाही आणि हौसेला मोल नाही, त्यामुळे मालदीवला येण्याऱ्या पर्यटकांची संख्या दरवर्षी वाढतच आहे. जेमतेम चार लाख वस्तीच्या मालदीवला करोनापूर्व काळात वर्षाला साधारण १२ लाखांपेक्षा जास्त पर्यटकांनी भेट दिली. मालदीव आपला शेजारी देश असला आणि पर्यटनासाठी जगभर विख्यात असला तरी भारतीय पर्यटकांची संख्या फार नाही. भारतीय सिनेजगतातील दिग्गज आणि अन्य व्यवसायातील तरुण नवश्रीमंतांचा वावर गेली काही वर्षे वाढत आहे खरा पण अन्य देशांच्या मानाने मालदीवला भारतीय पर्यटक अजूनही कमीच.

प्रयत्नपूर्वक श्रीमंत आणि अति-श्रीमंतांचे पर्यटनस्थळ असे मालदीवचे ब्रॅण्डिंग असल्यामुळे सर्व काही प्रचंड महाग. माझे मत विचाराल तर मालदीवच्या ह्या पंच-सप्ततारांकित जगात काही दिवस राहून आल्यावर न्यूयॉर्क हे बऱ्यापैकी स्वस्त शहर आहे असे आपण आत्मविश्वासाने म्हणू शकतो Happy

* * *
पण हे झुळझुळीत - श्रीमंत - रंगीत - आल्हाददायी चित्र पर्यटकांच्या मालदीवचे. सगळाच देश तसा नाही, बराच वेगळा आहे. त्याला इतिहास आहे, स्वतःची वेगळी दुर्मिळ-दुर्लभ भाषा आहे. स्वतःची ठळक सांस्कृतिक ओळख आहे. ते सगळे पुढल्या भागात.

* * *

थोडे अवांतर :

मालदीवच्या भूमीवर 'अटॉल' सारखेच अजून काही शब्द पुन्हा-पुन्हा कानावर पडतात. तेच ह्या लेखाचे शीर्षक आहे.
हायो धुआ = शुभेच्छा, तथास्तु ;
सलाम = नमस्कार

क्रमश:
(मालिकेतील काही चित्रे / नकाशे जालावरून साभार)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदरच
छान चालू आहे

**धू आणि ते धू.... कितीदा आणि काय धुवायचे ते तरी कोणी सांगणार का Happy

वाचतेय.. लिहीत रहा..
~ २००४ सालापासून मालदीव laa जायचे मनात असलेली शिरीष

भारी!
लईच महाग आहे मालदीव तर !

@ कुमार१,

तेच, मला स्वच्छतेचा सोस वाटला ती नावे म्हणजे Happy

@ नानबा / शिरीष,

तुम्हाला मालदीव भेटीचा योग लवकर येवो, हायो धुआ _/\_

@ आबा.,

व्हय आबा, महागच हाये हा शेजारी. आपल्याला डिस्काउंट बी देईना Happy

स्री लंकेमध्ये मला वाटते आयुबोवान किंवा असेच काहीतरी स्वागताप्रसंगी म्हणतात. आयुष्मान भव, तुम्हांला उत्तम आयुष्य लाभो असा काहीसा अर्थ होतो त्याचा.

श्रीलंकेतील आयुबोवान ...

हो, असे आगंतुकांचे शुभ चिंतिणारी स्वागतसंबोधनं सगळीकडे आहेत. गुजरातेतील 'भले पधाऱ्या' ते अरबांचे 'अस्सलाम वालेकुम' ते बर्मातील 'मिंगलाबा'... भावना एकच.

@ हीरा,
@ देवकी,
@ SharmilaR

आभारी आहे.