*****************************************************
****************************************************
रस्त्यावरुन जाणारी ती बायी कसल्यातरी घाईत असावी. मध्यम उंची, तीक्ष्ण नाक, साडी ओंगाबोंगा झालेली...केंस विखुरलेले..मात्र त्यातही ती आकर्षक दिसत होती. तिनं हातातली पर्स चक्क ओढून पकडल्यासारखी धरलेली...पण तिच कशाकडेच फारस लक्ष नव्हत. ती आणखी झपाझप चालायला लागली. तीच सगळ लक्ष सारख मागेच जात होत... त्याच्याकडे.. तो अजुनही मागेच येतोय का म्हणून. तिला अजुनही पाचेक मिनीटे तरी चालाव लागणार होतं... स्टेशनपर्यंत.
रोज टॅक्सीची चैन परवडणारी नव्हती. कालच नवर्याच तिसर्यांदा विचारुन झालेल - आजकाल तुझा जाण्या-येण्याचा खर्च बराच वाढलाय...या महीन्यात पाचव्यांदा एटीएमला जायला लागतय....राग आलेला पण तिनं प्रयासान आवरलेला. आता तिला स्टेशनच्या गर्दीत कधी एकदा घुसते अस झालेलं..त्याला टाळायचा तोच एक सोपा उपाय होता. नेहमी नकोशी वाटणारी गर्दी तिला आज हवीशी झालेली... नव्हे ती आसुसलेली होती त्या गर्दीत मिसळण्यासाठी! त्याच लगबगीत ती पोहोचली कशीबशी स्टेशनला एकदाची. गाडीची वाट पाहाता पाहाता तिला न्युजर्सीच जगण आठवलं....पण त्यालाही झाले की तीनं वर्ष आता...तिथे कसं सगळ एका रेषेत चालायच. मनीष पंधरा-पंधरा तास काम करायचा... घरात नसायचाच.. नुसता झोपण्यापुरता यायचा.
मीरा मनीष अत्रे ही तशी मध्यमवर्गीय संस्कारात मोठी झालेली अन आता नवरा अन मुलगी या विश्वात रममाण झालेली स्त्री. नवरा इंजीनिअर,अगदी अमेरीकेत पाच वर्ष नोकरी वैगरे केलेला. मीराचही आपल करीअर जे अमेरीकेच्या पाच वर्षांत पॉज घेतं झालेलं. मग काही कारणांनी मनीषला नोकरी सोडावी लागली अन कुटुंबासहीत परत याव लागलं भारतात. सुरुवातीला त्याला हवी तशी नोकरी मिळेना म्हणुन मीरान घेतली जी आता एक फुलस्केल करीअर होतेय. मनीष मात्र शोधतोच आहे तीन वर्ष झाली तरी!
दहा मिनिटांत फलाटाला गाडी आली.ती सरळ जाऊन लेडीज डब्ब्यात बसली.. फर्स्ट क्लासचा पास असूनही. तिला वाटलं तो पाठलाग करणारा तिथेही आला तर...! तिला आज त्या आजुबाजुच्या बायका केव्हढा आधार वाटल्या. बायकांनी बायकांना निर्हेतुक जपावं...सांभाळाव हे नेहमी अशा अवघडल्या क्षणीच का होतं आपल्या देशात... तिचा उगाचचा प्रश्न स्वताला..मग उगाच धुसमुसणं स्वताशीच... अन मग स्वताला समजावणही.
गाडीत बसल्यावर प्रथम तिनं खिडकीबाहेर पाहिलं...तो कुठ दिसतोय का म्हणून... कुठच दिसला नाही अन ती खुश झाली... पण उद्या काय? परत हेच झाल तर....आज दोन आठवडे झाले त्याला ती बघतेय सारख मागे मागे येतांना. तो बोलत काहीच नाही त्यामुळे ती पार गुदमरलेली... नवर्याला सांगितल तर त्यानं उडवून लावलं.. आता पस्तीशीत कोण तुझा एव्हढा पाठलाग करणार म्हणून. याचं काहीतरी करावच लागणारय...कोणाची मदत घ्यावी की सरळ पोलीसांत जावं? पण मनीष नको म्हणालेला.. उगाच ब्रभा होईल अन पोलीसांच नसतं लचांड मागे लागेल ही भीती होतीच त्याला अन तिलाही. गौतमला सांगाव का? तस गौतम ओळखतो तिच्या नवर्यालाही. ऑफीसातही नेहमी तत्पर असतो कोणालाही मदत करायला. मला जरा जास्तच अस ऑफिसमध्ये नेहा चिडवत असते सारखी. मी मात्र तो सिनीयर आहे याच भान नेहमीच बाळगते त्याच्याशी वागतांना ... पण त्याच मात्र नेहमीचच " कॉल मी बाय नेम - आय हॅव अ गुड नेम यु सी..." ....बघुया.. काहीतरी करावच लागेल - तीच स्वगत चालुच होत...
