मराठी भाषेवरील प्रेमामुळे, आपुलकीमुळे आपण सर्व कधी ना कधी 'मायबोली' ह्या संस्थळावर आलो. इथले लेख, कथा, कादंबर्या, कविता, गज़ला, उपक्रम, गप्पा, ह्या सगळ्यांमध्ये कुठे तरी आपण रमलो, आणि इथलेच झालो. मराठी भाषेची आवड इथल्या प्रत्येकातच कुठे तरी दडली आहे, आणि ती वेळोवेळी कलागुणांमधून दिसून येते. मराठी जरी आपली भाषा असली, तरी तिची रोजच्या व्यवहारातल्यापेक्षा वेगळी अशी एक गोडी आपण कुठेतरी एखाद्या गाण्याच्या दोन ओळींमध्ये 'अर्थ नवा गीतास मिळावा' अशी अनुभवलेली आहे. "पण काय असे मेघांच्या, डोळ्यांत साठले होते, आभाळ नसावे, बहुधा काळीज फाटले होते…" असा घनगर्भ अर्थ कुठल्यातरी कवितेच्या ओळींमध्ये आपल्याला भेटलेला आहे. "रत्नांग्रीच्या समस्त म्हयशी तूर्तास गाभण काय रे झंप्या??" मधला चहाच्या रंगावरचा नर्म विनोद आपल्याला कुठे तरी स्पर्शून जातो.
आपल्या अश्या प्रकारच्या आवडी-निवडी लहानपणापासून कळत-नकळत विकसित होत जातात. कुठल्याही विषयाप्रमाणे ह्याही प्रवासात आपण अनेकांकडून अनेक गोष्टी शिकत जातो. मग ते आई-वडील असतील, भावंडं असतील, शाळेतले शिक्षक असतील. शेजारीसुद्धा कोणी असेल, आत्या, काका, मावशी, मामा, .. खाजगी शिकवणीमधलं कोणी असेल, वाचनालयातले ग्रंथपालही असू शकतील. इतकंच काय, कॉलेजमधली आवडती व्यक्ती, प्रियकर, प्रेयसी, पती, पत्नी हेही असू शकतील. ह्या सगळ्यांमध्ये तुमच्यावर मराठी भाषा शिकण्याचा, जपण्याचा, तिच्यात रमण्याचा कोणी विशेष संस्कार केला असेल, तर त्याविषयी ह्या मराठी भाषा दिनी आम्हाला आणि मायबोलीच्या सर्व वाचकांना सांगा. छानसा लेख लिहा. त्यात अश्या व्यक्तीविषयी, आणि त्यांनी तुम्हाला मराठी शिकण्यात काय आणि कशी मदत केली, हे असायला हवं. मराठी भाषेबद्दलच्या तुमच्या आठवणी, आताच्या भावना, असंही त्यात असलेलं चालेल. मात्र हे नुसतं व्यक्तिचित्रण नसून मराठी भाषेच्या अनुषंगाने आलेलं चित्रण असायला हवं, ह्याचं भान मात्र राहू द्या.
आवश्यकता भासल्यास तुम्ही पुढील मुद्द्यांचा विचार आधार म्हणून कुठल्याही क्रमाने करू शकाल. मात्र हे असलंच पाहिजे, अशी अजिबात सक्ती नाही.
(१) मराठी भाषेत वाचन किंवा श्रवण ह्या बाबतीत घरचं, शाळेतलं वातावरण कसं आहे?
(२) मराठी भाषेत तुम्हाला कथा, कविता, ललितलेखन अश्या विविध प्रकारांपैकी कशाची विशेष आवड आहे का?
(३) ही आवड साधारणपणे कधी लक्षात आली? ह्या आवडीबद्दल लक्षात यायला कोणी कारणीभूत होतं का?
(४) मराठी भाषेतील तुमच्या कौशल्याचा विकास कसा झाला? त्यात तुम्हाला कोणी मदत केली?
(५) मराठी शिकण्याबद्दल एखादा गमतीशीर किंवा प्रभावी किस्सा आहे का?
(६) तुम्हाला मराठीबद्दल प्रभावित करणारी व्यक्ती कशी होती? त्यांच्यावर तो प्रभाव कुठून आला असावा?
(६) आता तुमच्या मराठी आवडीनिवडी त्याच आहेत, की बदलल्या आहेत? ह्या प्रवासाविषयी काय वाटतं?
तर मग उचला लेखणी आणि करा सुरूवात!
उपक्रम नियमावली :
१. मायबोलीवरच्या उपक्रमांमधले लेखन पूर्वप्रकाशित नसावे असा नियम सहसा असतो. पण मराठी दिनाच्या दिवशी अशा व्यक्तींची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून, या उपक्रमापुरते पूर्वप्रकाशित लेखन चालेल. मात्र हे लेखन पुनः प्रकाशित करताना मूळ प्रकाशकाकडून परवानगी मिळवून प्रताधिकारांचा भंग होणार नाही याची काळजी घ्या.
