टाटा स्टोरीज- माझे अनुवादित पुस्तक प्रकाशित झाले

Submitted by रेव्यु on 27 February, 2022 - 04:35

दि २५ फेब्रुवारी २२ रोजी माझे अनुवादित पुस्तक , # टाटा स्टोअरीज प्रकाशित झाले...
मूळ इंग्रजी पुस्तक श्री हरीश भट यांनी लिहिले असून ते बेस्ट सेलर आहे.
साकेत प्रकाशन व टाटा मॅनेजमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा साजरा झाला.
राष्ट्र्निर्मितीत टाटांचा १५० वर्षाहून अधिक कालावधीचा वारसा आहे. या दीर्घ कालखंडाच्या क्षितिजावर अनेक सुंदर आणि विसमयकारक कथा आहेत. या कथा आपल्याला प्रेरणा देतात, उत्तेजित करतात आणि एवढेच नव्हे तर आपल्या आयुष्यात अर्थपूर्ण कार्य करण्यात आपणास सक्रीय बनवतात.
आर्थिक संकटावर मात करण्यासाठी प्रसिध्द कोहिनूर हिर्‍याच्या दुप्पट आकाराचा गहाण ठेवलेला हिरा; ’ तशा एका अनोळखी तरुण साधू’ शी भेट जो नंतर स्वामी विवेकानंद या नावाने प्रसिध्द झाला; ऑलिंपिक्स मधील सर्वात पहिल्या भारतीय टीमची रोमहर्षक कथा; भारताच्या पहिल्या वाणिज्य एअरलाइनचे आणि पहिल्या देशी कारचे सृजन; भारतीय महामार्गांवर लाखो ट्रक्सच्या मागच्या भागावर ’ओके टाटा’चे पदार्पण; जिंकलेली आणि त्याबरोबरच हरलेली विख्यात शर्यत; आणि अशाच अनेक.
# टाटा कथा हा टाटा समूहातील व्यक्ती, घटना आणि स्थळांच्या अल्प-परिचित कथांचा संग्रह आहे ज्यांनी आज आपण वास्तव्य करत असलेल्या भारतास घडवले आहे.
तत.png
अनुवादक उजवीकडून दुसरे
अनुवादकाचे दोन शब्द:
अंदाजे सहा महिन्यांपूर्वी साकेत प्रकाशनाच्या सौ. प्रतिमा भांड यांनी # Tata Stories या हरीश भट लिखित पुस्तकाचा अनुवाद मी करू शकेन का असे मला फोनवर विचारले. पाठोपाठ मूळ इंग्रजी प्रत पाठवली. अविरत दोन दिवस मी हे पुस्तक मंत्रमुग्ध होऊन संपवले आणि एका तृप्त अनुभूतीने मला व्यापले.
या पाठोपाठ, हरीशजींशी संवाद साधण्याची संधी मला मिळाली आणि हे पुस्तक, या स्वरूपात सादर करण्याचा त्यांचा उद्देश मी समजून घेतला . त्याची मला अनुवाद करताना खूपच मदत झाली.
आपल्या देशातील इतक्या उत्तुंग आणि मूल्यांशी कोणतीही तडजोड न करणार्‍या या प्रवर्तक उद्योग समूहाबद्दल वाचून माझी मान अभिमानाने उंचावली. टाटा समूहाचे कार्य इतक्या सुंदर, उद्बोधक आणि ओघवत्या शैलीत हरीशजींनी कथा रूपात सादर केले आहे. याचा अनुवाद तेवढ्याच ओघवत्या आणि प्रेरणादायी शैलीत करणे हे आव्हान होते. मराठी वाचकांसाठी त्याच प्रकारची अनुभूती हा अनुवाद देईल अशी माझी आशा आहे.
अनुवाद करून प्रकाशित करण्याकरिता साकेत प्रकाशनाने त्यांच्या परंपरेस साजेसे हे अनुकरणीय पाऊल उचलले आहे. या प्रवासात त्यांचे व त्यांच्या सहकार्‍यांचे सहकार्य मोलाचे ठरले आहे. त्या बद्दल साकेत समूहाचे मन:पूर्वक आभार!
टाटा समूहाची मूल्ये, श्रध्दा आणि योगदान जाणून घेण्यात मराठी वाचकांना हे पुस्तक उद्बोधक ठरो अशी आशा मी व्यक्त करतो.

WhatsApp Image 2022-02-27 at 14.16.44.jpeg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिनंदन, नक्की वाचेन. टाटायन पेक्षा काही वेगळे आहे काय? माझ्याकडे टाटायन आहे. तुमचेही विकत घेऊन वाचेन उपाध्ये सर.

छान लेख. तुमचे पुस्तक कुठे विकत मिळू शकेल?

हा लेख वाचून मला डॉक्टर द.रा.पेंडसे यांनी लिहिलेले "जेआरडी - मी पाहिलेले" हे पुस्तक आठवले. तेसुद्धा छान पुस्तक आहे, अशी शिफारस करीन.

अरे वाह.. छान
टाटा समूहाबद्दल नेहमीच एक आपलेपणा वाटतो

वा!
मूळ इंग्रजी पुस्तक penguin प्रकाशन आहे ना? ते वाचायला घेतो.
टाटांवर खूप पुस्तकं आहेत त्यातली दोन वाचली आहेत. नावं आठवत नाहीत. ( R.M.Lala चं वाचलं बहुतेक)

'रेव्यु' आइडी नाव का घेतले यामागची गोष्ट आहे का?

Pages