"मनीष तसाही काही कामाचा नाही याबाबतीत.. तसा न्युजर्सीवरन परत आल्यापास्न तो काहीच करत नसतो. त्याचे पेपर्स्,टीवी अन झोपणं. नोकरी शोध म्हणून कित्ती सांगुन झालय पण तेंव्हाही हलला नाही तेंव्हा आता काय... आता तीन वर्षात तर सवयच झालीय त्याला काही न करण्याची....."
...यासगळ्या गदारोळात अंधेरी कधी आलं तिला कळलच नाही. ती उठली अन गर्दी बरोबर आपोआप खाली टाकली गेली. मुंबईत लोकल्सकरता फलाटावर आलं अन एकदा गर्दीचा भाग झालं की काही कराव लागत नाही ..सगळ आपोआप कलेक्टीवली होतं...डब्ब्यात ढकलल जाणं..अन खाली उतरणही.
स्टेशनच्या बाहेर येते तो काय समोर मनीष...म्हणला तुझा लोकल पकडल्याचा एसेमेस मिळाला तेंव्हाच ठरवलं आज तुला सरप्राइज द्यायचं. गेल्या दोन आठवड्यांतल त्याच हे पाचव सरप्राइज! म्हणाला घरी चालतच जाऊ जरा व्यायाम होईल. मीही तयार झाले....नाहीतरी आजकाल कुठे मिळतात काही क्षण निवांत घालवायला या मुंबईच्या आयुष्यात अन मनीषही बराच बदललाय गेल्या काही वर्षात.. सुरुवातीला कामात आहे म्हणुन अस असेल अस मी समजावत असे स्वताला... पण गेली तीन वर्ष तर कामही नाहीय पण त्याच वागणं तसच -नीरस अन अलीप्त........"सगळीच लग्न होतात का अशी कालापरत्वे. नाती अशी अबोल का व्हावीत. एकमेकांना पुरत ओळखुन झालं- एकमेकांसाठी सगळ करुन झाल अस वाटायला लागत म्हणुन की एकमेकांसाठी काही वेगळ करत राहायच्या उर्मी थंडावतात म्हणुन? हे अव्याहत चालाव यासाठी लागणारी चेतना का नाही निर्माण करता येत अशावेळी बर्याच जोडप्यांना.मग बाबा कसे आईसाठी साठाव्या वर्षीही गजरा आणायचे.. "अहो जोशीबाई "ती" साडी घाला आज जरा बाहेर जातांना"म्हणायचे........."
असो.....आमच्या दोघांत तस नाहीय ते मात्र खर...बहुधा सुरुवातीलाच ते गणित कुठेतरी चुकलं. तीनं प्रयासान ते विचार दुर लोटले..घरी जाऊन तिला परत सगळ करायचच होत.. खाणं गरम करणं, वाढणं. पुरुषांनी हे केल तर किती अनर्थ होऊ शकतो याचा खुलासा तिला एकदा मनीषला विचारायचाय पण कधी ते ठरलेल नाही. ती घराचा रस्ता जवळ करु लागली अर्थात मनीष होताच बरोबर.
जेवणानंतर टीव्ही बघतांना मीरान मनीषला परत त्या पाठलाग करणार्याबद्दल सांगितल. तो नेहमीसारखा टीव्हीत गढलेला. तिला आता त्याच्या या गोष्टीचाही राग येईनासा झालेला. सुरुवातीची दोन वर्ष सोडली तर त्यांच्यातल्या संवादाची तशी घसरणच झालेली...तो कमी कमीच होत गेलेला. मीमांसा झाल्यानंतर तर तो संवाद अगदीच फंक्शनल पातळीवर पोहोचलेला. सुरुवातीला तिलाही पोरीला मोठं करायच्या नादात हे लक्षातच आल नाही अन आलं तेंव्हा उशीर झालेला. आता तर तीचं करीअर छान चाललेल म्हणुनच मनीष काही करत नाही याच तिला फार वाट्त नसे. मीमांसाला तो बाप म्हणुन पुर्णवेळ मिळतो अन तीची काळजी घेतली जाते हे पण तिला मोठ्ठं काम वाटायच.