२. लेखनासाठी शब्द मर्यादा नाही.
३. प्रवेशिका २५/०२/२०२२ पासून पाठवू शकता.
४. प्रवेशिकेचे शीर्षक पुढील प्रकारे द्यावे -
"मराठी भाषा दिवस : माझे मराठीचे मास्तर / माझ्या मराठीच्या बाई - {तुमचे नाव / मायबोली आयडी}" (दोन्हींपैकी एक जे असेल ते लिहा. दोन्ही लिहिण्याची गरज नाही.)
५. लेखन पाठविण्याची शेवटची तारीख ०१/०३/२०२२.
६. प्रत्येक प्रवेशिकेला "मराठी भाषा दिवस २०२२" अशी शब्दखूण द्यावी.
७. प्रवेशिका 'मराठी भाषा दिवस २०२२' ह्या ग्रुपमध्ये काढावी. मात्र, ती ग्रुपपुरती मर्यादित न ठेवता सर्वांना दिसेल, अशी ठेवावी.
छान आहे हा उपक्रम.
छान आहे हा उपक्रम.
छान उपक्रम
छान उपक्रम
कल्पना आवडली.
कल्पना आवडली.
फक्त मराठी बाई किंवा मास्तर
फक्त मराठी बाई किंवा मास्तर बद्धल लिहायचे आहे का... का कोणत्याही विषयाच्या बाई मास्तर चालतील? मराठीचे शिक्षक फारसे लक्षात राहत नाहीत...
मलाही विचारायचे आहे की मराठी
मलाही विचारायचे आहे की मराठी चे शिक्षक तर लिहायचे आहेतच, परंतु आणखीन काही लोकांमुळे मराठीची गोडी वाढत गेली असेल तर त्यांच्याबद्दलही सांगितले तर चालेल का?
मराठीची गोडी लावणार्या
मराठीची गोडी लावणार्या कोणाबद्दलही लिहिलेलं चालेल. ते शाळेतले शिक्षक नसतील, तरी चालेल. मात्र इतर विषयांचे शिक्षक (त्यांनी मराठीची गोडी लावली नसल्यास) ह्या उपक्रमाअंतर्गत नकोत. 'माझे आवडते शिक्षक' असं ह्या उपक्रमाचं स्वरूप नसून 'मराठीबद्दल आवड निर्माण करण्यात कोणाचा हातभार होता?' असं ह्याचं स्वरूप आहे.
मराठीचे शिक्षक फारसे लक्षात राहत नाहीत... -- कदाचित ह्यामुळेच ह्या उपक्रमाची कल्पना आली असावी.
मास्तर आणि बाई हे शब्दप्रयोग
मास्तर आणि बाई हे शब्दप्रयोग का वापरलेत? शिक्षक आणि शिक्षिका हे शब्द हवेत न?
मास्तर आणि बाई हे बोलीभाषेतील
मास्तर आणि बाई हे बोलीभाषेतील शब्द आहेत, म्हणून ते वापरले. शिक्षक/शिक्षिका हेही चालले असते. तसंही ह्यात फक्त शिक्षक/शिक्षिका इतकंच असलं पाहिजे, असे नाही. त्यामुळे औपचारिक शब्दाची आवश्यकता नाही.
कारण शाळेत बाई शिकवतात
कारण शाळेत बाई शिकवतात शिक्षिका पुस्तकात असतील कदाचित.
बाईच बरोबर आहे... मास्तर
बाईच बरोबर आहे... मास्तर बहुतेक जुन्या काळी म्हणत असावेत.. आम्ही सर म्हणायचो... गणिताचे सर... पीटी चे सर...
मराठी माध्यम असणाऱ्यांना तरी बाई आणि सर चुकीचे वाटणार नाही...
काही मायबोलीकरांना अजूनही
काही मायबोलीकरांना अजूनही अभिवाचन पाठवायची इच्छा आहे, पण वेळ झालेला नाही. लेखांबाबतीतही असं झालं आहे. त्यामुळे प्रवेशिका पाठवायची मुदत २ मार्च रात्री १२पर्यंत PST अशी एका दिवसाने वाढवण्यात येत आहे. अपूर्ण राहिलेल्या प्रवेशिका ह्या वेळपर्यंत पूर्ण करून पाठवाव्यात.
>>>>>लेखांबाबतीतही असं झालं
>>>>>लेखांबाबतीतही असं झालं आहे.
क्या बात है!! उदंड प्रतिसाद लाभत आहे. माबो अशीच बहरत राहो.