दुसर्या दिवशी ती जरा लवकरच ऑफीसला पोहोचली. काही काम हातावेगळ करायच होत अन जमल्यास गौतमशी बोलायच होत त्या माणसाबद्दल. त्याला काय वाटतं ते अन काय करणं संयुक्तीक राहील ते - त्याचा दृष्टीकोन तर कळेल. गौतमन तीला केबीनलाच बोलावल. कशी सुरुवात करावी याची ती जुळवाजुळवच करत होती की गौतमनच सुरुवात केली.
"मीरा..दोन गोष्टींसाठी तुमच्याशी बोलायचय.. एक गुड न्युज आहे तर एक जराशी वेगळीच आहे. प्रथम चांगली बातमी : कंपनीनं तुम्हाला युरोपला पोस्ट करायच ठरवलय तिथलं इंडीया कोऑर्डीनेटर म्हणुन. अर्थात तुमची रिलोकेट व्हायची तयारी असेल तरच. सो अभिनंदन!!! दुसरं जरा काळजी करण्यासारख आहे..मी गेल्या काही दिवसांचा विचारीन म्हणतोय तुम्हाला... इकडे काही माणसं येऊन तीन-चारदा चौकशी करुन गेली तुमची. अर्थात ऑफीशिअली नाही पण बाहेरच्या बाहेर. मला आपल्या सिक्युरीटी मॅनेजरनी सांगितल. ते बरच काही विचारीत होते गार्डसना बाहेर काही चिरीमिरी देऊन. तुम्ही कुठे-कुठे जाता, कुणाला भेटता, कुणाशी मैत्री वैगरे. मी ताकीद दिलीय सगळ्यांना तेंव्हा तो बंदोबस्त तर झालाय पण तुम्हाला कस सांगायच-विचारायच ते ठरवत होतो. बरच झाल तुम्ही आज आलात ते."....गौतमन एका फ्लोमध्ये तीला सगळ सांगितल.. ती अवाकच झाली या खुलाश्याने..
"गौतम... मी पण त्याचसाठी आलेले आज तुमच्याकडे.. गेल्या काही दिवसांपास्न मला कोणी फॉलो करतय अस वाटतय. माझ्या सेलफोन कंपनीतही कोणी चौकशीला गेलेलं म्हणुन त्यांचा फोन आलेला मला. काय असाव ते समजत नाहीय... माझ अस काहीच नाहीय जे कोणाच्या अशा पहार्याचा विषय व्हावं. छोटस कुटुंब आहे..आनंदी आहे... नोकरीतही सगळ आलबेल आहे - तुमच्या समोरच आहे सगळ"...तीनही एका दमात बोलुन टाकल...
गौतमही विचारात पडला. का अन कोण करत असाव हे सगळ.
"आपण अस करुया.. आज मी येतो तुमच्याबरोबर अगदी घरापर्यंत. बघुया हे प्रकरण काय आहे ते..सरळ पकडुनच विचारतो त्याला.." गौतमन सरळ जाहीरच केल.
पण तिला ते ऐकुन मात्र बरच हायस वाट्ल. एका दमात टेबलवरचा पाण्याचा ग्लास रिकामा करीत तीनं त्याला थँक्स म्हटल अन संध्याकाळी बरोबर सहाला निघायच ठरवुन तिनं त्याचा निरोप घेतला.
सहाला दोघही तिच्या नेहमीच्या रस्त्यानेच निघाले. स्टेशन आठ्-दहा मिनिटांच्या रस्त्यावर होत. गौतमनी तिला इशार्यात कस सांगायच ते सगळ दुपारीच शिकवलेल. अपेक्षेप्रमाणे तो माणूस ऑफीसपासनच मागे यायला लागला. थोड चालून झाल्यावर गौतम म्हणाला
" मीरा अस केल तर - जस्ट टू वेरीफाय की तो आपल्याच मागे येतोय,आपण रस्त्यात एका कॅफेला थांबुया. बघु तो तिथेही येतो का ते... जर आलाच तर मी त्याला तिथेच पकडतो. ड्रायवरला मग तिथेच बोलवू कार घेऊन अन सरळ देऊ पोलीसात - जर गरज पडली तर..".
मीरालाही प्लॅन पटला. ते सरळ रस्त्यातल्या कॅफेत शिरले अन दरवाजा दिसेल अस टेबल पकडुन दोघही बसले.
"काय घेणार.. या निमीत्ताने का होईना मी तुम्हाला कॉफी ऑफर करतोय.." गौतम मिश्कीलपणे म्हणाला.
मीरानं कापुचिनो अन त्यानं कॉफी लाते ऑर्डर केली. यादरम्यान तो माणूस दोनदा आत डोकावून गेलेला दोघांनीही पाहीला.
" आपण कॉफी संपवुया अन मग मी पकडतो त्याला.."
गौतमन तिला आपला मनसुबा सांगीतला. तस ठरलही. बाहेर हलका पाऊस सुरु झालेला.
"आवडी-निवडी बोलायची वेळ नाहीय पण मला पाऊस बघायला खुप आवडतो.... अन चहा-कॉफी वैगरे असेल तर बोनस.." गौतमन बाहेर पावसाकडे बघत म्हट्लं.
"पाऊस्-कॉफी समजल पण हे वैगरेत काय अंतर्भुत होतं गौतम.." मीरान त्याला सहजच विचारल अन तो मोठ्यान हसला.
त्याच हसण सुरुच होत अन मीराच लक्ष दाराकडे गेल............... तिथ मनीष उभा !!! रागान लालबुंद झालेला... तो तरातरा चालत तिच्या टेबलपर्यंत आला.......
"तर हे आपल ऑफीस आहे मॅडम..." अरे...ऐक तर हे गौतम...माझ्या.." तो काही ऐकायच्या मुडमध्येच दिसत नव्ह्ता.
"मला कधीपास्न हा संशय होता की तू बाहेर कुणाला भेटत असतेस नेहमी...तुझं काहीतरी चाललय गुपचुप. कामाच्या नावान तुझ उशीरा रात्री घरी येण..सगळच बघत होतो मी..अन आता हे इथे स्पष्ट दिसतय". मग मात्र ती जरा तडकलीच...
"मनीष काय हे ...लेट्स गो होम अन टॉक.. गौतम सो सॉरी फॉर ऑल धीस"...
गौतम अवाक झालेला तीला स्पष्ट दिसत होता. ती उठली अन मनीषबरोबर चालायला लागली. बाहेर तिन सरळ टॅक्सीलाच हात दिला. टॅक्सीत बसल्याबसल्याच त्याचा पट्टा सुरु झाला.... तो सरळसरळ तिच्यावर फसवणुकीचा आरोप करत होता. तिला आतबाहेर गलबलुन आलं..ज्या माणसासाठी तिन सगळ केलं.... लग्नाच्या बंधनात सगळं वळवुन घेत गेली तोच आज तिला सरळ वाममार्गी ठरवत होता.तिच्या डोळ्यासमोर लग्नाची बारा वर्ष सर्रकन तरळुन गेलीत..... फलीत समोर घडत होत. तिला भरपुर रडुही आलं आपल्या असहायतेवर्...पण तिनं कसबस सावरल स्वताला...
मनीषला यावर काय प्रतिसाद द्यावा याचं त्रांगड तिच्या डोक्यात फेर धरत होतं...त्याला समजवाव कस? हा असा इतका टोकाची गोष्ट कशी करतोय आज वैगरे अनेक प्रश्न होते ज्यांची उत्तरं तिच्याजवळ नव्हती.. ती शांतपणे घर यायची वाट पाहू लागली!!!!
टॅक्सीच बील देऊन वर घरात येईपर्यंत कोणी काही बोललं नाही.
मीरानं फ्रिजमधन पाणी घेतलं.... थोड प्यायली..थंडगार पाण्यान बर वाट्ल तिला. पाणी संपवून ती त्याच्या समोर येऊन बसली ...
"ऐक मनीष.. गौतम माझा फक्त सहकारी आहे अन हे मी अगदी आई-बाबा-मीमांसाच्या शपथेवर सांगु शकते. तू समजतोयस तस काहीही नाहीय्...तु उगाच घरी असतोस म्हणुन बहुधा तू जरा फ्रस्ट्रेट झालेलायस.. अन मी ते समजते. अरे कोणी मला गेली दोन्-तीन आठवडे जे त्रास देतय पाठलाग करून..ती लोक माझ्या ऑफीसमध्यही येऊन माझ्याबद्दल काहीबाही विचारतायत्...माझ्या सेलफोन कंपनीतूनही फोन आलेला की कोणी माझी फोन रेकॉर्डस मागत होती म्हणुन्...त्यासगळ्यावर मी गौतमची मदत घेऊ बघत होते. तू आला नसतांस तर आम्ही त्या पाठलाग करणार्या माणसाला पकडलाही असता आज.."
तिला मध्येच तोडत मनीष म्हट्ला" तो मी तुझ्या मागावर ठेवलेला माणुस होता.... तुझ्या हालचालींचा छडा लावायसाठी मी एका डिटेक्टीव्ह कंपनीची मदत घेतलीय अन त्यांचीच माणस हे सगळ करतायत.." .........
मनीषच बोलणं ऐकून तीला आभाळ अंगावर आल्यागत झाल. तिनं कसाबसा डायनींग टेबलाचा आधार घेतला. काय कराव ते तिला सुचेना.सगळी दुनिया थांबलीय अन फक्त आपल्या घराच्या भिंती गोल फिरतायत अस वाटत राहीलं बराच वेळ तिला...
" मनीष तूऊऊऊऊऊऊ ????? तू केलस हे सगळं ?" ती कशीबशी पुटपुटली.
त्यानं गोंधळल्यासारखी होकारार्थी मान डोलावली. त्याच्या चेहर्यावर त्यान केलेला आततायीपणा चुकल्याच स्पष्ट दिसत होत.ती परत फ्रीजजवळ गेली..पाण्याची बाटली काढुन तीनं सरळ डोक्यावर ओतली.. तीला संशयाच्या सरणावर ठेवुन पेटवल्यागत झालेल... ते विझवाव कस ते सुचत नव्हत. ती मटकन खाली जमीनीवरच बसली.......तिच्या नजरेसमोरुन त्याच्यासोबत केलेली सुरुवात्-सुरुवातीपासनच कसलीतरी उणीव सतत जाणवलेली-त्यातही तिच नेहेमी परीस्थितीशी जुळवुन घेण-विवाहसंस्थेच नागमोड वागणं-नवरा या विशेषणातला जाणवलेला एक दर्प हे सगळं क्षणात झरकन फिरुन गेलं ...
अन हे कितीवेळ सोसायच हे ठरवायची वेळ आलीय असही तिला तीव्रतेने जाणवल.
मनीषच्या या वागण्यान आपल अस्तीत्व किती तोकड होऊ शकतं.... नव्हे मनीषनी ते तोकड करुन दाखवलय असही वाटून गेल...ते मात्र मीराला जास्त उसवून गेलेल.
थोडावेळ विचार केला अन ती काही तरी ठरवुन उठल्यासारख करत उठली. डायनींग टेबलवर येऊन बसली. मनीषही आला... बसला.
"मी अस करायला नको होतं अस वाटतं..चुकलो ग्...सॉरी मीरा!!!"
तिन मान वर करुन त्याच्या डोळ्यांत नजर घातली.. तिच्या डोळ्यात कसलासा निश्चय दिसला त्याला..
"ऐक मनीष...मला वाटतं जे झाल ते खुप वाईट झाल..बारा वर्षांची माझी तपश्चर्या तू दोन क्षणात मातीमोल केलीस. तुझ्या प्रोफेशनल अपयशान फ्रस्टेट होऊन तू मला शिकार करायला गेलास. अरे तु अमेरीकेत रात्री दोन्-दोन वाजता घरी यायचास पण मी नाही लावले डिटेक्टीव्हज तुझ्यामागे कधी. माझ्या मनालाही तो विचार कधी शिवला नाही. बहुधा आपल्या संस्कारांतला फरक असावा तो......."........
"आज गेल्या बारा वर्षांत मी स्वताला हरवुन तुझ्याबरोबर एकरुप झालेली कारण तोच मला यशस्वी जगण्याचा रस्ता वाट्ला पण तस नसाव बहुधा. निरपेक्षतेची चाड कुठल्याही नात्यात दोघांकडुनही रुजवावी लागते...आपल्यात ते माझ एकट्याच काम झालं अन आता या असल्या शहानिशा मला फेस कराव्या लागतायत... एकदम अनफेअर मनिष अन तुझं अस वागणं हा अक्षम्य गुन्हाच ठरायला हवा! अरे विवाह्संस्थेत निष्ठा निखार्यासारख्याही होऊ शकतात अन थंड वार्याच्या झुळुकीसारक्याही - नवराबायको सहचर म्हणुन त्या कशा बजावतात यावरच सगळ ठरतं. पण निष्ठा अन हक्क जेव्हां एकतर्फी होतात ना तेंव्हा मात्र हे असच होत..मी निष्ठेच पुस्तक वाचत राहीले अन तू हक्कांच...यात झालेली पडझड लक्षातच आली नाही कधी तुझ्या-माझ्या!!!! ...."
"....जाऊ देत हे सगळ आता तुला सांगायला उशीर झालाय. तू असले डिटेक्टीवज माझ्या मागे लावुन हे नातं एका तकलादू पातळीवर आणून ठेवलयस. मग या भंगूरतेवर मीही काही ठरवायला हवच... मनीष ऐक... मी ठरवलय की मी मीमांसाला घेऊन विभक्त होणार. अन तू प्लीज यात मला थांबवायला जाऊ नकोस. गेली बारा वर्ष मी एक खेळणं होऊन तुझ्याबरोबर नांदले..आनंदाने ..कारण कुठेतरी एक उबदार सहचर्य आहे हा विश्वास होता मनाशी. पण आज तू ते सगळ तोडलयस.माझी किंमत शुन्य करुन टाकलीयस या नात्यांत ...मग एकत्र राहाण्यात गोडी कसली.. राहीलो तरी आता ती मझा नाही...अन मला ते मारुन मुटकुन आनंदाची सोंगं घेणं जमणारही नाही..."...
"...तेंव्हा ज्यांच्याबद्दल तुला प्रचंड आत्मीयता आहे ते तुझे अमेरीकेन डॉलर्स तुला लखलाभ्...मी माझं बघीन. अजुनही उशीर झालेला नाहीय खरी आत्मीयता शोधायला.. बघेन कुठे सापडली तर... गुड लक!!!" ...........अस म्हणुन ती उठलीही. सुटकेसमध्ये काही कपडे कोंबले... झोपलेल्या मीमांसाला कडेवर घेतलं अन ती निघालीही... मागे वळुन न पाहाताच... तो उंबरा ओलांडून .... कायमचाच!!!!
ती बिल्डींगच्या खाली आलेली तर खाली गौतम उभा! तिला आश्चर्य वाटलं. त्यानं पुढ येऊन तिच्या हातातली सुटकेस घेतली
"मी अस काही होईल हे ओळखुन होतो मनीषचा कॅफेतला अवतार पाहून..अन म्हणुन मागेमागे आलो अन इथे थांबलो होतो काय कराव त्याचा विचार करत"
ती त्यावर काहीच बोलली नाही. त्यानं सुटकेस कारच्या डीकीत टाकली. डिकी बंद करता-करता गौतम म्हणाला "मी तुम्हाला माझ्या घरी नेतोय...नकार नका देऊ..भाडं द्या हव तर्.." अस म्हणुन त्यानं मीमांसाला तिच्या कडेवरुन घेतलही. मीमांसाला मागच्या सीटवर झोपवुन गौतम व्हीलवर आला...
" मीरा... मी यातनं गेलोय म्हणुन समजतो सगळं. थोड्याच दिवसांची गोष्ट आहे मग होईल सगळ स्थिरस्थावर."
"पण गौतम ... मला तुमच्याकडे राहायला नाही आवडणार..."
" अरे जास्त दिवस नाहीय... युरोपचा व्हीसा दोन आठवडे अन मग तुम्ही कुठे दिसणार आहात आम्हाला मॅडमे ...सो डोंट वरी".
त्याच्या प्रांजळ हसण्यात ती विसरलीच ती काय करुन येतेय ते.....सिग्नलला थांबलेल्या शेजारच्या टॅक्सीतनं एफएम रेडीओ ओसंडून वाहात होता.................................
"जहांसे तुम मोड मुड गये थे...वो मोड अब भी वहीं खडे है ......."!!!!!!!
****************************************************
****************************************************
--------समाप्त-----------
मित्रहो... हा माझा कथालेखनाचा
मित्रहो... हा माझा कथालेखनाचा पहीलाच प्रयत्न...सध्याच्या युगात नाती कशी नागमोडी आकार घेतायत ,रोजच्या जगण्यातल्या जाणीवा कुठल्या दिशेला जातायत या साध्याशा संकल्पनेवर मी या कथेला बेतलय. कथेची नायीका अन सगळाच बॅकड्रॉप हा पुरोगामी समाज व्यवस्थेचा भाग आहे.
मला कथा लिहायला उद्युक्त करणार्या अन या कथेवर पहीला अभिप्राय देणार्या योगेश प्रभुण्यांचे यायोगे मनःपुर्वक आभार!!!
सस्नेह : गिरीश
छान जमली आहे कथा
छान जमली आहे कथा
कथा आवडली .
कथा आवडली .
गिरीशराव... हळुहळु आपल्या
गिरीशराव... हळुहळु आपल्या अष्टपैलूत्वाची जाणीव करुन देताय तर
छान आहे कथा आवडली....! तरीही एक वाटलं की मनीषच्या मनोवस्थेवर अजुन थोडासा प्रकाष टाकता आला असता. मीरा आणि गौतमच्या नात्यावरही अजुन थोडे लिहीता आले असते. पण एकंदरीत पहिला प्रयत्न असेल (तसे वाटत नाहीय खरेतर ) चानच आहे. पुलेशु. !
गिरिश, पहिला प्रयत्नं वाटत
गिरिश, पहिला प्रयत्नं वाटत नाहीये... छान उतरलीये. मला आवडली. फक्तं मीराच्या दृष्टीकोनातून घेतलेली असूनही आवडली. कुठेतरी तुमची सुरेख शैली त्याला कारणीभूत असणार.
अजूनही जमलं तर एक गोष्टं कराल? कथा वाचायला सोप्पी होईल. - थोडे अधिक परिच्छेद करा. संवाद वेगळे असूद्या.
गिरीश, आभार मानून मित्राला
गिरीश,
आभार मानून मित्राला लाजवू नका. तुमची भाषा प्रवाही आहे आणि कविमन असल्याने संवेदनशीलताही आहेच. कथालेखनासाठीची मूलभूत गुणसंपदा तुमच्याकडे आहेच. मी केवळ त्याला उत्तेजन देण्यापुरता निमित्तमात्र. जाणकार माबोकर मित्र हा आपल्या लेखनासाठी आरसा असल्याने त्यांच्या सूचना लक्षात घ्या आणि कथेच्या प्रांतातही वेगाने आगेकूच करा. पुढील लेखनासाठी मनापासून शुभेच्छा!
जीके, दाद आणि विकु यांच्या
जीके, दाद आणि विकु यांच्या सल्ल्यानंतर काय बोलणार ? कथानक छानच आहे. चला, माबोला अजून एक चांगला लेखक मिळाला म्हणायचा !!!
खुपचं छान गिरिश..पहील्या
खुपचं छान गिरिश..पहील्या प्रयत्नातही कथा आटोपशीर आणि सरळमार्गी असल्याने खुप छान वाटली वाचताना.. अजुन लिहित रहा नविन नविन कथा... खुप शुभेच्छा !!!
छान कथानक.
छान कथानक.
छान
छान
खुप मस्त कथा आहे
खुप मस्त कथा आहे गिरीशजी..आवडली...बकी एवढ्या मोठमोठ्या लेखकांची दाद मिळाल्यानंतर या अधिक काही लिहायला सुचत नाही आहे...लिहीत रहा..माझ्या शुभेच्छा!
कथा आवडली. मीराने
कथा आवडली. मीराने पाठलागाबद्दल सांगूनही मनिष लाईटली घेणं, तेव्हाच पुढे काय याचा अंदाज आला. त्याचं थोडं काळजीच नाटक असतं तर नंतर जास्त मजा आली असती.
कॉफीशॉपमधे जाईपर्यंत फार मस्त
कॉफीशॉपमधे जाईपर्यंत फार मस्त चालली होती. नंतरच्या घटनांचा अंदाज आला होता पण तरी मस्त वाटत होतं. पण कॉफीशॉपपासून हिंदी सिनेमासारखा स्पीड लागला सगळ्याला. थोडं गुंडाळल्यासारखं झालं. हे आपलं माझं मत.
पु. ले. शु.
कथा छान जमल्ये. मनिषच्या
कथा छान जमल्ये. मनिषच्या सहभागाचा थोडा अंदाज आला.
पण एकुणात आवडली.
छान आहे
छान आहे
छान लिहीता.. आवडली
छान लिहीता.. आवडली
अरे वा.. ह्या प्रांतात पण ?
अरे वा.. ह्या प्रांतात पण ? छानच जमलिय कथा.. !!!
छान गिरिशजी !! पहिला प्रयत्न
छान गिरिशजी !! पहिला प्रयत्न वाटत नाही पहिला इतकी झकास जमलीये कथा. कथावस्तु छान ..कुठेही वास्तवतेची पातळी सोडली नाहीये..अन अतिरंजितही होत नाहीये कथा..
खुप फुलवताही आली असतीही तुम्हाला गौतमच्या नात्यातुन..पण योग्य थांबलात ..मस्त कथा!! ..:) keep it up..all the best..:)
छान आहे. आवडली
छान आहे. आवडली
गिरिश जी ! नमस्कार ! फार
गिरिश जी ! नमस्कार !
फार आवडली तुमची कथा . फक्त वाचण्या सारखीच नाही , घेण्या सारख सुध्दा खूप्-खूप आहे.
>>>निरपेक्षतेची चाड कुठल्याही नात्यात दोघांकडुनही रुजवावी लागतात ..>>><<< -भन्नाड
कथा चांगली झाली आहे. थोडी
कथा चांगली झाली आहे. थोडी चित्रपटासारखी झाली शेवटी.
छान! आवडली
छान! आवडली
छान आहे कथानक!! थोड्या लहान
छान आहे कथानक!! थोड्या लहान लहान पॅरेग्राफ मधे टाकले तर सोप होईल वाचायला
मित्रहो : सगळ्यांच्या
मित्रहो : सगळ्यांच्या प्रतिसाद व सुचनांचे मनःपुर्वक आभार!!!
विशाल-कौतुक-बांसुरी-दाद : आपल्याकडुन आलेले प्रोत्साहन मोलाचे आहे..खुप धन्यवाद!!!
मी नागपुरला हिस्लॉप कॉलेजला असतांना "स्टोरी बिल्डींग कंपीटीशन" मध्ये लिहिलेल्या कथेव्यतीरीक्त कधी हा प्रयत्न केला नव्हता...( त्यात बक्षीस मिळालेल पुस्तक मी आजही जीवापाड जपतो..:-) ) त्यामुळे ही तशी माझी पहिलीच कथा. योगेश प्रभुण्यांनी त्यांच्या फोर्सफुल स्टाईलनी मला कथालेखनाकडे बघा म्हणुन आवर्जुन कळवल नसत तर बहुधा मी आताही लिहिली नसतीच... हे पेशंस माझ्यात नाहीत.. कविता नेहेमीच जवळचीही वाटत आलेली पण ही नवी मैत्रीणही छानच आहे..... बघुया पेशंस डेव्हलप होतात का ते...
आपणा सगळ्यांच्या सुचनेनुसार पॅरेग्राफ पाडलेयत्...संवादही वेगळे मांडलेयत..
मनीष्-गौतमची व्यक्तीचित्र मी मुद्दामच तशी ठेवलीत कारण कथेचा कोअर मला मीरा अन तिच द्वंद हेच पाहीजे होत. नीधपंनी व इतरही काही मित्रांनी म्हटल्याप्रमाणे शेवट जरा फिल्मी झालाय... मला कथा प्रवाही ठेवायची होती अन जास्त ऑप्शंन्स निर्माण करायची नव्हती म्हणुन बहुधा जरा घाई झाली असावी..
पुन्हा सगळ्यांचे खुप खुप आभार .....
सस्नेह : गिरीश
अगदी खर खर लिहिल आहे
अगदी खर खर लिहिल आहे तुम्हि.
पन नेह्मिच गौतम मिलत नहि.
आनि मिरासरखि. सन्धी समोर वात पाहत नस्ते.
good luck.
जशी आहे अगदी तश्शी आवडली कथा!
जशी आहे अगदी तश्शी आवडली कथा!
कथा चांगली झाली आहे.. एक
कथा चांगली झाली आहे.. एक नाजुक विषय खुप सुंदर पणे हाताळला आहात..
पहिलाच प्रयत्न आसा...तर पुढे काय....पु.ले.शु..
गिरीश, ते डिटेक्टीव वगैरे न
गिरीश, ते डिटेक्टीव वगैरे न टाकता नवराच पाठलाग करतोय , चौकशा करतोय वगैरे ठेवलं असतं तर अधिक रीअल झालं असतं. अजुन काही मुद्दे जाणवले पण असो, तुम्ही सुरुवात चांगली केलीत. शुभेच्छा
गिरीश, छान लिहीलीत कथा.
गिरीश, छान लिहीलीत कथा. पु.ले.शु.
अजुन एक गंमत झाली, मी मिमांसा हे नाव पहिल्यांदाच ऐकलं,( म्हणजे वाचलं) त्यामुळे थोडा समजायला गोंधळ झाला, त्या पॅरिग्राफच्या शेवट्च्या वाक्याला समजल कि हे मुलीचं नावं !!
पुनःश्च सगळ्यांचे मनःपुर्वक
पुनःश्च सगळ्यांचे मनःपुर्वक आभार....!!!!
पल्ली : नवर्याचे पाठ्लाग आता जास्तच रिअल झालेयत म्हणुन ऐसे किया...
सस्नेह : गिरीश
Pages